रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
समाप्ती
१ अपूर्वकृष्ण बी. ए. पास होऊन कलकत्त्याहून आपल्या गावी परत येत आहेत. नदी लहानशी आहे. पावसाळा सरला की जवळजवळ कोरडी पडते. आता श्रावणाच्या अखेरीस ती पाण्यानं काठोकाठ भरून गावाच्या कुंपणाचं आणि बांबूच्या बेटांच्या पायथ्याचं अगदी चुंबन घेऊ लागली आहे. कितीतरी दिवसांच्या दाट पावसानंतर आज ढगांतून मोकळ्या झालेल्या आकाशात ऊन पडलं आहे. नावेत बसलेल्या अपूर्वकृष्णाच्या मनातलं चित्र जर आपल्याला पाहता आलं असतं, तर दिसलं असतं की तिथेही या तरुणाची मनोनदी नव्या पावसानं दुथडी भरून उन्हात लखलखते आहे आणि वाऱ्यावर हेलकावे घेत खळखळते आहे. नाव नेहमीच्या घाटाला लागली. नदीकाठावरून झाडांच्या आडून अपूर्वच्या घराची पक्की गच्ची दिसत होती. अपूर्व येणार हे घरी कुणालाच ठाऊक नव्हतं, म्हणून घाटावर कुणी आलं नव्हतं. नावाडी पिशवी उचलायला पुढे झाला, तेव्हा अपूर्वनं त्याला थांबवलं, आणि स्वतःच पिशवी हातात घेऊन तो मोठ्या आनंदात घाईघाईनं खाली उतरला. उतरला मात्र, काठावर निसरडं होतं, पिशवीसकट अपूर्व चिखलात आपटला. तो पडतो न पडतो तोच कुठूनतरी एका गोड, उंच गळ्यातून हास्याची एक नितळ लहर उसळली आणि जवळच्या पिंपळावरचे पक्षी दचकून उठले. अपूर्व अतिशय शरमला, घाईघाईनं सावरून त्यानं वळून पाहिलं. पाहतो तो, काठावर सावकाराच्या नावेतून नव्या विटा उतरवून त्यांची रास रचून ठेवलेली होती, आणि त्या राशीवर बसलेली एक मुलगी हसता हसता आता शंभर तुकडे होऊन विखुरणार की काय असं वाटत होतं. अपूर्वनं ओळखलं: त्यांच्याच नव्या शेजारणीची मुलगी, मृण्मयी. दूर मोठ्या नदीच्या काठी यांचं घर होतं; नदीच्या धुपेत तिथली जमीन गेली, म्हणून गाव सोडून दोन-तीन वर्षांपूर्वी ही मंडळी या गावी येऊन राहू लागली होती.
समाप्ती
या मुलीच्या बदलौकिकाच्या गोष्टी पुष्कळ कानावर येतात. गावातले पुरुष तिला मायेनं 'वेडी' म्हणतात, पण गावच्या गृहिणी तिच्या उच्छृंखल स्वभावाला नेहमी धास्तावलेल्या, काळजीत, भेदरलेल्या असतात. गावातल्या सगळ्या मुलांबरोबरच तिचे खेळ; आपल्या वयाच्या मुलींना ती तुच्छच लेखते. पोरांच्या राज्यात ही मुलगी म्हणजे बारगिरांची एक छोटीशी धाडच म्हणायला हरकत नाही. बापाची लाडकी लेक ना, म्हणून तर एवढा तिचा दरारा. याबद्दल मृण्मयीची आई मैत्रिणींजवळ नवऱ्याच्या नावानं सतत तक्रार करायला सोडत नसे; तरीही, बापाचा तिच्यावर जीव, बाप जवळ असता तर मृण्मयीच्या डोळ्यांतला एक थेंबसुद्धा त्याच्या काळजाला फार लागला असता, हे मनात येऊन, परगावी असलेल्या नवऱ्याची आठवण करून, मृण्मयीच्या आईला लेकीला कधीही रडवता येत नसे. मृण्मयी रंगानं सावळी; लहान कुरळे केस पाठीपर्यंत रुळलेले. चेहऱ्यावरचा भाव अगदी मुलग्यासारखा. मोठमोठ्या दोन काळ्याभोर डोळ्यांत ना लाज, ना भीती, ना नखऱ्याचा-हावभावाचा लवलेश. अंगानं उंच, भरलेली, निरोगी, धडधाकट; पण तिचं वय जास्त की कमी हा प्रश्न कुणाच्याच मनात उठत नाही; उठता, तर अजून ती बिनलग्नाची आहे म्हणून लोकांनी तिच्या आईबापाला दोष दिला असता. परमुलखातल्या जमीनदाराची नाव कधी काळी ज्या दिवशी घाटाला लागते, त्या दिवशी गावचे लोक आदरानं धांदलून जातात, घाटावरच्या बायकांच्या मुखांच्या रंगमंचावर एकदम नाकाच्या शेंड्यापर्यंत पडदा पडतो; पण मृण्मयी कुठूनतरी एका नागड्या पोराला कडेवर घेऊन, कुरळे केस पाठीवर उडवीत धावत घाटावर येऊन हजर. जिथे पारधी नाही, कुठलं संकट नाही, अशा मुलखातल्या हरणाच्या पाडसासारखी निर्भय कुतूहलानं उभी राहून ती टक लावून पाहत राहते, आणि शेवटी आपल्या टोळीतल्या पोरांकडे परत जाऊन या नव्या आलेल्या प्राण्याच्या चालीरीतींचं भरपूर तिखटमीठ लावून वर्णन करते.
समाप्ती
आपल्या अपूर्वनं याआधी सुट्टीत घरी आल्यावर ही बंधन नसलेली पोरगी दोन-चारदा पाहिली होती, आणि फुरसतीच्या वेळी, किंबहुना कामाच्या वेळीही, तिचा विचार केला होता. जगात पुष्कळ चेहरे डोळ्यांसमोरून जातात, पण एखादाच चेहरा काही न सांगता-सवरता थेट मनात जाऊन उतरतो. ते केवळ सौंदर्यामुळे नव्हे; त्यात आणखी काहीतरी एक गुण असतो. तो गुण बहुधा पारदर्शकता. बहुतेक चेहऱ्यांत माणसाचा अंतरीचा स्वभाव स्वतःला स्पष्टपणे प्रकट करू शकत नाही; पण ज्या चेहऱ्यातून तो अंतरीच्या गुहेत राहणारा गूढ माणूस बिनदिक्कत बाहेर येऊन दर्शन देतो, तो चेहरा हजारांत उठून दिसतो आणि एका क्षणात मनावर ठसतो. या मुलीच्या चेहऱ्यात, डोळ्यांत एक अवखळ, न जुमानणारी स्त्रीप्रकृती मोकळ्या, वेगवान रानहरिणीसारखी नेहमी डोकावत असते, खेळत असते; म्हणूनच हा जिवंतपणानं सळसळणारा चेहरा एकदा पाहिला की सहजासहजी विसरता येत नाही. वाचकांना सांगायला नकोच, की मृण्मयीचं ते खट्याळ हसू कितीही गोड असलं, तरी बिचाऱ्या अपूर्वला ते जरासं जाचकच झालं. त्यानं घाईघाईनं पिशवी नावाड्याच्या हाती सोपवली आणि लाल झालेल्या चेहऱ्यानं भरभर घराकडे चालू लागला. सगळी मांडणी फार सुंदर जमून आली होती. नदीचा काठ, झाडांची सावली, पक्ष्यांचं गाणं, सकाळचं ऊन, वय वर्षं वीस; विटांचा ढीग तेवढा काही सांगण्याजोगा नाही हे खरं, पण त्यावर जी बसली होती तिनं त्या कोरड्या, कठीण आसनावरही एक मनोहर शोभा पसरली होती. हाय, अशा देखाव्यात पहिलंच पाऊल टाकताच सारं काव्य प्रहसन होऊन जावं, यापेक्षा नियतीची निष्ठुरता आणखी कोणती असू शकेल! २ त्या विटांच्या शिखरावरून वाहत येणारं हसू ऐकत ऐकत, चादर आणि पिशवी चिखलानं माखलेली, झाडांच्या सावलीतून अपूर्व घरी जाऊन पोचला.
