रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
कोडं सुटलं
१ झिंकडाकोट्याचे कृष्णगोपाल सरकार थोरल्या मुलावर जमीनदारीचा आणि संसाराचा भार सोपवून काशीला निघून गेले. मुलखातले सगळे अनाथ, गरीब लोक त्यांच्यासाठी आक्रोश करून रडू लागले. अशी उदारता, अशी धर्मनिष्ठा कलियुगात पाहायला मिळत नाही, असं सगळेच म्हणू लागले. त्यांचा मुलगा विपिनविहारी हा आजकालचा एक सुशिक्षित बी. ए. दाढी ठेवतात, चष्मा लावतात, कुणात फारसे मिसळत नाहीत. अतिशय सच्छील— इतके की तंबाखूसुद्धा ओढत नाहीत, पत्तेसुद्धा खेळत नाहीत. चेहरा अगदी भल्या माणसासारखा, पण माणूस भलताच कडक. त्यांच्या रयतेला लवकरच हे जाणवलं. म्हाताऱ्या मालकांपाशी निभाव लागत असे, पण यांच्यापाशी कोणत्याही सबबीवर देण्याची किंवा खंडाची एक पैही सूट मिळण्याची आशा नाही. ठरलेल्या मुदतीपेक्षा एक दिवसही मागेपुढे होण्याची सोय नाही. कारभार हाती घेताच विपिनविहारींच्या लक्षात आलं की वडिलांनी पुष्कळ ब्राह्मणांना जमिनी बिनखंडी सोडून दिल्या आहेत, आणि किती लोकांचा खंड कमी करून दिला आहे त्याची तर गणतीच नाही. कुणी त्यांच्यापाशी काहीही मागितलं की ते पुरं केल्याशिवाय त्यांना राहवत नसे— हा त्यांचा एक दुबळेपणा होता. विपिनविहारी म्हणाले, 'हे कदापि होणार नाही; अर्धी जमीनदारी मी इनाम म्हणून सोडून देऊ शकत नाही.' त्यांच्या मनात पुढील दोन युक्तिवाद उभे राहिले. पहिला असा की, जे निकम्मे लोक घरी बसून या जमिनींचं उत्पन्न खाऊन गब्बर होत आहेत, ते बहुतेक कुचकामी आणि दयेला अपात्र आहेत; अशा दानानं देशात फक्त आळसाला खतपाणी मिळतं.
कोडं सुटलं
दुसरा असा की, त्यांच्या बापजाद्यांच्या काळापेक्षा आता उपजीविका फार दुर्मिळ आणि महाग झाली आहे. गरजा पुष्कळ वाढल्या आहेत. आता एखाद्या सभ्य गृहस्थाला आपली प्रतिष्ठा राखून राहायचं तर पूर्वीच्या चौपट खर्च येतो. तेव्हा त्यांच्या वडिलांनी ज्या निश्चिंत मनानं दोन्ही हातांनी सगळं वाटून-उधळून टाकलं, तसं आता करून चालणार नाही; उलट ते सगळं वेचून, वाढवून पुन्हा घरात आणण्याचा प्रयत्न करणं हेच कर्तव्य. कर्तव्यबुद्धीनं त्यांना जे सांगितलं तेच ते करू लागले. एक प्रिन्सिपल पकडून ते चालू लागले. घरातून जे बाहेर गेलं होतं ते हळूहळू पुन्हा घरात परतू लागलं. वडिलांची फारच थोडी दानं त्यांनी कायम ठेवली, आणि जी ठेवली तीही कायमचं दान म्हणून गणली जाऊ नयेत अशी तजवीज केली. काशीत असताना कृष्णगोपालांच्या कानी पत्रांतून रयतेचा आक्रोश येऊन पोहोचला— इतकंच नव्हे, तर काही जण तिथे त्यांच्यापाशी जाऊनही रडले. कृष्णगोपालांनी विपिनविहारींना पत्र लिहिलं की हे काम निंद्य होत आहे. विपिनविहारींनी उत्तरात लिहिलं की, पूर्वी जसं दान दिलं जाई तशी येणीही नाना प्रकारची होती. तेव्हा जमीनदार आणि रयत दोन्ही बाजूंनी देणं-घेणं होतं. अलीकडे नवे नवे कायदे होऊन रास्त खंडाखेरीज बाकीची सगळी येणी अजिबात बंद झाली आहेत, आणि फक्त खंड वसूल करण्याखेरीज जमीनदाराचे इतर मानाचे हक्कही उठले आहेत; तेव्हा आजच्या दिवसांत मी माझ्या रास्त येण्याकडे कडक नजर ठेवली नाही तर उरतं काय? आता रयतही मला जास्तीचं काही देणार नाही, मीही तिला जास्तीचं काही देणार नाही— आता आमच्यात फक्त देण्या-येण्याचा व्यवहार. दानधर्म करायला गेलो तर दिवाळं निघेल, इस्टेट राखणं आणि घराण्याची प्रतिष्ठा राखणं कठीण होऊन बसेल.
