रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
जिवंत की मेलेली?
१ राणीहाटचे जमीनदार शारदाशंकरबाबू यांच्या घरच्या विधवा सुनेच्या माहेरी कुणीच उरलं नव्हतं; एकेक करून सगळे वारले होते. सासरीही खरं तर आपलं म्हणावं असं कुणी नव्हतं — ना नवरा, ना मुलगा. थोरल्या दिराचा एक मुलगा, शारदाशंकरांचा धाकटा मुलगा, तोच तिचा जीव की प्राण होता. तो जन्मल्यानंतर त्याची आई बरेच दिवस कठीण आजारानं अंथरुणाला खिळून होती, म्हणून या विधवा काकूनं — कादंबिनीनंच — त्याला वाढवलं होतं. दुसऱ्याचं मूल वाढवलं की त्याची ओढ जणू अधिकच लागते, कारण त्याच्यावर हक्क नसतो; समाजापुढे त्याच्यावर कसलाही दावा चालत नाही, असतो तो फक्त मायेचा — पण नुसती माया आपला दावा समाजापुढे कुठल्याही दस्तऐवजानं सिद्ध करू शकत नाही, आणि तसं करू पाहतही नाही; ती फक्त आपल्या त्या अनिश्चित जिवाच्या ठेव्यावर दुप्पट व्याकुळतेनं प्रेम करत राहते. विधवेचं सारं कोंडलेलं प्रेम या मुलावर शिंपून, श्रावणातल्या एका रात्री कादंबिनी अचानक मरण पावली. एकाएकी कशामुळे कोण जाणे, तिच्या हृदयाची धडधड थांबली — जगात इतर सगळीकडे काळ चालत राहिला, फक्त त्या मायेनं व्याकूळ, लहानशा, कोमल छातीत काळाच्या घड्याळाची कळ कायमची बंद पडली. पोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून फारसा गाजावाजा न करता जमीनदारांचे चार ब्राह्मण कारभारी लगेचच प्रेत दहनासाठी घेऊन गेले. राणीहाटचं स्मशान वस्तीपासून खूप दूर आहे. एका तळ्याकाठी एक झोपडी, तिच्याजवळ एक प्रचंड वडाचं झाड; त्या विस्तीर्ण माळावर बाकी कुठे काहीच नाही. पूर्वी इथून नदी वाहत असे; आता नदी पार आटून गेली आहे. त्या कोरड्या पात्राचा एक भाग खणून स्मशानाचं हे तळं बनवलं आहे. आजचे लोक हे तळंच त्या पवित्र नदीचं प्रतिनिधी मानतात.
जिवंत की मेलेली?
प्रेत झोपडीत ठेवून, चितेचं लाकूड येण्याची वाट पाहत चौघे बसून राहिले. वेळ इतका लांबल्यासारखा वाटू लागला की अधीर होऊन चौघांपैकी निताई आणि गुरुचरण लाकडाला एवढा उशीर का होतोय ते पाहायला गेले; विधू आणि वनमाली प्रेताची राखण करत बसून राहिले. श्रावणातली अंधारी रात्र. आभाळ कोंदून आलं होतं, एकही चांदणी दिसत नव्हती; त्या अंधाऱ्या खोलीत दोघे गप्प बसून राहिले. एकाच्या उपरण्यात काडेपेटी आणि मेणबत्ती बांधलेली होती. पण पावसाळ्यातली काडेपेटी; कितीही खटपट केली तरी पेटली नाही — बरोबर आणलेला कंदीलही विझून गेला होता. बराच वेळ गप्प राहिल्यानंतर एक जण म्हणाला, 'अरे बाबा, एक चिलीमभर तंबाखूची सोय असती तर फार बरं झालं असतं. घाईघाईत काहीच आणलं नाही.' दुसरा म्हणाला, 'मी चटकन एक धाव मारून सगळं घेऊन येतो.' वनमालीचा पळून जायचा बेत ओळखून विधू म्हणाला, 'वा रे वा! आणि मी काय इथे एकटा बसून राहायचं, वाटतं!' पुन्हा बोलणं थांबलं. पाच मिनिटं एका तासासारखी वाटू लागली. जे लाकूड आणायला गेले होते त्यांना हे दोघे मनातल्या मनात शिव्या घालू लागले; ते कुठेतरी मस्त आरामात बसून गप्पा मारत तंबाखू ओढत असणार, हा संशय त्यांच्या मनात हळूहळू दाट होत चालला. कुठे कसलाही आवाज नव्हता — फक्त तळ्याकाठून रातकिड्यांची किरकिर आणि बेडकांचं डरावणं अखंड ऐकू येत होतं. इतक्यात वाटलं, खाट जरा हलली; जणू प्रेतानं कूस बदलली. विधू आणि वनमाली रामनाम जपत थरथर कापू लागले. एकाएकी खोलीत एक दीर्घ उसासा ऐकू आला. विधू आणि वनमाली — क्षणार्धात खोलीतून उडी मारून बाहेर पडले आणि त्यांनी गावाच्या दिशेनं धूम ठोकली.
