रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
काबुलीवाला
माझी पाच वर्षांची धाकटी मुलगी मिनी घटकाभरसुद्धा बोलल्याशिवाय राहू शकत नाही. जगात जन्म घेतल्यानंतर भाषा शिकायला तिनं फक्त एक वर्ष खर्च केलं, आणि तेव्हापासून ती जागी असेपर्यंत एक क्षणही मौनात वाया घालवत नाही. तिची आई पुष्कळदा दटावून तिचं तोंड बंद करते, पण मला ते जमत नाही. मिनी गप्प बसली की इतकी अनैसर्गिक दिसते, की ते मला फार वेळ सहन होत नाही. म्हणून माझ्याशी तिचं संभाषण जरा उत्साहानंच चालतं. सकाळी मी माझ्या कादंबरीच्या सतराव्या प्रकरणाला हात घातला होता, तोच मिनी येऊन सुरूच झाली, 'बाबा, रामदयाल दरवान कावळ्याला कौआ म्हणत होता. त्याला काही काही कळत नाही. हो ना?' जगातल्या भाषांच्या विविधतेविषयी मी तिला ज्ञान देण्याच्या तयारीला लागणार, त्याआधीच ती दुसऱ्या विषयावर जाऊन पोचली. 'बघ ना बाबा, भोला सांगत होता, आकाशात हत्ती सोंडेनं पाणी फेकतो, म्हणून पाऊस पडतो. आई गं, भोला केवढं खोटंनाटं बडबडतो! नुसता बडबडत असतो, रात्रंदिवस बडबडतो.' यावर माझं मत काय, याची जराही वाट न पाहता तिनं एकाएकी विचारलं, 'बाबा, आई तुझी कोण?' मनात म्हटलं, मेहुणी; तोंडानं म्हटलं, 'मिनी, तू जा बरं, भोलाशी खेळ जा. मला आता काम आहे.' तेव्हा ती माझ्या लिहिण्याच्या टेबलाशेजारी माझ्या पायांजवळ बसली, आणि दोन्ही गुडघ्यांवर हात आपटत, भराभर 'आगडुम बागडुम' म्हणत बडबडगीताचा खेळ खेळू लागली. माझ्या सतराव्या प्रकरणात प्रतापसिंह त्या वेळी कांचनमालेला घेऊन, अंधाऱ्या रात्री तुरुंगाच्या उंच गवाक्षातून खालच्या नदीच्या पाण्यात उडी घेत होते.
काबुलीवाला
माझी खोली रस्त्याच्या कडेला आहे. एकाएकी मिनी आगडुम बागडुमचा खेळ टाकून खिडकीकडे धावली, आणि मोठ्यानं ओरडून हाका मारू लागली, 'काबुलीवाला, ए काबुलीवाला!' मळके ढगळ कपडे घातलेला, डोक्याला पगडी, खांद्याला झोळी, हातात द्राक्षांच्या दोन-चार पेट्या, असा एक उंचापुरा काबुलीवाला संथ चालीनं रस्त्यानं चालला होता— त्याला पाहून माझ्या कन्यारत्नाच्या मनात कोणता भाव उदेला, ते सांगणं कठीण; पण तिनं धापा टाकत त्याला हाकांवर हाका मारायला सुरुवात केली. मला वाटलं, आता खांद्याला झोळी अडकवलेली एक ब्याद येऊन उभी राहणार, आणि माझं सतरावं प्रकरण काही पुरं होणार नाही. पण मिनीच्या आरोळीसरशी काबुलीवाल्यानं हसून तोंड वळवलं आणि तो आमच्या घराकडे येऊ लागला, तसं तिनं धापा टाकत आतल्या घराकडे धूम ठोकली; तिचा मागमूसही उरला नाही. तिच्या मनात एक अंधश्रद्धेसारखी समजूत होती, की त्या झोळीत शोधलं तर तिच्यासारखी दोन-चार जिवंत माणसांची पोरं सापडतील. इकडे काबुलीवाला येऊन हसत हसत मला सलाम करून उभा राहिला— मला वाटलं, प्रतापसिंह आणि कांचनमाला यांची अवस्था जरी अत्यंत बिकट असली, तरी या माणसाला घरात बोलावून त्याच्याकडून काहीच विकत न घेणं बरं दिसत नाही. काही खरेदी झाली. मग इकडच्या तिकडच्या चार गोष्टी निघाल्या. अब्दुर रहमान, रशिया, इंग्रज वगैरेंना घेऊन सरहद्दीच्या रक्षणनीतीवर गप्पा रंगल्या. शेवटी उठून जाताना त्यानं विचारलं, 'बाबू, तुमची लडकी कुठं गेली?'
