रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
क्षुधित पाषाण
मी आणि माझा एक नातलग पूजेच्या सुट्टीत देशाटन आटोपून कलकत्त्याला परतत होतो, तेव्हा आगगाडीत त्या बाबूंची भेट झाली. त्यांचा पेहराव पाहून आधी ते पश्चिमेकडचे कोणी मुसलमान असावेत असा भ्रम झाला होता. त्यांचे बोलणे ऐकून तर आणखीच बुचकळ्यात पडलो. जगातल्या प्रत्येक विषयावर ते अशा थाटात बोलू लागले, की जणू विश्वाचा नियंता कोणतेही काम करण्यापूर्वी आधी त्यांचाच सल्ला घेत असतो. जगाच्या पडद्याआड अशा अश्रुतपूर्व, गूढ घटना घडत होत्या, रशियन इतके पुढे सरकले होते, इंग्रजांचे असले गुप्त डाव होते, देशी राजांमध्ये अशी काही खिचडी शिजत होती — यातले काहीएक ठाऊक नसताना आम्ही अगदी निर्धास्त होतो. आमचे हे नवे परिचित किंचित हसून इंग्रजीत म्हणाले, 'होरेशिओ, स्वर्गात आणि पृथ्वीवर तुमच्या वर्तमानपत्रांत छापून येते त्याहून कितीतरी अधिक घडत असते.' आम्ही पहिल्यांदाच घर सोडून बाहेर पडलो होतो, त्यामुळे त्या माणसाचे ते रंगढंग पाहून थक्क झालो. हा माणूस बारीकसारीक निमित्तानेही कधी विज्ञान सांगे, कधी वेदांवर भाष्य करी, तर कधी एकाएकी फारसी शेर म्हणू लागे; विज्ञान, वेद आणि फारसी भाषा यांपैकी कशातच आमची काडीमात्र गती नसल्याने त्यांच्याविषयीची आमची भक्ती उत्तरोत्तर वाढतच गेली. इतकी, की माझ्या थिऑसॉफिस्ट नातलगाच्या मनाने पक्के घेतले, आमच्या या सहप्रवाशाचा कसल्या ना कसल्या अलौकिक गोष्टीशी काहीतरी संबंध आहे — कुठलेतरी अपूर्व मॅग्नेटिझम, वा दैवी शक्ती, वा सूक्ष्म देह, नाहीतर त्याच जातीचे काहीतरी. या असामान्य माणसाची अगदी सामान्य वाक्येसुद्धा ते भक्तिविह्वल, मुग्ध होऊन ऐकत होते आणि गुपचूप टिपून घेत होते. माझ्या मनाला असे आले, की असामान्य व्यक्तीनेही ते गुपचूप ओळखले होते आणि ते जरासे खूषही झाले होते.
क्षुधित पाषाण
गाडी जंक्शनवर येऊन थांबली, तेव्हा पुढच्या गाडीची वाट पाहत आम्ही वेटिंगरूममध्ये जमलो. तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजले होते. वाटेत कुठेतरी काहीतरी अडथळा आल्यामुळे गाडी बरीच उशिरा येणार असे कळले. मी तोवर टेबलावर बिछाना पसरून झोपायचे ठरवले होते, इतक्यात त्या असामान्य गृहस्थांनी पुढील कहाणी रंगवून सांगायला बसले. त्या रात्री मग माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. * * * राज्यकारभाराच्या एक-दोन बाबतींत मतभेद झाल्यामुळे मी जुनागडची नोकरी सोडली आणि हैदराबादला निजाम सरकारच्या चाकरीत रुजू झालो; तेव्हा मी तरुण आणि धडधाकट आहे हे पाहून त्यांनी पहिल्याच फटक्यात बरीच नावाच्या ठिकाणी कापसाची जकात वसूल करण्याच्या कामावर माझी नेमणूक केली. बरीच हे ठिकाण मोठे रमणीय आहे. निर्जन डोंगराच्या पायथ्याशी, मोठमोठ्या रानांतून शुस्ता नदी (संस्कृत 'स्वच्छतोया'चा अपभ्रंश) गोट्यांवरून खळाळत्या वाटेने, एखाद्या निपुण नर्तकीसारखी पावलोपावली वळणे घेत, द्रुत नृत्याच्या लयीत वाहत गेली आहे. नेमक्या त्याच नदीकाठी, दगडांनी बांधलेल्या दीडशे पायऱ्यांच्या उंचच उंच घाटावर, डोंगराच्या पायथ्याशी शुभ्र पाषाणाचा एक प्रासाद एकटाच उभा आहे — जवळपास कुठे वस्ती नाही. बरीचचा कापसाचा बाजार आणि गाव इथून दूर आहेत. सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी दुसऱ्या शाह मामूदने भोगविलासासाठी हा प्रासाद या निर्जन ठिकाणी बांधला होता. तेव्हा त्याच्या स्नानगृहातल्या कारंज्यांच्या मुखांतून गुलाबाचा गंध ल्यालेल्या पाण्याच्या धारा उसळत असत, आणि त्या तुषारांनी शीतल झालेल्या एकांत दालनात, संगमरवरी जडावाच्या स्निग्ध शिलासनांवर बसून, आपली कोमल अनवाणी पदपल्लवे हौदाच्या निर्मळ जलात सोडून, तरुण इराणी ललना स्नानापूर्वी केस मोकळे सोडत आणि मांडीवर सतार घेऊन द्राक्षमळ्यांच्या गझला गात असत.