समाप्ती
मुलगा अचानक आलेला पाहून त्याची विधवा आई आनंदानं फुलून गेली. ताबडतोब खवा, दही, रोहू मासा मिळवायला जवळ-दूर माणसं धावली, आणि आळीत शेजारीपाजारीही एकच गडबड उडाली. जेवण झाल्यावर आईनं अपूर्वच्या लग्नाचा विषय काढला. अपूर्व त्याच्या तयारीतच होता. कारण प्रस्ताव फार पूर्वीपासून होताच, पण मुलानं नव्या मताचा नवा हेका धरून हट्ट मांडला होता की 'बी. ए. पास झाल्याशिवाय लग्न करणार नाही.' इतके दिवस आई त्यासाठीच थांबली होती; तेव्हा आता आणखी कोणतीही सबब सांगणं व्यर्थ होतं. अपूर्व म्हणाला, 'आधी मुलगी पाहू या, मग ठरवू.' आई म्हणाली, 'मुलगी पाहून झाली आहे, त्याची काळजी तुला करायला नको.' पण ती काळजी स्वतःच करायची अपूर्वची तयारी होती; तो म्हणाला, 'मुलगी पाहिल्याशिवाय मी लग्न करू शकणार नाही.' आईला वाटलं, असलं जगावेगळं बोलणं कधी कुणी ऐकलं नसेल; पण तिनं होकार दिला. त्या रात्री दिवा मालवून अपूर्व अंथरुणावर पडला, तेव्हा पावसाळी मध्यरात्रीच्या सगळ्या आवाजांच्या आणि सगळ्या निःस्तब्धतेच्या पलीकडच्या टोकाहून, त्या एकाकी, निद्राहीन शय्येपर्यंत, एका उसळत्या, उंच, मधुर कंठाचं हसू त्याच्या कानात सारखं वाजत राहिलं. सकाळचं ते घसरणं कुठल्या तरी उपायानं सुधारून घ्यायला हवं, या विचारानं मन स्वतःलाच सारखं टोचत राहिलं. त्या पोरीला कुठे ठाऊक होतं की 'मी अपूर्वकृष्ण, पुष्कळ विद्या मिळवली आहे, कलकत्त्याला कितीतरी काळ राहून आलो आहे; दैवयोगानं निसरड्यावर पाय पडून चिखलात आपटलो असेन, पण मी कुणीही ऐरागैरा, हसण्याजोगा, दुर्लक्ष करण्याजोगा खेडवळ तरुण नव्हे.'
समाप्ती
दुसऱ्या दिवशी अपूर्व मुलगी पाहायला जायचा होता. फार लांब नाही, आळीतच त्यांचं घर. त्यानं जरा विशेष काळजीनं पोशाख केला. धोतर-चादर सोडून रेशमी अंगरखा, त्यावर झगा, डोक्याला एक गोल पगडी, पायांत वार्निश केलेले बूट, आणि हातात रेशमी छत्री घेऊन तो सकाळीच बाहेर पडला. होऊ घातलेल्या सासुरवाडीत पाऊल ठेवताच आदरसत्काराचा मोठा थाट उडाला. शेवटी यथावकाश थरथरत्या काळजाच्या त्या मुलीला झाडून-पुसून, रंगवून, अंबाड्यात चमकी गुंडाळून, एका पातळ रंगीत साडीत लपेटून नवऱ्या मुलासमोर आणून बसवण्यात आलं. ती एका कोपऱ्यात मान जवळजवळ गुडघ्याला टेकवून मुकाट बसून राहिली, आणि एक पोक्त दासी तिला धीर द्यायला मागे उभी राहिली. नवऱ्या मुलीचा एक लहान भाऊ, त्यांच्या घरात बिनहक्क घुसू पाहणाऱ्या या नव्या माणसाची पगडी, घड्याळाची साखळी आणि नुकती फुटलेली दाढी एकाग्र होऊन न्याहाळू लागला. अपूर्वनं काही वेळ मिशीला पीळ देऊन शेवटी गंभीरपणे विचारलं, 'तू काय शिकतेस?' कपड्यांच्या-दागिन्यांच्या आड झाकलेल्या त्या लाजेच्या ढिगाकडून काहीच उत्तर आलं नाही. दोन-तीनदा विचारल्यावर आणि पोक्त दासीनं पाठीवर उत्तेजनाच्या भरपूर थापा मारल्यावर ती मुलगी हळू आवाजात एका दमात भराभरा बोलून गेली: चारुपाठ भाग दुसरा, व्याकरणसार भाग पहिला, भूगोलविवरण, पाटीगणित, भारतवर्षाचा इतिहास. तेवढ्यात बाहेर कुणाच्यातरी अस्वस्थ चालीची धपधप ऐकू आली, आणि क्षणात धावत, धापा टाकत, पाठीवरचे केस उडवीत मृण्मयी खोलीत शिरली. अपूर्वकृष्णाकडे ढुंकूनही न पाहता तिनं थेट नवऱ्या मुलीच्या भावाचा, राखालचा, हात धरून ओढाओढ सुरू केली. राखाल त्या वेळी आपल्या निरीक्षणशक्तीच्या साधनेत तल्लीन झाला होता; तो काही केल्या उठेना.
समाप्ती
दासी आपल्या संयमी आवाजाचा हळुवारपणा सांभाळण्याकडे लक्ष ठेवून जमेल तितक्या कडक शब्दांत मृण्मयीला रागावू लागली. अपूर्वकृष्ण आपलं सगळं गांभीर्य आणि मोठेपण एकवटून, पगडी घातलेलं मस्तक आभाळाला भिडवून बसून राहिला, आणि पोटापाशी घड्याळाची साखळी चाळवू लागला. शेवटी आपल्या सवंगड्याला काही केल्या हलवता येत नाही असं पाहून, त्याच्या पाठीत एक सणसणीत धपाटा घालून, आणि चटकन नवऱ्या मुलीच्या डोक्यावरचा पदर ओढून खाली पाडून, मृण्मयी वादळासारखी खोलीतून निघून गेली. दासी गुरगुरत गरजू लागली, आणि बहिणीचा पदर अचानक उघडा पडलेला पाहून राखाल खुदूखुदू हसू लागला. आपल्या पाठीत बसलेला तो जबरदस्त धपाटा त्याला अन्यायाचा वाटला नाही, कारण असली देणीघेणी त्यांच्यात नेहमीच चालत असत. इतकंच काय, पूर्वी मृण्मयीचे केस खांद्याच्या खाली पाठीच्या मध्यापर्यंत येत; राखालनंच एक दिवस अचानक मागून येऊन तिच्या केसांच्या झुपक्यात कात्री चालवली होती. तेव्हा मृण्मयीनं भयंकर संतापून त्याच्या हातातली कात्री हिसकावून घेतली आणि आपले मागचे उरलेले केस कचकच आवाज करीत निर्दयपणे कापून टाकले; तिच्या कुरळ्या केसांचे पुंजके फांदीवरून गळलेल्या काळ्या द्राक्षांच्या घोसांसारखे झुबक्या-झुबक्यांनी जमिनीवर पडले. दोघांमध्ये अशी राज्यपद्धती चालू होती. यानंतर ही मूक परीक्षासभा फार वेळ टिकली नाही. गठडीसारखी गोळा होऊन बसलेली ती मुलगी कशीबशी पुन्हा उलगडून उभी राहिली आणि दासीबरोबर आत निघून गेली. अपूर्व विरळ मिशीच्या रेषेला अत्यंत गंभीरपणे पीळ देत उठला आणि खोलीबाहेर निघाला. दाराशी येऊन पाहतो तो वार्निशचे नवे बूट होते तिथे नाहीत, आणि कुठे आहेत हेही पुष्कळ प्रयत्न करून कुणाला ठरवता आलं नाही.
