रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
सांगाडा
आम्ही तिघे बालमित्र ज्या खोलीत झोपत असू, तिच्या शेजारच्या खोलीच्या भिंतीवर एक अख्खा मानवी सांगाडा टांगलेला असे. रात्री वाऱ्याने त्याची हाडे खटखट वाजत हलत. दिवसा मात्र ती हाडे आम्हालाच हलवावी लागत. त्या काळी आम्ही पंडितजींकडे मेघनादवध काव्य आणि कॅम्बेल स्कूलच्या एका विद्यार्थ्याकडे अस्थिविद्या शिकत होतो. आम्हाला एकदम सर्व विद्यांत पारंगत करून सोडावे, अशी आमच्या पालकांची इच्छा होती. त्यांचा हेतू कितपत सफल झाला, हे आम्हाला ओळखणाऱ्यांना सांगण्याची गरज नाही, आणि जे ओळखत नाहीत त्यांच्यापासून ते लपवून ठेवलेलेच बरे. त्यानंतर पुष्कळ काळ लोटला. दरम्यान त्या खोलीतून सांगाडा आणि आमच्या डोक्यातून अस्थिविद्या कुठे स्थलांतरित झाली, याचा शोध घेऊनही पत्ता लागत नाही. काही दिवसांपूर्वी एका रात्री, कुठल्याशा कारणाने इतरत्र जागा नसल्यामुळे, मला त्या खोलीत झोपावे लागले. सवय नसल्याने झोप येईना. या कुशीवरून त्या कुशीवर वळता वळता चर्चच्या घड्याळातले मोठमोठे ठोके जवळजवळ सगळेच वाजून गेले. इतक्यात खोलीच्या कोपऱ्यात जळत असलेला तेलाचा दिवा सुमारे पाच मिनिटे शेवटच्या धापा टाकत टाकत अखेर पूर्ण विझून गेला. याआधीच आमच्या घरात एक-दोन दुर्घटना घडून गेल्या होत्या. त्यामुळे तो दिवा विझताच सहजच मनात मृत्यूचा विचार आला. वाटले, या मध्यरात्री एक दीपज्योत चिरंतन अंधारात विलीन झाली; निसर्गाच्या लेखी ती जशी, तशाच माणसांच्या लहान लहान प्राणज्योतीही कधी दिवसा, कधी रात्री अचानक विझतात आणि विस्मृतीत जातात.
सांगाडा
हळूहळू त्या सांगाड्याची आठवण झाली. तो जिवंत असतानाच्या दिवसांची कल्पना करता करता एकाएकी वाटले, कुणीतरी सचेतन जीव अंधारात खोलीच्या भिंती चाचपडत माझ्या मच्छरदाणीभोवती फेऱ्या घालतो आहे; त्याच्या जलद जलद श्वासांचा आवाज ऐकू येतो आहे. ते जणू काहीतरी शोधते आहे, ते सापडत नाही, आणि म्हणून अधिकच वेगाने खोलीभर घिरट्या घालते आहे. ही सगळी माझ्या जागरणाने तापलेल्या मेंदूची कल्पना आहे, आणि माझ्याच डोक्यात घुमत धावणारे रक्तच जलद पावलांसारखे वाजते आहे, हे मला पक्के कळत होते. तरीही अंगावर काटा उभा राहिला. हे निष्कारण भय जोर करून मोडून काढावे म्हणून मी मोठ्याने विचारले, 'कोण?' पावलांचा आवाज माझ्या मच्छरदाणीजवळ येऊन थांबला आणि उत्तर ऐकू आले, 'मी. माझा तो सांगाडा कुठे गेला, तेच शोधत आहे.' मी विचार केला, आपल्याच कल्पनेने घडवलेल्या गोष्टीपुढे घाबरलेले दिसणे काही बरे नव्हे. कुशीची उशी घट्ट कवटाळून, जुन्या ओळखीच्या माणसाशी बोलावे तशा अगदी सहज सुरात मी म्हणालो, 'या मध्यरात्री चांगलंच काम काढलंस! पण त्या सांगाड्याची तुला आता काय गरज?' अंधारात, मच्छरदाणीच्या अगदी जवळून उत्तर आले, 'काय म्हणतोस! माझ्या छातीची हाडं त्यातच तर होती. माझं सव्वीस वर्षांचं तारुण्य त्याच्याभोवती फुललं होतं. ते एकदा पाहावंसं वाटणार नाही का?' मी लगेच म्हणालो, 'हो, म्हणणं रास्तच आहे. बरं, तर तू जा आणि शोध घे. मी जरा झोपायचा प्रयत्न करतो.'
