रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
रामकानाईचा मूर्खपणा
कुणी कुणी म्हणतात की गुरुचरण मरणाच्या दारात होते तेव्हा त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या गृहलक्ष्मी आत माजघरात बसून पत्ते खेळत होत्या. असं म्हणणारे जगाची निंदा करणारे लोक; राईचा पर्वत करणं हा त्यांचा धंदाच. खरं म्हणजे बाईसाहेब त्या वेळी एका पायावर बसून, दुसऱ्या पायाचा गुडघा हनुवटीपर्यंत उचलून, कच्ची चिंच, कच्ची मिरची आणि कोलंबीची झणझणीत भाजी तोंडी लावून मोठ्या एकाग्रतेनं पाण्यातला शिळा भात खात होत्या. बाहेरून हाक आली तेव्हा चावून टाकलेल्या देठांचा ढीग आणि चाटून पुसून रिकामं केलेलं ताट तसंच टाकून गंभीर चेहऱ्यानं त्या म्हणाल्या, 'दोन घास शिळा भात तोंडात घालायलासुद्धा वेळ मिळत नाही.' इकडे डॉक्टरनं हात टेकले तेव्हा गुरुचरणांचे धाकटे भाऊ रामकानाई रोग्याच्या उशाशी बसून हळूहळू म्हणाले, 'दादा, मृत्युपत्र करायची इच्छा असेल तर सांगा.' गुरुचरण क्षीण आवाजात म्हणाले, 'मी सांगतो, तू लिहून घे.' रामकानाई कागद-लेखणी घेऊन तयार झाले. गुरुचरण सांगत गेले, 'माझी स्थावर-जंगम सगळी मालमत्ता मी माझी धर्मपत्नी श्रीमती वरदासुंदरी हिला देत आहे.' रामकानाईंनी लिहिलं, पण लिहिताना त्यांची लेखणी पुढे सरकत नव्हती. त्यांना मोठी आशा होती की आपला एकुलता एक मुलगा नवद्वीप हा निपुत्रिक काकांच्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल. दोघा भावांच्या चुली वेगळ्या असल्या तरी याच आशेवर नवद्वीपच्या आईनं नवद्वीपला काही केल्या नोकरी करू दिली नव्हती, लवकर लग्नही लावून दिलं होतं, आणि शत्रूंच्या तोंडात माती, ते लग्न निष्फळही ठरलं नव्हतं. तरीही रामकानाईंनी लिहिलं, आणि सही करण्यासाठी लेखणी दादांच्या हातात दिली. गुरुचरणांनी निर्जीव हातानं जी सही केली, ती थरथरत्या वाकड्यातिकड्या रेघा आहेत की त्यांचं नाव, हे ओळखणं महाकठीण.
रामकानाईचा मूर्खपणा
शिळा भात खाऊन पत्नी आल्या तेव्हा गुरुचरणांची वाचा बंद झालेली पाहून त्या रडू लागल्या. ज्यांनी मोठी आशा धरली होती आणि ज्यांना मालमत्तेला मुकावं लागलं, ते म्हणाले, 'नक्राश्रू.' पण ते काही विश्वास ठेवण्यासारखं नाही. मृत्युपत्राची हकीकत ऐकून नवद्वीपची आई धावत आली आणि तिनं भयंकर गोंधळ उडवून दिला; म्हणाली, 'मरणाच्या वेळी माणसाची बुद्धी नाठी होते. असा सोन्यासारखा पुतण्या असताना—' रामकानाई पत्नीचा फार आदर करीत— इतका की त्याला दुसऱ्या शब्दांत भीती म्हणता येईल— तरीही त्यांना राहवलं नाही, ते धावत येऊन म्हणाले, 'नवद्वीपची आई, तुझी तर बुद्धी नाठी व्हायची वेळ आलेली नाही, मग तू असं का वागतेस? दादा चालले, मी तर अजून आहे ना; तुला जे काही बोलायचं असेल ते सवडीनं मला सांग, आत्ता ती वेळ नाही.' नवद्वीपला बातमी कळून तो आला तेव्हा त्याचे काका गेले होते. नवद्वीपनं मेलेल्या माणसाला दम भरला, 'बघतोच आता तुम्हाला अग्नी कोण देतो ते— आणि श्राद्ध-शांती केली तर मी नावाचा नवद्वीप नाही.' गुरुचरण हा माणूस काहीच मानत नसे. तो डफसाहेबांचा विद्यार्थी होता. शास्त्रानं जे सर्वांत अभक्ष्य ठरवलं होतं, त्यातच त्याला विशेष तृप्ती मिळे. लोक त्याला ख्रिस्ती म्हणू लागले की तो कानाला हात लावून म्हणे, 'राम राम! मी ख्रिस्ती असेन तर गोमांस खाईन!' जिवंतपणी ज्याची ही तऱ्हा, तो ताजा ताजा मेल्यावर पिंडदान बुडेल या भीतीनं थोडासुद्धा विचलित होईल, अशी शक्यता नव्हती. पण त्या घडीला याखेरीज सूड घ्यायचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. नवद्वीपला एवढंच समाधान मिळालं की हा माणूस परलोकात जाऊन तिथे उपाशी मरून पडेल. जोपर्यंत इहलोकात आहोत तोपर्यंत काकांची मालमत्ता मिळाली नाही तरी कसंबसं पोट भरतं, पण काका ज्या लोकात गेले तिथे भीक मागूनही पिंड मिळत नाही. जिवंत राहण्यात पुष्कळ सोयी असतात.