जिवंत की मेलेली?
जवळजवळ दीड कोस गेल्यावर त्यांना दिसलं, त्यांचे उरलेले दोघे सोबती हातात कंदील घेऊन परत येत आहेत. ते खरोखरच तंबाखू ओढायला गेले होते, लाकडाची त्यांना काहीही खबर नव्हती; तरीही त्यांनी सांगितलं की झाडं तोडून लाकूड फोडणं चालू आहे — थोड्याच वेळात रवाना होईल. तेव्हा विधू आणि वनमालीनं झोपडीतली सारी हकीकत सांगितली. निताई आणि गुरुचरणानं ती अविश्वासानं हसण्यावारी नेली, आणि कर्तव्य सोडून पळून आल्याबद्दल त्या दोघांवर फार संतापून त्यांची भरपूर खरडपट्टी काढली. क्षणाचाही विलंब न करता चौघेही स्मशानातल्या त्या झोपडीपाशी जाऊन पोहोचले. आत शिरून पाहतात तो प्रेत नाही; रिकामी खाट पडलेली. ते एकमेकांच्या तोंडाकडे पाहत राहिले. कोल्ह्यांनी नेलं असेल का? पण अंगावरचं आच्छादनाचं वस्त्रसुद्धा नाही. शोधता शोधता बाहेर येऊन पाहतात तो झोपडीच्या दाराशी थोडा चिखल साचला होता, त्यात एका स्त्रीची ताजी, लहानशी पावलं उमटलेली. शारदाशंकर काही साधेभोळे गृहस्थ नव्हते; त्यांना ही भुताची गोष्ट सांगितली तर काही चांगलं निष्पन्न होईल, अशी शक्यता नव्हती. तेव्हा चौघांनी बरीच खलबतं करून ठरवलं की दहनविधी पार पडला अशीच खबर देणं बरं. पहाटेच्या सुमारास जे लाकूड घेऊन आले, त्यांना सांगण्यात आलं की उशीर होतोय हे पाहून आधीच काम उरकलं; झोपडीत लाकूड साठवलेलं होतं. याबद्दल कुणाला सहजासहजी शंका येण्याचं कारण नव्हतं — कारण प्रेत काही इतकी मौल्यवान मालमत्ता नव्हे, की कुणी हातोहात फसवून चोरून नेईल.
जिवंत की मेलेली?
२ सगळ्यांनाच ठाऊक आहे की जीवनाचं कोणतंही लक्षण दिसत नसतानाही पुष्कळदा जीव आत दडून राहिलेला असतो, आणि वेळ आली की त्या मृतवत देहात तो पुन्हा आपलं काम सुरू करतो. कादंबिनीही मेली नव्हती — एकाएकी कशामुळे कोण जाणे, तिच्या जीवनाचे व्यापार थांबले होते. ती शुद्धीवर आली तेव्हा तिला दिसलं, चोहीकडे गडद अंधार. नेहमीच्या सवयीनं ती जिथे झोपत असे, ती ही जागा नव्हे असं तिला वाटलं. तिनं एकदा हाक मारली, 'ताई' — अंधाऱ्या खोलीत कुणी ओ दिली नाही. घाबरून ती उठून बसली, आणि तिला ती मृत्युशय्या आठवली. छातीपाशी अचानक उठलेली ती कळ — श्वास कोंडू लागलेला. तिची थोरली जाऊ खोलीच्या कोपऱ्यात शेगडीवर बाळासाठी दूध तापवत होती — कादंबिनीला उभं राहवेना, ती अंथरुणावर कोसळली — घुसमटलेल्या आवाजात म्हणाली, 'ताई, एकदा बाळाला आणून दे गं, माझा जीव कसासाच होतोय.' त्यानंतर सगळं काळं होत गेलं — जणू लिहिलेल्या वहीवर दौतीसकट शाई सांडली — कादंबिनीच्या साऱ्या आठवणी आणि जाणीव, विश्वग्रंथाची सारी अक्षरं एका क्षणात एकाकार झाली. बाळानं तिला अखेरचं एकदा आपल्या त्या गोड, लाडिक आवाजात 'काकू' म्हणून हाक मारली होती की नाही, आपल्या अनंत, अज्ञात मरणयात्रेच्या वाटेवर चिरपरिचित पृथ्वीवरून ही मायेची शेवटची शिदोरी तिनं बरोबर घेतली होती की नाही, हेही त्या विधवेला आठवत नव्हतं. आधी तिला वाटलं, यमलोक बहुधा असाच — कायमचा निर्जन आणि कायमचा अंधारलेला. तिथे पाहण्यासारखं काही नाही, ऐकण्यासारखं काही नाही, करण्यासारखं काही नाही; फक्त असं जागं होऊन युगानुयुगं बसून राहायचं.
जिवंत की मेलेली?