सांगाडा
तो आवाज म्हणाला, 'तू एकटाच आहेस वाटतं? मग जरा बसू. थोड्या गप्पा मारू या. पस्तीस वर्षांपूर्वी मीसुद्धा माणसांजवळ बसून माणसांशी गप्पा मारत असे. ही पस्तीस वर्षं स्मशानातल्या वाऱ्यासंगे हू हू करत भटकणं, एवढंच माझं काम. आज तुझ्याजवळ बसून पुन्हा एकदा माणसासारख्या गप्पा मारू या.' मच्छरदाणीजवळ कुणीतरी बसल्याचे मला जाणवले. आता इलाज नाही हे पाहून मी चांगल्याच उत्साहाने म्हणालो, 'हे बरं झालं. मन अगदी प्रसन्न होईल अशी एखादी गोष्ट सांग.' उत्तर आले, 'सगळ्यांत गमतीची गोष्ट ऐकायची असली, तर माझ्याच आयुष्याची सांगू.' चर्चच्या घड्याळात टण् टण् करून दोन वाजले. 'मी माणूस होते आणि लहान होते, तेव्हा एका व्यक्तीची मला यमासारखी भीती वाटे. ते माझे पती. गळ टाकून पकडलेल्या माशाला जसं वाटत असेल, तसंच मलाही वाटे. म्हणजे, कुणीतरी पूर्णपणे अनोळखी प्राणी मला गळात ओवून माझ्या जन्माच्या शीतल, खोल जलाशयातून हिसडा मारून ओढून नेतो आहे, आणि त्याच्या हातून सुटकेचा कुठलाच मार्ग नाही. लग्नानंतर दोनच महिन्यांत माझे पती वारले, आणि माझ्या नातलगांनी माझ्या वतीने भरपूर शोक केला, विलाप केला. माझ्या सासऱ्यांनी पुष्कळशी लक्षणं पडताळून पाहिली आणि सासूबाईंना सांगितलं, "शास्त्रात जिला विषकन्या म्हणतात, ती हीच मुलगी." ते बोलणं मला स्पष्ट आठवतं. ऐकतो आहेस ना? कसं वाटतंय?' मी म्हणालो, 'छान. गोष्टीची सुरुवात मोठी गमतीची आहे.' 'मग ऐक. मी आनंदानं माहेरी परत आले. हळूहळू वय वाढू लागलं. लोक हे माझ्यापासून लपवायचा प्रयत्न करत, पण मला स्वतःला पुरतं ठाऊक होतं, की माझ्यासारखी रूपवती अशी कुठेही सहजासहजी सापडत नाही. तुला काय वाटतं?' 'अगदी शक्य आहे. पण मी तुला कधी पाहिलेलं नाही.'
सांगाडा
'पाहिलं नाहीस! का बरं? माझा तो सांगाडा! ही ही ही ही! थट्टा करतेय मी. तुला कसं पटवून देऊ, की त्या दोन रिकाम्या खोबणींत मोठे मोठे, लांबसडक, काळेभोर दोन डोळे होते; लाल ओठांवर जे मंद हसू माखलेलं असे, त्याची आताच्या उघड्या दातांच्या विकट हास्याशी काही तुलनाच होऊ शकत नाही; आणि त्या मोजक्या लांब, सुक्या हाडांच्या तुकड्यांवर इतकं लालित्य, इतकं लावण्य, तारुण्याची इतकी कठीण-कोमल, घाटदार परिपूर्णता रोज नव्यानं उमलत होती. हे तुला सांगायला गेलं की हसूही येतं आणि रागही येतो. माझ्या त्या शरीरावरून अस्थिविद्या शिकता येईल, यावर त्या काळचे मोठमोठे डॉक्टरसुद्धा विश्वास ठेवत नसत. मला ठाऊक आहे, एका डॉक्टरांनी आपल्या एका जिवलग मित्रापाशी मला सोनचाफा म्हटलं होतं. त्याचा अर्थ असा, की जगातली बाकी सारी माणसं अस्थिविद्येची आणि शरीरशास्त्राची उदाहरणं होती, मी एकटीच सौंदर्याचं रूप घेतलेल्या फुलासारखी होते. सोनचाफ्याच्या आत कधी सांगाडा असतो का? 'मी चालत असे तेव्हा माझं मलाच जाणवायचं, की हिऱ्याचा एखादा तुकडा हलवला की त्याच्या चारी बाजूंनी जसा प्रकाश लखलखून उठतो, तशा माझ्या देहाच्या प्रत्येक हालचालीबरोबर सौंदर्याच्या लकेरी सहज लाटांसारख्या चारी दिशांना फुटत. कधीकधी मी कितीतरी वेळ माझेच दोन हात न्याहाळत बसे. जगातल्या साऱ्या उद्दाम पौरुषाच्या तोंडात लगाम घालून त्याला गोडीनं आपल्या ताब्यात वळवून घेतील, असे दोन हात. सुभद्रा अर्जुनाला बरोबर घेऊन आपला विजयरथ विस्मित झालेल्या तिन्ही लोकांतून दिमाखानं हाकत घेऊन गेली, तेव्हा तिचेही बहुधा असेच दोन नाजूक, सुडौल बाहू, आरक्त तळवे आणि लावण्याच्या ज्योतीसारखी बोटं असतील.
