रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
खोकाबाबू परत आले
१ रायचरण बाबूंच्या घरी पहिल्यांदा चाकरीला आला तेव्हा तो बारा वर्षांचा होता. यशोहर जिल्ह्यातला. लांब केस, मोठे मोठे डोळे, सावळा, तुकतुकीत, सडपातळ पोरगा. जातीनं कायस्थ. त्याचे धनीही कायस्थच. बाबूंच्या वर्षभराच्या एका बाळाची राखण करायला आणि त्याला सांभाळायला मदत करणं, हे त्याचं मुख्य काम होतं. ते बाळ कालांतरानं रायचरणाच्या कडेवरून उतरून शाळेत गेलं, शाळेतून कॉलेजात, आणि अखेर कॉलेजातून मुन्सफीत जाऊन रुजू झालं. रायचरण आजही त्यांचा नोकर आहे. त्याच्या धन्यांत आणखी एकाची भर पडली आहे; आईसाहेब घरात आल्या आहेत; त्यामुळे अनुकूलबाबूंवर रायचरणाचा पूर्वी जितका हक्क होता, त्यातला बहुतेक सगळा नव्या मालकिणीच्या हाती गेला आहे. पण मालकिणींनी रायचरणाचा जुना हक्क जसा काहीसा कमी केला, तसा एक नवा हक्क देऊन त्याची बरीचशी भरपाईही करून दिली आहे. अनुकूलबाबूंना थोड्याच दिवसांपूर्वी मुलगा झाला आहे — आणि रायचरणानं केवळ स्वतःच्या प्रयत्नानं आणि चिकाटीनं त्याला पुरतं आपलंसं करून घेतलं आहे. त्याला तो अशा उत्साहानं झोके देऊ लागला आहे, अशा कौशल्यानं दोन्ही हातांत धरून आकाशात उडवतो, त्याच्या तोंडाजवळ येऊन असा आवाज करत डोकं हलवत राहतो, उत्तराची कसलीही अपेक्षा न ठेवता असे पूर्णपणे निरर्थक, असंबद्ध प्रश्न सूर लावून त्या बाळाला विचारत राहतो, की हा चिमुकला अनुकूल-कुलदीपक रायचरणाला पाहताच अगदी हरखून जातो.
खोकाबाबू परत आले
पुढे बाळ जेव्हा रांगत रांगत मोठ्या सावधपणे उंबरठा ओलांडू लागलं, आणि कुणी धरायला आलं की खुदूखुदू हसत, खिदळत भराभर सुरक्षित जागी लपायचा प्रयत्न करू लागलं, तेव्हा त्याचं ते असामान्य चातुर्य आणि विवेकबुद्धी पाहून रायचरण थक्क होऊन जाई. आईसाहेबांकडे जाऊन अभिमानानं, आश्चर्यानं म्हणे, 'आई, तुमचा मुलगा मोठा झाला ना, की जज होईल, पाच हजार रुपये कमवील.' या वयात उंबरठा ओलांडण्यासारखं अशक्य चातुर्य जगातलं दुसरं कुठलंही मानवी बालक दाखवू शकेल, ही गोष्ट रायचरणाच्या कल्पनेपलीकडची होती; फक्त भावी जजांच्या बाबतीत यात आश्चर्य असं काहीच नाही. शेवटी बाळ जेव्हा दुडुदुडु, लटपटत चालू लागलं, तो तर एक चमत्कारच होता; आणि जेव्हा ते आईला 'आई', आत्याला 'अत्ती' आणि रायचरणाला 'चन्न' म्हणून हाक मारू लागलं, तेव्हा ती विश्वासापलीकडची बातमी रायचरण ज्याला त्याला सांगत सुटला. सगळ्यांत आश्चर्याची गोष्ट ही की, 'आईला आई म्हणतो, आत्याला आत्या म्हणतो, पण मला म्हणतो चन्न!' खरंच, बाळाच्या डोक्यात ही अक्कल कुठून आली, सांगणं कठीण. कोणत्याही प्रौढ माणसानं असली लोकविलक्षण बुद्धी कधीच दाखवली नसती, आणि दाखवलीच असती तर तो कधी जज होईल की नाही, याबद्दल लोकांना शंका आल्यावाचून राहिली नसती. काही दिवसांनी तोंडात दोरी धरून रायचरणाला घोडा व्हावं लागलं. आणि पहिलवान बनून बाळाशी कुस्तीही खेळावी लागे — आणि हरून जमिनीवर आडवा पडला नाही, तर भयंकर बंड माजे. याच सुमारास अनुकूलबाबूंची पद्मेच्या काठच्या एका जिल्ह्यात बदली झाली. बाळासाठी त्यांनी कलकत्त्याहून एक ढकलगाडी बरोबर नेली. सॅटिनचा अंगरखा, डोक्यावर जरीची टोपी, हातात सोन्याचे वाळे आणि पायांत दोन पैंजण घालून रायचरण त्या छोट्या कुमाराला सकाळ-संध्याकाळ गाडीतून हवा खायला नेत असे.
