रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
रासमणीचा मुलगा
कालीपदची आई होती रासमणी — पण नाइलाजाने त्यांना बापाचे पद स्वीकारावे लागले होते. कारण, आई आणि बाप दोघेही 'आई' होऊन बसले, तर त्यात मुलाचे काही भले होत नाही. त्यांचे पती भवानीचरण मुलाला मुळीच धाकात ठेवू शकत नाहीत. ते एवढे लाड का करतात, असे विचारले की ते जे उत्तर देतात, ते समजायचे तर आधीचा इतिहास ठाऊक असायला हवा. गोष्ट अशी — शानियाडीच्या प्रसिद्ध, खानदानी श्रीमंत घराण्यात भवानीचरणांचा जन्म झाला. भवानीचरणांचे वडील अभयाचरण; त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा श्यामाचरण. उतारवयात पत्नी वारल्यावर अभयाचरणांनी दुसरे लग्न केले, तेव्हा त्यांच्या सासऱ्यांनी आलंदीची जमीनदारी खास आपल्या मुलीच्या नावे लिहून घेतली होती. जावयाच्या वयाचा हिशेब करून त्यांनी मनाशी विचार केला होता की, मुलीच्या नशिबी वैधव्य आलेच, तर अन्नवस्त्रासाठी तिला सवतीच्या मुलाच्या मिंध्यात राहावे लागू नये. त्यांनी जे कल्पिले होते, त्याचा पहिला भाग खरा ठरायला वेळ लागला नाही. त्यांचा नातू भवानीचरण जन्मल्यानंतर थोड्याच दिवसांत जावई वारले. आपल्या मुलीला तिच्या खास मिळकतीचा हक्क मिळाला, हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहून परलोकाच्या प्रवासाला निघताना तेही मुलीच्या इहलोकाविषयी बरेचसे निश्चिंत होऊन गेले. श्यामाचरण तेव्हा पुरते वयात आलेले होते. इतकेच काय, त्यांचा थोरला मुलगा तेव्हाच भवानीपेक्षा वर्षाने मोठा होता. श्यामाचरणांनी आपल्या मुलांबरोबरच भवानीला वाढवायला सुरुवात केली. भवानीचरणांच्या आईच्या मिळकतीतून त्यांनी स्वतः कधी एक पैसाही घेतला नाही, आणि दरवर्षी तिचा चोख हिशेब सावत्र आईपुढे सादर करून त्याची पावती घेतली — हे पाहून सगळेच त्यांच्या सचोटीवर लुब्ध झाले.
रासमणीचा मुलगा
खरे पाहता जवळजवळ सगळ्यांनाच वाटत होते की, एवढी सचोटी अनावश्यक आहे; इतकेच नव्हे, तर तो मूर्खपणाचाच दुसरा अवतार आहे. अखंड वडिलोपार्जित मिळकतीचा एक तुकडा दुसऱ्या बायकोच्या हाती पडावा, हे गावातल्या कुणालाच रुचले नव्हते. श्यामाचरणांनी काही डाव टाकून, कसल्यातरी युक्तीने तो दस्तऐवज रद्द करून टाकला असता, तर शेजाऱ्यापाजाऱ्यांनी त्यांच्या पुरुषार्थाचे कौतुकच केले असते; आणि ते काम कोणत्या मार्गाने बिनबोभाट साधता येईल, याचा सल्ला द्यायला जाणत्या वडीलधाऱ्यांचीही काही वाण नव्हती. पण श्यामाचरणांनी आपल्या घराण्याच्या पिढीजात हक्काला अपंग करूनसुद्धा सावत्र आईची मिळकत पूर्णपणे वेगळी राखली. या कारणाने, आणि आपल्या उपजत मायाळू स्वभावामुळेही, सावत्र आई व्रजसुंदरी श्यामाचरणांवर पोटच्या मुलासारखी माया करीत, त्यांच्यावर तसाच विश्वास ठेवीत. आपली मिळकत श्यामाचरण अगदी परकी मानून पाहतात, म्हणून त्यांनी कित्येकदा त्यांना रागेही भरले होते; म्हणत, 'बाळा, हे सगळं तुमचंच तर आहे. ही मिळकत काही मी बरोबर घेऊन स्वर्गाला जाणार नाही, ती तुमचीच राहणार; मला एवढे हिशेबठिशेब बघायचे कशाला?' श्यामाचरण त्या बोलण्याकडे लक्ष देत नसत. श्यामाचरण आपल्या मुलांना कडक शिस्तीत ठेवीत. पण भवानीचरणांवर त्यांचा कसलाच अंकुश नव्हता. हे पाहून सगळे एकमुखाने म्हणत, त्यांना पोटच्या मुलांपेक्षा भवानीचीच जास्त माया आहे. असे होता होता भवानीचे शिक्षण काही झालेच नाही. आणि व्यवहारबुद्धीच्या बाबतीत जन्मभर लहान मुलासारखेच राहून, दादावर सर्वस्वी विसंबून ते दिवस काढू लागले. मिळकतीच्या कामकाजाचा त्यांना कधी विचार करावा लागत नसे — फक्त अधूनमधून एखाद्या दिवशी सही करावी लागे. आपण सही का करतो आहोत, हे समजून घ्यायचा ते प्रयत्न करीत नसत; कारण, प्रयत्न केला असता तरी त्यांना ते जमले नसते.
रासमणीचा मुलगा
इकडे श्यामाचरणांचा थोरला मुलगा तारापद सगळ्या कामांत वडिलांचा मदतनीस म्हणून राहून कामकाजात पक्का तयार झाला. श्यामाचरण वारल्यावर तारापद भवानीचरणांना म्हणाला, 'काकासाहेब, आता आपलं एकत्र राहणं जमायचं नाही. कुणास ठाऊक, एखाद्या दिवशी किरकोळ कारणावरून मनं दुखावतील, आणि मग सगळ्या संसाराची राखरांगोळी होईल.' वेगळे होऊन एक दिवस आपली मिळकत आपल्यालाच सांभाळावी लागेल, हे भवानींनी स्वप्नातसुद्धा कल्पिले नव्हते. ज्या संसारात ते लहानपणापासून वाढले होते, तो अगदी अखंड आहे असेच ते समजत होते — त्याला कुठेतरी एक सांधा आहे आणि त्या सांध्यापाशी त्याचे दोन तुकडे करता येतात, ही बातमी अचानक कानी आल्यावर ते अगदी कावरेबावरे होऊन गेले. घराण्याच्या इभ्रतीला लागणारा बट्टा आणि नातलगांच्या मनाला होणारे दुःख यांनी तारापद जेव्हा तसूभरही ढळले नाहीत, तेव्हा मिळकतीची वाटणी कशी करता येईल, या असाध्य विचारात भवानींना गढावे लागले. त्यांची ती चिंता पाहून तारापद अतिशय आश्चर्याने म्हणाले, 'काकासाहेब, हे काय भलतंच? तुम्ही एवढा विचार का करताय? वाटणी तर झालेलीच आहे. आजोबा हयात असतानाच वाटणी करून गेलेत.' भवानी भांबावून म्हणाले, 'खरंच की काय! मला तर त्यातलं काहीच ठाऊक नाही.' तारापद म्हणाले, 'वा! ठाऊक नाही म्हणजे काय! सगळ्या मुलखाला ठाऊक आहे — तुमचं-आमचं कधी भांडण होऊ नये म्हणून आजोबांनी आलंदीची जमीनदारी तुमच्या वाट्याला लिहून देऊन सुरुवातीपासूनच तुम्हाला वेगळं करून ठेवलंय — आजवर तसंच तर चालत आलंय.' भवानीचरणांना वाटले, काहीही शक्य आहे. त्यांनी विचारले, 'आणि हे घर?'
रासमणीचा मुलगा
तारापद म्हणाले, 'तुमची इच्छा असेल तर घर तुम्हीच ठेवा. तालुक्याच्या गावी जी कोठी आहे, ती मिळाली तरी आमचं कसंबसं भागेल.' तारापद एवढ्या सहजपणे वडिलोपार्जित घर सोडायला तयार झाले, हे पाहून भवानी त्यांच्या औदार्याने थक्क झाले. तालुक्याच्या गावचे आपले घर त्यांनी कधी पाहिलेही नव्हते, आणि त्याच्याविषयी त्यांना जराही ममता नव्हती. भवानींनी आपल्या आई व्रजसुंदरी यांना सगळी हकीकत सांगितली, तेव्हा त्यांनी कपाळावर हात मारून घेतला: 'अगं बाई, हे काय भलतंच! आलंदीची जमीनदारी तर मला माझ्या पोटापाण्यासाठी स्त्रीधन म्हणून मिळाली होती — आणि तिचं उत्पन्नही काही फार नाही. वडिलोपार्जित मिळकतीत तुझा जो वाटा, तो तुला का मिळू नये?' भवानी म्हणाले, 'तारापद म्हणतो, बाबांनी आम्हाला त्या जमीनदारीखेरीज दुसरं काहीच दिलं नाही.' व्रजसुंदरी म्हणाल्या, 'तो म्हणाला म्हणून मी का ऐकून घेऊ? ह्यांनी स्वतःच्या हातानं आपल्या मृत्युपत्राच्या दोन प्रती लिहिल्या होत्या — त्यातली एक माझ्यापाशी ठेवलीय; ती माझ्या तिजोरीतच आहे.' तिजोरी उघडण्यात आली. तिथे आलंदीच्या जमीनदारीचे दानपत्र होते, पण मृत्युपत्र नव्हते. मृत्युपत्र चोरीला गेले होते. सल्ला घ्यायला माणूस बोलावण्यात आला. हा इसम म्हणजे त्यांच्या कुलगुरूंचा मुलगा, नाव बगलाचरण. सगळे म्हणत, त्याची बुद्धी भारी पक्की. त्याचा बाप गावाचा मंत्रदाता, आणि मुलगा मंत्रणादाता. बापलेकांनी गावाचा परलोक आणि इहलोक आपसात वाटून घेतला होता. इतरांच्या बाबतीत त्याचे फळ काहीही असो, त्यांची स्वतःची मात्र काहीच गैरसोय झाली नव्हती.
रासमणीचा मुलगा
बगलाचरण म्हणाला, 'मृत्युपत्र नाही सापडलं तर नाही. बापाच्या मिळकतीत दोघा भावांचा सारखा वाटा असणारच.' इतक्यात दुसऱ्या पक्षाकडून एक मृत्युपत्र बाहेर आले. त्यात भवानीचरणांच्या वाट्याला काहीच लिहिलेले नव्हते. सगळी मिळकत नातवांना दिलेली होती. तेव्हा अभयाचरणांना मुलगा झालेला नव्हता. बगलाला नावाडी करून भवानींनी खटल्याच्या महासागरात नाव लोटली. बंदराला लागल्यावर लोखंडी तिजोरी तपासून पाहिली, तेव्हा दिसले की लक्ष्मीच्या घुबडाचे घरटे पार रिकामे झाले आहे — एखाददुसरे सोनेरी पीस तेवढे गळून पडलेले. वडिलोपार्जित मिळकत दुसऱ्या पक्षाच्या हाती गेली. आणि आलंदीच्या जमीनदारीचे जे शेंडेटोक खटल्याच्या खर्चाच्या विनाशतळातून कसेबसे वर डोकावत उरले, त्याच्या आधाराने कसाबसा निर्वाह होऊ शकत होता इतकेच; घराण्याची प्रतिष्ठा राखणे मात्र शक्य नव्हते. जुने घर हाती आले म्हणून भवानीचरणांना वाटले, आपण मोठीच बाजी मारली. तारापदची मंडळी तालुक्याच्या गावी निघून गेली. दोन्ही पक्षांची पुढे भेटगाठ राहिली नाही. २ श्यामाचरणांचा हा विश्वासघात व्रजसुंदरींच्या काळजात भाल्यासारखा रुतला. श्यामाचरणाने अन्याय करून मालकांचे मृत्युपत्र चोरले, भावाला फसवले आणि बापाचा विश्वासघात केला, हे त्यांना कधीच विसरता आले नाही. त्या जिवंत होत्या तोवर रोज दीर्घ सुस्कारा टाकून पुनःपुन्हा म्हणत, 'धर्माला हे कधीच सहन व्हायचं नाही.' भवानीचरणांना त्या जवळजवळ रोज असा धीर देत की, 'मला कोर्टकचेरीतलं काही कळत नाही; पण मी तुला सांगते, ह्यांचं ते मृत्युपत्र कायमचं दडून राहायचं नाही. ते तुला नक्की परत मिळेल.'
रासमणीचा मुलगा
आईच्या तोंडून सतत हेच ऐकून भवानीचरणांना मनात फार मोठा भरवसा वाटू लागला. ते स्वतः असमर्थ होते, म्हणून असे आश्वासनाचे बोल त्यांच्या दृष्टीने फार मोठ्या सांत्वनाची गोष्ट होते. सतीसाध्वीचे बोल फळल्याशिवाय राहणार नाहीत, जे आपले आहे ते आपोआप आपल्याकडे परत येईल, हे त्यांनी मनाशी पक्के ठरवून टाकले आणि ते निर्धास्त बसून राहिले. आईच्या मृत्यूनंतर हा विश्वास आणखीच दृढ झाला — कारण मृत्यूच्या वियोगातून आईचे पुण्यतेज त्यांना आणखी कितीतरी मोठे होऊन भासले. दारिद्र्याची सगळी ओढाताण जणू त्यांच्या अंगाला लागतच नसे. वाटे, ही जी अन्नवस्त्राची आबाळ, हा जो पूर्वीच्या राहणीला बसलेला खो, हे सगळे जणू दोन दिवसांचे नाटक आहे — यातले काहीच खरे नाही. म्हणूनच जुने ढाक्याचे तलम धोतर फाटल्यावर कमी किमतीचे जाडेभरडे धोतर विकत घेऊन नेसायची पाळी आली, तेव्हा त्यांना हसू आले. पूजेच्या दिवसांत जुन्या काळचा धूमधडाका काही जमला नाही, कसेबसे उरकून घ्यावे लागले; आलेल्या पाहुण्यांनी ही गरिबीची तयारी पाहून सुस्कारे टाकीत जुन्या दिवसांच्या आठवणी काढल्या. भवानीचरण मनातल्या मनात हसले; त्यांना वाटले, 'यांना ठाऊक नाही, हे सगळं फक्त काही दिवसांपुरतं आहे — मग एक दिवस असा धूमधडाक्यात उत्सव होईल की, यांचे डोळे विस्फारलेलेच राहतील.' भविष्यातला तो निश्चित सोहळा त्यांना असा प्रत्यक्ष डोळ्यांसमोर दिसे की, वर्तमानातले दैन्य त्यांच्या नजरेतच येत नसे.
