रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
पोस्टमास्तर
पहिलीच नोकरी लागली आणि पोस्टमास्तरांना उलापूर गावी यावं लागलं. गाव अगदीच किरकोळ. जवळ एक नीळकोठी आहे, म्हणून कोठीच्या साहेबानं बरीच खटपट करून हे नवं पोस्ट ऑफिस सुरू करवलं आहे. आमचे पोस्टमास्तर कलकत्त्याचे. पाण्यातला मासा काठावर काढल्यावर जी गत होते, तीच गत या आडगावात येऊन पोस्टमास्तरांची झाली आहे. गवताच्या छपराच्या एका अंधाऱ्या मोठ्या घरात त्यांचं ऑफिस; जवळच शेवाळानं भरलेलं एक तळं आणि त्याच्या चारी काठांना रान. कोठीचे गुमास्ते वगैरे जे नोकर आहेत त्यांना फुरसत अशी जवळजवळ नसतेच, आणि सभ्य माणसानं ज्यांच्यात मिसळावं अशा लायकीचेही ते नाहीत. त्यातून कलकत्त्याच्या पोराला नीटसं मिसळताच येत नाही. अनोळखी जागी गेलं की तो एकतर उद्धट होतो नाहीतर बावरून जातो. यामुळे इथल्या लोकांशी त्यांची ऊठबस काही जमत नाही. बरं, हाताला कामही फारसं नाही. कधीकधी एखाद-दुसरी कविता लिहायचा प्रयत्न करतात. त्यांत त्यांनी असा भाव मांडला आहे की, दिवसभर झाडांच्या पानांची थरथर आणि आकाशातले ढग पाहत आयुष्य मोठ्या सुखात जातं— पण अंतर्यामीलाच ठाऊक, अरबी सुरस कथांमधला एखादा राक्षस येऊन एका रात्रीत ही सगळी झाडं फांद्यापानांसकट तोडून पक्का रस्ता बांधून देईल, आणि ओळीनं उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारती आकाशातले ढग नजरेआड करून टाकतील, तर सभ्य घरातलं हे अर्धमेलं पोर पुन्हा नवजीवन पावेल.
पोस्टमास्तर
पोस्टमास्तरांचा पगार अगदी तुटपुंजा. स्वतः रांधून खावं लागतं, आणि गावातली एक आईबापावेगळी अनाथ पोर त्यांचं कामकाज करून देते, त्या बदल्यात तिला चार घास खायला मिळतात. पोरीचं नाव रतन. वय बारा-तेरा. लग्न होण्याची फारशी शक्यता दिसत नाही. संध्याकाळी जेव्हा गावातल्या गोठ्यांमधून धुराची वलयं वळसे घेत वर चढत, झुडपाझुडपांत रातकिडे किरकिरत, दूर गावातल्या नशाबाज बाउल बैराग्यांचा मेळा वाद्यं वाजवत उंच सुरात गाणी आळवू लागे— जेव्हा अंधाऱ्या ओसरीवर एकट्यानं बसून झाडांची सळसळ पाहिली की कवीच्या हृदयातही जरा धडकी भरे, तेव्हा खोलीच्या कोपऱ्यात मंद ज्योतीची एक पणती लावून पोस्टमास्तर हाक मारत— 'रतन'. रतन दाराशी बसून या हाकेचीच वाट पाहत असे, पण एका हाकेसरशी आत येत नसे; म्हणे, 'काय वो बाबू, कशापायी बोलावलंत?' पोस्टमास्तर विचारत, 'काय करतेयस गं?' रतन म्हणे, 'आत्ताच चूल पेटवायला जायचंय— स्वैपाकघरातली—' पोस्टमास्तर म्हणत, 'तुझं स्वैपाकघरातलं काम मागाहून होईल— आधी जरा हुक्क्याची चिलीम भरून दे बघू.'