खोकाबाबू परत आले
पावसाळा आला. भुकेली पद्मा बागा, गावं, शेतं एकेका घासात तोंडात कोंबू लागली. वाळूच्या बेटांवरची काशाची बनं आणि झाऊची झुडपं पाण्याखाली गेली. काठ कोसळण्याच्या अखंड धपाधप आवाजानं आणि पाण्याच्या गर्जनेनं दाही दिशा दुमदुमून गेल्या, आणि वेगानं धावणाऱ्या फेसाच्या राशींनी नदीचा तीव्र वेग डोळ्यांसमोर उभा केला. दुपारनंतर आभाळ भरून आलं होतं, पण पाऊस पडण्याची काही चिन्हं नव्हती. रायचरणाचे लहरी छोटे धनी घरात काही केल्या राहायला तयार नव्हते. गाडीत चढून बसले. रायचरण हळूहळू गाडी ढकलत भातशेतांच्या कडेनं नदीकाठी येऊन पोहोचला. नदीत एकही नाव नाही, शेतांत एकही माणूस नाही — ढगांच्या फटीतून दिसत होतं, पलीकडच्या निर्जन वाळवंटी काठावर निःशब्द, झगमगत्या थाटात सूर्यास्ताची तयारी चालली आहे. त्या नीरव शांततेत बाळानं एकाएकी एका दिशेला बोट दाखवून म्हटलं, 'चन्न, फू.' जवळच, पाणथळ चिखलाच्या जमिनीवर एका मोठ्या कदंबाच्या झाडाच्या उंच फांदीवर काही कदंबाची फुलं उमलली होती; बाळाची लोभावलेली नजर तिकडे वेधली गेली होती. दोन-चार दिवसांपूर्वीच रायचरणानं काड्या खोचून त्याला कदंबाच्या फुलांची एक गाडी करून दिली होती; तिला दोरी बांधून ओढण्यात त्याला इतका आनंद झाला होता, की त्या दिवशी रायचरणाला लगाम घालावा लागला नव्हता; घोड्याच्या पदावरून त्याला थेट मोतद्दाराच्या पदावर बढती मिळाली होती. चिखल तुडवत फुलं तोडायला जाण्याची चन्नाची इच्छा झाली नाही — त्यानं घाईघाईनं उलट्या दिशेला बोट दाखवून म्हटलं, 'बघ बघ, ते—ऽ बघ पाखरू, ते उडून गे—ऽलं. ये रे पाखरा, ये ये.' असा अखंड, नाना तऱ्हेचा किलबिलाट करत तो जोरानं गाडी ढकलू लागला.