रासमणीचा मुलगा
या विषयावर त्यांच्याशी चर्चा करणारा मुख्य माणूस म्हणजे नोटो नोकर. कितीदा तरी पूजेच्या उत्सवातल्या दारिद्र्याच्या मधोमध बसून धनी-चाकर भावी सुदिनी कसकसा थाट करायचा, याच्या तपशीलवार चर्चेत रंगून गेले होते. इतकेच काय, कुणाला आमंत्रण द्यायचे आणि कुणाला नाही, आणि कलकत्त्याहून जात्रेच्या खेळाचा फड आणायची गरज आहे की नाही, यावरून दोन्ही पक्षांत घनघोर मतभेद आणि वादविवादही होऊन गेले होते. स्वभावतःच हात आखडता असल्यामुळे नटबिहारीने त्या भावी काळाच्या यादीत कंजूषपणा दाखवला, म्हणून त्याला भवानीचरणांची कडक बोलणीही खावी लागली होती. असे प्रसंग नेहमीच घडत. एकूण काय, मिळकतीविषयी भवानीचरणांच्या मनात कसलीच काळजी नव्हती. त्यांना घोर होता तो एकाच गोष्टीचा — त्यांची मिळकत भोगणार कोण? आजवर त्यांना मूलबाळ झाले नव्हते. उपवर मुलींच्या काळजीने ग्रासलेले हितचिंतक जेव्हा त्यांना आणखी एक लग्न करण्याचा आग्रह करीत, तेव्हा त्यांचे मन क्वचित चलबिचल होई; त्याचे कारण, नव्या नवरीची त्यांना विशेष हौस होती, असे नव्हे — उलट चाकर आणि तांदूळ यांच्याप्रमाणेच बायकोही जुनीच बरी, असे ते जुन्या वळणाने मानीत — पण ज्याच्या वाट्याला ऐश्वर्य येणार आहे, त्याच्या वाट्याला संतती येऊ नये, ही मोठीच विटंबना आहे, असे ते समजत. अशात जेव्हा त्यांना मुलगा झाला, तेव्हा सगळे म्हणाले, आता या घराचे भाग्य फिरणार, त्याची सुरुवात झाली आहे — साक्षात स्वर्गवासी थोरले मालक अभयाचरणच पुन्हा या घरात जन्मले आहेत; अगदी तसेच लांबसडक डोळे. मुलाच्या कुंडलीतही ग्रहनक्षत्रांचे असे योग जुळलेले दिसले की, गेलेली मिळकत परत मिळाल्याशिवाय राहणारच नाही.
रासमणीचा मुलगा
मुलगा झाल्यापासून भवानीचरणांच्या वागण्यात थोडा बदल दिसू लागला. आजवर दारिद्र्य त्यांनी एखाद्या खेळासारखे, मौजेने आणि अगदी सहज सोसले होते; पण मुलाच्या बाबतीत तो भाव त्यांना टिकवता आला नाही. शानियाडीच्या प्रसिद्ध चौधरी घराण्यातला विझू आलेला कुलदीप पुन्हा उजळावा म्हणून सगळ्या ग्रहनक्षत्रांची आभाळभर अनुकूलता लाभून जे बाळ भूतलावर अवतरले आहे, त्याच्याविषयी काही कर्तव्य आहेच ना. आजवर पिढ्यानपिढ्या या घराण्यातल्या प्रत्येक मुलाला जन्मापासून जे कौतुक लाभत आले, त्याला मुकलेला पहिला मुलगा म्हणजे भवानीचरणांचा थोरला मुलगा — हे दुःख त्यांना विसरता येईना. 'या घराण्यात जे पिढ्यानपिढ्या सगळ्यांना मिळत आलं, जे मला मिळालं, ते मी माझ्या मुलाला देऊ शकलो नाही' — हे आठवून त्यांना वाटू लागले, 'मीच याला फसवलं.' म्हणून कालीपदसाठी जो पैसा खर्च करता आला नाही, त्याची भरपाई त्यांनी भरभरून लाड करून करायचा प्रयत्न केला. भवानींच्या पत्नी रासमणी वेगळ्याच वळणाच्या होत्या. शानियाडीच्या चौधरींच्या कुलगौरवाची त्यांना कधी फिकीर वाटली नाही. भवानींना ते ठाऊक होते आणि त्याबद्दल ते मनातल्या मनात हसत; त्यांना वाटे, साध्या गरीब वैष्णव घराण्यात आपल्या बायकोचा जन्म झाला आहे, तेव्हा तिचा हा दोष क्षमा करणेच योग्य — चौधरींच्या मानमरातबाची नेमकी कल्पना येणे तिला शक्यच नाही. रासमणी स्वतःच हे कबूल करीत; म्हणत, 'मी गरिबाघरची मुलगी, मला मानमरातबाशी काही देणंघेणं नाही; माझा कालीपद जगो-वाचो, तेच माझं सगळ्यांत मोठं ऐश्वर्य.' मृत्युपत्र पुन्हा सापडेल, आणि कालीपदच्या पुण्याईने या घराण्याच्या आटलेल्या संपत्तीच्या कोरड्या नदीपात्राला पुन्हा पूर येईल, असल्या गोष्टींकडे त्या मुळी कानच देत नसत.
रासमणीचा मुलगा
हरवलेल्या मृत्युपत्राविषयी त्यांच्या पतीने ज्याच्याशी चर्चा केली नाही, असा एकही माणूस नव्हता. फक्त मनातली ही सगळ्यांत मोठी गोष्ट त्यांची आपल्या बायकोशी होत नसे. एकदोनदा त्यांनी रासमणींशी चर्चा करायचा प्रयत्न केला होता, पण त्यात काही रस वाटला नाही. गतवैभव आणि भावी वैभव — दोन्हींकडे त्यांच्या पत्नी लक्षसुद्धा देत नसत; समोरच्या गरजांनीच त्यांचे सारे मन व्यापून टाकले होते. ती गरजही काही थोडीथोडकी नव्हती. मोठ्या कष्टाने संसार चालवावा लागे. कारण, लक्ष्मी निघून गेली तरी आपले थोडेबहुत ओझे मागे टाकून जाते; तेव्हा उपाय उरत नाही, पण अपाय मात्र उरतात. या घराचा आसरा जवळजवळ मोडून पडला होता, पण आश्रितांचा तांडा अजूनही त्यांची सुटका करायला तयार नव्हता. आणि भवानीचरणही असे नव्हते की, तंगीच्या भीतीने कुणाला निरोप देतील. या भाराने वाकलेल्या मोडक्या संसाराचा गाडा ओढायचा भार रासमणींवर. कुणाकडून त्यांना फारशी मदतही मिळत नसे. कारण, या संसाराच्या सुबत्तेच्या दिवसांत आश्रितांनी सगळेच दिवस आरामात आणि आळसात काढले होते! चौधरी घराण्याच्या महावृक्षाखाली त्यांच्या सुखशय्येवर सावली आपोआप येऊन पसरली होती, आणि पिकलेली फळे आपोआप त्यांच्या तोंडापाशी येऊन पडली होती — त्यासाठी त्यांच्यापैकी कुणालाही बोटसुद्धा हलवावे लागले नव्हते. आज त्यांना कसलेही काम सांगितले की त्यांचा भयंकर अपमान होतो — स्वयंपाकघरातला धूर लागला की त्यांचे डोके दुखते; आणि चालणेफिरणे करायला गेले की, कुठूनसा असा मेला वाताचा आजार येऊन जखडतो की, वैद्याच्या महागड्या तेलानेही तो उतरायला तयार नसतो. शिवाय भवानीचरण म्हणत, आसरा दिल्याच्या बदल्यात आश्रिताकडून काम करवून घेतले, तर ती त्याच्याकडून चाकरी करवून घेणेच झाले — त्याने आसरा देण्याचे मोलच निघून जाते — चौधरींच्या घरी असा रिवाजच नाही.
रासमणीचा मुलगा
म्हणून सगळी जबाबदारी रासमणींवरच. रात्रंदिवस नाना युक्त्या लढवून आणि कष्ट उपसून या कुटुंबाच्या साऱ्या उणिवा त्यांना गुपचूप भरून काढाव्या लागत. असे रात्रंदिवस दैन्याशी झुंजत, ओढाताण करीत, घासाघीस करीत राहिले की माणूस फार कठोर होऊन जातो — त्याच्यातली कोमलता निघून जाते. ज्यांच्यासाठी तो पावलोपावली राबून मरतो, तेच त्याला सहन करू शकत नाहीत. रासमणी केवळ स्वयंपाकघरात अन्न शिजवीत असे नव्हे, अन्नाची तजवीज करायचा भारही बराचसा त्यांच्यावरच होता — आणि तरी तेच अन्न खाऊन दुपारी जे ताणून देत, ते रोज त्या अन्नालाही नावे ठेवीत आणि अन्नदात्रीचेही कधी कौतुक करीत नसत. केवळ घरचेच काम नव्हे, तर जमीनदारी आणि ब्रह्मोत्तर इनामापैकी जे काही थोडेबहुत अजून शिल्लक होते, त्याचे हिशेब पाहणे, खंडवसुलीची व्यवस्था करणे — हे सगळे रासमणींनाच करावे लागे. वसुलीबाबत पूर्वी कधी एवढी ओढाताण नव्हती — भवानीचरणांचा पैसा म्हणजे अभिमन्यूच्या अगदी उलटा: त्याला बाहेर पडायचे तेवढे ठाऊक, आत शिरायची विद्या त्याला अवगत नाही. पैशासाठी कुणाकडे तगादा लावणे भवानीचरणांना मुळीच जमत नसे. रासमणी मात्र आपल्या येण्यापैकी कुणालाही दमडीचीही सूट देत नसत. यामुळे कुळे त्यांची निंदा करीत; गुमास्तेसुद्धा त्यांच्या सावधगिरीच्या जाचाने हैराण होऊन, त्यांच्या माहेरच्या कुळाला शोभणाऱ्या कोतेपणाचा उल्लेख करून त्यांना शिव्या द्यायला सोडत नसत. इतकेच काय, त्यांचे पतीसुद्धा त्यांचा कंजूषपणा आणि कडक बोलणे आपल्या विश्वविख्यात घराण्याला कमीपणा आणणारे आहे, असा कधीकधी हळू आवाजात आक्षेप घेत.
रासमणीचा मुलगा
ही सगळी निंदा आणि बोलणी पूर्णपणे दुर्लक्षून त्या आपल्या नियमाने काम करीत राहत, सगळा दोष स्वतःच्या माथी घेत; आपण गरिबाघरची मुलगी, आपल्याला मोठेपणाची रीतभात काही समजत नाही, हे पुनःपुन्हा कबूल करीत, घरात-बाहेर सगळ्या लोकांना नकोशा होऊन, पदराचे टोक घट्ट कमरेला खोचून, वादळाच्या वेगाने कामाला भिडत; त्यांना अडवायची कुणाची छाती होत नसे. पतीला कधी कोणत्या कामाला बोलावणे तर दूरच, उलट भवानीचरण अचानक कर्तेपणा गाजवून एखाद्या कामात हात घालून बसतील, अशी भीतीच त्यांच्या मनात सदैव असे. 'तुम्हाला कसलाही विचार करायची गरज नाही, यात कशातच तुम्ही पडायची आवश्यकता नाही' असे म्हणून सगळ्याच बाबतींत पतीला निरुद्योगी ठेवणे, हा त्यांचा एक मुख्य प्रयत्न असे. पतीलाही जन्मापासून याची छान सवय असल्याने, त्या बाबतीत पत्नीला फारसे दुःख सोसावे लागले नाही. रासमणींना बऱ्याच उशिरापर्यंत मूल झाले नव्हते — कोणत्याही कामाचा नसलेला, भोळा, परावलंबी असा हा पतीच त्यांच्या पत्नीप्रेमाची आणि मातृप्रेमाची — दोन्हींची — तहान भागवीत होता. भवानींना त्या वयाने वाढलेले मूलच समजत. त्यामुळे सासूबाईंच्या मृत्यूनंतर घरच्या कर्त्याची आणि गृहिणीची — दोघांचीही कामे त्यांना एकटीलाच पार पाडावी लागत. कुलगुरूंच्या मुलापासून आणि इतर संकटांपासून पतीला वाचवण्यासाठी त्या इतक्या कडकपणे वागत की, पतीचे सोबती त्यांना भारी घाबरत. आपला तिखटपणा झाकून ठेवावा, स्पष्ट बोलण्याची धार जरा बोथट करावी, आणि पुरुषमंडळींशी यथोचित संकोच राखून वागावे — ही स्त्रीजनाला शोभणारी सवड त्यांना कधी मिळालीच नाही. आजवर भवानीचरण त्यांच्या आज्ञेतच वागत आले होते. पण कालीपदच्या बाबतीत रासमणींचे ऐकणे त्यांना जड जाऊ लागले.
रासमणीचा मुलगा
त्याचे कारण हे की, रासमणी भवानींच्या मुलाकडे, भवानीचरणांकडे पाहत तशा नजरेने, पाहत नसत. पतीविषयी त्यांना वाटे, 'बिचारा करणार काय, त्याचा काय दोष — तो मोठ्या माणसाच्या घरी जन्मला — त्याला इलाजच नाही.' म्हणून पती कसलेही कष्ट सोसतील, अशी अपेक्षाच त्या करू शकत नसत. म्हणूनच हजार तंग्या असूनही जिवाचे रान करून त्या पतीच्या सगळ्या सवयीच्या गरजा शक्य तितक्या पुरवीत. त्यांच्या घरात बाहेरच्या लोकांबद्दलचा हिशेब अगदी काटेकोर होता, पण भवानीचरणांच्या खाण्यापिण्यात, राहणीत होता होईतो जुन्या रिवाजात जराही फरक पडू शकत नसे. अगदी ओढग्रस्तीच्या दिवसांत एखाद्या गोष्टीत कमतरता पडलीच, तर ती तंगीमुळे पडली आहे, हे त्या पतीला कधीच कळू देत नसत — कदाचित म्हणत, 'अगं बाई, त्या मेल्या कुत्र्यानं जेवणाला तोंड लावून सगळं नासवून टाकलं!' — आणि आपल्या काल्पनिक निष्काळजीपणाला स्वतःच दूषणे देत. नाहीतर, त्या दळभद्री नोटोच्या चुकीमुळेच नवे विकत आणलेले धोतर हरवले, असे म्हणून त्याच्या अकलेबद्दल भरपूर तिरस्कार व्यक्त करीत — तेव्हा भवानीचरण आपल्या लाडक्या नोकराची बाजू घेऊन त्याला गृहिणीच्या रागापासून वाचवायला धडपडू लागत. इतकेच काय, कधी असेही घडले आहे की, जे धोतर गृहिणींनी विकत घेतलेच नव्हते, भवानीचरणांनी डोळ्यांनीही पाहिले नव्हते, आणि जे काल्पनिक धोतर हरवल्याचा आरोप नटबिहारीवर होता — त्याच्याविषयी भवानीचरणांनी चेहऱ्यावरची रेषाही न हलवता कबूल केले आहे की, ते धोतर नोटोने आपल्याला निऱ्या घालून दिले, आपण ते नेसले, आणि मग — मग काय झाले, हे ऐन वेळी त्यांच्या कल्पनाशक्तीला सुचले नाही — तेवढे रासमणींनी स्वतःच पूर्ण करून सांगितले — 'नक्कीच तुम्ही ते आपल्या बाहेरच्या बैठकीच्या खोलीत सोडून ठेवलं असणार; तिथे कुणीही येतं-जातं, कुणीतरी चोरून नेलं.'