क्षुधित पाषाण
आता ते कारंजे खेळत नाही, ते गाणे नाही, पांढऱ्या दगडावर शुभ्र पावलांचे सुंदर आघात पडत नाहीत — आता हे आमच्यासारख्या, एकांतवासाने गांजलेल्या, सहचारिणीविना राहणाऱ्या जकात-कलेक्टराचे अतिप्रचंड आणि अतिशून्य निवासस्थान आहे. पण कचेरीतला म्हातारा कारकून करीम खाँ याने मला या प्रासादात राहू नका म्हणून पुन्हा पुन्हा बजावले होते. म्हणाला होता, हवे तर दिवसा राहावे, पण रात्रीचा मुक्काम मात्र इथे कधीही करू नये. मी ते हसण्यावारी नेले. नोकर म्हणाले, संध्याकाळपर्यंत काम करू, पण रात्री इथे राहणार नाही. मी म्हटले, तथास्तु. या वास्तूची अशी काही बदनामी होती, की रात्री चोरसुद्धा इथे फिरकायची हिंमत करत नसत. सुरुवातीसुरुवातीला या ओसाड पाषाणप्रासादाचा सुनसानपणा माझ्या छातीवर एखाद्या भयंकर ओझ्यासारखा दडपून बसे; मी जमेल तितका वेळ बाहेरच राहून अविश्रांत कामकाज करी आणि रात्री घरी परतून थकल्या देहाने झोपी जाई. पण आठवडाभर उलटायच्या आतच त्या वास्तूची एक विलक्षण नशा मला हळूहळू घेरू लागली. माझी ती अवस्था वर्णन करणेही कठीण, आणि ती गोष्ट लोकांना खरी वाटायला लावणेही अवघड. सारी वास्तू जणू एखाद्या जिवंत प्राण्यासारखी मला आपल्या जठरातल्या मोहरसात थोडी थोडी पचवू लागली. बहुधा या वास्तूत पाऊल ठेवल्या क्षणीच ही क्रिया सुरू झाली होती — पण ज्या दिवशी मला जाणीवपूर्वक पहिल्यांदा तिचा आरंभ जाणवला, तो दिवस मला स्पष्ट आठवतो.
क्षुधित पाषाण
तेव्हा उन्हाळा नुकताच सुरू झाला होता, बाजार मंदावला होता; माझ्या हाताशी काही काम नव्हते. सूर्यास्ताच्या थोडे आधी मी त्या नदीकाठी घाटाच्या तळाशी एक आरामखुर्ची टाकून बसलो होतो. तेव्हा शुस्ता आटून रोडावली होती; — पैलतीरावरचा विस्तीर्ण वाळूचा पट्टा उतरत्या उन्हाच्या आभेत रंगून गेला होता, आणि अलीकडे घाटाच्या पायऱ्यांपाशी नितळ उथळ पाण्याच्या तळाशी गोटे झिकमिकत होते. त्या दिवशी कुठेच वाऱ्याची झुळूक नव्हती. जवळच्या डोंगरावरच्या रानतुळस, पुदिना आणि बडीशेपेच्या जंगलातून एक दाट सुगंध उठून निश्चल आकाशाला जडावून टाकत होता. सूर्य डोंगरशिखराआड उतरला मात्र, आणि त्याच क्षणी दिवसाच्या नाट्यशाळेवर सावलीचा एक लांबलचक पडदा पडला; — इथे डोंगरांचा आडोसा असल्याने सूर्यास्ताच्या वेळी उजेड-अंधाराचे मीलन फार वेळ टिकत नाही. घोड्यावर बसून एक रपेट मारून यावी म्हणून उठावे उठावे करत होतो, इतक्यात पायऱ्यांवर पावलांचा आवाज ऐकू आला. मागे वळून पाहिले, तर कोणीच नाही. इंद्रियांचा भ्रम समजून पुन्हा वळून बसतो न बसतो तोच एकदम अनेक पावलांचा आवाज ऐकू आला — जणू पुष्कळ जण मिळून धावत-पळत खाली उतरत आहेत. किंचित भयात एक अपूर्व रोमांच मिसळून माझे सर्वांग भरून गेले. माझ्यासमोर कोणतीही आकृती नव्हती, तरीही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावे इतक्या स्पष्टपणे मला वाटले, की या उन्हाळी सायंकाळी विलासचंचल स्त्रियांचा एक घोळका शुस्तेच्या पाण्यात स्नानासाठी उतरला आहे. त्या सायंकाळी त्या निःस्तब्ध डोंगरकडेवर, नदीकाठी, निर्जन प्रासादात कुठेही कसलाही आवाज नव्हता; तरीही मला जणू स्पष्ट ऐकू आले, झऱ्याच्या शंभर धारांसारख्या खोडकर खळखळत्या हास्यात एकमेकींचा भरभर पाठलाग करत त्या स्नानार्थिनी माझ्या बाजूने निघून गेल्या. जणू त्यांनी माझी दखलच घेतली नाही.