काबुलीवाला
मिनीची निष्कारण भीती मोडून काढावी म्हणून मी तिला आतून बोलावून आणलं— ती माझ्या अंगाला चिकटून, काबुलीवाल्याच्या तोंडाकडे आणि झोळीकडे संशयानं पाहत उभी राहिली. काबुलीवाल्यानं झोळीतून बेदाणे, जर्दाळू काढून तिला देऊ केले; तिनं ते काही केल्या घेतले नाहीत, उलट दुप्पट संशयानं ती माझ्या गुडघ्यांना बिलगून राहिली. पहिली ओळख ही अशी झाली. काही दिवसांनी एके दिवशी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडत असताना पाहतो तो, माझी कन्या दाराजवळच्या बाकावर बसून अखंड बोलते आहे, आणि काबुलीवाला तिच्या पायांशी बसून हसऱ्या चेहऱ्यानं ऐकतो आहे, आणि मधूनमधून विषयाला धरून आपलं मतही संकरित बंगालीत मांडतो आहे. मिनीच्या पाच वर्षांच्या आयुष्याच्या अनुभवात बाबांखेरीज इतका धीराचा श्रोता तिला कधी मिळाला नव्हता. आणखी पाहतो तो, तिचा इवलासा पदर बदाम-बेदाण्यांनी भरलेला. मी काबुलीवाल्याला म्हटलं, 'हे सगळं हिला कशाला दिलंस? असं पुन्हा देऊ नकोस.' आणि खिशातून एक अधेली काढून त्याला दिली. त्यानं जराही न संकोचता अधेली घेऊन झोळीत टाकली. घरी परत येऊन पाहतो तो, त्या अधेलीवरून पुरं सोळा आणे महाभारत माजलं आहे. मिनीच्या आई एक पांढरी, चकचकीत, गोल वस्तू हातात घेऊन रागावलेल्या सुरात मिनीला विचारत होत्या, 'ही अधेली तुला कुठं मिळाली?' मिनी म्हणत होती, 'काबुलीवाल्यानं दिली.' तिच्या आई म्हणत होत्या, 'काबुलीवाल्याकडून तू अधेली घ्यायला गेलीसच का?' मिनी रडण्याच्या बेतात येऊन म्हणाली, 'मी मागितली नाही, त्यानंच आपणहून दिली.'
