रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
मास्तर
प्रस्तावना रात्रीचे जवळजवळ दोन वाजले होते. कलकत्त्याच्या स्तब्ध झालेल्या कोलाहल-सागरावर एक लहानशी लाट उठवीत एक मोठी जोडगाडी भवानीपूरकडून येऊन बिर्जीतलावच्या कोपऱ्यापाशी थांबली. तिथे एक भाड्याची गाडी दिसताच गाडीतल्या बाबूंनी तिला हाक मारून बोलावून घेतले. त्यांच्या शेजारी कोट-हॅट घातलेला, विलायतेहून परतलेला एक बंगाली तरुण समोरच्या आसनावर दोन्ही पाय टाकून, जरा नशेतच, मान खाली टाकून झोपला होता. हा तरुण नुकताच विलायतेहून आला होता. त्याच्याच स्वागतानिमित्त मित्रमंडळीत एक मेजवानी झाली होती. त्या मेजवानीतून परतताना एका मित्राने त्याला थोडे अंतर पोहोचवावे म्हणून आपल्या गाडीत घेतले होते. त्यांनी त्याला दोन-तीनदा ढोसून जागे केले आणि म्हटले, 'मजुमदार, गाडी मिळाली, घरी जा.' मजुमदार दचकून जागा झाला आणि एक विलायती शिवी हासडून भाड्याच्या गाडीत चढला. त्याच्या गाडीवानाला पत्ता नीट समजावून देऊन ब्रूहॅम गाडीतले गृहस्थ आपल्या वाटेने निघून गेले. भाड्याची गाडी थोडे अंतर सरळ जाऊन पार्क स्ट्रीटसमोर मैदानाच्या रस्त्याला वळली. मजुमदाराने पुन्हा एकदा इंग्रजीत शिवी उच्चारली आणि स्वतःशीच म्हणाला, 'हे काय! हा काही माझा रस्ता नाही!' मग झोपेच्या गुंगीतच त्याला वाटले, 'असेलही, हाच कदाचित सरळ रस्ता असेल.' मैदानात शिरताच मजुमदाराचे अंग कसेसेच झाले. एकाएकी त्याला वाटले — कोणी माणूस नाही, तरीही त्याच्या शेजारची जागा जणू भरून येते आहे; त्याच्या आसनाच्या रिकाम्या भागातले आकाश जणू घनदाट होऊन त्याला दाबून धरते आहे. मजुमदार मनाशी म्हणाला, 'हा काय प्रकार? ही गाडी माझ्याशी हे कसलं वागणं वागायला लागली?' 'ए गाडीवान, गाडीवान!' गाडीवानाने काहीच जवाब दिला नाही. मागची झडप उघडून मजुमदाराने मोतद्दाराचा हात घट्ट धरला; म्हणाला, 'तुम भीतर आके बैठो.'
मास्तर
मोतद्दार भेदरलेल्या आवाजात म्हणाला, 'नहीं साब, भीतर नहीं जायेगा!' ते ऐकून मजुमदाराच्या अंगावर सरसरून काटा आला; त्याने जोर लावून मोतद्दाराचा हात दाबून धरला आणि म्हणाला, 'जल्दी भीतर आओ.' मोतद्दाराने हिसडा देऊन हात सोडवून घेतला आणि खाली उतरून धूम ठोकली. तेव्हा मजुमदार भीत भीत शेजारी पाहू लागला; काहीच दिसले नाही, तरी वाटले की शेजारी कुठलातरी अढळ पदार्थ अगदी खेटून बसला आहे. कसाबसा घशातून आवाज काढून मजुमदार म्हणाला, 'गाडीवान, गाडी रोको.' त्याला वाटले, गाडीवान जणू उभा राहून दोन्ही हातांनी लगाम खेचून घोडे थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे — पण घोडे काही केल्या थांबले नाहीत. न थांबता दोन्ही घोड्यांनी रेड रोडचा रस्ता धरून पुन्हा दक्षिणेकडे वळण घेतले. मजुमदार घाईघाईने म्हणाला, 'अरे, कहां जाता?' काहीच उत्तर आले नाही. शेजारच्या रिकाम्या जागेकडे राहून राहून चोरट्या नजरेने पाहता पाहता मजुमदाराच्या सर्वांगाला घाम फुटला. कसाबसा अंग आखडून त्याने आपले शरीर जितके आकसता येईल तितके आकसले; पण त्याने जितकी जागा सोडली, तितकी जागा भरून आली. मजुमदार मनातल्या मनात युक्तिवाद करू लागला, 'कुठल्याशा प्राचीन युरोपीय ज्ञान्याने म्हटलंय, नेचर अॅबहॉर्स व्हॅक्यूम — निसर्गाला पोकळी खपत नाही. तेच तर दिसतंय. पण हे आहे तरी काय रे! हा काय नेचर आहे? हे जर मला काही करणार नसेल, तर आत्ताच्या आत्ता सगळी जागा याला सोडून देऊन मी उडी मारतो.' उडी मारण्याचा धीर झाला नाही — न जाणो, मागून काहीतरी कल्पनेपलीकडचे घडायचे. 'पहारेवाला!' म्हणून हाक मारायचा त्याने प्रयत्न केला — पण मोठ्या कष्टाने असा काही बारीक, विचित्र, क्षीण आवाज बाहेर पडला की इतक्या भयातही त्याला हसू आले.
मास्तर
अंधारात मैदानातली झाडे भुतांच्या निःशब्द पार्लमेंटसारखी एकमेकांसमोर तोंड करून उभी राहिली होती, आणि गॅसचे खांब जणू सारे काही जाणतात पण काहीही सांगणार नाहीत, अशा थाटात ताठ उभे राहून आपल्या मिणमिणत्या ज्योतींनी डोळे मिचकावीत होते. मजुमदाराने ठरवले, चटकन एका उडीत समोरच्या आसनावर जाऊन बसावे. मनात येते न येते तोच त्याला जाणवले की समोरच्या आसनावरून केवळ एक नजर त्याच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहते आहे. डोळे नाहीत, काही नाही, आणि तरीही एक नजर. ती नजर कुणाची, हे जणू आठवते आहे, पण कितीही केले तरी आठवणीत आणता येत नाही. मजुमदाराने दोन्ही डोळे जोर लावून मिटण्याचा प्रयत्न केला — पण भीतीने ते मिटेनात — त्या अनिर्वचनीय नजरेकडे त्याने दोन्ही डोळे इतके ताठ उघडे ठेवले की पापणी लववायलाही त्याला उसंत मिळाली नाही. इकडे गाडी मात्र मैदानातल्या रस्त्यांवरून उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे गोल गोल फिरतच राहिली. दोन्ही घोडे जणू हळूहळू बेभान होत गेले — त्यांचा वेग वाढतच चालला — गाडीच्या झडपा थरथर कापत खडखडाट करू लागल्या. इतक्यात कशावर तरी जोराने आदळल्यासारखी गाडी एकाएकी थांबली. मजुमदाराने दचकून पाहिले, गाडी त्यांच्याच रस्त्यावर उभी आहे आणि गाडीवान त्याला हलवून विचारतो आहे, 'साहेब, कुठे जायचं ते सांगा.' मजुमदाराने चिडून विचारले, 'इतका वेळ मला मैदानात का फिरवत होतास?' गाडीवान आश्चर्याने म्हणाला, 'कुठे? मैदानात तर मी फिरवलं नाही.' मजुमदाराचा विश्वास बसेना; तो म्हणाला, 'मग हे काय नुसतं स्वप्न होतं?' गाडीवान जरा विचार करून घाबरून म्हणाला, 'बाबूसाहेब, हे नुसतं स्वप्न नसावं. माझ्या याच गाडीत आज तीन वर्षांपूर्वी एक घटना घडली होती.'
मास्तर
मजुमदाराची नशा आणि झोपेची गुंगी तोवर पार उतरली होती; त्यामुळे गाडीवानाच्या गोष्टीकडे लक्ष न देता, भाडे चुकते करून तो निघून गेला. पण त्या रात्री त्याला नीटशी झोप लागली नाही — तो सारखा विचार करीत राहिला, ती नजर कुणाची? १ अधर मजुमदाराच्या वडिलांनी जहाजी कारकुनीसारख्या साध्या नोकरीपासून सुरुवात करून एका मोठ्या साहेबी पेढीच्या मुख्य दलालपदापर्यंत मजल मारली होती. अधरबाबू वडिलांनी मिळवलेला रोकड पैसा व्याजाने राबवतात; त्यांना स्वतःला आता राबावे लागत नाही. वडील डोक्याला पांढरा फेटा बांधून पालखीतून ऑफिसला जात असत; शिवाय व्रतवैकल्ये, दानधर्म यांतही त्यांचा हात सढळ होता. संकटात-अडचणीत, टंचाईत-तंगीत सर्व थरांतली माणसे त्यांच्याकडे येऊन गळ घालत, याचाच त्यांना अभिमान वाटे. अधरबाबूंनी मोठा वाडा बांधला, जोडगाडी ठेवली, पण माणसांशी आता त्यांचा काही संबंध उरला नाही; फक्त कर्जाचे दलाल येऊन त्यांच्या मढवलेल्या हुक्क्यातून तंबाखू ओढून जातात, आणि अॅटर्नीच्या कचेरीतल्या बाबूंशी स्टँप लावलेल्या दस्तऐवजांच्या अटींवर चर्चा चालते. घरखर्चाच्या बाबतीत त्यांचा हिशोब इतका काटेकोर की, आळीतल्या फुटबॉल क्लबची चिवट पोरेसुद्धा पुष्कळ प्रयत्न करूनही त्यांच्या थैलीवर दात उमटवू शकली नाहीत. अशातच त्यांच्या संसारात एका पाहुण्याचे आगमन झाले. मुलगा होत नाही, होत नाही, असे करता करता पुष्कळ दिवसांनी त्यांना एक मुलगा झाला. मुलाचे रूप आईच्या वळणावर गेले होते. मोठे मोठे डोळे, धारदार नाक, रंग निशिगंधाच्या पाकळीसारखा — जो पाही तो म्हणे, 'अहाहा, हा मुलगा नव्हे, साक्षात कार्तिकेयच!' अधरबाबूंचा निष्ठावंत हुजऱ्या रतिकांत म्हणाला, 'मोठ्या घरच्या मुलानं जसं असायला हवं, अगदी तस्सा झालाय.'
मास्तर
मुलाचे नाव ठेवले वेणुगोपाल. याआधी अधरबाबूंच्या पत्नी ननीबाला यांनी संसारखर्चाबाबत पतीविरुद्ध आपले म्हणणे कधी फारसे जोर लावून चालवले नव्हते. एखाद-दुसऱ्या हौसेच्या गोष्टीवरून किंवा देण्याघेण्याच्या अगदी आवश्यक तयारीवरून अधूनमधून वाद झाले खरे, पण शेवटी पतीच्या कंजूषपणाला तुच्छ लेखून त्यांनी निमूटपणे हार मानली होती. या खेपेला मात्र अधरलाल ननीबालांपुढे टिकू शकले नाहीत; वेणुगोपालच्या बाबतीत त्यांचा हिशोब एकेक पाऊल मागे हटू लागला. त्याच्या पायांतले वाळे, हातांतली कडी, गळ्यातला हार, डोक्यावरची टोपी, त्याचे देशी-विलायती, नाना प्रकारचे, नाना रंगांचे कपडेलत्ते — यांविषयी ननीबालांनी जी जी मागणी पुढे केली, ती प्रत्येक त्यांनी कधी निःशब्द अश्रुपाताने, कधी सशब्द वाग्वर्षावाने जिंकून घेतली. वेणुगोपालसाठी जे लागेल आणि जे लागणार नाही, तेही हवेच हवे — तिथे रिकाम्या थैलीची सबब किंवा भविष्याचे पोकळ आश्वासन एक दिवसही चालले नाही. २ वेणुगोपाल मोठा होऊ लागला. वेणूसाठी खर्च करणे ही अधरलालांची सवयच होऊन गेली. त्याच्यासाठी त्यांनी जास्त पगार देऊन पुष्कळ परीक्षा पास झालेले एक म्हातारे मास्तर ठेवले. या मास्तरांनी वेणूला गोड बोलण्याने आणि सभ्य वागण्याने वश करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला — पण म्हणे त्यांनी आजवर विद्यार्थ्यांना नेहमी कडक शिस्तीत ठेवून मास्तरकीची प्रतिष्ठा अबाधित राखली होती; त्यामुळे त्यांच्या बोलण्यातला गोडवा आणि वागण्यातली सभ्यता सारखी बेसूरच वाजत राहिली — त्या कोरड्या साधनेला पोर भुलले नाही.
