रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
मणिहारा
त्या जीर्णप्राय बांधीव घाटाच्या कडेला माझी बोट लावलेली होती. तेव्हा सूर्य मावळला होता. बोटीच्या छतावर नावाडी नमाज पढत होता. पश्चिमेच्या धगधगत्या आकाशपटावर त्याची मूक उपासना क्षणाक्षणाला चित्रासारखी उमटत होती. स्थिर, लाटा नसलेल्या नदीच्या पाण्यावर शब्दांपलीकडचे असंख्य रंग पाहता पाहता फिकट छटेतून गडद छटेत, सोनेरी रंगातून पोलादी रंगात, एका आभेतून दुसऱ्या आभेत विरत चालले होते. खिडक्या तुटलेल्या, सज्जे लोंबकळलेल्या, जराजर्जर अशा प्रचंड वाड्यासमोर, पिंपळाच्या मुळांनी फुटलेल्या घाटावर, रातकिड्यांच्या किरकिरीने भरलेल्या संध्याकाळी मी एकटा बसलो होतो; माझ्या कोरड्या डोळ्यांच्या कडा ओलावू-ओलावू होत होत्या; इतक्यात डोक्यापासून पायापर्यंत अचानक दचकून मी ऐकले, 'महाशयांचे आगमन कुठून?' पाहिले तो एक सद्गृहस्थ: अपुऱ्या अन्नाने रोडावलेले, भाग्यलक्ष्मीने अगदीच उपेक्षिलेले. बंगालात घरापासून दूर परमुलखात नोकरी करणाऱ्या बहुतेकांचा जसा वर्षानुवर्षे डागडुजी न झालेला एक अवतार असतो, तसाच यांचाही. धोतरावर आसामी मटका रेशमाचा एक मळकट, तेलकट, बटणे उघडी असलेला चपकन — जणू कामावरून आत्ताच परतत होते. आणि ज्या वेळी चार घास फराळाचे खायला हवे होते, त्या वेळी हा अभागी जीव नदीकाठी नुसती संध्याकाळची हवा खायला आला होता. आगंतुकांनी पायरीच्या कडेला बैठक मारली. मी म्हणालो, 'मी रांचीहून येतो आहे.' आपण काय करता? व्यापार करतो. कसला व्यापार? हिरडा, रेशमाचे कोष आणि लाकूड यांचा व्यापार. नाव? जरासे थांबून मी एक नाव सांगितले. पण ते माझे स्वतःचे नाव नव्हते. सद्गृहस्थांचे कुतूहल शमले नाही. पुन्हा प्रश्न आला, 'इथे कशासाठी येणे झाले?' मी म्हणालो, 'हवापालट.'
मणिहारा
माणूस जरा चकित झाला. म्हणाला, 'महाशय, गेली जवळजवळ सहा वर्षे मी इथली हवा खातो आहे, आणि तिच्या जोडीने रोज सरासरी पंधरा ग्रेन क्विनाईनही खातो आहे, पण काही गुण तर आलेला नाही.' मी म्हणालो, 'हे मात्र मान्य करावेच लागेल की रांचीहून इथे आल्यावर हवेत भरपूर पालट दिसेल.' ते म्हणाले, 'जी हो, भरपूर. इथे मुक्काम कुठे करणार?' मी घाटावरचे ते जीर्ण घर दाखवून म्हणालो, 'या घरात.' बहुधा त्या माणसाला शंका आली की मला या ओसाड घरात कुठल्यातरी गुप्तधनाचा सुगावा लागला आहे. पण याबद्दल त्यांनी आणखी काही वाद काढला नाही — फक्त आजपासून पंधरा वर्षांपूर्वी या शापित घरात जी घटना घडली होती, तिचे सविस्तर वर्णन केले. हे गृहस्थ इथले शाळामास्तर. भुकेने आणि आजाराने खंगलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर, मोठ्याशा टकलाखाली, खोल खोबणींतून दोन मोठमोठे डोळे विलक्षण तेजाने जळत होते. त्यांना पाहून मला इंग्रज कवी कोलरिजने रचलेल्या त्या म्हाताऱ्या खलाशाची आठवण झाली. नावाड्याने नमाज आटोपून स्वयंपाकाकडे लक्ष वळवले होते. संध्याकाळची शेवटची आभाही विरून गेली, आणि घाटावरचे ते निर्जन, अंधारे घर आपल्या गतवैभवाच्या प्रचंड भुतासारखे निःस्तब्ध उभे राहिले. शाळामास्तर म्हणाले — 'मी या गावी येण्याच्या सुमारे दहा वर्षे आधी या घरात फणिभूषण साहा राहत असत. आपले निपुत्रिक काका दुर्गामोहन साहा यांच्या मोठ्या मालमत्तेचे आणि व्यापाराचे ते वारस झाले होते. 'पण त्यांना नव्या जमान्याने झपाटले होते. ते शिकले-सवरलेले होते. साहेबाच्या ऑफिसात बुटांसकट शिरत आणि अगदी अस्सल, खणखणीत इंग्रजी बोलत. त्यातून पुन्हा दाढी राखली होती; त्यामुळे साहेब-सौदागरांकडून त्यांचे काही भले होण्याची शक्यताच उरली नव्हती. त्यांना पाहताक्षणीच हे नव्या वळणाचे बंगाली बाबू आहेत, हे ओळखू येई.
मणिहारा
'आणि घरातही एक लचांड येऊन बसले होते. त्यांची बायको सुंदर होती. एक तर कॉलेजात शिकलेले, त्यात सुंदर बायको — मग जुनी रीतभात कुठली टिकायला! इतकेच काय, आजारपणात असिस्टंट सर्जनला बोलावले जाई. खाणे-पिणे, कपडेलत्ते, दागदागिने यांचाही थाट याच प्रमाणात वाढू लागला. 'महाशय, आपण नक्कीच विवाहित आहात, तेव्हा आपल्याला हे सांगायची गरजच नाही की, साधारणपणे स्त्रीजातीला कच्च्या कैऱ्या, झणझणीत मिरच्या आणि कडक नवराच आवडतो. जो दुर्दैवी पुरुष स्वतःच्या बायकोच्या प्रेमाला पारखा होतो, तो कुरूप असतो किंवा कफल्लक असतो असे नव्हे; तो निव्वळ गरीब गाय असतो. 'असे का झाले, असे आपण विचाराल, तर याबद्दल मी बराच विचार करून ठेवला आहे. ज्याची जी प्रवृत्ती आणि जी कुवत, तिला वाव मिळाला नाही तर तो सुखी होत नाही. शिंगांना धार लावायला हरीण कठीण झाडाचे खोड शोधते; केळीच्या खुंटावर शिंगे घासण्यात त्याला सुख वाटत नाही. स्त्री-पुरुष हा भेद झाला तेव्हापासून स्त्री नाना युक्त्यांनी दांडग्या पुरुषाला भुलवून वश करण्याच्या विद्येचा सराव करत आली आहे. जो नवरा आधीच वश होऊन बसून राहतो, त्याची बायको बिचारी पार बेकार होते; तिला आपल्या आज्या-पणज्यांकडून लाखो वर्षे धार लावलेली जी तळपती वरुणास्त्रे, अग्निबाण आणि नागपाश मिळालेले असतात, ते सगळे फुकट जातात. 'स्त्रीला पुरुषाला भुलवून, स्वतःच्या बळावर प्रेम वसूल करून घ्यायचे असते — नवरा भलामाणूस होऊन तेवढीही संधी देत नसेल, तर नवऱ्याचे नशीब खोटे, आणि बायकोचे त्याहूनही खोटे!
