रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
पत्त्यांचा देश
दूर समुद्रात एक बेट आहे. तिथे फक्त पत्त्यांचे राजे, पत्त्यांच्या राण्या, एक्के आणि गुलाम राहतात. दुर्री-तिर्रीपासून नव्वी-दश्शीपर्यंत आणखीही पुष्कळ घरंदारं आहेत, पण ती उच्च जातीची नाहीत. एक्का, राजा, गुलाम हे तिघेच मुख्य वर्ण; नव्वी-दश्शी अंत्यज, त्या तिघांच्या पंक्तीला बसण्याची त्यांची लायकी नाही. पण व्यवस्था मात्र अप्रतिम. कोणाची किंमत किती आणि कोणाचा मान किती, हे फार पूर्वीपासून ठरून गेलं आहे; त्यात केसभरही इकडेतिकडे व्हायची सोय नाही. सगळे जण ठरल्याप्रमाणे आपापलं काम करीत जातात — पिढ्यान्पिढ्या पूर्वजांनी काढलेल्या अक्षरांवरच पुन्हा पुन्हा गिरवीत जायचं, एवढंच. ते काम कसलं, हे परक्या माणसाला समजणं कठीण. एकदम पाहिलं तर खेळच वाटतो. नुसतं नियमानं चालणं-फिरणं, नियमानं जाणं-येणं, नियमानं उठणं-पडणं. कोणाचा तरी अदृश्य हात त्यांना चालवतो आहे आणि ते चालताहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव कधी बदलत नाही. कायमचा एकच भाव त्यांच्यावर छापून ठेवलेला. जणू भकास चित्रंच. मांधात्याच्या काळापासून डोक्यावरच्या टोपीपासून पायातल्या जोड्यापर्यंत सगळं काही हुबेहूब तसंच आहे. कोणालाही कधी विचार करावा लागत नाही, सारासार पाहावं लागत नाही; सगळे मुकाट, निर्जीवपणे, आवाज न करता येरझारा घालत असतात; पडायची वेळ आली की आवाज न करता पडतात आणि चेहऱ्यावरची रेषही न हलवता उताणे पडून आकाशाकडे बघत राहतात.
पत्त्यांचा देश
कोणाला कसली आशा नाही, अभिलाषा नाही, भीती नाही, नव्या वाटेने जाण्याचा प्रयत्न नाही, हसू नाही, रडू नाही, शंका नाही, दुविधा नाही. पिंजऱ्यातला पक्षी जसा फडफडतो, तशी कोणत्याही जिवंत प्राण्याची अस्वस्थ तडफड या चित्रासारख्या मूर्तींच्या अंतरंगात कुठे दिसत नाही. तरीही एके काळी या पिंजऱ्यांत जीव राहत होते — तेव्हा पिंजरे झुलत, आतून पंखांची फडफड आणि गाणी ऐकू येत, गर्द रानाची आणि विशाल आकाशाची आठवण होई. आता फक्त पिंजऱ्याची अरुंद कोंडी आणि शिस्तीत रांगेने बसवलेले लोखंडी गज तेवढे जाणवतात — पक्षी उडून गेला, की मेला, की जिवंतपणीच मेल्यासारखा पडून आहे, कोण सांगणार? विलक्षण स्तब्धता आणि शांती. परिपूर्ण स्वस्थता आणि संतोष. रस्त्यात, घाटावर, घरात सगळं काही संयमित, यथाविहित — आवाज नाही, संघर्ष नाही, उत्साह नाही, ओढ नाही; फक्त रोजची नेमाची लहानसहान कामं आणि लहानसा विसावा. समुद्र अखंड एका सुरात किनाऱ्यावर फेसासारख्या शुभ्र हजारो कोमल तळव्यांनी थापटत साऱ्या बेटाला झोपेच्या गुंगीत लपेटून ठेवतो आहे — पक्षिणीने आपले दोन निळे पंख पसरावेत तसं आकाश दिशादिशांची शांती राखतं आहे. फार दूर पैलतीरावर गडद निळ्या रेषेसारखा परदेशाचा आभास दिसतो — तिथल्या राग-द्वेषाचा, भांडणांचा कोलाहल समुद्र ओलांडून इथवर येऊ शकत नाही. २ त्या पैलतीरी, त्या परदेशात, नावडत्या राणीचा मुलगा, एक राजपुत्र राहतो. आपल्या हद्दपार आईबरोबर समुद्रकिनारी तो आपल्याच नादात बालपण घालवतो आहे.