रासमणीचा मुलगा
भवानीचरणांच्या बाबतीत अशी व्यवस्था. पण स्वतःच्या मुलाला त्या कोणत्याच बाबतीत पतीच्या बरोबरीचा मानीत नसत. तो तर त्यांच्याच पोटचा गोळा — त्याला कसली आली बाबूगिरी! तो होईल धडधाकट, कामाचा माणूस — सहज दुःख सोसेल आणि कष्ट करून खाईल. त्याला हे नसले तर चालत नाही, ते नसले तर अपमान वाटतो — असले बोलणे त्याला कधीच शोभणार नाही. कालीपदसाठी रासमणींनी खाण्यापिण्याची, कपड्यालत्त्याची अगदी जाडीभरडी तरतूद केली. मुरमुरे-गूळ देऊनच त्याची न्याहारी उरकली, आणि डोके-कान झाकून दुलई गुंडाळून त्याच्या थंडीची सोय केली. गुरुजींना स्वतः बोलावून सांगितले की, मुलाने अभ्यासात तसूभरही ढिलाई करता कामा नये, त्याला खास शिस्तीत, धाकात ठेवून शिकवावे. इथेच मोठी पंचाईत झाली. गरीब स्वभावाचे भवानीचरण अधूनमधून बंडाची लक्षणे दाखवू लागले, पण रासमणींनी जणू ते पाहूनही न पाहिल्यासारखे केले. बलवान पक्षापुढे भवानींनी नेहमीच हार मानली होती; या वेळीही त्यांना निरुपायाने हार मानावी लागली, पण त्यांच्या मनातला विरोध काही गेला नाही. या घराचा मुलगा दुलई लपेटून गूळ-मुरमुरे खातो — असले विसंगत दृश्य दिवसामागून दिवस कसे पाहावे?
रासमणीचा मुलगा
पूजेच्या दिवसांत त्यांना आठवे, वडीलधाऱ्यांच्या जमान्यात नवे कपडेलत्ते घालून त्यांना केवढा उत्साह वाटे. पूजेच्या दिवसांसाठी रासमणींनी कालीपदसाठी जी स्वस्त कापडाची, कुडत्याची सोय केली होती, तिला जुन्या काळी त्यांच्या घरच्या नोकरांनीही नाक मुरडले असते. रासमणींनी पतीला परोपरीने समजवायचा प्रयत्न केला होता की, 'कालीपदला जे द्यावं त्यातच तो खूश असतो; त्याला जुन्या रिवाजांचं काय ठाऊक — तुम्ही उगाच मन जड करून का बसता?' पण बिचाऱ्या कालीपदला आपल्या घराण्याचा गौरव ठाऊक नाही म्हणून त्याला फसवले जात आहे, हे भवानीचरणांना काही केल्या विसरता येत नसे. खरे तर, साधीशी भेट मिळाल्यावर तो अभिमानाने आणि आनंदाने नाचत नाचत ती त्यांना दाखवायला धावत येई, तेव्हा तर भवानीचरणांना ते आणखीच लागे. ते त्यांना पाहवतच नसे. त्यांना तोंड फिरवून निघून जावे लागे. भवानीचरणांनी खटला चालवल्यापासून त्यांच्या कुलगुरूंच्या घरी चांगलीच धनप्राप्ती झाली होती. तेवढ्यावर समाधान न मानता हे गुरुपुत्र दरवर्षी पूजेच्या काही दिवस आधी कलकत्त्याहून नाना तऱ्हेच्या, डोळे दिपवणाऱ्या स्वस्त हौसेच्या वस्तू मागवून काही महिने दुकान चालवीत. अदृश्य शाई, गळ-काठी-छत्री एकत्र असलेली युक्ती, चित्रे छापलेले पत्रांचे कागद, लिलावात घेतलेले रंगीबेरंगी कुजके रेशीम आणि सॅटिनचे तागे, काठावर कविता लिहिलेल्या साड्या — असला माल घेऊन ते गावातल्या स्त्रीपुरुषांची मने उतावीळ करून सोडीत. कलकत्त्याच्या बाबूमंडळीत आजकाल ही सगळी साधने असल्याशिवाय सभ्यता राखली जात नाही, हे ऐकून गावातला प्रत्येक महत्त्वाकांक्षी माणूस आपला गावंढळपणा घालवण्यासाठी ऐपतीबाहेर खर्च करायला मागेपुढे पाहत नसे.
रासमणीचा मुलगा
एकदा बगलाचरणांनी एका मेमसाहेबाची अतिशय अजब बाहुली आणली होती. तिला कुठल्याशा जागी किल्ली दिली की मेम खुर्चीवरून उठून उभी राहायची आणि जोरजोरात स्वतःला पंखा घालू लागायची. उकाड्याने हैराण झालेल्या, सतत वारा घेणाऱ्या त्या मेमच्या बाहुलीचा कालीपदला भलताच लोभ सुटला. कालीपद आपल्या आईला चांगला ओळखून होता; म्हणून आईजवळ काही न बोलता त्याने भवानीचरणांपाशी केविलवाण्या स्वरात अर्ज सादर केला. भवानीचरणांनी लगेच उदारपणे त्याला आश्वासन दिले, पण तिची किंमत ऐकून त्यांचा चेहरा उतरला. पैसे वसूल करणार रासमणी, खजिनाही त्यांच्याजवळ, आणि खर्चही त्यांच्याच हातून होई. भवानीचरण भिकाऱ्यासारखे आपल्या अन्नपूर्णेच्या दारी जाऊन उभे राहिले. आधी पुष्कळ इकडच्यातिकडच्या गप्पा मारून शेवटी एका क्षणी धाडकन मनातली इच्छा बोलून टाकली. रासमणी अगदी थोडक्यात म्हणाल्या, 'वेड लागलंय का!' भवानीचरण गप्प बसून काही वेळ विचार करीत राहिले. मग एकदम म्हणाले, 'बरं, हे बघ, जेवणात तू रोज मला जे तूप आणि खीर वाढतेस, त्याची काही गरज नाही!' रासमणी म्हणाल्या, 'गरज नाही म्हणजे काय?' भवानीचरण म्हणाले, 'वैद्य म्हणतो, त्यानं पित्त वाढतं.' रासमणींनी तडक मान हलवून म्हटले, 'तुमच्या वैद्याला सगळंच कळतं!' भवानीचरण म्हणाले, 'मी तर म्हणतो, रात्री माझ्या पुऱ्या बंद करून भात केलास तर बरं होईल. पुऱ्यांनी पोट जड होतं.' रासमणी म्हणाल्या, 'पोट जड होऊन आजवर तुमचं काही बिघडलेलं तर कधी दिसलं नाही. जन्मापासून पुऱ्या खाऊनच तर तुम्ही लहानाचे मोठे झालात.'
रासमणीचा मुलगा
भवानीचरण सर्व प्रकारचा त्याग करायला तयार — पण त्या बाजूला भारी कडेकोट पहारा. तुपाचा भाव वाढतो आहे, तरी पुऱ्यांची संख्या अगदी तेवढीच आहे. दुपारच्या जेवणात खीर असतेच, तेव्हा दही नाही दिले तरी काहीच बिघडत नाही — पण अनावश्यक असले तरी या घरात बाबू मंडळी पिढ्यानपिढ्या दही आणि खीर खात आली आहेत. कधी भवानीचरणांच्या ताटात ते पिढीजात दही नसलेले रासमणींना मुळीच सहन होत नसे. म्हणून अंगाला वारा घालणारी ती मेमची बाहुली भवानीचरणांच्या दही-खीर-तूप-पुऱ्यांच्या कोणत्याही फटीतून आत शिरेल, असा काही मार्ग दिसेना. भवानीचरण एके दिवशी जणू अगदीच विनाकारण आपल्या गुरुपुत्राच्या बिऱ्हाडी गेले, आणि पुष्कळ इकडच्यातिकडच्या गप्पांनंतर त्या मेमची चौकशी केली. आपली सध्याची आर्थिक दुर्दशा बगलाचरणापासून लपून राहायचे काहीच कारण नाही, हे त्यांना ठाऊक होते; तरीसुद्धा, आज आपल्यापाशी पैसा नाही म्हणून एवढेसे खेळणे आपण आपल्या मुलासाठी विकत घेऊ शकत नाही, याचे नुसते सूचन करतानाही त्यांचे डोके जणू फुटून जाऊ लागले. तरीही असह्य संकोचाला पायाखाली दाबून त्यांनी आपल्या उपरण्याच्या आतून कापडात गुंडाळलेली एक जुनी, मौल्यवान जामेवार शाल बाहेर काढली. दाटून आलेल्या कंठाने म्हणाले, 'सध्या दिवस जरा वाईट आलेत, हाताशी फारसा रोकडा नाही — म्हणून म्हटलं, ही जामेवार तुमच्याकडे गहाण ठेवून ती बाहुली कालीपदसाठी घेऊन जावी.' जामेवारपेक्षा कमी किमतीची एखादी वस्तू असती, तर बगलाचरणाला काहीच अडचण वाटली नसती — पण त्याला ठाऊक होते की, हे काही आपल्याला पचवता येणार नाही — गावातले लोक तर निंदा करतीलच, शिवाय रासमणींच्या जिभेतून जे बाहेर पडेल, ते काही रसाळ असणार नाही. जामेवार पुन्हा उपरण्यात लपवून भवानीचरणांना निराश होऊन परतावे लागले.
रासमणीचा मुलगा
कालीपद रोज वडिलांना विचारी, 'बाबा, माझ्या त्या मेमचं काय झालं?' भवानीचरण रोजच हसतमुखाने म्हणत, 'थांब रे — आत्ताच काय घाई? आधी सप्तमीचा दिवस तर येऊ दे.' रोज रोज चेहऱ्यावर हसू ओढून आणणे अधिकाधिक कठीण होत चालले. आज चतुर्थी. भवानीचरण काहीतरी निमित्त काढून अवेळी आत माजघरात गेले. जणू बोलता बोलता सहज आठवले, अशा थाटात रासमणींना म्हणाले, 'हे बघ, मी गेले काही दिवस पाहतोय, कालीपदची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललीय.' रासमणी म्हणाल्या, 'इडापीडा टळो! खालावायला काय झालंय? मला तर त्याला काही दुखणं दिसत नाही.' भवानीचरण म्हणाले, 'दिसलं नाही तुला! तो गप्प बसून असतो. कसला तरी विचार करत असतो.' रासमणी म्हणाल्या, 'तो घटकाभर गप्प बसला तर मी सुटले! त्याला म्हणे विचार! कुठे काय खोडी काढायची, त्याचाच विचार करत असतो तो.' किल्ल्याच्या तटबंदीच्या याही बाजूला काही कमकुवतपणा दिसला नाही — दगडावर तोफगोळ्याचा ओरखडासुद्धा उमटला नाही. सुस्कारा टाकून, डोक्यावरून हात फिरवीत फिरवीत भवानीचरण बाहेर निघून आले. एकटेच ओसरीवर बसून ते जोरजोराने हुक्का ओढू लागले. पंचमीच्या दिवशी त्यांच्या ताटातले दही आणि खीर तशीच पडून राहिली. संध्याकाळी त्यांनी फक्त एक संदेश खाऊन पाणी प्यायले, पुऱ्यांना हातही लावला नाही. म्हणाले, भूकच नाही मुळी. या वेळी तटबंदीला एक मोठे खिंडार पडले. षष्ठीच्या दिवशी रासमणींनी स्वतः कालीपदला एकांतात बोलावून घेतले आणि त्याच्या लाडक्या नावाने हाक मारून म्हणाल्या, 'भेंटू, एवढा मोठा झालास, तरी तुझे हे भलते हट्ट सुटले नाहीत! शी शी! जे मिळायचा मार्गच नाही, त्याचा लोभ धरणं म्हणजे अर्धी चोरीच, ठाऊक आहे ना!'
रासमणीचा मुलगा
कालीपद नाकातल्या सुरात म्हणाला, 'मला काय ठाऊक? बाबांनीच तर सांगितलंय, ते मला देणार म्हणून.' मग बाबांच्या त्या बोलण्याचा अर्थ काय, हे रासमणी कालीपदला समजावून सांगू लागल्या. वडिलांच्या त्या बोलण्यात किती माया, किती वेदना आहे, आणि तरीही ही वस्तू द्यायची झाली तर त्यांच्या गरीब घराचे किती नुकसान, किती दुःख होईल, हे त्यांनी परोपरीने सांगितले. रासमणींनी कालीपदला कधी असे समजावून काही सांगितले नव्हते — त्या जे काही करीत ते अगदी थोडक्यात आणि जोरकसपणे — कोणतीही आज्ञा मऊ करून सांगायची त्यांना कधी गरजच पडली नव्हती. म्हणून आज त्या अशा विनवणीच्या सुरात, एवढे विस्ताराने बोलत आहेत, याचे कालीपदला आश्चर्य वाटले; आणि आईच्या मनात एका कोपऱ्यात केवढा कळवळा दडलेला आहे, हे लहान असूनही त्याला एका परीने कळले. पण मेमवरून मन एका क्षणात परत फिरवणे किती कठीण, हे प्रौढ वाचकांना समजायला अवघड जाणार नाही. म्हणून कालीपद तोंड अगदी गंभीर करून एक काडी घेऊन जमिनीवर रेघोट्या ओढू लागला. तेव्हा रासमणी पुन्हा कठोर झाल्या; कडक आवाजात म्हणाल्या, 'तू रागाव नाहीतर रडारड कर — जे मिळण्यासारखं नाही, ते काही केल्या मिळणार नाही.' एवढे बोलून, आणखी वेळ फुकट न घालवता, त्या झपाझप पावलांनी घरकामाला निघून गेल्या. कालीपद बाहेर गेला. तेव्हा भवानीचरण एकटेच बसून हुक्का ओढत होते. कालीपदला दुरून पाहताच ते घाईघाईने उठले आणि जणू काही महत्त्वाचे काम आहे, अशा थाटात कुठेतरी निघाले. कालीपद धावत येऊन म्हणाला, 'बाबा, माझी ती मेम —'
रासमणीचा मुलगा
आज मात्र भवानीचरणांच्या चेहऱ्यावर हसू उमटले नाही; कालीपदच्या गळ्याला मिठी मारून ते म्हणाले, 'थांब बाळा, मला एक काम आहे — ते उरकून येतो, मग सगळं बोलू.' — असे म्हणून ते घराबाहेर पडले. कालीपदला वाटले, त्यांनी जणू घाईघाईने डोळ्यांतले पाणी पुसून टाकले. तेव्हा आळीतल्या एका घरी उत्सवासाठी सनईवाल्यांना वाजवून पाहून सुपारी दिली जात होती. त्या सनई-चौघड्याच्या सकाळच्या करुण सुरात शरदातले कोवळे ऊन जणू दडलेल्या अश्रूंच्या भाराने व्याकूळ होऊन उठत होते. कालीपद आपल्या घराच्या दारापाशी उभा राहून गप्पपणे रस्त्याकडे पाहत राहिला. आपले वडील कोणत्याही कामासाठी कुठेही जात नाहीत, हे त्यांच्या चालीवरूनच कळत होते — प्रत्येक पावलागणिक ते निराशेचे एक ओझे ओढत ओढत चालले आहेत, आणि ते कुठे उतरवून ठेवायला जागा नाही, हे त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीवरूनही स्पष्ट दिसत होते. कालीपद आत माजघरात परत येऊन म्हणाला, 'आई, मला ती पंखा घालणारी मेम नको.' आई तेव्हा अडकित्ता घेऊन भराभर सुपारी कातरत होत्या. त्यांचा चेहरा उजळून निघाला. मायलेकांची तिथे बसून काय मसलत झाली, ते कुणालाच कळले नाही. अडकित्ता खाली ठेवून, कातरलेल्या-न कातरलेल्या सुपारीने भरलेली टोपली तशीच टाकून रासमणी त्याच क्षणी बगलाचरणाच्या घरी निघून गेल्या. आज भवानीचरणांना घरी परतायला बराच उशीर झाला. आंघोळ उरकून ते जेवायला बसले, तेव्हा त्यांचा चेहरा पाहून वाटले, आजही दही-खिरीला सद्गती लाभणार नाही; इतकेच काय, माशाचे डोके आज पूर्णपणे मांजराच्याच वाट्याला जाणार.