मणिहारा
'नव्या सभ्यतेच्या शिक्षणाचा मंत्र घेऊन पुरुषाने आपला स्वभावसिद्ध, विधात्याने दिलेला महान रानटीपणा गमावला आणि आधुनिक दांपत्यसंबंध असा ढिला करून टाकला आहे. अभागी फणिभूषण आधुनिक सभ्यतेच्या यंत्रातून अगदी भलामाणूस होऊन बाहेर पडला होता — व्यापारातही त्याचे फारसे फावले नाही, आणि संसारातही त्याला तशी संधी मिळाली नाही. 'फणिभूषणाची बायको मणिमालिका हिला लाड मिळत ते प्रयत्न न करता, ढाक्याच्या साड्या मिळत त्या एक अश्रू न ढाळता, आणि बाजूबंद मिळत ते कसलाही कठीण रुसवा न धरता. अशाने तिची स्त्रीप्रकृती आणि तिच्याबरोबर तिचे प्रेमही निश्चेष्ट होऊन गेले होते. ती फक्त घेत असे, काहीच देत नसे! तिच्या गरीब आणि भोळसट नवऱ्याला वाटे, देत राहणे हाच म्हणे परतफेड मिळवण्याचा मार्ग. अगदी उलटे समजला होता म्हणायचे! 'याचा परिणाम असा झाला की, ती नवऱ्याला आपल्याला ढाकाई साड्या आणि बाजूबंद पुरवणारे एक यंत्र समजू लागली; — यंत्रही असे सुरेख की, कधी त्याच्या चाकात एक थेंब तेल घालण्याचीही गरज पडली नाही. 'फणिभूषणाचे जन्मगाव फुलबेडे, आणि व्यापाराचे ठाणे इथे. कामाच्या निमित्ताने त्याला बहुतेक काळ इथेच राहावे लागे. फुलबेड्याच्या घरी त्याची आई नव्हती, तरी आत्या, मावशी आणि इतर चार माणसे होती. पण आत्या, मावशी आणि इतर चार माणसांच्या सोयीसाठी म्हणून काही फणिभूषणाने खास सुंदर बायको घरात आणली नव्हती. म्हणून त्याने बायकोला त्या चार माणसांतून काढून या कोठीत एकटीला आपल्यापाशीच ठेवले. पण इतर हक्कांपेक्षा बायकोवरच्या हक्काचा फरक असा की, बायकोला चार माणसांपासून तोडून एकटीला आपल्यापाशी ठेवली म्हणजे ती नेहमीच अधिक मिळते असे नाही.
मणिहारा
'बायको फारशी बोलत नसे; आळीतल्या शेजारणींशीही तिचे फारसे येणे-जाणे नव्हते; व्रताच्या निमित्ताने दोन ब्राह्मणांना जेवू घालणे, किंवा दारी आलेल्या वैष्णविणीला दोन पैसे भिक्षा घालणे, असे तिच्या हातून कधी घडले नाही. तिच्या हातून कोणतीही वस्तू वाया गेली नाही; नवऱ्याचे लाड सोडले तर, जे जे मिळाले ते सगळे तिने साठवून ठेवले. आश्चर्याची गोष्ट अशी की, आपल्या अपूर्व तारुण्यश्रीचीही तिने जणू तिळमात्र उधळपट्टी होऊ दिली नाही. लोक म्हणतात, चोविसाव्या वर्षीही ती चौदा वर्षांच्या पोरीसारखी कोवळी दिसे. ज्यांचे हृदय बर्फाचा गोळा असते, ज्यांच्या छातीत प्रेमाच्या दाहाला आणि यातनेला जागा नसते, ते बहुधा दीर्घकाळ ताजे राहतात; ते कंजुषासारखे आतून-बाहेरून स्वतःला साठवून ठेवू शकतात. 'दाट पानांनी भरलेल्या, अतिशय टवटवीत वेलीसारखे विधात्याने मणिमालिकेला निष्फळ ठेवले, तिला संततीपासून वंचित केले. म्हणजे तिला असे काहीच दिले नाही, की जे ती आपल्या लोखंडी तिजोरीतल्या हिऱ्या-माणकांपेक्षा अधिक मोलाचे मानू शकेल; जे वसंतातल्या पहाटेच्या कोवळ्या सूर्यासारखे आपल्या कोमल उबेने तिच्या हृदयातला बर्फाचा गोळा वितळवून संसारावर मायेचा एक झरा वाहवील. 'पण मणिमालिका कामाला वाघ होती. तिने कधीच फार नोकरचाकर ठेवले नाहीत. जे काम तिच्या हातून होण्यासारखे, त्या कामाचा पगार दुसऱ्या कुणी घेऊन जावा, हे तिला सहन होत नसे. ती कुणाची काळजी करत नसे, कुणावर प्रेम करत नसे, फक्त काम करत असे आणि साठवत असे; म्हणूनच तिला रोग, शोक, ताप काहीच नव्हते; अमर्याद आरोग्य, अविचल शांती आणि वाढत्या संपत्तीच्या मध्ये ती दिमाखात विराजमान होती.
मणिहारा
'बहुतेक नवऱ्यांना एवढे पुरे; पुरे कशाला, हे दुर्मीळच. अंगात कंबर नावाचा एक प्रकार आहे, हे कंबर दुखल्याशिवाय आठवत नाही; — घराचा आधार असलेली बायको नावाची कुणी एक आहे, हे प्रेमाच्या टोचणीने पावलोपावली आणि चोवीस तास जाणवत राहणे, याचेच नाव संसाराची कंबरदुखी! अतोनात पातिव्रत्य बायकोसाठी गौरवाची गोष्ट असेल, पण नवऱ्यासाठी ते आरामाचे नव्हे; निदान माझे तरी असे मत आहे. 'महाशय, बायकोचे प्रेम नेमके किती मिळाले, नेमके किती कमी पडले, हे अगदी बारीक तराजू धरून अहोरात्र तोलत बसणे, हे काय पुरुषमाणसाचे काम आहे! बायको तिचे काम करो, मी माझे काम करतो — घरचा ढोबळ हिशेब हाच तर. न बोललेल्यात किती बोलले गेले, भावात किती अभाव, अगदी उघड्या बोलण्यातही किती इशारा, अणुरेणूत किती विशालता — प्रेमाच्या देवाणघेवाणीची इतकी सूक्ष्म जाण विधात्याने पुरुषाला दिलेली नाही — द्यायची गरजच पडली नाही. पुरुषाच्या तिळमात्र प्रीतीची-अप्रीतीची लक्षणे घेऊन बायका मात्र खरोखरच वजन करायला बसतात. शब्दांमधून खरी ढब, आणि ढबीमधून खरा शब्द चिरून चिरून, वेचून वेचून बाहेर काढत राहतात! कारण पुरुषाचे प्रेम हेच बायकांचे बळ, त्यांच्या जीवन-व्यापाराचे भांडवल. त्याच्या वाऱ्याचा रोख पाहून योग्य वेळी योग्य तसे शीड फिरवता आले, तरच त्यांची नाव पैलतीराला लागते. म्हणूनच विधात्याने प्रेम मोजण्याचे यंत्र बायकांच्या हृदयात टांगून दिले आहे, पुरुषांना दिलेले नाही.