काबुलीवाला
मी आलो आणि मिनीला तिच्यावर येऊ घातलेल्या संकटातून सोडवून बाहेर घेऊन गेलो. बातमी कळली की काबुलीवाल्याशी मिनीची ही काही दुसरी भेट नव्हे; मधल्या काळात तो जवळजवळ रोज येऊन, पिस्ते-बदामांची लाच देऊन, मिनीचं इवलंसं लोभी हृदय बरंचसं काबीज करून बसला आहे. दिसलं की या दोघा मित्रांमध्ये काही ठरलेले संवाद आणि थट्टा चालत असते— म्हणजे, रहमतला पाहताक्षणी माझी मुलगी हसत हसत विचारी, 'काबुलीवाला, ए काबुलीवाला, तुझ्या त्या झोळीत काय आहे?' रहमत एक अनावश्यक अनुनासिक जोडून हसत हसत उत्तर देई, 'हाँथी!' म्हणजे, त्याच्या झोळीत एक हत्ती आहे, हाच त्याच्या थट्टेचं सूक्ष्म मर्म. ते फार सूक्ष्म होतं असं म्हणता येणार नाही, तरीही या थट्टेत दोघांनाही चांगलीच गंमत वाटे— आणि शरदऋतूतल्या सकाळी एका प्रौढ आणि एका अजाण बालकाचं ते निर्मळ हसू पाहून मलाही बरं वाटे. त्या दोघांमध्ये आणखी एक संवाद ठरलेला होता. रहमत मिनीला म्हणे, 'खोखी, तुम सासुरवाडीला कब्भी नको जाना!' बंगाली घरातली मुलगी जन्मापासून 'सासर' हा शब्द ऐकत मोठी होते; पण आम्ही जरा नव्या वळणाची माणसं असल्यानं, आमच्या चिमुरडीला सासरविषयी शहाणं करून सोडलेलं नव्हतं. त्यामुळे रहमतची ही विनंती तिला नीटशी कळत नसे; पण कुठलंतरी उत्तर दिल्यावाचून गप्प बसणं हे तिच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध— ती उलट विचारी, 'तू जाणार सासरी?' रहमत कल्पनेतल्या सासऱ्यावर आपली प्रचंड जाडजूड मूठ उगारून म्हणे, 'हम ससुऱ्याला मारेगा!' ते ऐकून, सासरा नावाच्या कुठल्यातरी अनोळखी प्राण्याची होणारी दुर्दशा डोळ्यांपुढे आणून मिनी खूप हसे.
काबुलीवाला
* * * आता शुभ्र शरदऋतू आहे. प्राचीन काळी याच दिवसांत राजे दिग्विजयाला निघत. मी कलकत्ता सोडून कधी कुठं गेलो नाही, पण म्हणूनच माझं मन सगळ्या जगभर भटकत असतं. जणू मी माझ्या घराच्या कोपऱ्यात कायमचा परदेशी आहे; बाहेरच्या जगासाठी माझं मन सदा हुरहुरत असतं. एखाद्या परदेशाचं नाव ऐकलं की लगेच माझं चित्त तिकडे धाव घेतं; तसंच परदेशी माणूस पाहिला की लगेच नदी, पर्वत, अरण्य यांच्यामधली एखादी झोपडी डोळ्यांपुढे उभी राहते, आणि एका उल्हासानं भरलेल्या स्वच्छंद जीवनाचं चित्र कल्पनेत जागं होतं. आणि दुसरीकडे मी स्वभावानं असा झाडासारखा एका जागी रुजलेला, की माझा कोपरा सोडून एकदा बाहेर पडायचं म्हटलं तरी डोक्यावर वीज कोसळते. म्हणून सकाळी माझ्या छोट्याशा खोलीत टेबलापुढे बसून या काबुलीवाल्याशी गप्पा मारून माझं बरंचसं प्रवासाचं काम भागत असे. दोन्ही बाजूंना खडबडीत, दुर्गम, होरपळलेल्या, लालबुंद, उंच पर्वतरांगा, मधून चिंचोळी वाळवंटी वाट, ओझ्यांनी लादलेल्या उंटांची रांग चालली आहे; पगडीवाले व्यापारी आणि वाटसरू, कुणी उंटावर तर कुणी पायी, कुणाच्या हातात भाला, कुणाच्या हातात जुन्या काळची गारगोटी ठोकायची बंदूक— काबुलीवाला मेघगर्जनेसारख्या धीरगंभीर आवाजात तुटक्या बंगालीत आपल्या देशाच्या गोष्टी सांगे, आणि हे चित्र माझ्या डोळ्यांसमोरून सरकत जाई. मिनीच्या आई अतिशय भित्र्या स्वभावाच्या आहेत. रस्त्यावर जरा काही आवाज झाला की त्यांना वाटतं, जगातले सगळे दारुडे नेमकं आमचंच घर हेरून धावत येत आहेत. हे जग सगळीकडे चोर, दरोडेखोर, दारुडे, साप, वाघ, मलेरिया, सुरवंट, झुरळं आणि गोरे यांनी भरलेलं आहे, ही दहशत इतके दिवस (फार दिवस नव्हेत) या जगात राहूनही त्यांच्या मनातून गेलेली नाही.
