रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
मध्यरात्री
'डॉक्टर! डॉक्टर!' झाली कटकट! ऐन मध्यरात्री— डोळे उघडून पाहतो तो आमचे जमीनदार दक्षिणाचरणबाबू. मी धडपडत उठलो, पाठ मोडलेली खुर्ची ओढून आणून त्यांना बसायला दिली आणि काळजीने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो. घड्याळात पाहिले तर रात्रीचे अडीच वाजले होते. दक्षिणाचरणबाबू फिक्या पडलेल्या चेहऱ्याने, डोळे विस्फारून म्हणाले, 'आज रात्री पुन्हा तसाच उपद्रव सुरू झाला आहे,— तुमचं औषध काहीच कामी आलं नाही.' मी जरा संकोचाने म्हणालो, 'आपण बहुधा दारूचं प्रमाण पुन्हा वाढवलं असावं.' दक्षिणाबाबू अतिशय चिडून म्हणाले,—'हा तुमचा मोठा भ्रम आहे. दारू नव्हे;—सगळी हकीकत आदीपासून अंतापर्यंत ऐकल्याशिवाय खरं कारण तुम्हाला ताडता येणार नाही.' कोनाड्यात पत्र्याच्या एका लहानशा डबीत रॉकेल मंदपणे जळत होते; मी वात जरा वर केली. थोडासा उजेड जागा झाला आणि बराचसा धूर निघू लागला. धोतराचा सोगा अंगावर ओढून घेऊन मी वर्तमानपत्र अंथरलेल्या एका पॅकिंगच्या पेटीवर बसलो. दक्षिणाबाबू सांगू लागले.— माझ्या पहिल्या पत्नीसारखी गृहिणी फार विरळा. पण तेव्हा माझे वय फारसे नव्हते; स्वभावातच रसिकता जरा अधिक, त्यात काव्यशास्त्राचा चांगला अभ्यास केलेला, त्यामुळे निव्वळ गृहिणीपणावर माझे मन भरत नसे. कालिदासाचा तो श्लोक वारंवार मनात येई,— गृहिणी सचिवः सखी मिथः प्रियशिष्या ललिते कलाविधौ। पण ललित कलांचा कोणताही उपदेश माझ्या गृहिणीपुढे चालत नसे, आणि सखीच्या नात्याने प्रणयाचे बोलणे करायला गेलो की त्या हसून ते उडवून लावत. गंगेच्या प्रवाहात जशी इंद्राच्या ऐरावताची फजिती झाली होती, तसेच त्यांच्या हास्याच्या लोंढ्यापुढे मोठमोठ्या काव्यांचे तुकडे आणि उत्तमोत्तम लाडिक संबोधने क्षणार्धात फजीत होऊन वाहून जात. हसण्याचे विलक्षण सामर्थ्य होते त्यांच्यात.
मध्यरात्री
त्यानंतर, आता सुमारे चार वर्षांपूर्वी, मला एका जीवघेण्या रोगाने गाठले. ओठावर फोड उठला, ज्वर चढून वात झाला, आणि मी मरणाच्या दारात पोहोचलो. जगण्याची आशा उरली नव्हती. एके दिवशी अशी वेळ आली की डॉक्टरही हात टेकून निघून गेले. अशा वेळी माझ्या एका नातलगाने कुठूनसा एक ब्रह्मचारी आणून उभा केला;—त्याने गाईच्या तुपात कसलेसे एक मूळ उगाळून मला चाटवले. औषधाच्या गुणाने म्हणा की नशिबाने म्हणा, त्या खेपेला मी वाचलो. आजारपणात माझ्या पत्नीने रात्रंदिवस क्षणभराचीही विश्रांती घेतली नाही. त्या दिवसांत एका अबला स्त्रीने, माणसाचे तुटपुंजे बळ घेऊन, जिवाच्या आकांताने, दाराशी येऊन ठेपलेल्या यमदूतांशी अखंड झुंज दिली. आपले सारे प्रेम, सारे हृदय, सारी काळजी पणाला लावून त्यांनी माझा हा नालायक जीव, छातीशी धरलेल्या तान्ह्या बाळासारखा, दोन्ही हातांनी झेप घालून झाकून ठेवला होता. ना अन्न होते, ना झोप; जगातल्या दुसऱ्या कशाकडेही त्यांचे लक्ष नव्हते. तेव्हा यम, पराभूत वाघासारखा, मला आपल्या जबड्यातून टाकून निघून गेला; पण जाता जाता माझ्या पत्नीला एक जबरदस्त पंजा मारून गेला. माझी पत्नी तेव्हा गर्भवती होती; थोड्याच दिवसांनी त्यांना मृत मूल झाले. तेव्हापासून त्यांच्या नाना प्रकारच्या गुंतागुंतीच्या व्याधींना सुरुवात झाली. आता मी त्यांची सेवा करू लागलो. त्याने त्या संकोचून जात. म्हणत, 'अहो, हे काय करताय! लोक काय म्हणतील! असं रात्रंदिवस माझ्या खोलीत येणं-जाणं करू नका!'