मास्तर
ननीबाला अधरलालांना म्हणाल्या, 'हा कसला मास्तर तुमचा? त्याला पाहिलं की पोर अगदी कावरंबावरं होतं. काढून टाका त्याला.' म्हाताऱ्या मास्तराची रवानगी झाली. जुन्या काळी मुलगी जशी स्वयंवरा होत असे, तसा ननीबालांचा मुलगा 'स्वयंमास्तर' होऊन बसला — ज्याला तो वरणार नाही, त्याच्या साऱ्या परीक्षा आणि सारी सर्टिफिकिटे फुकट. अशा वेळी अंगावर एक मळकी चादर आणि पायांत फाटके कॅनव्हासचे बूट घालून मास्तरकीच्या उमेदवारीसाठी हरलाल येऊन दाखल झाला. त्याच्या विधवा आईने परक्यांच्या घरी स्वयंपाक करून आणि भात कांडून त्याला गावाकडच्या एन्ट्रन्स शाळेतून कसाबसा एन्ट्रन्स पास करवला होता. आता हरलाल कलकत्त्यात कॉलेजात शिकायचेच, असा जिवापाड निश्चय करून घराबाहेर पडला होता. उपासमारीने त्याच्या चेहऱ्याचा खालचा भाग सुकून भारतवर्षाच्या 'कन्याकुमारी'सारखा निमुळता झाला होता; फक्त भले मोठे कपाळ हिमालयासारखे रुंद होऊन फार नजरेत भरत होते. वाळवंटातल्या वाळूवरून सूर्याचे ऊन जसे परावर्तित होऊन झळाळते, तशी त्याच्या दोन्ही डोळ्यांतून दारिद्र्याची एक अस्वाभाविक दीप्ती बाहेर पडत होती. दरवानाने विचारले, 'काय हवंय? कुणाला भेटायचंय?' हरलाल भीत भीत म्हणाला, 'घरच्या बाबूंना भेटायचं आहे.' दरवान म्हणाला, 'भेट होणार नाही.' यावर काय बोलावे ते न सुचून हरलाल घुटमळत होता, तेवढ्यात सात वर्षांचा वेणुगोपाल बागेतला खेळ आटोपून देवडीपाशी येऊन पोहोचला. हरलालला घुटमळताना पाहून दरवान पुन्हा म्हणाला, 'बाबू, चला जाओ.' वेणूला एकाएकी हट्ट चढला — तो म्हणाला, 'नहीं जायेगा.' आणि हरलालचा हात धरून त्याने त्याला दुमजल्यावरच्या व्हरांड्यात आपल्या वडिलांपाशी नेऊन हजर केले.
मास्तर
बाबू तेव्हा दुपारची झोप आटोपून सुस्तावलेल्या जडपणाने व्हरांड्यात वेताच्या खुर्चीवर गप्प बसून पाय हलवत होते, आणि म्हातारा रतिकांत एका लाकडी चौरंगावर मांडी घालून बसून सावकाश तंबाखू ओढत होता. त्या दिवशी त्या वेळी त्या अवस्थेत निव्वळ योगायोगाने हरलालची मास्तरकी पक्की झाली. रतिकांतने विचारले, 'आपलं शिक्षण कुठवर झालंय?' हरलाल किंचित मान खाली घालून म्हणाला, 'एन्ट्रन्स पास झालो आहे.' रतिकांत भुवया उंचावून म्हणाला, 'नुसतं एन्ट्रन्स पास? मला वाटलं, आपण कॉलेजात शिकला असाल. आपलं वयही काही अगदीच कमी दिसत नाही.' हरलाल गप्प राहिला. आश्रितांना आणि आश्रयाची आशा धरून आलेल्यांना सर्व प्रकारे छळणे, हाच रतिकांतचा मुख्य आनंद होता. रतिकांतने लाडाने वेणूला आपल्या मांडीजवळ ओढून घेण्याचा प्रयत्न करीत म्हटले, 'किती एम.ए., बी.ए. आले नि गेले, एकही पसंत पडला नाही — आणि शेवटी काय, आमचे सोनाबाबू एन्ट्रन्स-पास मास्तराकडे शिकणार!' रतिकांतच्या लाडाची पकड जोराने सोडवून घेत वेणू म्हणाला, 'जा!' वेणूला रतिकांत मुळीच सहन होत नसे; पण रतिही वेणूच्या या चिडचिडीला त्याच्या बालपणीच्या गोडव्याचे एक लक्षण मानून त्यात भरपूर मजा वाटून घेण्याचा प्रयत्न करी, आणि त्याला 'सोनाबाबू', 'चांदबाबू' म्हणून चिडवून चिडवून लालबुंद करून सोडी. हरलालची उमेदवारी यशस्वी होणे कठीण होऊन बसले होते; तो मनात म्हणत होता, आता कुठल्याशा निमित्ताने बसल्या जागेवरून उठून बाहेर पडता आले की सुटलो. तेवढ्यात अधरलालांच्या मनात एकाएकी आले की, हा पोरगा अगदी मामुली पगारावरही मिळेल. शेवटी असे ठरले की हरलाल घरीच राहील, जेवेल आणि दरमहा पाच रुपये पगार घेईल. घरी ठेवून जे काही जास्तीचे औदार्य दाखवले जाईल, त्याच्या मोबदल्यात जास्तीचे काम वसूल करून घेतले की ही थोडीशी दया सार्थकी लागेल.
मास्तर
३ या खेपेला मास्तर टिकला. पहिल्यापासूनच हरलाल आणि वेणूचे असे काही जमले की जणू ते दोघे भाऊच. कलकत्त्यात हरलालचे नातलग-मित्र कुणीच नव्हते — या सुंदर लहान मुलाने त्याचे सारे हृदय व्यापून टाकले. अभाग्या हरलालला याआधी कधी कुणा माणसावर असे प्रेम करण्याची संधीच मिळाली नव्हती. काय केले म्हणजे आपली परिस्थिती सुधारेल, या आशेने त्याने मोठ्या कष्टाने पुस्तके जमवून, केवळ स्वतःच्या प्रयत्नाने रात्रंदिवस फक्त अभ्यासच केला होता. आईला परावलंबी राहावे लागल्यामुळे मुलाचे बालपण केवळ संकोचातच गेले होते — मनाईचे कुंपण ओलांडून खोड्या करीत आपल्या बालपणीच्या पराक्रमाचा झेंडा फडकवण्याचे सुख त्याला कधीच मिळाले नव्हते. तो कुणाच्याच टोळीत नव्हता; आपली फाटकी पुस्तके आणि फुटकी पाटी यांच्यामध्ये तो एकटाच होता. जगात जन्म घेतल्यावर ज्या मुलाला बालपणीच गप्प, गुणी व्हावे लागते, तेव्हापासूनच आईचे दुःख आणि स्वतःची परिस्थिती ओळखून ज्याला जपून चालावे लागते, पूर्णपणे अविचारी होण्याचे स्वातंत्र्य ज्याच्या वाट्याला कधीच येत नाही, आनंदाने धांगडधिंगा घालणे किंवा दुःख झाले म्हणून रडणे — या दोन्ही गोष्टी इतरांची गैरसोय होईल, ते वैतागतील, या भीतीने ज्याला आपले सारे बालबळ एकवटून दाबून टाकाव्या लागतात, त्याच्यासारखा करुणेस पात्र आणि तरीही करुणेपासून वंचित असा जगात दुसरा कोण आहे! पृथ्वीवरच्या साऱ्या माणसांच्या खाली दबून गेलेल्या त्या हरलालला स्वतःलाही ठाऊक नव्हते की त्याच्या मनात मायेचा एवढा रस संधीची वाट पाहत असा साचून राहिला होता. वेणूबरोबर खेळताना, त्याला शिकवताना, आजारपणात त्याची शुश्रूषा करताना हरलालला स्पष्ट कळून चुकले की, आपली परिस्थिती सुधारण्यापेक्षाही माणसाला आणखी एक गोष्ट असते — ती एकदा मनाचा ताबा घेते, तेव्हा तिच्यापुढे दुसरे काहीच लागत नाही.
मास्तर
वेणूलाही हरलाल मिळाल्याने हायसे झाले. कारण घरात तो एकटाच मुलगा; एक अगदी तान्ही आणि दुसरी तीन वर्षांची, अशा दोन बहिणी आहेत — वेणू त्यांना आपल्या संगतीच्या लायकच समजत नाही. आळीत समवयस्क मुलांची वाण नाही, पण अधरलालांनी आपले घराणे फारच मोठे आहे असे मनाशी पक्के ठरवून ठेवल्यामुळे, मिसळायला योग्य असा मुलगा वेणूच्या वाट्याला आला नाही. त्यामुळे हरलाल हाच त्याचा एकमेव सोबती झाला. अनुकूल परिस्थितीत वेणूचा जो धुडगूस दहा जणांत वाटला जाऊन कसाबसा सहन करण्याजोगा झाला असता, तो सारा एकट्या हरलालला सोसावा लागे. हा सारा उपद्रव रोज सोसता सोसता हरलालची माया अधिकच घट्ट होत गेली. रतिकांत म्हणू लागला, 'आमच्या सोनाबाबूंची मास्तर पार माती करायला बसलेत.' अधरलालांनाही अधूनमधून वाटू लागले की, मास्तर आणि विद्यार्थी यांचे नाते जसे असायला हवे तसे काही होत नाहीये. पण हरलालला वेणूपासून दूर करील, अशी ताकद आता कुणात आहे? ४ वेणूचे वय आता अकरा. हरलाल एफ.ए. पास होऊन, शिष्यवृत्ती मिळवून तिसऱ्या वर्षात शिकतो आहे. दरम्यान कॉलेजात त्याला एक-दोन मित्र मिळाले नाहीत असे नाही, पण तो अकरा वर्षांचा मुलगाच त्याच्या साऱ्या मित्रांत श्रेष्ठ होता. कॉलेजातून परत आल्यावर तो वेणूला घेऊन गोलदिघीला, आणि कधी कधी ईडन गार्डनला फिरायला जात असे. त्याला ग्रीक इतिहासातल्या वीरपुरुषांच्या कहाण्या सांगत असे, स्कॉट आणि व्हिक्टर ह्यूगोच्या गोष्टी थोड्या थोड्या करून बंगालीत ऐकवत असे — त्याच्यापुढे मोठ्याने इंग्रजी कविता म्हणून त्यांचा अनुवाद करून अर्थ उलगडून सांगत असे, शेक्सपिअरचे 'ज्यूलियस सीझर' अर्थ लावून वाचून दाखवून त्यातले अँटनीचे भाषण त्याला पाठ करवण्याचा प्रयत्न करीत असे. तो इवलासा मुलगा हरलालचे हृदय जागे करण्यासाठी जणू परीकथेतली सोन्याची कांडीच ठरला.
