रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
नयनजोरचे बाबू
१ नयनजोरचे जमीनदार एके काळी 'बाबू' म्हणून विशेष प्रसिद्ध होते. त्या काळी बाबूगिरीचा आदर्श गाठणे काही सोपे नव्हते. आज जसे राजा किंवा रायबहादूर हा किताब मिळवण्यासाठी पुष्कळांना मेजवान्या, नाच, घोड्यांच्या शर्यती आणि सलाम-शिफारशी यांच्यापायी पैशाची होळी करावी लागते, तसेच तेव्हाही लोकांकडून 'बाबू' ही पदवी मिळवण्यासाठी बरीच दुष्कर तपश्चर्या करावी लागत असे. आमच्या नयनजोरचे बाबू ढाक्याची तलम वस्त्रे काठ फाडून टाकून नेसत, कारण काठाच्या खरखरीतपणाने त्यांच्या सुकोमल बाबूगिरीला इजा होत असे. ते लाख रुपये खर्चून मांजरीच्या पिल्लांची लग्ने लावत; आणि असे सांगतात की, एकदा कुठल्याशा उत्सवाच्या निमित्ताने रात्रीचा दिवस करण्याची प्रतिज्ञा करून त्यांनी असंख्य दिवे लावले होते आणि सूर्यकिरणांची नक्कल म्हणून वरून अस्सल चांदीच्या जरीचा वर्षाव करवला होता. यावरूनच सर्वांच्या लक्षात येईल की त्या काळी बाबूंची बाबूगिरी पिढ्यान् पिढ्या टिकू शकत नसे. अनेक वातींच्या दिव्यासारखी ती आपले तेल आपणच थोड्याच काळात थाटामाटात जाळून संपवून टाकी. आमचे कैलासचंद्र रायचौधुरी हे त्याच नामांकित नयनजोरचे एक विझलेले बाबू. त्यांचा जन्म झाला तेव्हा तेल दिव्याच्या तळाशी जाऊन टेकले होते; त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर नयनजोरची बाबूगिरी काही असामान्य श्राद्धविधींमध्ये अखेरची झगमग दाखवून एकाएकी विझून गेली. सगळी जमीनजुमला, मालमत्ता कर्जापायी विकली गेली—जे थोडेफार उरले त्यात पूर्वजांची कीर्ती राखणे अशक्य होते.
नयनजोरचे बाबू
म्हणून नयनजोर सोडून, मुलाला बरोबर घेऊन कैलासबाबू कलकत्त्याला येऊन राहिले—आणि त्यांच्या मुलानेही एक मुलगी तेवढी मागे ठेवून या गतवैभव संसाराचा त्याग केला आणि ते परलोकी निघून गेले. आम्ही त्यांचे कलकत्त्यातले शेजारी. आमचा इतिहास त्यांच्या अगदी उलट. माझ्या वडिलांनी स्वतःच्या कष्टाने पैसा कमावला होता. ते कधीही गुडघ्याच्या खाली धोतर नेसत नसत, कवडी-दमडीचा हिशेब ठेवत, आणि 'बाबू' पदवी मिळवण्याची त्यांना हाव नव्हती. त्याबद्दल मी, त्यांचा एकुलता एक मुलगा, त्यांचा ऋणी आहे. मी लिहायला-वाचायला शिकलो आणि स्वतःचे प्राण आणि मान राखण्याइतका पुरेसा पैसा मला काहीही कष्ट न करता मिळाला, हीच मी मोठ्या अभिमानाची गोष्ट मानतो—रिकाम्या खजिन्यातल्या वडिलोपार्जित बाबूगिरीच्या उज्ज्वल इतिहासापेक्षा लोखंडी तिजोरीतले वडिलोपार्जित कंपनी सरकारचे रोखे मला कितीतरी अधिक मोलाचे वाटतात. बहुधा त्याच कारणामुळे, कैलासबाबू आपल्या पूर्ववैभवाच्या बुडालेल्या बँकेवर जेव्हा सढळ हाताने लांबलचक चेक फाडत, तेव्हा ते मला इतके असह्य वाटे. मला वाटे, माझ्या वडिलांनी स्वतःच्या हातांनी पैसा कमावला म्हणून कैलासबाबू बहुधा मनातल्या मनात आम्हाला तुच्छ लेखत असावेत. मला राग येई आणि मी विचार करी, तुच्छ लेखण्याजोगा कोण? ज्या माणसाने आयुष्यभर कठोर त्याग करून, नाना मोहांवर मात करून, लोकांच्या तोंडच्या क्षुल्लक कीर्तीकडे दुर्लक्ष करून, अथक आणि सावध बुद्धिकौशल्याने सगळे प्रतिकूल अडथळे परतवून लावून, सगळ्या अनुकूल संधी आपल्या मुठीत घेऊन, चांदीचा एकेक थर रचत संपत्तीचा एक उत्तुंग पिरॅमिड एकट्याने स्वहस्ते उभा केला, तो माणूस केवळ गुडघ्याखाली धोतर नेसत नसे म्हणून काही कमी योग्यतेचा ठरत नाही!