पोस्टमास्तर
थोड्याच वेळात दोन्ही गाल फुगवून चिलमीवर फुंकर घालत घालत रतनचा प्रवेश. तिच्या हातातून चिलीम घेऊन पोस्टमास्तर एकदम विचारतात, 'काय गं रतन, तुला तुझी आई आठवते?' ती मोठी कहाणी; थोडं आठवतं, थोडं आठवत नाही. आईपेक्षा बापाचा तिच्यावर जास्त जीव होता, बाप थोडाथोडा आठवतो. दिवसभर राबून बाप संध्याकाळी घरी परत येई, त्यांतल्या चुकूनमाकून एखाद-दोन संध्याकाळी तिच्या मनात स्वच्छ चित्रासारख्या कोरल्या गेल्या आहेत. हे बोलता बोलता हळूहळू रतन पोस्टमास्तरांच्या पायांपाशी जमिनीवर बसून जाई. तिला आठवे, तिला एक धाकटा भाऊ होता— फार फार पूर्वीच्या पावसाळ्यातल्या एका दिवशी एका डबक्याच्या काठी दोघांनी मिळून झाडाच्या मोडक्या फांदीचा गळ करून खोटं खोटं मासे पकडण्याचा खेळ खेळला होता— कितीतरी मोठमोठ्या घटनांपेक्षा तीच गोष्ट तिला जास्त आठवत असे. अशा गप्पांत कधी कधी रात्र बरीच होई, मग आळसावून पोस्टमास्तरांना स्वैपाक करायची इच्छाच होत नसे. सकाळची शिळी भाजी असे, आणि रतन घाईघाईनं चूल पेटवून चार-दोन रोट्या भाजून आणी— त्यावरच दोघांचं रात्रीचं जेवण भागे. एखाद्या संध्याकाळी त्या मोठ्या घराच्या कोपऱ्यात ऑफिसच्या लाकडी बाकावर बसून पोस्टमास्तरही आपल्या घरच्या गोष्टी काढत— धाकटा भाऊ, आई आणि दिदी यांच्या गोष्टी, परमुलखात एकट्यानं खोलीत बसलं की ज्यांच्यासाठी जीव कळवळून येई त्यांच्या गोष्टी. ज्या गोष्टी सदा मनात येतात पण नीळकोठीच्या गुमास्त्यांपुढे कोणत्याही प्रकारे काढता येत नाहीत, त्या ते एका अशिक्षित चिमुरड्या पोरीला सांगत जात, आणि त्यात त्यांना काहीही वावगं वाटत नसे. शेवटी असं झालं की, बोलताना ती पोर त्यांच्या घरच्या माणसांचा उल्लेख आई, दिदी, दादा असा, जणू जन्मापासून ओळखत असल्यासारखा करू लागली. इतकंच काय, आपल्या इवल्याशा हृदयपटावर पोरीनं त्यांच्या काल्पनिक मूर्तीही रेखून घेतल्या होत्या.
पोस्टमास्तर
एके दिवशी पावसाळ्यातल्या ढग फिटलेल्या दुपारी किंचित कोमट, मऊ मऊ वारा वाहत होता; उन्हात भिजलेल्या गवतातून आणि झाडाझुडपांतून एक प्रकारचा गंध दरवळत होता; वाटत होतं, जणू थकलेल्या धरतीचे उष्ण निःश्वास अंगाला येऊन भिडताहेत; आणि कुठलासा एक हट्टी पक्षी आपल्या एकसुरी सुरातली फिर्याद अख्खी दुपार निसर्गाच्या दरबारात अतिशय करुण स्वरात पुन्हा पुन्हा आळवत होता. पोस्टमास्तरांच्या हाताला काम नव्हतं— त्या दिवशीची पावसानं धुतलेल्या, गुळगुळीत, तुकतुकीत पानांची लहरती सळसळ आणि हरलेल्या पावसाचे उरलेसुरले, उन्हात शुभ्र झळाळणारे ढगांचे ढीग खरोखरच पाहण्याजोगे होते; पोस्टमास्तर ते पाहत होते आणि मनात म्हणत होते, या वेळी जवळ कुणीतरी अगदी आपलं माणूस असतं तर— हृदयाला अगदी बिलगून राहणारी, मायेची एक बाहुलीसारखी मानवी मूर्ती. हळूहळू त्यांना वाटू लागलं, तो पक्षी हेच पुन्हा पुन्हा सांगतो आहे, आणि झाडांच्या सावलीत बुडालेल्या या निर्जन दुपारच्या पानांच्या मर्मराचा अर्थही काहीसा असाच आहे. कुणी विश्वास ठेवत नाही, कुणाला कळतही नाही, पण लहानशा खेड्यातल्या तुटपुंज्या पगाराच्या सब-पोस्टमास्तरच्या मनातही खोल, निःस्तब्ध दुपारी, सुट्टीच्या लांबलचक दिवशी असा एखादा भाव उमटत असतो. पोस्टमास्तरांनी एक दीर्घ उसासा टाकून हाक मारली, 'रतन'. रतन तेव्हा पेरूच्या झाडाखाली पाय पसरून कच्चे पेरू खात होती; धन्याचा आवाज ऐकताच धावत आली— धापा टाकत म्हणाली, 'दादाबाबू, बोलावलंत?' पोस्टमास्तर म्हणाले, 'तुला मी थोडं थोडं वाचायला शिकवीन.' असं म्हणून अख्खी दुपार तिला घेऊन 'अ', 'आ' घोकत बसले. आणि अशा रीतीनं थोड्याच दिवसांत जोडाक्षरांचा टप्पाही पार झाला.