मणिहारा
'पण विधात्याने जे दिले नाही, ते अलीकडे पुरुषांनी मिळवून घेतले आहे. कवींनी विधात्यावर कुरघोडी करून हे दुर्मीळ यंत्र, ही होकायंत्राची सुई, बिनदिक्कत सर्वसामान्यांच्या हाती देऊन टाकली आहे. मी विधात्याला दोष देत नाही; त्याने स्त्री-पुरुषांना पुरेसे भिन्न करूनच घडवले होते, पण सभ्यतेत तो भेद उरत नाही; आता बाईही पुरुष होते आहे, पुरुषही बाई होतो आहे; म्हणून घरातून शांतीने आणि शिस्तीने निरोप घेतला. आता शुभविवाहाच्या आधी, आपण पुरुषाशी लग्न करतो आहोत की बाईशी, हे काही केल्या नक्की ठरवता न आल्याने वर आणि वधू दोघांचीही छाती भीतीने धडधडत राहते. 'आपण कंटाळलात! मी एकटा पडून असतो; बायकोपासून हद्दपार; दुरून पाहताना संसाराची बरीच गूढ तत्त्वे मनात उगवतात — ही काही विद्यार्थ्यांना सांगण्याजोगी गोष्ट नव्हे; बोलण्याच्या ओघात आपल्याला सांगून घेतली, विचार करून पाहा. 'तात्पर्य असे की, स्वयंपाकात मीठ कमी पडत नसे आणि विड्यात चुना जास्त होत नसे, तरीही फणिभूषणाच्या हृदयाला कसलातरी, काय ते न कळणारा एक असाध्य उपद्रव जाणवत असे. बायकोचा काही दोष नव्हता, काही चूक नव्हती, तरी नवऱ्याला काही सुख नव्हते. आपल्या सहधर्मचारिणीच्या पोकळ खळग्यासारख्या हृदयाचा नेम धरून तो सारखे हिरे-मोत्यांचे दागिने ओतत असे, पण ते जाऊन पडत लोखंडी तिजोरीत — हृदय रिकामेच राही. काका दुर्गामोहन प्रेम इतके सूक्ष्मपणे समजत नसत, इतक्या आर्ततेने मागत नसत, इतक्या भरभरून देत नसत, तरी काकूंकडून ते त्यांना अमाप मिळे. व्यापारी व्हायचे तर नवा बाबू होऊन चालत नाही, आणि नवरा व्हायचे तर पुरुष असावे लागते, या गोष्टीबद्दल आपण तिळमात्र शंका घेऊ नका.'
मणिहारा
नेमक्या याच वेळी जवळच्या झुडपातून कोल्हे अतिशय मोठ्याने कोकलू लागले. मास्तरांच्या कथाप्रवाहाला काही मिनिटे खीळ बसली. अगदी असे वाटले की, त्या अंधाऱ्या सभेत शाळामास्तरांनी विशद केलेली दांपत्यनीती ऐकून असो, की नव्या सभ्यतेने दुबळ्या झालेल्या फणिभूषणाच्या वागण्यामुळे असो, विनोदप्रिय कोल्ह्यांचा समुदाय राहून राहून गडगडाटी हसत सुटला आहे. त्यांचा भावावेग ओसरून जल-स्थल दुपटीने निःस्तब्ध झाल्यावर, मास्तर संध्याकाळच्या अंधारात आपले मोठे तेजस्वी डोळे गरगरा फिरवत गोष्ट सांगू लागले. 'फणिभूषणाच्या गुंतागुंतीच्या आणि दूरवर पसरलेल्या व्यापारावर अचानक एक गंडांतर आले. नेमका काय प्रकार होता, हे माझ्यासारख्या व्यापार न जाणणाऱ्याला समजणे आणि समजावणे कठीण. मुद्दा असा की, अचानक कोणत्यातरी कारणाने बाजारात आपली पत टिकवणे त्याला कठीण होऊन बसले होते. केवळ पाच दिवसांसाठी जरी त्याला कुठूनतरी दीडेक लाख रुपये उभे करता आले, बाजारात एकदा विजेसारखी त्या रकमेची झलक दाखवता आली, तरी क्षणार्धात संकट पार होऊन त्याचा व्यापार शिडात वारा भरून धावू लागला असता. 'रकमेची सोय होत नव्हती. ओळखीच्या स्थानिक सावकारांकडून कर्ज काढायला निघाला आहे, अशी वदंता उठली तर व्यापाराचे दुप्पट नुकसान होईल, या भीतीने त्याला अनोळखी ठिकाणी कर्जाचा प्रयत्न करावा लागत होता. तिथे योग्य तारण ठेवल्याशिवाय भागत नाही. 'दागिने गहाण ठेवले तर लिखापढीचा आणि दिरंगाईचा प्रश्नच उरत नाही; झटपट आणि सहज काम होऊन जाते.
