रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
पत्नीचे पत्र
श्रीचरणकमली आज आपल्या लग्नाला पंधरा वर्षं झाली, आणि आजवर मी तुम्हाला कधी पत्र लिहिलं नाही. सदा जवळच पडून असायचे — तोंडची बोलणी तुम्ही पुष्कळ ऐकलीत, मीही ऐकली; पत्र लिहावं इतकी फट कधी मिळालीच नाही. आज मी श्रीक्षेत्री तीर्थयात्रेला आले आहे, आणि तुम्ही आहात तुमच्या कचेरीच्या कामात. गोगलगाईचं तिच्या कवचाशी जे नातं, तेच तुमचं कलकत्त्याशी; ते तुमच्या देहामनाला घट्ट चिकटून बसलं आहे. म्हणून तुम्ही कचेरीत रजेचा अर्ज केला नाही. विधात्याचीही तशीच इच्छा होती; त्यानं माझा रजेचा अर्ज मंजूर केला आहे. मी तुमच्या घरची मधली सूनबाई. आज पंधरा वर्षांनंतर या समुद्राच्या काठी उभी राहून मला कळलं आहे, की जगाशी आणि जगदीशाशी माझं आणखीही एक नातं आहे. म्हणून आज धीर करून हे पत्र लिहिते आहे; हे तुमच्या घरच्या मधल्या सूनबाईचं पत्र नव्हे. तुमच्याशी माझं नातं ज्यानं माझ्या कपाळी लिहिलं, त्याच्याखेरीज त्या शक्यतेची कुणालाही कल्पना नव्हती, अशा त्या लहानपणी मी आणि माझा भाऊ एकाच वेळी सन्निपाताच्या तापानं आजारी पडलो. माझा भाऊ गेला, मी वाचले. आळीतल्या साऱ्या बायका म्हणू लागल्या, 'मृणाल पोरगी ना, म्हणून वाचली; पोरगा असता तर कुठला वाचतोय!' यम चोरीच्या विद्येत पक्का; त्याचा डोळा नेहमी मोलाच्या वस्तूंवरच. मला मरण नाही. हीच गोष्ट नीट उलगडून सांगण्यासाठी हे पत्र लिहायला बसले आहे.
पत्नीचे पत्र
ज्या दिवशी तुमचे दूरच्या नात्यातले मामा तुमचे मित्र नीरद यांना घेऊन मुलगी पाहायला आले, तेव्हा माझं वय बारा होतं. आमचं घर एका आडवाटेच्या खेड्यात; तिथे दिवसाढवळ्या कोल्हे ओरडतात. स्टेशनपासून सात कोस भाड्याच्या खटारा घोडागाडीनं येऊन, उरलेले तीन मैल कच्च्या रस्त्यानं पालखीतून आलं, की मग कुठे आमच्या गावी पोचता येतं. त्या दिवशी तुमचे किती हाल झाले! त्यात भर आमच्या बांगाल मुलखातल्या स्वयंपाकाची — त्या स्वयंपाकाचं प्रहसन मामा आजही विसरलेले नाहीत. तुमच्या घरच्या थोरल्या सुनेच्या रूपाची उणीव मधल्या सुनेकरवी भरून काढायचा तुमच्या आईंचा अगदी हट्ट होता. नाहीतर इतके कष्ट घेऊन तुम्ही लोक आमच्या त्या गावात कशाला आला असता? बंगालमध्ये पानथरी, यकृत, आम्लशूळ आणि नवरी यांना शोधत कुणाला जावं लागत नाही; ती आपणहून येऊन धरतात, आणि काही केल्या सोडत नाहीत. बाबांच्या छातीत धडधडू लागलं, आई दुर्गेचं नाव जपू लागली. शहरातल्या देवाला खेड्यातला पुजारी कशानं संतुष्ट करणार? भरवसा मुलीच्या रूपावर; पण त्या रूपाचा तोरा मुलीच्या ठायी कुठे असतो? पाहायला आलेला माणूस तिला जे मोल देईल, तेच तिचं मोल. म्हणूनच तर हजार रूप-गुण असले, तरी बाईमाणसाचा संकोच काही केल्या जात नाही. साऱ्या घराची, किंबहुना साऱ्या आळीची ही धास्ती माझ्या छातीवर दगडासारखी येऊन बसली. त्या दिवशीच्या आकाशातला सगळा उजेड आणि जगातली सारी शक्ती जणू बारा वर्षांच्या एका खेडवळ पोरीला दोघा परीक्षकांच्या दोन जोड्या डोळ्यांसमोर घट्ट धरून उभी करण्यासाठी शिपायगिरी करत होती — मला कुठेही लपायला जागा नव्हती.
पत्नीचे पत्र
साऱ्या आकाशाला रडवत सनई वाजू लागली — मी तुमच्या घरी येऊन दाखल झाले. माझे दोष बारीकसारीक तपासून पाहिल्यावरही घरच्या जाणत्या बायकांनी एकमुखानं कबूल केलं, की एकंदरीत मी सुंदर आहे खरी. ते ऐकून माझ्या मोठ्या जाऊबाईंचा चेहरा गंभीर झाला. पण माझ्या रूपाची गरजच काय होती, असा मला प्रश्न पडतो. रूप नावाची वस्तू एखाद्या जुन्या काळच्या पंडितानं गंगेच्या मातीतून घडवली असती, तर तिची कदर झाली असती; पण ती तर विधात्यानं केवळ आपल्या आनंदासाठी घडवली आहे, म्हणून तुमच्या धर्मनिष्ठ संसारात तिला किंमत नाही. माझ्यापाशी रूप आहे, हे विसरायला तुम्हाला फार दिवस लागले नाहीत. पण माझ्यापाशी बुद्धी आहे, याची आठवण मात्र तुम्हा सगळ्यांना पावलोपावली ठेवावी लागली. ती बुद्धी माझ्या इतकी स्वभावातच आहे, की तुमच्या संसारात इतकी वर्षं काढूनही ती अजून टिकून आहे. माझ्या या बुद्धीपायी आईला भारी काळजी लागून राहिलेली असे; बाईमाणसाला ही एक ब्याद. जिला अडथळे मानून चालायचं, तिनं जर बुद्धीला मानून चालायचं ठरवलं, तर ठेचा खाऊन खाऊन तिचं कपाळ फुटणारच. पण मी काय करू, सांगा. तुमच्या घरच्या सुनेला जेवढी बुद्धी लागते, त्याहून कितीतरी जास्त विधात्यानं गाफीलपणे मला देऊन टाकली; ती आता मी परत कुणाला करू? तुम्ही सगळ्यांनी मला 'अतिशहाणी' म्हणून दोन्ही वेळा शिव्या दिल्यात. कडू बोलणं हेच अक्षमांचं सांत्वन असतं; म्हणून मी त्याला क्षमा केली.