क्षुधित पाषाण
त्या जशा मला अदृश्य, तसा मीही जणू त्यांना अदृश्य. नदी पूर्वीसारखीच निश्चल होती; पण मला स्पष्ट जाणवले, की स्वच्छतोयेचा उथळ प्रवाह किणकिणत्या कंकणांच्या अनेक बाहूंच्या हिंदोळ्यांनी ढवळून निघाला आहे, हसत हसत सख्या एकमेकींच्या अंगावर पाणी उडवत आहेत, आणि पोहणाऱ्या ललनांच्या पायांच्या फटकाऱ्यांनी पाण्याचे थेंब मूठमूठ मोत्यांसारखे आकाशात उधळले जात आहेत. माझ्या छातीत एक प्रकारचा कंप सुटला; ती उत्तेजना भयाची होती, की आनंदाची, की कुतूहलाची, नेमके सांगता येत नाही. नीट डोळे भरून पाहावे अशी फार इच्छा होऊ लागली, पण समोर पाहण्यासारखे काहीच नव्हते; वाटले, नीट कान दिला तर त्यांचे सारे बोलणे स्पष्ट ऐकू येईल, — पण एकाग्र मनाने कान देऊनही ऐकू येत होती ती फक्त रानातल्या रातकिड्यांची किरकिर. वाटले, अडीचशे वर्षांचा एक काळाकभिन्न पडदा अगदी माझ्यासमोर झुलतो आहे — भीत भीत त्याचे एक टोक उचलून आत डोकावून पाहावे — आत मोठी सभा भरली आहे, पण गडद अंधारात काहीच दिसत नाही. एकाएकी कोंदटपणा भंगून घोंघावत एक वाऱ्याचा झोत आला; शुस्तेचे निश्चल जलपृष्ठ पाहता पाहता एखाद्या अप्सरेच्या केशकलापासारखे कुरळे झाले, आणि सायंछायेत बुडालेली सारी वनभूमी एका क्षणात एकसाथ सळसळून जणू दुःस्वप्नातून जागी झाली. स्वप्न म्हणा की सत्य म्हणा, अडीचशे वर्षांच्या भूतकाळाच्या क्षेत्रावरून परावर्तित होऊन जे एक अदृश्य मृगजळ माझ्यापुढे अवतरले होते, ते क्षणार्धात अंतर्धान पावले. ज्या मायाविनी माझ्या अंगावरून देहहीन, भरभर पावलांनी, निःशब्द उंच हास्यकल्लोळात धावत जाऊन शुस्तेच्या पाण्यात झेपावल्या होत्या, त्या ओले पदर पिळत पिळत माझ्या बाजूने वर आल्या नाहीत. वारा जसा गंध उडवून नेतो, तशाच वसंताच्या एका निःश्वासासरशी त्या उडून निघून गेल्या.
क्षुधित पाषाण
तेव्हा मला मोठी धास्ती वाटली, की एकांत मिळालेला पाहून काव्यदेवी अचानक माझ्या मानगुटीवर येऊन बसल्या की काय; मी बिचारा कापसाची जकात वसूल करून कष्टाची भाकरी खाणारा माणूस, आता या सर्वनाशिनी माझे वाटोळे करायलाच आल्या म्हणायच्या! ठरवले, चांगले पोटभर जेवायला हवे; — रिकाम्या पोटीच सगळे असाध्य रोग येऊन धरतात. आपल्या आचाऱ्याला बोलावले आणि भरपूर तुपातले, मसाल्यांनी घमघमणारे, रीतसर मोगलाई जेवण फर्मावले. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळा प्रकार अगदी हास्यास्पद वाटला. मी आपल्याच नादात, साहेबासारखी सोलाची टोपी घालून, स्वतःच्या हाताने गाडी हाकत, खडखडाट करत आपल्या तपासणीच्या कामाला निघून गेलो. त्या दिवशी तिमाही अहवाल लिहायचा दिवस असल्याने घरी उशिरा परतायचे होते. पण संध्याकाळ होते न होते तोच मला कोणीतरी घराकडे ओढू लागले. कोण ओढू लागले ते सांगता येत नाही; पण वाटले, आता आणखी उशीर करणे बरे नाही. वाटले, सगळे वाट पाहत बसले आहेत. अहवाल अर्धवट टाकून, सोलाची टोपी डोक्यावर चढवून, त्या संध्याधूसर, वृक्षछायांनी गच्च, निर्जन रस्त्याला चाकांच्या खडखडाटाने दचकवत, डोंगराच्या कडेला उभ्या त्या अंधारलेल्या निःस्तब्ध प्रचंड प्रासादात जाऊन पोहोचलो.
क्षुधित पाषाण
जिन्याच्या माथ्यावर समोरचे दालन अतिप्रचंड आहे. मोठमोठ्या खांबांच्या तीन रांगांवर नक्षीदार कमानींनी विस्तीर्ण छत तोलून धरले आहे. हे प्रचंड दालन आपल्या अफाट शून्यतेच्या भाराने अहोरात्र घुमत असते. त्या दिवशी, संध्याकाळ व्हायच्या आधी, अजून दिवे लागले नव्हते. दार ढकलून मी त्या प्रचंड दालनात पाऊल टाकले मात्र, आणि मला वाटले, जणू दालनात एकच मोठी खळबळ उडाली — जणू एकाएकी सभा मोडून चहूकडच्या दारांतून, खिडक्यांतून, खोल्यांतून, वाटांतून, सज्ज्यांतून कोण कुठल्या दिशेला पळाले याचा पत्ताच नाही. मला कुठेच काही दिसले नाही; मी थक्क होऊन उभा राहिलो. अंगावर एका प्रकारच्या धुंदीने रोमांच उभे राहिले. जणू पुष्कळ दिवसांपूर्वी लोपून उरलेला केसांच्या उटण्याचा आणि अत्तराचा मंद गंध माझ्या नाकात शिरू लागला. त्या दीपहीन, जनहीन, प्रचंड दालनात, प्राचीन पाषाणस्तंभांच्या रांगांमधोमध उभा राहून मी ऐकू लागलो — झरझर आवाज करत कारंज्याचे पाणी पांढऱ्या दगडावर येऊन पडते आहे, सतारीवर कोणता सूर वाजतो आहे ते उमगत नाही, कुठे सोन्याच्या अलंकारांची किणकिण, कुठे पैंजणांची छुमछुम, कधी तांब्याच्या प्रचंड घंटेवर प्रहर वाजल्याचा नाद, दूर कुठेतरी नौबतीची आलापी, वाऱ्यावर झुलणाऱ्या झुंबराच्या स्फटिक लोलकांची टुणटुण, सज्ज्यातून पिंजऱ्यातल्या बुलबुलाचे गाणे, बागेतून पाळलेल्या सारसांची साद — माझ्याभोवती हे सारे मिळून प्रेतलोकीचा एक राग रचू लागले.