खोकाबाबू परत आले
पण ज्या मुलाला पुढे जज होण्याची थोडीफार तरी शक्यता आहे, त्याला इतक्या साध्या उपायानं भुलवण्याची आशा धरणं व्यर्थ — विशेषतः भोवताली नजर खिळवून ठेवण्यासारखं काहीच नव्हतं, आणि काल्पनिक पाखरावर फार वेळ काम भागत नाही. रायचरण म्हणाला, 'मग तू गाडीत बसून राहा, मी पटकन फुलं तोडून आणतो. खबरदार, पाण्याजवळ जाऊ नकोस.' असं म्हणून गुडघ्यांवर धोतर वर खोचून तो कदंबाच्या झाडाकडे निघाला. पण, तो जे पाण्याजवळ जायची मनाई करून गेला, त्यामुळे बाळाचं मन कदंबाच्या फुलांवरून परत फिरलं आणि त्याच क्षणी पाण्याकडे धावलं. त्यानं पाहिलं, पाणी खळखळ, छलछल करत धावत चाललं आहे; जणू कुण्या एका प्रचंड रायचरणाच्या हातून खोडकरपणे निसटून लाखो बालकांचा लोंढा हसत, किलबिलत, मनाई केलेल्या जागेकडे भरधाव पळून चालला आहे. त्यांच्या त्या वाईट वळणाच्या उदाहरणानं मानवी बालकाचं मन चंचल झालं. गाडीतून हळूच उतरून ते पाण्याच्या काठाशी गेलं — एक लांब गवताची काडी उचलून, तिला गळ समजून, वाकून मासे धरू लागलं — आणि ते द्वाड पाणी अस्फुट, किलबिलत्या भाषेत बाळाला पुन्हा पुन्हा आपल्या खेळघरात बोलावू लागलं. एकदा 'डुबुक्' असा एक आवाज झाला, पण पावसाळ्यात पद्मेच्या काठी असे आवाज किती तरी ऐकू येतात. रायचरणानं धोतराचा सोगा भरून कदंबाची फुलं तोडली. झाडावरून उतरून हसऱ्या चेहऱ्यानं गाडीजवळ येऊन पाहिलं, तर कुणीच नाही. चहूकडे पाहिलं, कुठेच कुणाचीही काहीही खूण नाही. क्षणात रायचरणाच्या अंगातलं रक्त गोठून गेलं. सारं जग मलिन, निस्तेज, धुरासारखं होऊन गेलं. फुटलेल्या छातीतून त्यानं एकदा जिवाच्या आकांतानं हाक फोडली, 'बाबू — खोकाबाबू — गुणाचे दादाबाबू माझे!'
खोकाबाबू परत आले
पण 'चन्न' म्हणून कुणीही ओ दिली नाही, खोडकरपणे कुठल्याही बाळाचा आवाज खुदकन हसला नाही; फक्त पद्मा पूर्वीसारखीच छलछल खळखळ करत धावत राहिली, जणू तिला काहीच ठाऊक नाही, आणि जगातल्या असल्या किरकोळ घटनांकडे लक्ष द्यायला तिला क्षणाचीही उसंत नाही. संध्याकाळ होत आली तशी जीव टांगणीला लागलेल्या आईनं चहूकडे माणसं पाठवली. कंदील घेऊन माणसं नदीकाठी आली, तर पाहतात तो रायचरण रात्रीच्या वादळी वाऱ्यासारखा सगळ्या शेतांतून 'बाबू — माझे खोकाबाबू' म्हणून फुटक्या गळ्यानं ओरडत फिरतो आहे. शेवटी घरी परतल्यावर रायचरण धाडकन आईसाहेबांच्या पायांशी येऊन कोसळला. त्याला कितीही विचारलं तरी तो रडत एवढंच म्हणे, 'मला ठाऊक नाही, आई.' हे पद्मेचंच काम, असं सगळ्यांनीच मनोमन ओळखलं; तरीही गावाच्या वेशीवर भटक्यांचा जो एक तांडा येऊन उतरला होता, त्यांच्यावरचाही संशय काही दूर झाला नाही. आणि आईसाहेबांच्या मनात तर अशी शंका आली, की रायचरणानंच चोरलं असेल; इतकंच काय, त्याला बोलावून अगदी काकुळतीनं त्या म्हणाल्या, 'तू माझं बाळ मला परत आणून दे — तू मागशील तितके पैसे तुला देईन.' हे ऐकून रायचरणानं फक्त कपाळावर हात मारून घेतला. मालकिणींनी त्याला हाकलून लावलं. अनुकूलबाबूंनी रायचरणाविषयीचा हा अन्याय्य संशय बायकोच्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता; त्यांनी विचारलं होतं, रायचरण असलं नीच कृत्य कशासाठी करील? मालकीण म्हणाल्या, 'का? त्याच्या अंगावर सोन्याचे दागिने होते.' २ रायचरण गावी परत गेला. इतकी वर्षं त्याला मूलबाळ झालं नव्हतं, होण्याची फारशी आशाही नव्हती. पण दैवयोगानं वर्ष उलटायच्या आतच त्याच्या बायकोनं उतारवयात एका मुलाला जन्म दिला आणि आपली इहलोकीची लीला आटोपली.
