रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
राजटिळा
नवेंदुशेखराचे अरुणलेखेशी लग्न लागले, तेव्हा होमाच्या धुराआडून भगवान प्रजापती किंचितसे हसले. हाय रे! प्रजापतीला जो खेळ, तो आपल्या वाट्याला नेहमीच गमतीचा ठरत नाही. नवेंदुशेखराचे वडील पूर्णेंदुशेखर इंग्रज सरकारदरबारी नामांकित होते. या भवसागरात केवळ भराभर सलामांची वल्ही मारत मारत ते रायबहादूर पदवीच्या उत्तुंग वाळवंटी किनाऱ्याला जाऊन लागले होते;—याहूनही दुर्गम अशा मानमरातबाच्या वाटेची शिदोरी त्यांच्यापाशी होती, पण वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी, अगदी जवळ दिसणाऱ्या राजेपदाच्या किताबाच्या धुक्यात लपलेल्या शिखराकडे करुण, लोलुप नजर खिळवून बसले असतानाच, हे राजकृपेचे धनी अकस्मात किताबविरहित लोकी निघून गेले, आणि असंख्य सलामांनी ढिली झालेली त्यांच्या मानेची गाठ स्मशानातल्या शय्येवर विसावली. पण विज्ञान सांगते की शक्तीचे स्थानांतर होते, रूपांतर होते, नाश होत नाही—चंचल लक्ष्मीची अचंचल सखी जी सलामशक्ती, ती वडिलांच्या खांद्यावरून मुलाच्या खांद्यावर उतरली—आणि नवेंदूचे नवे कोरे मस्तक लाटांच्या तडाख्यांनी हेलकावणाऱ्या कोहळ्यासारखे इंग्रजांच्या दारोदारी अविश्रांत वर-खाली होऊ लागले. त्यांची पहिली बायको मूलबाळ न होताच वारली, आणि मग ज्या घराण्यात त्यांनी दुसरे लग्न केले, त्या घराण्याचा इतिहास अगदी निराळा. त्या घराण्यातले थोरले भाऊ प्रमथनाथ ओळखीच्या लोकांच्या प्रीतीला आणि आप्तांच्या लाडाला पात्र होते. घरची माणसे आणि आळीतले चार लोक त्यांना प्रत्येक बाबतीत अनुकरण करण्याजोगे मानत.
राजटिळा
प्रमथनाथ विद्येने बी. ए. होते आणि बुद्धीने चतुर होते, पण मोठा पगार किंवा धारदार लेखणी यांची त्यांनी कधी पर्वा केली नाही; वशिल्याचे बळही त्यांना फारसे नव्हते, कारण इंग्रज त्यांना जितके दूर ठेवत, तितकेच तेही इंग्रजांना दूर ठेवून वागत. म्हणून प्रमथनाथ घरच्या कोपऱ्यात आणि ओळखीच्या वर्तुळातच तेजाने झळकत—दूरच्या लोकांचे लक्ष वेधून घेण्याची कुठलीच ताकद त्यांच्यात नव्हती. हे प्रमथनाथ एकदा तीनेक वर्षांसाठी विलायतेला जाऊन आले होते. तिथे इंग्रजांच्या सौजन्याने भारावून जाऊन, हिंदुस्थानचा अपमान आणि दुःख विसरून, ते इंग्रजी पोशाख चढवून मायदेशी परतले. भावंडे आधी जरा संकोचली—पण मग दोन दिवसांतच म्हणू लागली की इंग्रजी कपड्यांत दादा जसे शोभतात तसे दुसरे कुणीच शोभत नाही; इंग्रजी कपड्यांचा गौरव आणि गर्व हळूहळू घराण्याच्या अंतःकरणात भिनला. प्रमथनाथ विलायतेहून असे मनाशी ठरवून आले होते की इंग्रजांशी बरोबरीचे नाते राखून कसे वागावे, याचा अपूर्व दाखला आपण घालून देऊ;—वाकल्याशिवाय इंग्रजांशी मैत्री जुळत नाही असे जो म्हणतो, तो स्वतःचा हीनपणा उघड करतो आणि इंग्रजांवरही अन्यायाने ठपका ठेवतो. विलायतेतल्या मोठमोठ्या लोकांकडून पुष्कळशी शिफारसपत्रे आणून प्रमथनाथांनी हिंदुस्थानातल्या इंग्रजी वर्तुळात थोडीफार पत मिळवली. इतकेच काय, अधूनमधून सपत्नीक इंग्रजांच्या चहापानात, भोजनात, खेळात आणि हास्यविनोदात त्यांना थोडाथोडा वाटाही मिळू लागला. भाग्याच्या धुंदीने त्यांच्या शिरा-उपशिरा हळूहळू झिणझिणू लागल्या. अशातच एका नव्या रेल्वेमार्गाच्या उद्घाटनानिमित्त रेल्वे कंपनीच्या निमंत्रणावरून छोट्या लाटसाहेबांबरोबर देशातले पुष्कळसे राजकृपेने ताठलेले प्रतिष्ठित लोक गाड्या भरभरून नव्या लोहमार्गावरून प्रवासाला निघाले. प्रमथनाथही त्यांच्यात होते.