कोडं सुटलं
काळ इतका बदललेला पाहून कृष्णगोपाल फार चिंतेत पडत आणि विचार करीत, आताची मुलं आताच्या काळाला साजेसं काम करताहेत, आमच्या जुन्या काळचे नियम आता चालणार नाहीत. मी दूर बसून यात हात घालायला गेलो तर ते म्हणतील, मग तुमची इस्टेट तुम्हीच परत घ्या, आम्हाला ती सांभाळता येणार नाही. कशाला ती उठाठेव, बाबा; हे उरलेले चार दिवस कसेबसे हरिनाम घेत काढता आले तरी पुरे. २ अशा रीतीनं कारभार चालू लागला. पुष्कळ खटले-मुकदमे, भांडणतंटे करून विपिनविहारींनी जवळजवळ सगळं एक प्रकारे आपल्या मनासारखं लावून घेतलं. बहुतेक कुळांनी भीतीपोटी शरणागती पत्करली; फक्त मिर्झाबीबीचा मुलगा अछिमद्दी विश्वास काही केल्या बधला नाही. विपिनविहारींचा रागही सगळ्यात जास्त त्याच्यावरच. ब्राह्मणांच्या ब्रह्मोत्तर जमिनींचा एक अर्थ तरी समजू शकतो, पण हा मुसलमानाचा पोर कोणत्या हिशेबानं इतकी जमीन बिनसाऱ्यानं आणि नाममात्र खंडानं भोगतो, ते कळत नाही. एका सामान्य यवन विधवेच्या पोरानं गावच्या देशी शाळेत जेमतेम दोन ओळी लिहायला-वाचायला शिकून घेतल्या आहेत, पण आपल्या नशिबाच्या घमेंडीत तो जणू कुणालाच जुमानत नाही. जुन्या कारकुनांकडून विपिनबाबूंना कळलं की मालकांच्या अमदानीपासून खरोखरच ही माणसं पुष्कळ काळ कृपा मिळवत आली आहेत. पण या कृपेचं काही खास कारण त्यांना सांगता येत नाही. बहुधा अनाथ विधवेनं आपलं दुःख सांगून मालकांच्या मनात दया उपजवली असावी.
कोडं सुटलं
पण विपिनबाबूंना ही कृपा सगळ्यात अपात्री वाटली. विशेषतः या लोकांची पूर्वीची गरिबी त्यांनी पाहिली नव्हती; आता त्यांची ही बेसुमार सुबत्ता आणि अमर्याद ऐट पाहून विपिनबाबूंना वाटे की यांनी जणू त्यांच्या दयेनं दुबळ्या, भोळ्या वडिलांना फसवून त्यांच्या इस्टेटीचा एक हिस्सा चोरून नेला आहे. अछिमद्दीही उद्धट स्वभावाचा तरुण. तो म्हणाला, जीव गेला तरी बेहत्तर, माझ्या हक्कातला तीळभरही सोडणार नाही. दोन्ही पक्षांत जोराचं युद्ध पेटलं. अछिमद्दीची विधवा आई मुलाला पुन्हा पुन्हा समजावत राहिली, जमीनदाराशी कज्जा करण्यात काही अर्थ नाही; इतके दिवस ज्यांच्या कृपेवर आयुष्य गेलं त्यांच्याच कृपेवर विसंबून राहणं हेच कर्तव्य— जमीनदार मागतात त्याप्रमाणे थोडं सोडून देऊ या. अछिमद्दी म्हणाला, 'आई, तुला यातलं काहीच कळत नाही.' खटल्यांत अछिमद्दी एकामागून एक हरू लागला. पण जसजशी हार होऊ लागली तसतसा त्याचा हट्ट वाढत गेला. आपल्या हक्कासाठी त्यानं सर्वस्व पणाला लावलं. मिर्झाबीबी एके दिवशी तिसऱ्या प्रहरी बागेतली थोडी भाजी-तरकारी भेट म्हणून घेऊन चोरून विपिनबाबूंना भेटायला गेली. म्हातारी जणू आपल्या करुण मातृदृष्टीनं मायेनं विपिनच्या सर्वांगावरून हात फिरवत म्हणाली, 'तू माझा बाप रे, अल्ला तुझं भलं करो. बाळा, अछिमचं वाटोळं करू नकोस, ते तुझ्या धर्माला शोभणार नाही. त्याला मी तुझ्याच हाती सोपवला— काही झालं तरी पोसावाच लागणारा एक नाकर्ता धाकटा भाऊ समजून त्याला पदरात घे; तुझ्या अपार वैभवातला एक चिमुकला कण त्याला मिळाला म्हणून मनाला लावून घेऊ नकोस, बापा.'