क्षुधित पाषाण
मला असा काही मोह पडला, असे वाटले, की ही स्पर्शातीत, अगम्य, अवास्तव गोष्टच जगात एकमेव सत्य आहे, बाकी सगळे मिथ्या मृगजळ. मी म्हणजे मी — म्हणजे अमुकाचा ज्येष्ठ पुत्र श्रीयुत अमुक, कापसाची जकात गोळा करून साडेचारशे रुपये पगार घेणारा मी, सोलाची टोपी आणि आखूड कोट घालून टमटम हाकत कचेरीला जाणारा मी — हे सगळेच मला इतके विचित्र, हास्यास्पद, निराधार, खोटे वाटले, की त्या विशाल, निःस्तब्ध, अंधाऱ्या दालनाच्या मधोमध उभा राहून मी हा हा करून मोठ्याने हसू लागलो. तेवढ्यात माझा मुसलमान नोकर पेटता केरोसीनचा कंदील हाती घेऊन दालनात आला. त्याने मला वेडा समजले की नाही कोण जाणे, पण त्याच क्षणी मला आठवण झाली, की कै. अमुकचंद्र यांचा ज्येष्ठ पुत्र श्रीयुत अमुकनाथ तो मीच; हेही मनात आले, की जगाच्या आत वा बाहेर कुठे एखादे अमूर्त कारंजे चिरकाल उसळते आहे की नाही, आणि अदृश्य बोटांच्या आघाताने कोणत्या मायावी सतारीवर अनंत राग झंकारतो आहे की नाही, हे आमचे महाकवी आणि कविश्रेष्ठच सांगू जाणोत; पण हे मात्र निश्चित सत्य, की मी बरीचच्या बाजारात कापसाची जकात वसूल करतो आणि महिन्याला साडेचारशे रुपये पगार घेतो. मग मघाच्या त्या विचित्र मोहाची आठवण होऊन, केरोसीनच्या उजेडात उजळलेल्या कँप-टेबलापाशी वर्तमानपत्र घेऊन मी मौजेने हसत राहिलो.
क्षुधित पाषाण
वर्तमानपत्र वाचून आणि मोगलाई जेवण जेवून, कोपऱ्यातल्या एका लहानशा खोलीत दिवा मालवला आणि बिछान्यावर जाऊन पडलो. माझ्यासमोरच्या उघड्या खिडकीतून, अंधाऱ्या रानांनी वेढलेल्या अराली पर्वताच्या माथ्यावर, एक अतितेजस्वी तारा सहस्र कोटी योजने दूरच्या आकाशातून त्या अतिशय क्षुल्लक कँप-खाटेवरच्या श्रीयुत जकात-कलेक्टरांकडे एकटक न्याहाळत होता, — याचे नवल आणि गंमत वाटत वाटत मला केव्हा झोप लागली ते सांगता येत नाही. किती वेळ झोपलो होतो तेही ठाऊक नाही. एकाएकी केव्हातरी शहारून जागा झालो; — खोलीत काही आवाज झाला होता असेही नाही, कोणी माणूस आत आलेलाही दिसला नाही. अंधाऱ्या पर्वतावरचा तो अनिमिष तारा मावळला होता, आणि कृष्णपक्षातल्या चंद्राचे क्षीण चांदणे, आपल्याला इथे येण्याचा अधिकार नाही अशा संकोचाने, मलूलपणे माझ्या खिडकीतून आत शिरले होते. कोणीही माणूस दिसला नाही, तरीही मला स्पष्ट वाटले, की कोणीतरी मला हळूच हलवून उठवते आहे. मी जागा होताच, एकही शब्द न उमटता, केवळ अंगठ्यांनी मढलेल्या पाच बोटांच्या इशाऱ्याने, मला अगदी सावधपणे मागोमाग येण्याची आज्ञा झाली. मी अगदी दबकत दबकत उठलो. शेकडो दालना-खोल्यांनी भरलेल्या, प्रचंड शून्यतेने भरलेल्या, निजलेल्या ध्वनींच्या आणि जाग्या प्रतिध्वनींच्या त्या विशाल प्रासादात माझ्याशिवाय चिटपाखरूही नव्हते; तरीही पावलोपावली भीती वाटत होती, कोणी जागे होईल की काय. प्रासादातली बहुतेक दालने बंद असत, आणि त्या दालनांत मी कधीच गेलो नव्हतो.
क्षुधित पाषाण
त्या रात्री निःशब्द पावलांनी, श्वास रोखून, त्या अदृश्य आवाहनरूपिणीच्या मागोमाग मी कुठे चाललो होतो, ते आज मला स्पष्ट सांगता येत नाही. किती अरुंद अंधाऱ्या वाटा, किती लांबलचक सज्जे, किती गंभीर निःस्तब्ध प्रशस्त सभागृहे, किती कोंदट लहानशा गुप्त खोल्या मी पार करत गेलो, त्याला गणतीच नाही. माझी ती अदृश्य दूती डोळ्यांना जरी दिसली नाही, तरी तिची मूर्ती माझ्या मनाला अगोचर नव्हती. एक अरब स्त्री; सैल लोंबत्या बाह्यांतून, जणू शुभ्र संगमरवरात घडवलेले, कठीण, सुडौल हात दिसत आहेत; टोपीच्या कडेपासून चेहऱ्यावर एका तलम वस्त्राचा पडदा पडला आहे; कमरबंदात एक वाकडी कट्यार खोचलेली. मला वाटले, अरबी सुरस कथांमधल्या हजार आणि एक रात्रींपैकी एक रात्र आज कथालोकातून उडून इथे आली आहे. मी जणू अंधाऱ्या मध्यरात्री, निद्रामग्न बगदादच्या दिवे विझलेल्या अरुंद गल्ल्यांमधून कुठल्याशा संकटांनी भरलेल्या अभिसाराला निघालो आहे. अखेर माझी दूती एका गडद निळ्या पडद्यासमोर एकाएकी थबकून उभी राहिली आणि जणू खाली बोट दाखवले. खाली काहीच नव्हते, पण भीतीने माझ्या छातीतले रक्त गोठले. मला जाणवले, त्या पडद्यासमोर जमिनीवर किनखापाचा पोशाख घातलेला एक भीषण हबशी खोजा मांडीवर उघडी तलवार घेऊन, दोन्ही पाय पसरून, बसल्या बसल्या पेंगतो आहे. दूतीने हलक्या पावलांनी त्याचे दोन्ही पाय ओलांडले आणि पडद्याचे एक टोक उचलून धरले.
