रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
पाहुणा
१ कांठालियाचे जमीनदार मतिलालबाबू सहकुटुंब नावेनं आपल्या गावी निघाले होते. वाटेत दुपारच्या वेळी नदीकाठच्या एका पेठेजवळ नाव बांधून स्वयंपाकाची तयारी चालली होती, तेवढ्यात एक ब्राह्मणाचा मुलगा येऊन विचारू लागला, 'बाबू, तुम्ही कुठं चाललात?' विचारणाऱ्याचं वय पंधरा-सोळापेक्षा जास्त नसावं. मतिबाबूंनी उत्तर दिलं, 'कांठालियाला.' ब्राह्मणाचा मुलगा म्हणाला, 'मला वाटेत नंदीगावला उतरवाल का?' बाबूंनी होकार दिला आणि विचारलं, 'तुझं नाव काय?' ब्राह्मणाचा मुलगा म्हणाला, 'माझं नाव तारापद.' गोरापान मुलगा दिसायला फार सुंदर होता. मोठमोठे डोळे, आणि प्रसन्न, हसऱ्या ओठांवर एक लोभस कोवळेपणा झळकत होता. अंगात एक मळकट धोतर. उघडं अंग अगदी नेटकं, कुठेही काही अधिक नाही — जणू एखाद्या कारागिरानं मोठ्या निगुतीनं घोटून, सुबक गोलाई देऊन, निर्दोष घडवलं होतं. जणू पूर्वजन्मी तो कुणी तपस्वी बालक होता, आणि निर्मळ तपश्चर्येच्या प्रभावानं त्याच्या देहातला स्थूल भाग पुष्कळसा झिजून जाऊन घासूनपुसून उजळलेलं ब्राह्मण्याचं एक तेज उमलून आलं होतं. मतिलालबाबू त्याला मोठ्या मायेनं म्हणाले, 'बाळा, जा, आंघोळ करून ये; जेवणखाण इथंच होईल.'
पाहुणा
तारापद म्हणाला, 'थांबा.' आणि असं म्हणून लगेच, कसलाही संकोच न बाळगता, स्वयंपाकाच्या तयारीत सामील झाला. मतिलालबाबूंचा नोकर हिंदुस्थानी होता; मासे चिरण्यासारख्या कामांत तो फारसा तरबेज नव्हता. तारापदानं त्याचं काम आपल्या हाती घेतलं आणि थोड्याच वेळात उत्तम पार पाडलं, आणि एक-दोन भाज्याही सरावलेल्या हातानं, कौशल्यानं करून दिल्या. स्वयंपाक आटोपल्यावर तारापदानं नदीत स्नान केलं, गाठोडं सोडून एक शुभ्र धोतर नेसलं; लाकडाची एक लहानशी फणी घेऊन डोक्यावरचे लांब केस कपाळावरून मागे सारून मानेवर रुळवले, आणि स्वच्छ जानव्याचा जुडगा छातीवर रुळू देऊन तो नावेत मतिबाबूंपाशी जाऊन हजर झाला. मतिबाबू त्याला नावेच्या आतल्या खोलीत घेऊन गेले. तिथं मतिबाबूंच्या पत्नी आणि त्यांची नऊ वर्षांची मुलगी बसल्या होत्या. मतिबाबूंच्या पत्नी अन्नपूर्णा या सुंदर मुलाला पाहून मायेनं उचंबळून आल्या; मनातल्या मनात म्हणाल्या, 'अरेरे, कुणाचं हे लेकरू, कुठून आलंय कुणास ठाऊक — याला सोडून याची आई जीव धरून तरी कशी राहत असेल!' वेळ झाल्यावर मतिबाबूंसाठी आणि या मुलासाठी शेजारी शेजारी दोन पाट मांडले गेले. मुलगा फारसा खाणारा नव्हता; त्याचं थोडंसं खाणं पाहून अन्नपूर्णांना वाटलं, तो लाजतो आहे; हे घे, ते घे म्हणून त्यांनी पुष्कळ आग्रह केला; पण एकदा त्यानं हात आखडला म्हटल्यावर कुठलाही आग्रह त्यानं मानला नाही. दिसून आलं की हा मुलगा सगळं अगदी आपल्या मर्जीनं करतो, पण इतक्या सहजपणे करतो की त्यात 'हट्ट' किंवा 'हेका' असं काहीच दिसत नाही. आणि त्याच्या वागण्यात लाजेचा मागमूसही दिसला नाही.
पाहुणा
सगळ्यांची जेवणं झाल्यावर अन्नपूर्णांनी त्याला जवळ बसवून, प्रश्न विचारत विचारत, त्याची हकीकत जाणून घ्यायला सुरुवात केली. सविस्तर असं काहीच हाती लागलं नाही. एकंदरीत एवढंच कळलं की, हा मुलगा सात-आठ वर्षांचा असतानाच आपल्या मर्जीनं घर सोडून पळून आला आहे. अन्नपूर्णांनी विचारलं, 'तुला आई नाही?' तारापद म्हणाला, 'आहेत.' अन्नपूर्णांनी विचारलं, 'त्यांचं तुझ्यावर प्रेम नाही?' हा प्रश्न तारापदाला भलताच विचित्र वाटला; तो हसून म्हणाला, 'का नसेल?' अन्नपूर्णांनी विचारलं, 'मग तू त्यांना सोडून आलास तो का?' तारापद म्हणाला, 'त्यांना आणखी चार मुलगे आणि तीन मुली आहेत.' मुलाच्या या विचित्र उत्तरानं अन्नपूर्णांच्या मनाला लागलं; त्या म्हणाल्या, 'अगं बाई, हे काय बोलणं! पाच बोटं आहेत म्हणून एखादं बोट टाकून देता येतं का?' तारापदाचं वय लहान, त्याची हकीकतही त्याच मानानं थोडक्यात; पण मुलगा मात्र अगदी आगळ्या जातीचा होता. तो आईबापांचा चौथा मुलगा; लहानपणीच त्याचे वडील वारले. इतक्या मुलांच्या घरातही तारापद सगळ्यांचा फार लाडका होता; आई, भाऊ, बहिणी, आळीतले सगळेच त्याच्यावर भरभरून माया करीत. इतकंच काय, पंतोजीसुद्धा त्याला मारत नसत — आणि मारलंच, तर आपल्या-परक्या सगळ्यांनाच त्याचं दुःख होई. अशा स्थितीत त्यानं घर सोडावं असं कुठलंही कारण नव्हतं. जो उपेक्षित, किडकिडीत पोरगा नेहमी चोरून तोडलेली झाडांची फळं खातो आणि गावकऱ्यांच्या हातून त्याच्या चौपट कर्माची फळं खात हिंडतो, तोसुद्धा आपल्या ओळखीच्या गावशिवेच्या आत, छळ करणाऱ्या आपल्या आईजवळच पडून राहिला; आणि सगळ्या गावाचा हा लाडका मुलगा मात्र एका परमुलखातल्या यात्रा-नाटकाच्या फडात मिसळून, मनाला जराही खंत न लावता, गाव सोडून पळून गेला.