मास्तर
एकटा बसून धडे घोकत असे तेव्हा इंग्रजी साहित्य त्याने असे मनात कधी उतरू दिले नव्हते; आता इतिहास, विज्ञान, साहित्य — तो जे काही वाची, त्यात जरा जरी रस सापडला की तो आधी वेणूला द्यावा, अशी त्याला ओढ लागे, आणि वेणूच्या मनात तो आनंद जागवण्याच्या प्रयत्नातच त्याची स्वतःची समजण्याची शक्ती आणि आनंद घेण्याचा अधिकार जणू दुपटीने वाढत असे. शाळेतून आल्याआल्या वेणू कसाबसा घाईघाईने फराळ उरकून हरलालकडे जायला अगदी उतावळा होत असे; त्याची आई कुठल्याही निमित्ताने, कुठल्याही आमिषाने त्याला अंतःपुरात धरून ठेवू शकत नसे. ननीबालेला हे आवडले नाही. तिला वाटे, हरलाल आपली नोकरी टिकवण्यासाठीच मुलाला एवढा वश करून घेण्याची धडपड करतो आहे. एके दिवशी तिने हरलालला बोलावून पडद्याआडून सांगितले, 'तुम्ही मास्तर आहात; मुलाला फक्त सकाळी एक तास, संध्याकाळी एक तास शिकवायचं — दिवसरात्र त्याच्या मागे का लागून असता? हल्ली तो आईबापांनाही जुमानत नाही. हे कसलं शिक्षण मिळतंय त्याला? आधी आईचं नाव काढताच नाचत यायचा तो पोर; आज हाका मारूनही सापडत नाही! वेणू माझा मोठ्या घरचा मुलगा आहे; त्याच्याशी तुमची एवढी सलगी कशासाठी?' परवाच रतिकांत अधरबाबूंना गोष्ट सांगत होता की, त्याच्या माहितीतल्या तीन-चार जणांनी श्रीमंतांच्या मुलांची मास्तरकी करायला येऊन मुलांची मने अशी वश करून घेतली की, मुलगा इस्टेटीचा मालक झाल्यावर तेच सर्वेसर्वा होऊन मुलाला आपल्या मर्जीप्रमाणे नाचवू लागले. हे सगळे बोलणे हरलालकडे इशारा करूनच चालले होते, हे हरलालला कळायचे राहिले नव्हते. तरीही तो गप्प राहून सारे सोसत आला होता. पण आज वेणूच्या आईचे बोलणे ऐकून त्याचे काळीज फाटले. त्याला कळून चुकले की, श्रीमंतांच्या घरात मास्तराची पायरी कोणती.
मास्तर
गोठ्यात मुलाला दूध पुरवण्यासाठी जशी गाय असते, तसाच त्याला विद्या पुरवण्यासाठी एक मास्तरही ठेवलेला असतो — विद्यार्थ्याशी मायेचे, आपुलकीचे नाते जोडणे हा इतका मोठा उद्धटपणा की घरच्या नोकरापासून गृहिणीपर्यंत कुणालाच तो सहन होत नाही, आणि सगळेच त्याला स्वार्थ साधण्याची एक चलाखीच समजतात. हरलाल कापऱ्या आवाजात म्हणाला, 'आईसाहेब, वेणूला मी फक्त शिकवीन; त्याच्याशी माझा दुसरा कोणताही संबंध राहणार नाही.' त्या दिवशी संध्याकाळी वेणूबरोबर खेळायच्या वेळी हरलाल कॉलेजातून परत आलाच नाही. रस्त्यारस्त्यांतून भटकत त्याने तो वेळ कसा घालवला, ते त्याचे त्यालाच ठाऊक. संध्याकाळ झाल्यावर तो शिकवायला आला तेव्हा वेणू तोंड फुगवून बसला. हरलालने आपल्या गैरहजेरीचा कोणताही खुलासा न करता शिकवणे चालू ठेवले — त्या दिवशी अभ्यास काही धड झालाच नाही. हरलाल रोज पहाटे अंधारातच उठून आपल्या खोलीत बसून अभ्यास करीत असे. वेणू सकाळी उठल्याबरोबर तोंड धुऊन त्याच्याकडे धावत येत असे. बागेत बांधलेल्या हौदात मासे होते. त्यांना चुरमुरे खायला घालणे, हे या दोघांचे एक काम होते. बागेच्या एका कोपऱ्यात काही दगड रचून, लहान लहान वाटा, लहानसे फाटक आणि कुंपण तयार करून वेणूने वालखिल्य ऋषींच्या आश्रमाला शोभेल अशी एक इवलीशी बाग वसवली होती. त्या बागेवर माळ्याचा काहीही अधिकार नव्हता. सकाळी या बागेची निगा राखणे हे त्यांचे दुसरे काम. त्यानंतर ऊन चढले की घरी परतून वेणू हरलालकडे अभ्यासाला बसे. काल संध्याकाळी गोष्टीचा जो भाग ऐकायचा राहिला होता, तो ऐकण्यासाठी आज वेणू शक्य तितक्या पहाटे उठून बाहेर धावत आला होता. त्याला वाटले होते, आज लवकर उठून आपण मास्तरांवर बाजी मारली. खोलीत येऊन पाहतो तो मास्तर नाहीत. दरवानाला विचारल्यावर कळले, मास्तर बाहेर गेले आहेत.
मास्तर
त्या दिवशीही सकाळी अभ्यासाच्या वेळी वेणू आपल्या इवल्याशा हृदयातली वेदना घेऊन चेहरा गंभीर करून बसून राहिला. सकाळी हरलाल का बाहेर गेला होता, ते त्याने विचारलेसुद्धा नाही. हरलाल वेणूच्या चेहऱ्याकडे न पाहता पुस्तकाच्या पानावर नजर ठेवून शिकवत राहिला. वेणू घरात आईजवळ जेवायला बसला तेव्हा आईने विचारले, 'काल संध्याकाळपासून तुला झालंय तरी काय, सांग बघू. तोंड असं गाडग्यासारखं फुगवून का बसलायस — नीट जेवत नाहीस — काय भानगड आहे?' वेणूने काहीच उत्तर दिले नाही. जेवण झाल्यावर आईने त्याला जवळ ओढून, त्याच्या अंगावरून हात फिरवत, खूप लाड करीत पुनःपुन्हा विचारायला सुरुवात केली, तेव्हा त्याला राहवले नाही; तो हुंदके देऊन रडू लागला. म्हणाला, 'मास्तर —' आई म्हणाल्या, 'मास्तर काय?' मास्तरांनी काय केले, ते वेणूला सांगता आले नाही. तक्रार नेमकी काय आहे, ते शब्दांत मांडणेच कठीण होते. ननीबाला म्हणाल्या, 'मास्तरांनी तुझ्यापाशी तुझ्या आईविषयी कागाळ्या केल्या असतील, होय ना!' त्या बोलण्याचा काहीच अर्थ न कळल्याने वेणू उत्तर न देता निघून गेला. ५ दरम्यान घरातून अधरबाबूंचे काही कपडेलत्ते चोरीला गेले. पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिसांनी झडतीत हरलालचीही पेटी तपासायला सोडली नाही. रतिकांत अगदी साळसूदपणे म्हणाला, 'ज्यानं नेलंय, तो काय माल पेटीत ठेवील?' मालाचा काहीच पत्ता लागला नाही. असले नुकसान अधरलालांना असह्य. ते अवघ्या जगावर संतापले. रतिकांत म्हणाला, 'घरात इतकी माणसं आहेत, कुणाला दोष देणार, कुणावर संशय घेणार? ज्याला जेव्हा वाटेल, तो येतो-जातो.' अधरलालांनी मास्तराला बोलावून सांगितले, 'हे पाहा हरलाल, तुम्हा लोकांपैकी कुणालाही घरात ठेवणं मला सोयीचं होणार नाही. आतापासून तुम्ही वेगळ्या बिऱ्हाडात राहून वेणूला ठरल्या वेळी येऊन शिकवत जा, हेच बरं — हवं तर मी तुमचा पगार दोन रुपयांनी वाढवायला तयार आहे.'
मास्तर
रतिकांत तंबाखू ओढता ओढता म्हणाला, 'हे तर फारच उत्तम — दोन्ही बाजूंनी चांगलं.' हरलालने मान खाली घालून ऐकून घेतले. तेव्हा तो काही बोलू शकला नाही. खोलीत येऊन त्याने अधरबाबूंना चिठ्ठी लिहून पाठवली की, नाना कारणांनी वेणूला शिकवणे त्याला जमणार नाही, म्हणून आजच निरोप घ्यायला तो तयार आहे. त्या दिवशी शाळेतून परत आल्यावर वेणूने पाहिले, मास्तरांची खोली रिकामी. त्यांची ती मोडकळीला आलेली पत्र्याची पेटीही नाही. दोरीवर त्यांची चादर आणि पंचा लोंबत असे; ती दोरी आहे, पण चादर आणि पंचा नाहीत. टेबलावर वह्या-कागद आणि पुस्तके अस्ताव्यस्त पसरलेली असत; त्यांच्याऐवजी तिथे एका मोठ्या बाटलीत सोनेरी मासे लखलखत वर-खाली करीत आहेत. बाटलीवर मास्तरांच्या हस्ताक्षरात वेणूचे नाव लिहिलेला एक कागद चिकटवलेला. शिवाय एक नवे, सुरेख बांधणीचे इंग्रजी चित्रांचे पुस्तक; त्याच्या आतल्या पानावर एका कोपऱ्यात वेणूचे नाव आणि त्याखाली आजची तारीख, महिना आणि सन घातलेले. वेणू धावत वडिलांकडे गेला आणि म्हणाला, 'बाबा, मास्तर कुठे गेले?' वडिलांनी त्याला जवळ ओढून घेत म्हटले, 'ते नोकरी सोडून निघून गेले.' वेणू वडिलांचा हात सोडवून बाजूच्या खोलीत बिछान्यावर पालथा पडून रडू लागला. अधरबाबू व्याकूळ झाले; काय करावे ते त्यांना काहीच सुचेना. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता हरलाल एका मेसच्या खोलीत लाकडी बाजेवर उदास बसून कॉलेजला जावे की नाही याचा विचार करीत होता, तोच अचानक त्याने पाहिले — आधी अधरबाबूंच्या घरचा दरवान खोलीत शिरला, आणि त्याच्या पाठोपाठ वेणूने आत येताच हरलालच्या गळ्याला मिठी मारली. हरलालचा आवाज घशात अडकला; बोलायला गेलो तर दोन्ही डोळ्यांतून पाणी ओघळेल, या भीतीने तो एक शब्दही बोलू शकला नाही. वेणू म्हणाला, 'मास्तर, आमच्या घरी चला.'