काबुलीवाला
रहमत काबुलीवाल्याविषयी त्या पुऱ्या निःशंक नव्हत्या. त्याच्यावर खास नजर ठेवा, असं त्यांनी मला पुन्हा पुन्हा बजावलं होतं. मी त्यांचा संशय हसण्यावारी नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी एकामागून एक मला काही प्रश्न विचारले, 'कधी कुणाचं मूल चोरीला जात नाही की काय? काबूल देशात गुलामांचा व्यापार चालत नाही की काय? एका धिप्पाड काबुलीवाल्याला एखादं लहान मूल चोरून घेऊन जाणं अगदीच अशक्य आहे की काय?' मला कबूल करावं लागलं, की ही गोष्ट अशक्य आहे असं नाही, पण अविश्वसनीय आहे. विश्वास ठेवण्याची शक्ती सगळ्यांची सारखी नसते, म्हणून माझ्या पत्नीच्या मनात भीती राहूनच गेली. पण तेवढ्यावरून, कसलाही दोष नसताना रहमतला आमच्या घरी येऊ नकोस असं सांगणं मला जमलं नाही. दर वर्षी माघ महिन्याच्या मध्याला रहमत आपल्या देशी निघून जातो. या दिवसांत येणी वसूल करण्यासाठी तो फार गडबडीत असतो. घरोघर फिरावं लागतं, तरीही एकदा मिनीला दर्शन देऊन जातोच. पाहिलं की खरोखरच वाटतं, या दोघांमध्ये जणू काही कटकारस्थान चाललं आहे. ज्या दिवशी सकाळी येता येत नाही, त्या दिवशी पाहतो तो संध्याकाळी आलेला असतो; अंधारात खोलीच्या कोपऱ्यात तो ढगळ कुडता-पायजमा घातलेला, झोळ्यांचं ओझं वागवणारा उंचापुरा माणूस पाहिला की खरोखरच मनात एकदम एक धास्ती उमटते. पण जेव्हा पाहतो की मिनी 'काबुलीवाला, ए काबुलीवाला' करत हसत हसत धावत येते, आणि त्या दोघा विषम वयाच्या मित्रांमध्ये तीच जुनी निर्मळ थट्टा सुरू होते, तेव्हा सगळं मन प्रसन्न होऊन जातं.
काबुलीवाला
एके दिवशी सकाळी मी माझ्या छोट्या खोलीत बसून मुद्रितं तपासत होतो. जाता जाता गेले दोन-तीन दिवस थंडीनं चांगलाच कडाका धरला आहे; चोहीकडे नुसती हुडहुडी भरली आहे. खिडकीतून आलेलं सकाळचं ऊन टेबलाखाली माझ्या पायांवर पडलं आहे, ती थोडीशी ऊब फार गोड वाटते आहे. आठ वाजले असतील— डोक्याला-गळ्याला गळपट्टे गुंडाळलेले ते पहाटवीर प्रभातफेरी आटपून बहुतेक सगळे घरी परतले आहेत. इतक्यात रस्त्यावर मोठा गलका ऐकू आला. पाहतो तो, आमच्या रहमतला दोन पोलीस बांधून घेऊन येत आहेत, आणि त्यांच्या मागे कुतूहलानं पोरांचं टोळकं चाललं आहे. रहमतच्या अंगावरच्या कपड्यांवर रक्ताचे डाग, आणि एका पोलिसाच्या हातात रक्तानं माखलेला सुरा. मी दाराबाहेर जाऊन पोलिसाला थांबवलं आणि विचारलं, काय प्रकार आहे. थोडं त्याच्याकडून, थोडं रहमतकडून ऐकून कळलं, की आमच्या शेजारचा एक माणूस रामपुरी चादरीसाठी रहमतचं काही देणं लागत होता— त्यानं खोटं बोलून ते देणं नाकारलं, आणि त्यावरून वाद