पाहुणा
सगळ्यांनी शोधाशोध करून त्याला गावी परत आणलं. आईनं त्याला छातीशी कवटाळून आसवांनी भिजवून टाकलं; बहिणी रडू लागल्या; मोठ्या भावानं घरातल्या कर्त्या पुरुषाचं कठोर कर्तव्य बजावायचं म्हणून त्याला सौम्यसं रागावण्याचा प्रयत्न केला, आणि शेवटी पस्तावून त्याचे भरपूर लाड केले, बक्षिसंही दिली. आळीतल्या बायकांनी त्याला घरोघरी बोलावून आणखी भरभरून माया करून, नाना आमिषं दाखवून बांधून ठेवायचा प्रयत्न केला. पण बंधन — मायेचं बंधनसुद्धा — त्याला सोसलं नाही; त्याच्या जन्मनक्षत्रानंच त्याला बेघर करून ठेवलं होतं. नदीतून परमुलखातली नाव दोरानं ओढत नेलेली दिसली, गावच्या मोठ्या पिंपळाखाली कुठल्या तरी दूर देशाहून एखादा संन्यासी येऊन उतरलेला दिसला, किंवा नदीकाठच्या पडीक माळावर भटक्या 'बेद्यांनी' लहान लहान चटयांचे आडोसे बांधून, बांबूच्या कामट्या तासून टोपल्या विणायला बसकण मारलेली दिसली, की अज्ञात बाहेरच्या जगाच्या मायाहीन स्वातंत्र्यासाठी त्याचं मन बेचैन होऊन उठे. लागोपाठ दोन-तीनदा पळून गेल्यावर त्याच्या नातलगांनी आणि गावकऱ्यांनी त्याची आशा सोडली. पहिल्यांदा तो एका यात्रेच्या फडाबरोबर गेला होता. फडाचा मालक जेव्हा त्याच्यावर पोटच्या मुलासारखी माया करू लागला, फडातल्या लहानथोर सगळ्यांचाच तो लाडका होऊन बसला, इतकंच नव्हे तर ज्या ज्या घरी यात्रा होई तिथले कर्ते लोक, आणि विशेषतः आतल्या बायका, खास बोलावून त्याचं कौतुक करू लागल्या, तेव्हा एके दिवशी कुणाला काही न सांगता तो कुठे नाहीसा झाला, त्याचा पुन्हा पत्ता लागला नाही.
पाहुणा
तारापद हरणाच्या पाडसासारखा बंधनाला भिणारा, आणि पुन्हा हरणासारखाच संगीतानं मोहून जाणारा. यात्रेच्या गाण्यांनीच त्याला पहिल्यांदा घरातून विरागी करून बाहेर काढलं. गाण्याच्या सुरानं त्याच्या साऱ्या नसांत कंप सुटे, आणि तालानं सर्वांग डोलू लागे. अगदी लहान असतानाही गाण्याच्या बैठकीत तो ज्या संयत, गंभीर, वडीलधाऱ्या आविर्भावात स्वतःला विसरून बसल्या बसल्या डोलत असे, ते पाहून मोठ्या माणसांना हसू आवरणं कठीण जाई. केवळ संगीतच का — झाडांच्या दाट पालवीवर श्रावणाच्या धारा कोसळत, आकाशात मेघ गर्जत, आणि अरण्यात आईविना पोरक्या दैत्याच्या पोरासारखा वारा आक्रंदू लागे, तेव्हा त्याचं मन जणू बेफाम होऊन उठे. निःशब्द दुपारी खूप दूर आकाशातून येणारी घारीची हाक, पावसाळी संध्याकाळचा बेडकांचा कलकलाट, मध्यरात्रीची कोल्हेकुई — सगळंच त्याला अस्वस्थ करी. याच संगीताच्या मोहानं ओढला जाऊन तो लवकरच एका पांचालीच्या फडात जाऊन दाखल झाला. फडाच्या प्रमुखानं मोठ्या निगुतीनं त्याला गाणी शिकवायला आणि पांचाली पाठ करवायला सुरुवात केली, आणि आपल्या छातीच्या पिंजऱ्यातल्या पाखरासारखा प्रिय मानून त्याच्यावर माया करू लागला. पाखरानं थोडीफार गाणी शिकून घेतली, आणि एके दिवशी पहाटे भुर्रकन उडून गेलं. शेवटच्या खेपेस तो एका जिम्नॅस्टिकच्या फडात जाऊन मिळाला होता. ज्येष्ठाच्या अखेरीपासून आषाढ सरेपर्यंत या भागात ठिकठिकाणी आळीपाळीनं वर्गणीच्या जत्रा भरतात. त्या निमित्तानं यात्रेचे, पांचालीचे, कविगानाचे दोन-तीन फड, नाचणाऱ्या कलावंतिणी, आणि नाना तऱ्हेची दुकानं नावांतून लहान लहान नद्या-उपनद्यांमधून एका जत्रेतून दुसऱ्या जत्रेत फिरत असतात. मागच्या वर्षीपासून कलकत्त्याचा एक लहानसा जिम्नॅस्टिकचा फड या फिरत्या जत्रांच्या करमणुकीच्या चक्रात सामील झाला होता.
पाहुणा
तारापदानं आधी नावेतल्या दुकानदारांत मिसळून जत्रेत पानाचे विडे विकायचं काम पत्करलं होतं. पुढे उपजत कुतूहलापोटी या जिम्नॅस्टिकच्या पोरांच्या कसरतीतल्या अचाट कौशल्यानं ओढला जाऊन तो या फडात शिरला. तारापद स्वतःच्या स्वतः सराव करून बासरी छान वाजवायला शिकला होता; कसरतीच्या वेळी त्याला द्रुत लयीत लखनवी ठुमरीच्या सुरात बासरी वाजवावी लागे — एवढंच त्याचं काम. याच फडातून त्याचं शेवटचं पलायन. त्यानं ऐकलं होतं की नंदीग्रामचे जमीनदार बाबू मोठ्या थाटामाटात एक हौशी यात्रा-नाटक उभं करताहेत — ते ऐकून आपलं लहानसं गाठोडं घेऊन तो नंदीग्रामच्या यात्रेची तयारी करत होता, तेवढ्यात त्याची मतिबाबूंशी गाठ पडली. निरनिराळ्या फडांत एकामागून एक मिसळूनही, आपल्या उपजत कल्पनाशील स्वभावामुळे, कुठल्याच फडाचा रंग त्याला चढला नव्हता. अंतर्यामी तो पूर्णपणे अलिप्त आणि मुक्त होता. जगातल्या कितीतरी ओंगळ गोष्टी तो सतत ऐकत आला होता, कितीतरी किळसवाणी दृश्यं त्याच्या नजरेस पडली होती; पण त्यांना त्याच्या मनात साचायला तिळमात्र वाव मिळाला नव्हता. कशाकडेच या मुलाचं मन चिकटत नसे. इतर बंधनांप्रमाणे कुठल्याही सवयीचं बंधनही त्याच्या मनाला जखडू शकलं नव्हतं; या जगाच्या गढूळ पाण्यावरून तो शुभ्र पंखांच्या राजहंसासारखा पोहत फिरत असे. कुतूहलापोटी कितीही वेळा बुडी मारली, तरी त्याचे पंख भिजत नसत, मळत नसत. म्हणूनच या घर सोडून आलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर एक शुभ्र, सहज तारुण्य न कोमेजता झळकत असे; त्याचं ते मुखतेज पाहूनच मुरलेल्या, व्यवहारी मतिलालबाबूंनी कसलाही प्रश्न न विचारता, कसलाही संशय न घेता, मोठ्या प्रेमानं त्याला जवळ बोलावून घेतलं होतं.