मास्तर
वेणूने आपला म्हातारा दरवान चंद्रभान याची पाठ धरली होती की, काहीही करून त्याला मास्तरांच्या घरी घेऊन जायलाच हवे. आळीतल्या ज्या हमालाने हरलालची पेटी वाहून आणली होती, त्याच्याकडून पत्ता काढून, आज शाळेला जाणाऱ्या गाडीतूनच चंद्रभान वेणूला हरलालच्या मेसवर घेऊन आला होता. वेणूच्या घरी जाणे आपल्याला का अगदीच अशक्य आहे, ते हरलालला सांगताही येईना, आणि त्यांच्या घरी जाताही येईना. वेणूने त्याच्या गळ्याला मिठी मारून त्याला म्हटले होते, 'आमच्या घरी चला' — तो स्पर्श आणि ते शब्द यांच्या आठवणीने कितीतरी दिवस, कितीतरी रात्री त्याचा गळा दाबून जणू त्याचा श्वास कोंडला. पण हळूहळू असेही दिवस आले की दोन्ही बाजूंनी सगळे मिटून गेले; छातीच्या शिरा घट्ट धरून ती वेदना निशाचर वटवाघळासारखी आता लोंबकळत राहिली नाही. ६ पुष्कळ प्रयत्न करूनही हरलालचे लक्ष आता अभ्यासात पूर्वीसारखे लागेना. तो कसल्याही प्रकारे स्थिर होऊन अभ्यासाला बसू शकत नसे. थोडे वाचण्याचा प्रयत्न केला की धाडकन पुस्तक मिटून टाकी आणि विनाकारण झपाझप पावले टाकीत रस्त्यावरून एक फेरी मारून येई. कॉलेजात व्याख्यानांच्या टिपणांत मधूनमधून मोठमोठ्या मोकळ्या जागा राहत, आणि मधूनमधून ज्या रेघोट्या उमटत, त्यांचे प्राचीन इजिप्तच्या चित्रलिपीखेरीज इतर कोणत्याही वर्णमालेशी साम्य नव्हते. हरलालने ओळखले, ही लक्षणे काही चांगली नव्हेत. परीक्षेत तो कदाचित पास झाला तरी शिष्यवृत्ती मिळण्याची काहीच शक्यता नाही. शिष्यवृत्ती मिळाली नाही तर कलकत्त्यात त्याचा एक दिवसही निभाव लागणार नाही. शिवाय तिकडे गावी आईलाही दोन-चार रुपये पाठवायलाच हवेत. नाना विचार करून तो नोकरीच्या शोधात बाहेर पडला. नोकरी मिळणे कठीण, पण न मिळणे त्याच्यासाठी त्याहूनही कठीण; म्हणूनच आशा सोडूनही त्याला आशा सोडता आली नाही.
मास्तर
हरलालच्या सुदैवाने, एका मोठ्या इंग्रज व्यापाऱ्याच्या ऑफिसात उमेदवारी करायला गेला असता तो अचानक मोठ्या साहेबांच्या नजरेत भरला. साहेबांची अशी खात्री होती की, ते चेहरा पाहून माणूस ओळखू शकतात. हरलालला बोलावून त्याच्याशी दोन-चार शब्द बोलताच ते मनात म्हणाले, 'हा माणूस चालेल.' त्यांनी विचारले, 'कामाची माहिती आहे?' हरलाल म्हणाला, 'नाही.' 'जामीन देऊ शकाल?' त्याचेही उत्तर, 'नाही.' 'एखाद्या मोठ्या माणसाकडून सर्टिफिकेट आणू शकाल?' कुठल्याच मोठ्या माणसाला तो ओळखत नव्हता. हे ऐकून साहेब जणू अधिकच खूश होऊन म्हणाले, 'ठीक आहे, पंचवीस रुपये पगारावर काम सुरू करा; काम शिकलात की बढती मिळेल.' मग साहेबांनी त्याच्या कपड्यांकडे नजर टाकून म्हटले, 'पंधरा रुपये आगाऊ देतो; ऑफिसला शोभतील असे कपडे शिवून घ्या.' कपडे शिवून झाले; हरलाल ऑफिसला जाऊही लागला. मोठे साहेब त्याला भुतासारखे राबवू लागले. इतर कारकून घरी गेले तरी हरलालला सुट्टी नसे. एखाद्या दिवशी साहेबांच्या बंगल्यावर जाऊनही त्यांना काम समजावून द्यावे लागे. अशा रीतीने काम शिकून घ्यायला हरलालला वेळ लागला नाही. त्याच्या सहकारी कारकुनांनी त्याला फसवण्याचे पुष्कळ प्रयत्न केले, वरिष्ठांकडे त्याच्याविरुद्ध चुगल्याही केल्या, पण या निःशब्द, निरुपद्रवी, सामान्य हरलालचे ते काहीही वाकडे करू शकले नाहीत. त्याला चाळीस रुपये पगार झाला तेव्हा हरलालने गावाहून आईला आणून एका लहानशा गल्लीत एका लहानशा घरात बिऱ्हाड केले. इतक्या दिवसांनी त्याच्या आईचे दुःख सरले. आई म्हणाल्या, 'बाळा, आता सून घरात आणते.' हरलालने आईच्या पायांची धूळ मस्तकी लावून म्हटले, 'आई, तेवढं मात्र मला माफ कर.' आईची आणखी एक विनंती होती. त्या म्हणाल्या, 'तू दिवसरात्र तुझ्या त्या विद्यार्थ्याच्या, वेणुगोपालच्या गोष्टी करत असतोस; त्याला एकदा जेवायला बोलाव. मला त्याला पाहावंसं वाटतं.'
मास्तर
हरलाल म्हणाला, 'आई, या घरात त्याला कुठे बसवू? थांब, एक मोठं घर घेतो, मग त्याला जेवायला बोलावतो.' ७ हरलालच्या पगारवाढीबरोबर लहान गल्लीतून मोठ्या गल्लीत आणि लहान घरातून मोठ्या घरात त्याचे बिऱ्हाड हलत गेले. तरीही, कोण जाणे काय मनात आणून, अधरलालांच्या घरी जायचे किंवा वेणूला आपल्या घरी बोलावून आणायचे, हे त्याला कसल्याही प्रकारे ठरवता येईना. कदाचित त्याचा संकोच कधीच सुटला नसता. इतक्यात एकाएकी बातमी आली की वेणूच्या आई वारल्या. ऐकताच क्षणाचाही विलंब न करता तो अधरलालांच्या घरी जाऊन पोहोचला. वयाने विषम अशा या दोन मित्रांची पुष्कळ दिवसांनी पुन्हा एकदा भेट झाली. वेणूचे सुतक संपले, तरीही या घरी हरलालचे येणे-जाणे चालू राहिले. पण पूर्वीसारखे आता काहीच उरले नव्हते. वेणू आता मोठा झाला आहे; अंगठा आणि तर्जनी यांच्या साहाय्याने आपल्या नव्या मिसरुडाच्या रेषेची आराधना करतो आहे. चालण्या-वागण्यात बाबूगिरी उमटू लागली आहे. आता त्याला साजेशा मित्रमंडळींचीही कमतरता नाही. फोनोग्राफवर नाटकातल्या नटींची हलकी गाणी लावून तो मित्रमंडळाला खूश ठेवतो. अभ्यासाच्या खोलीतली ती जुनी मोडकी खुर्ची आणि डागाळलेले टेबल कुठे गेले? आरसे, चित्रे, सामानसुमान यांनी खोली जणू छाती फुगवून उभी आहे. वेणू आता कॉलेजला जातो, पण दुसऱ्या वर्षाची हद्द ओलांडण्याची त्याला काही घाई दिसत नाही. वडिलांनी ठरवून ठेवले आहे की एक-दोन परीक्षा पास करवून घेऊन लग्नाच्या बाजारात मुलाचा भाव वाढवायचा. पण मुलाच्या आईला ठाऊक होते, आणि त्या स्पष्ट बोलूनही दाखवत, 'सामान्य माणसाच्या मुलासारखी आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी माझ्या वेणूला परीक्षांचा हिशोब द्यावा लागणार नाही — लोखंडी तिजोरीत कंपनीचे रोखे अक्षय राहोत.' मुलानेही आईचे हे म्हणणे मनोमन चांगलेच समजून घेतले होते.
मास्तर
काहीही असो, आज वेणूला आपली काहीही गरज उरलेली नाही, हे हरलालला स्पष्ट कळून चुकले, आणि राहून राहून त्याला तो दिवस आठवत राहिला — ज्या दिवशी वेणू अचानक सकाळी त्याच्या त्या मेसमधल्या खोलीत जाऊन त्याच्या गळ्याला मिठी मारून म्हणाला होता, 'मास्तर, आमच्या घरी चला.' तो वेणू आता नाही, ते घर आता नाही; आता मास्तरांना कोण बोलावणार? हरलालने ठरवले होते की, आता वेणूला अधूनमधून आपल्या घरी जेवायला बोलवायचे. पण त्याला बोलावण्याचे बळ झाले नाही. एकदा वाटले, 'त्याला यायला सांगावं'; मग वाटले, 'सांगून काय फायदा — वेणू कदाचित आमंत्रणाचा मान राखील, पण — जाऊ दे.' हरलालच्या आईंनी मात्र पिच्छा सोडला नाही. त्या पुनःपुन्हा म्हणत राहिल्या की, स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून त्याला जेवू घालणार — 'अरेरे, लेकराची आई गेली हो!' शेवटी एके दिवशी हरलाल त्याला आमंत्रण द्यायला गेला. म्हणाला, 'अधरबाबूंची परवानगी घेऊन येतो.' वेणू म्हणाला, 'परवानगी घ्यायची गरज नाही. आपल्याला काय वाटतं, मी अजून तोच छोटा बाबू आहे?' वेणू हरलालच्या घरी जेवायला आला. या कार्तिकेयासारख्या मुलाला आईंनी आपल्या दोन स्निग्ध डोळ्यांच्या आशीर्वादाने न्हाऊ घालून प्रेमाने जेवू घातले. त्यांना सारखे वाटत राहिले, 'अरेरे, एवढ्या वयाच्या अशा पोराला मागे टाकून याची आई गेली, तेव्हा तिच्या जिवाचं काय झालं असेल कोण जाणे.' जेवण आटोपताच वेणू म्हणाला, 'मास्तर, मला आज जरा लवकर निघायला हवं. माझे एक-दोन मित्र यायचे आहेत.' असे म्हणून त्याने खिशातून सोन्याचे घड्याळ काढून एकदा वेळ पाहून घेतली; मग थोडक्यात निरोप घेऊन तो जोडगाडीत जाऊन बसला. हरलाल आपल्या घराच्या दारापाशी उभा राहिला. गाडी सारी गल्ली हादरवीत क्षणार्धात नजरेआड झाली.
मास्तर
आई म्हणाल्या, 'हरलाल, त्याला अधूनमधून बोलावून आणत जा. एवढ्या वयात त्याची आई गेली, या विचाराने माझा जीव कसा कसा होतो.' हरलाल गप्प राहिला. या आईविना मुलाचे सांत्वन करण्याची त्याला काहीच गरज वाटली नाही. एक दीर्घ निःश्वास सोडून तो मनाशी म्हणाला, 'बस्स, एवढंच. पुन्हा कधी बोलावणार नाही. एके काळी पाच रुपये पगाराची मास्तरकी केली होती खरी — पण मी आपला एक सामान्य हरलालच.' ८ एके दिवशी संध्याकाळनंतर हरलाल ऑफिसातून परत आला तेव्हा त्याने पाहिले, त्याच्या तळमजल्यावरच्या खोलीत अंधारात कुणीतरी बसले आहे. तिथे कुणी माणूस आहे हे लक्षात न येता तो बहुधा वर निघून गेला असता; पण दारातून आत शिरताच त्याला जाणवले की सेंटच्या वासाने सारा आसमंत भरून गेला आहे. खोलीत शिरून हरलालने विचारले, 'कोण आहे, महाशय?' वेणू पटकन म्हणाला, 'मास्तर, मी.' हरलाल म्हणाला, 'हे काय? केव्हा आलास?' वेणू म्हणाला, 'खूप वेळ झाला येऊन. आपण इतक्या उशिरा ऑफिसातून परत येता, हे मला ठाऊकच नव्हतं.' फार दिवसांपूर्वी ते जेवण जेवून गेल्यानंतर वेणू एकदाही या घरी आला नव्हता. ना निरोप, ना काही, आज एकाएकी तो संध्याकाळी या अंधाऱ्या खोलीत असा वाट पाहत बसलेला पाहून हरलालचे मन चिंतेत पडले. वरच्या खोलीत जाऊन दिवा लावून दोघे बसले. हरलालने विचारले, 'सगळं ठीक आहे ना? काही विशेष बातमी?' वेणूने सांगितले, अभ्यास आता त्याला फारच कंटाळवाणा वाटू लागला आहे. वर्षानुवर्षे त्या सेकंड इयरमध्येच तो किती काळ अडकून राहणार! त्याच्याहून कितीतरी लहान पोरांबरोबर त्याला शिकावे लागते, याची त्याला फार लाज वाटते. पण बाबांना काही केल्या हे कळत नाही. हरलालने विचारले, 'तुझी काय इच्छा आहे?'