पोस्टमास्तर
श्रावणात पावसाला अंतच नाही. ओढे, तळी, नाले पाण्यानं भरून वाहू लागले. रात्रंदिवस बेडकांचं डराँव डराँव आणि पावसाची रिपरिप. गावातल्या रस्त्यांवरची ये-जा जवळजवळ बंदच— बाजाराला होडीतून जावं लागतं. एके दिवशी सकाळपासूनच पावसाची झड लागली होती. पोस्टमास्तरांची विद्यार्थिनी बराच वेळ दाराशी वाट पाहत बसली होती, पण नेहमीसारखी ठरलेली हाक ऐकू न आल्यानं आपणहूनच आपली पोथीची पिशवी घेऊन हळूच खोलीत शिरली. पाहते तो, पोस्टमास्तर आपल्या बाजेवर पडले आहेत— विश्रांती घेत असतील असं वाटून ती अगदी आवाज न करता पुन्हा खोलीबाहेर जाऊ लागली. एवढ्यात कानावर आलं— 'रतन'. घाईनं मागे वळून ती म्हणाली, 'दादाबाबू, झोपला होतात?' पोस्टमास्तर कळवळत्या आवाजात म्हणाले, 'अंग जरा बरं वाटत नाहीये— बघ बरं, माझ्या कपाळावर हात ठेवून.' अशा अगदी एकाकी परमुलखात, धो धो पावसात, आजारानं कळवळलेल्या शरीराला थोडीशी शुश्रूषा मिळावी असं वाटतं. तापलेल्या कपाळावर शंखाच्या बांगड्या भरलेल्या कोमल हाताचा स्पर्श आठवतो. या घोर परमुलखात रोगाच्या यातनांत, मायाळू स्त्रीरूपात आई आणि दिदी उशाशी बसल्या आहेत, असं मनात आणावंसं वाटतं— आणि इथे त्या परदेशी जिवाची मनीषा वाया गेली नाही. छोटी रतन आता छोटी पोर राहिली नाही. त्याच क्षणी ती आईच्या जागी जाऊन बसली; वैद्य बोलावून आणला, वेळच्या वेळी गोळ्या दिल्या, रात्रभर उशाशी जागत बसली, आपणच पथ्याचं जेवण रांधून दिलं, आणि शंभरदा विचारलं, 'काय हो दादाबाबू, जरासं बरं वाटतंय का?' बऱ्याच दिवसांनी पोस्टमास्तर अशक्त शरीरानं आजाराचं अंथरूण सोडून उठले; मनाशी ठरवलं, आता बस्स, इथून कसंही करून बदली करून घ्यायलाच हवी. इथल्या रोगट हवेचा उल्लेख करून त्यांनी तत्काळ कलकत्त्याला वरिष्ठांकडे बदलीसाठी अर्ज केला.