राजटिळा
परतताना एका इंग्रज दारोग्याने देशी बड्या लोकांना एका खास डब्यातून अतिशय अपमान करून खाली उतरवले. इंग्रजी पोशाखातले प्रमथनाथही आपली अब्रू सांभाळून उतरण्याच्या बेतात आहेत हे पाहून दारोगा म्हणाला, 'आपण का उठता? आपण बसा ना.' या खास सन्मानाने प्रमथनाथ आधी जरासे फुगले. पण गाडी सुटली, गवताचे पातेही नसलेल्या, नांगरटीने धुरकट झालेल्या पश्चिमेकडच्या माळाच्या पार टोकापासून मावळतीची फिकट प्रभा एखाद्या करुण, आरक्त लज्जेसारखी जणू सगळ्या देशावर पसरली, आणि खिडकीपाशी एकटेच बसून, वनराईआड दडलेल्या संकोचलेल्या बंगभूमीकडे ते खिडकीतून एकटक पाहत विचार करू लागले, तेव्हा धिक्काराने त्यांचे हृदय विदीर्ण झाले आणि दोन्ही डोळ्यांतून आगीसारख्या जाळणाऱ्या अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांना एक गोष्ट आठवली. एक गाढव राजरस्त्यावरून देवमूर्तीचा रथ ओढत चालले होते, वाटसरू त्याच्यापुढे धुळीत लोटांगण घालून मूर्तीला नमस्कार करत होते, आणि मूर्ख गाढव मनातल्या मनात समजत होते की सगळे आपल्यालाच मान देत आहेत. प्रमथनाथ मनाशी म्हणाले—गाढवात आणि माझ्यात एवढाच काय तो थोडासा फरक दिसतो, की मला आज कळून चुकले आहे, मान माझा नाही, माझ्या खांद्यावरच्या ओझ्याचा आहे. प्रमथनाथांनी घरी येऊन घरातल्या सगळ्या मुलाबाळांना बोलावले, एक होमाग्नी पेटवला, आणि विलायती कपडेलत्ते एकेक करून आहुतीसारखे त्यात टाकायला सुरुवात केली. ज्वाळा जसजशा उंच उसळल्या तसतशी मुले उचंबळत्या आनंदाने नाचू लागली. तेव्हापासून प्रमथनाथांनी इंग्रजांच्या घरच्या चहाचे घोट आणि पावाचे तुकडे सोडून दिले आणि पुन्हा घरच्या कोपऱ्याच्या किल्ल्यात अभेद्य होऊन बसले; आणि वर सांगितलेले ते अपमानित किताबधारी पूर्वीसारखेच इंग्रजांच्या दारोदारी पगड्या हलवत फिरत राहिले.
राजटिळा
दैवाच्या फेऱ्याने अभागी नवेंदुशेखरांनी याच घराण्यातल्या एका मधल्या बहिणीशी लग्न करून टाकले. घरातल्या मुली लिहिण्यावाचण्यात जशा, तशाच दिसायलाही—नवेंदूंना वाटले, मोठेच घबाड हाती लागले. पण मला मिळवून तुम्हीही काही कमी जिंकलेले नाही, हे सिद्ध करायला त्यांनी वेळ दवडला नाही. कुठल्या साहेबाने त्यांच्या वडिलांना केव्हा काय पत्र लिहिले होते, ते जणू अगदी चुकून, योगायोगानेच खिशातून बाहेर पडल्यासारखे करून ते मेहुण्यांच्या हाती सरकवू लागले. मेहुण्यांच्या कोमल तोंडल्यासारख्या लाल ओठांआडून तीक्ष्ण, धारदार हसू जेव्हा लालभडक मखमली म्यानातून डोकावणाऱ्या लखलखत्या कट्यारीसारखे दिसू लागले, तेव्हा कुठे, कधी, कुणापुढे—याचे त्या अभाग्याला भान आले. त्याला कळले, मोठीच चूक झाली. मेहुण्यांपैकी थोरली, आणि रूपागुणांत सर्वांत श्रेष्ठ, लावण्यलेखा हिने एके दिवशी शुभ मुहूर्त पाहून नवेंदूच्या शयनगृहातल्या कोनाड्यात दोन जोड विलायती बूट शेंदराने माखून स्थापले; आणि त्यांच्यापुढे फुले, चंदन आणि दोन पेटत्या मेणबत्त्या ठेवून धूप-ऊद जाळला. नवेंदूने खोलीत पाऊल टाकताच दोघी मेहुण्यांनी त्याचे दोन्ही कान धरले आणि म्हणाल्या, 'तुझ्या इष्टदेवतेला नमस्कार कर, तिच्या कृपेने तुझी पदवृद्धी होवो.' तिसरी मेहुणी किरणलेखा हिने कित्येक दिवस मेहनत करून एका चादरीवर जोन्स, स्मिथ, ब्राउन, टॉमसन अशी शंभर प्रचलित इंग्रजी नावे लाल दोऱ्याने भरली, आणि एके दिवशी मोठ्या थाटामाटात ती रामनामी उपरण्यासारखी नामावली म्हणून नवेंदूला भेट दिली. चौथी मेहुणी शशांकलेखा वयाच्या हिशेबाने गणतीत येण्याजोगी नसली तरी म्हणाली, 'भावोजी, मी ना तुला एक जपमाळ करून देईन, साहेबांच्या नावाचा जप करत बस.'