मग उघड्या दारातून अचानक पावसाळी गार वाऱ्याचा झोत आला आणि पावसाळ्यातल्या बेडकांचं डरावणं कानी पडलं, तेव्हा एका क्षणात तिच्या या अल्पशा आयुष्यातल्या, बालपणापासूनच्या साऱ्या पावसाळ्यांच्या आठवणी एकवटून मनात दाटून आल्या, आणि पृथ्वीचा जवळचा स्पर्श तिला जाणवू लागला. एकदा वीज चमकली; समोरचं तळं, वडाचं झाड, विस्तीर्ण माळ आणि दूरवरची झाडांची रांग एका निमिषात तिच्या नजरेत भरली. तिला आठवलं, अधूनमधून पर्वणीच्या तिथीला ती या तळ्यात स्नानाला आली होती; आणि आठवलं, त्या वेळी या स्मशानात प्रेतं पाहून मृत्यू किती भयानक वाटत असे. सर्वांत आधी तिला वाटलं, घरी परत जायला हवं. पण लगेच तिच्या मनात आलं, 'मी तर जिवंत नाही; मला घरात कशाला घेतील? तिथे अमंगळ होईल. जिवंतांच्या राज्यातून मी हद्दपार होऊन आले आहे — मी माझंच भूत आहे.' तसं नसतं तर या मध्यरात्री शारदाशंकरांच्या कडेकोट अंतःपुरातून ती या दुर्गम स्मशानात आली कशी? आणि अजून तिचे अंत्यसंस्कार उरकले नसतील, तर दहन करणारी माणसं गेली कुठे? शारदाशंकरांच्या दिव्यांनी उजळलेल्या घरातला आपल्या मरणाचा शेवटचा क्षण तिला आठवला, आणि त्यानंतर लगेच या दूरवरच्या निर्मनुष्य, अंधाऱ्या स्मशानात स्वतःला एकटी पाहून तिला कळून चुकलं, 'मी आता या पृथ्वीवरच्या माणसांपैकी कुणीच नाही; मी अतिशय भीषण आहे, अमंगळ करणारी आहे; मी माझंच भूत आहे.'
जिवंत की मेलेली?
हा विचार मनात येताच तिला वाटलं, तिच्या भोवतीची विश्वनियमांची सारी बंधनं जणू तुटून गेली आहेत. जणू तिच्यात अद्भुत शक्ती आली आहे, अमर्याद स्वातंत्र्य मिळालं आहे — हवं तिथे जाऊ शकते, हवं ते करू शकते. या अभूतपूर्व नव्या भावनेच्या आवेशात ती वेड्यासारखी होऊन, अचानक आलेल्या वावटळीसारखी खोलीतून बाहेर पडली आणि अंधाऱ्या स्मशानातून चालू लागली — मनात लाज, भीती, काळजी यांचा लवलेशही उरला नाही. चालता चालता पाय थकले, शरीर गळून येऊ लागलं. माळामागून माळ, संपतच नव्हते — मधूनच भाताची शेतं, कुठे गुडघाभर पाणी साचलेलं. पहाटेचा उजेड जरासा दिसू लागला तेव्हा जवळच्या वस्तीतल्या बांबूच्या बेटातून एक-दोन पाखरांची किलबिल ऐकू आली. तेव्हा तिला कसंसंच भय वाटू लागलं. पृथ्वीशी, जिवंत माणसांशी आता आपलं कसलं नवं नातं जुळलं आहे, याची तिला काहीच कल्पना नव्हती. जोवर ती माळावर होती, स्मशानात होती, श्रावणरात्रीच्या अंधारात होती, तोवर ती जणू निर्भय होती, जणू आपल्याच राज्यात होती. दिवसाच्या उजेडात मनुष्यवस्ती तिला अतिशय भयंकर जागा वाटू लागली. माणूस भुताला भितो, भूतही माणसाला भितं; मृत्यूच्या नदीच्या दोन तीरांवर दोघांची वस्ती. ३ कपड्यांना चिखल माखलेला, त्या विलक्षण भावनेच्या आहारी जाऊन आणि रात्रभराच्या जागरणानं वेडीपिशी झालेली — कादंबिनीचा जो अवतार झाला होता, तो पाहून माणसं घाबरली असती, आणि पोरं बहुधा दूर पळून जाऊन तिला ढेकळं मारत बसली असती. सुदैवानं एका वाटसरू सभ्य गृहस्थानं तिला अशा अवस्थेत सर्वांत आधी पाहिलं.
जिवंत की मेलेली?