मणिहारा
'फणिभूषण एकदा बायकोकडे गेला. स्वतःच्या बायकोकडे नवरा जितक्या सहजपणे जाऊ शकतो, तितक्या सहजपणे जाण्याचे बळ फणिभूषणात नव्हते. दुर्दैवाने तो आपल्या बायकोवर तसे प्रेम करत असे, जसे काव्याचा नायक काव्याच्या नायिकेवर करतो; ज्या प्रेमात जपून पाऊल टाकावे लागते आणि सगळ्या गोष्टी तोंड उघडून बोलता येत नाहीत — ज्या प्रेमाचे प्रबळ आकर्षण, सूर्य आणि पृथ्वी यांच्या आकर्षणासारखे, मध्ये एक फार मोठे अंतर राखून ठेवते. 'तरीही तशीच अडचण आली तर काव्याच्या नायकालाही प्रेयसीपाशी हुंडी, गहाण आणि हँडनोट यांचा विषय काढावाच लागतो; पण सूर अडखळतो, शब्द घसरतात, अशा स्वच्छ व्यवहाराच्या बोलण्यातही भावनेचा जडपणा आणि वेदनेचा कंप येऊन बसतो. अभागी फणिभूषणाला स्पष्टपणे म्हणता आले नाही की, अगं, मला गरज पडली आहे, तुझे दागिने दे! 'त्याने विषय काढला खरा, पण अगदी दुबळेपणाने काढला. मणिमालिकेने कठोर चेहरा करून होय-नाही काहीच उत्तर दिले नाही, तेव्हा त्याला एक अतिशय निष्ठुर घाव बसला, पण त्याने उलट घाव घातला नाही. कारण पुरुषाला शोभणारा रानटीपणा त्याच्यात लवलेशही नव्हता. जिथे जबरदस्तीने हिसकावून घ्यायला हवे होते, तिथे त्याने आपला आतला क्षोभसुद्धा दाबून टाकला. जिथे केवळ प्रेमाचाच अधिकार, तिथे सर्वनाश झाला तरी बळाला शिरकाव करू द्यायचा नाही, असा त्याचा मनोभाव. याबद्दल त्याची कानउघाडणी केली असती तर बहुधा त्याने असा सूक्ष्म युक्तिवाद केला असता की, बाजारात अन्याय्य कारणानेही माझी पत उरली नसेल, तर म्हणून काही बाजार लुटून घेण्याचा अधिकार मला नाही; बायको स्वखुशीने, विश्वास ठेवून मला दागिने देत नसेल, तर ते मी हिसकावून घेऊ शकत नाही.
मणिहारा
बाजारात पत, घरात तसेच प्रेम, बाहुबळ फक्त रणांगणावर! पावलोपावली असे अतिशय सूक्ष्म-सूक्ष्म युक्तिवादाचे धागे कातण्यासाठीच का विधात्याने पुरुषमाणसाला इतका उदार, इतका प्रबळ, इतका धिप्पाड घडवला होता? बसल्या बसल्या अतिशय कोमल भावना अतिशय नाजूकपणे अनुभवत बसायला त्याला सवड आहे का, की ते त्याला शोभते? 'ते काहीही असो; आपल्या उदात्त भावनांच्या अभिमानाने बायकोच्या दागिन्यांना हात न लावता फणिभूषण दुसऱ्या मार्गाने पैसा उभा करायला कलकत्त्याला निघून गेला. 'संसारात साधारणपणे नवरा बायकोला जितके ओळखतो, त्यापेक्षा बायको नवऱ्याला कितीतरी अधिक ओळखते; पण नवऱ्याची प्रकृती फारच सूक्ष्म असेल तर बायकोच्या सूक्ष्मदर्शकात ती संपूर्ण पकडली जात नाही. आमच्या फणिभूषणाची बायको त्याला नीटसे ओळखत नव्हती. स्त्रीचे न शिकवता आलेले चातुर्य ज्या अतिशय जुन्या, पिढ्यान्पिढ्यांच्या संस्कारांनी घडलेले असते, त्यांच्या बाहेर अगदी नव्या पद्धतीचे पुरुष जाऊन पडतात. ही एक वेगळीच जात! हे बायकांसारखेच गूढ होत चालले आहेत. सामान्य पुरुषांचे जे काही मोठमोठे कप्पे आहेत — म्हणजे कुणी रानटी, कुणी मूर्ख, कुणी आंधळा — त्यांपैकी कोणत्याच कप्प्यात यांना नीट बसवता येत नाही. 'म्हणून मणिमालिकेने सल्ल्यासाठी आपल्या मंत्र्याला बोलावले. गावच्या नात्याने म्हणा की दूरच्या नात्याने, मणिमालिकेचा एक भाऊ फणिभूषणाच्या कोठीत गुमास्त्याच्या हाताखाली काम करत असे. कामाच्या जोरावर पुढे यावे असा त्याचा स्वभाव नव्हता; कोणते ना कोणते निमित्त काढून, नात्याच्या जोरावर पगार आणि पगाराहूनही थोडेफार अधिक तो गोळा करत असे.
मणिहारा
'मणिमालिकेने त्याला बोलावून सगळी हकीकत सांगितली; विचारले, "आता काय सल्ला?" 'त्याने मोठ्या शहाण्यासारखी मान हलवली — म्हणजे लक्षणे ठीक नाहीत. शहाण्यांना लक्षणे कधीच ठीक दिसत नाहीत. तो म्हणाला, "बाबूंना पैसे कधीच उभे करता येणार नाहीत; शेवटी तुझ्या या दागिन्यांवरच गदा येणार." 'मणिमालिका माणसांना ज्या प्रकारे ओळखत होती, त्यावरून तिला वाटले की असेच होणे संभवनीय, आणि हेच रास्त. तिची चिंता तीव्र झाली. संसारात तिला मूल नाही; नवरा आहे खरा, पण नवऱ्याचे अस्तित्व ती अंतःकरणात जाणत नाही — म्हणून जे तिचे एकुलते एक जिवापाड जपलेले धन, जे तिच्या मुलासारखे हळूहळू वर्षावर्षाने वाढत चालले आहे, जे नुसते रूपक नव्हे, जे खरोखरीचे सोने, जे माणिक, जे छातीवरचे, जे गळ्यातले, जे मस्तकावरचे — ती अनेक दिवसांची, अनेक हौसेने जमवलेली ठेव एका क्षणात व्यापाराच्या अथांग खाईत फेकली जाणार, या कल्पनेने तिचे सर्वांग गार पडले. ती म्हणाली, "काय करावे?" 'मधुसूदन म्हणाला, "दागिने घेऊन आत्ताच्या आत्ता माहेरी चल!" दागिन्यांचा काही भाग, इतकेच काय, बहुतेक भाग आपल्या वाट्याला कसा येईल, याचा उपाय शहाण्या मधूने मनातल्या मनात हेरून ठेवला. 'मणिमालिकेने हा प्रस्ताव तत्काळ मान्य केला. 'आषाढ संपता संपता एका संध्याकाळी या घाटाच्या कडेला एक नाव येऊन लागली. ढगांनी गच्च भरलेल्या पहाटे, दाट अंधारात, निद्राहीन बेडकांच्या कलकलाटात, एका जाड चादरीत पायापासून डोक्यापर्यंत लपेटून मणिमालिका नावेत चढली. मधुसूदन नावेत जागा होऊन उठला आणि म्हणाला, "दागिन्यांची पेटी माझ्याकडे दे!" मणी म्हणाली, "ते नंतर पाहू, आत्ता नाव सोड." 'नाव सोडली; भरधाव प्रवाहात ती सरसर वाहत गेली.