राजटिळा
तिच्या मोठ्या बहिणींनी तिला दटावले, 'चल गं, तुला एवढा आगाऊपणा करायला नको.' नवेंदूला मनातून रागही येतो, लाजही वाटते, पण मेहुण्यांना सोडवतही नाही; त्यातून थोरली मेहुणी फारच सुंदर. तिच्यात मध जितका, तितकेच काटे; तिची नशा आणि तिची आग दोन्ही मनाला अगदी चिकटून बसतात. पंख दुखावलेला पतंग रागाने भुणभुणत राहतो, आणि तरी आंधळ्या, अजाण जिवासारखा भोवताली घिरट्या घालून घालून मरतो. शेवटी मेहुण्यांच्या संगतीच्या जबर मोहात पडून नवेंदू साहेबांच्या लाडाची हाव साफ नाकारू लागला. ज्या दिवशी मोठ्या साहेबांना सलाम करायला जाई, त्या दिवशी मेहुण्यांना सांगे, सुरेंद्र बॅनर्जींचे भाषण ऐकायला चाललो आहे. दार्जिलिंगहून परतणाऱ्या मधल्या साहेबांचे स्टेशनवर स्वागत करायला निघताना मेहुण्यांना सांगून जाई, मधल्या मामांना भेटायला चाललो. साहेब आणि मेहुण्या अशा दोन होड्यांवर पाय ठेवून तो अभागी भलत्याच पेचात सापडला. मेहुण्या मनाशी म्हणाल्या, तुझी ती दुसरी होडी फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. महाराणीच्या येत्या वाढदिवशी नवेंदू किताबांच्या स्वर्गलोकाच्या पहिल्या पायरीवर, रायबहादूर पदवीवर, पाऊल ठेवणार अशी कुणकुण कानी आली—पण त्या संभाव्य सन्मानाची, आनंदाने उचंबळणारी ही बातमी तो भित्रा बिचारा मेहुण्यांपाशी फोडू शकला नाही;—फक्त एकदा शरदातल्या शुक्लपक्षाच्या संध्याकाळी, सर्वनाशी चांदण्यात, भरून आलेल्या मनाच्या आवेगात त्याने ती बायकोपाशी बोलून टाकली. दुसऱ्या दिवशी भरदिवसा बायको पालखीत बसून आपल्या थोरल्या बहिणीच्या घरी गेली आणि अश्रूंनी दाटलेल्या गळ्याने गाऱ्हाणे गाऊ लागली. लावण्य म्हणाली, 'त्यात काय एवढे? रायबहादूर झाला म्हणून तुझ्या नवऱ्याला काही शेपूट फुटणार नाही—तुला एवढी लाज कसली गं!'
राजटिळा
अरुणलेखा पुन्हा पुन्हा म्हणत राहिली,—'नाही दिदी, आणखी काहीही होईन, पण रायबहादुरीण काही मला होववणार नाही.' खरी गोष्ट अशी, की अरुणच्या ओळखीचे भूतनाथबाबू रायबहादूर होते—पदवीला तिचा मनापासून विरोध होता तो त्यामुळेच! लावण्यने तिची पुष्कळ समजूत घातली आणि म्हणाली, 'बरे, त्याची तू काळजी करू नकोस.' लावण्यचे यजमान नीलरतन बक्सरला नोकरी करत. शरद ऋतू सरता सरता नवेंदूंना तिथून लावण्यचे आमंत्रण आले. आनंदित मनाने, फार वेळ न लावता, ते गाडीत बसून निघाले. रेल्वेत चढताना त्यांचे डावे अंग फुरफुरले नाही—पण त्यावरून एवढेच सिद्ध होते की, संकट जवळ आले असता डावे अंग फुरफुरणे ही एक निराधार अंधश्रद्धा आहे. पश्चिमेकडच्या प्रदेशात नव्या थंडीबरोबर आलेल्या आरोग्याने आणि सौंदर्याने, अरुण आणि पांढुरक्या छटांत पुरती उमलून, लावण्यलेखा निर्मळ शरदात निर्जन नदीकाठी लाडाने वाढलेल्या, न कोमेजलेल्या, प्रफुल्ल काशफुलांच्या बनासारखी हास्याने आणि लहरींनी झळाळत होती. नवेंदूच्या मुग्ध नजरेवर जणू एखादी पूर्ण बहरलेली मालतीची वेल नव्या पहाटेचे थंड, लखलखते दवबिंदू शिडकाव्यामागून शिडकाव्याने वर्षवू लागली. मनाच्या आनंदाने आणि पश्चिमेच्या हवेने नवेंदूचे अपचनाचे दुखणे पळाले. आरोग्याच्या नशेत, सौंदर्याच्या मोहात आणि मेहुणीच्या हातच्या शुश्रूषेच्या पुलकात तो जणू जमीन सोडून आकाशावरून चालू लागला. त्यांच्या बागेसमोरून दुथडी भरलेली गंगा जणू त्याच्याच मनातल्या बेफाम वेडाला आकार देत, प्रचंड कल्लोळ करत, जबर आवेगाने कुठेतरी अज्ञाताकडे वाहत जात असे.