नयनजोरचे बाबू
तेव्हा वय कमी होते, म्हणून असे वाद घालत असे, रागावत असे—आता वय झाले आहे, आता वाटते, काय बिघडले! माझ्याकडे तर अमाप संपत्ती आहे, मला कशाची उणीव? ज्याच्याकडे काहीच नाही, तो जर अहंकार बाळगून सुखी होत असेल, तर त्यात माझे तर दमडीचेही नुकसान नाही, उलट त्या बिचाऱ्याला तेवढाच दिलासा. हेही दिसून आले की माझ्याशिवाय दुसरे कोणीही कैलासबाबूंवर रागावत नसे. कारण इतका निरुपद्रवी माणूस सहसा पाहायला मिळत नाही. कार्यप्रसंगी, सुखदुःखात शेजाऱ्यापाजाऱ्यांशी त्यांचा पुरा सहभाग असे. लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत कुणीही भेटला की ते लगेच हसतमुखाने प्रेमाने विचारपूस करत—जिथे ज्याचे जे कोणी असेल त्या सगळ्यांचे क्षेमकुशल विचारून झाल्यावरच त्यांच्या सौजन्याला विराम मिळे. त्यामुळे कोणाशीही त्यांची भेट झाली की प्रश्नोत्तरांची एक लांबलचक माळ तयार होई: 'बरे आहात ना? शशी बरा आहे? आमचे मोठे बाबू बरे आहेत? मधूच्या मुलाला ताप आला होता म्हणून ऐकलं होतं, आता तो बरा आहे ना? हरिचरणबाबूंना कित्येक दिवसांत पाहिलं नाही, त्यांना काही दुखणंबिखणं तर नाही ना? तुमच्या राखालची काय खबर? घरची सगळी मंडळी बरी आहेत ना?' इत्यादी. माणूस मोठा स्वच्छ, नीटनेटका. कपडेलत्ते फारसे नव्हते, पण मिरजई, उपरणे, सदरा, इतकेच काय अंथरुणावर घालायची एक जुनी लोकरी चादर, उशीचा अभ्रा, एक लहानशी सतरंजी—सगळे ते स्वतःच्या हाताने उन्हात घालून, झटकून, दोरीवर वाळत टाकून, घड्या करून दांडीवर नीटनेटके ठेवत. ते जेव्हा केव्हा दिसत तेव्हा असे वाटे की ते सजून तयारच आहेत. थोड्याशा साध्या सामानानेही त्यांचे घरदार लखलखीत दिसे. असे वाटे की त्यांच्याकडे यापेक्षा पुष्कळ काही आहे.