समाप्ती
घरातले सगळे भलतेच गोंधळून गेले, आणि गुन्हेगाराच्या नावानं शिव्याशापांचा, बोलण्यांचा भडिमार होऊ लागला. पुष्कळ शोधाशोध करून शेवटी दुसरा उपाय उरला नाही, तेव्हा घरच्या कर्त्या पुरुषाच्या जुन्या, फाटक्या, ढिल्या चपला पायांत घालून, विजार-अंगरखा-पगडीनं नटलेला अपूर्व चिखलानं भरलेल्या गावच्या वाटेनं अतिशय जपून चालू लागला. तळ्याच्या काठी निर्जन वाटेच्या कडेला पुन्हा अचानक त्याच उंच गळ्यातल्या हास्याचा खळखळता लोट. जणू झाडांच्या पानांतून एखादी थट्टेखोर वनदेवता अपूर्वच्या त्या विसंगत चपलांकडे पाहून आपलं हसू आणखी आवरू शकली नाही. अपूर्व ओशाळून थबकला आणि इकडेतिकडे न्याहाळत होता, तेवढ्यात दाट झाडीतून बाहेर येऊन एका निर्लज्ज अपराधिनीनं त्याच्यासमोर ते नवे बूट ठेवले आणि ती पळून जाणार, तोच अपूर्वनं चपळाईनं तिचे दोन्ही हात धरून तिला कैद केलं. मृण्मयीनं वेडीवाकडी होऊन हात सोडवून पळून जायचा प्रयत्न केला, पण तिला जमलं नाही. कुरळ्या केसांनी वेढलेल्या तिच्या भरल्या, हसऱ्या, खट्याळ चेहऱ्यावर फांद्यांच्या आडून निसटलेली सूर्याची किरणं येऊन पडली. उन्हानं उजळलेल्या, नितळ, चंचल झऱ्याकडे वाकून एखादा कुतूहली वाटसरू जसा एकटक त्याचा तळ पाहत राहतो, तसं अपूर्वनं खोल, गंभीर नजरेनं मृण्मयीच्या वर उचललेल्या चेहऱ्याकडे, विजेसारख्या चंचल दोन डोळ्यांच्या आत पाहिलं, आणि अगदी हळूहळू आपली मूठ सैल करून, जणू जे करायला हवं होतं ते अपुरं ठेवून, आपल्या कैदिणीला सोडून दिलं. अपूर्वनं रागावून मृण्मयीला धरून मारलं असतं, तर तिला त्याचं काहीच नवल वाटलं नसतं; पण निर्जन वाटेवरच्या या विलक्षण, मूक शांततेचा तिला काहीच अर्थ लागला नाही.
समाप्ती
नाचणाऱ्या निसर्गाच्या पैंजणांच्या रुणझुणीसारखं ते चंचल हसू सगळ्या आकाशभर वाजत राहिलं, आणि विचारांत बुडालेला अपूर्वकृष्ण अगदी सावकाश पावलं टाकीत घरी येऊन पोचला. ३ अपूर्व दिवसभर काहीतरी निमित्तं काढून आत आईला भेटायला गेलाच नाही. बाहेर कुठेतरी जेवणाचं आमंत्रण होतं, तिथे जेवून आला. अपूर्वसारखा एवढा विद्याविभूषित, गंभीर, विचारी माणूस एका सामान्य, अशिक्षित पोरीपुढे आपली गेलेली प्रतिष्ठा परत मिळवायला, आपल्या अंतरीच्या थोरवीची पुरेपूर ओळख करून द्यायला इतका का उतावीळ व्हावा, हे समजणं कठीण आहे. एका खेडवळ, चंचल पोरीनं त्याला सामान्य माणूस समजलं, म्हणून काय बिघडलं? क्षणभर त्यांना हास्यास्पद करून, मग त्यांचं अस्तित्वच विसरून, ती राखाल नावाच्या एका मूर्ख, निरक्षर पोराबरोबर खेळायला अधीर झाली, तर त्यात त्यांचं काय नुकसान? ते 'विश्वदीप' नावाच्या मासिकात ग्रंथपरीक्षणं लिहितात, आणि त्यांच्या पेटीत अत्तर, बूट, रुबिनीचा कापूर, रंगीत पत्रांचे कागद आणि हार्मोनियम शिकायच्या पुस्तकाबरोबर एक काठोकाठ भरलेली वही, रात्रीच्या गर्भात दडलेल्या उद्याच्या उषेसारखी, प्रकाशात येण्याची वाट पाहत पडून आहे, हे तिच्यापाशी सिद्ध करायची गरजच काय? पण मनाची समजूत घालणं कठीण; आणि या खेड्यात राहणाऱ्या चंचल पोरीपुढे श्रीयुत अपूर्व राय, बी. ए., काही केल्या हार मानायला तयार नव्हते. संध्याकाळी तो आत गेला तेव्हा आईनं विचारलं, 'काय रे अपू, मुलगी कशी वाटली? पसंत पडली ना?' अपूर्व जरा ओशाळून म्हणाला, 'मुली पाहिल्या आई, त्यांतली एक मला पसंत पडली आहे.' आई चकित होऊन म्हणाली, 'तू आणखी किती मुली पाहिल्यास रे!'
समाप्ती
शेवटी पुष्कळ आढेवेढे घेतल्यावर उघड झालं की शेजारीण शरत् हिची मुलगी मृण्मयी हिला आपल्या मुलानं पसंत केलं आहे. एवढं शिकूनसवरून मुलाची पसंती ही अशी! सुरुवातीला अपूर्वला बरीचशी लाज वाटत होती; पण आई जेव्हा जोरजोरात विरोध करू लागली, तेव्हा त्याची लाज सुटली. इरेला पेटून तो बोलून गेला, 'मृण्मयीशिवाय दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही.' ती दुसरी, बाहुलीसारखी निर्जीव मुलगी तो जसजशी डोळ्यांसमोर आणू लागला, तसतसा लग्नाबद्दलच त्याला भयंकर तिटकारा येऊ लागला. दोन-तीन दिवस दोन्ही बाजूंनी रुसवेफुगवे, उपास, जागरणं झाल्यावर अपूर्वच जिंकला. आईनं मनाची समजूत घातली की मृण्मयी अजून लहान आहे, आणि मृण्मयीच्या आईला योग्य शिक्षण देणं जमलं नाही; लग्न होऊन ती आपल्या हाती आली की तिचा स्वभाव बदलेल. आणि हळूहळू तिला हेही पटलं की मृण्मयीचा चेहरा सुंदर आहे. पण लगेच पुन्हा तिचे ते आखूड केस डोळ्यांसमोर येऊन तिचं मन निराशेनं भरून जाई; तरीही तिनं आशा धरली की घट्ट वेणी घालून आणि थबथबेल इतकं तेल चोपडून कालांतरानं हा दोषही सुधारता येईल. आळीतल्या सगळ्या लोकांनी अपूर्वच्या या पसंतीचं नाव ठेवलं 'अपूर्व पसंती'. वेड्या मृण्मयीवर पुष्कळांचा जीव होता, पण म्हणून ती आपल्या मुलाला बायको करण्याजोगी आहे, असं कुणालाच वाटत नसे. मृण्मयीचा बाप ईशान मजुमदार याला यथाकाळ कळवण्यात आलं. तो कुठल्याशा आगबोट कंपनीत कारकून म्हणून दूर नदीकाठच्या एका लहानशा स्टेशनावर, पत्र्याचं छप्पर असलेल्या एका छोट्या खोपटात, माल चढवण्या-उतरवण्याच्या आणि तिकिटं विकण्याच्या कामावर होता.