राजटिळा
पहाटे नदीकाठी फिरून परतताना हिवाळी सकाळचे कोवळे ऊन प्रियजनाच्या भेटीच्या उबेसारखे त्याचे सारे अंग कृतार्थ करून टाकी. मग परत आल्यावर मेहुणीच्या हौसेच्या स्वयंपाकात हाताखाली मदत करण्याचे काम अंगावर घेतल्याने नवेंदूचे अज्ञान आणि अनाडीपण पावलोपावली उघडे पडत असे. पण सराव करून आणि लक्ष देऊन ते हळूहळू सुधारावे, अशी कसलीच उत्सुकता त्या मूढ अननुभवी माणसात दिसली नाही,—कारण रोज स्वतःला अपराधी करून जी बोलणी, जी कानउघाडणी तो खाई, तिने त्याचे पोट काही केल्या भरत नसे. मसाल्याचे जिन्नस नेमक्या प्रमाणात वाटणे, चुलीवरून पातेले उतरवणे-चढवणे, जास्त आचेने भाजी करपू नये याची नीट व्यवस्था करणे—अशा बाबतींत आपण तान्ह्या बाळासारखे अडाणी, असमर्थ आणि असहाय आहोत, हेच रोज जोर लावून सिद्ध करून नवेंदू मेहुणीचे दयामिश्रित हसू आणि हास्यमिश्रित हेटाळणी मनसोक्त उपभोगत असे. दुपारी, एकीकडे भुकेचा तगादा आणि दुसरीकडे मेहुणीचा आग्रह, स्वतःची उत्सुकता आणि प्रियजनाची उत्कंठा, स्वयंपाकाची नीटनेटकी सुबकता आणि स्वयंपाकिणीच्या सेवेची गोडी—या दोन्हींचा मेळ बसल्यावर जेवणाचे वजन सांभाळणे त्याला कठीण होऊन बसे. जेवणानंतर साध्याशा पत्त्यांच्या डावातही नवेंदूला आपली प्रतिभा दाखवता येत नसे. तो चोरी करी, दुसऱ्याच्या हातातली पाने बघी, हिसकाहिसकी आणि वादावादी उकरून काढी, पण तरीही जिंकू शकत नसे. न जिंकताही तो आपली हार जबरदस्तीने नाकारी, आणि त्यापायी रोज त्याच्या वाट्याला येणाऱ्या टोमण्यांना सीमा नसे; तरीही तो निगरगट्ट स्वतःला सुधारण्याच्या प्रयत्नांविषयी अगदी बेफिकीर होता. फक्त एकाच बाबतीत त्याची सुधारणा पुरी झाली होती. साहेबांचा लाड हेच जीवनाचे अंतिम ध्येय, ही गोष्ट तो तूर्तास विसरून गेला होता. आप्तस्वकीयांचा आदर आणि माया किती सुखाची, किती अभिमानाची असते, हेच तो मनापासून अनुभवत होता.
राजटिळा
शिवाय, तो जणू एका नव्याच हवेत येऊन पडला होता. लावण्यचे यजमान नीलरतनबाबू कोर्टात मोठे वकील असूनही साहेबसुभ्यांच्या भेटीला जात नसत, म्हणून पुष्कळ बोलले जाई—ते म्हणत—'कशाला रे बाबा! त्यांनी उलट शिष्टाचार केला नाही, तर मी जे दिले ते मला कुठल्याही मार्गाने परत मिळणार नाही. वाळवंटातली वाळू शुभ्र पांढरी आहे म्हणून काय तिच्यात बी पेरण्यात काही सुख आहे! पीक हाती येणार असेल तर काळ्या जमिनीतच बी पेरावे.' नवेंदूही ओढीने ओढला जाऊन त्या गोटात सामील झाला. पुढे काय होईल याची त्याला चिंताच उरली नाही. वडिलांच्या आणि स्वतःच्या मेहनतीने पूर्वीच जी जमीन मशागत करून ठेवली होती, तिच्यात रायबहादूर किताबाची शक्यता आपोआपच वाढत चालली. दरम्यान नव्याने पाणी घालण्याची गरजच उरली नाही. इंग्रजांच्या एका खास आवडत्या शहरात नवेंदूंनी मोठा खर्च करून घोड्यांच्या शर्यतीचे एक मैदान बांधून दिले होते. इतक्यात काँग्रेसचे दिवस जवळ आले. नीलरतनांकडे वर्गणी गोळा करण्याच्या विनंतीचे पत्र आले. नवेंदू लावण्यबरोबर मनाच्या आनंदात निर्धास्तपणे पत्ते खेळत होता. नीलरतन वही हाती घेऊन मध्येच येऊन म्हणाले—'एक सही द्यावी लागेल.' जुन्या सवयीच्या संस्कारामुळे नवेंदूचा चेहरा उतरला. लावण्य घाईघाईने म्हणाली, 'खबरदार, असले काही करू नकोस, तुझ्या घोड्यांच्या शर्यतीच्या मैदानाची माती होईल!' नवेंदूने फुशारकी मारत म्हटले—'त्या काळजीने मला रात्री झोपच लागत नाही!' नीलरतन धीर देत म्हणाले, 'तुमचे नाव कुठल्याही वर्तमानपत्रात छापून येणार नाही.' लावण्य अतिशय काळजीत पडल्यासारखा शहाणा चेहरा करून म्हणाली—'तरी कशाला! कोण जाणे, बोलता बोलता—' नवेंदू तडकून म्हणाला, 'वर्तमानपत्रात छापून आले तर माझे नाव काही झिजून जाणार नाही.'