मध्यरात्री
रात्री त्यांना ताप चढलेला असताना, जणू मी स्वतःलाच वारा घेतो आहे असे भासवून पंख्याने त्यांना वारा घालायला गेलो, तर मोठीच ओढाताण सुरू होई; एखाद्या दिवशी त्यांच्या शुश्रूषेपायी माझी जेवणाची नेहमीची वेळ दहा मिनिटांनी टळली, तर तेही नाना प्रकारच्या विनवण्या, आग्रह आणि तक्रारींचे कारण होऊन बसे. जरा काही सेवा करायला जावे तो उलटेच होई. त्या म्हणत, 'पुरुषमाणसानं एवढं अति करू नये.' आमचे ते बरानगरचे घर तुम्ही बहुधा पाहिले असेल. घरासमोरच बाग, आणि बागेसमोरून गंगा वाहते. आमच्या झोपायच्या खोलीच्या खालीच, दक्षिणेच्या बाजूला, थोडीशी जमीन मेंदीच्या कुंपणाने घेरून माझ्या पत्नीने आपल्या मनासारखी एक छोटीशी बाग केली होती. साऱ्या बागेत तो तुकडाच अगदी साधासुधा आणि निव्वळ देशी. म्हणजे, तिथे सुगंधापेक्षा रंगांचा थाट, फुलांपेक्षा पानांचे वैचित्र्य असे काही नव्हते—आणि कुंड्यांतल्या क्षुल्लक रोपट्यांच्या शेजारी काडीला टेकून कागदावरच्या लॅटिन नावांचे विजयध्वज फडकत नसत. मोगरा, जुई, गुलाब, गंधराज, कण्हेर आणि निशिगंध यांचाच भरणा जरा जास्त. एका प्रचंड बकुळीच्या झाडाचा तळ पांढऱ्या संगमरवराने बांधून काढलेला होता. बऱ्या असताना त्या स्वतः उभ्या राहून दोन्ही वेळा तो धुवून स्वच्छ करवून घेत. उन्हाळ्यात कामातून सवड मिळाली की संध्याकाळी तीच त्यांची बसायची जागा. तिथून गंगा दिसे, पण गंगेतून, कोठीच्या नावेतून जाणाऱ्या बाबू लोकांना त्या दिसत नसत. पुष्कळ दिवस अंथरुणाला खिळून राहिल्यावर, चैत्राच्या शुक्लपक्षातल्या एका संध्याकाळी त्या म्हणाल्या, 'खोलीत कोंडून राहून जीव कसासाच होतोय; आज एकदा माझ्या त्या बागेत जाऊन बसेन.'
मध्यरात्री
मी त्यांना मोठ्या काळजीने धरून हळूहळू त्या बकुळीखालच्या दगडी चौथऱ्यावर नेले आणि झोपवले. त्यांचे डोके माझ्याच मांडीवर घेता आले असते, पण त्यांना ते विचित्र वागणे वाटेल हे मी जाणून होतो. म्हणून एक उशी आणून त्यांच्या डोक्याखाली ठेवली. एकेक, दोन-दोन करत उमललेली बकुळीची फुले गळू लागली, आणि फांद्यांच्या फटींतून सावल्यांची नक्षी उमटलेले चांदणे त्यांच्या कृश चेहऱ्यावर येऊन पडले. भोवताली सारे शांत, निःस्तब्ध; त्या दाट सुगंधाने भरलेल्या छायांधारात एका बाजूला मुकाट बसून त्यांच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता माझ्या डोळ्यांत पाणी आले. मी हळूच जवळ सरकलो आणि त्यांचा एक तापलेला, कृश हात दोन्ही हातांत उचलून घेतला. त्यांनी त्याला काही हरकत घेतली नाही. काही वेळ असे गप्प बसल्यावर माझे हृदय कसेसेच उचंबळून आले, आणि मी बोलून गेलो—'तुझं प्रेम मी कधीही विसरणार नाही!' त्याच क्षणी उमगले, हे बोलण्याची काहीच गरज नव्हती. माझी पत्नी हसू लागली. त्या हसण्यात लाज होती, सुख होते आणि थोडासा अविश्वासही होता—आणि त्यात बऱ्याच प्रमाणात थट्टेची धारही होती. विरोधादाखल एक शब्दही न बोलता, केवळ त्या हसण्याने त्यांनी सांगितले, की कधीही विसरणार नाही, हे कधीच शक्य नाही, आणि माझी तशी अपेक्षाही नाही. त्या गोड, धारदार हसण्याच्या भीतीनेच मी पत्नीशी कधी रीतसर प्रेमालाप करायचे धाडस केले नाही. त्या समोर नसताना जे जे मनात येई, ते त्यांच्यापुढे गेलो की अगदीच फालतू वाटे. छापील अक्षरांत वाचताना ज्या शब्दांनी डोळ्यांतून घळघळ धारा वाहू लागतात, तेच तोंडाने बोलायला गेले की हसू का येते, हे मला आजतागायत कळलेले नाही.