मणिहारा
'मणिमालिकेने रात्रभर एकेक करून आपले सगळे दागिने सर्वांगभर घातले होते — डोक्यापासून पायापर्यंत आणखी जागा उरली नव्हती. पेटीत घालून दागिने नेले तर ती पेटी हातची जाण्याची भीती तिला होती. पण अंगावर घालून गेले, तर तिचा वध केल्याशिवाय ते दागिने कुणालाही घेता येणार नाहीत! 'बरोबर कसलीच पेटी न दिसल्याने मधुसूदनाला काही उलगडा झाला नाही — जाड चादरीखाली मणिमालिकेच्या देह-प्राणाबरोबरच, देह-प्राणाहूनही अधिक मोलाचे दागिने झाकलेले आहेत, याचा त्याला अंदाज आला नाही. मणिमालिकेला फणिभूषण कळला नव्हता खरा, पण मधुसूदनाला ओळखायचे तिचे काही बाकी राहिले नव्हते. 'मधुसूदनाने गुमास्त्यापाशी एक चिठ्ठी ठेवली की, तो मालकिणीला माहेरी पोहोचवायला निघाला आहे. गुमास्ता फणिभूषणाच्या वडिलांच्या काळापासूनचा; तो अतिशय वैतागला, आणि ऱ्हस्व इकाराचा दीर्घ ईकार आणि दंत्य सचा तालव्य श करत त्याने मालकाला एक पत्र लिहिले — त्याने चांगले बंगाली लिहिले नाही, पण बायकोला अवाजवी सूट देणे पुरुषाला शोभत नाही, ही गोष्ट मात्र नेमकी मांडली. 'फणिभूषणाला मणिमालिकेच्या मनातली गोष्ट नेमकी कळली. त्याच्या मनाला हा घाव जोराने लागला की, मोठ्या नुकसानाची शक्यता असूनही बायकोच्या दागिन्यांचा विचार सोडून मी जिवापाड धडपडून पैसा उभा करायला निघालो — तरी माझ्यावर संशय! मला अजूनही ओळखले नाही. 'स्वतःवरच्या ज्या भयंकर अन्यायाने संतापायला हवे होते, त्याने फणिभूषण फक्त खिन्न झाला! पुरुषमाणूस म्हणजे विधात्याचा न्यायदंड; त्याच्यात विधात्याने वज्राग्नी ठेवून दिला आहे; स्वतःवरच्या किंवा दुसऱ्यावरच्या अन्यायाच्या घर्षणाने तो भडकून पेटून उठू शकत नसेल, तर धिक्कार असो त्याचा! पुरुषमाणूस क्षुल्लक कारणाने वणव्यासारखा भडकेल, आणि स्त्री श्रावणातल्या मेघासारखी विनाकारण अश्रू ढाळत राहील, अशी विधात्याची व्यवस्था होती — पण ती आता टिकत नाही.
मणिहारा
'अपराधी बायकोला उद्देशून फणिभूषण मनातल्या मनात म्हणाला, हेच जर तुझे मनोगत असेल, तर असेच होवो; माझे कर्तव्य मी करत राहीन. — आणखी पाच-सहा शतकांनी जेव्हा जग केवळ अध्यात्मशक्तीवर चालेल, तेव्हा ज्याने जन्म घ्यायला हवा होता, तो भावी युगातला फणिभूषण एकोणिसाव्या शतकात अवतरला, आणि त्या आदियुगातल्या स्त्रीशी लग्न करून बसला, जिच्या बुद्धीला शास्त्रे प्रलयंकरी म्हणतात. फणिभूषणाने बायकोला एका अक्षराचेही पत्र लिहिले नाही, आणि मनातल्या मनात प्रतिज्ञा केली की, याबद्दल बायकोपाशी तो कधीही एका शब्दाचाही उल्लेख करणार नाही. काय भयंकर दंडविधान! 'दहाएक दिवसांनी कसेबसे पुरेसे पैसे उभे करून, संकटातून पार पडलेला फणिभूषण घरी येऊन दाखल झाला. त्याला वाटत होते, माहेरी दागदागिने ठेवून आतापर्यंत मणिमालिका घरी परतली असेल. त्या दिवशीचा दीन याचकाचा भाव टाकून, कार्य साधून आलेला कर्तबगार पुरुष म्हणून आपण बायकोसमोर उभे राहिलो की मणी कशी ओशाळेल आणि आपल्या अनावश्यक खटाटोपाबद्दल थोडी पस्तावेल, याचीच कल्पना करत करत फणिभूषण अंतःपुरातल्या शयनगृहाच्या दारापाशी येऊन पोहोचला. 'पाहिले तो दार बंद. कुलूप तोडून आत शिरला, तो खोली रिकामी. कोपऱ्यात लोखंडी तिजोरी उघडी पडली आहे, त्यात दागदागिन्यांचा मागमूसही नाही. नवऱ्याच्या छातीत धस्सकन एक घाव बसला! — वाटले, संसार उद्देशहीन, आणि प्रेम काय, व्यापारधंदा काय, सगळे व्यर्थ. या संसाराच्या पिंजऱ्याच्या प्रत्येक गजावर आपण जीव ओतत बसलो आहोत, पण त्याच्या आत पाखरूच नाही; ठेवले तरी ते राहत नाही — मग अहोरात्र हृदयाच्या खाणीतल्या रक्तमाणकांनी आणि अश्रूंच्या मोत्यांच्या माळांनी आपण काय सजवत बसलो आहोत! आयुष्यभराचे सर्वस्व गुंतलेला हा रिकामा संसाराचा पिंजरा फणिभूषणाने मनोमन लाथ मारून दूर भिरकावून दिला.
मणिहारा
'बायकोबाबत कसलाही प्रयत्न करायची फणिभूषणाची इच्छा नव्हती. त्याला वाटले, इच्छा असेल तर येईल परत. म्हातारा ब्राह्मण गुमास्ता येऊन म्हणाला, "गप्प बसून काय होणार — मालकीणबाईंची खबर घ्यायलाच हवी!" असे म्हणून त्याने मणिमालिकेच्या माहेरी माणूस पाठवला. तिथून खबर आली की, मणी किंवा मधू आतापर्यंत तिथे पोहोचलेले नाहीत. 'मग चोहीकडे शोधाशोध सुरू झाली. नदीकाठाकाठाने विचारपूस करत माणसे धावली. मधूच्या तपासासाठी पोलिसांत खबर दिली गेली — कोणती नाव, नावाडी कोण, कोणत्या वाटेने ते कुठे निघून गेले, याचा काहीच पत्ता लागला नाही. 'सगळ्या आशा सोडून एके दिवशी संध्याकाळी फणिभूषणाने आपल्या ओस पडलेल्या शयनगृहात पाऊल टाकले. त्या दिवशी जन्माष्टमी; सकाळपासून अविश्रांत पाऊस पडतो आहे! उत्सवानिमित्त गावाबाहेरच्या माळावर जत्रा भरते; तिथे मांडवात वर्गणीतून ठरवलेल्या जात्रेचा — गावोगाव पौराणिक खेळ करणाऱ्या फडाचा — खेळ सुरू झाला आहे. मुसळधार पावसाच्या आवाजात जात्रेच्या गाण्याचे सूर अधिकच मंद होऊन कानांवर येत आहेत. ते पाहा, त्या खिडकीवर ढिल्या बिजागरीची झडप लोंबकळते आहे, तिथेच अंधारात फणिभूषण एकटा बसला होता — पावसाळी वारा, पावसाचे शिंतोडे आणि जात्रेचे गाणे खोलीत शिरत होते, त्याला कसलेच भान नव्हते. खोलीच्या भिंतीवर आर्ट-स्टुडिओत छापलेली लक्ष्मी-सरस्वतीच्या चित्रांची एक जोडी टांगलेली; दांडीवर एक पंचा आणि एक टॉवेल, एक बांगडीकाठी आणि एक पट्टेरी साडी, लगेच नेसता यावी अशी घडी करून टांगलेली आहे; खोलीच्या कोपऱ्यात तिपाईवर पितळेच्या डबीत मणिमालिकेने स्वहस्ते लावलेले काही विडे सुकून पडले आहेत.