रामकानाईचा मूर्खपणा
रामकानाई वरदासुंदरीकडे जाऊन म्हणाले, 'वहिनी, दादांनी सगळी मालमत्ता तुम्हालाच देऊन ठेवली आहे. हे त्यांचं मृत्युपत्र. लोखंडी तिजोरीत जपून ठेवा.' विधवा त्या वेळी तोंडी तोंडी लांबलचक पदं रचून मोठ्यानं विलाप करीत होत्या; दोन-चार दासीही त्यांच्या सुरात सूर मिसळून मधूनमधून दोन-चार नवे शब्द जोडून त्या शोकगीतानं साऱ्या आळीची झोप उडवत होत्या. मध्येच हा कागदाचा तुकडा येऊन पडल्यामुळे एक प्रकारे लय मोडली, आणि भावनेचाही आगापिछा राहिला नाही. सगळ्या प्रकाराला खालीलप्रमाणे असंबद्ध रूप आलं. 'अगं बाई गं, माझा केवढा सर्वनाश झाला गं, केवढा सर्वनाश झाला! बरं भाऊजी, हे लिहिलंय कुणी? तुम्हीच ना? अगं बाई गं, आता तितक्या मायेनं माझं कोण करील, माझ्याकडे कोण तोंड वर करून बघेल गं— अगं, जरा थांबा गं, फार कोकलू नका, ते ऐकू तरी द्या. अगं बाई गं, मी आधीच का नाही गेले गं— मी का जिवंत राहिले!' रामकानाईंनी मनातल्या मनात सुस्कारा सोडून म्हटलं, 'तो आमच्या नशिबाचा दोष.' घरी परतल्यावर नवद्वीपच्या आईनं रामकानाईंना धारेवर धरलं. भरलेल्या गाडीसकट खड्ड्यात पडलेला दुर्दैवी बैल गाडीवानाचे हजार टोचे खाऊनही जसा बराच वेळ हतबल होऊन निश्चल उभा राहतो, तसं रामकानाईंनी बराच वेळ गप्प राहून सगळं सोसलं— शेवटी केविलवाण्या स्वरात म्हणाले, 'माझा काय अपराध? मी काही दादा नाही.' नवद्वीपची आई फणकाऱ्यानं उसळून म्हणाली, 'हो, हो, तुम्ही फार सज्जन, तुम्हाला काही कळत नाही; दादा म्हणाले "लिही", की भाऊ लागलीच लिहून मोकळे. तुम्ही सगळे एकजात सारखे. तुम्हीसुद्धा वेळ आली की हाच पराक्रम करणार, टपूनच बसला आहात. मी मेले की कुठली तरी तोंडजळकी चेटकीण घरात आणाल— आणि माझ्या सोन्यासारख्या नवद्वीपला वाऱ्यावर सोडाल. पण त्याची काळजी करू नका, मी काही इतक्यात मरत नाही.'