नयनजोरचे बाबू
नोकर नसल्यामुळे पुष्कळदा खोलीचे दार लावून घेऊन ते स्वतःच्या हाताने अतिशय नीटनेटक्या निऱ्या घालून धोतर तयार ठेवत आणि उपरण्याला व सदऱ्याच्या बाह्यांना मोठ्या काळजीने आणि कष्टाने बारीक चुण्या पाडून ठेवत. त्यांच्या मोठमोठ्या जमीनदाऱ्या आणि मौल्यवान मालमत्ता नाहीशी झाली होती, पण एक मौल्यवान गुलाबदाणी, अत्तरदाणी, एक सोन्याची रकाबी, एक चांदीचा आलबोला हुक्का, एक मौल्यवान शाल आणि जुन्या पद्धतीचा जामाजोडा व पगडी एवढ्या वस्तू त्यांनी मोठ्या प्रयत्नाने दारिद्र्याच्या घशातून वाचवल्या होत्या. एखादा प्रसंग उभा राहिला की या वस्तू बाहेर निघत आणि नयनजोरच्या जगद्विख्यात बाबूंची इज्जत राखली जाई. तसे पाहता कैलासबाबू स्वभावाने अगदी साधेभोळे, मऊ असले तरी बोलण्यात जो अहंकार दाखवत तो जणू पूर्वजांविषयीचे कर्तव्य म्हणून दाखवत; सगळे लोक ते कौतुकाने चालवून घेत आणि त्यात त्यांना खास मजा वाटे. आळीतले लोक त्यांना 'आजोबा' म्हणत आणि त्यांच्याकडे नेहमी पुष्कळ लोकांची ये-जा असे; पण या गरिबीच्या दिवसांत त्यांचा तंबाखूचा खर्च जड होऊ नये म्हणून बहुधा आळीतला कोणी ना कोणी एक-दोन शेर तंबाखू विकत घेऊन जाई आणि त्यांना म्हणे, 'आजोबा, जरा ओढून पाहा बरं, चांगला गयेचा तंबाखू मिळालाय.' आजोबा एक-दोन झुरके घेऊन म्हणत, 'छान रे बाबा, छान तंबाखू आहे.' लगेच त्या निमित्ताने तोळ्याला साठ-पासष्ट रुपये भावाच्या तंबाखूची गोष्ट काढत; आणि विचारत, तो तंबाखू कोणाला चाखून पाहायची इच्छा आहे का?
नयनजोरचे बाबू
सगळ्यांना ठाऊक होते की जर कोणी इच्छा दाखवली तर किल्लीचा पत्ता निश्चितच लागणार नाही, किंवा पुष्कळ शोधाशोध केल्यानंतर उघड होईल की तो जुना नोकर गणेश्या कुठे काय ठेवतो याचा काही नेमच नाही—आणि गणेशही एका शब्दाने विरोध न करता सगळा आळ मुकाट्याने आपल्या माथी घेईल. म्हणून सगळे एकमुखाने म्हणत, 'आजोबा, राहू द्या, तो तंबाखू आम्हाला झेपायचा नाही, आम्हाला हाच बरा.' ते ऐकून आजोबा दुसरा शब्द न काढता किंचित हसत. सगळे निरोप घेऊन निघू लागले की म्हातारबुवा एकदम म्हणत, 'ते असो, पण तुम्ही माझ्याकडे जेवायला कधी येताय ते सांगा पाहू, बाबांनो?' लगेच सगळे म्हणत, 'त्यासाठी एखादा दिवस ठरवून पाहू.' आजोबा म्हणत, 'तेच बरं. जरा पाऊस पडू दे, गारवा येऊ दे, नाहीतर या उकाड्यात जड जेवण काही खरं नाही.' पाऊस पडू लागला की आजोबांना कोणीही त्यांच्या प्रतिज्ञेची आठवण करून देत नसे—उलट विषय निघाला की सगळे म्हणत, 'ही पावसाची झड थांबल्याशिवाय काही जमायचं नाही.' लहानशा भाड्याच्या घरात राहणे त्यांना शोभत नाही आणि त्रासही होतो, हे त्यांचे सगळे मित्र त्यांच्या तोंडावर कबूल करत; पण त्याच वेळी कलकत्त्यात विकत घेण्याजोगे घर मिळणे किती कठीण आहे याविषयीही कोणाला शंका नव्हती—इतकेच काय, गेली सहा-सात वर्षे शोधूनही भाड्याने घेण्याजोगे एखादे मोठे घर आळीतल्या कोणालाच सापडले नाही—शेवटी आजोबा म्हणत, 'असू दे रे बाबांनो, तुमच्या जवळपास आहे हेच माझं सुख. नयनजोरला मोठा वाडा पडूनच आहे, पण तिथे मन रमतंय कुठे?'