मणिहारा
काचेच्या कपाटात तिने लहानपणापासून जमवलेल्या चिनी बाहुल्या, अत्तराच्या कुप्या, रंगीत काचेच्या सुरया, हौसेचे पत्ते, समुद्रातल्या मोठमोठ्या कवड्या, इतकेच काय रिकाम्या साबणाच्या डब्यासुद्धा अगदी नीटनेटक्या मांडून ठेवलेल्या; अगदी लहानशा काचगोळ्याचा जो छोटासा हौसेचा रॉकेलचा दिवा ती रोज स्वतः तयार करून, स्वहस्ते लावून कोनाड्यात ठेवत असे, तो जागच्या जागी विझून, निस्तेज होऊन उभा आहे; तो लहानसा दिवाच या शयनगृहातल्या मणिमालिकेच्या शेवटच्या क्षणाचा मूक साक्षीदार; सगळे रिकामे करून जी निघून जाते, तीसुद्धा इतक्या खुणा, इतका इतिहास, सगळ्या जड वस्तूंवर आपल्या जिवंत हृदयाच्या मायेच्या इतक्या सह्या ठेवून जाते! ये मणिमालिके, ये; तुझा दिवा तू लाव, तुझी खोली तू उजळ, आरशासमोर उभी राहून निगुतीने निऱ्या घातलेली तुझी साडी तू नेस; तुझ्या वस्तू तुझी वाट पाहत आहेत. तुझ्याकडून कुणी काहीही अपेक्षा करत नाही; फक्त तू येऊन उभी राहा, आणि आपल्या अक्षय तारुण्याने, आपल्या अम्लान सौंदर्याने भोवतालच्या या सगळ्या विशाल, विखुरलेल्या, अनाथ जड वस्तूंच्या राशीला एका प्राणाच्या ऐक्याने संजीवित ठेव; या सगळ्या मूक, निष्प्राण वस्तूंच्या न उमटलेल्या आक्रोशाने घराचे स्मशान केले आहे! 'रात्री उशिरा कधीतरी पावसाच्या धारा आणि जात्रेचे गाणे थांबले आहे. फणिभूषण खिडकीपाशी जसा बसला होता तसाच बसून आहे. खिडकीबाहेर असा जगद्व्यापी, निबिड अंधार की, त्याला वाटत होते जणू समोर यमपुरीचे गगनभेदी सिंहद्वार आहे — जणू इथे उभे राहून रडून हाक मारली, तर कायमची हरवलेली वस्तू क्षणभरासाठी एकदा दिसूही शकेल. शाईसारख्या काळ्याकुट्ट मृत्यूच्या या पटावर, या अतिशय कठीण कसोटीच्या दगडावर त्या हरवलेल्या सोन्याची एक रेघ उमटूही शकेल!
मणिहारा
'इतक्यात ठकठक अशा आवाजाबरोबरच दागिन्यांची छुमछुम ऐकू आली. अगदी असे वाटले की, आवाज नदीच्या घाटावरून वर येतो आहे. तेव्हा नदीचे पाणी आणि रात्रीचा अंधार एकजीव होऊन मिसळून गेले होते. पुलकित फणिभूषण दोन्ही उत्सुक डोळ्यांनी अंधार ढकलून ढकलून, भेदून भेदून पाहण्याचा प्रयत्न करू लागला — फुगून आलेले हृदय आणि आसुसलेली दृष्टी दुखू लागली, काहीच दिसले नाही. पाहण्याचा प्रयत्न जसजसा पराकोटीला गेला, तसतसा अंधार जणू अधिक दाट, जग जणू अधिक छायामय होत गेले. निशीथरात्री आपल्या मृत्युनिवासाच्या गवाक्षापाशी अचानक पाहुणा आलेला पाहून प्रकृतीने घाईघाईने आणखी एक पडदा ओढून घेतला. 'तो आवाज हळूहळू घाटाची सर्वांत वरची पायरी सोडून घराकडे सरकू लागला. घरासमोर येऊन थांबला. देवडीचे दार बंद करून दरवान जात्रा ऐकायला गेला होता. तेव्हा त्या बंद दारावर ठकठक छुमछुम करत धडका बसू लागल्या. जणू दागिन्यांबरोबरच एखादी कठीण वस्तू दारावर येऊन आदळत होती. फणिभूषणाला राहवले नाही. विझलेल्या दिव्यांच्या खोल्या ओलांडून, अंधाऱ्या जिन्याने उतरून तो बंद दारापाशी येऊन ठेपला. दाराला बाहेरून कुलूप होते. फणिभूषणाने दोन्ही हातांनी ते दार हलवताच, त्या धक्क्याने आणि त्याच्या आवाजाने तो दचकून जागा झाला. त्याच्या लक्षात आले, झोपेतच तो वरून खाली उतरून आला होता. त्याचे सर्वांग घामाने निथळत होते, हातपाय बर्फासारखे गार पडले होते, आणि हृदय विझू पाहणाऱ्या दिव्यासारखे फडफडत होते. स्वप्न भंगल्यावर त्याने पाहिले, बाहेर आणखी कसलाही आवाज नाही; फक्त श्रावणाच्या धारा तेव्हाही झरझर पडत होत्या, आणि त्यातच मिसळून ऐकू येत होते की, जात्रेतल्या पोरांनी पहाटेच्या सुरात तान धरली आहे.