पाहुणा
२ जेवणं झाल्यावर नाव सुटली. अन्नपूर्णा मोठ्या मायेनं या ब्राह्मणाच्या मुलाला त्याच्या घराबद्दल, नातलगांबद्दल विचारू लागल्या; तारापदानं अगदी थोडक्यात उत्तरं दिली आणि बाहेर येऊन आपली सुटका करून घेतली. बाहेर पावसाळ्यातली नदी शेवटच्या रेषेपर्यंत काठोकाठ भरून, आपल्या बेभान, उधाणलेल्या चंचलतेनं जणू निसर्गमातेलाच काळजीत टाकत होती. ढगांतून मोकळ्या झालेल्या उन्हात नदीकाठची अर्धी पाण्यात बुडालेली कासाच्या गवताची रांग, तिच्या वर रसरशीत, दाट उसाची शेतं, आणि त्यांच्याही पलीकडे दूर क्षितिजाला टेकलेली काजळनिळी वनराई — सगळं जणू एखाद्या परीकथेतल्या सोन्याच्या कांडीचा स्पर्श होऊन नुकत्याच जाग्या झालेल्या नव्या सौंदर्यासारखं, मुक्या निळ्या आकाशाच्या मुग्ध नजरेसमोर उमलून आलं होतं; सगळंच जणू जिवंत, धडधडतं, बोलकं, प्रकाशानं उजळलेलं, नवेपणानं तुकतुकीत, समृद्धीनं ओसंडणारं. तारापद नावेच्या छतावर शिडाच्या सावलीत जाऊन बसला. एकामागून एक उतरती हिरवी कुरणं, पुरात बुडालेली तागाची शेतं, गर्द हिरव्या आमन भाताचं डुलणं, घाटापासून गावाकडे जाणाऱ्या अरुंद पाऊलवाटा, दाट झाडीनं वेढलेली सावळी गावं त्याच्या डोळ्यांसमोरून सरकू लागली. हे पाणी, ही जमीन, हे आकाश; भोवतालची ही चलबिचल, हा जिवंतपणा, ही किलबिल; वर-खालचा हा विस्तार, हे वैचित्र्य, ही अलिप्त दूरता; हे प्रचंड, चिरंतन, अपलक, मुकं विश्व — हेच या कोवळ्या मुलाचे सगळ्यात जवळचे आप्त होते; आणि तरीही या चंचल पोराला एका क्षणासाठीसुद्धा मायेच्या बाहूंनी धरून ठेवायचा प्रयत्न ते कधी करत नसे.
पाहुणा
नदीकाठी वासरं शेपट्या उंचावून उधळताहेत; पुढचे दोन पाय दोरीनं बांधलेलं गावठी तट्टू उड्या मारत मारत गवत खात फिरतं आहे; कोळ्यांची जाळी बांधायच्या बांबूवरून खंड्या झप्पकन पाण्यात सूर मारून मासा पकडतो आहे; मुलं पाण्यात पडून धुडगूस घालताहेत; बायका मोठमोठ्यानं हसत गप्पा मारत छातीभर पाण्यात पदर पसरून दोन्ही हातांनी तो धुवून घेताहेत; कमरेला पदर खोचलेल्या कोळिणी टोपल्या घेऊन कोळ्यांकडून मासे विकत घेताहेत — हे सगळं तो बसल्या बसल्या नित्य नव्या, न थकणाऱ्या कुतूहलानं पाहत राही; त्याच्या डोळ्यांची तहान कधीच शमत नसे. नावेच्या छतावर जाऊन तारापदानं हळूहळू वल्हेकरी-नावाड्यांशी गप्पा जमवल्या. अधूनमधून गरजेप्रमाणे खलाशांच्या हातून लग्गी घेऊन तो स्वतःच नाव ढकलू लागला; नावाड्याला तंबाखू ओढायची असली की तो स्वतः जाऊन सुकाणू धरी; जेव्हा ज्या बाजूला शीड फिरवायचं असे, ते सगळं तो कौशल्यानं करून टाकी. संध्याकाळ होऊ लागली तेव्हा अन्नपूर्णांनी तारापदाला बोलावून विचारलं, 'रात्री तू काय खातोस?' तारापद म्हणाला, 'मिळेल ते खातो; रोज खातोच असंही नाही.' या सुंदर ब्राह्मण मुलाची आतिथ्याबद्दलची ही बेफिकिरी अन्नपूर्णांना जराशी बोचू लागली. खाऊपिऊ घालून, ल्यायला-नेसायला देऊन या घराला दुरावलेल्या वाटसरू मुलाला तृप्त करावं, अशी त्यांची फार इच्छा होती. पण नेमकं कशानं त्याचं समाधान होईल, याचा त्यांना काही थांग लागेना. अन्नपूर्णांनी नोकरांना बोलावून गावातून दही, मिठाई वगैरे आणण्यासाठी एकच धांदल उडवून दिली. तारापदानं बेताचं जेवण केलं; पण दूध मात्र घेतलं नाही. अबोल स्वभावाच्या मतिलालबाबूंनीही त्याला दूध घ्यायचा आग्रह केला; तो थोडक्यात म्हणाला, 'मला आवडत नाही.'
पाहुणा
नदीवर दोन-तीन दिवस गेले. स्वयंपाकपाणी, बाजारहाटापासून नाव चालवण्यापर्यंत सगळ्या कामांत तारापद स्वखुशीनं आणि तत्परतेनं सामील झाला. डोळ्यांसमोर येईल त्या दृश्याकडे त्याची उत्सुक नजर धाव घेई; हाताशी येईल त्या कामाकडे तो आपोआप ओढला जाई. त्याची नजर, त्याचे हात, त्याचं मन सदैव हालचालीत असत; म्हणूनच तो या सदा वाहत्या निसर्गासारखाच — सदा निश्चिंत, उदासीन, आणि तरीही सदा कामात गुंतलेला. प्रत्येक माणसाची स्वतःची अशी एक वेगळी, ठाम पायाभूमी असते; पण तारापद म्हणजे अनंत निळं आकाश वाहून नेणाऱ्या या विश्वप्रवाहावरची आनंदानं झळाळणारी एक लाट; भूतकाळाशी, भविष्याशी त्याचं काहीच बंधन नाही — पुढे पुढे वाहत जाणं हेच त्याचं एकमेव काम. इकडे पुष्कळ दिवस निरनिराळ्या मंडळींत राहिल्यानं मन रिझवणाऱ्या अनेक विद्या त्याला अवगत झाल्या होत्या. कसल्याही चिंतेचं सावट नसल्यानं त्याच्या निर्मळ स्मृतिपटावर सगळं काही आश्चर्यकारक सहजतेनं उमटून जाई. पांचाली, कथेकऱ्यांची कथा, कीर्तनं, यात्रा-नाटकांचे मोठमोठे उतारे त्याच्या जिभेच्या टोकावर होते. मतिलालबाबू आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे एके दिवशी संध्याकाळी पत्नीला आणि मुलीला रामायण वाचून दाखवत होते; कुश-लवांची कथा सुरू होणार, तेवढ्यात तारापदाला उत्साह आवरेना; नावेच्या छतावरून खाली उतरून तो म्हणाला, 'पुस्तक ठेवा! मी कुश-लवांचं गाणं म्हणतो, तुम्ही ऐका.'