समाप्ती
आपल्या मृण्मयीच्या लग्नाचा प्रस्ताव ऐकून त्याच्या दोन्ही डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. त्यात किती दुःख होतं आणि किती आनंद, हे मोजून सांगायचा काही मार्ग नाही. लेकीच्या लग्नासाठी ईशाननं मुख्य कचेरीतल्या साहेबाकडे रजेचा अर्ज केला. साहेबानं हे कारण अगदीच क्षुल्लक मानून रजा नामंजूर केली. तेव्हा पूजेच्या दिवसांत आठवडाभराची रजा मिळण्याची शक्यता आहे असं कळवून, तोपर्यंत लग्न पुढे ढकलावं म्हणून त्यानं गावी पत्र लिहिलं. पण अपूर्वची आई म्हणाली, 'याच महिन्यात चांगला मुहूर्त आहे, आता आणखी उशीर करता येणार नाही.' दोन्हीकडे विनंती फेटाळली गेल्यावर दुखावलेल्या मनानं ईशाननं आणखी काही आक्षेप न घेता पूर्वीसारखंच माल तोलणं आणि तिकिटं विकणं चालू ठेवलं. त्यानंतर मृण्मयीची आई आणि आळीतल्या सगळ्या वयस्क बायका मिळून पुढे काय काय करायचं याबद्दल मृण्मयीला रात्रंदिवस उपदेश करू लागल्या. खेळाची आवड, भरभर चालणं, मोठ्यानं हसणं, मुलांशी बोलणं, आणि भुकेप्रमाणे जेवणं, या सगळ्यांबद्दल सगळ्यांनीच 'असं करू नकोस' असा सल्ला देऊन लग्न हा एक भयंकर बागुलबुवा आहे असं ठसवण्यात पुरेपूर यश मिळवलं. धास्तावलेल्या, घाबरलेल्या मनानं मृण्मयीला वाटलं की आपल्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, आणि ती संपल्यावर फाशीचा हुकूम. खोडकर तट्टासारखी मान वाकडी करून, मागे सरकून ती बोलून बसली, 'मी लग्न करणार नाही.' ४ पण तरीही लग्न करावं लागलंच. त्यानंतर शिक्षण सुरू झालं. एका रात्रीत मृण्मयीचं सगळं जग अपूर्वच्या आईच्या माजघरात येऊन कोंडलं गेलं. सासूबाईंनी सुधारणेचं काम हाती घेतलं. अगदी कठोर चेहरा करून त्या म्हणाल्या, 'हे बघ पोरी, तू काही आता कुकुलं बाळ राहिली नाहीस; आमच्या घरात असला निर्लज्जपणा चालायचा नाही.'
समाप्ती
सासूबाईंना ज्या अर्थानं म्हणायचं होतं, त्या अर्थानं मृण्मयीनं ते घेतलं नाही. तिला वाटलं, या घरात चालणार नसेल तर दुसरीकडे कुठेतरी जावं लागणार. दुपार टळल्यावर ती कुठेच दिसेना. कुठे गेली, कुठे गेली, शोधाशोध सुरू झाली. शेवटी विश्वासघातकी राखालनं तिला तिच्या लपायच्या जागेतून पकडून दिलं. वडाखाली राधाकांत देवाचा टाकून दिलेला मोडका रथ होता, त्यात जाऊन ती बसली होती. सासूबाईंनी आणि आळीतल्या सगळ्या हितचिंतक बायकांनी मृण्मयीची जी काय छीथू केली, त्याची कल्पना वाचकांना आणि वाचिकांना सहज करता येईल. रात्री आभाळ दाटून आलं आणि धो धो पाऊस सुरू झाला. अपूर्वकृष्ण अंथरुणात अगदी हळूहळू, जरासा मृण्मयीच्या जवळ सरकला आणि तिच्या कानात हळूच म्हणाला, 'मृण्मयी, तुझं माझ्यावर प्रेम नाही?' मृण्मयी तडकून म्हणाली, 'नाही. मी तुझ्यावर कध्धीच प्रेम करणार नाही.' तिचा सगळा राग आणि तिनं ठरवलेल्या सगळ्या शिक्षा तिनं एकवटलेल्या वज्रासारख्या अपूर्वच्या डोक्यावर फेकल्या. अपूर्व दुखावून म्हणाला, 'का, मी तुझा काय अपराध केला?' मृण्मयी म्हणाली, 'तू माझ्याशी लग्न का केलंस?' या गुन्ह्याचं समाधानकारक स्पष्टीकरण देणं कठीण. पण अपूर्वनं मनाशी ठरवलं, काहीही करून हे बधत नसलेलं मन वश करायचंच. दुसऱ्या दिवशी मृण्मयीच्या बंडखोर वृत्तीची सगळी लक्षणं पाहून सासूबाईंनी तिला खोलीत कोंडून दार लावून घेतलं. नव्यानं पिंजऱ्यात कोंडलेल्या पाखरासारखी ती आधी कितीतरी वेळ खोलीत फडफडत येरझारा घालत राहिली. शेवटी कुठूनही पळायची वाट दिसेना, तेव्हा निष्फळ संतापानं तिनं पलंगावरची चादर दातांनी फाडून चिंध्या चिंध्या केल्या, आणि जमिनीवर पालथी पडून मनातल्या मनात बाबांना हाका मारीत रडू लागली.
समाप्ती
तेवढ्यात हळूच कुणीतरी तिच्याजवळ येऊन बसलं. धुळीत लोळलेले तिचे केस गालावरून मायेनं बाजूला करायचा प्रयत्न केला. मृण्मयीनं जोरात मान झटकून तो हात दूर केला. अपूर्व तिच्या कानाजवळ तोंड नेऊन हळूच म्हणाला, 'मी चोरून दार उघडलं आहे. चल, आपण मागच्या परसबागेत पळून जाऊ.' मृण्मयीनं जोरजोरात मान हलवली आणि रडत, तडकून म्हणाली, 'नाही.' अपूर्वनं तिची हनुवटी धरून तोंड वर करायचा प्रयत्न करीत म्हटलं, 'एकदा बघ तरी कोण आलंय.' जमिनीवर पडलेल्या मृण्मयीकडे पाहत राखाल भांबावल्यासारखा दाराशी उभा होता. मृण्मयीनं तोंड वर न करताच अपूर्वचा हात ढकलून दिला. अपूर्व म्हणाला, 'राखाल तुझ्याशी खेळायला आलाय, खेळायला जातेस?' ती चिडचिडीनं उसळलेल्या आवाजात म्हणाली, 'नाही.' राखालनंही इथे काही खरं नाही हे ओळखलं आणि कसाबसा खोलीतून पळ काढून सुटकेचा निःश्वास टाकला. अपूर्व गप्प बसून राहिला. रडता रडता थकून मृण्मयी झोपी गेली, तेव्हा अपूर्व पावलांचा आवाज न करता बाहेर पडला आणि दाराला कडी लावून निघून गेला. त्याच्या दुसऱ्या दिवशी मृण्मयीला वडिलांचं एक पत्र आलं. आपल्या जिवापाड लाडक्या मृण्मयीच्या लग्नाला हजर राहता आलं नाही म्हणून हळहळ व्यक्त करून त्यांनी नव्या जोडप्याला मनापासून आशीर्वाद पाठवले होते. मृण्मयी सासूबाईंकडे जाऊन म्हणाली, 'मी बाबांकडे जाणार.' या अचानक केलेल्या अशक्य मागणीवर सासूबाई तिच्यावर उखडल्या, 'हिचा बाप कुठे राहतो त्याचा पत्ता नाही; म्हणे बाबांकडे जाणार! भलताच लाडिक हट्ट.' ती काही उत्तर न देता निघून गेली. आपल्या खोलीत जाऊन तिनं दार लावून घेतलं, आणि सगळी आशा सुटलेला माणूस देवाची जशी प्रार्थना करतो, तशी ती म्हणू लागली, 'बाबा, मला तुम्ही घेऊन जा. इथे माझं कुणी नाही. इथे राहिले तर मी जगणार नाही.'