तो जवळ येऊन म्हणाला, 'बाई, तुम्ही चांगल्या घरच्या सूनबाई दिसता; या अवस्थेत एकट्याच रस्त्यानं कुठे निघाला आहात?' कादंबिनी आधी काही उत्तर न देता नुसती पाहत राहिली. एकाएकी तिला काहीच सुचेना. आपण अजून संसारातच आहोत, आपण चांगल्या घरच्या सुनेसारख्या दिसतो, गावच्या रस्त्यावर एक वाटसरू आपल्याला प्रश्न विचारतो आहे — हे सगळं तिला कल्पनेपलीकडचं वाटलं. वाटसरू पुन्हा म्हणाला, 'चला बाई, मी तुम्हाला घरी पोचवतो — तुमचं घर कुठे, मला सांगा.' कादंबिनी विचार करू लागली. सासरी परत जाण्याचा विचार मनात आणणंच शक्य नव्हतं; माहेर तर उरलंच नव्हतं — तेव्हा तिला लहानपणीची सखी आठवली. सखी योगमायेची आणि तिची ताटातूट लहानपणीच झाली होती, तरीही अधूनमधून पत्रं जात-येत असत. कधी कधी चांगलीच प्रेमाची लढाई जुंपे — कादंबिनीला दाखवून द्यायचं असे की प्रेम तिच्याच बाजूनं अधिक आहे; योगमायेला दाखवून द्यायचं असे की कादंबिनी तिच्या प्रेमाची योग्य परतफेड करत नाही. कधी संधी मिळून एकदा दोघी भेटल्या, तर घटकाभरही एकमेकींना डोळ्याआड होऊ देणार नाहीत, याबद्दल दोघींपैकी कुणाच्याही मनात जराही शंका नव्हती. कादंबिनी त्या गृहस्थाला म्हणाली, 'निशिंदापूरला श्रीपतिचरणबाबूंच्या घरी जायचं आहे.' वाटसरू कलकत्त्याला चालले होते; निशिंदापूर काही जवळ नव्हतं, तरी त्यांच्या वाटेवरच पडत होतं. त्यांनी स्वतः व्यवस्था करून कादंबिनीला श्रीपतिचरणबाबूंच्या घरी पोचवलं. दोघी सख्यांची भेट झाली. आधी ओळखायला जरा वेळ लागला; मग बालपणीचं रूप दोघींच्या डोळ्यांपुढे हळूहळू स्पष्ट होत गेलं.
जिवंत की मेलेली?
योगमाया म्हणाली, 'अगं बाई, माझं केवढं भाग्य! तुझं दर्शन होईल असं माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. पण बाई गं, तू आलीस कशी? तुझ्या सासरच्या लोकांनी तुला सोडलं तरी कसं!' कादंबिनी गप्प राहिली; शेवटी म्हणाली, 'बाई गं, सासरचं मला काही विचारू नकोस. मला दासीसारखी घराच्या एका कोपऱ्यात जागा दे; मी तुमची कामं करीन.' योगमाया म्हणाली, 'अगं बाई, हे काय बोलणं! दासीसारखी का राहशील? तू माझी सखी, तू माझी —' वगैरे वगैरे. इतक्यात श्रीपती खोलीत आला. कादंबिनी काही वेळ त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली आणि हळूहळू खोलीतून निघून गेली — डोक्यावर पदर घेणं, किंवा कसलाही संकोच, कसली मर्यादा, याचं कोणतंही लक्षण दिसलं नाही. आपल्या सखीबद्दल श्रीपतीनं काही वावगं मनात आणू नये म्हणून योगमाया लगबगीनं त्याला परोपरीनं समजावू लागली. पण इतकं कमी समजवावं लागलं, आणि श्रीपतीनं योगमायेच्या सगळ्या म्हणण्याला इतक्या सहज होकार दिला, की योगमाया मनातून काही फारशी खूश झाली नाही. कादंबिनी सखीच्या घरी आली, पण सखीत मिसळू शकली नाही — मधे मृत्यूचा पडदा. स्वतःबद्दल सतत एक संशय, एक जाणीव मनात असली की दुसऱ्यात मिसळता येत नाही. कादंबिनी योगमायेच्या तोंडाकडे पाहते आणि कसल्याशा विचारात बुडते — मनात म्हणते, 'नवरा आणि संसार घेऊन ही जणू खूप दूर, दुसऱ्याच एका जगात आहे. माया-ममता आणि सारी कर्तव्यं घेऊन ही जणू या पृथ्वीवरची, आणि मी जणू एक पोकळ सावली. ही जणू अस्तित्वाच्या देशात, आणि मी जणू अनंतात.'
जिवंत की मेलेली?