कोडं सुटलं
म्हातारपणी येणाऱ्या स्वाभाविक वाचाळपणापायी ही म्हातारी आपल्याशी घरोबा जोडायला आली आहे हे पाहून विपिन फार वैतागला. म्हणाला, 'तू बाईमाणूस, तुला यातलं काही कळत नाही. काही सांगायचं असेल तर तुझ्या मुलाला पाठवून दे.' मिर्झाबीबीनं आपल्या मुलाकडूनही आणि परक्याच्या मुलाकडूनही ऐकलं की तिला यातलं काहीच कळत नाही. अल्लाचं नाव घेत, डोळे पुसत पुसत विधवा घरी परतली. ३ खटला फौजदारीतून दिवाणीत, दिवाणीतून जिल्हा कोर्टात, जिल्हा कोर्टातून हायकोर्टापर्यंत गेला. असं करता करता दीडेक वर्ष लोटलं. अछिमद्दी कर्जात आकंठ बुडाला तेव्हा अपील कोर्टात त्याचा अंशतः विजय ठरला. पण जमिनीवरच्या वाघाच्या तोंडातून जे थोडंफार वाचलं त्यावर पाण्यातल्या मगरीनं झडप घातली. सावकारानं संधी साधून डिक्री बजावली. अछिमद्दीच्या सर्वस्वाच्या लिलावाचा दिवस ठरला. तो दिवस सोमवार, बाजाराचा दिवस. एका लहानशा नदीच्या काठी बाजार भरतो. पावसाळ्यात नदी तुडुंब भरली आहे. काही खरेदी-विक्री नावांमधून, काही काठावर चालली आहे; कलकलाटाला अंत नाही. मालामध्ये या आषाढ महिन्यात फणसांची आवक सगळ्यात जास्त, हिलसा मासेही भरपूर. आभाळ ढगांनी भरून आलं आहे; पाऊस येईल या भीतीनं पुष्कळ विक्रेत्यांनी बांबू रोवून त्यावर एकेक कापड ताणलं आहे. अछिमद्दीही बाजार करायला आला आहे, पण त्याच्या हातात एक पैसुद्धा नाही, आणि आजकाल त्याला कुणी उधारीवरही काही विकत नाही. तो एक कोयता आणि पितळेचं एक ताट हातात घेऊन आला आहे; ते गहाण ठेवून उधार घेणार.