समाप्ती
मध्यरात्री नवरा झोपल्यावर हळूच दार उघडून मृण्मयी घराबाहेर पडली. मधूनमधून ढग भरून येत होते, तरी चांदण्या रात्री वाट दिसण्याइतका उजेड पुरेसा होता. बाबांकडे जायचं तर कोणत्या वाटेनं जायचं, हे मृण्मयीला काहीच ठाऊक नव्हतं. फक्त तिच्या मनात एक विश्वास होता की टपालाच्या पिशव्या वाहून नेणारे 'हरकारे' ज्या वाटेनं जातात, त्या वाटेनं जगातल्या प्रत्येक पत्त्यावर जाता येतं. मृण्मयी तीच टपालाची वाट धरून चालू लागली. चालता चालता अंग थकून आलं, रात्रही संपत आली. रानात दोन-एक पक्षी चुळबुळ करीत अनिश्चित सुरात ओरडायच्या बेतात होते, पण नक्की वेळ ठरवता न आल्यानं घुटमळत होते, तेव्हा वाट संपून नदीकाठी एका मोठ्या बाजारपेठेसारख्या ठिकाणी मृण्मयी येऊन पोचली. आता कोणत्या दिशेला जावं याचा ती विचार करीत होती, तोच ओळखीचा छुमछुम आवाज तिला ऐकू आला. पत्रांची पिशवी खांद्यावर टाकून धापा टाकीत टपालाचा हरकारा येऊन पोचला. मृण्मयी घाईघाईनं त्याच्याजवळ गेली आणि केविलवाण्या, थकलेल्या आवाजात म्हणाली, 'मला कुशीगंजला बाबांकडे जायचंय, मला तुझ्याबरोबर घेऊन चल ना.' तो म्हणाला, 'कुशीगंज कुठे आहे मला ठाऊक नाही.' एवढं म्हणून त्यानं घाटाला बांधलेल्या टपालाच्या नावेच्या नावाड्याला उठवलं आणि नाव सोडली. दया दाखवायला किंवा चौकशी करायला त्याला वेळ नव्हता.
समाप्ती
पाहता पाहता हाट आणि बाजार जागे झाले. मृण्मयीनं घाटावर उतरून एका नावाड्याला हाक मारून विचारलं, 'नावाडीदादा, मला कुशीगंजला नेशील?' नावाड्यानं उत्तर द्यायच्या आधीच शेजारच्या नावेतून कुणीतरी म्हणालं, 'अरे, कोण ही! मिनूमाय, तू इथे कुठून?' मृण्मयी उसळत्या उत्सुकतेनं म्हणाली, 'वनमाली, मला कुशीगंजला बाबांकडे जायचंय, मला तुझ्या नावेतून घेऊन चल.' वनमाली त्यांच्या गावचा नावाडी; ही उच्छृंखल स्वभावाची पोरगी त्याच्या चांगली ओळखीची होती. तो म्हणाला, 'बाबांकडे जायचंय? हे तर छानच. चल, मी नेतो तुला.' मृण्मयी नावेत चढली. नावाड्यानं नाव सोडली. ढग भरून आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. भाद्रपदातली भरलेली नदी फुगून फुगून नावेला झोके देऊ लागली; मृण्मयीचं सगळं अंग झोपेनं जड झालं; पदर अंथरून ती नावेत आडवी झाली, आणि ही अवखळ पोरगी नदीच्या झोपाळ्यावर, निसर्गानं मायेनं वाढवलेल्या एखाद्या शांत बाळासारखी निर्धास्त झोपून गेली. जाग आली तेव्हा तिनं पाहिलं, ती आपल्या सासरी पलंगावर निजलेली आहे. ती जागी झालेली पाहून मोलकरीण बडबड करू लागली. मोलकरणीचा आवाज ऐकून सासूबाई आल्या आणि अतिशय कठोर कठोर शब्द सुनवू लागल्या. मृण्मयी डोळे विस्फारून मुकाट त्यांच्या तोंडाकडे पाहत राहिली. शेवटी त्यांनी तिच्या बापानं केलेल्या वाईट शिकवणीवर टोमणा मारला, तेव्हा मृण्मयी भरभर शेजारच्या खोलीत शिरली आणि आतून कडी लावून घेतली.
समाप्ती
लाजलज्जा बाजूला ठेवून अपूर्व आईकडे येऊन म्हणाला, 'आई, सुनेला दोन-एक दिवसांसाठी एकदा माहेरी पाठवायला काय हरकत आहे?' आई अपूर्वला 'न भूतो न भविष्यति' अशी बोलणी ऐकवू लागली, आणि देशात एवढ्या मुली असताना निवडून निवडून ही जीव जाळणारी दरोडेखोर पोरगी घरात आणल्याबद्दल तिनं त्याची पुरेपूर निर्भर्त्सना केली. ५ त्या दिवशी दिवसभर बाहेर वादळवारा आणि पाऊस होता, आणि घरातही तसंच तुफान चालू होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री अपूर्वनं मृण्मयीला हळूहळू जागं केलं आणि विचारलं, 'मृण्मयी, तुझ्या बाबांकडे जायचंय?' मृण्मयीनं दचकून अपूर्वचा हात जोरात घट्ट पकडला आणि म्हणाली, 'जायचंय.' अपूर्व कुजबुजला, 'मग चल, आपण दोघं हळूच पळून जाऊ. मी घाटावर नाव ठरवून ठेवली आहे.' मृण्मयीनं अतिशय कृतज्ञ मनानं एकदा नवऱ्याच्या तोंडाकडे पाहिलं. मग घाईघाईनं उठून कपडे बदलून ती निघायला तयार झाली. आईला काळजी वाटू नये म्हणून अपूर्वनं एक चिठ्ठी ठेवली, आणि दोघं बाहेर पडले. त्या अंधाऱ्या रात्री, निर्मनुष्य, निःशब्द, निर्जन गावच्या वाटेवर मृण्मयीनं आज पहिल्यांदा स्वतःहून, मनापासून विसंबून नवऱ्याचा हात धरला; तिच्या हृदयातला आनंद आणि हुरहुर त्या कोमल स्पर्शातून तिच्या नवऱ्याच्या धमन्यांत भिनत गेली.
समाप्ती
नाव त्याच रात्री सुटली. अनावर हर्षाच्या उचंबळत्या लाटा असूनही थोड्याच वेळात मृण्मयीला झोप लागली. दुसऱ्या दिवशी काय ती सुटका, काय तो आनंद! दोन्ही तीरांवर कितीतरी गावं, बाजार, शेतं, रानं; दोन्ही बाजूंनी कितीतरी नावा येत-जात होत्या. प्रत्येक क्षुल्लक गोष्टीबद्दल मृण्मयी नवऱ्याला हजार वेळा प्रश्न विचारू लागली. त्या नावेत काय आहे, ते लोक कुठून आले, या जागेचं नाव काय, असले प्रश्न, ज्यांची उत्तरं अपूर्वला कॉलेजच्या कुठल्याही पुस्तकात सापडली नव्हती आणि ज्यांना त्याचा कलकत्त्याचा अनुभव पुरा पडत नव्हता. वाचकमित्रांना ऐकून शरम वाटेल, पण अपूर्वनं यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं, आणि बहुतेक उत्तरांचा सत्याशी काही मेळ नव्हता. उदाहरणार्थ, तिळाच्या नावेला जवसाची नाव, पांचबेडेला रायनगर, आणि मुन्सफाच्या कोर्टाला जमीनदाराची कचेरी म्हणायला त्याला जराही संकोच वाटला नाही. आणि या सगळ्या चुकीच्या उत्तरांनी त्या भाबड्या विश्वासानं विचारणारीच्या समाधानाला तिळमात्र धक्का लागला नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नाव कुशीगंजला पोचली. पत्र्याच्या खोलीत, चौकोनी काचांच्या एका मळकट कंदिलात तेलाची वात लावून, लहानशा डेस्कवर चामड्यानं बांधलेली एक मोठी वही ठेवून, उघड्या अंगानं ईशानचंद्र स्टुलावर बसून हिशेब लिहीत होते. तेवढ्यात नवं जोडपं खोलीत शिरलं. मृण्मयीनं हाक मारली, 'बाबा.' त्या खोलीत असा आवाज असा कधीच घुमला नव्हता. ईशानच्या डोळ्यांतून घळघळा आसवं वाहू लागली. काय बोलावं, काय करावं, त्याला काही सुचेना. आपली मुलगी आणि जावई जणू एखाद्या साम्राज्याचे युवराज आणि युवराज्ञी; या सगळ्या तागाच्या पोत्यांच्या गराड्यात त्यांच्या योग्यतेचं सिंहासन कसं उभारायचं, हेच जणू त्याच्या गोंधळलेल्या बुद्धीला ठरवता येईना.