नयनजोरचे बाबू
मला वाटते, आजोबांनाही ठाऊक होते की सगळ्यांना त्यांची परिस्थिती ठाऊक आहे; आणि जेव्हा ते भूतकाळात जमा झालेले नयनजोर आजही असल्याचे भासवत आणि इतर सगळेही त्यात सामील होत, तेव्हा ते मनोमन समजून असत की एकमेकांचा हा बनाव केवळ एकमेकांवरच्या जिव्हाळ्यापोटी आहे. पण मला मात्र विलक्षण चीड येई. कोवळ्या वयात दुसऱ्याचा निरुपद्रवी गर्वसुद्धा ठेचावासा वाटतो, आणि हजार गंभीर अपराधांपेक्षा मूर्खपणाच सर्वात असह्य वाटतो. कैलासबाबू अगदीच मूर्ख होते असे नाही; कामकाजात त्यांची मदत आणि सल्ला सगळ्यांनाच हवासा वाटे. पण नयनजोरच्या वैभवाचे प्रदर्शन करण्याच्या बाबतीत त्यांना जराही तारतम्य नव्हते! सगळे त्यांच्यावर प्रेम करत आणि गंमत म्हणून त्यांच्या कुठल्याही अशक्य गोष्टीला विरोध करत नसत, त्यामुळे त्यांना आपल्या बोलण्याचे माप राखता येत नसे. इतर लोकही जेव्हा गंमत म्हणून किंवा त्यांना खूश करण्यासाठी नयनजोरच्या कीर्तीविषयी भरमसाट अतिशयोक्ती करत, तेव्हा ते सारे काही बिनदिक्कत स्वीकारत, आणि दुसरा कोणी या गोष्टींवर लवमात्र अविश्वास ठेवू शकेल अशी शंकासुद्धा त्यांना स्वप्नातही येत नसे.
नयनजोरचे बाबू
मला कधी कधी वाटे, म्हातारा ज्या खोट्या किल्ल्याचा आसरा घेऊन राहतो आहे आणि तो चिरकाल टिकेल असे समजतो आहे, तो किल्ला दोन तोफगोळ्यांत सगळ्यांसमोर उडवून द्यावा. एखादा पक्षी सोयीस्कर फांदीवर बसलेला दिसला की शिकाऱ्याला त्याच्यावर गोळी झाडावीशी वाटते; डोंगराच्या कडेला एखादा दगड आता पडेल की मग असा दिसला की पोराला एक लाथ मारून तो गडगडवून द्यावासा वाटतो—जी वस्तू प्रत्येक क्षणी पडू-पडू करत असते पण तरीही कशाला तरी चिकटून राहिलेली असते, तिला ढकलून दिली की मगच जणू तिची पूर्तता होते आणि पाहणाऱ्याच्या मनाला समाधान मिळते. कैलासबाबूंच्या थापा इतक्या भोळ्या, त्यांचा पाया इतका कमकुवत, आणि त्या सत्याच्या बंदुकीच्या नेमासमोर अशा छाती फुगवून नाचत की त्यांचा क्षणार्धात नाश करण्याची एक ऊर्मी उसळून येई—केवळ निव्वळ आळसापोटी आणि सर्वमान्य रीतीला धरून मी त्या कामाला हात घालत नसे. २ स्वतःच्या पूर्वीच्या मनःस्थितीचे विश्लेषण करता, जितके आठवते त्यावरून वाटते की कैलासबाबूंविषयी माझ्या मनात असलेल्या द्वेषाचे आणखी एक गूढ कारण होते. ते जरा सविस्तर सांगणे आवश्यक आहे. मी श्रीमंताचा मुलगा असूनही वेळच्या वेळी एम. ए. पास झालो; तरुण वय असूनही कुठल्याही वाईट संगतीत किंवा घाणेरड्या चैनीत भाग घेतला नाही; आणि पालकांच्या मृत्यूनंतर स्वतःच कर्ता झाल्यावरही माझ्या स्वभावात कोणत्याही प्रकारची विकृती आली नाही. शिवाय माझे रूप असे आहे की त्याला मी स्वतःच्या तोंडाने देखणे म्हटले तर अहंकार ठरेल, पण असत्य ठरणार नाही.