पत्नीचे पत्र
माझी एक गोष्ट तुमच्या संसाराच्या बाहेर होती; ती तुमच्यापैकी कुणालाच कळली नाही. मी लपूनछपून कविता लिहीत असे. त्या कितीही केरकचरा असोत, तिथे तुमच्या अंतःपुराची भिंत उभी राहिली नव्हती. तिथे माझी मुक्ती; तिथे मी मी होते. माझ्यातलं जे जे तुमच्या मधल्या सूनबाईच्या पलीकडे उरलं होतं, ते तुम्हाला आवडलं नाही, ओळखताही आलं नाही; मी कवी आहे, हे या पंधरा वर्षांतही तुमच्या ध्यानात आलं नाही. तुमच्या घराच्या पहिल्या आठवणींपैकी आज सगळ्यांत आधी मनात जागी होते ती तुमची गोठ्याची खोली. अंतःपुराच्या जिन्याला लागून असलेल्या खोलीतच तुमच्या गाई राहतात; समोरच्या लहानशा अंगणाखेरीज त्यांना हलायला जागा नाही. त्या अंगणाच्या कोपऱ्यात त्यांना आंबोण घालायची लाकडी डोण. सकाळी गड्याला अनेक कामं असत; तोवर उपाशी गाई त्या डोणेच्या कडा चाटून चाटून, चावून चावून कुरतडत. माझा जीव तुटायचा. मी खेड्यातली मुलगी — ज्या दिवशी नवी नवी तुमच्या घरी आले, त्या दिवशी त्या दोन गाई आणि तीन वासरं साऱ्या शहरात मला जन्माच्या ओळखीच्या आप्तांसारखी वाटली. नवी सून होते तोवर स्वतः न खाता लपून त्यांना खाऊ घालत असे; मोठी झाल्यावर गाईंवरची माझी उघड माया पाहून, माझ्याशी थट्टेचं नातं असलेली मंडळी माझ्या गोत्राविषयीच शंका घेऊ लागली. माझी मुलगी जन्मताच गेली. जाताना तिनं मलाही सोबत येण्याची हाक दिली होती. ती जगली असती, तर माझ्या आयुष्यात जे जे मोठं, जे जे खरं, ते सारं तिनं आणून दिलं असतं; तेव्हा मी मधली सूनबाई न राहता एकदम आई होऊन बसले असते. आई ना, एका संसारात राहूनही अवघ्या विश्वसंसाराची असते. आई होण्याचं दुःख मला मिळालं, पण आई होण्याची मुक्ती मिळाली नाही.
पत्नीचे पत्र
आठवतं, इंग्रज डॉक्टर येऊन आमचं अंतःपूर पाहून चकित झाला होता, आणि बाळंतिणीची खोली पाहून चिडून त्यानं खूप तोंड टाकलं होतं. सदरेला तुमची लहानशी बाग आहे. दिवाणखान्यात सजावटीला, सामानसुमानाला तोटा नाही. आणि अंतःपूर म्हणजे जणू लोकरीच्या भरतकामाची उलटी बाजू; त्या बाजूला ना लाज, ना शोभा, ना सजावट. तिकडे दिवा मिणमिणत जळतो; वारा चोरासारखा शिरतो; अंगणातला केर हलायचं नाव घेत नाही; भिंतींवरचे आणि जमिनीवरचे सारे डाग अक्षय होऊन विराजमान असतात. पण डॉक्टरची एक चूक झाली; त्याला वाटलं, हे आम्हाला अहोरात्र दुःख देत असेल. अगदी उलट; उपेक्षा ही वस्तू राखेसारखी असते; ती राख आतल्या आत विस्तव कदाचित धरून ठेवते, पण बाहेरून त्याची धग जाणवू देत नाही. आत्मसन्मानच कमी झाला, की उपेक्षा अन्याय्य वाटत नाही. म्हणून तिची वेदना होत नाही. म्हणूनच तर बाईमाणसाला दुःख वाटून घ्यायचीसुद्धा लाज वाटते. म्हणून मी म्हणते, बाईमाणसानं दुःख भोगलंच पाहिजे अशी जर तुमची व्यवस्था असेल, तर तिला शक्यतो उपेक्षेतच ठेवलेलं बरं; लाडानं दुःखाची वेदना फक्त वाढते. कसंही ठेवा, दुःख आहे ही गोष्ट मनात आणावी, हेसुद्धा कधी मनात आलं नाही. बाळंतिणीच्या खोलीत मरण उशाशी येऊन उभं राहिलं, तरी मनाला भीतीसुद्धा शिवली नाही. आमचं आयुष्य असं ते काय, की मरणाला भ्यावं? लाडाकोडानं, जपणुकीनं ज्यांच्या जिवाची बंधनं घट्ट झाली आहेत, त्यांनाच मरताना जड जातं. त्या दिवशी यमानं मला धरून ओढलं असतं, तर भुसभुशीत मातीतून गवताचं ढेकूळ जसं मुळांसकट सहज उपटून येतं, तशी मी उपटून आले असते. बंगाली मुलगी तर उठसूट मरायला निघते. पण अशा मरण्यात कसली बहादुरी? मरायची लाज वाटते — आमच्यासाठी ते इतकं सोपं आहे.