मणिहारा
'हा सगळा प्रकार स्वप्नच असला, तरी तो इतका जवळचा आणि इतका खराखुरा होता की, फणिभूषणाला वाटले, अगदी थोडक्यासाठी आपल्या असंभव आकांक्षेच्या अद्भुत पूर्तीला आपण मुकलो. पावसाच्या पडण्याच्या त्या आवाजाबरोबर दुरून येणारी भैरवीची तान त्याला सांगू लागली — हे जागेपणच स्वप्न, हे जगच मिथ्या. 'त्याच्या दुसऱ्या दिवशीही जात्रा होती, आणि दरवानालाही सुट्टी होती. फणिभूषणाने हुकूम दिला की, आज रात्रभर देवडीचे दार उघडे राहिले पाहिजे. दरवान म्हणाला, "जत्रेच्या निमित्ताने नाना मुलखांतून नाना तऱ्हेचे लोक आलेत — दार उघडे ठेवायची छाती होत नाही." फणिभूषणाने ते मानले नाही. दरवान म्हणाला, "मग मी रात्रभर हजर राहून पहारा देतो." फणिभूषण म्हणाला, "ते चालायचे नाही; तुला जात्रा ऐकायला जायलाच हवे." दरवान थक्क झाला. 'दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दिवा विझवून फणिभूषण आपल्या शयनगृहातल्या त्याच खिडकीत येऊन बसला. आकाशात पाऊस न पाडता नुसते कोंदून राहिलेले ढग, आणि चोहीकडे कसल्यातरी अनामिक, येऊ घातलेल्या प्रतीक्षेची निःस्तब्धता. बेडकांचा अविश्रांत कलकलाट आणि जात्रेच्या गाण्याचा कर्कश आवाज ती स्तब्धता भंगू शकले नाहीत; उलट तिच्यात एक विसंगत, विचित्र रस पसरवत होते. 'रात्री उशिरा कधीतरी बेडूक, रातकिडे आणि जात्रेतली पोरे गप्प झाली, आणि रात्रीच्या अंधारावर आणखी कसलातरी एक अंधार येऊन पडला. कळून चुकले, आता वेळ आली आहे. 'आदल्या दिवसासारखा नदीच्या घाटावर ठकठक आणि छुमछुम आवाज उठला. पण फणिभूषणाने तिकडे डोळा वळवला नाही; त्याला भीती वाटली की, अधीर इच्छेने आणि अशांत धडपडीने आपली सारी इच्छा, सारी धडपड वाया जाईल. उत्कंठेचा वेग आपल्या इंद्रियांच्या शक्तीवर मात करील. त्याने आपली सारी शक्ती स्वतःच्या मनाला आवरण्यासाठी लावली — लाकडी मूर्तीसारखा ताठ, निश्चल बसून राहिला.
मणिहारा
'आज तो किणकिणाट घाटावरून हळूहळू पुढे सरकत उघड्या दारातून आत शिरला. ऐकू आले, अंतःपुराच्या गोल जिन्याने फिरत फिरत आवाज वर चढतो आहे. फणिभूषणाला आता स्वतःला आवरवेना; त्याची छाती वादळात सापडलेल्या होडीसारखी आपटू लागली, आणि श्वास कोंडायची वेळ आली. गोल जिना संपवून तो आवाज सज्ज्यावरून हळूहळू खोलीजवळ येऊ लागला. शेवटी नेमका त्या शयनगृहाच्या दारापाशी येऊन खटखट आणि छुमछुम थांबली. आता फक्त उंबरा ओलांडायचा अवकाश. 'फणिभूषणाला आता राहवले नाही. त्याचा कोंडलेला आवेग एका क्षणात प्रचंड वेगाने उफाळून आला — तो विजेच्या वेगाने खुर्चीवरून उठला आणि रडत ओरडला, "मणी!" त्याबरोबर दचकून जागा होऊन त्याने पाहिले, त्याच्याच त्या व्याकुळ किंकाळीने खोलीतली काचेची तावदानेसुद्धा घुमत, थरथरत आहेत. बाहेर तोच बेडकांचा कलकलाट आणि जात्रेतल्या पोरांच्या शिणलेल्या गळ्यांचे गाणे. 'फणिभूषणाने स्वतःच्या कपाळावर जोराने हात मारून घेतला. 'दुसऱ्या दिवशी जत्रा उठली. दुकानदार आणि जात्रेचा फड निघून गेले. फणिभूषणाने हुकूम दिला की, त्या दिवशी संध्याकाळनंतर त्याच्या घरात त्याच्याशिवाय आणखी कुणीही राहणार नाही. नोकरांनी ठरवले, बाबू तांत्रिक पद्धतीने कसलीतरी साधना करत आहेत. फणिभूषणाने दिवसभर उपवास केला. 'निर्जन घरात संध्याकाळी फणिभूषण खिडकीपाशी येऊन बसला. त्या दिवशी आकाशात जागजागी ढग नव्हते, आणि धुऊन निघालेल्या निर्मळ हवेतून तारे अतिशय तेजस्वी दिसत होते. कृष्णपक्षातल्या दशमीचा चंद्र उगवायला अजून बराच अवकाश होता. जत्रा संपून गेल्याने दुथडी भरलेल्या नदीत एकही नाव नव्हती, आणि उत्सवाच्या जागरणाने थकलेले गाव दोन रात्रींच्या जागरणानंतर आज गाढ झोपेत बुडाले होते.
मणिहारा
'फणिभूषण एका खुर्चीत बसून, खुर्चीच्या पाठीवर डोके टेकवून, वर तोंड करून तारे पाहत होता — आठवत होता, एके काळी, जेव्हा तो एकोणीस वर्षांचा होता, कलकत्त्याच्या कॉलेजात शिकत होता, जेव्हा संध्याकाळी गोलदिघीच्या हिरवळीवर उताणा पडून, हातावर डोके ठेवून, त्या अनंतकालीन ताऱ्यांकडे तो पाहत राही, आणि त्याला आठवे, नदीकाठच्या सासुरवाडीतल्या एका एकांत खोलीतला, चौदा वर्षांच्या, नुकत्याच वयात येऊ लागलेल्या मणीचा तो तेजस्वी, कोवळा चेहरा — तेव्हाचा तो विरह किती मधुर होता, तेव्हाच्या त्या ताऱ्यांचे प्रकाशस्पंदन हृदयातल्या तारुण्याच्या स्पंदनाबरोबर किती विलक्षण "वसन्तरागेण यतितालाभ्याम्" वाजत, झंकारत उठे! आज तेच तारे आगीने आकाशात मोहमुद्गराचे ते काही श्लोक लिहून ठेवून म्हणत आहेत, "संसारोऽयमतीव विचित्रः!" 'पाहता पाहता सगळे तारे लुप्त झाले. आकाशातून एक अंधार उतरून आणि पृथ्वीवरून एक अंधार वर येऊन, डोळ्याच्या वरच्या आणि खालच्या पापण्यांसारखे एकत्र येऊन मिटले. आज फणिभूषणाचे चित्त शांत होते. त्याला खात्री होती की, आज त्याचे इच्छित सिद्धीस जाईल, साधकापुढे मृत्यू आपले रहस्य उघडे करील. 'आदल्या रात्रीसारखा तो आवाज नदीच्या पाण्यातून घाटाच्या पायऱ्यांवर चढला; फणिभूषण दोन्ही डोळे मिटून, स्थिर, दृढ मनाने ध्यानाला बसला. आवाज पहारेकरी नसलेल्या देवडीत शिरला — आवाज निर्जन अंतःपुराच्या गोल जिन्यातून फिरत फिरत वर चढू लागला — आवाजाने लांबलचक सज्जा पार केला — आणि शयनगृहाच्या दारापाशी येऊन क्षणभर थांबला.