रासमणीचा मुलगा
तेव्हा दोरीने बांधलेला एक पुठ्ठ्याचा खोका घेऊन रासमणी पतीसमोर येऊन उभ्या राहिल्या. जेवण झाल्यावर भवानीचरण विश्रांतीला जातील, तेव्हाच त्यांना हे रहस्य उलगडावे, अशी रासमणींची इच्छा होती; पण दही, खीर आणि माशाच्या डोक्याची उपेक्षा टाळण्यासाठी तो आत्ताच बाहेर काढावा लागला. खोक्यातून ती मेमची बाहुली बाहेर आली आणि क्षणाचाही विलंब न लावता मोठ्या उत्साहाने आपली उन्हाळ्याची काहिली शमवण्याच्या कामाला लागली. मांजराला आज निराश होऊन परतावे लागले. भवानीचरण गृहिणीला म्हणाले, 'आज स्वयंपाक फारच उत्तम झालाय. कितीतरी दिवसांत असा माशाचा रस्सा खाल्ला नव्हता. आणि दही किती सुरेख लागलंय, काय सांगू!' सप्तमीच्या दिवशी कालीपदला आपले कितीतरी दिवसांचे आकांक्षेचे धन मिळाले. त्या दिवशी दिवसभर तो मेमचे वारा खाणे पाहत राहिला, आपल्या बरोबरीच्या मित्रांना ती दाखवून त्यांच्या मनात असूया जागवली. दुसऱ्या कोणत्या परिस्थितीत, सारखे चाललेले या बाहुलीचे एकसुरी पंखा हलवणे पाहून त्याला एका दिवसातच नक्की कंटाळा आला असता — पण अष्टमीच्याच दिवशी या प्रतिमेचे विसर्जन करायचे आहे, हे ठाऊक असल्याने त्याची प्रीती अढळ राहिली. रासमणींनी गुरुपुत्राला दोन रुपये रोख देऊन केवळ एका दिवसासाठी ही बाहुली भाड्याने आणली होती. अष्टमीच्या दिवशी कालीपदने दीर्घ सुस्कारा टाकून स्वतःच्या हाताने खोक्यासकट ती बाहुली बगलाचरणाला परत नेऊन दिली. या एका दिवसाच्या मीलनाची सुखद आठवण पुष्कळ दिवस त्याच्या मनात जागी राहिली; त्याच्या कल्पनेच्या जगात तो पंखा कधी थांबलाच नाही.
रासमणीचा मुलगा
तेव्हापासून कालीपद आईच्या मसलतीतला सोबती झाला; आणि तेव्हापासून भवानीचरण दरवर्षी इतक्या सहजपणे कालीपदला इतकी मौल्यवान पूजेची भेट देऊ शकत, की त्यांचे त्यांनाच आश्चर्य वाटे. या जगात मोल दिल्याशिवाय काहीच मिळत नाही, आणि ते मोल म्हणजे दुःखाचे मोल — आईचा जिवाभावाचा सोबती झाल्यावर ही गोष्ट कालीपदला दिवसेंदिवस जसजशी उमगत गेली, तसतसा तो पाहता पाहता जणू आतून मोठा होऊ लागला. आता सगळ्या कामांत तो आईच्या उजव्या हाताशी येऊन उभा राहिला. संसाराचा भार वाहायचा आहे, संसाराचा भार वाढवायचा नाही, ही गोष्ट कोणत्याही उपदेशाशिवाय त्याच्या रक्तातच मिसळून गेली. आयुष्याची जबाबदारी उचलायला आपल्याला तयार व्हायचे आहे, हे लक्षात ठेवून कालीपद जिवापाड अभ्यास करू लागला. शिष्यवृत्तीची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याला शिष्यवृत्ती मिळाली, तेव्हा भवानीचरणांना वाटले, आता आणखी शिकायची गरज नाही; आता कालीपदने घरच्या मिळकतीचे कामकाज पाहायला लागावे. कालीपद आईकडे येऊन म्हणाला, 'कलकत्त्याला जाऊन शिकता आलं नाही, तर मी काही माणसात येऊ शकणार नाही.' आई म्हणाल्या, 'हे तर खरंच आहे, बाळा. कलकत्त्याला तर जायलाच हवं.' कालीपद म्हणाला, 'माझ्यासाठी काहीच खर्च करावा लागणार नाही. याच शिष्यवृत्तीवर भागवीन — आणि काहीतरी कामधंदाही जमवीन.' भवानीचरणांना राजी करायला खूप कष्ट पडले. पाहण्यासारखी मिळकत अशी काहीच उरलेली नाही, असे म्हटले तर भवानीचरणांना फार दुःख होते, म्हणून रासमणींना तो मुद्दा दाबून टाकावा लागला. त्या म्हणाल्या, 'कालीपदला माणसात यायचंय ना.' पण पिढ्यानपिढ्या कधी शानियाडीबाहेर पाऊल न टाकताच तर चौधरी आजवर माणसात आले होते. परमुलखाला ते यमपुरीसारखे भीत.
रासमणीचा मुलगा
कालीपदसारख्या कोवळ्या पोराला एकट्याला कलकत्त्याला पाठवायचा प्रस्ताव तरी कुणाच्या डोक्यात कसा येऊ शकतो, हेच त्यांना उमजेना. शेवटी गावातला सर्वांत बुद्धिमान माणूस बगलाचरणसुद्धा रासमणींच्या मताला मत देऊन बसला. तो म्हणाला, 'कालीपद एक दिवस वकील होऊन त्या मृत्युपत्राच्या चोरीच्या फसवणुकीचं उट्टं काढील, हे नक्कीच त्याच्या ललाटी लिहिलेलं आहे — तेव्हा त्याला कलकत्त्याला जाण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही.' हे ऐकून भवानीचरणांना बराच दिलासा मिळाला. पंचात बांधलेली सगळी जुनी कागदपत्रे बाहेर काढून ते कालीपदशी मृत्युपत्राच्या चोरीविषयी पुनःपुन्हा चर्चा करू लागले. अलीकडे आईच्या मंत्र्याचे काम कालीपद मोठ्या चतुराईने पार पाडीत होता, पण वडिलांच्या मंत्रिमंडळात त्याचा जोर चालेना. कारण, आपल्या घराण्यावरच्या या जुन्या अन्यायाविषयी त्याच्या मनात पुरेसा आवेश नव्हता. तरीही तो वडिलांच्या होला हो मिळवीत राहिला. सीतेला सोडवण्यासाठी वीरश्रेष्ठ राम जसे लंकेला निघाले होते, तसेच भवानीचरणांनी कालीपदच्या कलकत्त्याच्या प्रवासाकडेही फार मोठ्या दृष्टीने पाहिले — ही काही केवळ परीक्षा पास होण्याची क्षुल्लक बाब नव्हे — घरची लक्ष्मी घरी परत आणण्याची ही तयारी होती. कलकत्त्याला जायच्या आदल्या दिवशी रासमणींनी कालीपदच्या गळ्यात एक रक्षाकवच बांधले; आणि त्याच्या हातात पन्नास रुपयांची एक नोट देऊन सांगितले, 'ही नोट जपून ठेव; अडीअडचणीला, गरजेच्या वेळी कामी येईल.' संसाराच्या खर्चातून मोठ्या कष्टाने साठवलेली हीच नोट कालीपदने खरोखरच्या पवित्र कवचासारखी मानून घेतली — आईच्या आशीर्वादासारखी ही नोट आपण कायम जपून ठेवू, कधीही खर्च करणार नाही, असा त्याने मनाशी संकल्प केला.
रासमणीचा मुलगा
३ मृत्युपत्राच्या चोरीची गोष्ट आता भवानीचरणांच्या तोंडी पूर्वीसारखी ऐकू येत नाही. आता त्यांच्या बोलण्याचा एकच विषय — कालीपद. त्याच्याविषयी बोलायला ते आता सगळ्या आळीभर फिरत असतात. त्याचे पत्र आले की घरोघर ते वाचून दाखवायच्या निमित्ताने नाकावरचा चष्मा काही खाली उतरत नाही. आपण कधी, कोणत्याही पिढीत कलकत्त्याला गेलो नाही, म्हणूनच कलकत्त्याच्या अभिमानाने त्यांची कल्पनाशक्ती भलतीच उत्तेजित झाली. आपला कालीपद कलकत्त्याला शिकतो, आणि कलकत्त्याची कोणतीही बातमी त्याला अज्ञात नाही — इतकेच काय, हुगळीजवळ गंगेवर आणखी एक दुसरा पूल बांधला जातो आहे, असल्या मोठमोठ्या बातम्या म्हणजे त्याच्या दृष्टीने अगदी घरच्या गोष्टी. 'ऐकलंस का, गड्या? गंगेवर आणखी एक पूल बांधताहेत — आजच कालीपदचं पत्र आलं, त्यात सगळी हकीकत लिहिलीय.' — असे म्हणून चष्मा काढून, त्याची काच नीट पुसून त्यांनी ते पत्र अगदी सावकाश, आदीपासून अंतापर्यंत शेजाऱ्याला वाचून दाखवले. 'पाहिलंस, गड्या! काळाच्या ओघात काय काय घडेल, याला काही धरबंधच नाही. शेवटी कुत्री-कोल्हीसुद्धा कोरड्या पायांनी गंगेवरून पलीकडे जातील — कलियुगात हेही घडलं रे!' गंगेचा महिमा असा उणावणे ही निःसंशय शोचनीय गोष्ट; पण कलियुगाची एवढी मोठी विजयवार्ता कालीपदने लिहून पाठवली आहे, आणि गावातल्या अगदी अडाणी लोकांनाही ती खबर त्याच्याच कृपेने कळली आहे, या आनंदात या युगातल्या जीवांच्या असीम दुर्गतीची चिंताही ते सहज विसरून गेले. ज्याची भेट होई त्याच्यापाशी मान डोलावून ते म्हणत, 'मी सांगून ठेवतो, गंगामाई आता फार दिवसांची राहिली नाही.' मनातल्या मनात त्यांना आशा होती की, गंगा जेव्हा निघून जायच्या बेतात असेल, तेव्हा ती खबर सर्वांत आधी कालीपदच्याच पत्रातून मिळेल.
रासमणीचा मुलगा
इकडे कलकत्त्यात कालीपद मोठ्या कष्टाने परक्यांच्या बिऱ्हाडी राहून, मुलांच्या शिकवण्या करून, रात्री हिशेबाच्या वह्या नकलून आपले शिक्षण चालवू लागला. कशीबशी एन्ट्रन्स परीक्षा पार करून त्याला पुन्हा शिष्यवृत्ती मिळाली. या अद्भुत घटनेच्या निमित्ताने सगळ्या गावाला एक भलेमोठे भोजन द्यायला भवानीचरण उतावीळ झाले. त्यांना वाटले, नाव आता जवळजवळ किनाऱ्याला येऊन लागलीच — त्या धाडसावर आतापासून मन मोकळे करून खर्च करायला हरकत नाही. रासमणींकडून काही उत्तेजन न मिळाल्यामुळे भोजन बारगळले. या खेपेस कालीपदला कॉलेजजवळच्या एका मेसमध्ये आसरा मिळाला. मेसचे जे मालक होते, त्यांनी त्याला तळमजल्यावरची एक वापरात नसलेली खोली राहायला दिली होती. कालीपद त्यांच्या घरी त्यांच्या मुलाला शिकवून दोन वेळचे जेवण मिळवी, आणि मेसच्या त्या ओलसर, अंधाऱ्या खोलीत त्याचे बिऱ्हाड. त्या खोलीची एक मोठी सोय अशी की, तिथे कालीपदचा कुणी वाटेकरी नव्हता. त्यामुळे तिथे वारा खेळत नसला, तरी अभ्यास मात्र मोकळेपणाने चाले. काहीही असो, सोयीगैरसोयीचा विचार करण्याची कालीपदची स्थिती नव्हती. या मेसमध्ये भाडे देऊन जे राहतात, विशेषतः जे वरच्या मजल्याच्या उच्चलोकात राहतात, त्यांच्याशी कालीपदचा काहीच संबंध नव्हता. पण संबंध नसला तरी आघातांपासून सुटका होत नाही. उच्चलोकातला वज्राघात खालच्यांसाठी किती प्राणघातक ठरतो, हे कळायला कालीपदला वेळ लागला नाही. या मेसच्या उच्चलोकात इंद्राचे सिंहासन ज्याचे, त्याची ओळख करून देणे आवश्यक आहे. त्याचे नाव शैलेंद्र. तो श्रीमंताचा मुलगा; कॉलेजात शिकताना मेसमध्ये राहायची त्याला काही गरज नव्हती — तरीही त्याला मेसमध्ये राहायलाच आवडे.
रासमणीचा मुलगा
त्यांच्या मोठ्या कुटुंबातून काही बायका-पुरुष नातेवाइकांना बोलावून घेऊन कलकत्त्यात एक घर भाड्याने घेऊन राहावे, अशी घरून विनंती आली होती — पण तो त्याला कोणत्याही प्रकारे राजी झाला नव्हता. त्याने कारण असे दाखवले होते की, घरच्या माणसांबरोबर राहिल्यास त्याचा अभ्यास काहीच होणार नाही. पण खरे कारण ते नव्हते. शैलेंद्राला माणसांची संगत फार आवडते; पण नातेवाइकांची अडचण अशी की, नुसती त्यांची संगत घेऊन सुटका होत नाही, त्यांची नाना ओझी स्वीकारावी लागतात — कुणाच्या बाबतीत हे करायचे नसते, तर कुणाच्या बाबतीत ते न करणे अतिशय निंदेची गोष्ट ठरते. म्हणून शैलेंद्रासाठी सर्वांत सोयीची जागा म्हणजे मेस. तिथे माणसे भरपूर आहेत, पण त्याच्यावर त्यांचे कसलेही ओझे नाही. ते येतात, जातात, हसतात, बोलतात; ते नदीच्या पाण्यासारखे — सतत वाहत निघून जातात, आणि कुठेही जराही खूण ठेवून जात नाहीत. शैलेंद्राची अशी समजूत होती की, तो चांगला माणूस आहे — ज्याला म्हणतात सहृदय. सगळ्यांनाच ठाऊक आहे की, या समजुतीची मोठी सोय अशी की, ती स्वतःपाशी टिकवून ठेवण्यासाठी चांगला माणूस असायची काहीच गरज पडत नाही. अहंकार म्हणजे काही हत्ती-घोडा नव्हे; त्याला अगदी अल्प खर्चात आणि चाऱ्याविनाही चांगला गुबगुबीत ठेवता येतो. पण शैलेंद्राकडे खर्च करायची ऐपतही होती आणि हौसही — म्हणून आपल्या अहंकाराला तो अगदी फुकटात चरून खाऊ देत नसे; महागडा खुराक देऊन त्याने त्याला छान सजवूनधजवून ठेवले होते.