पत्नीचे पत्र
माझी मुलगी संध्याताऱ्यासारखी क्षणभर उगवून मावळली. मी पुन्हा आपल्या नित्याच्या कामांत आणि गाईवासरांत गुंतले. आयुष्य तसंच घरंगळत घरंगळत शेवटपर्यंत सरलं असतं; आज तुम्हाला हे पत्र लिहायची गरजच पडली नसती. पण वारा एखादं साधंसं बी उडवून आणतो, आणि पक्क्या इमारतीत पिंपळाला अंकुर फुटतो; शेवटी त्या एवढ्याशा अंकुरापायी विटा-लाकडाच्या छातीच्या फासळ्या फुटून जातात. माझ्या संसाराच्या पक्क्या बंदोबस्ताच्या मधोमध कुठूनतरी आयुष्याचा एक लहानसा कण उडून येऊन पडला; तिथून भेगा पडायला सुरुवात झाली. विधवा आईच्या मृत्यूनंतर, चुलतभावांच्या जाचाला कंटाळून माझ्या मोठ्या जाऊबाईंची बहीण बिंदू ज्या दिवशी आमच्या घरी आपल्या दिदीपाशी आश्रयाला आली, त्या दिवशी तुम्हा सगळ्यांना वाटलं, ही आणखी कुठली ब्याद! माझा मेला स्वभाव, काय करू सांगा — पाहिलं, तुम्ही सगळे मनातून वैतागला आहात, आणि म्हणूनच या निराधार मुलीच्या बाजूनं माझं सारं मन जणू कंबर कसून उभं राहिलं. परक्याच्या घरी, परक्याची मर्जी नसताना आश्रयाला येणं — केवढा मोठा अपमान तो! अडचणीपोटी तोसुद्धा जिला पत्करावा लागला, तिला काय एका बाजूला लोटून ठेवता येतं? त्यानंतर पाहिली माझ्या मोठ्या जाऊबाईंची दशा. केवळ जिवाच्या कळवळ्यापोटी त्या बहिणीला आपल्यापाशी घेऊन आल्या होत्या. पण नवऱ्याची मर्जी नाही असं दिसताच त्या असं दाखवू लागल्या, जणू ही त्यांच्यामागे लागलेली एक भयंकर ब्याद आहे, जणू हिला दूर करता आलं की त्यांची सुटका होईल. या अनाथ बहिणीवर मनमोकळेपणानं, उघडपणे माया करायचं धैर्य त्यांना झालं नाही. त्या पतिव्रता.
पत्नीचे पत्र
त्यांचं हे संकट पाहून माझं मन आणखीच कळवळलं. पाहिलं, मोठ्या जाऊबाईंनी सगळ्यांना मुद्दाम दाखवून दाखवून बिंदूच्या खाण्यापिण्याची, नेसण्याची इतकी जाडीभरडी व्यवस्था केली, आणि घरातल्या सगळ्या प्रकारच्या दासीकामाला तिला अशा रीतीनं जुंपलं, की मला नुसतं दुःखच नव्हे, तर लाज वाटली. आमच्या संसाराला बिंदू अगदी चोरीच्या भावात मिळाली आहे, हे सगळ्यांपुढे सिद्ध करायची त्यांना घाई झालेली. ती काम भरपूर देते, आणि खर्चाच्या हिशोबात कमालीची स्वस्त. आमच्या मोठ्या जाऊबाईंच्या माहेरच्या घराण्यात कुळाखेरीज दुसरं काही मोठं नव्हतं — ना रूप, ना पैसा. माझ्या सासऱ्यांचे हातपाय धरून त्यांचं लग्न तुमच्या घरात कसं झालं, ते तुम्हाला ठाऊकच आहे. आपलं लग्न म्हणजे आपण या घराण्याचा केलेला एक भयंकर अपराध, असंच त्यांनी जन्मभर मनात मानलं आहे. म्हणून प्रत्येक बाबतीत स्वतःला शक्य तितकं आकसून घेऊन त्या तुमच्या घरात अगदी थोडी जागा व्यापून राहतात. पण त्यांच्या या सत्त्वशील आदर्शानं आमची मोठी पंचाईत झाली आहे. मी सगळ्या बाबतींत स्वतःला इतकं अशक्य खुजं करू शकत नाही. ज्याला मी चांगलं समजते, त्याला दुसऱ्या कुणाच्या मर्जीखातर वाईट म्हणून मान्य करणं माझ्याच्यानं होत नाही — याचे पुष्कळ पुरावे तुम्हालाही मिळाले आहेत.
पत्नीचे पत्र
बिंदूला मी आपल्या खोलीत ओढून घेतलं. दिदी म्हणाल्या, 'मधल्या सूनबाई गरिबाघरच्या पोरीला लाडावून बिघडवायला बसल्या आहेत.' जणू मी काहीतरी भयंकर संकट ओढवून आणलं, अशा थाटात त्या सगळ्यांपाशी तक्रार करत फिरल्या. पण मला पक्कं ठाऊक आहे, मनातून त्यांची सुटका झाली. आता दोषाचं ओझं माझ्यावरच पडलं. जी माया त्या स्वतः बहिणीवर दाखवू शकत नव्हत्या, ती माझ्याकरवी करवून घेऊन त्यांचं मन हलकं झालं. माझ्या मोठ्या जाऊबाई बिंदूच्या वयातून दोन-चार आकडे वजा करायचा प्रयत्न करत. पण तिचं वय चौदाहून कमी नव्हतं, हे खाजगीत सांगितलं तर अन्याय होणार नाही. तुम्हाला ठाऊकच आहे, ती दिसायला इतकी कुरूप होती, की पडून तिचं डोकं फुटलं असतं, तर लोकांना काळजी वाटली असती ती जमिनीची. म्हणून आईबाप नसल्यानं तिचं लग्न लावून देणारं कुणी नव्हतं, आणि तिच्याशी लग्न करण्याइतकं मनाचं बळ तरी किती जणांकडे होतं? बिंदू मोठ्या भीतभीत माझ्याजवळ आली. जणू तिचा स्पर्श माझ्या अंगाला झाला, तर मला तो सहन होणार नाही. या विश्वसंसारात जन्माला यायची जणू तिला काही अटच नव्हती; म्हणून ती सदा कडेकडेनं, नजर चुकवून वावरत असे. तिच्या माहेरी तिच्या चुलतभावांनी तिला असा एखादा कोपराही सोडायची तयारी दाखवली नाही, जिथे एखादी नको असलेली वस्तू पडून राहू शकेल. नको असलेला केरकचरा घराच्या आसपास सहज जागा मिळवतो, कारण माणूस त्याला विसरून जातो; पण नको असलेलं बाईमाणूस एक तर नकोसं, आणि त्यात तिला विसरणंही कठीण, म्हणून उकिरड्यावरसुद्धा तिला जागा नाही. बरं, बिंदूचे चुलतभाऊ जगात फार आवश्यक पदार्थ आहेत, असं म्हणायची सोय नाही. पण ते मजेत आहेत.