क्षुधित पाषाण
आतून इराणी गालिचा अंथरलेल्या खोलीचा काही भाग दिसला. तख्तावर कोण बसले आहे ते दिसले नाही — फक्त केशरी रंगाच्या फुगीर पायजम्याखाली जरीच्या मोजड्या घातलेली दोन चिमुकली सुंदर पावले गुलाबी मखमली आसनावर आळसावून विसावलेली दिसली. फरशीच्या एका बाजूला एका निळसर स्फटिकपात्रात काही सफरचंदे, नासपत्या, नारिंगे आणि द्राक्षांचे भरगच्च घोस मांडून ठेवले होते, आणि त्याच्या शेजारी दोन लहान प्याले आणि सोनेरी मदिरेची एक काचेची सुरई पाहुण्याची वाट पाहत होती. खोलीच्या आतून कुठल्याशा अपूर्व धुपाचा एक प्रकारचा मादक सुगंधी धूर येऊन मला विह्वल करून गेला. थरथरत्या छातीने मी त्या खोजाचे पसरलेले पाय ओलांडायला गेलो, तोच तो दचकून जागा झाला — त्याच्या मांडीवरची तलवार दगडी फरशीवर खणखणत पडली. एकाएकी एक भयानक किंकाळी ऐकू आली, आणि दचकून पाहिले, तर मी माझ्या त्या कँप-खाटेवर घामाने निथळत बसलो आहे — पहाटेच्या उजेडात कृष्णपक्षातली चंद्रकोर जागरणाने शिणलेल्या रोग्यासारखी पांढुरकी, फिकी पडली आहे — आणि आमचा वेडा मेहेर अली आपल्या रोजच्या रिवाजाप्रमाणे पहाटेच्या निर्मनुष्य रस्त्यावरून 'तफात जाव' 'तफात जाव' असे ओरडत चालला आहे. अशा रीतीने माझी अरबी सुरस कथांतली एक रात्र अकस्मात संपली — पण अजून हजार रात्री बाकी आहेत. माझ्या दिवसाचे आणि रात्रीचे मोठेच वाकडे आले. दिवसा थकल्याभागल्या देहाने कामाला जात असे, आणि त्या शून्यस्वप्नमयी, मोहमयी, मायाविनी रात्रीला शिव्याशाप देत राही — आणि पुन्हा संध्याकाळ झाली, की दिवसाचे माझे ते कामाच्या बेड्यांत जखडलेले अस्तित्व अगदी क्षुद्र, खोटे आणि हास्यास्पद वाटू लागे.
क्षुधित पाषाण
संध्याकाळनंतर मी एका नशेच्या जाळ्यात विह्वल होऊन गुरफटून जात असे. शेकडो वर्षांपूर्वीच्या, कुठल्यातरी अलिखित इतिहासातली एक वेगळीच, अपूर्व व्यक्ती होऊन जात असे; तेव्हा विलायती आखूड कोट आणि तंग पाटलोण मला शोभेनाशी होई. तेव्हा मी डोक्यावर लाल मखमली तुर्की टोपी चढवून, सैल पायजमा, फुलांची नक्षी काढलेला कबा आणि रेशमी लांब चोगा घालून, रंगीत रुमालाला अत्तर लावून मोठ्या निगुतीने साज करी; आणि सिगारेट फेकून देऊन, गुलाबपाण्याने भरलेला, अनेक वेटोळ्यांच्या नळीचा मोठा हुक्का घेऊन उंच गादीच्या एका मोठ्या खुर्चीत बसे. जणू रात्री कुठल्यातरी अपूर्व प्रियमीलनासाठी परम उत्कंठेने सज्ज होऊन राहत असे. त्यानंतर अंधार जसजसा गडद होत जाई, तसतसा कसला एक अद्भुत प्रकार घडू लागे, ते मला वर्णन करता येत नाही. जणू एखाद्या सुंदर गोष्टीचे काही फाटके तुकडे वसंतातल्या आकस्मिक वाऱ्यावर या प्रचंड प्रासादाच्या चित्रविचित्र दालनांतून उडत फिरत. थोड्या दूरपर्यंत ती गोष्ट हाती लागे, त्यापुढे तिचा शेवट काही दिसत नसे. मीही त्या भिरभिरणाऱ्या सुट्या तुकड्यांच्या मागे मागे रात्रभर दालनादालनांतून भटकत राही. या खंडित स्वप्नांच्या भोवऱ्यात, कधी मेंदीच्या गंधाच्या, कधी सतारीच्या स्वराच्या, कधी सुगंधी तुषारांनी भिजलेल्या वाऱ्याच्या लहरीत, एक नायिका क्षणोक्षणी विजेच्या रेघेसारखी चमकून दिसे. तिचाच तो केशरी रंगाचा पायजमा, दोन शुभ्र-आरक्त कोमल पावलांत टोकाशी वळलेल्या जरीच्या मोजड्या, छातीवर घट्ट आवळलेली जरीच्या फुलांची चोळी, डोक्यावर एक लाल टोपी आणि तिच्यातून लोंबणारी सोन्याची झालर तिच्या शुभ्र कपाळाला आणि गालांना वेढून राहिलेली.