राजटिळा
असे म्हणून नीलरतनांच्या हातातून वही ओढून घेऊन त्याने एकदम हजार रुपयांची सही फटदिशी ठोकून दिली. मनात आशा होती, बातमी वर्तमानपत्रात येणार नाही. लावण्य डोक्याला हात लावून म्हणाली, 'हे काय करून बसलास!' नवेंदू ताठ्याने म्हणाला, 'का, काय गुन्हा केला मी!' लावण्य म्हणाली—'सियालदह स्टेशनचे गार्ड, व्हाइटवेच्या दुकानातले असिस्टंट, हार्ट ब्रदर्सचे साईससाहेब—हे जर तुझ्यावर रागावून रुसून बसले—जर तुझ्या पूजेच्या आमंत्रणाला शॅम्पेन प्यायला आले नाहीत, जर भेटल्यावर तुझी पाठ थोपटली नाही, तर!' नवेंदू उद्धटपणे म्हणाला, 'तर मग मी बिऱ्हाडी जाऊन मरून पडेन!' काही दिवसांनीच, नवेंदू सकाळी चहा पीत पीत वर्तमानपत्र वाचत असताना अचानक त्यांच्या नजरेस पडले, की 'एक्स' अशी सही करणाऱ्या एका पत्रलेखकाने त्यांचे भरपूर आभार मानून काँग्रेसला दिलेल्या वर्गणीची बातमी छापली आहे, आणि त्यांच्यासारखा माणूस पक्षात आल्याने काँग्रेसचे बळ किती वाढले आहे, याचे मोजमाप करणे त्याला शक्य झालेले नाही. काँग्रेसचे बळ वाढले! हाय रे स्वर्गवासी तात पूर्णेंदुशेखर! काँग्रेसचे बळ वाढवण्यासाठीच का तुम्ही या अभाग्याला भारतभूमीवर जन्माला घातलेत! पण दुःखाबरोबर सुखही असते. नवेंदूसारखा माणूस कुणी ऐरागैरा नव्हे—त्यांना आपल्या काठावर ओढून घेण्यासाठी एकीकडे हिंदुस्थानातले इंग्रज आणि दुसरीकडे काँग्रेस लाळ घोटत गळ टाकून डोळ्याची पापणी न लववता बसले आहेत, ही गोष्ट काही अगदीच झाकून ठेवण्याजोगी नव्हे. तेव्हा नवेंदू हसत हसत वर्तमानपत्र घेऊन लावण्यला दाखवले. कुणी लिहिले याची जणू तिला काहीच कल्पना नाही, अशा थाटात लावण्य आकाशातून पडल्यासारखी होऊन म्हणाली—'अगं बाई, याने तर सगळेच फोडून टाकले! अरेरे! अरेरे! तुझा असा कोण वैरी होता! त्याच्या लेखणीला कीड लागो, त्याच्या शाईत वाळू पडो, त्याचा कागद कसर खावो—'
राजटिळा
नवेंदू हसून म्हणाला—'आणखी शाप देऊ नकोस! मी माझ्या वैऱ्याला क्षमा करून आशीर्वाद देतो, त्याला सोन्याची दौत-लेखणी लाभो!' दोन दिवसांनी काँग्रेसच्या विरोधी पक्षातले, इंग्रज संपादकाचे एक इंग्रजी वर्तमानपत्र टपालाने नवेंदूच्या हाती आले; वाचून पाहतात तो त्यात 'वन हू नोज्'—म्हणजे 'जाणणारा कुणी एक'—या सहीने वरील बातमीचा प्रतिवाद छापून आला आहे. लेखक लिहितो की, 'नवेंदूंना जे ओळखतात ते त्यांच्या नावाने उठवलेल्या या बदनामीवर कधीही विश्वास ठेवू शकणार नाहीत;—बिबट्याला आपल्या कातडीवरचे काळे ठिपके बदलणे जसे अशक्य, तसेच नवेंदूंना काँग्रेसचा पक्ष वाढवणेही. बाबू नवेंदुशेखरांपाशी स्वतःचे पुरेसे गाठोडे आहे—ते कामधंदा नसलेले नोकरीचे उमेदवार नव्हेत की अशील नसलेले वकील नव्हेत. दोन दिवस विलायतेत फिरून, पोशाखात आणि चालीरीतींत विचित्र माकडचेष्टा करून, घमेंडीने इंग्रज समाजात घुसू पाहून, शेवटी खट्टू मनाने, हताश होऊन ते परत आलेले नाहीत; तेव्हा ते कशासाठी हे सगळे वगैरे वगैरे!' हाय रे परलोकवासी पिता पूर्णेंदुशेखर! इंग्रजांपाशी एवढे नाव, एवढा विश्वास कमावून ठेवूनच तुम्ही गेलात तर! हे पत्रही मेहुणीपुढे मोराच्या पिसाऱ्यासारखे फुलवून धरण्याजोगे होते. त्यात एक गोष्ट होती, की नवेंदू कुणी अनामिक, कफल्लक, लक्ष्मीने पाठ फिरवलेला माणूस नव्हेत, ते भारदस्त, वजनदार गृहस्थ आहेत! लावण्य पुन्हा आकाशातून पडल्यासारखी होऊन म्हणाली—'आता हे तुझ्या कुठल्या जिवलग मित्राने लिहिले! कुठल्या तिकीट कलेक्टरने, कुठल्या चामड्याच्या दलालाने, की किल्ल्यातल्या बँडच्या कुठल्या वाजंत्र्याने!' नीलरतन म्हणाले, 'या पत्राचा प्रतिवाद तुम्ही करायलाच हवा.' नवेंदू जरा तोऱ्यात म्हणाला—'गरज काय! जो जे बोलेल त्या प्रत्येकाचा प्रतिवाद करत बसायचे की काय?'