रासमणीचा मुलगा
खरे पाहता शैलेंद्राच्या मनात दया पुष्कळ होती. लोकांचे दुःख दूर करायला त्याला खरोखरच आवडे. पण इतके आवडे की, दुःख दूर करण्यासाठी कुणी त्याला शरण आले नाही, तर तो त्याला यथासांग दुःख दिल्याशिवाय सोडत नसे. त्याची दया जेव्हा निर्दय होई, तेव्हा ती फार भीषण रूप धारण करी. मेसमधल्या लोकांना नाटके दाखवणे, बोकडाच्या मटणाच्या मेजवान्या देणे, पैसे उसने देऊन ती गोष्ट सदैव लक्षात न ठेवणे — हे त्याच्या हातून नेहमीच घडे. नुकतेच लग्न झालेला, बायकोवर भाळलेला एखादा तरुण पूजेच्या सुट्टीत घरी जाताना कलकत्त्यातला बिऱ्हाडखर्च वगैरे सगळे चुकते करून कफल्लक होई, तेव्हा बायकोचे मन जिंकायला उपयोगी पडणारे शौकीन साबण आणि अत्तरे, आणि त्यासोबत नव्याने आलेल्या विलायती छिटाचे एखाददुसरे जाकीट जमवायची त्याला फारशी काळजी करावी लागत नसे. शैलेनच्या अभिरुचीवर पूर्ण विसंबून तो म्हणे, 'तूच बरं का मित्रा, पसंत करून द्यायचंस.' दुकानात त्याला बरोबर घेऊन जाऊन तो स्वतः अगदी स्वस्त आणि टाकाऊ वस्तू निवडी; तेव्हा शैलेन त्याला दटावून म्हणे, 'अरे शी शी, तुझी कसली रे ही पसंती!' — आणि सर्वांत शौकीन वस्तू ओढून काढी. दुकानदार येऊन म्हणे, 'हां, यांना मालाची पारख आहे खरी.' गिऱ्हाईकाने किमतीचा विषय काढून तोंड पाडताच शैलेन किंमत चुकवायचा तो क्षुल्लक भार स्वतःच उचली — समोरच्याने पुनःपुन्हा आक्षेप घेतले तरी तिकडे लक्ष देत नसे. अशा रीतीने, शैलेन जिथे होता तिथे तो सभोवतालच्या सगळ्यांचाच सगळ्या बाबतींत आधार होऊन बसला होता. कुणी त्याचा आधार स्वीकारला नाही, तर त्याचा तो उद्धटपणा त्याला मुळीच सहन होत नसे. लोकांचे हित करायची त्याची हौस एवढी प्रबळ.
रासमणीचा मुलगा
बिचारा कालीपद खालच्या ओलसर खोलीत मळक्या चटईवर बसून, एक फाटके बनियन घालून, पुस्तकाच्या पानात डोळे खुपसून डुलत डुलत धडे घोकीत असे. काहीही करून त्याला स्कॉलरशिप मिळवायचीच होती. कलकत्त्याला निघण्यापूर्वी आईने त्याला आपल्या गळ्याची शपथ घालून सांगितले होते की, श्रीमंतांच्या मुलांशी सलगी करून त्याने चैनीत रंगून जाऊ नये. केवळ आईची आज्ञा म्हणून नव्हे, तर कालीपदला जे दैन्य पत्करावे लागले होते, ते राखून श्रीमंतांच्या मुलांशी मिसळणे त्याला अशक्यच होते. तो कधी शैलेनच्या जवळपास फिरकला नाही — आणि शैलेनची मर्जी संपादन केली तर आपल्या रोजच्या कितीतरी अवघड अडचणी एका क्षणात सुटू शकतील, हे ठाऊक असूनही, कोणत्याही कठीण प्रसंगी त्याच्या कृपेचा लाभ घ्यायचा मोह कालीपदला पडला नाही. आपल्या उणिवा घेऊन तो आपल्या दारिद्र्याच्या एकांत अंधारात दडून राहत असे. गरीब असूनही दूर राहायचे — हा अहंकार शैलेनला मुळीच सहन झाला नाही. शिवाय, खाण्यापिण्यात, कपड्यालत्त्यात कालीपदचे दारिद्र्य इतके उघड होते की, ते अगदी डोळ्यांत खुपत असे. त्याचे अतिशय दीनवाणे कपडेलत्ते आणि मच्छरदाणी-अंथरूण जेव्हा जेव्हा वरच्या मजल्याचा जिना चढताना नजरेस पडत, तेव्हा तेव्हा तो जणू एक अपराधच आहे, असे मनाला डाचे. त्यात भर म्हणजे, त्याच्या गळ्यात ताईत लटकलेला असे, आणि तो सकाळ-संध्याकाळ यथाविधी संध्या करी. त्याचा हा सगळा अजब गावंढळपणा वरच्या मंडळींना भयंकर हास्यास्पद वाटे. शैलेनच्या गोटातल्या एकदोघांनी या एकांतवासी, निरुपद्रवी माणसाचे रहस्य उलगडण्यासाठी दोनचार दिवस त्याच्या खोलीत येजा केली. पण या घुम्या माणसाचे तोंड काही त्यांना उघडता आले नाही. त्याच्या खोलीत फार वेळ बसणे सुखाचे नव्हते, आरोग्याचे तर मुळीच नव्हते; त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली.
रासमणीचा मुलगा
त्यांच्या बोकडाच्या मटणाच्या मेजवानीला या कफल्लकाला एकदा बोलावले, तर तो नक्की कृतार्थ होईल, असा विचार करून एकदा मेहेरबानी करून आमंत्रणपत्र पाठवण्यात आले. कालीपदने कळवले की, मेजवानीतले पदार्थ पचवणे आपल्याला झेपणार नाही, आपली सवय वेगळी आहे. या नकाराने लवाजम्यासकट शैलेन भयंकर संतापला. काही दिवस त्याच्या अगदी डोक्यावरच्या खोलीत अशी धपाधप आदळआपट आणि जोरजोरात गाणेबजावणे चालू झाले की, कालीपदला अभ्यासात मन लावणे अशक्य होऊन बसले. दिवसा तो होईल तितका गोलदिघीच्या काठी एका झाडाखाली पुस्तक घेऊन अभ्यास करी, आणि रात्र असतानाच उठून, पहाटे पहाटे एक दिवा लावून अध्ययनात मन लावी. कलकत्त्यातल्या खाण्याराहण्याच्या आबाळीने आणि अतिश्रमाने कालीपदला डोकेदुखीची एक व्याधी जडली. कधीकधी असे होई की, तीनचार दिवस त्याला अंथरुणावर पडून राहावे लागे. त्याला पक्के ठाऊक होते की, ही खबर कळली तर आपले वडील आपल्याला कधीच कलकत्त्यात राहू देणार नाहीत, आणि व्याकूळ होऊन कदाचित कलकत्त्यापर्यंत धावतही येतील. भवानीचरणांची समजूत होती की, कलकत्त्यात कालीपद अशा सुखात आहे की, त्याची कल्पनाही गावच्या लोकांना करता येणार नाही. खेड्यात जशी झाडेझुडपे आपोआप उगवतात, तशी कलकत्त्याच्या हवेत सर्व प्रकारच्या आरामाची साधने जणू आपोआप उगवतात आणि सगळेच त्यांची फळे चाखू शकतात, अशी त्यांची एक कल्पना होती. कालीपदने त्यांचा तो भ्रम कधीही मोडला नाही. आजारपणाच्या अत्यंत कष्टाच्या दिवसांतही वडिलांना पत्र लिहायला त्याने एक दिवसही चुकवले नाही. पण अशा दुखण्याच्या दिवसांत शैलेनचे टोळके गोंगाट करून भुताटकी माजवी, तेव्हा कालीपदच्या कष्टांना सीमा राहत नसे.
रासमणीचा मुलगा
तो नुसता या कुशीवरून त्या कुशीवर होई, आणि त्या निर्मनुष्य खोलीत पडल्या पडल्या आईला हाका मारी, वडिलांची आठवण काढी. दारिद्र्याचा अपमान आणि दुःख तो जसजसे भोगी, तसतशी आपल्या आईवडिलांना या बंधनातून सोडवायचेच, ही प्रतिज्ञा त्याच्या मनात अधिकाधिक दृढ होत जाई. कालीपदने स्वतःला अगदी आक्रसून घेऊन सगळ्यांच्या नजरेआड ठेवायचा प्रयत्न केला, पण त्याने उपद्रव तसूभरही कमी झाला नाही. कधी त्याला दिसे की, चिनाबाजारातल्या त्याच्या जुन्या स्वस्त जोड्यातला एक बूट गायब आहे आणि त्याच्या जागी एक अतिशय उंची विलायती बूट ठेवलेला आहे. असे विजोड बूट घालून कॉलेजला जाणे शक्यच नव्हते. त्याविषयी कसलीही तक्रार न करता त्याने तो परका बूट खोलीबाहेर ठेवून दिला, आणि जोडे दुरुस्त करणाऱ्या चांभाराकडून कमी किमतीचे जुने जोडे विकत घेऊन काम भागवू लागला. एके दिवशी वरून एक पोरगा अचानक कालीपदच्या खोलीत येऊन विचारू लागला, 'तुम्ही चुकून माझ्या खोलीतून माझी सिगारेट-केस घेऊन आलात का? मला ती कुठेच सापडत नाहीये.' कालीपद वैतागून म्हणाला, 'मी तुमच्या खोल्यांत गेलेलोच नाही.' 'ही काय, इथेच तर आहे' असे म्हणून त्या इसमाने खोलीच्या एका कोपऱ्यातून एक मौल्यवान सिगारेट-केस उचलली आणि आणखी काहीही न बोलता तो वर निघून गेला. कालीपदने मनाशी ठरवले, 'एफ.ए.च्या परीक्षेत चांगली शिष्यवृत्ती मिळाली, तर ही मेस सोडून जाईन.' मेसमधली मुले मिळून दरवर्षी धूमधडाक्यात सरस्वतीपूजा करतात. तिच्या खर्चाचा मोठा भाग शैलेन उचलतो, पण सगळीच मुले वर्गणी देतात. गेल्या वर्षी अगदीच तुच्छ लेखून कुणी कालीपदकडे वर्गणी मागायलाही आले नव्हते.
रासमणीचा मुलगा
या वर्षी केवळ त्याला सतावण्यासाठीच त्याच्यापुढे वर्गणीची वही आणून धरली. ज्या टोळक्याकडून कालीपदने कधी तसूभरही मदत घेतली नव्हती, ज्यांच्या जवळजवळ रोजच्या चैनीत सामील होण्याचे भाग्य त्याने साफ नाकारले होते, ते जेव्हा कालीपदकडे वर्गणीची मदत मागायला आले, तेव्हा कोण जाणे काय मनात येऊन त्याने पाच रुपये देऊन टाकले. पाच रुपये शैलेनला त्याच्या गोटातल्या कुणाकडूनच मिळाले नव्हते. कालीपदच्या दारिद्र्याच्या कंजूषपणामुळे आजवर सगळेच त्याला तुच्छ लेखत आले होते, पण आज त्याचे हे पाच रुपयांचे दान त्यांना अगदी असह्य झाले. 'याची परिस्थिती कशी आहे, ते काय आम्हाला ठाऊक नाही? मग याला एवढी कसली ऐट? हा तर सगळ्यांवर कडी करायला बघतोय.' सरस्वतीपूजा धूमधडाक्यात झाली — कालीपदने दिलेले ते पाच रुपये दिले नसते, तरी काही फरक पडला नसता. पण कालीपदच्या बाबतीत तसे म्हणता येत नाही. त्याला परक्याच्या घरी जेवावे लागे — रोज वेळेवर जेवण मिळत नसे. शिवाय, स्वयंपाकघरातले नोकरच त्याचे भाग्यविधाते; त्यामुळे कमीजास्त, बरेवाईट यावर कसलीही अप्रिय टीका न करता, न्याहारीसाठी थोडीफार पुंजी त्याला हाताशी ठेवावीच लागे. ती तुटपुंजी शिल्लक झेंडूच्या सुकलेल्या फुलांच्या ढिगाबरोबर, विसर्जित देवीच्या मूर्तीमागोमाग अंतर्धान पावली. कालीपदच्या डोकेदुखीचा उपद्रव वाढला. या खेपेस तो परीक्षेत नापास झाला नाही खरा, पण शिष्यवृत्ती मिळाली नाही. त्यामुळे अभ्यासाच्या वेळेला कात्री लावून त्याला आणखी एक शिकवणी मिळवावी लागली. आणि पुष्कळ उपद्रव होत असूनही, बिनभाड्याचे ते बिऱ्हाड त्याला सोडता आले नाही.
रासमणीचा मुलगा
वरच्या मजल्यावरच्यांनी आशा केली होती की, या खेपेस सुट्टीनंतर कालीपद या मेसमध्ये नक्कीच परत येणार नाही. पण ठरल्या वेळी त्याच्या त्या खालच्या खोलीचे कुलूप उघडले गेले. धोतरावर तोच त्याचा कायमचा चौकड्यांचा चायना-कोट घालून कालीपद आपल्या ढोलीत शिरला; आणि मळक्या कापडात बांधलेले एक भलेमोठे गाठोडे आणि पत्र्याची पेटी खाली उतरवून ठेवून सियालदहचा हमाल त्याच्या खोलीसमोर उकिडवा बसला आणि बराच वाद घालून आपली मजुरी वसूल करून गेला. त्या गाठोड्याच्या पोटात नाना मडकी, गाडगी, भांड्यांमध्ये कालीपदच्या आईने कैऱ्या, बोरे, करमळ वगैरे सामग्रीपासून नाना प्रकारचे चटकदार पदार्थ तयार करून स्वतःच्या हाताने भरून दिले होते. कालीपदला ठाऊक होते की, आपल्या गैरहजेरीत वरच्या मजल्यावरचे थट्टेखोर टोळके आपल्या खोलीत शिरत असते. त्याला दुसरी कसलीच काळजी नव्हती; फक्त एकच मोठा संकोच होता — आपल्या आईवडिलांच्या मायेची एखादी खूण या टवाळखोरांच्या हाती पडू नये. आईने दिलेले हे खाण्याचे पदार्थ त्याच्या दृष्टीने अमृत — पण हे सगळे त्याच्या गरीब गावठी घरचे लाडाचे धन; ज्या भांड्यांत ते ठेवलेले होते, ती कणकेने तोंड लिंपलेली, परळ झाकलेली मडकी — त्यांतही शहरी ऐश्वर्याच्या थाटाची कोणतीच खूण नाही; ती काही काचेची भांडी नव्हेत, चिनी मातीच्या बरण्याही नव्हेत — पण यांच्याकडे एखादा शहरी पोरगा तुच्छतेने पाहील, हे त्याला अजिबात सहन होण्यासारखे नव्हते. मागच्या खेपेस तो या आपल्या खास वस्तू खाटेखाली जुनी वर्तमानपत्रे वगैरे झाकून दडवून ठेवीत असे. या खेपेस त्याने कुलूपकिल्लीचा आश्रय घेतला. पाच मिनिटांसाठीसुद्धा तो खोलीबाहेर गेला, तरी खोलीला कुलूप लावून जाई.