कोडं सुटलं
विपिनबाबू तिसऱ्या प्रहरी हवा खायला बाहेर पडले आहेत; बरोबर लाठ्या घेतलेले दोन-तीन शिपाई चालले आहेत. कलकलाटानं ओढ लागून त्यांना एकदा बाजार पाहावासा वाटला. बाजारात शिरून ते सहज कुतूहलानं द्वारी तेल्याला त्याच्या जमाखर्चाविषयी विचारत होते, इतक्यात अछिमद्दी कोयता उगारून वाघासारखी डरकाळी फोडत विपिनबाबूंवर धावून आला. बाजारातल्या लोकांनी त्याला अर्ध्या वाटेतच धरून तत्काळ निःशस्त्र केलं— लगेच त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं, आणि बाजारात पुन्हा पूर्वीसारखी खरेदी-विक्री चालू झाली. या घटनेनं विपिनबाबू मनातून खूश झाले नाहीत असं म्हणता येणार नाही. आपण ज्याची शिकार करू पाहतो त्यानंच आपल्यावर पंजा मारायला यावं, हा बदमाशपणा आणि ही बेअदबी असह्य. काही का असेना, बेटा जसा बदमाश आहे तशीच त्याला योग्य शिक्षा होईल. विपिनबाबूंच्या अंतःपुरातल्या स्त्रिया आजची हकीकत ऐकून शहारल्या. सगळ्याच म्हणाल्या, 'आई गं, कुठला हा बदमाश हरामजादा मेला!' त्याला योग्य शिक्षा होईल या आशेनं त्यांना बरंच समाधान वाटलं. इकडे त्याच संध्याकाळी विधवेचं अन्नहीन, पुत्रहीन घर मरणापेक्षाही काळोखं झालं. ही घटना सगळे विसरले; जेवले-खाल्ले, अंथरुणावर पडले, झोपी गेले— फक्त एका म्हातारीसाठी जगातल्या सगळ्या घटनांमध्ये हीच सर्वांत मोठी होऊन बसली; आणि तरीही त्या घटनेशी झुंजायला अवघ्या जगात दुसरं कुणीही नाही— फक्त दिवा नसलेल्या झोपडीच्या एका कोपऱ्यात काही जीर्ण हाडं आणि एक हताश, भयभीत हृदय.
कोडं सुटलं
४ दरम्यान तीनेक दिवस उलटून गेले आहेत. उद्या डेप्युटी मॅजिस्ट्रेटपुढे सुनावणीचा दिवस ठरला आहे. विपिनबाबूंनाही साक्ष द्यायला जावं लागणार. यापूर्वी जमीनदाराला कधी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागलं नव्हतं, पण विपिनबाबूंची त्याला काहीच हरकत नाही. दुसऱ्या दिवशी ठरल्या वेळी पगडी घालून, घड्याळाची साखळी लोंबकळत ठेवून, पालखीत बसून मोठ्या थाटामाटात विपिनबाबू कचेरीत जाऊन पोहोचले. कोर्टाच्या दालनात आज माणसं मावत नाहीत. इतका मोठा गवगवा कोर्टात पुष्कळ दिवसांत झाला नव्हता. खटला पुकारायला फारसा अवकाश उरला नसताना एका बरकंदाजानं येऊन विपिनबाबूंच्या कानात काहीतरी सांगितलं— ते चपापले आणि 'जरा काम आहे' असं म्हणत बाहेर आले. बाहेर येऊन पाहतात तो काही अंतरावर एका वडाखाली त्यांचे वृद्ध वडील उभे आहेत. अनवाणी पाय, अंगावर हरिनामाची अक्षरं छापलेलं एक उपरणं, हातात हरिनामाची माळ; कृश देह जणू स्निग्ध तेजानं उजळलेला. कपाळावरून एक शांत करुणा विश्वभर पसरते आहे. चपकन, जोब्बा आणि तंग पाटलोण सांभाळत विपिनबाबूंनी मोठ्या कष्टानं त्यांना वाकून नमस्कार केला. डोक्यावरची पगडी नाकाच्या शेंड्यावर घसरली, घड्याळ खिशातून बाहेर निसटलं. त्या घाईघाईनं सावरून त्यांनी वडिलांना जवळच्याच एका वकिलाच्या बिऱ्हाडी चलण्याची विनंती केली. कृष्णगोपाल म्हणाले, 'नको, मला जे सांगायचं आहे ते मी इथेच सांगून टाकतो.' विपिनबाबूंच्या माणसांनी कुतूहलानं जमलेल्या लोकांना दूर लोटलं. कृष्णगोपाल म्हणाले, 'अछिमची सुटका होईल असा प्रयत्न करायला हवा, आणि त्याची जी मालमत्ता तू हिसकावून घेतली आहेस ती परत करायची.'