पत्नीचे पत्र
म्हणून मी बिंदूला आपल्या खोलीत बोलावून आणलं, तेव्हा तिची छाती थरथरू लागली. तिची भीती पाहून मला फार दुःख झालं. माझ्या खोलीत तिच्यासाठी थोडीशी जागा आहे, ही गोष्ट मी तिला खूप लाडानं समजावून सांगितली. पण माझी खोली काही फक्त माझी नाही. त्यामुळे माझं काम सोपं झालं नाही. माझ्याजवळ दोन-चार दिवस राहते न राहते, तोच तिच्या अंगावर लाल लाल काहीतरी उठलं. घामोळं असेल, नाहीतर आणखी काही; तुम्ही सगळे म्हणालात, देवी. कारण ती बिंदू ना! तुमच्या आळीतला एक अर्धवट डॉक्टर येऊन म्हणाला, आणखी एक-दोन दिवस गेल्याशिवाय नक्की सांगता येत नाही. पण ते एक-दोन दिवस धीर धरणार कोण? बिंदू तर आपल्या आजाराच्या लाजेनंच मरायला टेकली. मी म्हटलं, देवी असल्या तर असू देत, मी तिला घेऊन आपल्या त्या बाळंतिणीच्या खोलीत राहीन, बाकी कुणाला काही करायला नको. यावरून तुम्ही सगळे माझ्यावर खवळून उठला होतात, बिंदूची दिदीसुद्धा कमालीचा वैताग आल्याचं सोंग करत त्या कपाळकरंट्या पोरीला इस्पितळात पाठवायची सूचना करत होत्या, तेवढ्यात तिच्या अंगावरचे सगळे लाल डाग एकदम मावळले. तुम्ही तर त्यानं आणखीच घाबरलात. म्हणालात, देवी नक्कीच आत उलटल्या. कारण ती बिंदू ना! उपेक्षेत वाढण्याचा एक मोठा गुण असा, की त्यानं शरीर अगदी अजरामर होतं. आजार व्हायचं नावच घेत नाही; मरणाचे राजमार्ग पार बंद. म्हणून रोग तिची थट्टा करून निघून गेला; काहीच झालं नाही. पण एवढं चांगलं कळून आलं, की जगातल्या सगळ्यांत क्षुल्लक माणसाला आश्रय देणं हेच सगळ्यांत कठीण. आश्रयाची गरज जिला जितकी जास्त, तितकेच तिच्या आश्रयाच्या आड येणारे अडथळेही भयंकर.
पत्नीचे पत्र
माझ्याविषयीची बिंदूची भीती मोडली, तेव्हा तिला आणखी एका गाठीनं धरलं. ती माझ्यावर इतकं प्रेम करू लागली, की मलाच भीती वाटू लागली. प्रेमाची अशी तऱ्हा मी संसारात कधी पाहिली नव्हती. पुस्तकात वाचली होती खरी, तीही स्त्रीपुरुषांमधली. माझ्यापाशी रूप होतं, हे आठवायचं काही कारण कित्येक वर्षांत घडलं नव्हतं — इतक्या दिवसांनी त्या रूपाच्या मागे लागली ही कुरूप पोर. माझा चेहरा पाहून पाहून तिच्या डोळ्यांची हौस फिटत नसे. म्हणायची, 'दिदी, तुझा हा चेहरा माझ्याखेरीज दुसऱ्या कुणालाच दिसला नाही.' ज्या दिवशी मी स्वतःचे केस स्वतः बांधत असे, त्या दिवशी तिचा भारी रुसवा. माझ्या केसांचा भार दोन्ही हातांनी हाताळायला तिला भारी आवडे. कुठे आमंत्रणाला जाण्याखेरीज मला नटण्यामुरडण्याची गरज नसे. पण बिंदू मला भंडावून सोडून रोज काही ना काही शृंगार करायला लावी. पोरगी माझ्यापायी अगदी वेडी झाली. तुमच्या अंतःपुरात कुठेही वीतभर जमीन नाही. उत्तरेच्या भिंतीला लागून मोरीच्या कडेला कसंबसं एक गाबाचं झाड उगवलं आहे. ज्या दिवशी त्या झाडाची नवी पानं लालबुंद होताना दिसत, त्या दिवशी मला कळे, पृथ्वीवर वसंत आला आहे खरा. माझ्या संसारात त्या उपेक्षित पोरीचं मन ज्या दिवशी असं पार रंगून गेलं, त्या दिवशी मला समजलं, हृदयाच्या जगातही वसंताचा एक वारा वाहतो — तो कुठल्यातरी स्वर्गातून येतो, गल्लीच्या कोपऱ्यावरून येत नाही. बिंदूच्या प्रेमाच्या असह्य वेगानं मला बेचैन करून सोडलं होतं. कधी कधी तिचा राग येई, हे मी कबूल करते; पण तिच्या या प्रेमातून मला माझं असं एक स्वरूप दिसलं, जे मी आयुष्यात कधीही पाहिलं नव्हतं. तेच माझं मुक्त स्वरूप.
पत्नीचे पत्र
इकडे, बिंदूसारख्या पोरीचे मी इतके लाड करते, इतकी जपणूक करते, हे तुम्हा सगळ्यांना फारच अतिरेकी वाटलं. यावरून कुरकुरीला आणि कटकटीला अंत नव्हता. ज्या दिवशी माझ्या खोलीतून बाजूबंद चोरीला गेला, त्या दिवशी त्या चोरीत बिंदूचा कोणत्याही प्रकारे हात होता, असं सुचवायला तुम्हाला लाज वाटली नाही. स्वदेशीच्या धामधुमीत लोकांच्या घरांची झडती होऊ लागली, तेव्हा बिंदू ही पोलिसांनी पाळलेली हेर बाई आहे, असा संशय घ्यायला तुम्ही बिलकूल कचरला नाहीत. त्याला दुसरा कोणताही पुरावा नव्हता; पुरावा एवढाच, की ती बिंदू. तुमच्या घरच्या दासी तिचं कोणतंही काम करायला नाक मुरडत — त्यांच्यापैकी कुणाला तिचं काम सांगितलं, तर ती पोरही संकोचानं जणू ताठ होऊन जाई. या सगळ्या कारणांनी तिच्यापायी माझा खर्च वाढला. मी खास एक वेगळी दासी ठेवली. ते तुम्हाला आवडलं नाही. बिंदूला मी जी लुगडी नेसायला देत असे, ती पाहून तुम्ही इतके संतापलात, की माझे हातखर्चाचे पैसे बंद करून टाकलेत. दुसऱ्या दिवसापासून मी सव्वा रुपयाला जोडी मिळणारी जाडीभरडी, कोरी, गिरणीची लुगडी नेसू लागले. आणि मोतीची आई माझं उष्टं ताट न्यायला आली, तेव्हा तिला मी मना केलं. मी स्वतः अंगणातल्या नळापाशी जाऊन उष्टं अन्न वासराला खाऊ घातलं आणि भांडी घासली. एके दिवशी अचानक ते दृश्य पाहून तुम्ही फारसे खूश झाला नाहीत. मला खूश केलं नाही तरी चालतं, पण तुम्हा लोकांना खूश केल्याशिवाय भागत नाही — एवढी अक्कल आजवर माझ्या डोक्यात काही शिरली नाही.