पत्त्यांचा देश
एकटा बसून बसून तो मनातल्या मनात एका फार मोठ्या आकांक्षेचं जाळं विणतो आहे. ते जाळं दिशादिशांत फेकून, कल्पनेत विश्वातल्या नवनव्या रहस्यांचे ढीग गोळा करून आपल्या दारापाशी ओढून आणतो आहे. त्याचं अस्वस्थ मन समुद्राच्या काठावरून, आकाशाच्या कडेला क्षितिज अडवून उभ्या असलेल्या त्या निळ्या डोंगररांगांच्या पलीकडे सदा भटकत असतं — त्याला शोधायचं असतं, पंखांचा पक्षिराज घोडा, नागाच्या मस्तकावरचा मणी, पारिजातकाचं फूल, सोन्याची कांडी, रुप्याची कांडी कुठे मिळतात — सात समुद्र आणि तेरा नद्यांच्या पार, राक्षसाच्या दुर्गम महालात, स्वप्नातच जन्मावी अशी अलौकिक सुंदर राजकन्या कुठे निजून राहिली आहे. राजपुत्र पाठशाळेत शिकायला जातो; तिथे धडा संपला की सौदागराच्या मुलाकडून देशोदेशींच्या गोष्टी आणि कोतवालाच्या मुलाकडून ताल-वेताळाच्या कहाण्या ऐकतो. झुपझुप पाऊस पडतो, ढगांनी अंधारून येतं — घराच्या दारात आईजवळ बसून, समुद्राकडे बघत राजपुत्र म्हणतो, 'आई, एखाद्या खूप खूप दूरच्या देशाची गोष्ट सांग ना.' आई बराच वेळ, आपण लहानपणी ऐकलेली एका अपूर्व देशाची अपूर्व गोष्ट सांगत असत; पावसाच्या झरझर आवाजात ती गोष्ट ऐकताना राजपुत्राचं मन हुरहुरून जाई. एके दिवशी सौदागराचा मुलगा येऊन राजपुत्राला म्हणाला, 'मित्रा, शिक्षण तर संपलं; आता एकदा देशाटनाला निघणार आहे, म्हणून निरोप घ्यायला आलो.' राजाचा मुलगा म्हणाला, 'मीही तुझ्याबरोबर येणार.' कोतवालाचा मुलगा म्हणाला, 'मला एकट्याला टाकून जाणार की काय? मीही तुमच्या सोबत आहे.' राजपुत्र आपल्या दुःखी आईकडे जाऊन म्हणाला, 'आई, मी प्रवासाला निघालो आहे — या वेळी तुझं दुःख दूर करण्याचा उपाय करूनच येईन.'