राजटिळा
लावण्यने मोठ्याने खळखळून हसून चारी दिशांना हास्याचे कारंजेच उडवले. नवेंदू ओशाळून म्हणाला, 'एवढे हसायला काय झाले!' त्याच्या उत्तरादाखल लावण्य पुन्हा आवरता न येणाऱ्या वेगाने हसत हसत आपली बहरलेल्या तारुण्याची देहलता लोळवू लागली. नाकातोंडाडोळ्यांत या भरपूर थट्टेच्या पिचकारीचे फवारे खाऊन नवेंदू अगदी फजीत झाला. जरा खट्टू होऊन म्हणाला—'तुला वाटते, प्रतिवाद करायला मी घाबरतो!' लावण्य म्हणाली—'छे, तसे कशाला! मी विचार करत होते, तुझ्या एवढ्या आशा-भरवशाचे ते घोड्यांच्या शर्यतीचे मैदान वाचवायचा प्रयत्न तू अजून सोडलेला नाहीस—जोवर श्वास, तोवर आस!' नवेंदू म्हणाला, 'म्हणजे त्यासाठी मी लिहीत नाही, असे वाटते तुला!' आणि भयंकर संतापून दौत-लेखणी घेऊन बसला. पण लिखाणात संतापाची लाली फारशी उमटली नाही, म्हणून लावण्य आणि नीलरतन यांना दुरुस्तीचे काम हाती घ्यावे लागले. जणू पुऱ्या तळण्याचा कार्यक्रमच सुरू झाला—नवेंदू जी पुरी पाण्यात आणि तुपात थंडगार, मऊमऊ करून, दाबून दाबून जमेल तितकी चपटी लाटून देई, ती त्याचे दोघे साहाय्यक तत्काळ तळून कडक आणि गरम करून टम्म फुगवून काढत. लिहिले गेले की, आप्त जेव्हा शत्रू होतो, तेव्हा तो बाहेरच्या शत्रूहूनही भयंकर होतो. पठाण किंवा रशियन हिंदुस्थान सरकारचे तितके शत्रू नव्हेत, जितका गर्वाने उन्मत्त झालेला अँग्लो-इंडियन समाज. सरकार आणि सामान्य प्रजा यांच्यातल्या निर्धोक स्नेहबंधनाच्या आड येणारा अभेद्य अडसर तोच. राजा आणि प्रजा यांच्यात कायमचा सलोखा साधण्यासाठी काँग्रेसने जो प्रशस्त राजमार्ग खुला केला आहे, त्याच्या अगदी मधोमध अँग्लो-इंडियन वर्तमानपत्रे काट्यांसारखी पसरून बसली आहेत. वगैरे.
राजटिळा
नवेंदूला आतल्या आत भीती भीती वाटू लागली, आणि तरीही लेख फार झकास उतरला आहे या विचाराने राहून राहून थोडा आनंदही होऊ लागला. इतकी सुंदर रचना करणे त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. यानंतर काही दिवस निरनिराळ्या वर्तमानपत्रांतून वादविवाद, आरोप-प्रत्यारोप होऊन नवेंदूची वर्गणी आणि काँग्रेसमध्ये सामील होणे यावरून दाही दिशांना ढोल वाजू लागले. आता नवेंदू जिवावर उदार होऊन बोलण्याचालण्यात, मेहुण्यांच्या मंडळात, एक अत्यंत निर्भय देशभक्त बनला. लावण्य मनातल्या मनात हसून म्हणाली, 'अजून तुझी अग्निपरीक्षा बाकी आहे.' एके दिवशी सकाळी नवेंदू आंघोळीपूर्वी छातीला तेल चोळून पाठीच्या दुर्गम भागांपर्यंत तेल पोचवण्याची युक्ती करत असताना बेहऱ्याने त्यांच्या हाती एक कार्ड आणून दिले; त्यावर साक्षात मॅजिस्ट्रेटसाहेबांचे नाव छापलेले. लावण्य हसऱ्या, उत्सुक डोळ्यांनी आडोशातून गंमत पाहत होती. तेलाने माखलेल्या अंगाने काही मॅजिस्ट्रेटसाहेबांना भेटता येत नाही—तळण्यापूर्वी मसाला चोळलेल्या कोई माशासारखे नवेंदू उगाच तडफडू लागले. घाईघाईने क्षणार्धात आंघोळ उरकून, कसेबसे कपडे चढवून, धापा टाकत ते बाहेरच्या दिवाणखान्यात येऊन पोचले. बेहरा म्हणाला, 'साहेब बराच वेळ बसून बसून निघून गेले.' या आद्यंत खोटेपणाच्या पापातला किती वाटा बेहऱ्याचा आणि किती लावण्यचा, हा नीतिशास्त्रीय गणितातला एक बारीक प्रश्न आहे. पालीची तुटलेली शेपूट जशी अगदी आंधळेपणाने तडफडत राहते, तसे नवेंदूचे क्षुब्ध हृदय आतल्या आत आपटू लागले. दिवसभर खाता-झोपताना त्याला चैन पडेना.