समाप्ती
मग जेवणाचा प्रश्न, तीही एक काळजीच. हा गरीब कारकून स्वतःच्या हातानं डाळ आणि भातातच भाजी उकडून शिजवून खातो; आज एवढ्या आनंदाच्या दिवशी तो काय करणार, काय खाऊ घालणार? मृण्मयी म्हणाली, 'बाबा, आज आपण सगळे मिळून स्वयंपाक करू.' अपूर्वनं या प्रस्तावाला मोठ्या उत्साहानं दुजोरा दिला. खोलीत जागेची टंचाई, माणसांची टंचाई, अन्नाची टंचाई; पण लहानशा छिद्रातून कारंजं जसं चौपट जोरानं उसळतं, तसा दारिद्र्याच्या अरुंद तोंडातून आनंद भरभरून उसळू लागला. असे तीन दिवस गेले. दोन्ही वेळा ठरल्याप्रमाणे आगबोट येऊन लागे, कितीतरी माणसं, कितीतरी गलबला; संध्याकाळी नदीकाठ अगदी निर्मनुष्य होई, तेव्हा काय ते मुक्त स्वातंत्र्य! आणि तिघं मिळून नाना प्रकारची जुळवाजुळव करीत, चुका करीत, एक करायला जाऊन भलतंच करीत, केलेला स्वयंपाक. मग मृण्मयीच्या बांगड्या किणकिणणाऱ्या मायाळू हातांनी वाढलेलं, सासरे-जावयांचं एकत्र जेवण; आणि तिच्या गृहिणीपणातल्या हजार उणिवा दाखवून मृण्मयीची थट्टा, आणि त्यावरून पोरीचं आनंदानं भांडणं आणि लटकं रुसणं. शेवटी अपूर्वनं सांगितलं की आणखी दिवस राहणं बरं नव्हे. मृण्मयीनं केविलवाण्या आवाजात आणखी काही दिवसांची मुदत मागितली. ईशान म्हणाला, 'नको, आता नको.' निरोपाच्या दिवशी लेकीला छातीशी ओढून, तिच्या डोक्यावर हात ठेवून, आसवांनी दाटलेल्या कंठानं ईशान म्हणाला, 'बाळ, सासरघर उजळून लक्ष्मीसारखी राहा. कुणालाही माझ्या मिनूचा कोणताही दोष काढता येऊ नये.' मृण्मयी रडत रडत नवऱ्याबरोबर निघून गेली. आणि ईशान त्या दुपटीनं उदास झालेल्या अरुंद खोलीत परत जाऊन दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने, नेमानं माल तोलत राहिला.
समाप्ती
६ हे गुन्हेगार जोडपं घरी परत आलं, तेव्हा आई अगदी गंभीर होऊन राहिली, एक शब्दही बोलली नाही. कुणाच्याही वागण्यावर असा कोणताही दोष ठेवला नाही की जो धुऊन काढायचा त्याला प्रयत्न तरी करता यावा. हा मूक आरोप, हा निःशब्द रुसवा, लोखंडी ओझ्यासारखा सगळ्या घरसंसारावर अढळपणे दाबून राहिला. शेवटी असह्य झालं, तेव्हा अपूर्व येऊन म्हणाला, 'आई, कॉलेज उघडलं आहे, आता मला कायद्याचा अभ्यास करायला जायला हवं.' आई उदासीनपणे म्हणाली, 'सुनेचं काय करणार?' अपूर्व म्हणाला, 'सून इथेच राहू दे.' आई म्हणाली, 'नको बाई, काही नको; तुम्ही तिला तुमच्याबरोबरच घेऊन जा.' एरवी आई अपूर्वला 'तू'च म्हणत असे. अपूर्व रुसून दुखावलेल्या आवाजात म्हणाला, 'बरं.' कलकत्त्याला जायची तयारी सुरू झाली. जायच्या आदल्या रात्री अपूर्व अंथरुणावर आला, तर पाहतो, मृण्मयी रडते आहे. एकाएकी त्याच्या मनाला धक्का बसला. खिन्न आवाजात तो म्हणाला, 'मृण्मयी, माझ्याबरोबर कलकत्त्याला यावंसं तुला वाटत नाही?' मृण्मयी म्हणाली, 'नाही.' अपूर्वनं विचारलं, 'तुझं माझ्यावर प्रेम नाही?' या प्रश्नाला काहीच उत्तर मिळालं नाही. पुष्कळदा या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं असतं; पण कधी कधी त्यात मनाचे इतके गुंतागुंतीचे पेच गुंतलेले असतात, की एका पोरीकडून त्याच्या उत्तराची अपेक्षा करता येत नाही. अपूर्वनं विचारलं, 'राखालला सोडून जायचं म्हणून तुला कसंसंच होतंय?' मृण्मयीनं बिनदिक्कत उत्तर दिलं, 'हो.' छोट्या राखालबद्दल या बी. ए. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्याविभूषित तरुणाच्या मनात सुईसारखा अगदी बारीक, पण अगदी तीक्ष्ण मत्सर उगवला. तो म्हणाला, 'मला पुष्कळ दिवस घरी येता येणार नाही.' या बातमीबद्दल मृण्मयीला काहीच म्हणायचं नव्हतं.
समाप्ती
'बहुतेक दोन वर्षं, किंवा त्याहूनही जास्त होतील.' मृण्मयीनं हुकूम सोडला, 'तू परत येशील तेव्हा राखालसाठी एक तीन पात्यांचा रॉजर्सचा चाकू घेऊन ये.' अपूर्व आडवा पडल्या पडल्या जरासा उठून म्हणाला, 'म्हणजे तू इथेच राहणार?' मृण्मयी म्हणाली, 'हो, मी आईकडे जाऊन राहीन.' अपूर्व निःश्वास टाकून म्हणाला, 'बरं, तसंच राहा. जोपर्यंत तू मला ये म्हणून पत्र लिहिणार नाहीस, तोपर्यंत मी येणार नाही. खूश झालीस ना?' या प्रश्नाचं उत्तर देणं अनावश्यक समजून मृण्मयी झोपी गेली. पण अपूर्वला झोप आली नाही; उशी उंच करून, तिला टेकून तो बसून राहिला. बऱ्याच रात्री अचानक चंद्र उगवला आणि चांदणं अंथरुणावर येऊन पडलं. अपूर्वनं त्या उजेडात मृण्मयीकडे पाहिलं. पाहता पाहता त्याला वाटलं, जणू कुणीतरी राजकन्येला रुप्याची कांडी लावून बेशुद्ध करून ठेवून गेलं आहे. एकदा फक्त सोन्याची कांडी मिळाली, की या निजलेल्या जिवाला जागं करून माळ बदलून घेता येईल. रुप्याची कांडी म्हणजे हसू, आणि सोन्याची कांडी म्हणजे आसवं. पहाटे अपूर्वनं मृण्मयीला उठवलं आणि म्हणाला, 'मृण्मयी, माझी जायची वेळ झाली आहे. चल, तुला तुझ्या आईच्या घरी पोचवून येतो.' मृण्मयी अंथरूण सोडून उठून उभी राहिली, तेव्हा अपूर्वनं तिचे दोन्ही हात धरून म्हटलं, 'आता माझी एक विनंती आहे. मी पुष्कळदा तुला पुष्कळ मदत केली आहे; आज जाताना त्याचं एक बक्षीस देशील?' मृण्मयीनं नवलानं विचारलं, 'काय?' अपूर्व म्हणाला, 'तू स्वतःहून, प्रेमानं मला एक चुंबन दे.'