पाहुणा
असं म्हणून त्यानं कुश-लवांची पांचाली सुरू केली. बासरीसारख्या गोड, भरीव स्वरात दाशुरायांच्या अनुप्रासांचा भराभर वर्षाव होऊ लागला; वल्हेकरी-नावाडी सगळे दाराशी येऊन वाकून ऐकू लागले; हास्य, करुणा आणि संगीत यांचा एक अपूर्व रसाचा झरा त्या नदीकाठच्या संध्याकाळच्या आकाशात वाहू लागला; दोन्ही निःशब्द काठ कुतूहलानं जागे झाले; बाजूनं जाणाऱ्या नावांतले प्रवासी क्षणभर उत्कंठेनं इकडे कान लावून राहिले; आणि गाणं संपलं तेव्हा सगळ्यांनीच हळहळून उसासा सोडला — एवढ्यातच का संपलं? डोळे भरून आलेल्या अन्नपूर्णांना वाटू लागलं, या मुलाला मांडीवर घेऊन छातीशी कवटाळावं आणि त्याचं मस्तक हुंगावं. मतिलालबाबू विचार करू लागले, या मुलाला कसंही करून जवळ ठेवता आलं, तर मुलगा नसल्याची उणीव भरून निघेल. फक्त लहानग्या चारुशशीचं मन मात्र मत्सरानं आणि द्वेषानं भरून आलं. ३ चारुशशी आईबापांचं एकुलतं एक अपत्य, त्यांच्या मायेची एकमेव वारसदार. तिच्या लहरींना आणि हट्टांना अंत नव्हता. खाणं, कपडे, वेणीफणी यांबद्दल तिची स्वतःची स्वतंत्र मतं होती, पण त्या मतांना काडीचाही स्थिरपणा नव्हता. ज्या दिवशी कुठे आमंत्रण असे, त्या दिवशी आईच्या जिवाला धास्ती, ही पोर नटण्यामुरडण्यावरून एखादा अशक्य हट्ट धरून बसेल की काय. चुकून एकदा वेणी मनासारखी झाली नाही, की मग त्या दिवशी कितीही वेळा केस सोडून कितीही प्रकारे बांधले, तरी तिचं मन काही केल्या राजी होणार नाही; शेवटी मोठा रडारडीचा प्रयोग रंगणार. सगळ्याच बाबतींत हे असं. आणि पुन्हा कधी कधी मन प्रसन्न असलं, की कशालाच तिची हरकत नसते. तेव्हा ती अतोनात प्रेम दाखवत आईच्या गळ्यात पडून, मुके घेऊन, हसून, बडबडून तिला अगदी भंडावून सोडते. ही इवलीशी पोर म्हणजे एक न सुटणारं कोडं.
पाहुणा
ही पोर आपल्या अनावर हृदयाचा सगळा जोर लावून मनातल्या मनात तारापदाचा जळजळीत द्वेष करू लागली. आईबापांनाही तिनं परोपरीनं हैराण करून सोडलं. जेवताना रडवेली होऊन ताट ढकलून देते, स्वयंपाक तिला रुचत नाही, दासीला मारते, प्रत्येक गोष्टीत विनाकारण तक्रारी करत राहते. तारापदाच्या कला जसजशा तिचं आणि इतर सगळ्यांचं मन रिझवू लागल्या, तसतसा तिचा राग जणू वाढतच गेला. तारापदाच्या अंगी काही गुण आहेत हे मान्य करायला तिचं मन तयार नव्हतं; आणि तरीही त्याचे पुरावे जसजसे जोरदार होत गेले, तसतसा तिच्या असंतोषाचा पाराही चढत गेला. ज्या दिवशी तारापदानं कुश-लवांचं गाणं म्हटलं, त्या दिवशी अन्नपूर्णांना वाटलं, संगीतानं वनातली जनावरंसुद्धा वश होतात, आज माझ्या मुलीचं मन बहुधा विरघळलं असेल; त्यांनी तिला विचारलं, 'चारू, कसं वाटलं?' तिनं काहीही उत्तर न देता मोठ्या जोरानं मान हलवली. या हावभावाचं भाषेत भाषांतर केलं, तर ते असं होईल: मुळीच आवडलं नाही, आणि जन्मात कधी आवडणारही नाही! चारूच्या मनात मत्सर उगवला आहे हे ओळखून तिच्या आईनं चारूसमोर तारापदावर माया दाखवणं बंद केलं. संध्याकाळनंतर लवकर जेवून चारू झोपायला गेली, की अन्नपूर्णा नावेतल्या खोलीच्या दाराशी येऊन बसत, मतिबाबू आणि तारापद बाहेर बसत, आणि अन्नपूर्णांच्या सांगण्यावरून तारापद गाणं सुरू करी; त्याच्या गाण्यानं नदीकाठची विसावलेली गावशोभा संध्याकाळच्या अफाट अंधारात मुग्ध, निःस्तब्ध होऊन राही, आणि अन्नपूर्णांचं कोमल हृदय मायेनं आणि सौंदर्यरसानं ओसंडू लागे, तेव्हा नेमकी चारू ताडताड अंथरुणावरून उठून येई आणि रागानं रडत रडत म्हणे, 'आई, तुम्ही काय गोंगाट चालवलाय, मला झोपच येत नाहीये.' आईबापांनी आपल्याला एकटीला झोपायला पाठवावं आणि तारापदाभोवती बसून गाणं ऐकत राहावं, हे तिला मुळीच सहन होत नसे.
पाहुणा
या चमकत्या काळ्या डोळ्यांच्या पोरीचा उपजत तिखटपणा तारापदाला मोठा गमतीचा वाटे. गोष्टी सांगून, गाणी म्हणून, बासरी वाजवून तिला वश करायचा त्यानं पुष्कळ प्रयत्न केला, पण काही केल्या यश आलं नाही! मात्र दुपारी तारापद नदीत आंघोळीला उतरे, आणि भरून वाहणाऱ्या पाण्यात आपलं गोरंपान, सरळ, सडपातळ अंग नाना प्रकारे पोहत लीलया हलवत एखाद्या तरुण जलदेवतेसारखा शोभे, तेव्हा पोरीचं कुतूहल जागं झाल्याशिवाय राहत नसे; ती त्या वेळेची वाटच पाहत असे; पण मनातली ओढ कुणाला कळू देत नसे; आणि ही न शिकताच तयार झालेली अभिनेत्री लोकरीचा गळपट्टा विणण्याचा एकाग्र सराव करता करता मधूनच, जणू अगदी तुच्छतेनं, डोळ्यांच्या कोपऱ्यातून तारापदाची जललीला पाहून घेई. ४ नंदीग्राम केव्हा मागे पडलं, याची तारापदानं दखलही घेतली नाही. ती मोठी नाव अगदी संथ, मंद गतीनं, कधी शीड उभारून, कधी दोरानं ओढली जात, नाना नद्यांच्या फाट्या-उपफाट्यांतून चालत राहिली; नावेतल्या प्रवाशांचे दिवसही या नद्या-उपनद्यांसारखेच, शांत, सुंदर वैचित्र्यातून सहज, सौम्य चालीनं, मंद-मधुर खळखळ करत वाहत राहिले. कुणालाच कसलीही घाई नव्हती; दुपारी स्नान-जेवणाला बराच उशीर होई; आणि इकडे संध्याकाळ होते न होते तोच एखादं मोठंसं गाव पाहून त्याच्या कडेला, घाटाजवळ, रातकिड्यांच्या किर्रकिर्रीनं घुमणाऱ्या, काजव्यांनी जडवलेल्या वनाच्या बाजूला नाव बांधली जाई. अशा रीतीनं दहाएक दिवसांत नाव कांठालियाला पोचली. जमीनदार आले म्हणून वाड्यावरून पालख्या आणि तट्टं येऊन दाखल झाली; आणि हाती बांबूच्या काठ्या घेतलेल्या पायक-बरकंदाजांच्या टोळीनं बंदुकींचे एकामागून एक बार हवेत उडवून गावच्या धास्तावलेल्या कावळेसमाजाला कमालीचा वाचाळ करून सोडलं.