पोस्टमास्तर
आजारपणातल्या सेवेतून सुटका होताच रतननं दाराबाहेरची आपली जागा पुन्हा धरली. पण पूर्वीसारखी तिला आता हाक येत नाही. मधूनमधून डोकावून पाहते, तर पोस्टमास्तर अगदी हरवल्यासारखे बाकावर बसलेले किंवा बाजेवर पडलेले. रतन हाकेची आशा धरून बसलेली असते, तेव्हा ते अधीर मनानं आपल्या अर्जाच्या उत्तराची वाट पाहत असतात. दाराबाहेर बसून पोरीनं आपला जुना धडा हजारदा वाचून काढला. ज्या दिवशी अचानक हाक येईल त्या दिवशी आपली जोडाक्षरं सगळी गडबडून जायची, अशी एक धास्ती तिला होती. शेवटी आठवडाभरानं एके दिवशी संध्याकाळी हाक आली. उचंबळत्या हृदयानं रतन खोलीत शिरली आणि म्हणाली, 'दादाबाबू, मला हाक मारली होतीत?' पोस्टमास्तर म्हणाले, 'रतन, उद्याच मी जातोय.' रतननं विचारलं, 'कुठं जाताय, दादाबाबू?' 'घरी जातोय.' 'पुन्हा कधी याल?' 'पुन्हा येणार नाही.' रतननं पुढे काहीच विचारलं नाही. पोस्टमास्तरांनी आपणहूनच तिला सांगितलं की, त्यांनी बदलीसाठी अर्ज केला होता, तो नामंजूर झाला; म्हणून ते नोकरी सोडून घरी जात आहेत. बराच वेळ कुणीच काही बोललं नाही. पणती मिणमिण जळत राहिली, आणि एका ठिकाणी घराचं जीर्ण छप्पर भेदून मातीच्या एका परळात पावसाचं पाणी टप् टप् गळत राहिलं. काही वेळानं रतन हळूच उठून स्वैपाकघरात रोट्या करायला गेली. नेहमीसारख्या त्या चटचट झाल्या नाहीत. बहुधा मधूनमधून डोक्यात बरेच विचार येत असावेत. पोस्टमास्तरांचं जेवण आटोपल्यावर पोरीनं त्यांना विचारलं, 'दादाबाबू, मला तुमच्या घरी न्याल?' पोस्टमास्तर हसून म्हणाले, 'ते कसं होणार!' ही गोष्ट कोणकोणत्या कारणांनी अशक्य आहे ते पोरीला समजावून सांगायची त्यांना गरज वाटली नाही. रात्रभर, स्वप्नात आणि जागेपणी, पोरीच्या कानात पोस्टमास्तरांचा तो हसरा आवाज वाजत राहिला— 'ते कसं होणार!'
पोस्टमास्तर
पहाटे उठून पोस्टमास्तरांनी पाहिलं, त्यांचं अंघोळीचं पाणी तयार आहे; कलकत्त्याच्या सवयीप्रमाणे ते भरून आणलेल्या पाण्यानं अंघोळ करीत. ते केव्हा निघणार हे का कोण जाणे पोरीला विचारता आलं नव्हतं; सकाळी लागलं तर असावं म्हणून रतननं एवढ्या रात्री नदीवरून त्यांचं अंघोळीचं पाणी भरून आणलं होतं. अंघोळ आटोपल्यावर रतनला हाक गेली. रतन आवाज न करता आत आली, आणि आज्ञेची वाट पाहत एकदा मुकाट्यानं धन्याच्या तोंडाकडे पाहिलं. धनी म्हणाले, 'रतन, माझ्या जागी जे गृहस्थ येतील त्यांना मी सांगून जाईन, ते तुझी माझ्याइतकीच काळजी घेतील; मी जातोय म्हणून तुला कसलीही चिंता करायला नको.' हे शब्द अतिशय मायेनं भरलेल्या, दयार्द्र हृदयातून उमटले होते यात काहीच संशय नाही, पण स्त्रीचं हृदय कोण ओळखणार! रतननं कितीतरी दिवस धन्याची कितीतरी बोलणी मुकाट्यानं सोसली होती, पण हे मऊ शब्द तिला सोसवले