रासमणीचा मुलगा
हे सगळ्यांच्याच डोळ्यांत खुपले. शैलेन म्हणाला, 'धनरत्नं तर अमाप आहेत! खोलीत शिरलं तर चोराच्याच डोळ्यांत पाणी येईल — आणि त्या खोलीला घडीघडी कुलूप पडतंय — अगदी दुसरी "बँक ऑफ बेंगॉल"च झालीय की! आपल्यापैकी कुणावरच विश्वास नाही — न जाणो, त्या पाबन्याच्या छिटाच्या चायना-कोटाचा मोह आपल्याला आवरला नाही तर! अरे राधू, त्याला एखादा बरासा नवा कोट घेऊन दिल्याशिवाय आता काही खरं नाही. वर्षानुवर्षं त्याचा तो एकुलता एक कोट बघून बघून मला उबग आलाय.' शैलेन कधीच कालीपदच्या त्या ओल धरलेल्या, चुना-रेती ढासळणाऱ्या अंधाऱ्या खोलीत शिरला नव्हता. जिन्याने वर चढताना ती बाहेरून नुसती पाहिली तरी त्याचे सर्वांग आकसून जाई. विशेषतः संध्याकाळच्या वेळी, एक मिणमिणता दिवा घेऊन एकटाच त्या कोंदट, बंदिस्त खोलीत उघड्या अंगाने बसून कालीपद पुस्तकावर वाकून अभ्यास करताना दिसे, तेव्हा त्याचा जीव गुदमरून जाई. शैलेन आपल्या गोटातल्यांना म्हणाला, 'या खेपेस कालीपदनं सात राजांचं कोणतं माणिकधन गोळा करून आणलंय, ते तुम्ही शोधून काढा.' या थट्टेत सगळ्यांनीच उत्साह दाखवला. कालीपदच्या खोलीचे कुलूप अगदीच स्वस्तातले; त्याचा मज्जाव काही फार कडक नव्हता; जवळजवळ कोणत्याही किल्लीने ते उघडे. एके दिवशी संध्याकाळी कालीपद शिकवणीला गेला असताना, ती संधी साधून दोनतीन अतिशय मौजी पोरांनी हसत हसत कुलूप उघडले आणि हातात कंदील घेऊन त्याच्या खोलीत प्रवेश केला. खाटेखालून लोणची, चटण्या, आंबापोळी वगैरेंची मडकी त्यांनी शोधून काढली. पण त्या फार मौल्यवान, लपवून ठेवण्यासारख्या वस्तू आहेत, असे काही त्यांना वाटले नाही.
रासमणीचा मुलगा
शोधता शोधता उशीखालून कडीसकट एक किल्ली मिळाली. त्या किल्लीने पत्र्याची पेटी उघडताच काही मळके कपडे, पुस्तके, वह्या, कात्री, सुरी, लेखणी वगैरे नजरेस पडले. पेटी बंद करून ते निघण्याच्या बेतात असताना, सगळ्या कपड्यांच्या तळाशी रुमालात गुंडाळलेली काहीतरी वस्तू सापडली. रुमाल उघडताच फाटक्या कापडाचे एक वेष्टण दिसले. ते वेष्टण उघडल्यावर, एकामागून एक जवळजवळ तीनचार कागदांची आवरणे सोडवल्यावर पन्नास रुपयांची एक नोट बाहेर पडली. ही नोट पाहून मात्र कुणालाच हसू आवरले नाही. सगळे खो खो करून मोठ्याने हसू लागले. सगळ्यांनी ठरवले की, याच नोटेसाठी कालीपद घडीघडी खोलीला कुलूप लावतो आहे, जगातल्या कोणत्याच माणसावर त्याचा विश्वास नाही. त्या माणसाचा कंजूषपणा आणि संशयी स्वभाव पाहून शैलेनच्या कृपेची आस धरणारे ते सोबती चकित झाले. इतक्यात अचानक वाटले, रस्त्यावर कालीपदसारखा कुणाचा तरी खोकला ऐकू आला. तत्क्षणी पेटीचे झाकण बंद करून, नोट हातात घेऊनच ते वर पळाले. एकाने घाईघाईने दाराला कुलूप लावले. शैलेन ती नोट पाहून खूप हसला. पन्नास रुपये म्हणजे शैलेनच्या दृष्टीने काहीच नव्हते; तरी एवढे पैसेसुद्धा कालीपदच्या पेटीत असतील, हे त्याच्या वागण्यावरून कुणालाच अंदाज करता आले नसते. त्यात पुन्हा या एवढ्याशा नोटेसाठी एवढी काळजी! सगळ्यांनी ठरवले, बघू या, हे पैसे गायब झाल्यावर हा विचित्र प्राणी काय तमाशा करतो ते. रात्री नऊनंतर शिकवणी आटोपून थकल्याभागल्या देहाने परतलेल्या कालीपदचे खोलीच्या अवस्थेकडे मुळीच लक्ष गेले नाही. शिवाय, त्याचे डोके जणू फुटून चालले होते. त्याला कळून चुकले होते, आता काही दिवस ही डोकेदुखी त्याची पाठ सोडणार नाही.
रासमणीचा मुलगा
दुसऱ्या दिवशी कपडे काढण्यासाठी त्याने खाटेखालून पत्र्याची पेटी ओढली, तेव्हा पेटी उघडी असल्याचे दिसले. कालीपद स्वभावतः गाफील नसला, तरी त्याला वाटले, कदाचित आपणच कुलूप लावायला विसरलो असू. कारण, खोलीत चोर आला असता, तर बाहेरच्या दाराला कुलूप लावलेले राहिले नसते. पेटी उघडून पाहतो तो त्याचे कपडेलत्ते सगळे उलटेपालटे. त्याच्या छातीत धस्स झाले. घाईघाईने सगळे सामान बाहेर काढून पाहिले — आईने दिलेली ती नोट नव्हती. कागदांची आणि कापडाची वेष्टणे तेवढी होती. पुनःपुन्हा कालीपद सगळे कपडे जोरजोराने झटकू लागला; नोट निघाली नाही. इकडे वरच्या मजल्यावरची एकेक-दोनदोन माणसे जणू आपल्याच कामाला जिन्याने खाली उतरून त्या खोलीकडे तिरप्या नजरेने पाहत पुनःपुन्हा चढउतार करू लागली. वर गडगडाटी हास्याचे कारंजे उसळले. नोटेची काहीच आशा उरली नाही, आणि डोकेदुखीमुळे सामानाची उलथापालथ करणे त्याला आणखी शक्य राहिले नाही, तेव्हा तो अंथरुणावर पालथा पडून प्रेतासारखा पडून राहिला. ही त्याच्या आईची मोठ्या दुःखाने साठवलेली नोट — आयुष्यातले कितीतरी क्षण कठोर यंत्रात पिळून पिळून दिवसेंदिवस थोडी थोडी करून ही नोट साठली होती. एके काळी या दुःखाचा इतिहास त्याला काहीच ठाऊक नव्हता; त्या दिवसांत तो आईच्या ओझ्यावर ओझेच वाढवीत गेला; अखेर ज्या दिवशी आईने त्याला आपल्या रोजच्या, अखंड फिरत राहणाऱ्या दुःखाचा सोबती करून घेतले, त्या दिवसासारखा अभिमान त्याने आपल्या वयात पुन्हा कधी अनुभवला नव्हता. कालीपदला आपल्या आयुष्यात जो सर्वांत मोठा संदेश, जो सर्वश्रेष्ठ आशीर्वाद मिळाला होता, तोच या नोटेत भरून राहिला होता.
रासमणीचा मुलगा
आईच्या अथांग मायेच्या सागराचे मंथन करून निघालेली ती अमोल दुःखाची भेट चोरीला जाणे, हा त्याला एखाद्या पैशाचिक शापासारखा वाटला. शेजारच्या जिन्यावरून आज पुनःपुन्हा पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला. विनाकारण चढणे-उतरणे आज थांबतच नव्हते. गाव पेटून जळून खाक होते आहे, आणि अगदी त्याच्या शेजारून थट्टेच्या खळखळाटात नदी अखंड धावते आहे — तसेच हे. वरच्या मजल्यावरचे गडगडाटी हास्य ऐकून एका क्षणी कालीपदला अचानक वाटले, हे चोराचे काम नव्हे. एका क्षणात त्याला कळून चुकले, शैलेंद्राच्या टोळक्याने थट्टा म्हणून त्याची ही नोट नेली आहे. चोराने चोरली असती, तरी त्याच्या मनाला एवढे लागले नसते. त्याला वाटू लागले, जणू पैशाच्या मदाने उन्मत्त झालेल्या तरुणांनी त्याच्या आईच्या अंगावर हात टाकला आहे. एवढे दिवस कालीपद या मेसमध्ये होता, पण हा एवढासा जिना चढून त्याने एकदाही वरच्या मजल्यावर पाऊल टाकले नव्हते. आज — अंगात तेच फाटके बनियन, पायांत जोडे नाहीत, मनाच्या आवेगाने आणि डोकेदुखीच्या तडाख्याने चेहरा लालबुंद झालेला — तो वेगाने वर चढून गेला. आज रविवार — कॉलेजला जायची कटकट नव्हती; लाकडी छताच्या व्हरांड्यात मित्रमंडळी कुणी खुर्चीवर, कुणी वेताच्या मोढ्यावर बसून हास्यविनोद करीत होती. कालीपद त्यांच्या मधोमध धावत जाऊन संतापाने कापऱ्या आवाजात ओरडला, 'द्या, माझी नोट द्या.' त्याने विनवणीच्या सुरात मागितले असते, तर काम झाले असते यात शंका नाही. पण त्याचे ते वेड्यासारखे संतप्त रूप पाहून शैलेन भयंकर चिडला. त्याच्या घरचा दरवान तिथे असता, तर त्याच्याकरवी त्याने या असभ्य माणसाला कान धरून हाकलून दिले असते, यात संशय नाही. सगळेच उठून उभे राहिले आणि एकदम गरजले, 'काय म्हणता, महाशय! कसली नोट!' कालीपद म्हणाला, 'माझ्या पेटीतून तुम्ही नोट काढून आणलीय.'
रासमणीचा मुलगा
'एवढी मजल! आम्हाला चोर म्हणायचंय तुम्हाला!' कालीपदच्या हातात काही असते, तर त्या क्षणीच त्याने खूनखराबा केला असता. त्याचा तो अवतार पाहून चारपाच जणांनी मिळून त्याचे हात धरून ठेवले. जाळ्यात अडकलेल्या वाघासारखा तो गुरगुरत राहिला. या अन्यायाचा प्रतिकार करायला त्याच्यापाशी कोणतीच शक्ती नाही, कोणताच पुरावा नाही — त्याचा संशय सगळेच वेडाचार म्हणून उडवून लावतील. ज्यांनी त्याला मृत्युबाण मारला होता, तेच त्याचा उद्धटपणा असह्य आहे म्हणून भयंकर आदळआपट करू लागले. ती रात्र कालीपदने कशी काढली, हे कुणालाच कळले नाही. शैलेनने शंभर रुपयांची एक नोट काढून म्हटले, 'घ्या, त्या गावंढळ बांगालाला देऊन या, जा.' सोबती म्हणाले, 'वेड लागलंय का तुला! आधी त्याची ती ऐट जिरू दे — आम्हा सगळ्यांपुढे आधी एक रिटन अपॉलॉजी देऊ दे, मग विचार करून बघू.' यथावकाश सगळे झोपायला गेले, आणि झोप लागायलाही कुणाला वेळ लागला नाही. सकाळी कालीपदची गोष्ट जवळजवळ सगळेच विसरून गेले होते. सकाळी कुणी कुणी जिन्याने खाली उतरताना त्याच्या खोलीतून बोलणे ऐकले. त्यांना वाटले, कदाचित वकील बोलावून सल्लामसलत चालली असेल. दाराला आतून कडी लावलेली. बाहेरून कान देऊन जे ऐकले, त्यात कायद्याचा काहीच संबंध नव्हता; सगळी असंबद्ध, वातातली बडबड. त्यांनी वर जाऊन शैलेनला खबर दिली. शैलेन खाली उतरून दाराबाहेर येऊन उभा राहिला. कालीपद काय बरळतो आहे, ते नीट कळत नव्हते; फक्त मधूनमधून 'बाबा', 'बाबा' म्हणून किंचाळत होता. भीती वाटली, कदाचित नोटेच्या दुःखाने त्याला वेड लागले असेल. बाहेरून दोनतीनदा हाक मारली, 'कालीपदबाबू!' कुणीच ओ दिली नाही. फक्त ती पुटपुटणारी बडबड चालूच राहिली. शैलेन पुन्हा मोठ्याने म्हणाला, 'कालीपदबाबू, दार उघडा, तुमची ती नोट सापडलीय.' दार उघडले नाही; फक्त बडबडीची गुणगुण ऐकू येत राहिली.
रासमणीचा मुलगा
प्रकरण एवढ्या थराला जाईल, अशी कल्पनाही शैलेनने केली नव्हती. आपल्या हुजऱ्यांपुढे तो पश्चात्तापाचा एक शब्दही बोलला नाही. पण त्याच्या मनात ते सलत राहिले. तो म्हणाला, 'दार तोडून टाकू या.' कुणी कुणी सल्ला दिला, 'पोलीस बोलावून आणा — कुणास ठाऊक, वेडाच्या भरात एकदम काही करून बसला तर — काल जो प्रकार पाहिला — धीर होत नाही.' शैलेन म्हणाला, 'नको — लगेच कुणीतरी जाऊन अनादि डॉक्टरांना बोलावून आणा.' अनादि डॉक्टर घराजवळच राहत. त्यांनी येऊन दाराला कान लावला आणि म्हणाले, 'हा तर सन्निपातच दिसतो.' दार तोडून आत गेल्यावर दिसले — खाटेवरचे विस्कटलेले अंथरूण थोडेसे घसरून जमिनीवर लोळते आहे. कालीपद जमिनीवर पडलेला — शुद्ध नाही. तो लोळतो आहे, मधूनमधून हातपाय झाडतो आहे, आणि वातात बडबडतो आहे; त्याचे लाल डोळे उघडे आहेत, आणि त्याच्या चेहऱ्यावर जणू रक्त उसळून फुटते आहे. डॉक्टरांनी त्याच्या शेजारी बसून बराच वेळ तपासले आणि शैलेनला विचारले, 'याचे कोणी नातेवाईक आहेत?' शैलेनचा चेहरा पांढराफटक पडला. त्याने घाबरून विचारले, 'का बरं, सांगा ना?' डॉक्टर गंभीर होऊन म्हणाले, 'कळवलेलं बरं; लक्षणं चांगली नाहीत.' शैलेन म्हणाला, 'यांच्याशी आमची फारशी ओळख नाही — नातेवाइकांची काहीच माहिती नाही. शोध घेतो. पण तोवर काय करायला हवं?' डॉक्टर म्हणाले, 'या खोलीतून रोग्याला आत्ताच्या आत्ता वरच्या मजल्यावरच्या एखाद्या चांगल्या खोलीत हलवायला हवं. रात्रंदिवस शुश्रूषेची व्यवस्थाही करायला हवी.' शैलेन रोग्याला आपल्या स्वतःच्या खोलीत घेऊन गेला. आपल्या सगळ्या सोबत्यांना गर्दी करायची मनाई करून खोलीतून घालवून दिले. कालीपदच्या डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवून स्वतःच्या हाताने वारा घालू लागला.