मध्यरात्री
शब्दाला शब्दाने उत्तर देता येते, पण हसण्यापुढे वाद चालत नाही; त्यामुळे गप्प बसावे लागले. चांदणे अधिकच उजळले; एक कोकिळ सारखा कुहू कुहू करून बेजार झाला. मी बसल्या बसल्या विचार करू लागलो, अशा चांदण्या रात्रीसुद्धा कोकिळवधू बहिरी होऊन बसली आहे की काय? पुष्कळ उपचार करूनही पत्नीचा आजार उतरण्याचे कोणतेच लक्षण दिसेना. डॉक्टरने सांगितले, एकदा हवापालट करून पाहिला तर बरे. मी पत्नीला घेऊन अलाहाबादला गेलो. इथे दक्षिणाबाबू एकाएकी थबकून गप्प झाले. संशयाने त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिले, मग दोन्ही हातांत डोके धरून विचार करत बसले. मीही गप्प राहिलो. कोनाड्यात रॉकेल मिणमिणत जळत राहिले, आणि निःस्तब्ध खोलीत डासांची भुणभुण स्पष्ट ऐकू येऊ लागली. अचानक मौन मोडून दक्षिणाबाबू पुन्हा सांगू लागले. तिथे हारान डॉक्टर माझ्या पत्नीवर उपचार करू लागले. शेवटी बराच काळ एकाच स्थितीत गेल्यावर डॉक्टरही म्हणाले, मलाही उमगले आणि माझ्या पत्नीलाही उमगले, की त्यांचा आजार बरा होणारा नाही. त्यांना आयुष्यभर आजारीच राहावे लागणार. तेव्हा, एके दिवशी माझ्या पत्नीने मला म्हटले, 'आजारही बरा होणार नाही आणि मी लवकर मरेन अशी आशाही नाही, तर मग हे जिवंतपणीचं मढं घेऊन तुम्ही आणखी किती दिवस काढणार? तुम्ही दुसरं लग्न करा.' जणू ही केवळ एक शहाणपणाची, विचारपूर्वक केलेली सूचना होती; यात फार मोठा थोरपणा, शौर्य किंवा असामान्य असे काही आहे, असा भाव त्यांच्या ठायी लवमात्रही नव्हता. आता हसण्याची पाळी माझी होती. पण तसे हसण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे का? कादंबरीच्या नायकासारखा गंभीर, उदात्त सुरात मी म्हणू लागलो—'जोवर या देहात प्राण आहे—' त्यांनी मध्येच अडवून म्हटले—'पुरे! पुरे! आणखी काही बोलायला नको. तुमचं बोलणं ऐकूनच माझा जीव जायचा!'
मध्यरात्री
मी हार न मानता म्हणालो—'या जन्मात मी दुसऱ्या कुणावरही प्रेम करू शकणार नाही!' ते ऐकून माझी पत्नी खळखळून हसली. मग मला थांबावेच लागले. ठाऊक नाही, तेव्हा मी स्वतःशी तरी हे कधी स्पष्टपणे कबूल केले होते की नाही; पण आता कळते आहे, बरे होण्याची आशाच नसलेल्या या शुश्रूषेने मी मनातून थकून गेलो होतो. हे काम अर्ध्यावर सोडून द्यावे, अशी कल्पनाही माझ्या मनाला शिवली नव्हती; आणि तरीही, आयुष्यभर या कायमच्या रोग्याला घेऊन दिवस काढायचे, ही कल्पनाही मला जाचू लागली होती. हाय! तारुण्याच्या पहिल्या बहरात जेव्हा पुढे पाहिले होते, तेव्हा प्रेमाच्या मोहिनीत, सुखाच्या आश्वासनात, सौंदर्याच्या मृगजळात सारे भावी आयुष्य प्रफुल्ल दिसत होते. आजपासून अखेरपर्यंत केवळ आशाहीन, दीर्घ, तहानलेले वाळवंट. माझ्या सेवेतला तो आतला थकवा त्यांनी नक्कीच पाहिला होता! तेव्हा ठाऊक नव्हते, पण आता तिळमात्र शंका नाही, की जोडाक्षरे नसलेल्या पहिल्या बालपोथीसारखा त्या मला अगदी सहज वाचत होत्या. म्हणूनच, जेव्हा मी कादंबरीचा नायक बनून गंभीरपणे त्यांच्यापुढे कवित्व पाजळायला जाई, तेव्हा त्या इतक्या गहिऱ्या ममतेने आणि तरीही आवरता न येणाऱ्या मिश्कीलपणाने हसत. माझ्या स्वतःलाही न कळलेल्या अंतरीच्या गोष्टीसुद्धा त्या अंतर्यामीसारख्या सगळ्या जाणत होत्या, हे आठवले की आजही लाजेने मरून जावेसे वाटते. हारान डॉक्टर आमच्याच जातीचे. त्यांच्या घरी मला बरेचदा आमंत्रण असे. काही दिवस येणे-जाणे झाल्यावर डॉक्टरांनी आपल्या मुलीशी माझी ओळख करून दिली. मुलगी अविवाहित होती—तिचे वय पंधराएक असेल. डॉक्टर म्हणत, मनासारखा वर मिळाला नाही म्हणून त्यांनी तिचे लग्न केले नाही. पण बाहेरच्या लोकांकडून कुजबूज कानी येई, की मुलीच्या कुळात दोष होता.