खोकाबाबू परत आले
या नवजात बाळाविषयी रायचरणाच्या मनात कमालीचा द्वेष उपजला. त्याला वाटलं, हा जणू कपटानं खोकाबाबूंची जागा बळकावायला आला आहे. त्याला वाटलं, धन्याच्या एकुलत्या एका मुलाला पाण्यात वाहून जाऊ देऊन स्वतः पुत्रसुख भोगणं हे जणू महापातकच. रायचरणाची विधवा बहीण नसती, तर या बाळाला जगाची हवा फार दिवस खायला मिळाली नसती. आश्चर्याची गोष्ट अशी की, हाही मुलगा काही दिवसांनी उंबरठा ओलांडू लागला आणि सगळ्या प्रकारच्या मनाया मोडण्यात मजेदार चलाखी दाखवू लागला. इतकंच काय, याचा आवाज, हसणं-रडणं सारं बरंचसं त्याच बाळासारखं. कधी कधी याचं रडणं ऐकलं की रायचरणाची छाती एकदम धस्स होई; वाटे, दादाबाबू रायचरणाला हरवून कुठे तरी रडत आहेत. फेलना — रायचरणाच्या बहिणीनं त्याचं नाव फेलना ठेवलं होतं — यथाकाळ आत्याला 'आत्या' म्हणून हाक मारू लागला. ती ओळखीची हाक ऐकून एके दिवशी अचानक रायचरणाच्या मनात आलं, 'म्हणजे खोकाबाबूंना माझा लळा सोडवला नाही तर! माझ्याच घरी येऊन जन्माला आले ते.' या विश्वासाच्या बाजूनं काही अकाट्य पुरावे होते. पहिला, ते गेल्यानंतर थोड्याच दिवसांत याचा जन्म झाला. दुसरा, इतक्या वर्षांनंतर बायकोच्या पोटी एकाएकी मूल यावं, हे काही केवळ तिच्या अंगच्या गुणानं होणं शक्य नाही. तिसरा, हाही रांगतो, दुडुदुडु चालतो आणि आत्याला आत्या म्हणतो. पुढे जज होण्यासाठी जी लक्षणं असावी लागतात, त्यांतली पुष्कळशी याच्यात उतरली आहेत. तेव्हा आईसाहेबांच्या त्या भयंकर संशयाची त्याला अचानक आठवण झाली — चकित होऊन तो मनाशीच म्हणाला, 'आहा! आईच्या मनानं बरोबर ओळखलं होतं, तिचा मुलगा कुणी चोरला ते.' मग इतके दिवस बाळाची जी हेळसांड केली होती, त्याबद्दल त्याला फार पश्चात्ताप झाला. तो पुन्हा बाळाच्या स्वाधीन झाला.
खोकाबाबू परत आले
आतापासून रायचरण फेलनाला असं वाढवू लागला, जणू तो एखाद्या मोठ्या घरचा मुलगा आहे. सॅटिनचा अंगरखा विकत आणला. जरीची टोपी आणली. मृत बायकोचे दागिने वितळवून बांगड्या आणि वाळे घडवले. आळीतल्या कुठल्याही मुलाशी तो त्याला खेळू देत नसे — रात्रंदिवस स्वतःच त्याचा एकमेव खेळगडी झाला. आळीतली पोरं संधी मिळाली की त्याला 'नवाबजादा' म्हणून चिडवत, आणि गावचे लोक रायचरणाच्या या वेडगळ वागण्यानं चकित झाले. फेलनाचं शिकायचं वय झालं तेव्हा रायचरणानं आपला जमीनजुमला सगळा विकला आणि पोराला कलकत्त्याला घेऊन गेला. तिथे मोठ्या कष्टानं एक नोकरी मिळवली आणि फेलनाला शाळेत घातलं. स्वतः कसाबसा राहून पोराला चांगलं खाणं, चांगलं लेणं, चांगलं शिक्षण देण्यात तो काही कसर ठेवत नसे. मनात म्हणे, 'बाळा, माझ्यावरच्या प्रेमापोटी तू माझ्या घरी आलास, म्हणून तुझी काही आबाळ होईल, असं होणार नाही.' असं करता करता बारा वर्षं उलटली. मुलगा अभ्यासात हुशार, दिसायलाही देखणा, धष्टपुष्ट, उजळ सावळ्या रंगाचा — केसांच्या, कपड्यांच्या ठेवणीकडे त्याचं विशेष लक्ष, स्वभाव जरा सुखासीन आणि शौकीन. बापाला तो नेमका बापासारखा मानू शकत नसे. कारण रायचरण मायेनं बाप आणि सेवेत नोकर होता, आणि त्याचा आणखी एक दोष होता — आपण फेलनाचे वडील आहोत, ही गोष्ट त्यानं सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. फेलना ज्या वसतिगृहात राहायचा, तिथली मुलं गावंढळ 'बांगाल' रायचरणाची नेहमी थट्टा करीत, आणि बापाच्या माघारी फेलनाही त्या थट्टेत सामील होत नसे, असं मी म्हणू शकत नाही. तरीही भोळ्या, मायाळू स्वभावाचा रायचरण सगळ्याच मुलांना फार आवडे; आणि फेलनालाही तो आवडे, पण आधीच सांगितलं तसं, नेमका बापासारखा नव्हे — त्यात थोडी मेहेरबानीची छटा मिसळलेली होती.