क्षुधित पाषाण
तिने मला वेडे करून सोडले होते. तिच्याच अभिसारासाठी मी रोज रात्री निद्रेच्या रसातळातल्या राज्यात, स्वप्नांच्या गुंतागुंतीच्या वाटांनी गजबजलेल्या मायापुरीत, गल्लीगल्लीतून, दालनादालनातून भटकत फिरलो आहे. कधी कधी संध्याकाळी मोठ्या आरशाच्या दोन्ही बाजूंना दोन दिवे लावून शाहजाद्यासारखा निगुतीने साज करत असताना एकाएकी दिसे, की आरशात माझ्या प्रतिबिंबाशेजारी क्षणभर त्या तरुण इराणी स्त्रीची छाया येऊन पडली; — पापणी लवते न लवते तोच मान वळवून, आपल्या घनश्याम विशाल बुबुळांतून खोल, आवेगाने तीव्र, वेदनेने भरलेला, आतुर कटाक्ष टाकून, रसरशीत सुंदर बिंबाधरांवर अस्फुट शब्दांचा केवळ आभास देऊन, हलक्या ललित नृत्यात आपली यौवनाने बहरलेली देहलता वेगाने वर वर गिरकी घेत फिरवून, निमिषार्धात वेदना, वासना आणि विभ्रम, हास्य, कटाक्ष आणि अलंकारांचे तेज यांच्या ठिणग्यांचा वर्षाव करून ती आरशातच विरून गेली. डोंगरारण्यातला सारा सुगंध लुटून वाऱ्याचा एक उन्मत्त झोत येई आणि माझे दोन्ही दिवे विझवून टाकी; — मी साजशृंगार सोडून देऊन वेशगृहाच्या एका टोकाला असलेल्या शय्येवर पुलकित देहाने, डोळे मिटून पडून राही — माझ्याभोवती त्या वाऱ्यात, अराली गिरिकुंजांच्या त्या साऱ्या मिश्र सौरभात, जणू अनेक लाड, अनेक चुंबने, अनेक कोमल करस्पर्श एकांत अंधार भरून फिरत राहत; कानांशी अनेक कलगुंजन ऐकू येई, कपाळावर सुगंधी श्वास येऊन पडे, आणि मंद सौरभाने रमणीय अशी एक मुलायम ओढणी पुन्हा पुन्हा उडत उडत येऊन माझ्या गालाला स्पर्श करून जाई. हळूहळू जणू एक मोहिनी नागीण आपल्या मादक विळख्यात माझे सर्वांग जखडून टाकी, आणि मी दीर्घ निःश्वास टाकून, बधिर देहाने, गाढ निद्रेच्या अधीन होऊन जाई.
क्षुधित पाषाण
एके दिवशी तिसऱ्या प्रहरी मी घोड्यावर बसून बाहेर पडायचे ठरवले — कोण मला मना करू लागले ते ठाऊक नाही, पण त्या दिवशी मी ती मनाई जुमानली नाही. एका लाकडी खुंटीवर माझी साहेबी हॅट आणि आखूड कोट लटकत होते; ते काढून अंगावर चढवायच्या बेतात होतो, इतक्यात शुस्ता नदीची वाळू आणि अराली पर्वतावरच्या वाळल्या पानांच्या पताका उभारत एक जोरदार वावटळ एकाएकी आली आणि माझा तो कोट आणि ती टोपी गरगर फिरवत घेऊन गेली; आणि एक अतिशय मधुर हास्यकल्लोळ त्या वाऱ्यासोबत गिरक्या घेत घेत, मिस्कीलपणाच्या सगळ्या पडद्यांवर आघात करत, वरच्या, आणखी वरच्या सप्तकात चढत जाऊन, सूर्यास्तलोकापाशी जाऊन विरून गेला. त्या दिवशी घोडेस्वारी काही झाली नाही, आणि दुसऱ्या दिवसापासून तो हास्यास्पद आखूड कोट आणि साहेबी हॅट घालणे मी कायमचे सोडून दिले आहे. आणि त्याच दिवशी मध्यरात्री बिछान्यात उठून बसलो, तो ऐकू आले — कोणीतरी जीव तोडून, हुंदके दाबत दाबत, उर फुटेस्तो रडते आहे — जणू माझ्या खाटेखालून, फरशीखालून, या प्रचंड प्रासादाच्या पाषाणपायाखाली असलेल्या एका ओलसर, अंधाऱ्या थडग्यातून रडत रडत सांगते आहे, तू मला सोडवून घेऊन जा — कठोर माया, गाढ निद्रा, निष्फळ स्वप्न यांचे सारे दरवाजे मोडून तोडून, तू मला घोड्यावर घेऊन, आपल्या छातीशी कवटाळून, रानातून, डोंगरावरून, नदी पार करून तुमच्या सूर्यप्रकाशाने उजळलेल्या घरात मला घेऊन जा! मला सोडव! मी कोण? मी कशी सुटका करणार! या भिरभिरत्या, बदलत्या स्वप्नप्रवाहातून मी कोणत्या बुडत्या कामनासुंदरीला काठावर ओढून काढू! तू केव्हा होतीस, कुठे होतीस, हे दिव्यरूपिणी! कोणत्या शीतल झऱ्याच्या काठी, खजुरीच्या कुंजाच्या सावलीत, कोणत्या घरदार नसलेल्या मरुवासिनीच्या कुशीत तू जन्मली होतीस!