मध्यरात्री
पण दुसरा कोणताही दोष नव्हता. जशी रूपवती तशीच सुशिक्षित. म्हणूनच अधूनमधून एखाद्या दिवशी तिच्याशी नाना विषयांवर चर्चा करता करता मला घरी परतायला रात्र होई, पत्नीला औषध द्यायची वेळ टळून जाई. मी हारान डॉक्टरांच्या घरी गेलो आहे हे त्यांना ठाऊक असे, पण उशिराचे कारण त्यांनी एकदासुद्धा मला विचारले नाही. वाळवंटात पुन्हा एकदा मृगजळ दिसू लागले. तहान छातीपर्यंत आलेली असताना डोळ्यांसमोर काठोकाठ भरलेले निर्मळ पाणी लहरत, हेलकावत राहिले. तेव्हा जिवाच्या आकांताने ओढूनही मनाला मागे वळवता आले नाही. रोग्याची खोली मला दुप्पट उदास वाटू लागली. आता शुश्रूषेचे आणि औषध देण्याचे नियम वरचेवर मोडू लागले. हारान डॉक्टर मला मधूनमधून म्हणत, ज्यांचा रोग बरा होण्याची काहीच शक्यता नाही, त्यांच्यासाठी मरणच बरे. कारण जगून त्यांना स्वतःलाही सुख नाही, आणि इतरांनाही त्रास. सर्वसाधारणपणे असे बोलण्यात काही दोष नाही, तरीही माझ्या पत्नीला उद्देशून असा विषय काढणे त्यांना उचित नव्हते. पण माणसाच्या जगण्या-मरण्याविषयी डॉक्टरांचे मन इतके बधिर झालेले असते, की आमच्या मनाची अवस्था त्यांना नेमकी उमगत नाही. एके दिवशी अचानक शेजारच्या खोलीतून ऐकले, माझी पत्नी हारानबाबूंना म्हणत होती, 'डॉक्टर, खोटी-नाटी औषधं गिळायला लावून दवाखान्याचं देणं कशाला वाढवताय? माझा जीवच जिथे एक रोग होऊन बसलाय, तिथे असं एखादं औषध द्या की हा जीव लवकर जाईल.' डॉक्टर म्हणाले, 'छे, असं बोलू नका.' ते ऐकून एकदम माझ्या काळजाला मोठा धक्का बसला. डॉक्टर गेल्यावर मी पत्नीच्या खोलीत जाऊन त्यांच्या अंथरुणाच्या कडेला बसलो, आणि त्यांच्या कपाळावरून हळूहळू हात फिरवू लागलो. त्या म्हणाल्या, 'ही खोली फार गरम आहे—तुम्ही बाहेर जा. तुमची फिरायला जायची वेळ झाली. थोडं फिरून आला नाहीत, तर रात्री पुन्हा तुम्हाला भूक लागणार नाही.'
मध्यरात्री
फिरायला जाणे म्हणजे डॉक्टरांच्या घरी जाणे. भूक लागण्यासाठी थोडे फिरून येणे फार आवश्यक आहे, असे मीच त्यांना समजावले होते. आता खात्रीने सांगू शकतो, माझी ही छोटीशी फसवणूक त्या रोजच ओळखत होत्या. मी मूर्ख, मला वाटे त्या मूर्ख आहेत. असे म्हणून दक्षिणाबाबू बराच वेळ तळहातांवर डोके टेकून गप्प बसून राहिले. शेवटी म्हणाले, 'मला एक ग्लासभर पाणी आणून द्या.' पाणी पिऊन ते पुढे सांगू लागले;— एके दिवशी डॉक्टरबाबूंची मुलगी मनोरमा यांनी माझ्या पत्नीला भेटायला यायची इच्छा व्यक्त केली. का कोण जाणे, त्यांचा तो प्रस्ताव मला रुचला नाही. पण विरोध करायला काही कारणही नव्हते. एके दिवशी संध्याकाळी त्या आमच्या बिऱ्हाडी येऊन पोहोचल्या. त्या दिवशी माझ्या पत्नीच्या वेदना नेहमीपेक्षा जरा वाढल्या होत्या. ज्या दिवशी त्यांचे दुखणे वाढे, त्या दिवशी त्या अगदी स्थिर, निःशब्द पडून राहत; फक्त मधूनमधून मुठी आवळल्या जात आणि चेहरा निळा पडत असे, त्यावरूनच त्यांची यातना कळे. खोलीत कसलीच चाहूल नव्हती; मी अंथरुणाच्या कडेला मुकाट बसलो होतो—त्या दिवशी मला फिरायला जा म्हणून सांगण्याचे त्राणही त्यांच्यात नव्हते, किंवा कदाचित फार यातना होत असताना मी जवळ असावे, अशी इच्छा त्यांच्या मनात होती. डोळ्यांना उजेड लागेल म्हणून रॉकेलचा दिवा दाराजवळ ठेवला होता. खोली अंधारी आणि निःस्तब्ध. फक्त मधूनच यातना जराशी कमी झाली, की माझ्या पत्नीचा खोल, दीर्घ निःश्वास ऐकू येई. इतक्यात मनोरमा खोलीच्या दारात येऊन उभ्या राहिल्या. उलट बाजूने रॉकेलच्या दिव्याचा उजेड त्यांच्या चेहऱ्यावर पडला. उजेड-अंधाराने डोळे दिपून काही वेळ त्यांना खोलीतले काहीच दिसेना, आणि त्या दाराजवळ उभ्या राहून घुटमळू लागल्या.