घालता घालता रहमतनं त्याला एक सुरा भोसकला. रहमत त्या खोटारड्याच्या नावानं कानावर पडू नयेत अशा नाना प्रकारच्या शिव्या देत होता, इतक्यात 'काबुलीवाला, ए काबुलीवाला' अशा हाका मारत मारत मिनी घरातून बाहेर आली. क्षणात रहमतचा चेहरा गमतीच्या हास्यानं फुलून आला. आज त्याच्या खांद्यावर झोळी नव्हती, त्यामुळे झोळीविषयीचा त्यांचा नेहमीचा संवाद होऊ शकला नाही. मिनीनं थेट त्याला विचारलं, 'तू जाणार सासरी?' रहमत हसून म्हणाला, 'तिथंच तर चाललाय!' उत्तर मिनीला हसण्याजोगं वाटलं नाही, हे पाहून त्यानं हात दाखवत म्हटलं, 'ससुऱ्याला मारलं असतं, पण काय करू— हात बांधलेत.' प्राणघातक हल्ला केल्याच्या अपराधाबद्दल रहमतला काही वर्षांची कैद झाली.
काबुलीवाला
त्याला मी जवळजवळ विसरूनच गेलो. आम्ही घरात बसून वर्षानुवर्षांच्या सवयीनं रोजच्या कामांत दिवसामागून दिवस घालवत होतो, तेव्हा पर्वतांवर स्वच्छंद हिंडणारा एक स्वतंत्र पुरुष तुरुंगाच्या भिंतींआड कशी वर्षं काढत असेल, हे आमच्या मनातसुद्धा येत नसे. आणि चंचल मनाच्या मिनीचं वागणं अतिशय लाजिरवाणं होतं, हे तिच्या बापालाही कबूल करावं लागतं. तिनं आपल्या जुन्या मित्राला बिनदिक्कत विसरून आधी नबी साईसाशी दोस्ती जमवली. मग जसजसं तिचं वय वाढत गेलं, तसतसे मित्रांऐवजी एकेक करून मैत्रिणी जमू लागल्या. इतकंच काय, आता तिच्या बाबांच्या लिहिण्याच्या खोलीतसुद्धा ती दिसेनाशी झाली आहे. मी तर तिच्याशी जवळजवळ कट्टीच घेतली आहे. * * * किती वर्षं निघून गेली. आणखी एक शरदऋतू आला आहे. माझ्या मिनीचं लग्न ठरलं आहे. पूजेच्या सुट्टीत तिचं लग्न होईल. कैलासवासिनीबरोबरच माझ्या घरची आनंदमयीही माहेर अंधारून टाकून पतीच्या घरी निघून जाईल. सकाळ फार सुंदर उगवली आहे. पावसाळ्यानंतरचं शरदाचं हे नव्यानं धुतलेलं ऊन जणू टाकणखारात वितळवलेल्या निर्मळ सोन्याच्या रंगाचं झालं आहे. इतकंच काय, कलकत्त्याच्या गल्ल्यांमधल्या, विटा ढासळलेल्या, कळकट, एकमेकांना खेटून उभ्या असलेल्या घरांवरसुद्धा या उन्हाच्या झळाळीनं एक अपूर्व लावण्य पसरलं आहे. आज माझ्या घरी रात्र सरते न सरते तोच सनई वाजते आहे. ती सनई जणू माझ्या छातीच्या पिंजऱ्यातल्या हाडांमधून रडत रडत वाजते आहे. करुण भैरवीच्या सुरात ती माझ्या येऊ घातलेल्या विरहाच्या वेदनेला शरदाच्या उन्हाबरोबर साऱ्या विश्वभर पसरवते आहे. आज माझ्या मिनीचं लग्न. सकाळपासून नुसती धांदल, माणसांची ये-जा. अंगणात बांबू बांधून मांडव उभारला जातो आहे; घराच्या खोलीखोलीत आणि व्हरांड्यांत झुंबरं टांगण्याचा ठणठण आवाज येतो आहे; हाकाहाकीला सुमार नाही.