मास्तर
वेणूने सांगितले, त्याची इच्छा आहे की विलायतेला जावे, बॅरिस्टर होऊन यावे. त्याच्याच बरोबर शिकणारा, इतकेच काय, त्याच्याहूनही अभ्यासात कितीतरी कच्चा असा एक मुलगा विलायतेला जायचे ठरले आहे. हरलाल म्हणाला, 'तुझ्या वडिलांना तुझी इच्छा सांगितलीस?' वेणू म्हणाला, 'सांगितली. बाबा म्हणतात, पास झाल्याशिवाय विलायतेला जाण्याचा प्रस्ताव ते कानावरही घेणार नाहीत. पण माझं मनच उडालंय — इथे राहिलो तर मी काही केल्या पास होऊ शकणार नाही.' हरलाल गप्प बसून विचार करू लागला. वेणू म्हणाला, 'आज याच विषयावरून बाबा मला तोंडाला येईल ते बोलले. म्हणून मी घर सोडून निघून आलो. आई असती तर असं कधीच झालं नसतं.' बोलता बोलता तो रुसून रडू लागला. हरलाल म्हणाला, 'चल, मीही तुझ्याबरोबर तुझ्या वडिलांकडे येतो; विचारविनिमय करून जे योग्य असेल ते ठरवू.' वेणू म्हणाला, 'नाही, मी तिथे जाणार नाही.' वडिलांशी भांडून वेणू हरलालच्या घरी येऊन राहणार, ही गोष्ट हरलालला मुळीच आवडली नाही. आणि तरीही 'माझ्या घरी राहता येणार नाही' असे म्हणणेही फार कठीण. हरलालने विचार केला, 'आणखी थोड्या वेळाने मन जरा शांत झालं की याची समजूत घालून घरी घेऊन जाईन.' त्याने विचारले, 'तू जेवून आलास?' वेणू म्हणाला, 'नाही, मला भूक नाही; मी आज जेवणार नाही.' हरलाल म्हणाला, 'असं कसं चालेल?' घाईघाईने आईकडे जाऊन म्हणाला, 'आई, वेणू आलाय; त्याच्यासाठी काहीतरी खायला हवं.' हे ऐकून आईंना खूप आनंद झाला आणि त्या खायला करायला गेल्या. हरलाल ऑफिसचे कपडे बदलून, हात-तोंड धुऊन वेणूजवळ येऊन बसला. जरासा खोकून, जरासे घुटमळून त्याने वेणूच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, 'वेणू, हे काही बरं होत नाहीये. वडिलांशी भांडून घरातून निघून येणं, हे तुला शोभत नाही.'
मास्तर
हे ऐकताच बिछान्यावरून ताडकन उठून वेणू म्हणाला, 'आपल्याकडे जर सोय होत नसेल, तर मी सतीशच्या घरी जातो.' असे म्हणून तो निघायला उठला. हरलालने त्याचा हात धरून म्हटले, 'थांब, काहीतरी खाऊन जा.' वेणू रागाने म्हणाला, 'नाही, मला खाववणार नाही.' असे म्हणून हात सोडवून घेऊन तो खोलीबाहेर आला. तेवढ्यात, हरलालसाठी जो फराळ तयार होता, तोच वेणूसाठी ताटात नीट मांडून आई त्यांच्यासमोर येऊन उभ्या राहिल्या. म्हणाल्या, 'कुठे निघालास, बाळा?' वेणू म्हणाला, 'मला काम आहे; मी निघतो.' आई म्हणाल्या, 'असं कसं, बाळा? काही न खाता नाही जायचं.' असे म्हणून त्याच व्हरांड्यात पान मांडून त्याचा हात धरून त्यांनी त्याला जेवायला बसवले. वेणू रागाने काही खात नव्हता, फक्त खाण्याशी जरासा चाळा करीत होता, तेवढ्यात दारापाशी एक गाडी येऊन थांबली. आधी एक दरवान आणि त्याच्या पाठोपाठ खुद्द अधरबाबू बुटांचा करकर आवाज करीत जिना चढून वर येऊन ठाकले. वेणूचा चेहरा पांढराफटक पडला. आई आतल्या खोलीत सरकल्या. अधर मुलासमोर येऊन, रागाने कापऱ्या आवाजात हरलालकडे पाहत म्हणाले, 'असं आहे तर! रतिकांतने मला तेव्हाच सांगितलं होतं, पण तुमच्या पोटात इतके डाव शिजत असतील, यावर माझा विश्वास बसला नव्हता. तुम्हाला वाटलं, वेणूला वश करून त्याला पिळून खाल! पण ते मी होऊ देणार नाही. मुलगा पळवता! तुमच्यावर पोलीस-केस करीन, तुम्हाला तुरुंगात डांबीन, तेव्हाच सोडीन.' असे म्हणून वेणूकडे पाहून ते म्हणाले, 'चल. ऊठ.' वेणू एक शब्दही न बोलता वडिलांच्या मागोमाग निघून गेला. त्या दिवशी घास फक्त हरलालच्याच तोंडात गेला नाही.
मास्तर
९ या खेपेला हरलालच्या व्यापारी ऑफिसने कोण जाणे कोणत्या कारणाने बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणावर तांदूळ-डाळ खरेदी करायला सुरुवात केली होती. त्यानिमित्ताने हरलालला दर आठवड्याला शनिवारी पहाटेच्या गाडीने सात-आठ हजार रुपये घेऊन बाहेरगावी जावे लागे. घाऊक व्यापाऱ्यांना हातोहात किंमत चुकती करण्यासाठी बाहेरगावच्या एका खास केंद्रात त्यांचे जे ऑफिस आहे, तिथे तो दहा आणि पाच रुपयांच्या नोटा आणि रोकड रुपये घेऊन जात असे; तिथे पावत्या आणि खातेवह्या पाहून मागच्या आठवड्याचा ढोबळ हिशोब जुळवून, चालू आठवड्याचे काम चालवण्यासाठी पैसे ठेवून येत असे. बरोबर ऑफिसचे दोन दरवान जात. हरलालचा कोणी जामीन नाही म्हणून ऑफिसात कुरबुर उठली होती, पण मोठ्या साहेबांनी सारी जोखीम स्वतःवर घेऊन सांगितले होते — हरलालच्या जामिनाची गरज नाही. माघ महिन्यापासून असे काम चालू आहे; चैत्रापर्यंत चालेल असा अंदाज आहे. या कामात हरलाल विशेष गुंतलेला होता. बऱ्याचदा त्याला रात्री फार उशिरा ऑफिसातून परतावे लागे. एके दिवशी अशाच रात्री परत आल्यावर त्याला कळले की वेणू आला होता; आईंनी त्याला खाऊ घालून प्रेमाने बसवून घेतले होते. त्या दिवशी त्याच्याशी गप्पागोष्टी करून त्याच्याविषयी त्यांच्या मनात अधिकच माया दाटून आली होती. असे आणखी एक-दोन दिवस झाले. आई म्हणाल्या, 'घरी आई नाही ना, म्हणून त्याचं तिथे मन रमत नाही. मी वेणूला तुझ्या धाकट्या भावासारखा, माझ्या पोटच्या मुलासारखाच मानते. ती माया मिळते म्हणून मला नुसतं आई म्हणून हाक मारायला तो इथे येतो.' असे म्हणून त्यांनी पदराच्या टोकाने डोळे पुसले.
मास्तर
एके दिवशी हरलालची वेणूशी भेट झाली. त्या दिवशी तो वाट पाहत बसला होता. रात्री उशिरापर्यंत गप्पा झाल्या. वेणू म्हणाला, 'बाबा हल्ली असे झाले आहेत की मला घरात अजिबात राहवत नाही. त्यातून ऐकतोय की ते लग्नाच्या तयारीत आहेत. रतिबाबू स्थळं घेऊन येताहेत — त्यांच्याशी सारखी खलबतं चालू आहेत. पूर्वी मी कुठे गेलो आणि उशीर झाला, तर बाबा अस्वस्थ होत; आता मी दोन-चार दिवस घरी परतलो नाही तर त्यांना आराम वाटतो. मी घरी असलो तर लग्नाची चर्चा जपून करावी लागते, म्हणून मी नसलो की ते सुटकेचा निःश्वास टाकतात. हे लग्न झालं तर मी घरात राहू शकणार नाही. आपणच मला सुटकेचा एखादा मार्ग दाखवा — मला स्वतंत्र व्हायचंय.' मायेने आणि वेदनेने हरलालचे हृदय भरून आले. संकटाच्या वेळी इतर सगळ्यांना सोडून वेणू आपल्या त्या मास्तरांकडे आला आहे, याचा त्याला दुःखासोबतच आनंदही झाला. पण मास्तरांची ताकद ती केवढी! वेणू म्हणाला, 'कसंही करून विलायतेला जाऊन बॅरिस्टर होऊन आलो, तर या संकटातून सुटेन.' हरलाल म्हणाला, 'अधरबाबू जाऊ देतील?' वेणू म्हणाला, 'मी गेलो तर ते सुटतील. पण पैशावर त्यांचा जो जीव आहे, त्यावरून विलायतेचा खर्च त्यांच्याकडून सहजासहजी वसूल होणार नाही. थोडी युक्ती करावी लागेल.' वेणूचा शहाणपणा पाहून हरलाल हसून म्हणाला, 'कसली युक्ती?' वेणू म्हणाला, 'मी हँडनोटवर कर्ज काढीन. देणेकऱ्याने माझ्यावर फिर्याद केली की बाबांना नाइलाजाने ते फेडावंच लागेल. त्या पैशाने मी पळून विलायतेला जाईन. तिकडे गेल्यावर ते खर्च पाठवल्याशिवाय राहू शकणार नाहीत.' हरलाल म्हणाला, 'तुला कर्ज देणार कोण?' वेणू म्हणाला, 'आपण नाही देऊ शकणार?' हरलाल आश्चर्याने म्हणाला, 'मी!' त्याच्या तोंडून पुढे एक शब्दही फुटला नाही.