मध्यरात्री
माझ्या पत्नीने दचकून माझा हात धरला आणि विचारले—'कोण ते?'—त्या अशक्त अवस्थेत अचानक अनोळखी माणूस पाहून घाबरून त्यांनी दोन-तीनदा अस्फुट स्वरात मला विचारले, 'कोण ते? कोण हो ते?' कशी दुर्बुद्धी सुचली कोण जाणे, मी आधी बोलून गेलो, 'मी ओळखत नाही!' बोलताक्षणीच कुणीतरी माझ्यावर चाबूक ओढल्यासारखे झाले. पुढच्याच क्षणी म्हणालो—'ओः, आपल्या डॉक्टरबाबूंची मुलगी!' पत्नीने एकदा माझ्या चेहऱ्याकडे पाहिले;—मला त्यांच्या चेहऱ्याकडे पाहवले नाही. पुढच्याच क्षणी त्यांनी क्षीण आवाजात पाहुणीला म्हटले, 'या, आत या.'—मला म्हणाल्या, 'दिवा उचलून धरा.' मनोरमा खोलीत येऊन बसल्या. रोगिणीशी त्यांचे थोडेफार बोलणे सुरू झाले. इतक्यात डॉक्टरबाबू येऊन पोहोचले. त्यांनी आपल्या दवाखान्यातून औषधाच्या दोन कुप्या बरोबर आणल्या होत्या. त्या दोन्ही कुप्या काढून ते माझ्या पत्नीला म्हणाले—'ही निळी कुपी चोळायची, आणि ही प्यायची. बघा हं, दोन्हींची गल्लत करू नका; हे औषध जहाल विष आहे.' मलाही एकदा सावध करून त्यांनी दोन्ही औषधे बिछान्याशेजारच्या टेबलावर ठेवली. निघताना डॉक्टरांनी आपल्या मुलीला हाक मारली. मनोरमा म्हणाल्या—'बाबा, मी इथेच राहिले तर? बरोबर कुणी बाईमाणूस नाही, यांची सेवा कोण करणार?' माझ्या पत्नीने घाईघाईने म्हटले, 'नको, नको, आपण उगाच त्रास घेऊ नका. जुनी मोलकरीण आहे, ती आईसारखी माझी काळजी घेते.' डॉक्टर हसून म्हणाले—'त्या साक्षात लक्ष्मी आहेत; जन्मभर दुसऱ्यांची सेवा करत आल्या, दुसऱ्याने केलेली सेवा त्यांना सोसवत नाही.'
मध्यरात्री
मुलीला घेऊन डॉक्टर निघायच्या तयारीत होते, इतक्यात माझ्या पत्नीने म्हटले, 'डॉक्टरबाबू, हे बंद खोलीत बराच वेळ बसून आहेत; आपण यांना जरा बाहेर फिरवून आणाल का?' डॉक्टरबाबू मला म्हणाले, 'चला ना, तुम्हाला जरा नदीकाठाने फिरवून आणतो.' मी जरासे आढेवेढे घेतल्यासारखे दाखवले आणि लगेचच कबूल झालो. जाताना डॉक्टरबाबूंनी दोन्ही कुप्यांविषयी माझ्या पत्नीला पुन्हा सावध केले. त्या दिवशी डॉक्टरांच्या घरीच जेवलो. परत यायला रात्र झाली. येऊन पाहतो तो पत्नी तळमळत आहेत. पश्चात्तापाने विद्ध होऊन मी विचारले, 'तुझं दुखणं वाढलं का?' त्यांना उत्तर देता आले नाही; त्यांनी नुसते माझ्या चेहऱ्याकडे पाहिले. तोवर त्यांचा कंठ रुद्ध झाला होता. मी तत्क्षणी त्याच रात्री डॉक्टरांना बोलावून आणले. आल्यावर पहिल्यांदा बराच वेळ डॉक्टरांना काहीच उमगले नाही. शेवटी त्यांनी विचारले, 'ते दुखणं वाढलं आहे का? ते औषध एकदा चोळून पाहिलं तर?' असे म्हणून त्यांनी टेबलावरून कुपी उचलून पाहिली, तो ती रिकामी. त्यांनी माझ्या पत्नीला विचारले, 'आपण चुकून हे औषध प्यायलात का?'—माझ्या पत्नीने मान हलवून मुकेपणाने सांगितले—हो. डॉक्टर तत्क्षणी गाडी करून आपल्या घरून पंप आणायला धावले. मी अर्धवट बेशुद्धासारखा पत्नीच्या बिछान्यावर जाऊन कोसळलो. तेव्हा, आई आपल्या आजारी बाळाची जशी समजूत घालते, तसे त्यांनी माझे डोके आपल्या छातीशी ओढून घेतले, आणि दोन्ही हातांच्या स्पर्शाने आपल्या मनातले मला समजावण्याचा प्रयत्न केला. केवळ त्या करुण स्पर्शानेच त्या मला पुन्हा पुन्हा सांगत राहिल्या—शोक करू नका, बरंच झालं—तुम्ही सुखी व्हाल, आणि हेच मनात आणून मी सुखाने मरते.