राजटिळा
लावण्यने आतल्या हसण्याची सगळी झाक चेहऱ्यावरून पार पुसून टाकली आणि काळजीच्या सुरात राहून राहून ती विचारू लागली, 'आज तुला काय झाले आहे, सांग पाहू! तब्येत-बिब्येत बिघडली नाही ना?' नवेंदूने कष्टाने हसून कसेबसे एक प्रसंगाला साजेसे उत्तर शोधून काढले—म्हणाला—'तुझ्या राज्यात आजार कसला? तू तर माझी धन्वंतरीण!' पण क्षणात ते हसू विरले—आणि तो विचार करू लागला,—एक तर मी काँग्रेसला वर्गणी दिली, वर्तमानपत्रात कडक पत्र लिहिले—त्यात भर म्हणजे मॅजिस्ट्रेटसाहेब स्वतः मला भेटायला आले, आणि मी त्यांना बसवून ठेवले—कोण जाणे ते काय समजत असतील! हाय रे तात, हाय पूर्णेंदुशेखर! जो मी नाही, तोच मी दैवाच्या फेऱ्याने, गोंधळात गोंधळात ठरलो! दुसऱ्या दिवशी नटूनथटून, घड्याळाची साखळी लोंबकळत ठेवून, डोक्यावर मोठे थोरले पागोटे चढवून नवेंदू बाहेर पडला. लावण्यने विचारले, 'कुठे निघालास?' नवेंदू म्हणाला, 'एक खास काम आहे—' लावण्य काहीच बोलली नाही. साहेबांच्या दाराशी कार्ड काढताक्षणी अर्दली म्हणाला, 'आता भेट होणार नाही.' नवेंदूने खिशातून दोन रुपये काढले. अर्दलीने त्रोटक सलाम करून म्हटले, 'आम्ही पाच जण आहोत.' नवेंदूंनी तत्काळ दहा रुपयांची एक नोट काढून दिली. साहेबांकडून बोलावणे आले. साहेब तेव्हा चपला आणि मॉर्निंग गाउन घालून लिहिण्यावाचण्याच्या कामात गुंतले होते. नवेंदूंनी एक सलाम ठोकला—मॅजिस्ट्रेटसाहेबांनी बोटाच्या इशाऱ्याने त्यांना बसायची परवानगी दिली आणि कागदावरून मान वर न करता विचारले, 'काय म्हणायचे आहे बाबू?' नवेंदू घड्याळाची साखळी चाळवत चाळवत नम्र, कापऱ्या आवाजात म्हणाला—'काल आपण कृपा करून मला भेटायला आला होता, पण—'
राजटिळा
साहेबांनी भुवया आक्रसून कागदावरून एक डोळा वर करून म्हटले—'भेटायला आलो होतो! बाबू, व्हॉट नॉन्सेन्स आर यू टॉकिंग!' 'बेग युवर पार्डन. चूक झाली, घोटाळा झाला'—असे म्हणत म्हणत घामाने निथळत नवेंदू कसाबसा बाहेर पडला. आणि त्या रात्री अंथरुणावर पडल्यावर, दुःस्वप्नात ऐकलेल्या एखाद्या मंत्रासारखे एक वाक्य राहून राहून त्याच्या कानात शिरू लागले—बाबू, यू आर अ हाउलिंग इडियट! वाटेने परत येता येता त्याची अशी पक्की समजूत झाली की, मॅजिस्ट्रेट आपल्याला भेटायला आला होता ही गोष्ट त्याने केवळ रागाच्या भरात नाकारली! मनातल्या मनात म्हणाला, धरणी, दुभंग हो! पण धरणीने त्याची विनंती मानली नाही, त्यामुळे तो निर्विघ्नपणे घरी येऊन पोचला. येऊन लावण्यला म्हणाला, 'गावी पाठवायला गुलाबपाणी आणायला गेलो होतो.' ते बोलणे पुरे होते न होते तोच कलेक्टरच्या चपराशा लावलेले सहा-एक शिपाई येऊन हजर झाले. सलाम करून हसऱ्या चेहऱ्याने गुपचूप उभे राहिले. लावण्य हसून म्हणाली, 'तू काँग्रेसला वर्गणी दिलीस म्हणून तुला अटक करायला तर आले नाहीत ना?' शिपायांनी, सहा जणांनी, आपल्या बारा दंतपंक्तींची टोके उघडी करून म्हटले—'बक्षीस, बाबूसाहेब!' नीलरतन शेजारच्या खोलीतून बाहेर येऊन वैतागलेल्या सुरात म्हणाले—'कसले बक्षीस!' शिपाई दात विचकत म्हणाले, 'मॅजिस्ट्रेटसाहेबांना भेटायला गेले होते, त्याचे बक्षीस!' लावण्य हसून म्हणाली, 'मॅजिस्ट्रेटसाहेबांनी हल्ली गुलाबपाणी विकायचा धंदा सुरू केला आहे की काय? असला अगदी थंडगार धंदा तर त्यांचा पूर्वी कधी नव्हता.'