योगमायेलाही कसंतरीच वाटू लागलं; तिला काहीच उमगेना. बाईमाणसाला गूढ सहन होत नाही — कारण अनिश्चिताला घेऊन कविता करता येते, शौर्य गाजवता येतं, पांडित्य मिरवता येतं, पण संसार करता येत नाही. म्हणून बाईला जे कळत नाही, त्याचं ती एकतर अस्तित्वच पुसून टाकते आणि त्याच्याशी कसलाही संबंध ठेवत नाही, नाहीतर स्वतःच्या हातानं त्याला नवा आकार देऊन आपल्या वापरण्याजोगी एखादी वस्तू घडवून घेते — आणि यांपैकी काहीच जमलं नाही, तर त्याच्यावर भयंकर रागावत राहते. कादंबिनी जितकी अनाकलनीय होत गेली, तितकी योगमाया तिच्यावर अधिकाधिक रागावू लागली; तिला वाटलं, हे कुठलं लचांड आपल्या मानगुटीवर बसलं! त्यात आणखी एक संकट. कादंबिनीला स्वतःचंच भय वाटतं. स्वतःपासून ती कशानंही पळून जाऊ शकत नाही. ज्यांना भुताची भीती वाटते, त्यांना आपल्या पाठीमागचं भय वाटतं — जिथे नजर पोचत नाही, तिथेच भीती. पण कादंबिनीची सर्वांत मोठी भीती तिच्या स्वतःच्या आतच होती; बाहेरची तिला भीती नव्हती. म्हणूनच सुनसान दुपारी एकटी खोलीत असताना ती कधी कधी किंचाळून उठत असे, आणि संध्याकाळी दिव्याच्या उजेडात आपली सावली दिसली की तिच्या अंगावर काटा येत असे. तिची ही भीती पाहून घरातल्या साऱ्या माणसांच्या मनात कसलीशी भीती रुजली. नोकरचाकर, दासी आणि योगमायाही वाटेल तेव्हा, वाटेल तिथे भुतं पाहू लागली. एके दिवशी असं झालं — कादंबिनी मध्यरात्री आपल्या निजायच्या खोलीतून रडत बाहेर पडली आणि थेट योगमायेच्या खोलीच्या दाराशी येऊन म्हणाली, 'ताई, ताई, तुझ्या पाया पडते गं! मला एकटीला टाकू नकोस.' योगमायेला जितकं भय वाटलं, तितकाच रागही आला. वाटलं, आत्ताच्या आत्ता कादंबिनीला घराबाहेर काढावं. दयाळू श्रीपतीनं मोठ्या प्रयत्नानं तिला शांत केलं आणि शेजारच्या खोलीत तिची सोय केली.
जिवंत की मेलेली?
दुसऱ्या दिवशी भलत्या वेळी श्रीपतीला अंतःपुरात बोलावणं आलं. योगमाया एकाएकी त्याची खरडपट्टी काढू लागली, 'काय हो, तुम्ही माणूस आहात तरी कसले? एक बाई आपलं सासर सोडून तुमच्या घरात येऊन ठाण मांडून बसली, महिना होत आला तरी जायचं नाव काढत नाही, आणि तुमच्या तोंडून विरोधाचा एक शब्दसुद्धा ऐकू येत नाही. तुमच्या मनात आहे तरी काय, जरा उलगडून सांगा पाहू. तुम्ही पुरुषमाणसं असलीच जात!' खरं म्हणजे, एकूण स्त्रीजातीबद्दल पुरुषमाणसाच्या मनात एक अविचारी पक्षपात असतोच, आणि म्हणूनच बायका त्यांना अधिक दोषी धरतात. निराधार पण सुंदर कादंबिनीबद्दल श्रीपतींच्या मनात असलेली करुणा योग्य प्रमाणापेक्षा किंचित अधिक होती — हे खोटं आहे अशी शपथ ते योगमायेच्या अंगाला हात लावून घ्यायला तयार असले, तरी त्यांच्या वागण्यातून त्याचा पुरावा मिळत असे. त्यांना वाटत असे, 'सासरची माणसं या निपुत्रिक विधवेवर नक्कीच अन्याय-जुलूम करत असणार; ते अगदीच असह्य झालं म्हणून पळून येऊन कादंबिनीनं माझा आश्रय घेतला आहे. हिला आई-बाप कुणीच नाहीत, तर मी हिला कसं टाकू?' असं म्हणून त्यांनी कसलीही चौकशी करणं टाळलं होतं, आणि या अप्रिय विषयावर प्रश्न विचारून कादंबिनीला दुखवावं असंही त्यांच्या मनात येत नसे. तेव्हा त्यांच्या पत्नीनं त्यांच्या बधिर कर्तव्यबुद्धीला परोपरीनं धक्के द्यायला सुरुवात केली. कादंबिनीच्या सासरी खबर देणं आपल्या घराची शांती राखण्यासाठी अगदी आवश्यक आहे, हे त्यांना चांगलंच उमगलं. शेवटी त्यांनी ठरवलं, एकदम पत्र लिहून बसलो तर कदाचित चांगला परिणाम होणार नाही; तेव्हा स्वतःच राणीहाटला जाऊन चौकशी करावी आणि मग काय करायचं ते ठरवावं. श्रीपती तर गेले; इकडे योगमाया येऊन कादंबिनीला म्हणाली, 'सखे, आता तू इथे राहणं बरं दिसत नाही. लोक काय म्हणतील?'
जिवंत की मेलेली?