रामकानाईचा मूर्खपणा
अशा रीतीनं रामकानाईंच्या भावी अत्याचारांची चर्चा करता करता गृहिणींचा पारा उत्तरोत्तर अधिकाधिक चढत गेला. रामकानाईंना पक्कं ठाऊक होतं की या सगळ्या भयंकर काल्पनिक शंका दूर करण्याच्या हेतूनं त्यांनी तिळमात्र प्रतिवाद केला तर उलटंच होईल. या भीतीनं ते अपराध्यासारखे गप्प बसून राहिले— जणू काही ते कृत्य त्यांनी करूनच टाकलं आहे, जणू सोन्यासारख्या नवद्वीपला मालमत्तेपासून वंचित करून सगळं आपल्या भावी दुसऱ्या बायकोच्या नावे लिहून देऊन ते मरूनही बसले आहेत, आणि आता अपराध कबूल करण्यावाचून दुसरी गतीच नाही. दरम्यान नवद्वीपनं आपल्या बुद्धिमान मित्रांशी खूप सल्लामसलत करून आईकडे येऊन सांगितलं, 'काही काळजी करू नकोस. ही मालमत्ता मलाच मिळेल. काही दिवसांपुरतं बाबांना इथून दुसरीकडे हलवलं पाहिजे. ते इथे असले तर सगळ्याचा विचका होईल.' नवद्वीपच्या बाबांच्या अकलेबद्दल नवद्वीपच्या आईला तिळमात्र आदर नव्हता; त्यामुळे तिलाही ही गोष्ट रास्तच वाटली. शेवटी आईच्या जाचामुळे हा अगदीच अनावश्यक, मूर्ख, कामाचा विचका करणारा बाप कसलं तरी जुजबी निमित्त काढून काही दिवसांसाठी काशीला जाऊन राहिला. थोड्याच दिवसांत वरदासुंदरी आणि नवद्वीपचंद्र एकमेकांवर खोटं मृत्युपत्र केल्याचा आरोप करून कोर्टात जाऊन उभे राहिले. नवद्वीपनं स्वतःच्या नावाचं जे मृत्युपत्र बाहेर काढलं होतं, त्यावरची सही पाहताच ते गुरुचरणांचं हस्ताक्षर असल्याचं स्पष्ट सिद्ध होत होतं; मृत्युपत्राचे एक-दोन निःस्वार्थी साक्षीदारही मिळाले होते. वरदासुंदरीच्या बाजूनं नवद्वीपचा बाप हा एकमेव साक्षीदार, आणि सही कुणालाही ओळखता येण्यासारखी नव्हती. त्यांच्याच घरी आश्रयाला असलेला त्यांचा एक मामेभाऊ होता; तो म्हणाला, 'ताई, तू काही काळजी करू नकोस. मी साक्ष देईन, आणखी साक्षीदारही जमवीन.'
रामकानाईचा मूर्खपणा
प्रकरण पुरतं शिजलं तेव्हा नवद्वीपच्या आईनं नवद्वीपच्या बापाला काशीहून बोलावून घेतलं. ते आज्ञाधारक सद्गृहस्थ बॅग आणि छत्री घेऊन वेळेवर हजर झाले. इतकंच नव्हे, थोडी रसिक थट्टाही करायचा प्रयत्न त्यांनी केला; हात जोडून हसत हसत म्हणाले, 'गुलाम हजर आहे, आता महाराणींचा काय हुकूम?' गृहिणी मान हलवून म्हणाल्या, 'पुरे, पुरे, थट्टा नको. इतके दिवस निमित्त काढून काशीत दिवस घालवून आलात, एका दिवसासाठीसुद्धा आठवण झाली नाही.' इत्यादी. अशा रीतीनं दोन्ही पक्ष बराच वेळ एकमेकांवर लाडिक आरोप करीत राहिले— शेवटी तक्रार व्यक्तीला सोडून साऱ्या पुरुषजातीपर्यंत आणि स्त्रीजातीपर्यंत जाऊन पोचली— नवद्वीपच्या आईनं पुरुषांच्या प्रेमाची तुलना मुसलमानाच्या कोंबडीवरच्या मायेशी केली. नवद्वीपचा बाप म्हणाला, 'बाईच्या तोंडात मध, आणि काळजात वस्तरा'— पण ही तोंडची गोडी नवद्वीपच्या बापानं कधी चाखली होती, हे सांगणं कठीण. दरम्यान रामकानाईंना अचानक कोर्टाकडून साक्षीदार म्हणून समन्स आलं. चकित होऊन ते त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करीत होते, तोच नवद्वीपची आई येऊन धाय मोकलून रडू लागली. म्हणाली, ती हाडं जाळणारी चेटकीण बाळ नवद्वीपला त्याच्या मायाळू काकांच्या न्याय्य वारशापासून वंचित करू पाहते आहे एवढंच नव्हे, तर आता त्या सोन्यासारख्या मुलाला तुरुंगात पाठवायची तयारीही करते आहे. शेवटी हळूहळू सगळ्या प्रकाराचा अंदाज आल्यावर रामकानाईंचे डोळे थिजले. ते मोठ्यानं ओरडले, 'अरे, तुम्ही हा काय सर्वनाश करून ठेवलात!' गृहिणी हळूहळू आपल्या खऱ्या रूपात येऊन म्हणाल्या, 'का, यात नवद्वीपचं काय चुकलं? त्यानं आपल्या काकांची मालमत्ता घ्यायची नाही! अशीच एका शब्दासरशी सोडून द्यायची!'