समाप्ती
अपूर्वची ही विचित्र मागणी आणि त्याचा गंभीर चेहरा पाहून मृण्मयी हसू लागली. हसू आवरून चुंबन घ्यायला तिनं तोंड पुढे केलं; अगदी जवळ गेली, पण पुढे तिला जमलं नाही, ती खुदूखुदू हसत सुटली. असे दोनदा प्रयत्न करून शेवटी ती थांबली, आणि तोंडावर पदर धरून हसत राहिली. शिक्षा केल्याचा आव आणून अपूर्वनं तिचा कान धरून हलवला. अपूर्वचा पण मोठा कडक. दरोडेखोरासारखं हिसकावून, लुटून घेणं हा तो आपला अपमान समजतो. तो देवासारखा मानानं राहून स्वखुशीनं आणलेल्या भेटीची अपेक्षा करतो; स्वतःच्या हातानं तो काहीच उचलून घेणार नाही. मृण्मयी पुन्हा हसली नाही. पहाटेच्या उजेडात निर्जन वाटेनं तिला तिच्या आईच्या घरी पोचवून अपूर्व घरी आला आणि आईला म्हणाला, 'विचार करून पाहिला; सुनेला माझ्याबरोबर कलकत्त्याला नेलं तर माझ्या अभ्यासात व्यत्यय येईल, आणि तिथे तिलाही कुणी सोबतीण नाही. तुला तर तिला या घरात ठेवायचं नाही; म्हणून मी तिला तिच्या आईच्या घरीच ठेवून आलो.' मनात खोलवर रुसवा ठेवूनच मायलेकरांची ताटातूट झाली. ७ आईच्या घरी आल्यावर मृण्मयीला दिसलं की तिचं मन कशातच लागत नाही. ते घर जणू आमूलाग्र बदलून गेलं होतं. वेळ जाता जात नव्हता. काय करावं, कुठे जावं, कुणाला भेटावं, तिला काही सुचेना. मृण्मयीला एकाएकी वाटलं, जणू सगळ्या घरात आणि सगळ्या गावात कुणी माणूसच नाही. जणू भर दुपारी सूर्याला ग्रहण लागलं. आज कलकत्त्याला निघून जायची इतकी जिवापाड इच्छा होते आहे, तर काल रात्री ही इच्छा कुठे होती, हे तिला काही केल्या कळेना. काल तिला ठाऊक नव्हतं की आयुष्याचा जो भाग सोडून जायचं म्हणून तिचा जीव एवढा कासावीस होत होता, त्याची सगळी चव त्याआधीच बदलून गेली होती. झाडाच्या पिकल्या पानासारखं, देठापासून सुटलेलं ते मागचं आयुष्य आज तिनं मुद्दाम, सहज दूर भिरकावून दिलं.
समाप्ती
गोष्टीत ऐकायला मिळतं की एखादा कसबी शस्त्रकार इतकी बारीक तलवार घडवू शकतो की तिनं माणसाचे दोन तुकडे केले तरी त्याला कळत नाही; शेवटी धक्का लागला की दोन्ही अर्धे वेगळे होतात. विधात्याची तलवारही तशीच बारीक; मृण्मयीच्या बालपणाच्या आणि तारुण्याच्या मधोमध त्यानं कधी घाव घातला, हे तिला कळलंच नाही; आज कसा कोण जाणे धक्का लागला, आणि बालपणाचा भाग तारुण्यापासून सुटून गळून पडला, आणि मृण्मयी चकित होऊन, दुखावून पाहतच राहिली. माहेरची तिची ती जुनी निजायची खोली तिला आता आपली वाटेना; तिथे जी राहत होती, ती एकाएकी आता नव्हतीच. आता हृदयातल्या सगळ्या आठवणी त्या दुसऱ्या एका घराभोवती, दुसऱ्या एका खोलीभोवती, दुसऱ्या एका शय्येभोवती गुणगुणत फिरू लागल्या. मृण्मयी कुणालाच बाहेर दिसेनाशी झाली. तिचं हसू आता ऐकू येत नाही. राखाल तिला पाहिलं की घाबरतो. खेळाचं तर मनातही येत नाही. मृण्मयी आईला म्हणाली, 'आई, मला सासरी पोचव.' इकडे, निघताना मुलाचा उतरलेला चेहरा आठवून अपूर्वच्या आईचं काळीज फाटून जात होतं. तो रागावून सुनेला व्याहीणबाईंच्या घरी ठेवून गेला, हे तिच्या मनाला फार टोचू लागलं. अशातच एक दिवस डोक्यावर पदर घेऊन, उतरलेल्या चेहऱ्यानं मृण्मयीनं सासूबाईंच्या पायांशी लोटांगण घालून नमस्कार केला. सासूबाईंनी तत्क्षणी डबडबलेल्या डोळ्यांनी तिला छातीशी कवटाळलं. क्षणात दोघींचं मनोमीलन झालं. सासूबाई सुनेच्या तोंडाकडे पाहून थक्क झाल्या. ती मृण्मयी आता राहिली नव्हती. असा बदल सगळ्यांच्या बाबतीत घडणं साधारणपणे शक्य नसतं. मोठ्या बदलासाठी मोठ्या बळाची गरज असते. सासूबाईंनी ठरवलं होतं की मृण्मयीचे दोष एकेक करून सुधारायचे; पण दुसऱ्याच एका अदृश्य सुधारकानं कुणाला ठाऊक नसलेला एक जवळचा मार्ग धरून मृण्मयीला जणू नवा जन्मच घ्यायला लावला.
समाप्ती
आता मृण्मयीलाही सासूबाई समजू लागल्या, आणि सासूबाईंनाही मृण्मयीची ओळख पटली; झाडाचा आणि त्याच्या फांद्या-उपफांद्यांचा जसा मेळ असतो, तसा सगळा घरसंसार एकमेकांत अखंड मिसळून गेला. ही जी एक गंभीर, स्निग्ध, विशाल स्त्रीप्रकृती मृण्मयीच्या सगळ्या शरीरात आणि सगळ्या अंतरंगात रेषा-रेषांनी भरून भरून आली, ती जणू तिला वेदना देऊ लागली. आषाढाच्या पहिल्या, सावळ्या, पाण्यानं भरलेल्या नव्या मेघासारखा तिच्या हृदयात एक अपुरा, विस्तीर्ण रुसवा दाटून आला. त्या रुसव्यानं तिच्या डोळ्यांच्या सावलीभरल्या लांबसडक पापण्यांवर आणखी एक गडद सावली टाकली. ती मनातल्या मनात म्हणू लागली, 'मला माझंच मन समजलं नाही, म्हणून तू तरी मला का समजून घेतलं नाहीस? तू मला शिक्षा का केली नाहीस? तुझ्या मनासारखं मला का चालवलं नाहीस? मी राक्षसीण जेव्हा तुझ्याबरोबर कलकत्त्याला यायला तयार झाले नाही, तेव्हा तू मला जबरदस्तीनं धरून का नेलं नाहीस? तू माझं ऐकलंसच कशाला, माझी विनंती मानलीसच कशाला, माझा हट्टीपणा सहन केलासच कशाला?' मग, ज्या दिवशी सकाळी तळ्याकाठच्या निर्जन वाटेवर अपूर्वनं तिला कैद करून काहीही न बोलता फक्त एकदा तिच्या तोंडाकडे पाहिलं होतं, ते तळं, ती वाट, ते झाडाखालचं ठिकाण, ते सकाळचं ऊन, आणि हृदयाच्या भारानं खाली झुकलेल्या डोळ्यांतली ती खोल नजर, सगळं तिला आठवलं, आणि एकाएकी तिला त्याचा सगळा अर्थ उमगला. मग निरोपाच्या दिवशीचं जे चुंबन अपूर्वच्या तोंडापर्यंत जाऊन परत फिरलं होतं, ते अपुरं चुंबन आता मृगजळाकडे धावणाऱ्या तहानलेल्या पाखरासारखं पुन्हा पुन्हा त्या निघून गेलेल्या क्षणाकडे धाव घेऊ लागलं, आणि त्याची तहान काही केल्या भागली नाही. आता राहून राहून मनात एवढंच येतं: अरेरे, त्या वेळी असं केलं असतं तर, अमुक प्रश्नाला असं उत्तर दिलं असतं तर, तेव्हा असं झालं असतं तर!