राजटिळा
अभागी नवेंदूने गुलाबपाण्याचा आणि मॅजिस्ट्रेटच्या भेटीचा मेळ घालायला जाऊन काय काय असंबद्ध बडबडले, ते कुणालाच कळले नाही. नीलरतन म्हणाले—'बक्षीस मिळण्याजोगे कुठलेच काम झालेले नाही. बक्षीस नहीं मिलेगा!' नवेंदूने संकोचून खिशातून एक नोट काढून म्हटले—'ती गरीब माणसे आहेत, थोडे काही दिले तर काय बिघडले?' नीलरतनांनी नवेंदूच्या हातातून नोट ओढून घेतली आणि म्हणाले, 'यांच्याहूनही गरीब माणसे जगात आहेत, मी त्यांना देईन.' रुष्ट महेश्वराच्या भूतगणांनाही थोडेसे थंड करायची संधी न मिळाल्याने नवेंदू मोठ्या पेचात सापडला. शिपाई वज्रासारखी नजर फेकून निघायला लागले, तेव्हा नवेंदूंनी अगदी केविलवाणेपणाने त्यांच्याकडे पाहिले—मूकपणे विनवले, बाबांनो, यात माझा काही दोष नाही, तुम्हाला ठाऊकच आहे! कलकत्त्यात काँग्रेसचे अधिवेशन. त्यानिमित्त नीलरतन सपत्नीक राजधानीत दाखल झाले. नवेंदूही त्यांच्याबरोबर परतला. कलकत्त्यात पाऊल ठेवताक्षणी काँग्रेसच्या लवाजम्याने नवेंदूला चोहोबाजूंनी घेरून एक प्रचंड तांडवच सुरू केले. मान, आदर, स्तुतिस्तोत्रांना सीमा उरली नाही. सगळे म्हणाले, 'आपल्यासारखे नेते देशकार्यात सामील झाले नाहीत, तर देशाला काही तरणोपाय नाही.' या बोलण्यातले तथ्य नवेंदूंना नाकारता आले नाही,—आणि गोंधळात अचानक केव्हातरी ते देशाचे एक अधिनायक होऊन बसले. काँग्रेसच्या सभेत त्यांनी पाऊल ठेवले, तेव्हा सर्वांनी मिळून उभे राहून परकीय विलायती कर्कश सुरात 'हिप् हिप् हुर्रे' अशा आरोळ्यांनी त्यांना बेढब अभिवादन केले. आमच्या मातृभूमीच्या कानांच्या पाळ्या लाजेने लाल झाल्या.
राजटिळा
यथाकाळ महाराणीचा वाढदिवस आला—नवेंदूचा रायबहादूर किताब अगदी जवळ आलेल्या मृगजळासारखा अंतर्धान पावला. त्याच दिवशी संध्याकाळी लावण्यलेखेने थाटामाटाने नवेंदूला आमंत्रण देऊन, नवी वस्त्रे लेववून, स्वहस्ते त्याच्या कपाळी रक्तचंदनाचा टिळा लावला, आणि प्रत्येक मेहुणीने स्वतः गुंफलेला एकेक फुलांचा हार त्याच्या गळ्यात घातला. अरुणवर्णी वस्त्र नेसलेली अरुणलेखा त्या दिवशी हसूने, लाजेने आणि अलंकारांनी आडोशाआडून लखलखत होती. तिच्या घामेजलेल्या, लाजेने गार पडलेल्या हातात एक जाडजूड हार देऊन बहिणी तिला ओढाओढी करू लागल्या, पण ती काही केल्या बधली नाही, आणि तो मुख्य हार नवेंदूच्या कंठाची आस धरून निर्जन मध्यरात्रीची गुपचूप वाट पाहत राहिला. मेहुण्या नवेंदूला म्हणाल्या, 'आज आम्ही तुला राजा केले. भारतवर्षात असा मान तुझ्याखेरीज दुसऱ्या कुणालाच मिळणे शक्य नाही.' यामुळे नवेंदूचे पुरते समाधान झाले की नाही, ते त्याचे अंतःकरण आणि अंतर्यामीच जाणे—पण आमच्या मनात याबद्दल पुरता संशय राहिला आहे. आमचा पक्का विश्वास आहे की मरण्यापूर्वी तो रायबहादूर होणारच—आणि त्याच्या मृत्यूनिमित्त 'इंग्लिशमन', 'पायोनियर' ही इंग्रजी वृत्तपत्रे एकसुरात शोक केल्याशिवाय राहणार नाहीत. तेव्हा तोवर—थ्री चिअर्स फॉर बाबू पूर्णेंदुशेखर! हिप् हिप् हुर्रे! हिप् हिप् हुर्रे! हिप् हिप् हुर्रे!