सांगाडा
'पण माझ्या त्या निर्लज्ज, निर्वस्त्र, निरलंकार, चिरवृद्ध सांगाड्यानं तुझ्यापाशी माझ्याविरुद्ध खोटी साक्ष दिली आहे. तेव्हा मी असहाय होते, निरुत्तर होते. म्हणून जगात सगळ्यांपेक्षा जास्त राग मला तुझा येतो. वाटतं, माझं ते सोळा वर्षांचं जिवंत, तारुण्याच्या उष्म्यानं तापलेलं, आरक्त रूप एकदा तुझ्या डोळ्यांसमोर उभं करावं, पुष्कळ काळासाठी तुझ्या दोन्ही डोळ्यांची झोप उडवावी, तुझ्या अस्थिविद्येला अस्थिर करून देशोधडीला लावावं.' मी म्हणालो, 'तुला अंग असतं, तर तुझ्या अंगाला हात लावून शपथेवर सांगितलं असतं, की त्या विद्येचा लवलेशही माझ्या डोक्यात उरलेला नाही. आणि तुझं ते त्रिभुवन मोहून टाकणारं, पूर्ण बहरलेल्या तारुण्याचं रूप रात्रीच्या अंधाऱ्या पटावर झळाळत उमटलं आहे. आणखी काही सांगायची गरज नाही.' 'मला कुणी सखी नव्हती. दादांनी लग्न न करण्याची प्रतिज्ञा केली होती. अंतःपुरात मी एकटी. बागेत झाडाखाली मी एकटी बसून कल्पना करत असे, की सारं जग माझ्यावरच प्रेम करतं आहे, सारे तारे माझ्याकडेच टक लावून पाहताहेत, वारा काहीतरी निमित्त काढून पुन्हा पुन्हा दीर्घ उसासे टाकत माझ्या अंगाजवळून निघून जातो आहे, आणि ज्या गवताच्या आसनावर मी दोन्ही पाय पसरून बसले आहे, त्याला जर संवेदना असती तर ते पुन्हा बेशुद्ध झालं असतं. जगातले सारे तरुण पुरुष त्या गवताच्या पुंजक्यांचं रूप घेऊन, घोळका करून निःशब्दपणे माझ्या पायाशी उभे आहेत, अशी मी कल्पना करत असे; आणि मनात विनाकारण कसलीशी वेदना जाणवत असे. 'दादांचे मित्र शशिशेखर मेडिकल कॉलेजातून पास होऊन आले, तेव्हा तेच आमच्या घरचे डॉक्टर झाले. याआधी मी त्यांना आडोशाआडून कितीदा तरी पाहिलं होतं. दादा मोठे विलक्षण गृहस्थ होते. जगाकडे जणू ते कधी नीट डोळे उघडून पाहतच नसत. संसार जणू त्यांना पुरेसा मोकळा वाटत नव्हता, म्हणून ते सरकत सरकत अगदी कडेला जाऊन राहिले होते.