नयनजोरचे बाबू
त्यामुळे बंगालच्या लग्नाच्या बाजारात माझी किंमत अतिशय जास्त आहे यात काहीच शंका नव्हती—या बाजारात मी माझी ती किंमत पुरेपूर वसूल करून घेणार, असा मी दृढ निश्चय केला होता. श्रीमंत बापाची, परम रूपवती, एकुलती एक, विदुषी कन्या माझ्या कल्पनेत आदर्श म्हणून विराजमान झाली होती. दहा हजार, वीस हजार रुपये हुंड्याचे प्रस्ताव घेऊन देशोदेशींहून माझ्यासाठी स्थळे येऊ लागली. मी स्थिर चित्ताने तराजू हातात धरून त्यांची योग्यायोग्यता तोलून पाहत होतो; कोणतेही स्थळ मला माझ्या तोलामोलाचे वाटले नाही. शेवटी भवभूतीप्रमाणे माझीही धारणा झाली होती की— कोण जाणे, जन्मेलही कुणी माझ्या तोलाचा, काळाला अंत नाही, विस्तार अफाट धरणीचा. पण सध्याच्या काळात आणि या चिमुकल्या बंगालमध्ये तो अशक्य, दुर्लभ पदार्थ जन्मला असेल की नाही, याची शंकाच होती. मुलीच्या लग्नाच्या काळजीने ग्रासलेले बाप सतत नाना निमित्तांनी माझी स्तुतिस्तोत्रे गाऊ लागले आणि नाना उपचारांनी माझी पूजा करू लागले. मुलगी पसंत पडो वा न पडो, ही पूजा मला काही वाईट वाटली नाही. मी गुणी मुलगा, म्हणून मुलींच्या बापांकडून होणारी ही पूजा हा माझा रास्त हक्कच आहे, असे मी ठरवून टाकले होते. शास्त्रांत वाचायला मिळते की देव वर देवो वा न देवो, यथाविधी पूजा मिळाली नाही तर तो भयंकर कोपतो. नियमित पूजा मिळत गेल्याने माझ्याही मनात तसाच अत्युच्च देवभाव जागा झाला होता.
नयनजोरचे बाबू
आधीच सांगितले आहे की आजोबांना एक नात होती. तिला मी पुष्कळदा पाहिले होते, पण ती रूपवती आहे असा भ्रम मला कधी चुकूनही झाला नाही. त्यामुळे तिच्याशी लग्न करण्याची कल्पनाही माझ्या मनात आली नव्हती. पण मी असे ठरवून ठेवले होते की कैलासबाबू कोणामार्फत किंवा स्वतः, नातीला अर्घ्य म्हणून अर्पण करण्याच्या हेतूने माझ्या पूजेची घटस्थापना करायला येतील, कारण मी गुणी मुलगा. पण त्यांनी तसे केले नाही. ऐकले की त्यांनी माझ्या एका मित्राला सांगितले होते, नयनजोरच्या बाबूंनी कधीही कोणत्याही बाबतीत पुढे होऊन कोणापाशी याचना केलेली नाही—मुलगी जन्मभर कुमारी राहिली तरी ती कुलरीत ते मोडू शकणार नाहीत. ते ऐकून मला फार राग आला. तो राग पुष्कळ दिवस माझ्या मनात घर करून होता—केवळ गुणी मुलगा म्हणूनच मी गप्प बसलो होतो. जशी वज्राबरोबर वीज असते, तसा माझ्या स्वभावात रागाबरोबरच एक थट्टेखोरपणा गुंतलेला होता. म्हाताऱ्याला निव्वळ छळणे माझ्याच्याने झाले नसते—पण एके दिवशी अचानक माझ्या डोक्यात असा एक गमतीदार प्लॅन आला की तो अमलात आणण्याचा मोह मला आवरता आला नाही. आधी सांगितलेच आहे की म्हाताऱ्याला खूश करण्यासाठी नाना लोक नाना थापा रचत. आळीतले एक पेन्शनर डेप्युटी मॅजिस्ट्रेट नेहमी म्हणत, 'आजोबा, छोटे लाटसाहेब भेटले की नयनजोरच्या बाबूंची खबर घेतल्याशिवाय सोडत नाहीत—साहेब म्हणतात, बंगालमध्ये बर्धमानचे राजे आणि नयनजोरचे बाबू ही दोनच खरी खानदानी घराणी आहेत.'