पाहुणा
या सगळ्या थाटामाटात वेळ जात होता, तेवढ्यात तारापद भराभर नावेतून उतरून एकदा अख्ख्या गावाचा फेरफटका मारून आला. कुणाला दादा, कुणाला काका, कुणाला दिदी, कुणाला मावशी म्हणत दोन-तीन तासांतच त्यानं सगळ्या गावाशी स्नेहाचं नातं जोडून घेतलं. कुठेच त्याचं खरं असं कुठलंही बंधन नव्हतं, म्हणूनच हा मुलगा आश्चर्यकारक झटपट आणि सहज सगळ्यांशी ओळख करून घेऊ शकत असे. पाहता पाहता थोड्याच दिवसांत तारापदानं गावाचं सगळं हृदय जिंकून घेतलं. इतक्या सहज मनं जिंकण्याचं कारण हे की, तारापद प्रत्येकाशी त्याच्यासारखाच होऊन स्वभावतःच मिसळू शकत असे. तो कुठल्याही विशिष्ट रूढीला, संस्काराला बांधलेला नव्हता, आणि तरीही प्रत्येक परिस्थितीकडे, प्रत्येक कामाकडे त्याचा एक प्रकारचा सहज ओढा होता. मुलांमध्ये तो अगदी स्वाभाविक मुलगा, तरीही त्यांच्याहून वरचढ आणि वेगळा; म्हाताऱ्यांपाशी तो पोरही नव्हे, आणि आगाऊ शहाणाही नव्हे; गुराख्यांबरोबर तो गुराखी, तरीही ब्राह्मण. सगळ्यांच्या सगळ्या कामांत तो जन्मोजन्मीच्या सोबत्यासारखा सरावल्या हातानं हात घालतो; हलवायाच्या दुकानात गप्पा मारता मारता हलवाई म्हणतो, 'दादाठाकूर, जरा बस बरं भाऊ, मी आलोच' — आणि तारापद हसतमुखानं दुकानावर बसून सालवृक्षाचं एक पान घेऊन संदेश मिठाईवरच्या माश्या हाकलू लागतो. भट्टीवर पाक घोटून मिठाई करण्यातही तो पक्का, मागावरची गुपितंही त्याला थोडीफार ठाऊक, आणि कुंभाराचं चाक फिरवणंही त्याला मुळीच अनोळखी नाही. तारापदानं सगळं गाव आपलंसं केलं; फक्त गावातल्या एका मुलीचा मत्सर तो अजूनही जिंकू शकला नाही. ही मुलगी आपण दूर कुठेतरी हद्दपार व्हावं अशी तीव्र इच्छा करते आहे, हे ठाऊक असल्यामुळेच बहुधा तारापद या गावात इतके दिवस अडकून राहिला.
पाहुणा
पण बायकांच्या मनाचा थांग लागणं अगदी बालपणीसुद्धा महाकठीण; चारुशशीनं त्याचा पुरावाच दिला. ब्राह्मण स्वयंपाकीणबाईंची मुलगी सोनामणी पाचव्या वर्षीच विधवा झाली होती; तीच चारूच्या बरोबरीची मैत्रीण. तिची तब्येत बरी नसल्यानं घरी परतलेल्या मैत्रिणीला ती काही दिवस भेटू शकली नव्हती. बरी झाल्यावर ज्या दिवशी भेटायला आली, त्या दिवशी जवळजवळ विनाकारणच दोघी मैत्रिणींत बेबनाव व्हायची वेळ आली. चारूनं मोठी रंगवून गोष्ट सांगायला सुरुवात केली होती. तिला वाटलं होतं, तारापद नावाचं जे अनमोल रत्न आपल्याला नव्यानं लाभलं आहे, ते कसं हाती आलं याची कहाणी सविस्तर वर्णन करून आपण मैत्रिणीचं कुतूहल आणि आश्चर्य टिपेला नेऊन पोचवू. पण जेव्हा तिनं ऐकलं की तारापद सोनामणीला मुळीच अनोळखी नाही, स्वयंपाकीणबाईंना तो मावशी म्हणतो आणि सोनामणी त्याला दादा म्हणते; जेव्हा ऐकलं की तारापदानं बासरीवर कीर्तनाच्या चाली वाजवून मायलेकींचं मन रिझवलं इतकंच नव्हे, तर सोनामणीच्या सांगण्यावरून स्वतःच्या हातानं तिला बांबूची एक बासरी करून दिली आहे, किती तरी दिवस उंच फांदीवरची फळं आणि काटेरी फांदीवरची फुलं तोडून दिली आहेत — तेव्हा चारूच्या काळजात जणू तापलेला भाला घुसू लागला. चारूची समजूत होती की तारापद हा खास त्यांचाच तारापद — अगदी गुपचूप जपून ठेवायचा; इतर सामान्य लोकांना त्याची थोडीफार चाहूल तेवढी लागेल, पण कसाही तो त्यांच्या हाती लागणार नाही; ते दुरूनच त्याच्या रूपगुणांवर भाळतील आणि चारुशशी मंडळींना धन्यवाद देत राहतील. हा अचाट, दुर्मिळ, देवानं दिलेला ब्राह्मण मुलगा सोनामणीला इतका सहज कसा लाभला? आम्ही इतक्या कष्टानं आणला नसता, इतक्या कष्टानं ठेवला नसता, तर सोनामणीसारख्यांना त्याचं दर्शन तरी कुठून घडलं असतं? 'सोनामणीचा दादा'! ऐकूनच अंगाचा तिळपापड होतो!
पाहुणा
ज्या तारापदाला चारूनं मनातल्या मनात द्वेषाच्या बाणांनी घायाळ करायचा प्रयत्न केला होता, त्याच्यावरच्या एकाधिकारासाठी तिची इतकी जबर तळमळ का? हे उमगणं कुणाच्या आवाक्यातलं आहे! त्याच दिवशी आणखी एका क्षुल्लक कारणावरून सोनामणीशी चारूची जिव्हारी लागणारी कट्टी झाली. आणि ती तारापदाच्या खोलीत गेली, त्याची लाडकी बासरी बाहेर काढली, आणि तिच्यावर उड्या मारून, तुडवून ती निर्दयपणे मोडू लागली. चारू मोठ्या तडफेनं हे बासरी-विध्वंसाचं काम करत असतानाच तारापद खोलीत आला. पोरीचं ते प्रलयंकारी रूप पाहून तो थक्कच झाला. म्हणाला, 'चारू, माझी बासरी का मोडतेस?' चारू लाल डोळ्यांनी, लालबुंद चेहऱ्यानं 'बरं करते, छान करते!' म्हणाली, त्या फुटक्या बासरीवर आणखी दोन-चारदा उगीचच लाथा मारल्या, आणि हुंदके देत रडत खोलीतून बाहेर निघून गेली. तारापदानं बासरी उचलून उलटीपालटी करून पाहिली — तिच्यात आता काही राम उरला नव्हता. आपल्या जुन्या, निरपराध बासरीची विनाकारण झालेली ही अचानक दुर्दशा पाहून त्याला हसू आवरलं नाही. चारुशशी दिवसेंदिवस त्याच्यासाठी मोठ्या कुतूहलाचा विषय होऊ लागली. त्याच्या कुतूहलाचं आणखी एक क्षेत्र होतं — मतिलालबाबूंच्या लायब्ररीतली इंग्रजी चित्रांची पुस्तकं. बाहेरच्या जगाशी त्याचा भरपूर परिचय झाला होता, पण या चित्रांच्या जगात मात्र त्याला काही केल्या नीट प्रवेश करता येत नसे. कल्पनेनं तो मनात बरीचशी पोकळी भरून काढी, पण तेवढ्यानं मनाचं काही केल्या समाधान होत नसे.