काबुलीवाला
मी माझ्या लिहिण्याच्या खोलीत बसून हिशेब पाहत होतो, इतक्यात रहमत येऊन सलाम करून उभा राहिला. आधी मी त्याला ओळखलंच नाही. त्याची ती झोळी नव्हती, त्याचे ते लांब केस नव्हते, त्याच्या अंगात पूर्वीसारखा तो जोम नव्हता. शेवटी त्याचं हसू पाहून त्याला ओळखलं. म्हटलं, 'काय रे रहमत, कधी आलास?' तो म्हणाला, 'काल संध्याकाळी जेलमधून सुटलो.' ते ऐकून कानाला कसंसंच खटकलं. कुठल्याही खुन्याला मी कधी प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं; याला पाहून सगळं अंतःकरण जणू आक्रसून गेलं. मनात येऊ लागलं, आजच्या या शुभदिवशी हा माणूस इथून गेला तर बरं. मी त्याला म्हणालो, 'आज आमच्या घरी एक कार्य आहे, मी जरा कामात आहे; तू आज जा.' ते ऐकताच तो तत्काळ निघायला तयार झाला; पण दारापाशी जाऊन जरा घुटमळून म्हणाला, 'खोखीला एकदा पाहता नाही येणार?' त्याच्या मनात बहुधा असा विश्वास होता, की मिनी अजून तशीच आहे. त्याला जणू वाटलं होतं, की मिनी पुन्हा पूर्वीसारखीच 'काबुलीवाला, ए काबुलीवाला' करत धावत येईल, आणि त्यांच्या त्या अतिशय गमतीदार जुन्या हास्यविनोदात जराही खंड पडणार नाही. इतकंच काय, जुन्या मैत्रीची आठवण ठेवून तो द्राक्षांची एक पेटी आणि कागदाच्या पुडीत थोडे बेदाणे-बदाम, बहुधा आपल्या देशातल्या कुणा मित्राकडून मागून-तागून गोळा करून घेऊन आला होता— त्याची स्वतःची ती झोळी आता राहिली नव्हती. मी म्हणालो, 'आज घरात कार्य आहे; आज कुणाचीही भेट होऊ शकणार नाही.' तो जरा हिरमुसला. स्तब्ध उभा राहून त्यानं एकदा माझ्या चेहऱ्याकडे एकटक पाहिलं, मग 'बाबू, सलाम' म्हणून तो दाराबाहेर निघून गेला. माझ्या मनात कसलीशी कळ उठली. त्याला परत बोलवावं, असं मनात आणतो आहे, तोच पाहतो तो, तो आपणहूनच परत येतो आहे.