मध्यरात्री
डॉक्टर परतले, तेव्हा प्राणांबरोबरच माझ्या पत्नीच्या साऱ्या यातनांचा अंत झाला होता. —दक्षिणाचरणांनी आणखी एकदा पाणी प्यायले आणि म्हणाले, 'उः, फार उकडतंय!' असे म्हणून ते घाईघाईने बाहेर गेले, व्हरांड्यात चार-पाच येरझारा घालून परत येऊन बसले. स्पष्ट दिसत होते, की त्यांना सांगायचे नव्हते, पण मीच जणू जादू करून त्यांच्याकडून शब्द हिसकावून घेत होतो. ते पुन्हा सांगू लागले— मनोरमेशी लग्न करून मी गावी परतलो. मनोरमेने तिच्या वडिलांच्या संमतीने माझ्याशी लग्न केले. पण मी जेव्हा तिच्याशी लाडिक बोलत असे, प्रेमालाप करून तिचे हृदय जिंकायचा प्रयत्न करत असे, तेव्हा ती हसत नसे, गंभीरच राहत असे. तिच्या मनात कुठे, कोणत्या कोपऱ्यात काय खुपत होते, हे मला कसे कळावे? याच काळात माझे दारूचे व्यसन फार वाढले. एकदा, शरदाच्या आरंभीच्या एका संध्याकाळी, मनोरमेला घेऊन मी आमच्या बरानगरच्या बागेत फिरत होतो. अंगावर काटा आणणारा अंधार दाटत आला होता. घरट्यांत पक्ष्यांच्या पंख फडफडण्याचाही आवाज नव्हता. फक्त फिरायच्या वाटेच्या दोन्ही कडांना दाट सावलीत बुडालेली सुरूची झाडे वाऱ्याने सळसळत थरथरत होती. थकवा जाणवताच मनोरमा त्या बकुळीखालच्या शुभ्र दगडी चौथऱ्यावर येऊन आपल्या दोन्ही हातांवर डोके टेकून पडली. मीही जवळ येऊन बसलो. तिथे अंधार आणखीच दाट होता,—जेवढे आकाश दिसत होते ते अगदी ताऱ्यांनी भरून गेले होते; झाडांखालची रातकिड्यांची किरकिर जणू अनंत आकाशाच्या वक्षातून ओघळलेल्या निःशब्दतेच्या खालच्या टोकाला आवाजाची एक बारीक किनार विणत होती.
मध्यरात्री
त्या दिवशीही दुपारी मी थोडी दारू घेतली होती; मन बरेचसे सैलावले होते, हळवे झाले होते. अंधार डोळ्यांना सरावला, तेव्हा झाडांच्या सावलीखाली फिकट पांढुरक्या रंगात रेखलेली, पदर सैलावलेली, थकल्या देहाची ती स्त्रीची धूसर आकृती पाहून माझ्या मनात एक अनावर आवेग उसळला. वाटले, ती जणू एक सावली आहे; तिला दोन्ही हातांनी कधीच धरता येणार नाही. इतक्यात अंधाऱ्या सुरूच्या शेंड्यांवर जणू आग लागली; मग कृष्णपक्षातला, कडा झिजलेला, पिवळा चंद्र हळूहळू झाडांच्या माथ्यावरच्या आकाशात चढला;—पांढऱ्या दगडावर पांढरी साडी नेसून थकून पडलेल्या त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर चांदणे येऊन पडले. मला राहवेना. जवळ जाऊन दोन्ही हातांत तिचा हात उचलून धरला आणि म्हणालो, 'मनोरमा, तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस, पण माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुला मी कधीही विसरू शकणार नाही.' हे बोलताक्षणी मी दचकलो; आठवले, नेमके हेच शब्द पूर्वी एके दिवशी दुसऱ्या कुणालातरी बोललो होतो! आणि त्याच क्षणी बकुळीच्या फांद्यांवरून, सुरूच्या शेंड्यांवरून, कृष्णपक्षातल्या पिवळ्या, भंगलेल्या चंद्राखालून, गंगेच्या पूर्व तीरापासून गंगेच्या दूरच्या पश्चिम तीरापर्यंत हाहा-हाहा-हाहा—करत अतिशय वेगाने एक हास्य वाहत गेले! ते काळीज चिरणारे हास्य होते की आकाश भेदणारा आक्रोश, सांगता येत नाही. मी तत्क्षणी दगडी चौथऱ्यावरून बेशुद्ध होऊन खाली कोसळलो. शुद्धीवर आलो तेव्हा पाहिले, मी माझ्या खोलीत बिछान्यावर पडलो आहे. पत्नीने विचारले, 'तुम्हाला अचानक असं का झालं?'— मी थरथरत म्हणालो, 'तू ऐकलं नाहीस, सारं आकाश भरून हाहा करत एक हसू वाहून गेलं?'