पाहुणा
चित्रांच्या पुस्तकांविषयीची तारापदाची ही ओढ पाहून एके दिवशी मतिलालबाबू म्हणाले, 'इंग्रजी शिकशील? मग या सगळ्या चित्रांचा अर्थ कळेल तुला.' तारापद लगेच म्हणाला, 'शिकेन.' मतिबाबूंना फार आनंद झाला, आणि त्यांनी गावच्या एंट्रन्स शाळेचे हेडमास्तर रामरतनबाबू यांना रोज संध्याकाळी या मुलाला इंग्रजी शिकवायच्या कामावर नेमलं. ५ आपली तल्लख स्मरणशक्ती आणि अखंड एकाग्रता घेऊन तारापद इंग्रजीच्या अभ्यासाला लागला. जणू तो एका नव्या, दुर्गम राज्यात भ्रमंतीला निघाला, आणि जुन्या जगाशी त्यानं कसलंच नातं ठेवलं नाही. आळीतल्या लोकांना तो आता दिसेनासा झाला; संध्याकाळ होण्याआधी निर्जन नदीकाठी भराभर येरझारा घालत तो धडे पाठ करत असे, तेव्हा त्याचा भक्त असलेला मुलांचा घोळका दुरूनच खट्टू मनानं, धाकयुक्त आदरानं त्याच्याकडे पाहत राही; त्याच्या अभ्यासात व्यत्यय आणायचं धाडस त्यांना होत नसे. चारूलाही हल्ली तो फारसा दिसत नसे. पूर्वी तारापद आत माजघरात जाऊन अन्नपूर्णांच्या मायाळू नजरेसमोर बसून जेवत असे — पण त्या निमित्तानं अधूनमधून जरा उशीर होई, म्हणून त्यानं मतिबाबूंना विनंती करून आपल्या जेवणाची सोय बाहेरच्या सोप्यात करून घेतली. यावर अन्नपूर्णांनी दुखावून हरकत घेतली होती, पण मुलाचा अभ्यासाचा उत्साह पाहून मतिबाबू फार संतुष्ट झाले आणि त्यांनी या नव्या व्यवस्थेला संमती दिली.
पाहुणा
अशातच चारूनंही एकदम हट्ट धरला, 'मीसुद्धा इंग्रजी शिकणार.' तिच्या आईबापांनी आपल्या लहरी मुलीचा हा प्रस्ताव आधी थट्टेचा विषय मानून मायेनं हसून घेतलं — पण मुलीनं या प्रस्तावातला थट्टेचा भाग आसवांच्या भरपूर धारांनी फार लवकर पार धुवून टाकला. शेवटी मायेनं दुबळ्या झालेल्या त्या निरुपाय पालकद्वयानं पोरीचा प्रस्ताव गांभीर्यानं मान्य केला. चारू मास्तरांकडे तारापदाबरोबर शिकू लागली. पण अभ्यास करणं या चंचल पोरीच्या स्वभावात नव्हतं. ती स्वतः काही शिकली नाही; फक्त तारापदाच्या अभ्यासात विघ्नं आणू लागली. ती मागे पडते, धडे पाठ करत नाही, पण तरीही काही केल्या तारापदाच्या मागे राहायला तयार नसते. तारापद तिला मागे टाकून पुढचा धडा घ्यायला गेला, की ती मोठा थयथयाट करी, इतकंच काय, रडारड करायलाही कमी करत नसे. तारापदानं जुनं पुस्तक संपवून नवं घेतलं, की तिलाही तेच नवं पुस्तक घेऊन द्यावं लागे. मोकळ्या वेळी तारापद आपल्या खोलीत बसून लिहीत असे आणि धडे पाठ करत असे, हे त्या मत्सरी पोरीला सहन होत नसे; ती गुपचूप त्याच्या लिहिलेल्या वहीवर शाई ओतून येई, लेखणी चोरून लपवून ठेवी, इतकंच काय, पुस्तकातला जिथं सराव करायचा असे तो भागच फाडून येई. तारापद या पोरीचा पुष्कळसा उपद्रव गमतीनं सोसत असे, असह्य झालं की मारत असे, पण काही केल्या तिला वठणीवर आणू शकत नसे.
पाहुणा
योगायोगानं एक उपाय सापडला. एके दिवशी फार वैतागून, निरुपाय होऊन तारापद शाईत बुडून गेलेली आपली वही फाडून टाकून गंभीर, उदास चेहऱ्यानं बसला होता; चारू दाराशी आली आणि तिला वाटलं, आज मार बसणार. पण तिची अपेक्षा पुरी झाली नाही. तारापद एक शब्दही न बोलता गप्प बसून राहिला. पोरगी खोलीत आत-बाहेर घुटमळत फिरू लागली. पुन्हा पुन्हा ती इतकी जवळ येऊन उभी राहिली, की तारापदानं ठरवलं असतं तर सहज तिच्या पाठीत एक धपाटा घालता आला असता. पण तसं न करता तो गंभीरच राहिला. पोरगी मोठ्या पेचात पडली. माफी कशी मागतात ही विद्या तिनं कधीच सरावली नव्हती, आणि तरीही पश्चात्तापानं भरलेलं तिचं इवलंसं हृदय आपल्या वर्गसोबत्याची क्षमा मिळवण्यासाठी अगदी व्याकूळ झालं. शेवटी काहीच उपाय न दिसून फाटक्या वहीचा एक तुकडा घेऊन ती तारापदाजवळ बसली आणि मोठमोठ्या अक्षरांत लिहिलं, 'मी पुन्हा कधी वहीला शाई फासणार नाही.' लिहून झाल्यावर त्या लिखाणाकडे तारापदाचं लक्ष वेधण्यासाठी ती नाना प्रकारे चुळबूळ करू लागली. ते पाहून तारापदाला हसू आवरलं नाही — तो खो खो हसत सुटला. तेव्हा पोरगी लाजेनं आणि रागानं वेडीपिशी होऊन खोलीतून तीरासारखी बाहेर पळाली. ज्या कागदाच्या तुकड्यावर तिनं स्वतःच्या हातानं आपली लीनता उघड केली होती, तो तुकडा अनंत काळातून आणि अनंत विश्वातून समूळ पुसून टाकता आला असता, तरच तिच्या मनातली ती जीवघेणी खंत शमली असती. इकडे संकोचलेली सोनामणी एक-दोन दिवस अभ्यासाच्या खोलीबाहेर डोकावून परत गेली होती. मैत्रीण चारुशशीशी तिचं इतर सगळ्या बाबतींत विशेष सख्य होतं, पण तारापदाच्या बाबतीत ती चारूकडे फार भीतीनं आणि संशयानं पाहत असे. चारू आत माजघरात असे, ती वेळ बरोबर साधून सोनामणी संकोचत संकोचत तारापदाच्या दाराशी येऊन उभी राही. तारापद पुस्तकातून मान वर करून मायेनं म्हणे, 'काय गं सोना! काय खबर? मावशी कशी आहे?'