सांगाडा
'त्यांच्या मित्रांमध्ये एकच, शशिशेखर. त्यामुळे बाहेरच्या तरुणांपैकी मी याच शशिशेखरला नेहमी पाहत असे; आणि संध्याकाळी फुलझाडाखाली मी सम्राज्ञीचं आसन ग्रहण करी, तेव्हा जगातली सारी पुरुषजात शशिशेखरचं रूप घेऊन माझ्या चरणी येई. ऐकतो आहेस ना? काय वाटतंय?' मी उसासा टाकून म्हणालो, 'वाटतंय, शशिशेखर म्हणून जन्मलो असतो तर किती बरं झालं असतं.' 'आधी सगळं ऐकून घे. एका पावसाळी दिवशी मला ताप आला होता. डॉक्टर तपासायला आले. तीच आमची पहिली भेट. 'मी खिडकीकडे तोंड करून पडले होते, संध्याकाळची लाल आभा पडून आजारी चेहऱ्याचा फिकेपणा दूर व्हावा म्हणून. खोलीत शिरताच डॉक्टरांनी एकदा माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं, तेव्हा मीही मनोमन डॉक्टर होऊन कल्पनेत माझ्याच चेहऱ्याकडे पाहिलं. त्या संध्याप्रकाशात मऊ उशीवर एक किंचित कोमेजलेला, फुलासारखा नाजूक चेहरा; सुटलेल्या भुरभुरत्या बटा कपाळावर रुळलेल्या, आणि लाजेनं झुकलेल्या मोठ्या मोठ्या पापण्यांची सावली गालांवर पसरलेली. 'डॉक्टर नम्र, हळू आवाजात दादांना म्हणाले, "एकदा हात पाहावा लागेल." 'मी पांघरुणातून माझा थकलेला, गोलसर हात बाहेर काढून दिला. एकदा हाताकडे पाहिलं; निळ्या काचेच्या बांगड्या घालता आल्या असत्या, तर तो आणखी शोभून दिसला असता. रोग्याचा हात हातात घेऊन नाडी पाहताना एखादा डॉक्टर असा चाचरलेला मी याआधी कधी पाहिला नव्हता. अगदी गोंधळून, कापऱ्या बोटांनी त्यांनी नाडी पाहिली. त्यांना माझ्या तापाची उष्णता कळली, आणि मलाही त्यांच्या अंतरीची नाडी कशी चालली आहे, याचा थोडासा अंदाज आला. विश्वास बसत नाही?' मी म्हणालो, 'अविश्वासाचं काही कारण दिसत नाही. माणसाची नाडी सगळ्या अवस्थांत सारखी चालत नाही.'
सांगाडा
'कालांतरानं आणखी दोन-चारदा आजारी पडून बरी झाल्यावर मी पाहिलं, की माझ्या त्या संध्याकाळच्या मनातल्या दरबारातली जगातल्या कोट्यवधी पुरुषांची संख्या कमी कमी होत अखेर एकावर येऊन ठेपली आहे; माझं जग जवळजवळ ओस पडलं आहे. जगात फक्त एक डॉक्टर आणि एक रोगी उरले. 'संध्याकाळी मी गुपचूप एक वासंती रंगाची साडी नेसत असे, नीटनेटका अंबाडा घालून त्यावर मोगऱ्याचा गजरा माळत असे, आणि हातात एक आरसा घेऊन बागेत जाऊन बसत असे. 'का? स्वतःला पाहून मन तृप्त होत नाही का? खरंच नाही होत. कारण मी काही स्वतःला स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नव्हते. तेव्हा मी एकटी बसून दोघं होत असे. तेव्हा मी डॉक्टर होऊन स्वतःला पाहत असे, मोहून जात असे, प्रेम करत असे, लाड करत असे; आणि तरीही जिवाच्या आत एक दीर्घ उसासा संध्याकाळच्या वाऱ्यासारखा हू हू करत उठे. 'तेव्हापासून मी एकटी राहिले नाही. चालताना खाली नजर लावून पाहत असे, की पायांची बोटं जमिनीवर कशी पडतात, आणि विचार करत असे, आमच्या नव्यानं परीक्षा उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांना हे पाऊल कसं वाटत असेल. भर दुपारी खिडकीबाहेर ऊन रणरणत असे, कुठे चाहूल नाही; मधूनच एखादी घार दूर आकाशात ओरडत उडून जाई; आणि आमच्या बागेच्या भिंतीबाहेरून खेळणीवाला सूर लावून "खेळणी घ्या खेळणी, बांगड्या घ्या" अशी हाळी देत निघून जाई. मी एक शुभ्र चादर अंथरून स्वतःच्या हातांनी बिछाना करून पडत असे; एक उघडा बाहू मऊ बिछान्यावर जणू बेफिकीरपणे पसरून विचार करत असे, की हा हात असा, याच ढबीत, जणू कुणीतरी पाहिला; जणू कुणीतरी दोन्ही हातांनी उचलून घेतला; जणू कुणीतरी त्याच्या आरक्त तळव्यावर एक चुंबन ठेवून पुन्हा हळूहळू परत चालला आहे. समज, गोष्ट इथेच संपली, तर कशी वाटेल?'