कादंबिनी गंभीरपणे योगमायेच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली, 'लोकांशी माझा काय संबंध?' हे ऐकून योगमाया थक्क झाली. जरा रागावून म्हणाली, 'तुझा नसेल, आमचा तर आहे. दुसऱ्याच्या घरची सून आम्ही कुठल्या तोंडानं अडकवून ठेवायची?' कादंबिनी म्हणाली, 'माझं सासर कुठे आहे?' योगमायेला वाटलं, 'मेलं मेलं! ही करंटी बोलते तरी काय!' कादंबिनी हळूहळू म्हणाली, 'मी काय तुमची कुणी आहे? मी काय या पृथ्वीवरची आहे? तुम्ही हसता, रडता, प्रेम करता, सगळे आपापल्यात गुंतलेले आहात; मी मात्र नुसती पाहत असते. तुम्ही माणसं आहात, आणि मी सावली. कळत नाही, देवानं मला तुमच्या या संसाराच्या मधोमध का ठेवलं आहे. तुम्हालाही भीती वाटते, तुमच्या हसण्याखेळण्यात मी अमंगळ आणीन की काय — आणि मलाही उमगत नाही, तुमच्याशी माझं नातं काय. पण देवानं आमच्यासाठी दुसरी कुठलीच जागा घडवून ठेवली नाही, म्हणून बंधनं तुटली तरी नाइलाजानं तुमच्याच भोवती घिरट्या घालत राहते.' अशा नजरेनं पाहत ती हे बोलून गेली, की योगमायेला कसंबसं, एकूणात काहीतरी कळल्यासारखं वाटलं; पण खरी गोष्ट कळली नाही, उत्तरही देता आलं नाही. पुन्हा काही विचारताही आलं नाही. अतिशय जड, गंभीर मनानं ती निघून गेली. ४ रात्रीचे जवळजवळ दहा वाजले तेव्हा श्रीपती राणीहाटहून परत आले. मुसळधार पावसात पृथ्वी वाहून चालली होती. त्याच्या अखंड झरझर आवाजानं वाटत होतं, पावसाला अंत नाही, आजच्या रात्रीलाही अंत नाही. योगमायेनं विचारलं, 'काय झालं?' श्रीपती म्हणाले, 'ती लांबलचक कहाणी आहे. नंतर सांगतो.' असं म्हणून त्यांनी कपडे बदलले, जेवले, तंबाखू ओढली आणि झोपायला गेले. चेहरा अतिशय चिंतातुर. योगमायेनं बराच वेळ उत्सुकता दाबून धरली होती; अंथरुणावर पडल्याबरोबर तिनं विचारलं, 'काय ऐकलंत, सांगा.'
जिवंत की मेलेली?
श्रीपती म्हणाले, 'तुझी नक्कीच काहीतरी चूक झाली आहे.' हे ऐकताच योगमाया मनातल्या मनात जरा रागावली. बायका कधीच चूक करत नाहीत; आणि केलीच, तरी कोणत्याही शहाण्या पुरुषानं तिचा उल्लेख करणं योग्य नव्हे — ती आपल्याच शिरावर घेणं हीच खरी शहाणपणाची रीत. योगमाया जराशा तापलेल्या स्वरात म्हणाली, 'कशी काय, ऐकू तरी.' श्रीपती म्हणाले, 'जिला तू घरात आसरा दिला आहेस, ती तुझी सखी कादंबिनी नव्हे.' असलं काही ऐकलं की सहजच राग येऊ शकतो; त्यातून ते आपल्याच नवऱ्याच्या तोंडून ऐकलं, तर विचारायलाच नको. योगमाया म्हणाली, 'माझ्या सखीला मी ओळखत नाही, तुमच्याकडून ओळखून घ्यायला हवं — काय शोभा आहे बोलण्याला!' श्रीपतींनी समजावलं की इथे बोलण्याच्या शोभेबद्दल काही वाद चाललेला नाही; पुरावा पाहायला हवा. योगमायेची सखी कादंबिनी वारली आहे, यात जराही शंका नाही. योगमाया म्हणाली, 'ऐकलं का हे! तुम्ही नक्कीच काहीतरी घोटाळा करून आला आहात. कुठे जायचं तर कुठे गेलात, काय ऐकायचं तर काय ऐकलंत, कशाचा ठिकाणा नाही. तुम्हाला स्वतः जायला सांगितलं कुणी? एक पत्र लिहून टाकलं असतं तरी सगळं स्पष्ट झालं असतं.' आपल्या कार्यकुशलतेवर पत्नीचा असा अविश्वास पाहून श्रीपती फार खट्टू झाले आणि सविस्तरपणे सगळे पुरावे मांडू लागले; पण काही उपयोग झाला नाही. दोघांचं हो-नाही करता करता मध्यरात्र झाली. कादंबिनीला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढायचं, याबद्दल नवराबायकोत कुठलाही मतभेद नव्हता — कारण श्रीपतींची खात्री होती की त्यांच्या पाहुणीनं खोटी ओळख सांगून इतके दिवस त्यांच्या पत्नीला फसवलं आहे, आणि योगमायेची खात्री होती की ती कुळाची लाज सोडून घराबाहेर पडलेली बाई आहे — तरीही चाललेल्या वादात दोघांपैकी कुणीच हार मानायला तयार नव्हतं.
जिवंत की मेलेली?