खोकाबाबू परत आले
रायचरण म्हातारा होत चालला आहे. त्याचे धनी कामात नेहमी चुका काढतात. खरं तर त्याचं शरीरही ढिलं पडत चाललं आहे, कामातही पूर्वीसारखं लक्ष लागत नाही, सारखा विसरतो — पण जो माणूस पुरा पगार देतो, तो म्हातारपणाची सबब मानायला तयार नसतो. इकडे जमीनजुमला विकून रायचरणानं जी रोकड जमवून आणली होती, तीही संपत आली आहे. फेलना आजकाल कपड्यालत्त्याच्या उणिवेवरून सतत कुरकुर करू लागला आहे. ३ एके दिवशी रायचरणानं अचानक नोकरी सोडली आणि फेलनाला काही पैसे देऊन म्हणाला, 'एक निकडीचं काम निघालं आहे, मी काही दिवसांसाठी गावी जात आहे.' असं म्हणून तो बारासतला जाऊन पोहोचला. अनुकूलबाबू तेव्हा तिथे मुन्सफ होते. अनुकूलबाबूंना दुसरं मूल झालं नव्हतं; मालकीण अजूनही तो पुत्रशोक उराशी जपत होत्या. एके दिवशी संध्याकाळी बाबू कचेरीतून येऊन विश्रांती घेत होते, आणि मालकीण एका संन्याशाकडून मूल व्हावं म्हणून भरपूर किंमत मोजून एक मुळी आणि आशीर्वाद विकत घेत होत्या — एवढ्यात अंगणात आवाज आला, 'जय हो, आई!' बाबूंनी विचारलं, 'कोण रे?' रायचरणानं येऊन नमस्कार केला आणि म्हणाला, 'मी रायचरण.' म्हाताऱ्याला पाहून अनुकूलबाबूंचं हृदय द्रवलं. त्याच्या सध्याच्या स्थितीबद्दल त्यांनी हजार प्रश्न विचारले आणि त्याला पुन्हा कामावर ठेवून घेण्याचा प्रस्ताव मांडला. रायचरण म्लान हसून म्हणाला, 'आईसाहेबांना एकदा नमस्कार करायचा आहे.' अनुकूलबाबू त्याला बरोबर घेऊन आत अंतःपुरात गेले. आईसाहेबांनी रायचरणाचं फारसं प्रसन्नपणे स्वागत केलं नाही — रायचरणानं तिकडे लक्ष न देता हात जोडून म्हटलं, 'धनी, आई, तुमचा मुलगा मीच चोरून नेला होता. पद्मेनं नव्हे, आणखी कुणीही नव्हे, हा कृतघ्न, अधम मीच —'
खोकाबाबू परत आले
अनुकूलबाबू उद्गारले, 'काय म्हणतोस रे? कुठे आहे तो?' 'जी, माझ्याकडेच आहे, मी परवा आणून देतो.' त्या दिवशी रविवार, कचेरी नाही. सकाळपासून नवरा-बायको दोघंही उत्सुकतेनं वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. दहा वाजता फेलनाला बरोबर घेऊन रायचरण येऊन पोहोचला. अनुकूलबाबूंच्या पत्नी कसलाही प्रश्न न विचारता, कसलीही शहानिशा न करता त्याला मांडीवर बसवून, त्याला स्पर्श करून, त्याला हुंगून, अतृप्त डोळ्यांनी त्याचा चेहरा न्याहाळत रडत-हसत अगदी व्याकूळ झाल्या. खरंच, मुलगा दिसायला देखणा — कपड्यालत्त्यात, रूपरंगात दारिद्र्याची कसलीही खूण नाही. चेहऱ्यावर अतिशय लोभस, नम्र, लाजरा भाव. ते पाहून अनुकूलबाबूंच्याही