पत्त्यांचा देश
तिघे मित्र बाहेर पडले. ३ समुद्रात सौदागराची बारा तारवं तयार होती; तिघे मित्र त्यांत चढून बसले. दक्षिणेच्या वाऱ्याने शिडं फुगली, आणि राजपुत्राच्या मनातल्या आकांक्षेसारखी ती गलबतं धावत सुटली. शंखद्वीपाला जाऊन एक गलबत शंखांनी, चंदनद्वीपाला जाऊन एक गलबत चंदनाने, प्रवाळद्वीपाला जाऊन एक गलबत प्रवाळांनी भरलं. त्यानंतर आणखी चार वर्षांत हस्तिदंत, कस्तुरी, लवंगा आणि जायफळांनी आणखी चार गलबतं भरली, तेव्हा अचानक एक भयंकर वादळ आलं. सगळी गलबतं बुडाली; फक्त एका गलबताने तिघा मित्रांना एका बेटावर आपटून टाकलं आणि त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. या बेटावर पत्त्यांचे एक्के, पत्त्यांचे राजे, पत्त्यांच्या राण्या, पत्त्यांचे गुलाम नियमाप्रमाणे राहतात, आणि दश्शी-नव्वीसुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नियमाप्रमाणे दिवस काढतात. ४ पत्त्यांच्या राज्यात इतके दिवस कसलाही उपद्रव नव्हता. आता पहिल्यांदाच गडबडीला सुरुवात झाली. इतक्या काळानंतर पहिल्यांदाच एक वाद उभा राहिला — एके दिवशी संध्याकाळी अचानक समुद्रातून वर आलेल्या या तीन माणसांना कोणत्या वर्गात घालायचं? पहिला प्रश्न, यांची जात कोणती — एक्का, राजा, गुलाम की दश्शी-नव्वी? दुसरा प्रश्न, यांचं गोत्र कोणतं — इस्पिक, किलवर, बदाम की चौकट? हे सगळं ठरल्याशिवाय यांच्याशी कसलाही व्यवहार करणंच कठीण. हे कोणाच्या हातचं अन्न खाणार, कोणाबरोबर राहणार — यांच्यापैकी अधिकारभेदाप्रमाणे कोणी वायव्येकडे, कोणी नैर्ऋत्येकडे, कोणी ईशान्येकडे डोकं करून, आणि कोणी उभ्यानेच झोपणार, यातलं काहीच ठरत नाही. या राज्यात इतक्या मोठ्या, इतक्या बिकट चिंतेचं कारण यापूर्वी कधीच उद्भवलं नव्हतं.
पत्त्यांचा देश
पण भुकेने कासावीस झालेल्या त्या तिघा परदेशी मित्रांना या गंभीर विषयांची तिळमात्र चिंता नव्हती. कसंही करून खायला मिळालं की झालं. त्यांना अन्नपाणी द्यायला सगळे कचरताहेत आणि विधी शोधून काढण्यासाठी एक्क्याने मोठी सभा बोलावली आहे, हे पाहिल्यावर ज्याला जिथे जे खाणं मिळालं ते तो खाऊ लागला. हा प्रकार पाहून दुर्री-तिर्रींचीसुद्धा बोटं तोंडात गेली. तिर्रीने म्हटलं, 'भाई दुर्री, यांना कसलाच विधिनिषेध नाही बघ.' दुर्रीने म्हटलं, 'भाई तिर्री, चांगलंच दिसतंय, हे तर आपल्याहूनही खालच्या जातीचे.' खाऊन-पिऊन शांत झाल्यावर तिघा मित्रांच्या लक्षात आलं, इथली माणसं जरा निराळ्याच प्रकारची आहेत. जणू जगात यांची कुठेच मुळं नाहीत. जणू कोणी यांची शेंडी धरून यांना उपटून काढलं आहे, आणि हे एक प्रकारच्या भांबावलेल्या अवस्थेत, संसाराचा स्पर्श सोडून, झुलत झुलत फिरताहेत. जे काही करताहेत, ते जणू दुसराच कोणी तरी करवून घेतो आहे. अगदी कळसूत्री बाहुल्यांच्या खेळातल्या लोंबकळत्या बाहुल्यांसारखे. म्हणूनच कोणाच्या चेहऱ्यावर भाव नाही, मनात विचार नाही; सगळे अतिशय गंभीर चालीने नियमाप्रमाणे वावरताहेत. आणि तरीही एकंदरीत सगळं भलतंच विचित्र दिसतं आहे. सभोवतालच्या या जिवंत निर्जीवपणाचा परमगंभीर थाटमाट पाहून राजपुत्र आकाशाकडे तोंड करून हा हा करून हसू लागला. मनापासून फुटलेल्या त्या गमतीच्या मोठ्या हास्याचा आवाज पत्त्यांच्या राज्यातल्या कलकल नसलेल्या राजरस्त्यावर फारच विचित्र वाटला. इथे सगळं इतकं तंतोतंत, इतकं नीटनेटकं, इतकं पुरातन, इतकं गंभीर, की ते हसू आपल्याच अचानक उसळलेल्या बेताल आवाजाने आपणच दचकलं, फिकं पडलं, विझून गेलं — सभोवतालच्या माणसांचा प्रवाह आधीपेक्षा दुप्पट स्तब्ध, दुप्पट गंभीर वाटू लागला.