रामकानाईचा मूर्खपणा
कुठूनशी एक नेत्रभक्षिणी, पतीची आयुष्यहंत्री, वंध्येची कन्या उपटसुंभासारखी येऊन ठाण मांडणार, हे कोणता सत्कुलदीपक कनकचंद्र सुपुत्र सहन करू शकेल? मरणकाळी आणि चेटकिणीच्या मंत्रप्रभावानं एखाद्या मूढमती ज्येष्ठतातांना बुद्धिभ्रम झालाच असेल, तर सुवर्णमय भ्रातृपुत्रानं तो भ्रम स्वहस्ते सुधारून घेतला, यात असं कोणतं मोठं अन्याय्य कृत्य घडलं? हतबुद्ध रामकानाईंनी पाहिलं की बायको आणि मुलगा दोघं मिळून कधी आदळआपट आणि गर्जना करताहेत, तर कधी अश्रूंचे पाट वाहवताहेत; तेव्हा कपाळावर हात मारून ते गप्प बसून राहिले— त्यांनी अन्न सोडलं, पाण्यालासुद्धा स्पर्श केला नाही. असे दोन दिवस मुकाट्यानं, उपाशीपोटी गेले, आणि खटल्याचा दिवस उजाडला. दरम्यान नवद्वीपनं वरदासुंदरीच्या मामेभावाला भीती आणि आमिष दाखवून इतकं वश करून घेतलं होतं की त्यानं बिनदिक्कत नवद्वीपच्या बाजूनं साक्ष दिली. विजयश्री वरदासुंदरीला सोडून दुसऱ्या पक्षाकडे जायच्या तयारीत असतानाच रामकानाईंना पुकारलं गेलं. उपासानं मरणासन्न झालेल्या, ओठ सुकलेल्या, जीभ कोरडी पडलेल्या त्या म्हाताऱ्यानं थरथरत्या कृश बोटांनी साक्षीदाराच्या पिंजऱ्याचा कठडा घट्ट धरला. चतुर बॅरिस्टरनं मोठ्या कौशल्यानं तोंडून गोष्ट काढून घेण्यासाठी उलटतपासणी सुरू केली— फार लांबून सुरुवात करून, सावधपणे, अतिशय सावकाश आडवळणानं तो मूळ मुद्द्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला.
रामकानाईचा मूर्खपणा
तेव्हा रामकानाई न्यायाधीशांकडे वळून हात जोडून म्हणाले, 'हुजूर, मी म्हातारा आहे, फार अशक्त आहे. फार बोलण्याचं त्राण माझ्यात नाही. मला जे सांगायचं आहे ते थोडक्यात सांगून टाकतो. माझे दादा, स्वर्गीय गुरुचरण चक्रवर्ती, यांनी मृत्यूसमयी आपली सगळी मालमत्ता मृत्युपत्रानं आपल्या पत्नी श्रीमती वरदासुंदरी यांना देऊन ठेवली. ते मृत्युपत्र मी स्वतःच्या हातानं लिहिलं आणि दादांनी स्वतःच्या हातानं त्यावर सही केली. माझे पुत्र नवद्वीपचंद्र यांनी जे मृत्युपत्र दाखल केलं आहे, ते खोटं आहे.' एवढं बोलून रामकानाई थरथर कापत बेशुद्ध होऊन कोसळले. चतुर बॅरिस्टर मिश्कीलपणे शेजारच्या ॲटर्नीला म्हणाला, 'बाय जोव्ह! पाहिलंत, कसा कात्रीत पकडला मी त्याला!' मामेभाऊ धावत जाऊन ताईला म्हणाला, 'म्हाताऱ्यानं सगळ्यावर पाणी फिरवलं होतं— माझ्या साक्षीनं खटला वाचला.' ताई म्हणाल्या, 'असं? माणसं ओळखणं कोणाला जमतं! मी तर म्हाताऱ्याला चांगला माणूस समजत होते.' तुरुंगात पडलेल्या नवद्वीपचे बुद्धिमान मित्र खूप विचार करून या निष्कर्षाला आले की म्हाताऱ्यानं नक्कीच भीतीपोटी हे करून टाकलं; साक्षीदाराच्या पिंजऱ्यात चढल्यावर म्हाताऱ्याला अक्कल ताळ्यावर ठेवता आली नाही; असा अस्सल मूर्ख सगळं शहर पालथं घातलं तरी सापडायचा नाही. घरी परतल्यावर रामकानाईंना कडक सन्निपाताचा ताप भरला. वातात मुलाचं नाव घेता घेता हा मूर्ख, सगळ्या कामांचा विचका करणारा, नवद्वीपचा अनावश्यक बाप या जगातून निघून गेला; नातलगांपैकी कुणी कुणी म्हणाले, 'आणखी काही दिवस आधी गेला असता तर बरं झालं असतं'— पण त्यांची नावं मी घेऊ इच्छित नाही.