मध्यरात्री
पत्नी हसून म्हणाली—'ते का हसू होतं? रांग धरून पक्ष्यांचा एक लांबलचक थवा उडून गेला, त्यांच्या पंखांचा आवाज मी ऐकला. तुम्ही इतक्याशानं घाबरता?'— दिवसा स्पष्ट उमगले, की तो पक्ष्यांचा थवा उडण्याचाच आवाज होता; या दिवसांत उत्तरेकडून हंसांच्या रांगा नदीतल्या वाळूच्या बेटांवर चरायला येत असतात. पण संध्याकाळ झाली की तो विश्वास टिकत नसे. तेव्हा वाटे, चहूकडच्या साऱ्या अंधारात दाट हास्य साठून राहिले आहे; एखाद्या क्षुल्लक निमित्तानेसुद्धा ते अचानक आकाश भरून, अंधार चिरून घुमू लागेल. शेवटी असे झाले, की संध्याकाळनंतर मनोरमेशी एक शब्द बोलायचीही मला हिंमत होत नसे. तेव्हा बरानगरचे घर सोडून मनोरमेला घेऊन मी बोटीतून निघालो. अग्रहायण महिन्यात नदीवरच्या वाऱ्याने सारी भीती निघून गेली. काही दिवस मोठ्या सुखात गेले. भोवतालच्या सौंदर्याने ओढली जाऊन मनोरमाही जणू पुष्कळ दिवसांनी आपल्या हृदयाचे बंद दार माझ्यापुढे हळूहळू उघडू लागली. गंगा मागे टाकून, खडे नदी मागे टाकून, शेवटी आम्ही पद्मेवर येऊन पोहोचलो. भयंकर पद्मा तेव्हा हेमंतात बिळात दडलेल्या नागिणीसारखी कृश, निपचित होऊन दीर्घ शीतनिद्रेत गढली होती. उत्तर तीरावर निर्मनुष्य, निर्तृण, कोणतीही खूण नसलेला, क्षितिजापर्यंत पसरलेला वाळूचा पट्टा भकास पडला होता—आणि दक्षिणेच्या उंच कड्यावर गावांच्या आमराया या राक्षसी नदीच्या अगदी तोंडासमोर हात जोडून उभ्या थरथरत होत्या;—पद्मा झोपेच्या गुंगीत मधूनच कूस बदलत होती, आणि भेगाळलेला किनारा धडाधड ढासळून कोसळत होता. इथे फिरायला सोयीचे दिसले म्हणून बोट बांधली.
मध्यरात्री
एके दिवशी आम्ही दोघे फिरता फिरता खूप दूरवर निघून गेलो. सूर्यास्ताची सोनेरी छाया विरते न विरते तोच शुक्लपक्षातले निर्मळ चांदणे पाहता पाहता फुलून आले. त्या अंतहीन शुभ्र वाळवंटावर जेव्हा अमाप, मोकळे, उचंबळलेले चांदणे थेट आकाशाच्या कडेपर्यंत पसरले—तेव्हा वाटले, जणू निर्मनुष्य चांदण्याच्या अथांग स्वप्नराज्यात आम्ही दोघेच भटकत आहोत. एक लाल शाल मनोरमेच्या डोक्यावरून उतरून तिच्या चेहऱ्याभोवती वेढा घालून तिचे सारे अंग झाकून राहिली होती. निःस्तब्धता गडद होत आली, एका अमर्याद, दिशाहीन शुभ्रतेशिवाय आणि शून्यतेशिवाय जेव्हा दुसरे काहीच उरले नाही, तेव्हा मनोरमेने हळूच हात बाहेर काढून माझा हात दाबून धरला; अगदी जवळ येऊन, जणू आपले सारे शरीर-मन, जीवन-यौवन माझ्यावर सोपवून, पूर्ण विसंबून ती उभी राहिली. पुलकित, उचंबळलेल्या हृदयाने मला वाटले, घराच्या चार भिंतींत पुरेसे प्रेम करता येते का? असे उघडे, मोकळे, अनंत आकाश नसेल तर दोन माणसे कुठे मावतील? तेव्हा वाटले, आम्हाला घर नाही, दार नाही, कुठे परतायचे नाही; असेच हातात हात घालून, गंतव्य नसलेल्या वाटेने, उद्देश नसलेल्या भ्रमंतीत, चांदण्यात न्हालेल्या शून्यावरून आम्ही बेरोकटोक चालत राहू. असे चालता चालता एका ठिकाणी येऊन पाहिले, त्या वाळूच्या राशींच्या मधोमध, थोड्या अंतरावर एखाद्या तळ्यासारखे झाले आहे—पद्मा मागे सरकल्यानंतर तिथे पाणी साचून राहिले आहे. वाळवंटाच्या वाळूने वेढलेल्या त्या लाट नसलेल्या, निद्रिस्त, निश्चल पाण्यावर चांदण्याची एक लांबच लांब रेघ मूर्च्छित होऊन पडली होती. त्या जागी येऊन आम्ही दोघे उभे राहिलो—मनोरमेने काय विचार करून कोण जाणे, माझ्या चेहऱ्याकडे पाहिले; तिच्या डोक्यावरून शाल अचानक घसरून पडली. चांदण्यात उमललेला तिचा तो चेहरा मी उचलून धरला आणि त्याचे चुंबन घेतले.