पत्त्यांचा देश
कोतवालाचा मुलगा आणि सौदागराचा मुलगा अस्वस्थ होऊन राजपुत्राला म्हणाले, 'मित्रा, या आनंदहीन भूमीवर आता एक घटकाही नको. इथे आणखी दोन दिवस राहिलो, तर अधूनमधून स्वतःला चाचपून बघावं लागेल, आपण जिवंत आहोत की नाही ते.' राजपुत्र म्हणाला, 'नाही रे, मला कुतूहल वाटतंय. हे दिसतात तर माणसांसारखे — यांच्यात थेंबभर तरी जिवंत पदार्थ आहे की नाही, एकदा हलवून बघायलाच हवं.' ५ असाच काही काळ जातो. पण हे तिघे परदेशी तरुण कोणत्याच नियमात सापडत नाहीत. जिथे जेव्हा उठायचं, बसायचं, तोंड फिरवायचं, पालथं पडायचं, उताणं पडायचं, मान हलवायची, कोलांटी उडी मारायची, तिथे हे यातलं काहीच करीत नाहीत; उलट मजेने न्याहाळत बसतात आणि हसतात. या सगळ्या यथाविहित अगणित क्रियाकर्मांत जे एक दिग्गज गांभीर्य आहे, त्याने हे मुळीच दबून जात नाहीत. एके दिवशी एक्का, राजा आणि गुलाम येऊन, मडक्यातून काढल्यासारख्या घुमऱ्या आवाजात, चेहरा जराही न हलवता, गंभीरपणे राजपुत्राला, कोतवालाच्या मुलाला आणि सौदागराच्या मुलाला विचारू लागले, 'तुम्ही विधीप्रमाणे का वागत नाही?' तिघे मित्र उत्तरले, 'आमची इच्छा.' मडक्यातल्या घुमऱ्या आवाजात पत्त्यांच्या राज्याचे तिघे अधिपती स्वप्नात असल्यासारखे म्हणाले, 'इच्छा? हा कोण लेकाचा?' इच्छा म्हणजे काय, हे त्या दिवशी त्यांना कळलं नाही; पण हळूहळू कळू लागलं. रोज त्यांना दिसू लागलं की असं न वागता तसंही वागता येतं, जशी ही बाजू आहे तशी ती बाजूही आहे — परदेशातून आलेल्या तीन जिवंत उदाहरणांनी दाखवून दिलं, की विधीतच माणसाच्या साऱ्या स्वातंत्र्याची सीमा संपत नाही. अशा रीतीने इच्छा नावाच्या एका राजसत्तेचा प्रभाव त्यांना अस्पष्टपणे जाणवू लागला.
पत्त्यांचा देश
तो जाणवताक्षणीच पत्त्यांचं राज्य आपादमस्तक थोडं थोडं ढवळून निघू लागलं — नुकत्याच झोपेतून उठलेल्या एखाद्या प्रचंड अजगराच्या अनेक वेटोळ्यांतून जागेपणा जसा अगदी मंद गतीने सरकत जातो, तसं. ६ निर्विकार मूर्तीसारख्या राण्यांनी इतके दिवस कोणाकडे नजर टाकली नव्हती; मुकाट, निश्चिंतपणे आपलं काम करीत आल्या होत्या. आता एके दिवशी वसंतातल्या एका उतरत्या दुपारी त्यांच्यापैकी एकीने, दचकल्यासारखं, आपल्या दाट काळ्याभोर पापण्या वर उचलून राजपुत्राकडे मुग्ध डोळ्यांनी एक कटाक्ष टाकला. राजपुत्र दचकून म्हणाला, 'अरे बापरे, हा काय अनर्थ! मला वाटलं होतं, या सगळ्या म्हणजे एकेक पुतळ्या; तसं तर नाही — ही तर, पाहतो तो, स्त्री आहे!' कोतवालाच्या मुलाला आणि सौदागराच्या मुलाला एकांतात बोलावून राजकुमार म्हणाला, 'मित्रांनो, हिच्यात मोठी माधुरी आहे. नव्या भावनेने उजळलेल्या तिच्या त्या काळ्याभोर