सांगाडा
मी म्हणालो, 'वाईट नाही. जरा अपुरी राहते खरी, पण तेवढं आपल्या मनाशी पूर्ण करत करत उरलेली रात्र छान निघून जाईल.' 'पण मग गोष्ट फारच गंभीर होऊन बसते ना. तिच्यातली थट्टा मग राहते कुठे? तिच्या आतला सांगाडा आपले सगळे दात विचकून दिसतो कुठे? 'पुढे ऐक. थोडा जम बसताच डॉक्टरांनी आमच्या घराच्या तळमजल्यावर आपला दवाखाना उघडला. तेव्हा मी त्यांना अधूनमधून हसत हसत औषधांबद्दल, विषांबद्दल, माणूस कशानं सहज मरतो, अशा गोष्टी विचारत असे. डॉक्टरकीचा विषय निघाला की डॉक्टरांची जीभ मोकळी सुटे. ऐकता ऐकता मृत्यू जणू घरातल्या ओळखीच्या माणसासारखा झाला. प्रेम आणि मरण, फक्त याच दोन गोष्टी मला जगभर दिसू लागल्या. 'माझी गोष्ट जवळजवळ संपत आली आहे, फार काही उरलं नाही.' मी हळू आवाजात म्हणालो, 'रात्रही जवळजवळ संपत आली.' 'काही दिवसांपासून मी पाहत होते, डॉक्टरबाबू फार अन्यमनस्क असतात, आणि माझ्यापुढे जणू फारच ओशाळलेले. एके दिवशी पाहिलं, त्यांनी जरा जास्तच नटूनथटून दादांकडून त्यांची दोन घोड्यांची गाडी उसनी घेतली; रात्री कुठेतरी जायचं होतं. 'मला राहवलं नाही. दादांकडे जाऊन इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी विचारलं, "का रे दादा, डॉक्टरबाबू आज गाडी घेऊन कुठे चाललेत?" 'दादा थोडक्यात म्हणाले, "मरायला." 'मी म्हणाले, "नाही, खरं सांग ना." 'त्यांनी आधीपेक्षा जरा उलगडून सांगितलं, "लग्न करायला." 'मी म्हणाले, "खरंच की काय?" आणि खूप हसू लागले. 'हळूहळू कळलं, की या लग्नात डॉक्टरांना बारा हजार रुपये मिळणार आहेत. 'पण माझ्यापासून ही बातमी लपवून माझा अपमान करण्यात काय अर्थ होता? मी काय त्यांचे पाय धरून म्हटलं होतं, की असं काही केलंत तर मी ऊर फुटून मरेन? पुरुषांवर विश्वास ठेवायची सोयच नाही. जगात मी एकच पुरुष पाहिला, आणि एका क्षणात सगळं ज्ञान मिळवलं.