पत्नीचे पत्र
इकडे तुमचा राग जसजसा वाढत गेला, तसतसं बिंदूचं वयही वाढत चाललं. त्या स्वाभाविक गोष्टीनं तुम्ही अस्वाभाविक रीतीनं बेजार झाला होतात. एका गोष्टीचं मला नवल वाटतं — तुम्ही बिंदूला जबरदस्तीनं घरातून का घालवून दिलं नाहीत? मला चांगलं कळतं, तुम्ही सगळे मनातून मला भिता. विधात्यानं मला जी बुद्धी दिली होती, तिचा आतल्या आत मुलाहिजा ठेवल्याशिवाय तुमचं चालत नाही. शेवटी बिंदूला स्वतःच्या बळावर घालवून देता न आल्यानं तुम्ही विवाहदेव प्रजापतीला शरण गेलात. बिंदूचं लग्न ठरलं. मोठ्या जाऊबाई म्हणाल्या, 'वाचले बाई! काली मातेनं आमच्या घराण्याची लाज राखली.' नवरा कसा आहे, ते मला ठाऊक नाही; तुमच्याकडून ऐकलं, सगळ्या बाबतींत चांगला आहे. बिंदू माझे पाय धरून रडू लागली; म्हणाली, 'दिदी, मला आणि लग्न कशाला?' मी तिला खूप समजावून सांगितलं, 'बिंदू, तू भिऊ नकोस — मी ऐकलंय, तुझा नवरा चांगला आहे.' बिंदू म्हणाली, 'नवरा चांगला असला, तर माझ्यात असं काय आहे, की मी त्याला पसंत पडेन?' वरपक्षाकडची मंडळी बिंदूला पाहायला येण्याचं नावही काढेनात. मोठ्या दिदी त्यामुळे अगदी निश्चिंत झाल्या. पण दिवसरात्र बिंदूचं रडणं काही थांबेना. तिला काय दुःख आहे, ते मला ठाऊक. बिंदूसाठी मी संसारात पुष्कळ भांडणं केली, पण तिचं लग्न मोडावं, हे म्हणायचं धैर्य मला झालं नाही. म्हणणार तरी कोणत्या बळावर? मीच मेले, तर तिचं काय होईल? एक तर मुलगी, त्यात काळी मुलगी; कुणाच्या घरी चालली आहे, तिचं काय होईल, याचा विचार न केलेलाच बरा. विचार करायला गेलं, की जीव थरकापतो. बिंदू म्हणाली, 'दिदी, लग्नाला अजून पाच दिवस आहेत, तेवढ्यात मला मरण येईल का?'
पत्नीचे पत्र
मी तिला चांगलंच दटावलं; पण अंतर्यामीला ठाऊक आहे, एखाद्या सहज मार्गानं बिंदूला मरण आलं असतं, तर मला हायसं वाटलं असतं. लग्नाच्या आदल्या दिवशी बिंदू आपल्या दिदीकडे जाऊन म्हणाली, 'दिदी, मी तुमच्या गोठ्यात पडून राहीन, मला जे सांगशील ते करीन, तुझ्या पाया पडते, मला अशी टाकून देऊ नकोस.' काही दिवसांपासून लपूनछपून दिदींच्या डोळ्यांतून पाणी येत होतं; त्या दिवशीही आलं. पण नुसतं हृदय असून चालत नाही, शास्त्रही आहे. त्या म्हणाल्या, 'ठाऊक आहे ना बिंदी, पती हाच स्त्रीची गती, मुक्ती, सर्वकाही. कपाळी दुःख असेल, तर ते कुणालाही टाळता यायचं नाही.' खरी गोष्ट अशी, की कोणत्याही बाजूनं कोणताही मार्ग नव्हता — बिंदूला लग्न करावंच लागणार, मग पुढे जे व्हायचं ते होवो. लग्न आमच्याच घरी व्हावं, असं मला वाटत होतं. पण तुम्ही सगळ्यांनी ठासून सांगितलं, लग्न नवऱ्याच्या घरीच व्हायला हवं — तो त्यांचा कुळाचार आहे. मी समजले — बिंदूच्या लग्नासाठी तुम्हाला खर्च करावा लागला, तर ते तुमच्या कुलदेवतेला काही केल्या सहन व्हायचं नाही. त्यामुळे गप्प बसावं लागलं. पण एक गोष्ट तुमच्यापैकी कुणालाच ठाऊक नाही. दिदींना सांगायची इच्छा होती, पण सांगितलं नाही, कारण सांगितलं असतं तर त्या भीतीनंच मेल्या असत्या — मी माझे काही काही दागिने देऊन लपून बिंदूला नटवलं होतं. दिदींच्या नजरेला ते पडलं असावं, पण त्यांनी पाहूनही न पाहिल्यासारखं केलं. धर्माची शपथ, त्याबद्दल तुम्ही त्यांना क्षमा करा. जाण्यापूर्वी बिंदू मला बिलगून म्हणाली, 'दिदी, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला अगदी टाकूनच दिलं ना?' मी म्हटलं, 'नाही गं बिंदी, तुझं काहीही होवो, मी तुला शेवटपर्यंत टाकणार नाही.'