पाहुणा
सोनामणी म्हणे, 'कितीतरी दिवसांत आला नाहीस, आईनं तुला एकदा यायला सांगितलंय. आईची कंबर दुखते, म्हणून ती तुला बघायला येऊ शकत नाही.' अशातच कधी अचानक चारू येऊन हजर. सोनामणी भांबावून जाई. जणू ती गुपचूप मैत्रिणीची मालमत्ता चोरायलाच आली होती. चारू आवाज टिपेला चढवून, डोळे-तोंड वेडेवाकडे करून म्हणे, 'अगं सोना! तू अभ्यासाच्या वेळी गोंगाट करायला आलीस होय? थांब, आत्ताच्या आत्ता बाबांना जाऊन सांगते!' — जणू त्या स्वतःच तारापदाच्या कुणी वयोवृद्ध पालकबाई; त्याच्या अभ्यासात तिळमात्र व्यत्यय येऊ नये, याकडेच काय ते त्यांचं रात्रंदिवस लक्ष. पण त्या स्वतः कुठल्या हेतूनं या अवेळी तारापदाच्या अभ्यासाच्या खोलीत येऊन ठेपल्या होत्या, ते अंतर्यामीला अज्ञात नव्हतं, आणि तारापदालाही ते चांगलंच ठाऊक होतं. पण बिचारी सोनामणी घाबरून तत्काळ खोट्या सबबींची एक रासच रचे; शेवटी चारू तिरस्कारानं तिला 'खोटारडी' म्हणून संबोधे, तेव्हा ती लाजून, घाबरून, हरून दुखऱ्या मनानं परत जाई. कनवाळू तारापद तिला हाक मारून म्हणे, 'सोना, आज संध्याकाळी मी येईन हं तुमच्या घरी!' चारू नागिणीसारखी फूत्कार टाकून म्हणे, 'हो तर, जाशील की! तुझा अभ्यास नाही करायचा? मी मास्तरांना सांगणार नाही असं वाटलं की काय?' चारूच्या या धमकीला न घाबरता तारापद एक-दोन दिवस संध्याकाळनंतर स्वयंपाकीणबाईंच्या घरी गेला होता. तिसऱ्या की चौथ्या खेपेस चारूनं पोकळ धमकी न देता, हळूच, कधीतरी बाहेरून तारापदाच्या खोलीच्या दाराला कडी घातली आणि आईच्या मसाल्याच्या पेटीचं कुलूप-किल्ली आणून कुलूपही ठोकलं. सगळी संध्याकाळ तारापदाला असं कैदेत ठेवून जेवणाच्या वेळी तिनं दार उघडलं. तारापद रागावून काहीच बोलला नाही, आणि न जेवताच निघून जायला निघाला.
पाहुणा
तेव्हा पश्चात्तापानं व्याकूळ झालेली पोरगी हात जोडून काकुळतीला येऊन पुन्हा पुन्हा म्हणू लागली, 'तुझ्या दोन्ही पाया पडते, पुन्हा मी असं नाही करणार! तुझ्या दोन्ही पाया पडते, तू जेवून जा!' तरीही तारापद बधला नाही, तेव्हा ती अधीर होऊन रडू लागली; तारापद पेचात पडला आणि परत येऊन जेवायला बसला. चारूनं कितीदा मनापासून प्रतिज्ञा केली होती की ती तारापदाशी नीट वागेल, पुन्हा कधी त्याला क्षणभरही त्रास देणार नाही; पण सोनामणी आणि इतर चार जण मधे येऊन पडल्यामुळे केव्हा तिची कसली लहर फिरते, काही केल्या तिला स्वतःला आवरता येत नाही. काही दिवस लागोपाठ ती शहाण्या मुलीसारखी वागू लागली, की येऊ घातलेल्या एखाद्या भयंकर उत्पातासाठी तारापद सावध होऊन तयारीत राही. हल्ला अचानक कुठल्या निमित्तानं, कुठल्या दिशेनं येईल, काहीच सांगता येत नसे. त्यानंतर प्रचंड वादळ; वादळानंतर आसवांचा मुसळधार पाऊस; आणि त्यानंतर प्रसन्न, स्निग्ध शांती. ६ अशा रीतीनं जवळजवळ दोन वर्षं गेली. इतक्या प्रदीर्घ काळासाठी तारापदानं कधीच कुणाला स्वतःला धरू दिलं नव्हतं. बहुधा अभ्यासात त्याचं मन एका अपूर्व आकर्षणानं बांधलं गेलं होतं; बहुधा वय वाढू लागलं तसा त्याचा स्वभाव बदलू लागला होता, आणि स्थिर होऊन संसारातलं सुखसमाधान भोगावं याकडे त्याचं मन वळलं होतं; बहुधा त्याच्याबरोबर शिकणाऱ्या त्या पोरीचं सततच्या खोड्यांनी चंचल असलेलं सौंदर्य नकळत त्याच्या हृदयावर आपलं जाळं पसरत होतं. इकडे चारूचं वय अकरा ओलांडून गेलं. मतिबाबूंनी शोध घेऊन मुलीच्या लग्नासाठी दोन-तीन चांगली चांगली स्थळं आणवली. मुलगी लग्नाची झाली हे ओळखून मतिबाबूंनी तिचं इंग्रजी शिकणं आणि बाहेर जाणं बंद केलं. या अचानक आलेल्या कोंडीनं चारूनं घरात मोठं रणकंदन माजवलं.
पाहुणा
तेव्हा एके दिवशी अन्नपूर्णांनी मतिबाबूंना बोलावून म्हटलं, 'नवऱ्यामुलासाठी तुम्ही एवढी शोधाशोध करत का फिरताय? तारापद मुलगा चांगला आहे की. आणि तुमच्या मुलीलाही तो पसंत आहे.' हे ऐकून मतिबाबूंना फारच आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, 'असं कधी होतं का? तारापदाचं कुळशील काहीच ठाऊक नाही. माझी एकुलती एक मुलगी, मला ती चांगल्या घरात द्यायची आहे.' एके दिवशी रायडांग्याच्या बाबूंच्या घरून मुलगी पाहायला मंडळी आली. चारूला नटवूनसजवून बाहेर आणायचा प्रयत्न झाला. ती झोपायच्या खोलीचं दार लावून आत बसून राहिली — काही केल्या बाहेर आली नाही. मतिबाबूंनी खोलीबाहेरून पुष्कळ विनवण्या केल्या, रागावून पाहिलं, पण कशाचाच काही उपयोग झाला नाही. शेवटी बाहेर येऊन रायडांग्याच्या दूतमंडळींना खोटंच सांगावं लागलं की मुलगी अचानक फार आजारी पडली आहे, आज दाखवता येणार नाही. त्यांना वाटलं, मुलीत बहुधा काहीतरी खोट असावी, म्हणूनच ही चलाखी केली गेली. तेव्हा मतिबाबू विचार करू लागले, तारापद मुलगा रूपानं-गुणानं सगळ्याच दृष्टीनं चांगला; त्याला मी घरीच ठेवू शकतो, मग माझ्या एकुलत्या एका मुलीला परक्याच्या घरी पाठवावं लागणार नाही. त्यांनी हाही विचार करून पाहिला की, आपल्या अशांत, हट्टी मुलीचा दांडगेपणा आपल्या मायेच्या डोळ्यांना कितीही क्षम्य वाटला, तरी सासरी तो कुणीही सहन करणार नाही. मग नवराबायकोंनी पुष्कळ विचारविनिमय करून तारापदाच्या गावी त्याच्या कुळाची सगळी माहिती काढायला माणूस पाठवलं. बातमी आली की घराणं चांगलं, पण गरीब. तेव्हा मतिबाबूंनी मुलाच्या आईकडे आणि भावाकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला. त्यांनी आनंदानं उचंबळून होकार द्यायला क्षणाचाही विलंब लावला नाही.