क्षुधित पाषाण
कोणत्या बेदुईन लुटारूने रानवेलीवरची फुलाची कळी खुडावी तसे तुला आईच्या कुशीतून हिसकावून, विजेच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यावर बसवून, तापलेल्या वाळूचे ढिगारे पार करत, कोणत्या राजनगरीच्या दासीबाजारात विकायला नेले होते! तिथे कोणत्या बादशहाच्या चाकराने तुझे नवे उमललेले, लाजरेबावरे यौवनसौंदर्य न्याहाळून, सोन्याच्या मोहरा मोजून देऊन, समुद्र पार करून, तुला सोन्याच्या पालखीत बसवून आपल्या धन्याच्या अंतःपुराला नजराणा म्हणून दिले होते! तिथे केवढा तो इतिहास! ती सारंगीची सुरावट, पैंजणांची छुमछुम, आणि शिराजच्या सोनेरी मदिरेच्या आडून आडून सुरीची लखलख, विषाची आग, कटाक्षांचे घाव! किती अपार ऐश्वर्य, किती अनंत कारागृह! दोन्ही बाजूंना दोन दासी कंकणांतल्या हिऱ्यांत विजा खेळवत चवऱ्या ढाळत आहेत; शहेनशहा बादशहा शुभ्र पावलांतल्या रत्नमोत्यांनी मढवलेल्या पादुकांपाशी लोळण घेत आहे; — बाहेरच्या दाराशी यमदूतासारखा हबशी, देवदूतासारखा पोशाख करून, उघडी तलवार हाती घेऊन उभा. त्यानंतर त्या रक्ताने मळलेल्या, मत्सराने फेसाळलेल्या, कटकारस्थानांनी भरलेल्या, भीषण-उज्ज्वल ऐश्वर्याच्या प्रवाहात वाहत जाऊन, तू मरुभूमीतली पुष्पमंजिरी, कोणत्या निष्ठुर मृत्यूत उतरलीस, की कोणत्या त्याहूनही निष्ठुर वैभवाच्या तटावर फेकली गेलीस? तेवढ्यात एकाएकी तो वेडा मेहेर अली ओरडला — 'तफात जाव, तफात जाव! सब झूट है, सब झूट है!' पाहिले, तो सकाळ झाली होती; चपराशाने टपालातली पत्रे आणून माझ्या हाती दिली, आणि आचाऱ्याने येऊन सलाम करून विचारले, आज जेवण कसले करायचे. मी म्हटले, नाही, आता या घरात राहणे होणार नाही. त्याच दिवशी माझे सामानसुमान उचलून कचेरीच्या खोलीत जाऊन राहिलो. कचेरीतला म्हातारा कारकून करीम खाँ मला पाहून किंचित हसला. त्याच्या त्या हसण्याचा मला राग आला, आणि काहीही उत्तर न देता मी कामाला लागलो.
क्षुधित पाषाण
जसजशी दुपार कलू लागली, तसतसा मी अन्यमनस्क होऊ लागलो — वाटू लागले, आत्ताच कुठेतरी जायचे आहे — कापसाचा हिशोब तपासण्याचे काम अगदीच अनावश्यक वाटले, निजामाची निजामतसुद्धा मला फारशी काही वाटेना — जे काही वर्तमान आहे, जे काही माझ्याभोवती चालते-फिरते, राबते-खाते आहे, ते सारेच मला अत्यंत दीन, अर्थहीन, क्षुल्लक वाटू लागले. मी लेखणी भिरकावून दिली, भलीमोठी वही बंद केली आणि तत्काळ टमटममध्ये बसून सुसाट निघालो. पाहिले, तो टमटम बरोबर गोरज मुहूर्तावर आपोआपच त्या पाषाणप्रासादाच्या दाराशी जाऊन थांबली. झपाझप पायऱ्या चढून मी दालनात शिरलो. आज सारे निःस्तब्ध. अंधारलेली दालने जणू रागावून, तोंड फुगवून बसली आहेत. पश्चात्तापाने माझे हृदय उचंबळून येऊ लागले; पण कोणाला सांगावे, कोणाची क्षमा मागावी, ते काही उमगेना. मी सुन्न मनाने अंधाऱ्या दालनादालनांतून भटकू लागलो. वाटू लागले, एखादे वाद्य हाती घ्यावे आणि कोणालातरी उद्देशून गाणे गावे, म्हणावे, हे अग्निशिखे! जो पतंग तुला सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, तो पुन्हा मरायला आला आहे. या खेपेला त्याला क्षमा कर, त्याचे दोन्ही पंख जाळून टाक, त्याची राखरांगोळी कर! एकाएकी वरून माझ्या कपाळावर दोन अश्रुबिंदू पडले. त्या दिवशी अराली पर्वताच्या शिखरावर काळेकुट्ट ढग दाटून आले होते. अंधारलेले अरण्य आणि शुस्तेचे शाईसारखे काळे पाणी एका भीषण प्रतीक्षेत स्तब्ध झाले होते. जल, स्थल, आकाश एकाएकी शहारले; आणि अकस्मात विजांचे दात विचकत एक वादळ, साखळदंड तोडलेल्या वेड्यासारखे, वाटा नसलेल्या दूरदूरच्या रानातून आर्त किंकाळ्या फोडत धावत आले. प्रासादातली मोठमोठी ओस दालने सगळी दारे आपटत, तीव्र वेदनेने हुंदके देत ओक्साबोक्शी रडू लागली.