नयनजोरचे बाबू
आजोबा भलतेच खूश होत—आणि माजी डेप्युटीबाबू भेटले की इतर क्षेमकुशलाबरोबर विचारत, 'छोटे लाटसाहेब बरे आहेत? त्यांच्या मेमसाहेब बऱ्या आहेत? त्यांची मुलेबाळे सगळी बरी आहेत?' लवकरच एके दिवशी साहेबांच्या भेटीला जाण्याची इच्छाही ते बोलून दाखवत. पण माजी डेप्युटींना पक्के ठाऊक होते की नयनजोरची प्रसिद्ध चौघोडी गाडी तयार होऊन दारात येईपर्यंत कितीतरी छोटे लाट आणि मोठे लाट बदलून जातील! मी एके दिवशी सकाळी जाऊन कैलासबाबूंना बाजूला बोलावले आणि हळूच कानात सांगितले, 'आजोबा, काल मी लेफ्टनंट गव्हर्नरच्या लेव्ही-दरबाराला गेलो होतो. त्यांनी नयनजोरच्या बाबूंचा विषय काढला, तेव्हा मी म्हणालो, नयनजोरचे कैलासबाबू कलकत्त्यातच आहेत—ते ऐकून, इतके दिवस तुमची भेट झाली नाही म्हणून छोट्या लाटसाहेबांना फार वाईट वाटलं—त्यांनी सांगितलंय, आजच दुपारी ते गुपचूप तुम्हाला भेटायला येतील.' दुसरा कोणी असता तर ही गोष्ट अशक्य आहे हे त्याला कळले असते, आणि दुसऱ्या कोणाविषयी असती तर कैलासबाबूही या बोलण्यावर हसले असते—पण स्वतःविषयी असल्यामुळे ही बातमी त्यांना लवमात्र अविश्वसनीय वाटली नाही. ऐकून ते जितके खूश झाले तितकेच अस्वस्थही झाले—कुठे बसवायचे, काय करायचे, स्वागत कसे करायचे—कोणत्या उपायाने नयनजोरची इज्जत राखली जाईल, काहीच त्यांना सुचेना. शिवाय त्यांना इंग्रजी येत नव्हते; बोलणे कसे चालवायचे, हाही एक प्रश्नच होता. मी म्हणालो, त्याची काळजी नको, त्यांच्याबरोबर एक दुभाषी असतोच; पण छोट्या लाटसाहेबांची खास इच्छा आहे की दुसरे कोणीही हजर असू नये. दुपारी आळीतले बहुतेक लोक कचेरीत गेलेले आणि उरलेले दार लावून गाढ झोपलेले असताना कैलासबाबूंच्या बिऱ्हाडासमोर एक जोडीची गाडी येऊन उभी राहिली.
नयनजोरचे बाबू
बिल्ला लावलेल्या चपराशाने त्यांना वर्दी दिली, 'छोटे लाट साहब आया!' आजोबा जुन्या काळच्या रिवाजाप्रमाणे शुभ्र जामाजोडा आणि पगडी घालून तयार होऊन बसले होते; त्यांचा जुना नोकर गणेश यालाही त्यांनी त्याचे स्वतःचे धोतर, उपरणे, सदरा घालायला लावून व्यवस्थित तयार ठेवले होते. छोटे लाट आल्याची वर्दी ऐकताच ते धापा टाकत, थरथरत धावत दारापाशी जाऊन पोचले—आणि कमरेत वाकून पुन्हा पुन्हा सलाम करत करत इंग्रजी पोशाखातल्या माझ्या एका जिवलग मित्राला आत घेऊन गेले. तिथे चौकीवर त्यांनी आपली एकुलती एक मौल्यवान शाल पसरून ठेवली होती; तिच्यावरच त्या नकली छोट्या लाटांना बसवून त्यांनी उर्दूत एक अतिशय नम्र, लांबलचक भाषण वाचून दाखवले, आणि नजराणा म्हणून सोन्याच्या रकाबीत, मोठ्या कष्टाने जपलेली, पिढ्यान् पिढ्या चालत आलेली अशरफ्यांची एक माळ पुढे केली. जुना नोकर गणेश गुलाबदाणी आणि अत्तरदाणी घेऊन हजर होता. कैलासबाबू पुन्हा पुन्हा खेद व्यक्त करू लागले की हुजूर बहादुरांची पायधूळ त्यांच्या नयनजोरच्या वाड्यात लागली असती तर त्यांना यथाशक्ती यथोचित आदरातिथ्याची व्यवस्था करता आली असती—कलकत्त्यात ते परदेशी आहेत—इथे ते पाण्याबाहेरच्या माशासारखे सर्वच बाबतीत असमर्थ आहेत—इत्यादी. माझा मित्र उंच हॅटसकट अत्यंत गंभीरपणे मान हलवत राहिला. इंग्रजी रीतीनुसार अशा वेळी डोक्यावर टोपी असायला नको होती, पण पकडले जाण्याच्या भीतीने शक्य तितके झाकलेले राहावे म्हणून माझ्या मित्राने हॅट काढली नव्हती. कैलासबाबू आणि त्यांचा गर्वाने आंधळा झालेला जुना नोकर सोडून इतर कोणीही एका क्षणात बंगाल्याचे हे सोंग ओळखू शकले असते.