पाहुणा
कांठालियात मतिबाबू आणि अन्नपूर्णा लग्नाच्या मुहूर्ताची चर्चा करू लागले; पण स्वभावतःच गुप्तताप्रिय, सावध मतिबाबूंनी ही गोष्ट गुप्तच ठेवली. चारूला धरून ठेवणं जमलं नाही. ती अधूनमधून बारगिरांच्या धाडीसारखी तारापदाच्या अभ्यासाच्या खोलीवर येऊन कोसळे. कधी राग, कधी अनुराग, कधी विराग — यांनी ती त्याच्या अभ्यासातल्या एकांत शांतीला अचानक लाटांनी हेलकावून सोडी. त्यामुळे हल्ली या अलिप्त, मुक्त स्वभावाच्या ब्राह्मण मुलाच्या मनात अधूनमधून क्षणभर विजेच्या लहरीसारखी एक अपूर्व चलबिचल उठे. ज्याचं हलकंफुलकं मन आजवर नेहमी अखंड, बेरोकपणे काळाच्या प्रवाहातल्या लाटांच्या शिखरांवर तरंगत पुढे वाहत जाई, तो हल्ली एखाद्या वेळी हरवल्यासारखा होऊन विचित्र दिवास्वप्नांच्या जाळ्यात गुरफटून पडतो. एखाद्या दिवशी अभ्यास सोडून तो मतिबाबूंच्या लायब्ररीत शिरून चित्रांच्या पुस्तकांची पानं उलटीत बसे; त्या चित्रांच्या मिश्रणातून जे कल्पनेचं जग उभं राही, ते पूर्वीच्या जगाहून पुष्कळ वेगळं, आणि अधिक रंगीत असे. चारूचं विचित्र वागणं पाहून त्याला आता पूर्वीसारखी सहज थट्टा करता येत नसे; तिनं खोडी काढली तरी तिला मारायचा विचारसुद्धा मनात येत नसे. आपल्यातला हा गूढ बदल, हा बांधला गेलेला, गुंतलेला भाव त्याला स्वतःलाच एखाद्या नव्या स्वप्नासारखा वाटू लागला. श्रावण महिन्यातला लग्नाचा शुभ मुहूर्त ठरवून मतिबाबूंनी तारापदाची आई आणि भाऊ यांना आणायला माणसं पाठवली; तारापदाला मात्र हे कळू दिलं नाही. कलकत्त्याच्या मुखत्याराला फोर्ट विल्यमचा लष्करी बँड इसार देऊन ठरवायला सांगितलं, आणि सामानसुमानाची यादी पाठवून दिली.
पाहुणा
आकाशात नव्या पावसाचे मेघ दाटून आले. गावची नदी इतके दिवस जवळजवळ कोरडी पडली होती; मधूनमधून एखाद्या डबक्यात तेवढं पाणी साचलेलं; लहान लहान नावा त्या गढूळ पाण्यात बुडवून ठेवलेल्या; आणि कोरड्या नदीपात्रातून बैलगाड्यांच्या येण्याजाण्यानं चाकांच्या खोल खुणा कोरल्या जात होत्या — अशा वेळी एके दिवशी, माहेरहून परतणाऱ्या पार्वतीसारखी, कुठूनशी भरधाव धावणारी जलधारा खळखळून हसत गावाच्या रिकाम्या उराशी येऊन पोचली. उघडीनागडी पोरंपोरी काठावर येऊन आरोळ्या ठोकत नाचू लागली; तृप्तीच न होणाऱ्या आनंदानं पुन्हा पुन्हा पाण्यात उड्या घेत जणू नदीला मिठीच मारू लागली; झोपड्यांतल्या बायका आपल्या ओळखीच्या लाडक्या सखीला भेटायला बाहेर आल्या; कोरड्या, निर्जीव गावात कुठूनसा एक प्रबळ, विपुल प्राणाचा लोट येऊन शिरला. देशोदेशीहून माल भरून लहानमोठ्या आकाराच्या नाना नावा येऊ लागल्या; बाजाराचा घाट संध्याकाळी परमुलखातल्या नावाड्यांच्या गाण्यांनी दुमदुमू लागला. दोन्ही काठांवरची गावं वर्षभर आपल्या एकांत कोपऱ्यात आपला इवलासा संसार घेऊन एकाकी दिवस कंठत असतात; पावसाळ्यात बाहेरचं विशाल जग नाना प्रकारच्या मालाचे नजराणे घेऊन, गेरूरंगी जलरथात बसून या गावकन्यांची खुशाली विचारायला येतं; तेव्हा जगाशी नातं जुळल्याच्या अभिमानानं काही दिवस त्यांचं क्षुद्रपण नाहीसं होतं; सगळं चल, जागं, जिवंत होऊन उठतं; आणि मुक्या, निःस्तब्ध प्रदेशात दूरदूरच्या राज्यांतली कलकल येऊन भोवतालचं आकाश ढवळून टाकते.
पाहुणा
याच सुमारास कुडुलकाटा इथं नागबाबूंच्या इलाख्यात प्रसिद्ध रथयात्रेची जत्रा भरणार होती. चांदण्या संध्याकाळी तारापद घाटावर जाऊन पाहतो, तो कुठे रहाटपाळणे घेऊन, कुठे यात्रेचा फड घेऊन, कुठे विक्रीचा माल घेऊन नावा नव्या पुराच्या जोरदार ओढीवर भरभर जत्रेच्या दिशेनं चालल्या आहेत; कलकत्त्याचा कॉन्सर्टचा ताफा मोठ्या आवाजात द्रुत लयीतलं वाजवणं लावून बसला आहे; यात्रेचा फड व्हायोलिनच्या साथीनं गाणी गातो आहे आणि समेवर 'हा हा हाऽ' अशा आरोळ्या उठताहेत; पश्चिमेकडच्या नावांचे वल्हेकरी-खलाशी नुसते मादल आणि झांजा घेऊन, बेभान उत्साहात, गाण्याविनाच खडमड खडमड आवाजानं आकाश फाडताहेत — उत्साहाला सीमा नाही. पाहता पाहता पूर्व क्षितिजावरून दाट मेघांची रास प्रचंड काळं शीड उभारून आकाशाच्या मधोमध चढून आली; चंद्र झाकला गेला; पूर्वेचा वारा सोसाट्यानं वाहू लागला; मेघांमागून मेघ धावू लागले; नदीचं पाणी खळखळ हसत फुगू लागलं; नदीकाठच्या डोलणाऱ्या वनराईत अंधार दाटून आला; बेडूक ओरडू लागले; रातकिड्यांची किर्रकिर्र जणू करवतीनं अंधार कापू लागली; — समोर आज जणू सगळ्या जगाचीच रथयात्रा: चाकं फिरताहेत, ध्वजा फडकताहेत, पृथ्वी थरथरते आहे; मेघ उडाले आहेत, वारा सुटला आहे, नदी वाहते आहे, नावा निघाल्या आहेत, गाणं उठलं आहे; पाहता पाहता गडगडाट करत मेघ गरजले, वीज आकाशाला चिरत चिरत लखलखली, दूरच्या अंधारातून मुसळधार पावसाचा गंध येऊ लागला. फक्त नदीच्या एका काठी, एका बाजूला, कांठालिया गाव आपल्या झोपड्यांची दारं लावून, दिवे मालवून, निःशब्द झोपी गेलं.
पाहुणा
दुसऱ्या दिवशी तारापदाची आई आणि भाऊ कांठालियाला येऊन उतरले; दुसऱ्या दिवशी कलकत्त्याहून नाना प्रकारच्या सामानानं भरलेल्या तीन मोठ्या नावा कांठालियाच्या जमीनदारी कचेरीच्या घाटाला लागल्या; आणि दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे सोनामणी कागदात थोडीशी आंबपोळी आणि पानांच्या द्रोणात थोडंसं लोणचं घेऊन, भीत भीत तारापदाच्या अभ्यासाच्या खोलीच्या दाराशी येऊन निःशब्द उभी राहिली — पण दुसऱ्या दिवशी तारापद दिसला नाही. माया, प्रेम, मैत्री यांच्या कारस्थानी बंधनांनी त्याला चारी बाजूंनी पुरतं वेढून टाकण्यापूर्वीच, सगळ्या गावाचं हृदय चोरून, पावसाळी मेघांनी काळोखलेल्या एका रात्री हा ब्राह्मणाचा मुलगा, कुणातच न गुंतणाऱ्या, कुणालाच धरून न ठेवणाऱ्या त्या उदासीन जननीकडे — या विशाल विश्वाकडे, या पृथ्वीकडे — निघून गेला होता.