पत्नीचे पत्र
तीन दिवस गेले. तुमच्या जमीनदारीतल्या एका कुळानं खाण्यासाठी तुम्हाला एक मेंढरू दिलं होतं; त्याला तुमच्या जठराग्नीपासून वाचवून मी आमच्या तळमजल्यावरच्या कोळशाच्या खोलीत एका बाजूला राहायला जागा दिली होती. सकाळी उठल्याबरोबर मी स्वतः जाऊन त्याला दाणा घालून येत असे; तुमच्या नोकरांवर एक-दोन दिवस विसंबून पाहिलं, तर त्याला खाऊ घालण्यापेक्षा त्यालाच खाण्याकडे त्यांचा जास्त ओढा दिसला. त्या दिवशी सकाळी त्या खोलीत शिरून पाहते, तो बिंदू एका कोपऱ्यात अंग चोरून बसली आहे. मला पाहताच माझे पाय धरून लोळण घेत ती निःशब्द रडू लागली. बिंदूचा नवरा वेडा आहे. 'खरं सांगतेस, बिंदी?' 'एवढं मोठं खोटं मी तुझ्यापाशी बोलू शकेन, दिदी? ते वेडे आहेत. सासऱ्यांची या लग्नाला संमती नव्हती — पण ते माझ्या सासूबाईंना यमासारखे भितात. लग्नाच्या आधीच ते काशीला निघून गेले. सासूबाईंनी हट्टानं आपल्या मुलाचं लग्न लावलं.' मी त्या कोळशाच्या ढिगावरच मटकन बसले. बाईमाणूस बाईमाणसाची दया करत नाही. म्हणते, 'ती काय, बाईच तर आहे. मुलगा वेडा का असेना, पुरुष आहे ना!' बिंदूचा नवरा एकदम पाहिला तर वेडा आहे असं कळत नाही, पण कधी कधी तो इतका पिसाळतो, की त्याला खोलीत कुलूप लावून कोंडून ठेवावं लागतं. लग्नाच्या रात्री तो बरा होता, पण जागरणं आणि तसल्याच इतर धामधुमीमुळे दुसऱ्या दिवसापासून त्याचं डोकं पार बिघडलं. बिंदू दुपारी पितळेच्या ताटात जेवायला बसली होती, तेवढ्यात तिच्या नवऱ्यानं ताटासकट भात ओढून अंगणात फेकून दिला. त्याला अचानक कसं कोण जाणे वाटलं, बिंदू म्हणजे साक्षात राणी रासमणी; गड्यानं नक्कीच सोन्याचं ताट चोरलं आणि राणीला स्वतःच्या ताटात जेवायला वाढलं.
पत्नीचे पत्र
हा त्याचा राग. बिंदू तर भीतीनं अर्धमेली झाली. तिसऱ्या रात्री सासूनं तिला नवऱ्याच्या खोलीत झोपायला सांगितलं, तेव्हा बिंदूचा जीव कोरडा पडला. तिची सासू भयंकर तापट; रागावली की तिला भान राहत नाही. तीही वेडीच, पण पुरी नाही म्हणून अधिकच भयानक. बिंदूला खोलीत जावंच लागलं. नवरा त्या रात्री शांत होता. पण भीतीनं बिंदूचं अंग जणू लाकडासारखं ताठ झालं. नवरा झोपल्यावर, खूप रात्री, ती अनेक युक्त्या करून पळून आली; त्याचं सविस्तर वर्णन लिहायची गरज नाही. घृणेनं आणि रागानं माझं सर्वांग पेटून उठलं. मी म्हटलं, 'असलं फसवणुकीचं लग्न म्हणजे लग्नच नव्हे. बिंदू, तू पूर्वी जशी होतीस तशी माझ्यापाशी राहा; पाहू, तुला कोण नेतो ते.' तुम्ही लोक म्हणालात, 'बिंदू खोटं बोलते आहे.' मी म्हटलं, 'ती कधीही खोटं बोललेली नाही.' तुम्ही म्हणालात, 'तुला कसं कळलं?' मी म्हटलं, 'मला पक्कं ठाऊक आहे.' तुम्ही धाक दाखवला, 'बिंदूच्या सासरच्या लोकांनी पोलिसात केस केली, तर पंचाईत होईल.' मी म्हटलं, 'फसवून वेड्या नवऱ्याशी तिचं लग्न लावलं, हे कोर्ट ऐकून घेणार नाही का?' तुम्ही म्हणालात, 'म्हणजे आता यासाठी कोर्टकचेऱ्या करायच्या की काय? का, आमची काय जबाबदारी?' मी म्हटलं, 'माझे स्वतःचे दागिने विकून मला जे करता येईल, ते मी करीन.' तुम्ही म्हणालात, 'वकिलाच्या घरी धावणार की काय?' या बोलण्याला उत्तर नाही. कपाळावर हात मारून घेऊ शकते, त्यापलीकडे आणखी काय करणार? तिकडे बिंदूच्या सासरहून तिचा थोरला दीर येऊन बाहेर भयंकर गोंधळ घालत होता. तो म्हणत होता, पोलीस ठाण्यात खबर देईन.
पत्नीचे पत्र
माझ्यात काय बळ आहे ते मला ठाऊक नाही — पण खाटकाच्या हातातून जीव मुठीत घेऊन जी गाय पळून येऊन माझ्या आश्रयाला आली आहे, तिला पोलिसांच्या दट्ट्यापायी पुन्हा त्याच खाटकाच्या हाती सोपवावंच लागेल, ही गोष्ट माझं मन काही केल्या मानेना. मी धिटाईनं म्हटलं, 'मग देऊ दे की ठाण्यात खबर.' असं म्हणून मनात ठरवलं, बिंदूला आत्ताच माझ्या निजायच्या खोलीत आणून, तिला घेऊन खोलीला कुलूप लावून बसून राहावं. शोधून पाहते, तो बिंदू नाही. तुमच्याशी माझा वाद चालू होता, तेव्हाच बिंदू स्वतः बाहेर जाऊन आपल्या दिराच्या हवाली झाली होती. तिला कळून चुकलं होतं, ती या घरात राहिली तर मला भयंकर संकटात टाकेल. मधेच पळून येऊन बिंदूनं आपलं दुःख आणखीच वाढवून घेतलं. तिच्या सासूचा युक्तिवाद असा, की तिचा मुलगा काही तिला खाऊन टाकत नव्हता. वाईट नवऱ्यांची उदाहरणं जगात दुर्मीळ नाहीत. त्यांच्याशी तुलना केली, तर तिचा मुलगा म्हणजे सोन्याचा तुकडा. माझ्या मोठ्या जाऊबाई म्हणाल्या, 'तिचं कपाळच फुटकं, त्याबद्दल दुःख करून काय करायचं? वेडा असो, रेडा असो, नवरा तो नवराच!' कुष्ठरोगी नवऱ्याला कडेवर घेऊन त्याच्या बायकोनं स्वतः त्याला वेश्येच्या घरी पोहोचवलं — त्या सतीसाध्वीचा तो दाखला तुमच्या मनात जागत होता. जगातल्या अत्यंत अधम भ्याडपणाची ही गोष्ट सगळीकडे सांगत फिरायला तुम्हा पुरुषांच्या मनाला आजवर जराही संकोच वाटलेला नाही; म्हणूनच मनुष्यजन्म घेऊनही बिंदूच्या वागण्याचा तुम्हाला राग येऊ शकला, तुमची मान खाली गेली नाही. बिंदूसाठी माझं काळीज फाटलं, पण तुमच्यासाठी माझ्या लाजेला सीमा उरली नाही. मी खेड्यातली मुलगी, त्यात तुमच्या घरी येऊन पडले; देवानं कोणत्या फटीतून माझ्यात अशी बुद्धी घातली कोण जाणे. तुमच्या या धर्माच्या गोष्टी मला काही केल्या सहन झाल्या नाहीत.