हृदयात एकाएकी माया उचंबळून आली. तरीही चेहरा निर्विकार ठेवून त्यांनी विचारलं, 'काही पुरावा आहे?' रायचरण म्हणाला, 'असल्या कामाचा पुरावा कसा असणार? मी तुमचा मुलगा चोरला होता, हे फक्त देवाला ठाऊक, जगात आणखी कुणाला ठाऊक नाही.' अनुकूलबाबूंनी विचार करून ठरवलं, की मुलगा हाती लागताच बायकोनं ज्या ओढीनं त्याला कवटाळून धरलं आहे, ते पाहता आता पुरावे गोळा करण्याच्या खटपटीत पडणं शहाणपणाचं नाही; काहीही असो, विश्वास ठेवणंच बरं. शिवाय, रायचरणाला असा मुलगा तरी कुठे मिळणार? आणि म्हातारा नोकर त्यांना विनाकारण फसवेल तरी कशाला? मुलाशीही बोलून त्यांनी जाणून घेतलं, की तो लहानपणापासून रायचरणाबरोबरच आहे आणि रायचरणाला वडील म्हणून ओळखत आला आहे, पण रायचरण त्याच्याशी कधीही बापासारखा वागला नाही, त्याच्या वागण्यात बरीचशी नोकराचीच रीत होती.
खोकाबाबू परत आले
अनुकूलबाबूंनी मनातला संशय काढून टाकला आणि म्हणाले, 'पण रायचरण, यापुढे तू आमच्या सावलीलाही उभं राहायचं नाहीस.' रायचरण हात जोडून गदगदलेल्या कंठानं म्हणाला, 'धनी, या म्हातारपणी कुठे जाऊ?' मालकीण म्हणाल्या, 'जाऊ द्या हो. माझ्या बाळाचं कल्याण होवो. मी त्याला माफ केलं.' न्यायप्रिय अनुकूलबाबू म्हणाले, 'असलं काम ज्यानं केलं, त्याला माफ करता येत नाही.' रायचरण अनुकूलबाबूंचे पाय धरून म्हणाला, 'मी केलं नाही, देवानं केलं.' आपलं पाप देवाच्या माथी मारण्याचा हा प्रयत्न पाहून अनुकूलबाबू आणखीच चिडून म्हणाले, 'ज्यानं असा विश्वासघात केला, त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवणं योग्य नाही.' रायचरण धन्याचे पाय सोडून म्हणाला, 'तो मी नव्हे, धनी.' 'मग कोण?' 'माझं नशीब.' पण असल्या खुलाशानं कोणत्याही सुशिक्षित माणसाचं समाधान होऊ शकत नाही. रायचरण म्हणाला, 'जगात मला आणखी कुणी नाही.' आपण मुन्सफांचा मुलगा आहोत, आणि रायचरणानं इतके दिवस आपल्याला चोरून, स्वतःचा मुलगा म्हणवून आपली मानहानी केली, हे जेव्हा फेलनानं पाहिलं, तेव्हा त्याला मनातून थोडा रागच आला. पण तरीही उदारपणे तो वडिलांना म्हणाला, 'बाबा, याला माफ करा. घरात राहू द्यायचं नसेल, तर याला दरमहा थोडे पैसे बांधून द्या.' यानंतर रायचरणानं एक शब्दही न बोलता एकदा मुलाचा चेहरा न्याहाळला, सगळ्यांना नमस्कार केला; आणि मग दाराबाहेर पडून जगातल्या असंख्य माणसांत मिसळून गेला. महिनाअखेरीस अनुकूलबाबूंनी त्याच्या गावच्या पत्त्यावर थोडी रक्कम पाठवली, तेव्हा ते पैसे परत आले. तिथे कुणीही नाही.