डोळ्यांच्या पहिल्या कटाक्षात मला वाटलं, जणू नव्यानेच निर्माण झालेल्या एका जगाच्या पहिल्या उषेचा पहिला उदय मी पाहतो आहे. इतके दिवस जो धीर धरून इथे राहिलो, तो आज सार्थकी लागला.' दोघे मित्र मोठ्या कुतूहलाने हसत म्हणाले, 'खरंच की काय, मित्रा?' ती अभागी बदामची राणी त्या दिवसापासून रोज नियम विसरू लागली. जेव्हा जिथे हजर राहायचं हा तिचा विधी, त्यात घडोघडी चुका होऊ लागल्या. समजा, जेव्हा तिने गुलामाच्या शेजारी रांगेत उभं राहायचं, तेव्हा ती एकदम राजपुत्राच्या शेजारी येऊन उभी राहते; गुलाम चेहरा न हलवता अतिशय गंभीर आवाजात म्हणतो, 'राणी, तुझी चूक झाली.' ते ऐकून बदामच्या राणीचे मूळचेच लाल गाल अधिकच लाल होतात, तिची एकटक शांत नजर खाली झुकते. राजपुत्र उत्तर देतो, 'काहीही चूक झालेली नाही; आजपासून मीच गुलाम.'
पत्त्यांचा देश
नुकत्याच उमललेल्या त्या स्त्रीहृदयातून ही कोणती अपूर्व शोभा, हे कोणतं अकल्पित लावण्य फुलून येऊ लागलं! तिच्या चालीत ही कसली मधुर चंचलता, तिच्या नजरेत ही कसली हृदयाची लहर, तिच्या साऱ्या अस्तित्वातून ही कसली सुगंधी आरतीची लाट उचंबळून येते आहे! या नव्या अपराधिनीच्या चुका सुधारण्याकडे अतोनात लक्ष देता देता हल्ली सगळ्यांच्याच चुका होऊ लागल्या. एक्का आपली परंपरागत प्रतिष्ठा राखायचं विसरला, राजा आणि गुलाम यांच्यात आता फरकच उरत नाही, दश्शी-नव्वींचंसुद्धा कसंसंच होऊन गेलं. या पुरातन बेटावर वसंतातला कोकीळ कितीतरी वेळा गायला आहे, पण त्या वर्षी तो जसा गायला तसा पूर्वी कधीच गायला नव्हता. समुद्र सदासर्वकाळ एकाच सुरात कलनादाचं गाणं गात आला आहे; पण इतके दिवस तो सनातन विधीचा अलंघ्य महिमा एका सुरात घोषित करीत आला होता — आज अचानक, दक्षिणवाऱ्याने चंचल झालेल्या, विश्वभर पसरलेल्या अनावर तारुण्याच्या लाटांसारखा, प्रकाशात-सावलीत, हावभावात-भाषेत आपली अथांग व्याकुळता व्यक्त करण्याचा प्रयत्न करू लागला. ७ हाच का तो एक्का, हाच का तो राजा, हाच का तो गुलाम? कुठे गेली ती तृप्त, पुष्ट, गोलगरगरीत मुखचर्या? कोणी आकाशाकडे बघत असतो, कोणी समुद्राच्या काठी बसून राहतो, कोणाला रात्री झोप येत नाही, कोणाचं खाण्यात लक्ष नाही. कोणाच्या चेहऱ्यावर मत्सर, कोणाच्या अनुराग, कोणाच्या व्याकुळता, कोणाच्या संशय. कुठे हसू, कुठे रडू, कुठे गाणं. सगळ्यांची नजर स्वतःकडे आणि दुसऱ्याकडे वळली आहे. प्रत्येक जण स्वतःची दुसऱ्याशी तुलना करतो आहे. एक्का विचार करतो आहे, 'राजा पोरगा दिसायला अगदीच वाईट नसेल, पण त्याच्यात ती रया नाही — माझ्या चालचलणुकीत असं काही माहात्म्य आहे की काही काही विशिष्ट व्यक्तींची नजर माझ्याकडे ओढली गेल्याशिवाय राहूच शकत नाही.'