रासमणीचा मुलगा
मी आधीच सांगितले आहे की, या घराच्या वरच्या मजल्यावरची मंडळी कसलीही अवहेलना किंवा थट्टा करतील म्हणून कालीपदने आपल्या आईवडिलांची सगळी माहिती त्यांच्यापासून लपवून ठेवली होती. त्यांना जी पत्रे तो लिही, ती तो काळजीपूर्वक स्वतः पोस्टात टाकून येई, आणि त्याच्या नावाची पत्रे पोस्टाच्याच पत्त्यावर येत — रोज तो स्वतः जाऊन ती घेऊन येई. कालीपदच्या घरचा पत्ता शोधण्यासाठी पुन्हा एकदा त्याची पेटी उघडावी लागली. त्याच्या पेटीत पत्रांचे दोन गठ्ठे होते. प्रत्येक गठ्ठा अतिशय जपून फितीने बांधलेला. एका गठ्ठ्यात त्याच्या आईची पत्रे, दुसऱ्यात वडिलांची. आईची पत्रे संख्येने थोडीच; वडिलांचीच जास्त. पत्रे हातात घेऊन शैलेनने दार बंद केले, आणि रोग्याच्या अंथरुणाशेजारी बसून वाचायला सुरुवात केली. पत्रावरचा पत्ता वाचताच तो एकदम दचकला. शानियाडी, चौधरीवाडा, सहा-आणे पाती! खाली नाव पाहिले — भवानीचरण देवशर्मा. भवानीचरण चौधरी! पत्रे खाली ठेवून तो स्तब्ध बसून कालीपदच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. काही दिवसांपूर्वी एकदा त्याच्या सोबत्यांपैकी कुणीतरी म्हणाले होते की, त्याच्या चेहऱ्याशी कालीपदच्या चेहऱ्याचे बरेच साम्य आहे. ते ऐकायला त्याला आवडले नव्हते, आणि इतर सगळ्यांनी ते साफ उडवून लावले होते. आज त्याला कळले, ते बोलणे निराधार नव्हते. त्याच्या आजोबांच्या पिढीत दोघे भाऊ होते — श्यामाचरण आणि भवानीचरण, हे त्याला ठाऊक होते. त्यानंतरचा इतिहास त्यांच्या घरात कधी निघाला नव्हता. भवानीचरणांना मुलगा आहे आणि त्याचे नाव कालीपद, हे त्याला ठाऊकच नव्हते. हाच तो कालीपद! हाच आपला काका!
रासमणीचा मुलगा
शैलेनला तेव्हा आठवू लागले — शैलेनची आजी, श्यामाचरणांच्या पत्नी, जिवंत होत्या तोवर शेवटपर्यंत मोठ्या मायेने भवानीचरणांविषयी बोलत. भवानीचरणांचे नाव घेताच त्यांचे दोन्ही डोळे भरून येत. भवानीचरण त्यांचे दीर खरे, पण त्यांच्या मुलापेक्षा वयाने लहान — त्यांना त्यांनी पोटच्या मुलासारखेच वाढवले होते. मिळकतीच्या उलथापालथीत जेव्हा ते वेगळे झाले, तेव्हा भवानीचरणांची थोडीतरी खबर कळावी म्हणून त्यांचा जीव तहानलेला असे. त्यांनी आपल्या मुलांना कितीदा तरी सांगितले होते, 'भवानीचरण अगदी भोळा, अजाण माणूस म्हणून तुम्ही नक्कीच त्याला फसवलंत — माझे सासरे त्याच्यावर एवढं प्रेम करायचे, ते त्याला मिळकतीतून वंचित करून जातील, हे मला खरं वाटत नाही.' त्यांच्या मुलांना या गोष्टींचा भयंकर राग येई, आणि शैलेनला आठवले, त्यालाही आपल्या आजीचा फार राग येत असे. इतकेच काय, आजी भवानीचरणांची बाजू घेत म्हणून त्याला भवानीचरणांचाही भारी राग येई. आज भवानीचरणांची अशी गरीब अवस्था आहे, हेही त्याला ठाऊक नव्हते — कालीपदची अवस्था पाहून त्याला सगळे उमगले; आणि एवढे दिवस हजार प्रलोभने असूनही कालीपद आपल्या हुजऱ्यांच्या पंक्तीत दाखल झाला नाही, याचा त्याला भारी अभिमान वाटला. दैववशात कालीपद त्याच्या मागेपुढे करणाऱ्यांत सामील झाला असता, तर आज त्याच्या लज्जेला सीमा उरली नसती. ४ शैलेनच्या गोटातल्या लोकांनी एवढे दिवस रोजच कालीपदचा छळ केला होता, अपमान केला होता. या बिऱ्हाडात त्यांच्या मधोमध आपल्या काकाला ठेवणे शैलेनला जमेना. डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याने मोठ्या काळजीने त्याला एका चांगल्या घरात हलवले.
रासमणीचा मुलगा
शैलेनचे पत्र मिळताच भवानीचरण एका सोबत्याला घेऊन घाईघाईने कलकत्त्याला धावत आले. ते निघताना व्याकूळ होऊन रासमणींनी आपल्या कष्टाने साठवलेल्या पैशांतला बहुतेक भाग पतीच्या हाती दिला आणि म्हणाल्या, 'बघा हं, हयगय होता कामा नये. तसं वाटलं तर मला नुसतं कळवा, की मी येईन.' चौधरी घराण्याच्या सुनेने उठसूट कलकत्त्याला जायचा प्रस्ताव इतका अनुचित होता की, पहिल्या खबरीसरशी त्यांचे जाणे घडले नाही. त्यांनी रक्षाकालीला नवस बोलला, आणि ज्योतिषाला बोलावून ग्रहशांतीची व्यवस्था करून दिली. कालीपदची अवस्था पाहून भवानीचरण गांगरून गेले. कालीपदला तेव्हा नीट शुद्ध आली नव्हती; त्याने त्यांना 'मास्तर' म्हणून हाक मारली — त्याने त्यांचे काळीज फाटले. कालीपद मधूनमधून वातात 'बाबा', 'बाबा' म्हणून हाका मारीत होता — ते त्याचा हात धरून त्याच्या तोंडाजवळ तोंड नेऊन मोठ्याने म्हणत होते, 'हा बघ बाळा, हा मी आलोय.' पण त्याने त्यांना ओळखले, असे काही त्याच्या चेहऱ्यावर दिसले नाही. डॉक्टर येऊन म्हणाले, 'ताप पूर्वीपेक्षा थोडा उतरलाय; कदाचित आता सुधारणेकडे वाटचाल होईल.' — कालीपद सुधारणार नाही, हा विचार भवानीचरणांच्या मनात येऊच शकत नव्हता. विशेषतः, त्याच्या लहानपणापासून सगळे म्हणत आले होते की, कालीपद मोठेपणी काहीतरी असाध्य ते साध्य करून दाखवील — ते भवानीचरणांनी केवळ लोकांचे बोलणे म्हणून घेतले नव्हते — तो विश्वास त्यांच्या अगदी संस्कारात रुजून गेला होता. कालीपदला जगावेच लागेल, हे त्याच्या ललाटीचे लिखित आहे. या कारणाने डॉक्टर जेवढे चांगले म्हणत, त्याहून कितीतरी जास्त चांगले ते ऐकून घेत, आणि रासमणींना जे पत्र लिहीत, त्यात धास्तीचा एक शब्दही नसे.
रासमणीचा मुलगा
शैलेंद्राच्या वागण्याने भवानीचरण अगदी थक्क होऊन गेले. तो आपला अगदी जवळचा आप्त नाही, असे कोण म्हणेल! विशेषतः, कलकत्त्याचा सुशिक्षित, सुसंस्कृत मुलगा असूनही तो त्यांच्याविषयी जी भक्ती, जो आदर बाळगतो, तसा काही सहसा दिसत नाही. त्यांना वाटले, कलकत्त्याच्या मुलांचा स्वभावच बहुधा असा असतो. मनात म्हणाले, 'असणारच की, आमच्या खेडवळ पोरांचं शिक्षण ते काय आणि रीतभात ती काय!' ताप थोडा थोडा उतरू लागला आणि कालीपद हळूहळू शुद्धीवर आला. वडिलांना अंथरुणाशेजारी पाहून तो दचकला; त्याला वाटले, कलकत्त्यातली आपली परिस्थिती आता वडिलांपुढे उघडी पडणार. त्याहूनही मोठी काळजी ही की, आपले गावठी वडील शहरी पोरांच्या थट्टेचा विषय होतील. चहूकडे पाहून त्याला उमगेना, 'ही कुठली खोली? हे स्वप्न तर बघत नाही ना मी?' तेव्हा फार काही विचार करण्याची त्याच्यात शक्ती नव्हती. त्याला वाटले, आजारपणाची खबर कळताच वडिलांनी येऊन आपल्याला एका चांगल्या बिऱ्हाडात आणून ठेवले आहे. कसे आणले, त्याचा खर्च कुठून भागवीत आहेत, एवढा खर्च करीत राहिले तर पुढे कोणते संकट ओढवेल, या गोष्टींचा विचार करायला त्याला सवड नव्हती. आता त्याला जगून उठायचे आहे; आणि त्यासाठी जणू सगळ्या जगावर त्याचा हक्क आहे. एकदा वडील खोलीत नसताना शैलेन एका भांड्यात काही फळे घेऊन त्याच्याजवळ येऊन उभा राहिला, तेव्हा कालीपद अवाक होऊन त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला — विचार करू लागला, यात काही थट्टा तर नाही ना? पहिला विचार त्याच्या मनात आला तो हा की, वडिलांना याच्या हातून वाचवायला हवे.
रासमणीचा मुलगा
शैलेनने फळांचे भांडे टेबलावर ठेवले, आणि कालीपदच्या पायांना हात लावून नमस्कार केला; म्हणाला, 'माझ्या हातून फार मोठा अपराध घडलाय, मला क्षमा करा.' कालीपद एकदम गडबडून गेला. शैलेनचा चेहरा पाहताच त्याला कळले, त्याच्या मनात कसलेही कपट नाही. कालीपद पहिल्यांदा मेसमध्ये आला, तेव्हा तारुण्याच्या तेजाने उजळलेला हा सुंदर चेहरा पाहून त्याचे मन कितीदा तरी त्याच्याकडे ओढले गेले होते; पण आपल्या दारिद्र्याच्या संकोचापायी तो कधी त्याच्या जवळपासही गेला नव्हता. तो बरोबरीचा माणूस असता, मित्र म्हणून याच्याजवळ जाण्याचा हक्क त्याला सहजच असता, तर त्याला किती आनंद झाला असता — पण एकमेकांच्या अगदी जवळ राहत असूनही, मधले अपार अंतर ओलांडायचा काही मार्ग नव्हता. जिन्याने शैलेन चढे-उतरे, तेव्हा त्याच्या शौकीन शालीचा सुगंध कालीपदच्या अंधाऱ्या खोलीत शिरे — तेव्हा अभ्यास सोडून, हसऱ्या, प्रफुल्ल, चिंतेची एकही रेघ नसलेल्या त्या तरुण चेहऱ्याकडे एकदा पाहिल्यावाचून त्याला राहवत नसे. त्या क्षणी, क्षणभरासाठीच, त्याच्या त्या ओलसर कोपऱ्यातल्या खोलीत दूरच्या सौंदर्यलोकाच्या ऐश्वर्यातून उधळलेल्या किरणांची एक झळाळी येऊन पडे. त्यानंतर त्याच शैलेनचे निर्दय तारुण्य त्याच्या दृष्टीने किती प्राणघातक ठरले, ते सगळ्यांना ठाऊक आहेच. आज शैलेनने फळांचे भांडे अंथरुणावर त्याच्यासमोर आणून ठेवले, तेव्हा दीर्घ सुस्कारा सोडून कालीपदने त्या सुंदर चेहऱ्याकडे आणखी एकदा पाहिले. क्षमेचा एकही शब्द तो तोंडाने बोलला नाही — हळूहळू फळे उचलून खाऊ लागला — त्यातच जे सांगायचे ते सांगून झाले.
रासमणीचा मुलगा
कालीपद रोज आश्चर्याने पाहू लागला की, आपल्या गावठी वडिलांची — भवानीचरणांची — शैलेनशी चांगलीच गट्टी जमली आहे. शैलेन त्यांना 'आजोबा' म्हणतो, आणि दोघांत बिनधास्त थट्टामस्करी चालते. दोन्ही बाजूंच्या हास्यविनोदाचे मुख्य लक्ष्य म्हणजे गैरहजर आजीबाई. इतक्या वर्षांनंतर या थट्टेच्या दक्षिणवाऱ्याच्या झुळकीने भवानीचरणांच्या मनात तारुण्याच्या आठवणी जणू पुलकित होऊ लागल्या. आजीबाईंनी स्वतःच्या हाताने केलेली लोणची, आंबापोळी वगैरे सगळे शैलेनने, रोगी बेशुद्ध असल्याची संधी साधून चोरून, कणही न ठेवता फस्त केले होते, हे त्याने आज बेशरमपणे कबूल केले. या चोरीच्या खबरीने कालीपदच्या मनाला एक खोल आनंद झाला. आईच्या हातचे पदार्थ सगळ्या जगाला बोलावून खाऊ घालावे, असे त्याला वाटे — त्यांना त्यांची कदर असेल तर. आज कालीपदला आपल्या आजारपणाची शय्या म्हणजे आनंदाची सभा होऊन बसली — असे सुख त्याला आयुष्यात फार थोडे मिळाले होते. फक्त मधूनमधून त्याला वाटे, अरेरे, आई इथे असती तर! आई असत्या तर या थट्टेखोर, सुंदर तरुणावर त्यांनी किती माया केली असती, याची तो कल्पना करू लागला. त्यांच्या रुग्णशय्येच्या सभेत फक्त एकच विषय असा होता की, तो आनंदाच्या प्रवाहाला मधूनमधून मोठी खीळ घालीत असे. कालीपदच्या मनात दारिद्र्याविषयी जणू एक मानी हळवेपणा होता — एके काळी आपल्यापाशी अमाप ऐश्वर्य होते, यावरून फुकाचा गर्व करायची त्याला भारी लाज वाटे. 'आम्ही गरीब आहोत' ही गोष्ट कोणत्याही 'पण'ने झाकायला तो मुळीच तयार नव्हता.
रासमणीचा मुलगा
भवानीचरणही आपल्या वैभवाच्या दिवसांच्या गोष्टी गर्वाने काढीत, असे नव्हे. पण ते त्यांचे सुखाचे दिवस होते, ते त्यांच्या तारुण्याचे दिवस होते. विश्वासघातकी संसाराचे बीभत्स रूप तेव्हा उघड झाले नव्हते. विशेषतः, श्यामाचरणांच्या पत्नी — त्यांच्यावर अपार माया करणाऱ्या वहिनी रमासुंदरी — जेव्हा त्यांच्या संसारात गृहिणी होत्या, तेव्हा त्या लक्ष्मीच्या भरल्या भांडाराच्या दारी उभे राहून त्यांनी किती अमाप लाड लुटले होते — त्या मावळलेल्या सुखाच्या दिवसांच्या आठवणींच्या झळाळीनेच तर भवानीचरणांच्या आयुष्याची संध्याकाळ सोनेरी होऊन राहिली होती. पण या सगळ्या सुखद आठवणींच्या गप्पांच्या मधोमध फिरून फिरून ती मृत्युपत्राच्या चोरीची गोष्ट येऊन पडेच. भवानीचरण या विषयावर भारी उत्तेजित होत. ते मृत्युपत्र अजूनही सापडेल, याविषयी त्यांच्या मनात तिळमात्र संशय नव्हता — त्यांच्या सतीसाध्वी आईचे बोल कधीच वाया जाणार नाहीत. हा विषय निघाला की कालीपद मनातल्या मनात अस्वस्थ होई. त्याला ठाऊक होते, हे आपल्या वडिलांचे एक वेड आहे, बाकी काही नाही. मायलेकांनी आपसात या वेडाला खतपाणीही घातले होते; पण शैलेनपुढे आपल्या वडिलांचा हा दुबळेपणा उघड व्हावा, हे त्याला मुळीच आवडत नसे. कितीदा तरी त्याने वडिलांना म्हटले होते, 'नाही बाबा, तो तुमचा उगाचचा संशय आहे.' पण अशा वादाचा उलटाच परिणाम होई. आपला संशय निराधार नाही, हे सिद्ध करण्यासाठी ते सगळ्या घटना कणाकणाने उलगडून सांगू लागत. मग कालीपदने कितीही प्रयत्न केले, तरी त्यांना थांबवणे त्याला काही केल्या जमत नसे.