सांगाडा
'रोगी तपासून डॉक्टर संध्याकाळच्या आधी घरी आले, तेव्हा मी भरपूर हसत हसत म्हणाले, "काय डॉक्टरसाहेब, आज म्हणे तुमचं लग्न आहे?" 'माझी ही प्रसन्नता पाहून डॉक्टर नुसते ओशाळले असं नाही, तर फारच खिन्न झाले. 'मी विचारलं, "वाजंत्री-बिजंत्री काहीच नाही ते?" 'हे ऐकून ते किंचित उसासा टाकून म्हणाले, "लग्न ही गोष्ट काय इतकी आनंदाची असते?" 'ते ऐकून मी हसून हसून बेजार झाले. असं बोलणं तर मी कधी ऐकलंच नव्हतं. मी म्हणाले, "ते काही चालणार नाही. वाजंत्री हवी, रोषणाई हवी." 'दादांच्या इतकी मागे लागले, की दादांनी तेव्हाच रीतसर उत्सवाची तयारी सुरू केली. 'मी सारखी बोलत राहिले, नवी नवरी घरी आल्यावर काय होईल, मी काय काय करीन. मी विचारलं, "बरं डॉक्टरसाहेब, तेव्हाही तुम्ही रोग्यांच्या नाड्या दाबत हिंडणार का?" 'ही ही ही ही! माणसाचं, त्यातही पुरुषाचं, मन डोळ्यांना दिसत नाही हे खरं; तरी मी शपथेवर सांगू शकते, की ते शब्द डॉक्टरांच्या काळजात भाल्यासारखे रुतत होते. 'मुहूर्त रात्री उशिरा होता. संध्याकाळी डॉक्टर गच्चीवर बसून दादांबरोबर एक-दोन पेले दारू घेत होते. दोघांनाही एवढी सवय होती. हळूहळू आकाशात चंद्र उगवला. 'मी हसत हसत येऊन म्हणाले, "डॉक्टरसाहेब, विसरलात की काय? निघायची वेळ झाली की." 'इथे एक किरकोळ गोष्ट सांगायला हवी. दरम्यान मी गुपचूप दवाखान्यात जाऊन थोडीशी पूड आणून ठेवली होती, आणि संधी साधून, कुणाच्या लक्षात न येता, त्यातली थोडी डॉक्टरांच्या पेल्यात मिसळली होती. कोणती पूड खाल्ली की माणूस मरतो, हे मी डॉक्टरांकडूनच शिकले होते.
सांगाडा
'डॉक्टर एका घोटात पेला संपवून, माझ्याकडे काळीज चिरणारी नजर टाकत काहीशा ओलसर, सद्गदित स्वरात म्हणाले, "तर मग, चाललो मी." 'सनई वाजू लागली. मी एक बनारसी शालू नेसले; पेटाऱ्यात ठेवलेले जेवढे दागिने होते, ते सगळे काढून अंगावर घातले; भांगात ठसठशीत सिंदूर भरला. माझ्या त्या बकुळीच्या झाडाखाली बिछाना अंथरला. 'फार सुंदर रात्र होती. लख्ख चांदणं पडलं होतं. झोपलेल्या जगाचा शीण हरत दक्षिणेचा वारा वाहत होता. जुई आणि मोगऱ्याच्या सुगंधानं सारी बाग दरवळली होती. 'सनईचा सूर हळूहळू दूर निघून गेला, चांदणं अंधारून येऊ लागलं, ही झाडं-पानं, हे आकाश आणि जन्मापासूनचं घरदार घेऊन जग माझ्या चारी बाजूंनी एखाद्या मायावी भासासारखं विरून जाऊ लागलं, तेव्हा मी डोळे मिटले आणि हसले. 'इच्छा होती, लोक येऊन मला पाहतील तेव्हा हे हसू एखाद्या रंगीत नशेसारखं माझ्या ओठांशी रेंगाळत राहावं. इच्छा होती, माझ्या अनंत रात्रीच्या शेजघरात मी हळूहळू पाऊल टाकीन, तेव्हा हे हसू इथूनच ओठांवर घेऊन जावं. कुठलं शेजघर! कुठे माझा तो नवरीचा साज! माझ्याच आतून आलेल्या खटखट आवाजानं जागी होऊन पाहिलं, तो माझ्यावर तीन मुलगे अस्थिविद्या शिकताहेत! 'छातीत जिथे सुखदुःख धडधडत असे, आणि तारुण्याच्या पाकळ्या रोज एकेक करून उमलत असत, तिथे छडीनं दाखवत मास्तर कोणत्या हाडाचं काय नाव ते शिकवतो आहे. आणि ते जे अखेरचं हसू मी ओठांशी फुलवलं होतं, त्याची काही खूण तुला दिसली होती का? ... 'गोष्ट कशी वाटली?' मी म्हणालो, 'गोष्ट मोठी मन प्रसन्न करणारी आहे.' इतक्यात पहिला कावळा ओरडला. मी विचारले, 'अजून आहेस का?' काहीच उत्तर मिळाले नाही. खोलीत पहाटेचा उजेड शिरला.