दोघांचे आवाज हळूहळू चढत गेले; शेजारच्या खोलीतच कादंबिनी झोपली आहे, याचं त्यांना भान राहिलं नाही. एक जण म्हणतात, 'चांगल्याच संकटात सापडलो! मी स्वतःच्या कानांनी ऐकून आलो.' दुसरी ठाम स्वरात म्हणते, 'तुम्ही म्हणता म्हणून मी का मानू? मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहते आहे.' शेवटी योगमायेनं विचारलं, 'बरं, कादंबिनी मेली कधी, सांगा बघू.' तिला वाटलं, कादंबिनीच्या एखाद्या पत्राच्या तारखेशी काहीतरी विसंगती काढून श्रीपतींचा भ्रम सिद्ध करून दाखवावा. श्रीपतींनी जी तारीख सांगितली, तिचा दोघांनी हिशेब करून पाहिला — कादंबिनी ज्या दिवशी संध्याकाळी त्यांच्या घरी आली, बरोबर त्याच्या आदल्या दिवशी ती पडत होती. हे ऐकताच योगमायेची छाती एकदम धडधडली; श्रीपतींनाही कसंसंच वाटू लागलं. इतक्यात त्यांच्या खोलीचं दार उघडलं; पावसाळी वाऱ्याचा एक झोत आला आणि दिवा फस्सकन विझला. बाहेरचा अंधार आत शिरला आणि एका क्षणात सारी खोली कोपऱ्यान् कोपरा भरून गेली. कादंबिनी थेट खोलीत येऊन उभी राहिली. तेव्हा रात्रीचा अडीच प्रहर उलटून गेला होता; बाहेर अखंड पाऊस कोसळत होता. कादंबिनी म्हणाली, 'सखे, मी तुझी तीच कादंबिनी; पण आता मी जिवंत नाही. मी मेलेली आहे.' योगमाया भयानं किंचाळली; श्रीपतींच्या तोंडून शब्द फुटेना. 'पण मेले, याशिवाय मी तुमचा आणखी काय अपराध केला आहे? मला जर इहलोकातही जागा नाही, परलोकातही जागा नाही — तर अहो, मग मी जाऊ कुठे?' तीव्र स्वरात किंचाळून, जणू या गडद पावसाळी मध्यरात्री झोपलेल्या विधात्याला जागं करून तिनं विचारलं, 'अहो, मग मी जाऊ कुठे?' असं म्हणून, बेशुद्ध पडलेल्या त्या जोडप्याला अंधाऱ्या खोलीत सोडून, कादंबिनी विश्वात आपली जागा शोधायला निघून गेली.
जिवंत की मेलेली?
५ कादंबिनी राणीहाटला कशी परत गेली, ते सांगणं कठीण. पण आधी ती कुणालाच दिसली नाही. सबंध दिवस उपाशीपोटी तिनं एका पडक्या, ओसाड देवळात काढला. पावसाळ्यातली अवेळी संध्याकाळ अतिशय गडद होत आली, आणि येऊ घातलेल्या वादळाच्या धास्तीनं गावातली माणसं लगबगीनं आपापल्या घरांचा आसरा धरू लागली, तेव्हा कादंबिनी रस्त्यावर आली. सासरच्या दाराशी पोचल्यावर एकदा तिच्या उरात धडकी भरली; पण मोठा घुंगट ओढून ती आत शिरली तेव्हा दासी समजून द्वारपालांनी तिला काहीच अडवलं नाही. इतक्यात पाऊस खूप जोरात कोसळू लागला, वाराही जोरानं वाहू लागला. त्या वेळी घरच्या गृहिणी, शारदाशंकरांच्या पत्नी, आपल्या विधवा नणंदेबरोबर पत्ते खेळत होत्या. मोलकरीण स्वयंपाकघरात होती, आणि आजारी बाळ ताप उतरल्यामुळे निजायच्या खोलीत बिछान्यावर झोपलं होतं. सगळ्यांची नजर चुकवून कादंबिनी त्या खोलीत शिरली. ती काय विचार करून सासरी आली होती, ते मला ठाऊक नाही; तिलाही ठाऊक नव्हतं; तिला एवढंच ठाऊक होतं की एकदा बाळाला डोळे भरून पाहून जायची इच्छा होती. त्यानंतर कुठे जायचं, काय होणार, याचा तिनं विचारही केला नव्हता. दिव्याच्या उजेडात तिनं पाहिलं, आजारानं रोडावलेलं बाळ मुठी वळून झोपलं आहे. ते पाहून तिचं तापलेलं हृदय जणू तहानेनं व्याकूळ झालं — त्याची सारी इडापिडा घेऊन त्याला एकदा छातीशी घट्ट कवटाळल्याशिवाय जगवेल तरी कसं? आणि मग तिच्या मनात आलं, 'मी नाही, आता याला कोण पाहणार? याच्या आईला माणसांत रमायला आवडतं, गप्पा आवडतात, खेळ आवडतात; इतके दिवस माझ्या हाती भार सोपवून ती निश्चिंत होती, मूल वाढवण्याची कसलीच तोशीस तिला कधी सोसावी लागली नाही. आज याची कोण तशी काळजी घेणार?'