नयनजोरचे बाबू
दहा मिनिटे मान डोलावल्यानंतर माझा मित्र उठला, आणि आधी शिकवून ठेवल्याप्रमाणे चपराशांनी सोन्याच्या रकाबीसकट अशरफ्यांची माळ, चौकीवरची ती शाल आणि नोकराच्या हातातली गुलाबदाणी व अत्तरदाणी गोळा करून सोंगाड्याच्या गाडीत ठेवल्या—कैलासबाबूंनी समजून घेतले, ही छोट्या लाटसाहेबांची रीतच आहे. मी बाजूच्या एका खोलीत लपून गुपचूप पाहत होतो, आणि दाबून धरलेल्या हसण्याच्या उमाळ्याने माझ्या बरगड्या फुटायची वेळ आली होती. शेवटी कसेच आवरेना म्हणून मी धावत जरा दूरच्या एका खोलीत शिरलो—आणि तिथे हसण्याचा बांध मोकळा सोडतो तोच अचानक पाहतो, तो एक मुलगी लाकडी पलंगावर पालथी पडून मुसमुसून रडते आहे. मला अचानक खोलीत शिरून हसताना पाहून ती तत्काळ पलंगावरून उठून उभी राहिली—आणि अश्रूंनी दाटलेल्या कंठात संतापाची गर्जना आणून, आपल्या पाणावलेल्या, विशाल, काळ्याभोर डोळ्यांतून माझ्या तोंडावर तीक्ष्ण विजांचा वर्षाव करत म्हणाली, 'माझ्या आजोबांनी तुमचं काय वाकडं केलंय—का तुम्ही त्यांना फसवायला आलात—का आलात तुम्ही—' पुढे तिला काहीच शब्द सुचेना—कंठ दाटून येऊन, तोंडाला पदर लावून ती रडू लागली. कुठे गेला माझा हसण्याचा उमाळा! मी जे केले होते त्यात गंमतीशिवाय आणखी काही होते, हे आतापर्यंत माझ्या डोक्यातच आले नव्हते—अचानक दिसले की अत्यंत कोमल जागी मी अत्यंत कठोर घाव घातला आहे; अचानक माझ्या कृत्याची बीभत्स निष्ठुरता माझ्यासमोर लख्ख उभी राहिली—लाज आणि पश्चात्ताप यांनी, लाथ बसलेल्या कुत्र्यासारखा मी त्या खोलीतून निःशब्दपणे बाहेर पडलो. म्हाताऱ्याने माझा काय अपराध केला होता? त्याच्या निरुपद्रवी अहंकाराने तर कधी कुठल्याही जिवाला दुखावले नव्हते. मग माझ्या अहंकाराने असे हिंस्र रूप का धारण केले?