मास्तर
वेणू म्हणाला, 'का? आपल्या दरवानाने तर थैल्यांत भरून बरेच पैसे घरात आणले.' हरलाल हसून म्हणाला, 'तो दरवान जितका माझा, तितकेच ते पैसेही माझे.' असे म्हणून ऑफिसच्या त्या पैशांचा उपयोग काय, ते त्याने वेणूला समजावून सांगितले. हा पैसा केवळ एका रात्रीपुरताच गरिबाच्या घरी आश्रयाला येतो; सकाळ झाली की दाही दिशांना निघून जातो. वेणू म्हणाला, 'आपले साहेब मला कर्ज देऊ शकणार नाहीत? हवं तर मी जास्त व्याज देईन.' हरलाल म्हणाला, 'तुझ्या वडिलांनी सिक्युरिटी दिली, तर माझ्या शब्दाखातर कदाचित देतीलही.' वेणू म्हणाला, 'बाबा सिक्युरिटी देणार असतील, तर मग पैसेच का देणार नाहीत?' वाद तिथेच मिटला. हरलाल मनातल्या मनात विचार करू लागला, 'माझं काही असतं, तर घरदार, जमीनजुमला सगळं विकून-सवरून पैसे दिले असते.' पण अडचण फक्त एवढीच होती की घरदार, जमीनजुमला काहीच नव्हते. १० एका शुक्रवारी रात्री हरलालच्या घरासमोर एक जोडगाडी येऊन उभी राहिली. वेणू गाडीतून उतरताक्षणी हरलालच्या ऑफिसच्या दरवानाने त्याला एक मोठा सलाम ठोकला आणि वर बाबूंना लगबगीने वर्दी द्यायला गेला. हरलाल तेव्हा आपल्या झोपायच्या खोलीत जमिनीवर बसून पैसे जुळवून पाहत होता. वेणू त्याच खोलीत शिरला. आज त्याचा पोशाख काहीसा नव्या धर्तीचा होता. शौकीन धोतर-उपरण्याऐवजी त्याने गुटगुटीत अंगावर पारशी कोट आणि पाटलोण चढवली होती आणि डोक्यावर कॅप घातली होती. त्याच्या दोन्ही हातांच्या बोटांत रत्नामोत्यांच्या अंगठ्या लखलखत होत्या. गळ्यातून लोंबणाऱ्या जाड सोन्याच्या साखळीला अडकवलेले घड्याळ छातीवरच्या खिशात विसावले होते. कोटाच्या बाहीच्या आतून सदऱ्याच्या बाहीवरची हिऱ्याची बटणे दिसत होती.
मास्तर
हरलालने पैसे मोजणे थांबवून आश्चर्याने विचारले, 'हे काय? इतक्या रात्री या वेशात!' वेणू म्हणाला, 'परवा बाबांचं लग्न आहे. त्यांनी ते माझ्यापासून लपवून ठेवलंय, पण मला बातमी लागली. मी बाबांना सांगितलं, काही दिवसांसाठी मी आपल्या बराकपूरच्या बागेत जातो. ऐकून ते फार खूश झाले आणि त्यांनी होकार दिला. म्हणून बागेकडे निघालोय. वाटतंय, पुन्हा परतूच नये. धैर्य असतं तर गंगेत बुडून मेलो असतो.' बोलता बोलता वेणू रडू लागला. हरलालच्या छातीत जणू सुरी खुपसली जाऊ लागली. एखादी अनोळखी स्त्री येऊन वेणूच्या आईची खोली, आईचा पलंग, आईची जागा बळकावून बसली की, आईच्या मायेच्या आठवणींनी गुंफलेले ते घर वेणूला किती काटेरी होऊन बसेल, हे हरलालला संपूर्ण हृदयाने उमगले. त्याने मनाशी विचार केला, या जगात गरीब म्हणून जन्माला आले नाही तरी दुःखाला आणि अपमानाला अंत नाही. वेणूचे सांत्वन कोणत्या शब्दांनी करावे, ते काहीच न सुचून त्याने वेणूचा हात आपल्या हातात घेतला. घेताक्षणी त्याच्या मनात एक शंका उभी राहिली. त्याला वाटले, एवढ्या दुःखाच्या वेळी वेणूला इतका साजशृंगार कसा सुचला? हरलालची नजर आपल्या अंगठ्यांवर खिळली आहे, हे पाहून वेणूने जणू त्याच्या मनातला प्रश्न ओळखला. तो म्हणाला, 'या अंगठ्या माझ्या आईच्या आहेत.' हे ऐकून हरलालने मोठ्या कष्टाने डोळ्यांतले पाणी आवरले. थोड्या वेळाने तो म्हणाला, 'वेणू, जेवून आलास?' वेणू म्हणाला, 'हो — आपलं जेवण झालं नाही?' हरलाल म्हणाला, 'हे पैसे मोजून आयर्न-चेस्टमध्ये ठेवल्याशिवाय मला खोलीबाहेर पडता येणार नाही.' वेणू म्हणाला, 'आपण जेवून या; आपल्याशी खूप बोलायचं आहे. मी खोलीतच थांबतो; आई आपलं जेवण घेऊन वाट पाहत बसल्या आहेत.'
मास्तर
हरलाल जरा घुटमळून म्हणाला, 'मी चटकन जेवून येतो.' हरलाल घाईघाईने जेवण आटोपून आईंना घेऊन खोलीत आला. वेणूने त्यांना नमस्कार केला; त्यांनी वेणूच्या हनुवटीला हात लावून ती बोटे ओठांशी नेऊन मुका घेतला. हरलालकडून सगळी हकीकत कळल्यावर त्यांची छाती जणू फुटत होती. आपली सारी माया देऊनही वेणूची उणीव त्या भरून काढू शकणार नाहीत, हेच त्यांचे दुःख. चहूकडे पसरलेल्या पैशांच्या मधोमध तिघे बसले आणि वेणूच्या लहानपणच्या गोष्टी निघाल्या. मास्तरांशी निगडित अशा कितीतरी दिवसांच्या कितीतरी घटना! मधूनमधून, मायेला काहीच बांध नसलेल्या त्या आईचीही आठवण निघत राहिली. असे करता करता रात्र बरीच झाली. एकाएकी घड्याळ काढून वेणू म्हणाला, 'आता पुरे; उशीर केला तर गाडी चुकेल.' हरलालच्या आई म्हणाल्या, 'बाळा, आजची रात्र इथेच राहा ना; उद्या सकाळी हरलालबरोबरच निघशील.' वेणू विनवणी करीत म्हणाला, 'नको आई, असा आग्रह करू नका; आज रात्री कसंही करून मला गेलंच पाहिजे.' हरलालला तो म्हणाला, 'मास्तर, या अंगठ्या-घड्याळ बागेत घेऊन जाणं सुरक्षित नाही. आपल्यापाशीच ठेवून जातो; परत आल्यावर घेऊन जाईन. आपल्या दरवानाला सांगा, माझ्या गाडीतून कातडी हँडबॅग आणून देऊ दे. तिच्यात हे सगळं ठेवून देतो.' ऑफिसच्या दरवानाने गाडीतून बॅग आणली. वेणूने आपली साखळी, घड्याळ, अंगठ्या, बटणे — सगळे काढून बॅगेत भरले. सावध हरलालने ती बॅग घेऊन तत्काळ आयर्न-सेफमध्ये ठेवली. वेणूने हरलालच्या आईच्या पायांची धूळ मस्तकी लावली. त्यांनी दाटल्या कंठाने आशीर्वाद दिला, 'जगदंबा माता तुझी आई होऊन तुझं रक्षण करो.'
मास्तर
त्यानंतर वेणूने हरलालच्या पायांना हात लावून नमस्कार केला. याआधी कधीही त्याने हरलालला असा नमस्कार केला नव्हता. हरलाल काहीही न बोलता त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याच्याबरोबर खाली उतरला. गाडीच्या कंदिलांत दिवे लागले; दोन्ही घोडे अधीर झाले. कलकत्त्याच्या गॅसच्या दिव्यांनी जडवलेल्या मध्यरात्रीत वेणूला घेऊन गाडी अदृश्य झाली. हरलाल आपल्या खोलीत येऊन बराच वेळ गप्प बसून राहिला. मग एक दीर्घ निःश्वास टाकून पैसे मोजत मोजत वाटणी करून एकेका थैलीत भरू लागला. नोटा आधीच मोजून, थैल्यांत बांधून लोखंडी तिजोरीत ठेवल्या गेल्या होत्या. ११ लोखंडी तिजोरीची किल्ली उशाखाली ठेवून त्या पैशांच्याच खोलीत हरलाल रात्री फार उशिरा झोपला. नीट झोप लागली नाही. स्वप्नात त्याने पाहिले — वेणूची आई पडद्याआडून त्याला मोठ्याने फैलावर घेत आहेत; शब्द काहीच स्पष्ट ऐकू येत नाहीत; फक्त त्या अस्पष्ट आवाजाबरोबर वेणूच्या आईच्या माणिक-पाचू-हिऱ्यांच्या दागिन्यांतून लाल, हिरव्या, शुभ्र किरणांच्या सुया काळा पडदा भेदून बाहेर येत झुलत आहेत. हरलाल जिवाच्या आकांताने वेणूला हाक मारायचा प्रयत्न करतो आहे, पण त्याच्या घशातून काही केल्या आवाज फुटत नाही. इतक्यात प्रचंड आवाज करीत काहीतरी तुटले आणि पडदा फाटून खाली कोसळला — दचकून डोळे उघडून हरलालने पाहिले, सगळीकडे ढिगाएवढा अंधार. वाऱ्याच्या एका झोताने खाडकन खिडकी ढकलून दिवा विझवला होता. हरलालचे सारे अंग घामाने भिजून गेले होते. त्याने घाईघाईने उठून काडेपेटीने दिवा लावला. घड्याळात पाहिले, चार वाजले होते. आता झोपायला वेळ नाही — पैसे घेऊन बाहेरगावी जाण्याची तयारी करायला हवी.
मास्तर
हरलाल तोंड धुऊन परत येत असताना आईंनी आपल्या खोलीतून विचारले, 'काय रे बाळा, उठलास?' सकाळी सर्वांत आधी आईचे मंगल मुख पाहावे म्हणून हरलाल त्यांच्या खोलीत गेला. आईंनी त्याचा नमस्कार स्वीकारून मनोमन त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाल्या, 'बाळा, मी आत्ताच स्वप्न पाहत होते, की तू जणू सून आणायला निघाला आहेस. पहाटेचं स्वप्न काय खोटं ठरेल!' हरलाल हसत आपल्या खोलीत आला. पैशांच्या आणि नोटांच्या थैल्या लोखंडी तिजोरीतून काढून पॅकिंगच्या पेटीत बंद करण्याची तयारी करू लागला. एकाएकी त्याच्या छातीत धस्स झाले — दोन-तीन नोटांच्या थैल्या रिकाम्या! वाटले, स्वप्न पाहतो आहोत. त्याने थैल्या तिजोरीवर जोराने आपटल्या — त्याने रिकाम्या थैल्यांचा रिकामेपणा खोटा ठरला नाही. तरीही व्यर्थ आशेने थैल्यांच्या गाठी सोडून त्याने त्या जोरजोराने झटकल्या; एका थैलीतून दोन पत्रे बाहेर पडली. वेणूचे हस्ताक्षर — एक पत्र त्याच्या वडिलांच्या नावे, आणि एक हरलालच्या. घाईघाईने उघडून वाचायला गेला. डोळ्यांना जणू दिसेना. वाटले, उजेडच पुरेसा नाही. तो सारखी वात मोठी करीत राहिला. जे वाची ते नीट कळेना; बंगाली भाषाच जणू विसरून गेला होता.