रासमणीचा मुलगा
विशेषतः, कालीपदने हे स्पष्ट हेरले होते की, हा विषय शैलेनला काही केल्या आवडत नाही. इतकेच काय, तोही जणू जरासा उत्तेजित होऊन भवानीचरणांच्या युक्तिवादाचे खंडन करायचा प्रयत्न करी. इतर सगळ्या विषयांत भवानीचरण बाकी सगळ्यांचे मत मान्य करायला तयार असत, पण या एका विषयात ते कुणापुढेही हार मानू शकत नसत. त्यांच्या आईला लिहितावाचता येत असे — त्यांनी स्वतःच्या हाताने त्यांच्या वडिलांचे मृत्युपत्र आणि दुसरा दस्तऐवज एका पेटीत बंद करून लोखंडी तिजोरीत ठेवला होता; आणि तरीही त्यांच्या समोरच आईने पेटी उघडली, तेव्हा दिसले की दुसरा दस्तऐवज जसाच्या तसा आहे, पण मृत्युपत्र नाही — याला चोरी नाही तर काय म्हणायचे? कालीपद त्यांना शांत करण्यासाठी म्हणे, 'असू दे ना बाबा, जे तुमची मिळकत भोगताहेत, ते तुमच्या मुलासारखेच तर आहेत, तुमचे पुतणेच तर आहेत. ती मिळकत तुमच्या वडिलांच्याच वंशात राहिलीय — हेच काय कमी समाधान आहे?' शैलेनला अशा गोष्टी फार वेळ सहन होत नसत; तो उठून खोलीबाहेर निघून जाई. कालीपद मनातल्या मनात दुखावून विचार करी, शैलेन कदाचित आपल्या वडिलांना पैशाला हपापलेला, व्यवहारी माणूस समजत असेल. खरे तर, आपल्या वडिलांच्या ठायी व्यवहारीपणाचा लवलेशही नाही, हे कसेही करून शैलेनला समजावून सांगता आले असते, तर कालीपदला फार हायसे वाटले असते.
रासमणीचा मुलगा
एव्हाना शैलेनने कालीपदला आणि भवानीचरणांना आपली ओळख नक्कीच सांगितली असती. पण या मृत्युपत्राच्या चोरीच्या चर्चेनेच त्याला अडवले. आपल्या वडिलांनी, आजोबांनी मृत्युपत्र चोरले, यावर तो कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवायला तयार नव्हता; आणि तरीही, वडिलोपार्जित मिळकतीतल्या न्याय्य वाट्यापासून भवानीचरण वंचित झाले, यात एक निष्ठुर अन्याय आहे, हेही तो कोणत्याही प्रकारे नाकारू शकत नव्हता. तेव्हापासून या विषयावर कसलाही वाद घालणे त्याने बंद केले — अगदी गप्प बसून राही — आणि संधी मिळाली तर उठून निघून जाई. अजूनही दुपार टळल्यावर थोडासा ताप येऊन कालीपदचे डोके दुखे, पण तो त्याला आजार म्हणून गणतच नसे. अभ्यासासाठी त्याचे मन अस्वस्थ झाले. एकदा त्याची स्कॉलरशिप हातची गेली होती; पुन्हा तसे होऊन चालणार नव्हते. शैलेनपासून लपवून त्याने पुन्हा अभ्यास सुरू केला; डॉक्टरांची याबाबत कडक मनाई आहे, हे ठाऊक असूनही त्याने ती धुडकावली. कालीपद भवानीचरणांना म्हणाला, 'बाबा, तुम्ही घरी परत जा — तिथे आई एकटी आहे. मी तर आता चांगला बरा झालोय.' शैलेनही म्हणाला, 'आता आपण गेलात तरी काही हरकत नाही. आता काळजीचं काही कारण दिसत नाही. जे काही उरलंय, ते दोन दिवसांत बरं होईल. आणि आम्ही आहोतच की.' भवानीचरण म्हणाले, 'ते मला चांगलं ठाऊक आहे; कालीपदची काळजी करण्यासारखं काहीच नाही. माझी कलकत्त्याला यायची काहीच गरज नव्हती, पण मन कुठे ऐकतं, बाळा? शिवाय तुझी आजीबाई एकदा एखादी गोष्ट धरून बसली, की मग ती सोडवायची सोयच नाही.' शैलेन हसून म्हणाला, 'आजोबा, तुम्हीच तर लाड करकरून आजीबाईंना पार बिघडवून ठेवलंय.' भवानीचरण हसून म्हणाले, 'बरं बाळा, बरं; घरात नातसून येईल, तेव्हा तुझी शासनपद्धती किती कडक रूप धारण करते, ते बघू या.'
रासमणीचा मुलगा
भवानीचरण म्हणजे पूर्णपणे रासमणींच्या सेवेवर पोसलेला जीव. कलकत्त्यातल्या नाना प्रकारच्या सुखसोयीसुद्धा रासमणींच्या मायेची, देखभालीची उणीव भरून काढू शकत नव्हत्या. त्यामुळे घरी जाण्यासाठी त्यांना फार आग्रह करावा लागला नाही. सकाळी सामानसुमान बांधून ते तयार झाले होते, इतक्यात कालीपदच्या खोलीत जाऊन पाहतात तो त्याचे डोळे, चेहरा अगदी लालबुंद झाला आहे — अंग जणू आगीसारखे तापले आहे. काल अर्धी रात्र त्याने लॉजिक घोकले होते, आणि उरलेल्या रात्रीत त्याला क्षणभरही झोप लागली नव्हती. कालीपदचा अशक्तपणा तर अजून गेला नव्हताच, त्यात पुन्हा आजाराचा जोरदार हल्ला पाहून डॉक्टर फार चिंतेत पडले. शैलेनला बाजूला बोलावून घेऊन म्हणाले, 'या खेपेस लक्षणं काही ठीक दिसत नाहीत.' शैलेन भवानीचरणांना म्हणाला, 'हे बघा आजोबा, तुम्हालाही त्रास होतोय, आणि रोग्याचीही बहुधा हवी तशी सेवा होत नाहीये; म्हणून मी म्हणतो, आणखी उशीर न करता आजीबाईंना बोलावून घ्यावं.' शैलेनने कितीही झाकून सांगितले, तरी एका भयंकर भीतीने भवानीचरणांचे मन व्यापून टाकले. त्यांचे हातपाय थरथर कापू लागले. ते म्हणाले, 'तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा.' रासमणींना पत्र गेले; त्या घाईघाईने बगलाचरणाला बरोबर घेऊन कलकत्त्याला आल्या. संध्याकाळी कलकत्त्याला पोहोचल्यावर त्यांनी कालीपदला फक्त काही तासच जिवंत पाहिले. सन्निपातात तो राहूनराहून आईला हाका मारीत होता — ते सूर त्यांच्या काळजात रुतून राहिले. भवानीचरण हा आघात सोसून कसे जगतील, या भीतीने रासमणींना आपला शोक नीट व्यक्त करायलाही सवड मिळाली नाही — त्यांचा मुलगा पुन्हा त्यांच्या पतीमध्ये विलीन झाला — पतीमध्येच पुन्हा दोघांचाही भार त्यांनी आपल्या दुखऱ्या काळजावर उचलून घेतला. त्यांचा जीव म्हणाला, 'आता मला सोसवत नाही.' तरीही त्यांना सोसावेच लागले.
रासमणीचा मुलगा
५ रात्र बरीच झाली होती. खोल शोकाने आलेल्या अतीव थकव्याने रासमणींना क्षणभरासाठी बेशुद्धीसारखी झोप लागली होती. पण भवानीचरणांना झोप येत नव्हती. काही वेळ अंथरुणावर या कुशीवरून त्या कुशीवर होऊन, शेवटी दीर्घ सुस्कारा टाकत 'दयाघना हरी' म्हणून ते उठले होते. कालीपद गावातल्याच शाळेत शिकत होता, कलकत्त्याला गेला नव्हता, तेव्हा तो ज्या कोपऱ्यातल्या खोलीत बसून अभ्यास करी, त्या रिकाम्या खोलीत भवानीचरण थरथरत्या हाताने एक दिवा धरून शिरले. रासमणींनी हाताने नक्षी भरलेली फाटकी गोधडी अजूनही खाटेवर अंथरलेली आहे, तिच्यावर जागोजागी अजूनही ते शाईचे डाग आहेत; मळकट भिंतीवर कोळशाने काढलेल्या भूमितीच्या त्या रेषा दिसताहेत; खाटेच्या एका कोपऱ्यात हाताने शिवलेल्या मळक्या कागदांच्या काही वह्यांसोबत 'रॉयल रीडर'च्या तिसऱ्या भागाचे फाटके अवशेष आजही पडून आहेत. आणि — हाय रे — त्याच्या लहानपणच्या इवल्याशा पायातली एक चप्पल खोलीच्या कोपऱ्यात पडलेली होती, ती इतके दिवस कुणी पाहूनही पाहिली नव्हती; आज ती सगळ्यांहून मोठी होऊन डोळ्यांसमोर उभी राहिली — आज त्या छोट्याशा चपलेला झाकून टाकू शकेल, अशी कोणतीही महान वस्तू जगात नाही. कोनाड्यात दिवा ठेवून भवानीचरण त्या खाटेवर येऊन बसले. त्यांच्या कोरड्या डोळ्यांत पाणी आले नाही, पण छातीत कसेसेच होऊ लागले — पुरेसा श्वास घेताना जणू त्यांच्या बरगड्या फुटून जाऊ पाहत होत्या. खोलीचे पूर्वेकडचे दार उघडून, गज धरून ते बाहेर पाहू लागले. अंधारी रात्र, रिमझिम पाऊस पडतो आहे. समोर कुंपणभिंतीने वेढलेले दाट रान. त्यात, अगदी अभ्यासाच्या खोलीसमोरच्या एवढ्याशा जमिनीत कालीपदने बाग फुलवायचा प्रयत्न केला होता. अजूनही त्याने स्वतःच्या हाताने लावलेली कृष्णकमळाची वेल कामट्यांच्या कुंपणावर भरपूर पालवी पसरवून जिवंत आहे — ती फुलांनी बहरून गेली आहे.
रासमणीचा मुलगा
आज त्या मुलाने जीव लावून जपलेल्या बागेकडे पाहताना त्यांचा जीव जणू कंठाशी आला. आता आशा करण्यासारखे काहीच उरले नाही; उन्हाळ्यात — पूजेच्या दिवसांत — कॉलेजला सुट्टी लागते, पण ज्याच्यासाठी त्यांचे गरीब घर ओस पडले आहे, तो आता कधीच, कोणत्याही सुट्टीत घरी परतणार नाही. 'अरे माझ्या बाळा रे!' म्हणत भवानीचरण तिथेच जमिनीवर बसले. कालीपद आपल्या बापाचे दारिद्र्य दूर करण्यासाठीच कलकत्त्याला गेला होता; पण या जगात तो या म्हाताऱ्याला केवढे निष्कांचन करून निघून गेला! — बाहेर पाऊस आणखीच जोर धरू लागला. इतक्यात अंधारात गवतपानांत पावलांचा आवाज ऐकू आला. भवानीचरणांच्या छातीत धस्स झाले. ज्याची कोणत्याही प्रकारे आशा करता येत नाही, तीच आशा जणू ते करून बसले. त्यांना वाटले, कालीपदच जणू बाग पाहायला आला आहे. पण पाऊस तर मुसळधार कोसळतोय — तो भिजेल ना! — या अशक्य काळजीने त्यांचे मन आतल्या आत अस्वस्थ झाले असतानाच, कुणीतरी गजांच्या बाहेर त्यांच्या खोलीसमोर येऊन क्षणभर उभे राहिले. शालीने त्याने डोके झाकून घेतले आहे — त्याचा चेहरा ओळखायला मार्ग नाही. पण तो जणू कालीपदइतकाच उंच असावा. 'आलास बाळा!' म्हणत भवानीचरण घाईघाईने उठून बाहेरचे दार उघडायला गेले. दार उघडून बागेत येऊन ते त्या खोलीसमोर पोहोचले. तिथे कुणीच नाही. त्या पावसात सगळ्या बागेभर ते फिरले; कुणीच दिसले नाही. त्या मध्यरात्री अंधारात उभे राहून त्यांनी फुटक्या आवाजात एकदा 'कालीपद' म्हणून मोठ्याने हाक मारली — कुणाचीच ओ आली नाही. त्या हाकेने नटू नोकर गोठ्यातून बाहेर आला, आणि मोठ्या मिनतवारीने म्हाताऱ्याला घरात घेऊन आला.
रासमणीचा मुलगा
दुसऱ्या दिवशी सकाळी नटू खोली झाडायला गेला, तेव्हा त्याला दिसले, गजांच्या अगदी समोर खोलीच्या आत एका पुडक्यात बांधलेली काहीतरी वस्तू पडलेली आहे. ती त्याने आणून भवानीचरणांच्या हाती दिली. भवानीचरणांनी उघडून पाहिले — एखाद्या जुन्या दस्तऐवजासारखे काहीतरी. चष्मा काढून डोळ्यांना लावून जरासे वाचताच ते घाईघाईने धावत रासमणींसमोर जाऊन उभे राहिले आणि तो कागद त्यांच्यापुढे उलगडून धरला. रासमणींनी विचारले, 'ते काय हो?' भवानीचरण म्हणाले, 'तेच ते मृत्युपत्र.' रासमणींनी विचारले, 'कुणी दिलं?' भवानीचरण म्हणाले, 'काल रात्री तो आला होता — तो देऊन गेला.' रासमणींनी विचारले, 'आता याचं काय करायचं?' भवानीचरण म्हणाले, 'आता मला याची काहीच गरज नाही.' असे म्हणून त्यांनी तो दस्तऐवज फाडून त्याच्या चिंधड्या केल्या. * * * ही बातमी आळीत पसरली, तेव्हा बगलाचरण मान डोलावून ऐटीत म्हणाला, 'मी म्हटलं नव्हतं, कालीपदच्याच हातून मृत्युपत्र परत मिळेल म्हणून?' रामचरण वाणी म्हणाला, 'पण दादाठाकूर, काल रात्री दहाची गाडी इस्टेशनावर आली, तेव्हा एक देखणासा बाबू माझ्या दुकानात आला आणि चौधरींच्या घराचा रस्ता विचारू लागला — मी त्याला रस्ता दाखवला. त्याच्या हातात काहीतरी होतं, असं वाटलं.' 'अरे हट्!' असे म्हणून बगलाचरणाने ती गोष्ट साफ उडवून लावली.