कोडं सुटलं
विपिनबाबूंनी चकित होऊन विचारलं, 'एवढ्यासाठी आपण काशीहून इतक्या लांब आलात? त्या लोकांवर आपली एवढी कृपा का?' कृष्णगोपाल म्हणाले, 'ते ऐकून तुला काय मिळणार आहे, बाबा?' विपिनबाबूंनी सोडलं नाही; म्हणाले, 'अपात्रतेचा विचार करून कितीतरी लोकांची कितीतरी दानं मी परत घेतली, त्यांत कितीतरी ब्राह्मणही होते; आपण त्यातल्या कशातच हात घातला नाहीत, आणि या मुसलमानाच्या पोरासाठी इतक्या लांब येण्याइतकी आपली धडपड! आज एवढं सगळं महाभारत करून शेवटी अछिमला सोडवायचं आणि सगळं परत द्यायचं, तर लोकांना मी काय सांगू?' कृष्णगोपाल काही वेळ गप्प राहिले. शेवटी भरभर थरथरणाऱ्या बोटांनी माळ फिरवत फिरवत किंचित कापऱ्या आवाजात म्हणाले, 'लोकांना सगळं उघड करून सांगणं आवश्यक वाटलं तर सांग— अछिमद्दी तुझा भाऊ लागतो, माझा मुलगा.' विपिनबाबू दचकून म्हणाले, 'यवनीच्या पोटी?' कृष्णगोपाल म्हणाले, 'हो, बाबा.' विपिनबाबू बराच वेळ स्तब्ध राहिले, मग म्हणाले, 'त्या सगळ्या गोष्टी नंतर बघू; आता आपण घरी चलावं.' कृष्णगोपाल म्हणाले, 'नाही, मी आता घरात पाऊल टाकणार नाही. मी इथूनच आत्ता परत निघालो. आता तुझ्या धर्माला जे उचित वाटेल ते कर.' असं म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला, आणि अश्रू आवरत, थरथरत्या अंगानं ते परत निघाले. विपिनला काय बोलावं, काय करावं, सुचेना. तो गप्प उभा राहिला. पण इतकं मात्र त्याच्या मनात आलं, की जुन्या काळची धर्मनिष्ठा म्हणजे ही अशी! शिक्षणात आणि चारित्र्यात आपण आपल्या वडिलांपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहोत असं त्यांना वाटलं. त्यांनी ठरवलं, अंगी एखादं प्रिन्सिपल नसलं की हे असं होतं.
कोडं सुटलं
कोर्टात परत आले तेव्हा त्यांनी पाहिलं, रोडावलेला, पिचलेला, सुकलेल्या पांढुरक्या ओठांचा, जळजळीत डोळ्यांचा अछिम दोन पहारेकऱ्यांच्या ताब्यात कैदी होऊन, एक मळकं चिरगूट अंगावर घेऊन बाहेर उभा आहे. तो विपिनचा भाऊ! डेप्युटी मॅजिस्ट्रेटशी विपिनबाबूंची मैत्री होती. एक प्रकारे गोंधळ होऊन खटला फिसकटला. आणि अछिमलाही थोड्याच दिवसांत आपली पूर्वीची स्थिती परत मिळाली. पण त्याचं कारण त्यालाही कळलं नाही, आणि इतर लोकही चकित झाले. खटल्याच्या वेळी कृष्णगोपाल आले होते ही गोष्ट पसरायला वेळ लागला नाही. सगळे नाना तऱ्हेच्या कुजबुजी करू लागले. चाणाक्ष वकिलांनी सगळा प्रकार ताडला. रामतारण वकिलाला कृष्णगोपालांनी स्वतःच्या खर्चानं शिकवून-सवरून माणसात आणलं होतं. त्याला पहिल्यापासूनच संशय होता, पण आता इतक्या दिवसांनी त्याची पुरी खात्री पटली की नीट शोध घेतला तर प्रत्येक साधू पकडला जातो. कुणी कितीही माळा जपो, जगात सगळे बेटे माझ्यासारखेच. संसारात साधू आणि असाधू यांच्यात फरक इतकाच की, साधू कपटी असतात आणि असाधू निष्कपट. काही का असेना, कृष्णगोपालांची जगप्रसिद्ध दया, धर्म, थोरवी हे सगळं ढोंग होतं असं ठरवल्यावर रामतारणाचं जणू इतक्या दिवसांचं एक न सुटणारं कोडं सुटलं; आणि कोणत्या युक्तिवादानं कोण जाणे, त्यामुळे कृतज्ञतेचं ओझंही जणू खांद्यावरून हलकं झालं. त्याला मोठं हायसं वाटलं.