मास्तर
मजकूर असा होता की, वेणू तीन हजार रुपयांच्या दहा-दहा रुपयांच्या नोटा घेऊन विलायतेला निघाला आहे; आज पहाटेच जहाज सुटणार होते. हरलाल जेवायला गेला होता, त्या वेळी वेणूने हा प्रकार केला होता. त्याने लिहिले होते, 'बाबांना पत्र लिहिले आहे; ते माझे हे कर्ज फेडतील. शिवाय बॅग उघडून पाहा, तिच्यात आईचे जे दागिने आहेत, त्यांची किंमत नक्की किती ते मला ठाऊक नाही; बहुधा तीन हजार रुपयांहून जास्तच असेल. आई जिवंत असती, तर बाबांनी मला विलायतेला जायला पैसे दिले नसते तरी, याच दागिन्यांतून आईने मला खर्चाची सोय नक्कीच करून दिली असती. माझ्या आईचे दागिने बाबा दुसऱ्या कुणाला देणार, हे मला सहन होत नाही. म्हणून जसे जमले तसे मीच ते घेतले आहेत. बाबांनी पैसे द्यायला उशीर केला, तर आपण खुशाल हे दागिने विकून किंवा गहाण ठेवून पैसे घेऊ शकाल. ही माझ्या आईची वस्तू आहे — ही माझीच वस्तू आहे.' याशिवाय आणखी पुष्कळ मजकूर होता — त्यात कामाचे काहीच नव्हते. हरलाल खोलीला कुलूप लावून, घाईघाईने एक गाडी करून गंगेच्या घाटाकडे धावला. वेणू कोणत्या जहाजाने निघाला आहे, त्याचे नावही त्याला ठाऊक नव्हते. मेटियाबुरुजपर्यंत धाव घेतल्यावर हरलालला कळले की पहाटे दोन जहाजे रवाना झाली आहेत. दोन्ही इंग्लंडला जाणार. वेणू कोणत्या जहाजावर आहे, हेही त्याच्या अंदाजापलीकडचे होते, आणि ते जहाज गाठण्याचा काय उपाय, तेही त्याला सुचेना.
मास्तर
मेटियाबुरुजहून त्याच्या घराकडे गाडी परतली तेव्हा सकाळच्या उन्हात कलकत्ता शहर जागे झाले होते. हरलालच्या डोळ्यांना काहीच दिसत नव्हते. त्याचे सारे सुन्न झालेले अंतःकरण एका देहहीन, निर्दय प्रतिकूलतेला जणू सारखे जिवाच्या आकांताने ढकलत होते — पण कुठूनही तिला तसूभरही हलवू शकत नव्हते. ज्या घरात त्याची आई राहते, ज्या घरात पाऊल टाकताच आजवर कामाच्या जागचा सारा शीण आणि झगड्यांची वेदना क्षणार्धात दूर होत असे, त्या घरासमोर गाडी येऊन उभी राहिली — गाडीवानाचे भाडे चुकते करून अपार निराशा आणि भीती घेऊन तो त्या घरात शिरला. आई काळजीने व्हरांड्यात उभ्या होत्या. त्यांनी विचारले, 'बाळा, कुठे गेला होतास?' हरलाल एकदम म्हणाला, 'आई, तुझ्यासाठी सून आणायला गेलो होतो.' असे म्हणून कोरड्या घशाने हसता हसता तो तिथेच मूर्च्छित होऊन कोसळला. 'अगं बाई गं, काय झालं हे!' म्हणत आईंनी घाईघाईने पाणी आणून त्याच्या तोंडावर पाण्याचे शिपके मारायला सुरुवात केली. थोड्या वेळाने हरलाल डोळे उघडून, शून्य नजरेने चहूकडे पाहत उठून बसला. तो म्हणाला, 'आई, तुम्ही कुणी घाबरू नका. मला जरा एकटं राहू द्या.' असे म्हणून तो घाईघाईने खोलीत शिरला आणि आतून दार लावून घेतले. आई दाराबाहेर जमिनीवरच बसल्या — फाल्गुनाचे ऊन त्यांच्या सर्वांगावर पडले. बंद दारावर डोके टेकून त्या राहून राहून एवढीच हाक मारत राहिल्या, 'हरलाल, बाळा हरलाल.' हरलाल म्हणाला, 'आई, थोड्या वेळाने मी बाहेर येईन; आता तू जा.' आई उन्हातच तिथे बसून जप करू लागल्या. ऑफिसच्या दरवानाने येऊन दारावर थाप मारली आणि म्हणाला, 'बाबू, आत्ता निघालो नाही तर गाडी मिळणार नाही.' हरलाल आतून म्हणाला, 'आज सातच्या गाडीने जाणं होणार नाही.' दरवान म्हणाला, 'मग केव्हा जाणार?'
मास्तर
हरलाल म्हणाला, 'ते मी तुला नंतर सांगेन.' दरवान मान हलवून, हात उलटा करून खाली निघून गेला. हरलाल विचार करू लागला, 'हे सांगू तरी कुणाला? ही तर चोरी आहे! वेणूला काय तुरुंगात घालू?' एकाएकी त्याला त्या दागिन्यांची आठवण झाली. ती गोष्ट तो पार विसरूनच गेला होता. वाटले, जणू किनारा सापडला. बॅग उघडून पाहतो तो तिच्यात फक्त अंगठ्या, घड्याळ, बटणे, साखळी एवढेच नाही — ब्रेसलेट, चिंचपेटी, बिजवरा, मोत्यांच्या माळा असे आणखी पुष्कळ मौल्यवान दागिने आहेत. त्यांची किंमत तीन हजारांहून कितीतरी जास्त. पण हीदेखील चोरीच. हेदेखील वेणूचे नाही. ही बॅग जोवर त्याच्या घरात आहे, तोवर त्याला धोका. मग आणखी उशीर न करता अधरलालांचे ते पत्र आणि बॅग घेऊन हरलाल खोलीबाहेर पडला. आईंनी विचारले, 'कुठे निघालास, बाळा?' हरलाल म्हणाला, 'अधरबाबूंच्या घरी.' आईंच्या छातीवरून एकाएकी अनामिक भीतीचे एक मोठे ओझे उतरले. त्यांनी ठरवून टाकले — काल हरलालने ऐकले ना की वेणूच्या वडिलांचे लग्न आहे, ते ऐकल्यापासून लेकराच्या मनाला शांती नाही. अरेरे, किती जीव आहे त्याचा वेणूवर! आईंनी विचारले, 'मग आज तुझं बाहेरगावी जाणं होणार नाही?' हरलाल म्हणाला, 'नाही.' आणि तसाच घाईघाईने बाहेर पडला. अधरबाबूंच्या घरी पोहोचण्याआधीच दुरून ऐकू आले की सनई-चौघडा अल्हैया रागात करुण सुरात आलाप छेडतो आहे; पण दारात शिरताच हरलालने पाहिले की लग्नघरच्या उत्सवात जणू अस्वस्थतेचे एक लक्षण मिसळले आहे. दरवानांचा पहारा कडक; घरातून नोकरचाकर कुणालाही बाहेर पडता येत नाही — सगळ्यांच्याच चेहऱ्यांवर भीती आणि काळजी. हरलालला कळले, काल रात्री घरातून पुष्कळ किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. दोन-तीन नोकरांवर विशेष संशय घेऊन त्यांना पोलिसांच्या हवाली करण्याची तयारी चालली आहे.
मास्तर
हरलाल दुमजल्यावरच्या व्हरांड्यात गेला तेव्हा त्याने पाहिले, अधरबाबू संतापाने लालबुंद होऊन बसले आहेत आणि रतिकांत तंबाखू ओढतो आहे. हरलाल म्हणाला, 'आपल्याशी मला एकांतात जरा बोलायचं आहे.' अधरबाबू भडकून म्हणाले, 'तुमच्याशी एकांतात गप्पा मारायला ही माझी वेळ नाही — जे काय बोलायचं असेल ते इथेच बोलून टाका.' त्यांना वाटले, हरलाल या वेळी आपल्याकडे मदत किंवा कर्ज मागायला आला असेल. रतिकांत म्हणाला, 'माझ्यासमोर बाबूंना काही सांगायला आपल्याला लाज वाटत असेल, तर हवं तर मी उठतो.' अधर वैतागून म्हणाले, 'आः, बस ना.' हरलाल म्हणाला, 'काल रात्री वेणू ही बॅग माझ्या घरी ठेवून गेला.' अधर: बॅगेत काय आहे? हरलालने बॅग उघडून अधरबाबूंच्या हाती दिली. अधर: मास्तर आणि विद्यार्थ्याने मिळून चांगलाच धंदा उघडलाय की! तुम्हाला ठाऊक होतं, हा चोरीचा माल विकायला गेलात तर पकडले जाल, म्हणून आणून दिलात — वाटतंय, प्रामाणिकपणाबद्दल बक्षीस मिळेल? तेव्हा हरलालने अधरबाबूंच्या नावाचे पत्र त्यांच्या हाती दिले. ते वाचून ते संतापाने पेटून उठले. म्हणाले, 'मी पोलिसांत खबर देणार. माझा मुलगा अजून सज्ञान झालेला नाही — तुम्ही त्याला पळवून विलायतेला पाठवलंत. कदाचित पाचशे रुपये कर्ज देऊन तीन हजार लिहून घेतले असतील. हे कर्ज मी फेडणार नाही.' हरलाल म्हणाला, 'मी कर्ज दिलेलं नाही.' अधर म्हणाले, 'मग त्याला ते पैसे मिळाले कुठून? तुमची पेटी फोडून चोरले?' हरलालने त्या प्रश्नाला काहीच उत्तर दिले नाही. रतिकांत हळूच टोमणा मारीत म्हणाला, 'त्यांनाच विचारा ना — तीन हजार कशाला, पाचशे रुपये तरी त्यांनी कधी डोळ्यांनी पाहिले आहेत का?' काहीही असो, दागिन्यांच्या चोरीचा निकाल लागताच वेणूच्या विलायतेला पळून जाण्यावरून घरात एकच हलकल्लोळ उडाला. सगळ्या अपराधाचे ओझे आपल्या डोक्यावर घेऊन हरलाल घरातून बाहेर पडला.
मास्तर
रस्त्यावर आला तेव्हा त्याचे मन जणू बधिर झाले होते. भीती बाळगण्याची, विचार करण्याचीही ताकद तेव्हा उरली नव्हती. या प्रकरणाचा परिणाम काय होऊ शकतो, याचा विचार करायलाही मन तयार नव्हते. गल्लीत शिरल्यावर त्याने पाहिले, त्याच्या घरासमोर एक गाडी उभी आहे. तो दचकला. एकाएकी आशा वाटली, वेणू परत आला आहे. वेणूच, नक्की! आपले संकट पूर्णपणे निरुपाय होऊन टोकाला जाईल, हे त्याला कसल्याही प्रकारे खरे वाटेना. घाईघाईने गाडीजवळ येऊन पाहतो तो गाडीत त्यांच्या ऑफिसातला एक साहेब बसलेला. हरलालला पाहताच साहेब गाडीतून उतरला आणि त्याचा हात धरून घरात शिरला. त्याने विचारले, 'आज बाहेरगावी का नाही गेलात?' ऑफिसच्या दरवानाने संशय येऊन मोठ्या साहेबांना जाऊन कळवले होते — त्यांनी याला पाठवले होते. हरलाल म्हणाला, 'तीन हजार रुपयांच्या नोटा सापडत नाहीत.' साहेबाने विचारले, 'कुठे गेल्या?' 'ठाऊक नाही' एवढेही उत्तर हरलालला देता आले नाही; तो गप्प राहिला. साहेब म्हणाला, 'चला, पैसे कुठे आहेत ते पाहू.' हरलाल त्याला वरच्या खोलीत घेऊन गेला. साहेबाने सगळे पैसे मोजले, चहूकडे शोधाशोध केली. घरातली प्रत्येक खोली कसून तपासू लागला. हे सगळे पाहून आईंना राहवले नाही — त्या साहेबासमोरच बाहेर येऊन व्याकूळ होऊन विचारू लागल्या, 'अरे हरलाल, काय झालं रे?' हरलाल म्हणाला, 'आई, पैसे चोरीला गेले.' आई म्हणाल्या, 'चोरीला कसे जातील? हरलाल, असा सर्वनाश कुणी केला रे!' हरलाल म्हणाला, 'आई, गप्प बस.' शोध संपवून साहेबाने विचारले, 'या खोलीत रात्री कोण होतं?' हरलाल म्हणाला, 'दार लावून मी एकटाच झोपलो होतो — दुसरं कुणीही नव्हतं.' साहेबाने पैसे गाडीत ठेवले आणि हरलालला म्हणाला, 'ठीक आहे, मोठ्या साहेबांकडे चला.'