जिवंत की मेलेली?
इतक्यात बाळानं एकदम कूस बदलली आणि अर्धवट झोपेत ते म्हणालं, 'काकू, पाणी दे.' आहा, जीव ओवाळून टाकावा! माझ्या सोन्या, अजून तुझ्या काकूला विसरला नाहीस! घाईघाईनं सुरईतून पाणी ओतून घेऊन, बाळाला छातीशी उचलून कादंबिनीनं त्याला पाणी पाजलं. जोवर झोपेची गुंगी होती, तोवर नेहमीच्या सवयीनं काकूच्या हातून पाणी पिण्यात बाळाला काहीच नवल वाटलं नाही. शेवटी कादंबिनीनं कित्येक दिवसांची आस पुरी करत त्याचा मुका घेऊन त्याला पुन्हा निजवलं, तेव्हा त्याची झोप उडाली, आणि काकूला बिलगून त्यानं विचारलं, 'काकू, तू मेली होतीस?' काकू म्हणाली, 'हो, बाळा.' 'मग तू पुन्हा बाळाकडे परत आलीस? आता पुन्हा नाही ना मरणार?' याचं उत्तर देण्याआधीच गोंधळ उडाला — मोलकरीण वाटीभर साबुदाण्याची पेज घेऊन खोलीत आली होती; ती एकदम वाटी टाकून 'आई गं!' म्हणत धाडकन खाली कोसळली. किंकाळी ऐकून पत्ते टाकून गृहिणी धावत आल्या; खोलीत पाऊल टाकताच त्या जागच्या जागी लाकडासारख्या ताठ झाल्या — पळताही येईना, तोंडातून एक शब्दही फुटेना. हा सगळा प्रकार पाहून बाळाच्याही मनात भीती दाटली — ते रडत म्हणालं, 'काकू, तू जा.' कादंबिनीला कित्येक दिवसांनी आज जाणवलं होतं की ती मेलेली नाही — ते जुनं घरदार, ते सगळं, ते बाळ, ती माया, तिच्यासाठी तितकंच जिवंत आहे; मधे कुठलीही ताटातूट, कुठलाही पडदा आलेला नाही. सखीच्या घरी गेल्यावर तिला जाणवलं होतं की बालपणीची ती सखी मरून गेली आहे; बाळाच्या खोलीत आल्यावर तिला उमगलं — बाळाची काकू तर तसूभरही मेलेली नाही. ती व्याकूळ होऊन म्हणाली, 'ताई, तुम्ही मला पाहून का घाबरता? हे पाहा, मी तुमची पूर्वीसारखीच, तशीच आहे.'
जिवंत की मेलेली?
गृहिणींना आणखी उभं राहवलं नाही; त्या बेशुद्ध होऊन पडल्या. बहिणीकडून खबर मिळताच शारदाशंकरबाबू स्वतः अंतःपुरात येऊन पोहोचले; हात जोडून ते कादंबिनीला म्हणाले, 'धाकट्या सूनबाई, हे तुम्हाला शोभतं का? सतीश हा माझ्या वंशातला एकुलता एक मुलगा; त्याच्यावर तुम्ही का नजर लावून बसलात? आम्ही काय तुमचे परके आहोत? तुम्ही गेल्यापासून तो दिवसेंदिवस सुकत चालला आहे, त्याचं दुखणं काही सुटत नाही, दिवसरात्र नुसता काकू, काकू करत असतो. संसाराचा एकदा निरोप घेतलात, तर आता हे मायेचं बंधन तोडून जा — आम्ही तुमचं यथासांग क्रियाकर्म करू.' तेव्हा कादंबिनीला आणखी सहन झालं नाही; ती तीव्र स्वरात ओरडली, 'अहो, मी मेले नाही हो, मेले नाही! मी तुम्हाला कसं समजावू, की मी मेले नाही! हे पाहा, मी जिवंत आहे.' असं म्हणून तिनं जमिनीवरची काशाची वाटी उचलली आणि आपल्या कपाळावर आपटायला सुरुवात केली; कपाळ फुटून रक्त वाहू लागलं. तेव्हा ती म्हणाली, 'हे पाहा, मी जिवंत आहे.' शारदाशंकर पुतळ्यासारखे उभे राहिले; बाळ भयानं बाबांना हाका मारू लागलं. बेशुद्ध पडलेल्या दोघी बायका जमिनीवर पडून राहिल्या. मग 'अहो, मी मेले नाही हो, मेले नाही हो, मेले नाही —' असं किंचाळत कादंबिनी खोलीतून बाहेर पडली, आणि जिना उतरून अंतःपुरातल्या तळ्याच्या पाण्यात जाऊन पडली. शारदाशंकरांना वरच्या खोलीतून 'धपाक्' असा आवाज ऐकू आला. रात्रभर पाऊस पडत राहिला; दुसऱ्या दिवशी सकाळीही पाऊस पडत होता, दुपारीही पावसाला उघडीप नव्हती. कादंबिनीनं मरून सिद्ध केलं, की ती मेली नव्हती.