नाहीत. एकदम उमाळा फुटून रडत ती म्हणाली, 'नको नको, तुम्ही कुणालाही काहीही सांगायला नको, मला नाही राहायचं इथं.' पोस्टमास्तरांनी रतनचं असं वागणं कधीच पाहिलं नव्हतं, त्यामुळे ते थक्क होऊन बघत राहिले. नवा पोस्टमास्तर आला. त्याला सगळा चार्ज समजावून देऊन जुने पोस्टमास्तर निघायच्या तयारीला लागले. जाताना रतनला बोलावून म्हणाले, 'रतन, तुला मी कधी काहीच देऊ शकलो नाही. आज जाताना तुला थोडं काही देऊन जातोय, यानं तुझे काही दिवस निभतील.' वाटखर्चापुरते थोडे पैसे बाजूला ठेवून, पगाराचे जितके रुपये मिळाले होते ते सगळे त्यांनी खिशातून बाहेर काढले. तेव्हा रतन धुळीत कोसळली आणि त्यांचे पाय धरून म्हणाली, 'दादाबाबू, तुमच्या दोन्ही पाया पडते, तुमच्या दोन्ही पाया पडते, मला काही द्यायला नको; तुमच्या दोन्ही पाया पडते, माझ्यासाठी कुणालाही कसलीही चिंता करायला नको'— आणि एका धावेत तिथून पळून गेली.
पोस्टमास्तर
भूतपूर्व पोस्टमास्तर एक उसासा टाकून, हातात कार्पेटची पिशवी लटकवून, खांद्यावर छत्री घेऊन, हमालाच्या डोक्यावर निळ्या-पांढऱ्या पट्ट्यांनी रंगवलेली पत्र्याची पेटी देऊन हळूहळू होडीकडे निघाले. ते होडीत बसले आणि होडी सुटली, पावसानं फुगलेली नदी धरतीच्या ओसंडून वाहणाऱ्या अश्रूंसारखी चहूकडे डबडबू लागली, तेव्हा त्यांना हृदयात एक तीव्र कळ जाणवू लागली— खेड्यातल्या एका साध्याशा पोरीचा तो करुण चेहरा जणू अवघ्या विश्वात भरून राहिलेली एक अफाट, शब्दांत न मावणारी अंतर्वेदना व्यक्त करू लागला. एकदा फार वाटलं, 'परत जावं, जगाच्या मांडीवरून निखळलेल्या त्या अनाथ पोरीला बरोबर घेऊन यावं'— पण तोवर शिडात वारा भरला होता, पावसाळी प्रवाह तीव्र वेगानं वाहत होता, गाव मागे टाकून नदीकाठचं स्मशान दिसू लागलं होतं— आणि नदीच्या प्रवाहावर तरंगत चाललेल्या त्या वाटसरूच्या उदास हृदयात हे तत्त्वज्ञान उगवलं: आयुष्यात असे कितीतरी वियोग, कितीतरी मृत्यू असतात, परत जाऊन काय उपयोग? या जगात कोण कुणाचं? पण रतनच्या मनात कुठलंच तत्त्वज्ञान उगवलं नाही. ती त्या पोस्ट ऑफिसच्या घराभोवती नुसती अश्रूंत न्हात घिरट्या घालत होती. बहुधा तिच्या मनात एक क्षीण आशा जागी होत होती, दादाबाबू कदाचित परत येतील— त्या बंधनात अडकून ती काही केल्या दूर जाऊ शकत नव्हती. हाय रे, बुद्धिहीन मानवी हृदया! भ्रम काही केल्या सुटत नाही, तर्कशास्त्राचा निवाडा फार उशिरा डोक्यात शिरतो, सबळ पुराव्यावरही अविश्वास ठेवून खोट्या आशेला दोन्ही बाहूंच्या पाशात बांधून जिवाच्या आकांतानं छातीशी कवटाळून धरलं जातं; शेवटी एके दिवशी सगळ्या नसा तोडून, हृदयाचं रक्त शोषून ती पळून जाते, तेव्हा कुठं भान येतं— आणि दुसऱ्या भ्रमाच्या पाशात पडायला मन पुन्हा आतुर होऊन उठतं.