पत्त्यांचा देश
राजा विचार करतो आहे, 'एक्का सदानकदा मोठ्या ताठ्यात टकटक करीत मान वाकडी करून फिरतो आहे; त्याला वाटतं, त्याला पाहून राण्या छाती फुटून मेल्याच.' असं म्हणून किंचित वाकडं हसत तो आरशात आपलं तोंड न्याहाळतो आहे. देशात जेवढ्या राण्या होत्या त्या सगळ्या जिवापाड नटतात-थटतात आणि एकमेकींकडे बोट दाखवून म्हणतात, 'इश्श, मेले बाई! या गर्विष्ठेचा एवढा नट्टापट्टा कशासाठी गं बाई? हिचे रंगढंग पाहून लाज वाटते!' आणि असं म्हणून दुप्पट नेटाने हावभावांचं जाळं पसरू लागतात. पुन्हा कुठे दोघे सखे, कुठे दोघी सख्या गळ्यात गळा घालून एकांतात बसून गुपितं बोलत असतात. कधी हसतात, कधी रडतात, कधी रागावतात, कधी रुसवेफुगवे चालतात, कधी मनधरणी होते. तरुण मंडळी रस्त्याच्या कडेला, रानाच्या सावलीत, झाडाच्या बुंध्याला पाठ टेकून, वाळल्या पानांच्या ढिगावर पाय पसरून आळसावून बसलेली असतात. एखादी बाला निळंशार वस्त्र नेसून त्या सावलीच्या वाटेने आपल्याच नादात चालत चालत तिथे येते आणि मान खाली घालून डोळे दुसरीकडे वळवते — जणू तिला कोणी दिसलंच नाही, जणू ती कोणाला दिसायला आलीच नाही, असा आव आणून निघून जाते. ते पाहून कोणी कोणी वेडा तरुण धाडसाच्या जोरावर घाईघाईने जवळ सरकतो, पण मनासारखा एकही शब्द सुचत नाही; ओशाळून तो जागीच थबकतो, अनुकूल संधी निघून जाते, आणि ती रमणीही सरलेल्या क्षणासारखी हळूहळू दूर विरून जाते. डोक्यावर पक्षी गात राहतात, वारा पदर आणि केसांच्या बटा उडवीत घोंघावत वाहत जातो, झाडांची पानं सळसळ मर्मर करतात, आणि समुद्राचा अखंड उसळता नाद हृदयातल्या अव्यक्त वासनेला दुप्पट हिंदोळे देतो. एका वसंतात तीन परदेशी तरुणांनी येऊन मेलेल्या नदीला असं तुडुंब उधाण आणलं.
पत्त्यांचा देश
८ राजपुत्रांनी पाहिलं, भरती-ओहोटीच्या मधल्या घडीला सारा देश गुदमरून थबकला आहे — बोलणं नाही, फक्त एकमेकांची तोंडं पाहणं; फक्त एक पाऊल पुढे, दोन पावलं मागे; फक्त आपल्या मनातल्या इच्छांचे ढीग रचून वाळूची घरं बांधणं आणि वाळूची घरं मोडणं. जणू प्रत्येक जण घराच्या कोपऱ्यात बसून आपल्याच अग्नीत आपली आहुती देतो आहे, आणि दिवसेंदिवस कृश आणि मुका होत चालला आहे; फक्त डोळे जळताहेत, आणि आत दडलेल्या शब्दांच्या हेलकाव्याने ओठ वाऱ्याने थरथरणाऱ्या पालवीसारखे कापताहेत. राजपुत्रांनी सगळ्यांना बोलावून सांगितलं, 'बासऱ्या आणा, तुताऱ्या-नगारे वाजवा, सगळे आनंदाचा जल्लोष करा — बदामची राणी स्वयंवर करणार आहे.' लगेच दश्शी-नव्वींनी बासऱ्यांत फुंकायला सुरुवात केली, दुर्री-तिर्रींनी तुताऱ्या-नगारे उचलून वाजवायला सुरुवात केली. या अचानक उसळलेल्या आनंदाच्या कल्लोळात