मध्यरात्री
इतक्यात त्या निर्मनुष्य, निःशब्द वाळवंटात गंभीर स्वरात कुणीतरी तीनदा म्हणाले—'कोण ते? कोण ते? कोण ते?' मी दचकलो, माझी पत्नीही थरथरली. पण पुढच्याच क्षणी आम्हा दोघांनाही उमगले, हा आवाज मानवी नाही, अमानवीही नाही—वाळवंटात वावरणाऱ्या पाणपक्ष्यांची ती हाक होती. इतक्या रात्री आपल्या सुरक्षित, एकांत निवाऱ्याजवळ अचानक माणसांची चाहूल लागून ते दचकून उठले होते. त्या भीतीच्या धक्क्याने आम्ही दोघेही घाईघाईने बोटीवर परतलो. रात्री बिछान्यावर येऊन पडलो; थकल्या देहाने मनोरमा लगेच झोपी गेली. तेव्हा अंधारात कुणीतरी माझ्या मच्छरदाणीजवळ उभे राहून, झोपलेल्या मनोरमेकडे एकच लांब, कृश, हाडकुळे बोट दाखवत, जणू माझ्या कानात अगदी हलक्या, दबलेल्या आवाजात सारखे विचारू लागले—'कोण ते? कोण ते? कोण हो ते?'— मी घाईने उठलो, काडी ओढली आणि दिवा लावला. त्याच क्षणी ती छायामूर्ती विरून गेली, आणि माझी मच्छरदाणी हादरवत, बोट डोलवत, घामाने निथळणाऱ्या माझ्या साऱ्या अंगातले रक्त गोठवत, हाहा-हाहा-हाहा करत एक हास्य अंधाऱ्या रात्रीतून वाहत निघून गेले. पद्मा ओलांडली, पद्मेचे वाळवंट ओलांडले, त्यापलीकडचे सारे निद्रिस्त देश, गावे, नगरे ओलांडून गेले—जणू ते युगानुयुगे देशोदेशांच्या, लोकलोकांतरांच्या पार जात जात क्रमाक्रमाने क्षीण, क्षीणतर, क्षीणतम होत अथांग दूरवर चालले आहे,—हळूहळू जणू ते जन्ममृत्यूच्या प्रदेशाच्याही पलीकडे गेले—हळूहळू ते सुईच्या टोकासारखे अतिशय क्षीण होत आले—इतका क्षीण आवाज मी कधी ऐकला नव्हता, कल्पनाही केली नव्हती—माझ्या मस्तकातच जणू अनंत आकाश आहे, आणि तो आवाज कितीही दूर गेला तरी माझ्या मेंदूची सीमा त्याला काही केल्या ओलांडता येत नाही;—शेवटी जेव्हा ते अगदीच असह्य झाले, तेव्हा वाटले, दिवा विझवल्याशिवाय मला झोप लागणार नाही.
मध्यरात्री
दिवा विझवून आडवा झालो मात्र, तोच माझ्या मच्छरदाणीशेजारी, माझ्या कानाजवळ, अंधारात पुन्हा तो दबलेला स्वर म्हणाला—'कोण ते, कोण ते, कोण हो ते.' माझ्या छातीतल्या रक्ताच्या अगदी त्याच तालावर सारखे घुमू लागले—'कोण ते, कोण ते, कोण हो ते! कोण ते, कोण ते, कोण हो ते!' त्या गडद रात्री निःस्तब्ध बोटीत माझे गोल घड्याळसुद्धा सजीव होऊन, आपला तासकाटा मनोरमेकडे रोखून, शेल्फवरून तालात तालात म्हणू लागले, 'कोण ते, कोण ते, कोण हो ते! कोण ते, कोण ते, कोण हो ते!' सांगता सांगता दक्षिणाबाबूंचा चेहरा राखेसारखा फिका पडला, त्यांचा कंठ दाटून आला. मी त्यांना स्पर्श करून म्हणालो, 'थोडं पाणी घ्या.' इतक्यात अचानक माझ्या रॉकेलच्या दिव्याची ज्योत फडफडत फडफडत विझून गेली. एकाएकी दिसले, बाहेर उजाडले आहे. कावळे काव काव करू लागले. दयाळ शीळ घालू लागला. माझ्या घरासमोरच्या रस्त्यावर एका रेड्याच्या गाडीचा करकर आवाज जागा झाला. तेव्हा दक्षिणाबाबूंच्या चेहऱ्यावरचा भाव पार बदलून गेला. भीतीची तिळमात्र खूण उरली नाही. रात्रीच्या मोहिनीत, काल्पनिक भीतीच्या धुंदीत माझ्यापाशी एवढे सारे बोलून बसल्याबद्दल ते जणू अतिशय लज्जित झाले, आणि माझ्यावरच भलतेच संतापले. शिष्टाचाराचा एक शब्दही न बोलता ते एकाएकी उठले आणि झपाझप चालते झाले. त्याच दिवशी मध्यरात्री पुन्हा माझ्या अंगावर थाप पडली—'डॉक्टर! डॉक्टर!'