काबुलीवाला
जवळ येऊन तो म्हणाला, 'ही द्राक्षं आणि थोडे बेदाणे-बदाम खोखीसाठी आणले होते; तिला द्याल.' ते घेऊन मी पैसे द्यायला लागलो, तसा त्यानं एकदम माझा हात घट्ट धरला; म्हणाला, 'आपली बहुत मेहरबानी, ती मला कायम लक्षात राहील— मला पैसे देऊ नका. बाबू, जशी तुमची एक लडकी आहे, तशीच तिकडे देशात माझीही एक लडकी आहे. मी तिचाच चेहरा आठवून तुमच्या खोखीसाठी थोडाथोडा मेवा हातात घेऊन येतो; मी काही सौदा करायला येत नाही.' असं म्हणून त्यानं आपल्या मोठ्या ढगळ कुडत्याच्या आत हात घातला, आणि छातीजवळून कुठूनतरी एक मळका कागदाचा तुकडा बाहेर काढला. मोठ्या जपणुकीनं त्याच्या घड्या उलगडून त्यानं तो दोन्ही हातांनी माझ्या टेबलावर पसरून धरला. पाहिलं तो, कागदावर एका छोट्याशा हाताचा ठसा. फोटो नव्हे, तैलचित्र नव्हे; हाताला थोडी काजळी फासून कागदावर त्याची खूण उमटवून घेतलेली. मुलीची ही चिमुकली आठवण छातीशी बाळगून रहमत दर वर्षी कलकत्त्याच्या रस्त्यांवर मेवा विकायला येतो— जणू त्या कोमल इवल्याशा बाळहाताचा स्पर्श त्याच्या विरहानं व्याकूळ झालेल्या विशाल छातीत अमृत भरून ठेवतो. ते पाहून माझे डोळे भरून आले. तेव्हा तो एक काबुली मेवेवाला आहे आणि मी एक बंगाली खानदानी माणूस आहे, हे मी विसरून गेलो— तेव्हा मला कळलं, तो आणि मी एकच; तोही बाप, मीही बाप. डोंगरातल्या घरात राहणाऱ्या त्याच्या चिमुकल्या पार्वतीच्या त्या हाताच्या ठशानं मला माझ्याच मिनीची आठवण करून दिली. मी तत्काळ तिला आतून बोलावणं पाठवलं. आतल्या घरात यावर बऱ्याच हरकती निघाल्या. पण मी कशालाच दाद दिली नाही. लाल रेशमी साडी नेसलेली, कपाळावर चंदनाची नक्षी रेखलेली, नवरीच्या वेषातली मिनी लाजत लाजत माझ्याजवळ येऊन उभी राहिली.
काबुलीवाला
तिला पाहून काबुलीवाला आधी गडबडून गेला; त्यांचा जुना संवाद त्याला रंगवता आला नाही. शेवटी हसून म्हणाला, 'खोखी, तुम सासुरवाडीला जायगी?' मिनीला आता सासरचा अर्थ कळतो; आता ती पूर्वीसारखं उत्तर देऊ शकली नाही— रहमतचा प्रश्न ऐकून लाजेनं लालेलाल होऊन तोंड फिरवून उभी राहिली. काबुलीवाल्याशी मिनीची ज्या दिवशी पहिली भेट झाली होती, तो दिवस मला आठवला. मन कसंसंच दुखावून आलं. मिनी निघून गेल्यावर एक खोल सुस्कारा सोडून रहमत जमिनीवर बसला. त्याला एकाएकी स्पष्ट उमगलं, की त्याची मुलगीही एव्हाना अशीच मोठी झाली असेल, तिच्याशीही पुन्हा नव्यानं ओळख करावी लागेल— ती आता त्याला अगदी पूर्वीसारखी तशी मिळणार नाही. या आठ वर्षांत तिचं काय झालं असेल, तेही कोण जाणे. सकाळच्या शरदाच्या स्निग्ध उन्हात सनई वाजत राहिली, आणि कलकत्त्याच्या एका गल्लीत बसून रहमत अफगाणिस्तानातल्या एका ओसाड डोंगराचं दृश्य पाहत राहिला. मी एक नोट काढून त्याला दिली. म्हटलं, 'रहमत, तू तुझ्या देशी, तुझ्या मुलीकडे परत जा; तुमच्या भेटीच्या सुखानं माझ्या मिनीचं कल्याण होवो.' हे पैसे देऊन टाकल्यामुळे हिशेबातून लग्नसमारंभाची एक-दोन अंगं छाटावी लागली. मनात योजलं होतं तशी विजेची रोषणाई करता आली नाही, किल्ल्यावरचा बँडही आला नाही; आतल्या घरात बायकांनी फार नाराजी व्यक्त केली; पण एका मंगल प्रकाशानं माझा शुभसोहळा उजळून निघाला.