मास्तर
हरलालला साहेबाबरोबर जाताना पाहून आईने त्यांची वाट अडवली आणि म्हटले, 'साहेब, माझ्या मुलाला कुठे नेताय? मी उपाशी राहून हा मुलगा वाढवलाय — माझा मुलगा कधीच परक्याच्या पैशाला हात लावणार नाही.' साहेबाला बंगाली बोलणे काहीच कळले नाही; तो म्हणाला, 'अच्छा, अच्छा.' हरलाल म्हणाला, 'आई, तू कशाला घाबरतेस? मोठ्या साहेबांना भेटून मी आत्ता येतो.' आई काळजीने म्हणाल्या, 'अरे, सकाळपासून तू काहीच खाल्लं नाहीस.' त्या बोलण्याला काहीच उत्तर न देता हरलाल गाडीत बसून निघून गेला. आई जमिनीवर अंग टाकून तशाच पडून राहिल्या. मोठे साहेब हरलालला म्हणाले, 'खरं खरं सांगा, प्रकार काय आहे?' हरलाल म्हणाला, 'मी पैसे घेतलेले नाहीत.' मोठे साहेब: ते मला पूर्ण पटतं. पण पैसे कुणी घेतले, ते तुम्हाला नक्कीच ठाऊक आहे. हरलाल काहीही उत्तर न देता मान खाली घालून बसून राहिला. साहेब: तुमच्या कळत कुणी हे पैसे नेले आहेत? हरलाल म्हणाला, 'माझ्या जिवात जीव असेपर्यंत, माझ्या कळत हे पैसे कुणालाच नेता आले नसते.' मोठे साहेब म्हणाले, 'हे पाहा हरलाल, मी तुमच्यावर विश्वास ठेवून, कोणताही जामीन न घेता ही जबाबदारीची कामगिरी तुम्हाला दिली होती. ऑफिसातले सगळेच विरोधात होते. तीन हजार रुपये ही काही फार मोठी रक्कम नाही. पण तुम्ही मला फारच लाजेत टाकाल. आजचा सबंध दिवस मी तुम्हाला मुदत देतो — कसेही करून पैसे जमवून आणा — मग मी याविषयी एक शब्दही काढणार नाही; तुम्ही जसे काम करताय तसेच करत राहाल.' असे म्हणून साहेब उठून गेले. तेव्हा अकरा वाजून गेले होते. हरलाल मान खाली घालून बाहेर पडला तेव्हा ऑफिसातले बाबू फार खूश होऊन हरलालच्या पतनाची चर्चा करू लागले. हरलालला एक दिवसाची मुदत मिळाली. निराशेच्या तळाशी साचलेला गाळ ढवळून काढण्यासाठी आणखी एका दीर्घ दिवसाची मुदत वाढली.
मास्तर
उपाय काय, उपाय काय, उपाय काय — हाच विचार करीत करीत त्या उन्हात हरलाल रस्त्यांवरून फिरू लागला. शेवटी उपाय आहे की नाही, हा विचार थांबला; पण विनाकारण रस्त्यांवरून भटकणे थांबले नाही. जे कलकत्ता हजारो लोकांचे आश्रयस्थान, तेच एका क्षणात हरलालसाठी एक प्रचंड फासाचा सापळा होऊन बसले. त्यातून कोणत्याही बाजूने बाहेर पडायला कोणतीही वाट नाही. सारा जनसमाज या अतिक्षुद्र हरलालला चहूबाजूंनी अडवून उभा आहे. कुणी त्याला ओळखतही नाही, आणि कुणाच्याही मनात त्याच्याविषयी काही द्वेषही नाही, पण प्रत्येक माणूस त्याचा शत्रू. आणि तरीही रस्त्यावरची माणसे त्याला खेटून त्याच्या बाजूने चालली आहेत; ऑफिसातले बाबू बाहेर येऊन कागदी पुड्यांतून खाऊ खात आहेत, त्याच्याकडे कुणी पाहतही नाही; मैदानाच्या कडेला एक आळशी वाटसरू डोक्याखाली हात घेऊन, एका पायावर दुसरा पाय टाकून झाडाखाली पडून आहे; भाड्याच्या खटारा गाड्या भरभरून हिंदुस्थानी बायका कालीघाटाला निघाल्या आहेत; एका चपराशाने एक पत्र हरलालसमोर धरून म्हटले, 'बाबू, जरा पत्ता वाचून द्या' — जणू त्याच्यात आणि इतर वाटसरूंत काहीच फरक नाही; त्यानेही पत्ता वाचून त्याला समजावून दिला. हळूहळू ऑफिसे सुटण्याची वेळ झाली. घराकडे निघालेल्या गाड्या ऑफिसांच्या वस्तीतल्या नाना रस्त्यांतून धावत बाहेर पडू लागल्या. ऑफिसातले बाबू ट्राम भरून, नाटकांच्या जाहिराती वाचत वाचत आपापल्या बिऱ्हाडी परतू लागले. आजपासून हरलालला ऑफिस नाही, ऑफिस सुटण्याची वेळ नाही, घरी परतण्यासाठी ट्राम पकडण्याची घाई नाही. शहरातली सारी कामे, घरेदारे, गाड्याघोडे, येणे-जाणे हरलालला कधी अत्यंत भयंकर सत्यासारखे दात विचकून अंगावर येत होते, तर कधी अगदी वस्तुहीन स्वप्नासारखे केवळ छाया होऊन जात होते.
मास्तर
अन्न नाही, विश्रांती नाही, आसरा नाही — हरलालचा दिवस कसा सरला, ते त्याला कळलेही नाही. रस्त्यारस्त्यांवर गॅसचे दिवे लागले — जणू एक सावध अंधार दिशादिशांतून आपले हजारो क्रूर डोळे उघडून, सावजासाठी टपलेल्या राक्षसासारखा दबा धरून बसला. रात्र किती झाली, याचा हरलालने विचारही केला नाही. त्याच्या कपाळाच्या शिरा ठणठणत होत्या; डोके जणू फुटत होते; सर्वांगात आग पेटली होती; पाय आता चालत नव्हते. दिवसभर आळीपाळीने वेदनेच्या उद्रेकात आणि थकव्याच्या बधिरतेत आईचीच आठवण सारखी मनात येत-जात राहिली होती — कलकत्त्याच्या असंख्य जनसमुदायांतून फक्त ते एकच नाव कोरड्या घशाला भेदून ओठांवर आले होते — आई, आई, आई. दुसऱ्या कुणाला हाक मारावी, असे कुणीच नव्हते. त्याने ठरवले, रात्र गडद होईल, या अतिसामान्य हरलालचा विनाअपराध अपमान करण्यासाठी एकही माणूस जागा राहणार नाही, तेव्हा तो गुपचूप आपल्या आईच्या कुशीत जाऊन झोपेल — आणि मग ती झोप पुन्हा कधी मोडूच नये! आईसमोर पोलिसांची माणसे किंवा आणखी कुणी आपला अपमान करायला येईल, या भीतीने तो घरी जाऊ शकत नव्हता. शरीराचे ओझे आता वाहवेना, अशा वेळी हरलालने एक भाड्याची गाडी पाहून तिला हाक मारली. गाडीवानाने विचारले, 'कुठे जाणार?' हरलाल म्हणाला, 'कुठेच नाही. या मैदानाच्या रस्त्यांवरून जरा वेळ हवा खात फिरेन.' गाडीवान संशयाने निघून जाऊ लागला तेव्हा हरलालने त्याच्या हातावर एक रुपया आगाऊ भाडे ठेवले. मग ती गाडी हरलालला घेऊन मैदानाच्या रस्त्यांवरून गोल गोल फिरू लागली. तेव्हा थकलेल्या हरलालने आपले तापलेले डोके उघड्या खिडकीवर टेकवून डोळे मिटले. हळूहळू त्याची सारी वेदना जणू दूर होत गेली. शरीर शीतल झाले. मनात एक अतिशय गहिरी, अतिशय घनदाट, आनंदाने भरलेली शांती दाटून येऊ लागली. जणू एका परम सुटकेने त्याला चहूबाजूंनी कवेत घेतले.
मास्तर
दिवसभर त्याला वाटत होते की, कुठेही त्याला वाट नाही, आधार नाही, सुटका नाही, त्याच्या अपमानाला अंत नाही, दुःखाला सीमा नाही — ती गोष्ट जणू एका क्षणात खोटी ठरली. आता वाटले, ते तर केवळ एक भय होते; ते काही सत्य नव्हते. ज्याने त्याच्या जीवनाला लोखंडी मुठीत आवळून चिरडून धरले होते, त्याला हरलालने आता तिळमात्रही जुमानले नाही — मुक्ती अनंत आकाश व्यापून राहिली आहे, शांतीला कुठेही सीमा नाही. या अतिसामान्य हरलालला वेदनेत, अपमानात, अन्यायात कैद करून ठेवू शकेल, अशी शक्ती विश्वब्रह्मांडातल्या कोणत्याही राजा-महाराजाकडेही नाही. ज्या दहशतीने त्याने स्वतःच स्वतःला बांधून घेतले होते, ती सारी बंधने सुटून गेली. तेव्हा हरलालला आपल्या बंधमुक्त हृदयाच्या चहूबाजूंना, अनंत आकाशात जाणवू लागले की, जणू त्याची ती गरीब आई पाहता पाहता वाढत वाढत विराट रूपाने सारा अंधार व्यापून बसत आहेत. त्यांना कुठेही मावत नाही. कलकत्त्याचे रस्ते-घाट, घरेदारे, दुकाने-बाजार हळूहळू त्यांच्यात झाकले जाऊन लुप्त होत आहेत — वारा भरून गेला, आकाश भरून आले, एकेक करून नक्षत्रे त्यांच्यात विरून गेली — हरलालच्या शरीरमनाच्या साऱ्या वेदना, साऱ्या चिंता, सारी चेतना त्यांच्यात थोडी थोडी करून निःशेष होऊन गेली — तो पाहा, गेला — तप्त वाफेचा बुडबुडा एकदम फुटून गेला — आता अंधारही नाही, उजेडही नाही; उरली ती केवळ एक प्रगाढ परिपूर्णता. चर्चच्या घड्याळात एकचा ठोका पडला. गाडीवान अंधाऱ्या मैदानात गाडी फिरवता फिरवता शेवटी वैतागून म्हणाला, 'बाबू, घोडे आता चालू शकत नाहीत — कुठे जायचं ते सांगा.' काहीच उत्तर आले नाही. कोचबॉक्सवरून उतरून हरलालला हलवून त्याने पुन्हा विचारले. उत्तर नाही. तेव्हा घाबरून गाडीवानाने तपासून पाहिले — हरलालचे शरीर ताठ झाले होते; त्याचा श्वास चालत नव्हता. 'कुठे जायचं' — या प्रश्नाचे उत्तर हरलालकडून पुन्हा मिळाले नाही.