पत्नीचे पत्र
मला पक्कं ठाऊक होतं, मेली तरी बिंदू आमच्या घरी पुन्हा येणार नाही. पण लग्नाच्या आदल्या दिवशी मी तिला आशा दिली होती, की तिला शेवटपर्यंत टाकणार नाही. माझा धाकटा भाऊ शरद कलकत्त्यात कॉलेजात शिकत होता. तुम्हाला ठाऊकच आहे, हरतऱ्हेची स्वयंसेवकगिरी करणं, प्लेगच्या वस्तीत उंदीर मारणं, दामोदरच्या पुरात धावून जाणं — यातच त्याला इतका उत्साह, की एफ. ए. परीक्षेत लागोपाठ दोनदा नापास होऊनही तो जरासुद्धा खचला नव्हता. त्याला बोलावून मी म्हटलं, 'बिंदूची खबर मला मिळत राहील अशी व्यवस्था तुला करून द्यावी लागेल, शरद. बिंदू मला पत्र लिहायचं धाडस करणार नाही, लिहिलं तरी ते मला मिळणार नाही.' या असल्या कामापेक्षा मी त्याला बिंदूला दरोडा घालून पळवून आणायला, किंवा तिच्या वेड्या नवऱ्याचं डोकं फोडायला सांगितलं असतं, तर तो जास्त खूश झाला असता. शरदशी बोलणं चाललं होतं, तेवढ्यात तुम्ही खोलीत येऊन म्हणालात, 'आणखी कसली भानगड उभी केली आहेस?' मी म्हटलं, 'तीच, जी अगदी पहिल्यांदा उभी केली होती — तुमच्या घरी आले — पण ती तर तुमचीच करामत.' तुम्ही विचारलंत, 'बिंदूला पुन्हा आणून कुठे लपवून ठेवलं आहेस?' मी म्हटलं, 'बिंदू आली असती, तर नक्कीच आणून लपवून ठेवली असती. पण ती येणार नाही, तुम्ही कुणी घाबरू नका.' शरदला माझ्यापाशी पाहून तुमचा संशय आणखी वाढला. मला ठाऊक होतं, शरदचं आमच्या घरी येणं-जाणं तुम्हा लोकांना काही केल्या आवडत नसे. तुम्हाला भीती होती, त्याच्यावर पोलिसांची नजर आहे — कधीतरी तो कुठल्यातरी राजकीय खटल्यात सापडेल, आणि मग तुम्हालाही त्यात गोवेल. म्हणून मी त्याला भाऊबिजेचा टिळासुद्धा माणसाकरवी पाठवून देत असे, घरी बोलावत नसे.
पत्नीचे पत्र
तुमच्याकडून ऐकलं, बिंदू पुन्हा पळाली आहे, म्हणून तिचा थोरला दीर तुमच्या घरी शोधायला आला आहे. ते ऐकून माझ्या काळजात शूल रुतला. त्या अभागिनीला काय असह्य यातना होत असतील, ते मी समजले, आणि तरी काहीही करायला मार्ग नव्हता. शरद खबर काढायला धावला. संध्याकाळी परत येऊन मला म्हणाला, 'बिंदू तिच्या चुलतभावांच्या घरी गेली होती, पण त्यांनी भयंकर रागावून तिला ताबडतोब पुन्हा सासरी नेऊन पोचवली. यापायी त्यांना जी नुकसानभरपाई आणि गाडीभाड्याचा दंड भरावा लागला, त्याची झोंब अजून त्यांच्या मनातून गेलेली नाही.' तुमच्या काकू श्रीक्षेत्री तीर्थयात्रेला जायचं म्हणून तुमच्या घरी येऊन उतरल्या आहेत. मी तुम्हा लोकांना म्हटलं, मीही जाणार. मला एकाएकी एवढी धर्माची ओढ लागलेली पाहून तुम्ही सगळे इतके खूश झालात, की जरासुद्धा आडकाठी केली नाहीत. मनात हेही होतं, की आता कलकत्त्यात राहिले, तर पुन्हा कधीतरी बिंदूवरून काहीतरी भानगड उभी करून बसेन. मी म्हणजे एक भलतंच लचांड. बुधवारी माझा जायचा दिवस; रविवारी सगळं ठरलं. मी शरदला बोलावून म्हटलं, 'काहीही करून बिंदूला बुधवारी पुरीला जाणाऱ्या गाडीत तुला बसवून द्यावं लागेल.' शरदचा चेहरा उजळला; तो म्हणाला, 'काळजी करू नकोस दिदी, मी तिला गाडीत बसवून पुरीपर्यंत सोबत जाईन — त्या निमित्तानं आयतंच जगन्नाथाचं दर्शन घडेल.' त्याच दिवशी संध्याकाळी शरद पुन्हा आला. त्याचा चेहरा पाहून माझा जीव दडपला. मी म्हटलं, 'काय रे शरद? जमलं नाही वाटतं?' तो म्हणाला, 'नाही.' मी म्हटलं, 'तिला तयार करता आलं नाही?' तो म्हणाला, 'आता त्याची गरजही उरली नाही. काल रात्री तिनं लुगड्याला आग लावून आत्महत्या केली. त्या घरातल्या ज्या पुतण्याशी मी सलगी जमवली होती, त्याच्याकडून कळलं, ती तुझ्या नावानं एक पत्र ठेवून गेली होती. पण ते पत्र त्या लोकांनी नष्ट केलं.'