त्या कानगोष्टी, ते एकमेकांकडे चोरून पाहणं, सगळं भंगून गेलं. उत्सवात स्त्री-पुरुष एकत्र जमले — किती गप्पा, किती हसू, किती थट्टामस्करी! किती गमतीच्या आडून मनातलं बोलणं, किती बहाण्याने अविश्वास दाखवणं, किती मोठमोठ्याने हसत क्षुल्लक बोलणं! दाट रानात वारा सुटला की जसं फांदीफांदीवर, पानापानावर, वेलींत-झाडांत नाना प्रकारे डोलणं-झुलणं, एकमेकांत मिसळणं सुरू होतं, तसंच यांच्यात होऊ लागलं. अशा कलकलाटाच्या आनंदोत्सवात सकाळपासून बासरीवर फार मधुर सुरात सहाना वाजू लागला. त्याने आनंदात गांभीर्य, मिलनात व्याकुळता, विश्वाच्या दृश्यात सौंदर्य आणि हृदयाहृदयांत प्रीतीची वेदना जागवली. ज्यांनी नीट प्रेम केलं नव्हतं, ते प्रेम करू लागले; ज्यांनी प्रेम केलं होतं, ते आनंदाने हुरहुरून गेले.
पत्त्यांचा देश
बदामची राणी तांबडं वस्त्र नेसून दिवसभर एका गुप्त सावलीच्या कुंजात बसून होती. तिच्याही कानांवर दुरून सहान्याची तान येत होती, आणि तिचे दोन्ही डोळे मिटत आले होते; अचानक एका क्षणी तिने डोळे उघडून पाहिलं, तो समोर राजपुत्र बसून तिच्या चेहऱ्याकडे पाहतो आहे. त्याच क्षणी थरथरत्या अंगाने दोन्ही हातांनी तोंड झाकून ती जमिनीवर कोसळली. राजपुत्र दिवसभर एकटेच समुद्रकाठी येरझारा घालत, ती भेदरलेली नजर आणि ते लाजून कोसळणं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा आठवत राहिले. ९ रात्री शेकडो-हजारो दिव्यांच्या प्रकाशात, माळांच्या सुगंधात, बासरीच्या संगीतात, नटूनथटून हसतमुख रांगेने बसलेल्या तरुणांच्या सभेत एक मुलगी हळूहळू थरथरत्या पावलांनी हातात माळ घेऊन राजपुत्रासमोर आली आणि मान खाली घालून उभी राहिली. हव्याशा गळ्यापर्यंत माळही उचलली गेली नाही, हव्याशा चेहऱ्याकडे डोळेही उचलता आले नाहीत. तेव्हा राजपुत्रांनी स्वतःच मान झुकवली आणि माळ निसटून त्यांच्या गळ्यात पडली. चित्रासारखी निस्तब्ध सभा अचानक आनंदाच्या उधाणाने ढवळून निघाली. सगळ्यांनी वरवधूंचा आदरसत्कार करून त्यांना सिंहासनावर नेऊन बसवलं. सगळ्यांनी मिळून राजपुत्रांना राज्याभिषेक केला. १० समुद्रापलीकडची ती दुःखी नावडती राणी सोन्याच्या नावेत बसून मुलाच्या नव्या राज्यात आल्या. चित्रांचा तो जमाव एकाएकी माणसांचा झाला आहे. आता पूर्वीसारखी ती अखंड शांती आणि न बदलणारं गांभीर्य राहिलेलं नाही. संसाराच्या प्रवाहाने आपली सुखदुःखं, राग-द्वेष, विपत्ती-संपत्ती घेऊन या नव्या राजाचं नवं राज्य भरून टाकलं. आता कोणी चांगला, कोणी वाईट; कोणाला आनंद, कोणाला विषाद — आता सगळी माणसं. आता कोणी अलंघ्य विधीप्रमाणे गरीब निरुपद्रवी नाही; सगळे स्वतःच्या इच्छेप्रमाणे भले आणि बुरे.