नयनजोरचे बाबू
शिवाय आज आणखी एका बाबतीत अचानक माझे डोळे उघडले. इतके दिवस मी कुसुममणीकडे, एखाद्या अविवाहित वराची प्रसन्न नजर पडण्याच्या प्रतीक्षेत राखून ठेवलेल्या विक्रीच्या मालासारखे पाहत होतो—वाटे, मी पसंत केली नाही म्हणून ती पडून आहे; योगायोगाने ज्याला ती पसंत पडेल, त्याची ती होईल. आज दिसले की या घराच्या कोपऱ्यात, त्या बालिकेच्या मूर्तीआड एक माणसाचे हृदय आहे. आपली सुखे-दुःखे, प्रीती-विरक्ती घेऊन एक अंतःकरण एकीकडे अज्ञेय भूतकाळ आणि दुसरीकडे अकल्पित भविष्यकाळ नावाच्या दोन अनंत रहस्यराज्यांकडे, पूर्वेला आणि पश्चिमेला पसरलेले आहे. ज्या माणसाच्या आत हृदय आहे, त्याची निवड काय केवळ हुंड्याचे पैसे आणि नाक-डोळ्यांची मापे मोजून करायची असते? रात्रभर झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे म्हातारबुवांच्या सगळ्या पळवलेल्या मौल्यवान वस्तू घेऊन मी चोरासारखा हळूच आजोबांच्या बिऱ्हाडात शिरलो—कोणालाही काही न सांगता गुपचूप नोकराच्या हाती सगळे देऊन यावे, असा बेत होता. नोकर दिसेना म्हणून मी घुटमळत होतो, तेवढ्यात जवळच्या खोलीतून म्हातारबुवा आणि ती मुलगी यांचे बोलणे ऐकू आले. मुलगी गोड, मायाळू आवाजात विचारत होती, 'आजोबा, काल लाटसाहेब तुम्हाला काय म्हणाले?' आजोबा अतिशय हरखून जाऊन लाटसाहेबांच्या तोंडी प्राचीन नयनजोर घराण्याची भरपूर काल्पनिक स्तुती घालत होते. मुलगी ते ऐकून मोठा उत्साह दाखवत होती. वृद्ध पालकासाठी आईचे काळीज बाळगणाऱ्या या चिमुकल्या मुलीच्या त्या करुण बनावाने माझे दोन्ही डोळे डबडबून आले. बराच वेळ मी गप्प बसून राहिलो—शेवटी आजोबा आपली कहाणी संपवून बाहेर आल्यावर, माझ्या फसवणुकीचा तो मुद्देमाल घेऊन मी मुलीपाशी गेलो आणि काही न बोलता सगळे तिच्यासमोर ठेवून बाहेर निघून आलो.
नयनजोरचे बाबू
आजच्या काळाच्या रिवाजाप्रमाणे इतर दिवशी वृद्धांना पाहून मी कोणत्याही प्रकारे अभिवादन करत नसे—आज त्यांना वाकून नमस्कार केला. वृद्धांना नक्कीच वाटले असणार की काल छोटे लाट त्यांच्या घरी आल्यामुळेच त्यांच्याविषयी माझ्या मनात एकाएकी भक्ती उपजली आहे. ते पुलकित होऊन शंभर तोंडांनी छोट्या लाटसाहेबांच्या गोष्टी रचून सांगू लागले—मीही काहीही विरोध न करता त्यात सामील झालो. बाहेरच्या ज्या लोकांनी हे ऐकले त्यांनी ही गोष्ट आद्यंत बनावट ठरवली, आणि गमतीने वृद्धांच्या प्रत्येक शब्दाला होकार देत गेले. सगळे उठून गेल्यावर मी अत्यंत लाजऱ्या चेहऱ्याने, नम्रपणे वृद्धांपुढे एक प्रस्ताव मांडला. म्हणालो, नयनजोरच्या बाबूंच्या कुलप्रतिष्ठेशी आमच्या घराण्याची तुलनाही होऊ शकत नाही, तरीसुद्धा— प्रस्ताव पुरा होताच वृद्धांनी मला छातीशी कवटाळले आणि आनंदाच्या भरात ते म्हणाले, 'मी गरीब माणूस—माझं असं भाग्य उजळेल हे मला ठाऊक नव्हतं रे बाबा—माझ्या कुसुमने खूप पुण्य केलं होतं, म्हणून आज तू आपण होऊन हाती आलास!' बोलता बोलता वृद्धांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. वृद्धांनी आज पहिल्यांदाच, आपल्या थोर पूर्वजांविषयीचे कर्तव्य विसरून, कबूल केले की ते गरीब आहेत; कबूल केले की मला मिळवल्याने नयनजोर घराण्याच्या प्रतिष्ठेला बाधा आलेली नाही. मी जेव्हा वृद्धांची फजिती करण्यासाठी कट रचत होतो, तेव्हा वृद्ध मला परम सत्पात्र मानून मनोमन माझीच आस धरून बसले होते.