पत्नीचे पत्र
चला, झाली एकदाची शांती. अवघा देश चिडून उठला. लोक म्हणू लागले, बायकांनी कपड्यांना आग लावून मरणं ही एक फॅशनच झाली आहे. तुम्ही लोक म्हणालात, हे सगळं नाटक आहे! असेलही. पण नाटकाचा हा तमाशा फक्त बंगाली बायकांच्या साड्यांवरच का रंगतो, आणि बंगाली वीरपुरुषांच्या धोतराच्या सोग्यांवर का रंगत नाही, याचाही विचार करायला हवा, नाही का? बिंदीचं कपाळच असं फुटकं! जिवंत होती तोवर रूपाबद्दल, गुणाबद्दल कसलाच नावलौकिक मिळाला नाही — मरतानासुद्धा थोडा विचार करून, देशातले पुरुष खूश होऊन टाळ्या वाजवतील अशा एखाद्या नव्या तऱ्हेनं मरावं, एवढीही अक्कल तिच्या डोक्यात आली नाही! मरूनसुद्धा लोकांना चिडवून गेली! दिदी खोलीत लपून रडल्या. पण त्या रडण्यात एक दिलासा होता. काही का असेना, निदान सुटका तरी झाली. मेली इतकंच ना; जिवंत राहिली असती, तर काय काय घडलं नसतं! मी तीर्थाला आले आहे. बिंदूला आता यायची गरज उरली नाही, पण मला गरज होती. लोक ज्याला दुःख म्हणतात, ते तुमच्या संसारात मला नव्हतं. तुमच्या घरी खाण्यापिण्याची, नेसण्याची ददात नाही; तुमच्या थोरल्या भावाचं चारित्र्य कसंही असो, तुमच्या चारित्र्यात असा कोणताही दोष नाही, की ज्यासाठी मी विधात्याला बोल लावावा. तुमचा स्वभाव तुमच्या थोरल्या भावासारखाच असता, तरी कदाचित एकंदरीत माझे दिवस असेच गेले असते, आणि माझ्या सतीसाध्वी मोठ्या जाऊबाईंसारखी मी पतिदेवाला दोष न देता विश्वदेवालाच दोष द्यायचा प्रयत्न केला असता. तेव्हा तुमच्याविरुद्ध मला कोणतीही फिर्याद मांडायची नाही — माझं हे पत्र त्यासाठी नाही.
पत्नीचे पत्र
पण तुमच्या त्या सत्तावीस नंबर, माखन बडाल गल्लीत मी आता परत येणार नाही. मी बिंदूला पाहिलं आहे. संसाराच्या मधोमध बाईमाणसाची ओळख काय असते, ते मला कळून चुकलं आहे. आता मला त्याची गरज नाही. शिवाय हेही पाहिलं आहे — ती बाई आहे खरी, पण देवानं तिला टाकलं नाही. तिच्यावर तुमचा कितीही जोर असो, त्या जोराला अंत आहे. ती आपल्या अभागी मनुष्यजन्मापेक्षा मोठी आहे. तुम्हीच आपल्या मर्जीनं, आपल्या रीतीरिवाजांनी तिचं आयुष्य कायमचं पायाखाली दाबून ठेवाल — इतके तुमचे पाय लांब नाहीत. मरण तुमच्यापेक्षा मोठं आहे. त्या मरणात ती महान आहे — तिथे बिंदू केवळ बंगाली घरची मुलगी नाही, केवळ चुलतभावांची बहीण नाही, केवळ एका अनोळखी वेड्या नवऱ्याची फसवलेली बायको नाही. तिथे ती अनंत आहे. त्या मरणाची बासरी या पोरीच्या भग्न हृदयातून माझ्या आयुष्याच्या यमुनेपार ज्या दिवशी वाजली, त्या दिवशी आधी तर माझ्या काळजात जणू बाण रुतला. मी विधात्याला विचारलं, जगात जे सगळ्यांत तुच्छ, तेच सगळ्यांत कठीण का? या गल्लीतला, चारी बाजूंनी भिंती उभारलेला, निरानंदाचा हा अगदी क्षुल्लक बुडबुडा एवढा भयंकर अडथळा का? तुझं हे विश्व आपल्या सहा ऋतूंचं अमृतपात्र हाती घेऊन कितीही साद घालो, एका क्षणासाठीसुद्धा मी या अंतःपुराचा हा एवढासा उंबरठा का ओलांडू शकत नाही? तुझ्या अशा भुवनात, माझं असं जीवन घेऊन, मला त्या अगदी तुच्छ विटामातीच्या आडोशातच तिळातिळानं का मरावं लागणार? किती तुच्छ माझी ही रोजची जीवनयात्रा; किती तुच्छ तिचे सारे ठरलेले नियम, ठरलेल्या सवयी, ठरलेली बोलणी, तिचा सगळा ठरलेला मार — पण शेवटी जीत त्या दैन्याच्या नागपाशाचीच व्हायची, आणि हार झाली तुझ्याच निर्मितीची, त्या आनंदलोकाची?
पत्नीचे पत्र
पण मरणाची बासरी वाजू लागली — कुठे गेली रे ती गवंड्यानं बांधलेली भिंत, कुठे गेलं रे तुमच्या घरगुती कायद्यांनी उभं केलेलं ते काटेरी कुंपण! कोणतं दुःख, कोणता अपमान माणसाला कैदेत ठेवू शकतो? ती पाहा, मरणाच्या हातात जीवनाची विजयपताका फडकते आहे! अगं मधल्या सूनबाई, भिऊ नकोस! तुझं हे मधल्या सूनबाईचं कवच फुटायला एक निमिषही लागत नाही. तुमच्या गल्लीची मला आता भीती वाटत नाही. आज माझ्यासमोर निळा समुद्र आहे, माझ्या माथ्यावर आषाढाचे मेघपुंज. तुमच्या सवयींच्या अंधारानं मला झाकून ठेवलं होतं. क्षणभरासाठी बिंदूनं येऊन त्या आवरणाच्या छिद्रातून मला पाहून घेतलं होतं. त्याच पोरीनं आपल्या मरणानं माझं ते आवरण वरपासून खालपर्यंत फाडून टाकलं. आज बाहेर येऊन पाहते, तो माझा गौरव मावायला आता जागाच पुरत नाही. माझं हे उपेक्षित रूप ज्यांच्या नजरेला भावलं, ते सुंदर अवघ्या आकाशातून माझ्याकडे पाहत आहेत. आता मेली ती मधली सूनबाई. तुम्हाला वाटत असेल, मी मरायला निघाले आहे — भिऊ नका, एवढी जुनी थट्टा मी तुम्हा लोकांशी करणार नाही. मीराबाईसुद्धा माझ्यासारखीच बाईमाणूस होती — तिच्या बेड्याही काही कमी जड नव्हत्या; तिला काही जगण्यासाठी मरावं लागलं नाही. मीराबाईनं आपल्या गाण्यात म्हटलं होतं, 'बाप सोडो, आई सोडो, जो जिथे असेल तो सोडो, मीरा मात्र टिकूनच राहिली, प्रभू — मग तिचं जे व्हायचं ते होवो.' हे टिकून राहणं हेच तर जिवंत राहणं. मीही जगेन. मी वाचले. तुमच्या चरणतळाच्या आश्रयापासून तुटलेली मृणाल