मणिहारा
'फणिभूषणाचे हृदय व्याकुळ झाले आणि सर्वांगावर काटा उभा राहिला, पण आज त्याने डोळे उघडले नाहीत. आवाज उंबरा ओलांडून अंधाऱ्या खोलीत शिरला. दांडीपाशी, जिथे साडी निऱ्या घालून ठेवली आहे; कोनाड्यापाशी, जिथे रॉकेलचा दिवा उभा आहे; तिपाईपाशी, जिथे पानाच्या डब्यात विडे सुकले आहेत; आणि नाना वस्तूंनी भरलेल्या त्या कपाटापाशी, प्रत्येक ठिकाणी एकेकदा थांबून शेवटी तो आवाज फणिभूषणाच्या अगदी जवळ येऊन थांबला. 'तेव्हा फणिभूषणाने डोळे उघडले, आणि पाहिले — खोलीत नुकत्याच उगवलेल्या दशमीच्या चंद्राचे चांदणे आत आले आहे, आणि त्याच्या खुर्चीसमोर बरोबर एक सांगाडा उभा आहे. त्या सांगाड्याच्या आठ बोटांत अंगठ्या, तळहातावर रत्नचक्र, मनगटांत कडी, दंडांवर बाजूबंद, गळ्यात कंठी, भांगात बिजवरा; डोक्यापासून पायापर्यंत हाडाहाडावर एकेक अलंकार सोन्या-हिऱ्यांनी झगमगतो आहे! दागिने ढिले होऊन डुचमळत होते, पण अंगावरून गळून पडत नव्हते. सगळ्यांत भयंकर म्हणजे, त्याच्या हाडांच्या चेहऱ्यात त्याचे दोन डोळे जिवंत होते — त्याच काळ्याभोर बाहुल्या, त्याच दाट लांब पापण्या, तीच पाणीदार चमक, तीच अविचल, दृढ, शांत दृष्टी. आजपासून अठरा वर्षांपूर्वी एके दिवशी दिव्यांनी उजळलेल्या मांडवात, चौघड्यावरच्या सहाना रागाच्या आलापात, शुभदृष्टीच्या क्षणी फणिभूषणाने जे दोन विशाल, सुंदर, काळेभोर, ओथंबलेले डोळे पहिल्यांदा पाहिले होते, तेच दोन डोळे आज श्रावणातल्या मध्यरात्री, कृष्णपक्षातल्या दशमीच्या चंद्रकिरणांत त्याने पाहिले — पाहून त्याच्या सर्वांगातले रक्त गोठून गेले. जिवाच्या आकांताने त्याने दोन्ही डोळे मिटण्याचा प्रयत्न केला, पण काही केल्या जमले नाही; त्याचे डोळे मेलेल्या माणसाच्या डोळ्यांसारखे पापणी न लवता पाहतच राहिले.
मणिहारा
'तेव्हा त्या सांगाड्याने स्तंभित फणिभूषणाच्या चेहऱ्यावर आपली दृष्टी स्थिर ठेवून उजवा हात उचलला, आणि मूकपणे बोटाच्या इशाऱ्याने बोलावले. त्याच्या चार बोटांच्या हाडांवर हिऱ्याच्या अंगठ्या लखलखल्या. 'फणिभूषण भारावल्यासारखा उठून उभा राहिला. सांगाडा दाराकडे निघाला; हाडांवर हाडे, दागिन्यांवर दागिने आपटून कठीण आवाज होऊ लागला. फणिभूषण दोऱ्यांनी बांधलेल्या कळसूत्री बाहुलीसारखा त्याच्या पाठोपाठ चालला. सज्जा पार केला, गडद अंधाऱ्या गोल जिन्याने फिरत फिरत, खटखट ठकठक छुमछुम करत दोघे खाली उतरले. खालचा सज्जा ओलांडून निर्जन, दिवे नसलेल्या देवडीत शिरले; शेवटी देवडी पार करून विटांची खडी घातलेल्या बागेच्या वाटेवर बाहेर पडले. हाडे पडताच खडी कडकड वाजू लागली. तिथे क्षीण चांदणे दाट फांद्यांत अडकून पडले होते, त्याला कुठेही सुटकेची वाट सापडत नव्हती; पावसाळ्याच्या दाट गंधाने भरलेल्या त्या अंधाऱ्या छायावाटेवरून, काजव्यांच्या थव्यांमधून दोघे नदीच्या घाटावर येऊन पोहोचले. 'घाटाच्या ज्या पायऱ्यांवरून आवाज वर चढला होता, त्याच पायऱ्यांवरून तो अलंकृत सांगाडा आपल्या न डोलणाऱ्या, ताठ चालीने कठीण आवाज करत एकेक पाऊल खाली उतरू लागला. पावसाळ्यात दुथडी भरलेल्या नदीच्या प्रबळ प्रवाहावर चांदण्याची एक लांब रेघ झिकमिकत होती.
मणिहारा
'सांगाडा नदीत उतरला; पाठोपाठ आलेल्या फणिभूषणानेही पाण्यात पाऊल ठेवले. पाण्याचा स्पर्श होताक्षणी फणिभूषणाची गुंगी उडाली. समोर आता त्याचा वाटाड्या नव्हता — फक्त नदीच्या पैलतीरी झाडे स्तब्ध उभी होती, आणि त्यांच्या माथ्यावरून अर्धा चंद्र शांत, अवाक् होऊन पाहत होता. डोक्यापासून पायापर्यंत पुन्हा पुन्हा शहारत, पाय घसरून फणिभूषण प्रवाहात पडला. पोहता येत होते, तरी मज्जातंतूंनी त्याचे ऐकले नाही — स्वप्नातून केवळ क्षणभर जागेपणाच्या काठापर्यंत येऊन, दुसऱ्याच क्षणी तो अथांग निद्रेत बुडून गेला.' गोष्ट संपवून शाळामास्तर थोडा वेळ थांबले. ते अचानक थांबताक्षणी जाणवले की, त्यांच्याशिवाय जगातले बाकी सगळे या दरम्यान नीरव, निःस्तब्ध झाले आहे. बराच वेळ मी एक शब्दही बोललो नाही, आणि अंधारात त्यांना माझ्या चेहऱ्यावरचा भावही दिसला नाही. त्यांनी मला विचारले, 'आपला या गोष्टीवर विश्वास बसला नाही का?' मी विचारले, 'आपला यावर विश्वास आहे का?' ते म्हणाले — 'नाही. का नाही, याची काही कारणे देतो. पहिले म्हणजे, प्रकृतीदेवी काही कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखिकाबाई नव्हेत; त्यांच्या हातात भरपूर कामे आहेत —' मी म्हणालो, 'दुसरे म्हणजे, माझेच नाव श्रीयुत फणिभूषण साहा.' शाळामास्तर जराही न ओशाळता म्हणाले, 'म्हणजे माझा अंदाज बरोबरच होता तर. आपल्या पत्नीचे नाव काय होते?' मी म्हणालो, 'नृत्यकाली.'