क्षुधित पाषाण
आज नोकर सगळे कचेरीतच होते; इथे दिवे लावायला कोणीच नव्हते. त्या मेघाच्छन्न अमावास्येच्या रात्री, घरातल्या कसोटीच्या दगडासारख्या काळ्याकभिन्न अंधारात मला स्पष्ट जाणवू लागले — एक स्त्री पलंगाच्या पायथ्याशी गालिच्यावर पालथी पडून, दोन्ही घट्ट आवळलेल्या मुठींनी आपले मोकळे विस्कटलेले केस ओढून उपटते आहे; तिच्या गोऱ्या कपाळातून रक्त फुटून वाहते आहे; कधी ती कोरड्या, तीक्ष्ण, विकट हास्याने हा हा करून हसते आहे, कधी हुंदके देत देत, उर फुटेस्तो रडते आहे; दोन्ही हातांनी छातीवरची चोळी फाडून टाकून उघड्या छातीवर आघात करते आहे; उघड्या खिडकीतून वारा गर्जत आत येतो आहे, आणि मुसळधार पाऊस येऊन तिचे सर्वांग न्हाऊ घालतो आहे. रात्रभर वादळही थांबेना आणि रडणेही थांबेना. मी निष्फळ पश्चात्तापाने अंधारात दालनादालनांतून भटकत राहिलो. कोणी कुठेच नाही; कोणाचे सांत्वन करू? हा प्रचंड रुसवा कोणाचा? हा अशांत आक्रोश कुठून उठतो आहे? वेडा ओरडला, 'तफात जाव, तफात जाव. सब झूट है, सब झूट है!' पाहिले, तो पहाट झाली होती, आणि मेहेर अली या घोर वादळी दिवशीसुद्धा नेहमीच्या नियमाने प्रासादाला प्रदक्षिणा घालत आपली सवयीची आरोळी ठोकतो आहे. एकाएकी मला वाटले, कदाचित हा मेहेर अलीसुद्धा कधीकाळी माझ्यासारखाच या प्रासादात राहिला असेल; आता वेडा होऊन बाहेर पडला, तरी या पाषाणराक्षसाच्या मोहाने खेचला जाऊन रोज पहाटे प्रदक्षिणा घालायला येतो. मी तत्काळ त्या पावसात त्या वेड्यापाशी धावत गेलो आणि त्याला विचारले, 'मेहेर अली, क्या झूट है रे?' त्याने माझ्या बोलण्याला काहीही उत्तर न देता मला ढकलून दिले, आणि अजगराच्या जबड्याभोवती भिरभिरणाऱ्या मोहग्रस्त पक्ष्यासारखा ओरडत ओरडत घराभोवती फेऱ्या घालू लागला. फक्त जिवाच्या आकांताने स्वतःला सावध करण्यासाठी पुन्हा पुन्हा म्हणत राहिला — 'तफात जाव, तफात जाव, सब झूट है, सब झूट है!'
क्षुधित पाषाण
मी त्या वादळपावसात वेड्यासारखा कचेरीत गेलो आणि करीम खाँला बोलावून म्हणालो, याचा अर्थ काय, ते मला उलगडून सांगा. म्हाताऱ्याने जे सांगितले, त्याचा मथितार्थ असा: एके काळी त्या प्रासादात अनेक अतृप्त वासना, अनेक उन्मत्त भोगांच्या ज्वाळा उसळत असत — त्या साऱ्या चित्तदाहामुळे, त्या साऱ्या निष्फळ कामनांच्या शापाने या प्रासादाचा प्रत्येक पाषाणखंड क्षुधित, तृषित होऊन बसला आहे; जिवंत माणूस हाती लागला, की लाळ गाळणाऱ्या पिशाचिणीसारखा तो त्याला गिळून टाकायला पाहतो. ज्यांनी त्या प्रासादात तीन रात्री काढल्या, त्यांच्यापैकी फक्त मेहेर अली वेडा होऊन बाहेर पडला; आजवर आणखी कोणीही त्याच्या घासातून सुटू शकलेले नाही. मी विचारले, माझ्या सुटकेचा काहीच मार्ग नाही का? म्हातारा म्हणाला, एकच उपाय आहे, आणि तोही अत्यंत कठीण. तो तुम्हाला सांगतो — पण त्याआधी त्या गुलबागेतल्या एका विकत घेतलेल्या इराणी दासीचा जुना इतिहास सांगायला हवा. तितकी विलक्षण आणि तितकी काळीज चिरणारी घटना जगात दुसरी कधी घडली नाही. * * * इतक्यात हमालांनी येऊन वर्दी दिली — गाडी येते आहे. इतक्या लवकर? घाईघाईने बिछाना-सामान बांधतो न बांधतो तोच गाडी येऊन ठेपली. त्या गाडीच्या फर्स्ट क्लासमध्ये नुकताच झोपेतून उठलेला एक इंग्रज खिडकीतून तोंड बाहेर काढून स्टेशनचे नाव वाचायचा प्रयत्न करत होता; आमच्या सहप्रवासी मित्राला पाहताच तो 'हॅलो' म्हणून ओरडला आणि त्यांना आपल्या डब्यात घेऊन गेला. आम्ही सेकंड क्लासमध्ये चढलो. ते बाबू कोण होते, याचा पत्ता लागला नाही, आणि गोष्टीचा शेवटही ऐकायचा राहून गेला. मी म्हटले, आपल्याला बावळट पाहून त्या इसमाने आपली गंमत केली आणि चांगलीच टोपी घालून गेला — गोष्ट पहिल्यापासून शेवटपर्यंत निव्वळ बनावट आहे. या वादापायी माझ्या थिऑसॉफिस्ट नातलगाशी माझे जन्माचे फाटले आहे.