समाप्ती
अपूर्वच्या मनात याची खंत राहिली होती की 'मृण्मयीला माझी पुरती ओळखच झाली नाही.' मृण्मयीही आज बसल्या बसल्या विचार करते, 'त्यांनी मला काय समजलं असेल, काय समजून ते निघून गेले?' अपूर्वनं तिला एक अवखळ, चंचल, अविचारी, मूर्ख पोरगी म्हणूनच ओळखलं; हृदयातल्या अमृताच्या भरल्या धारेनं प्रेमाची तहान भागवू शकणारी स्त्री म्हणून त्याला तिची ओळख झाली नाही, या विचारानं ती पश्चात्तापानं, लाजेनं, स्वतःच्या धिक्कारानं होरपळू लागली. चुंबनांची आणि लाडाची ती सगळी देणी ती अपूर्वच्या उशीवर फेडू लागली. असे कितीतरी दिवस गेले. अपूर्व सांगून गेला होता, 'तू पत्र लिहिलं नाहीस तर मी घरी परत येणार नाही.' तेच आठवून मृण्मयी एक दिवस खोलीचं दार लावून पत्र लिहायला बसली. अपूर्वनं तिला दिलेले सोनेरी काठाचे रंगीत कागद तिनं बाहेर काढले आणि बसून विचार करू लागली. अगदी काळजीपूर्वक लेखणी धरून, ओळी वाकड्या करीत, बोटांना शाई माखवून, अक्षरं लहान-मोठी काढीत, वर कोणतंही संबोधन न लिहिता तिनं थेट लिहिलं, 'तू मला पत्र का लिहीत नाहीस? तू कसा आहेस, आणि तू घरी ये.' आणखी काय सांगायचं ते तिला काही सुचेना. मुख्य सांगायच्या गोष्टी तर सगळ्या सांगून झाल्या होत्या खऱ्या, पण माणसांच्या जगात मनातलं जरा पाल्हाळ लावूनच सांगावं लागतं. मृण्मयीलाही ते कळलं; म्हणून आणखी बराच वेळ विचार कर कर करून तिनं आणखी काही नव्या गोष्टी जोडल्या: 'आता तू मला पत्र लिही, आणि कसा आहेस ते लिही, आणि घरी ये. आई बऱ्या आहेत, बिशू-पुटी बरी आहेत, काल आपल्या काळ्या गाईला वासरू झालं.' एवढं लिहून तिनं पत्र संपवलं. पत्र पाकिटात घालून प्रत्येक अक्षरावर मनातल्या प्रेमाचा एकेक थेंब टाकीत तिनं लिहिलं, श्रीयुत बाबू अपूर्वकृष्ण राय. प्रेम कितीही ओतलं, तरी ओळी सरळ, अक्षरं वळणदार आणि शुद्धलेखन बिनचूक काही झालं नाही.
समाप्ती
पाकिटावर नावाशिवाय आणखी काही लिहावं लागतं, हे मृण्मयीला ठाऊक नव्हतं. सासूबाईंच्या किंवा आणखी कुणाच्या नजरेला पडेल, या लाजेनं तिनं ते पत्र एका विश्वासू दासीच्या हाती टपालात टाकायला पाठवलं. सांगायला नकोच, की या पत्राचा काहीच परिणाम झाला नाही; अपूर्व घरी आला नाही. ८ आईनं पाहिलं, सुट्टी लागली तरी अपूर्व घरी आला नाही. तिला वाटलं, अजूनही तो आपल्यावर रागावलेला आहे. मृण्मयीनंही ठरवलं की अपूर्व आपल्यावर नाराज आहे; आणि मग आपलं पत्र आठवून ती लाजेनं मेल्याहून मेल्यासारखी होऊ लागली. ते पत्र किती क्षुल्लक होतं, त्यात काहीच लिहिलं गेलं नव्हतं, तिच्या मनातलं काहीच त्यातून व्यक्त झालं नव्हतं, ते वाचून अपूर्व मृण्मयीला आणखीच पोरकट समजत असेल, मनातल्या मनात आणखीच तुच्छ लेखत असेल, या विचारानं ती बाण लागल्यासारखी आतल्या आत तडफडू लागली. दासीला तिनं पुन्हा पुन्हा विचारलं, 'ते पत्र तू खरंच टपालात टाकून आलीस ना?' दासीनं तिला हजारदा धीर देत सांगितलं, 'हो गं, मी माझ्या हातानं पेटीत टाकलंय; बाबूंना ते केव्हाच मिळालं असेल.' शेवटी एक दिवस अपूर्वच्या आईनं मृण्मयीला बोलावून सांगितलं, 'सूनबाई, अपू बरेच दिवस घरी आला नाही; म्हणून म्हणते, कलकत्त्याला जाऊन त्याला भेटून यावं. तू येतेस बरोबर?' मृण्मयीनं होकारार्थी मान हलवली, आणि खोलीत येऊन दार लावून घेतलं, पलंगावर पडून उशी छातीशी घट्ट धरली, आणि हसत, कूस बदलत, मनातला उमाळा मोकळा केला; मग हळूहळू गंभीर होऊन, उदास होऊन, शंकाकुशंकांनी भरून जाऊन, ती उठून बसली आणि रडू लागली. अपूर्वला काहीही न कळवता या दोघी पश्चात्तापदग्ध स्त्रिया त्याची मर्जी पुन्हा मिळवण्याची भीक मागायला कलकत्त्याला निघाल्या. अपूर्वची आई तिथे आपल्या जावयाच्या घरी जाऊन उतरली.
समाप्ती
त्याच दिवशी मृण्मयीच्या पत्राची वाट पाहून निराश झालेला अपूर्व संध्याकाळी आपली प्रतिज्ञा मोडून स्वतःच तिला पत्र लिहायला बसला होता. एकही शब्द मनासारखा जमत नव्हता. असं एखादं संबोधन तो शोधत होता की ज्यात प्रेमही दिसेल आणि रुसवाही व्यक्त होईल; शब्द सापडेना, तसतशी मातृभाषेबद्दलची त्याची अश्रद्धा अधिकच पक्की होत होती. तेवढ्यात मेहुण्यांचं पत्र आलं: 'आई आली आहे, लगेच ये आणि रात्रीचं जेवण इथेच कर. बाकी सगळं क्षेमकुशल.' शेवटच्या आश्वासनानंतरही काहीतरी अशुभ घडलं असेल या शंकेनं अपूर्व खिन्न झाला. तो तडक बहिणीच्या घरी जाऊन पोचला. भेटताक्षणीच त्यानं आईला विचारलं, 'आई, सगळं ठीक आहे ना?' आई म्हणाली, 'सगळं ठीक आहे. तू सुट्टीत घरी आला नाहीस, म्हणून मी तुला न्यायला आले आहे.' अपूर्व म्हणाला, 'त्यासाठी एवढे कष्ट घेऊन यायची काय गरज होती; कायद्याच्या परीक्षेचा अभ्यास...' वगैरे वगैरे. जेवताना बहिणीनं विचारलं, 'दादा, या खेपेला वहिनीला तुझ्याबरोबर का आणलं नाहीस?' दादा गंभीरपणे सांगू लागला, 'कायद्याचा अभ्यास वगैरे.' मेहुणे हसून म्हणाले, 'असल्या सगळ्या खोट्या सबबी. आमच्या भीतीनं आणायची हिंमत होत नाही.' बहीण म्हणाली, 'हो, भयंकरच माणूस आहे खरा! एखादं लहान पोर यांना अचानक पाहील तर दचकूनच उठेल.' अशी थट्टामस्करी चालू राहिली, पण अपूर्व अगदी खिन्न होऊन बसला. कोणतंच बोलणं त्याला रुचत नव्हतं. त्याला वाटत होतं, आई एवढी कलकत्त्याला आली, तेव्हा मृण्मयीनं मनात आणलं असतं तर तीही सहज तिच्याबरोबर येऊ शकली असती. आईनं तिला बरोबर आणायचा प्रयत्नही बहुधा केला असेल, पण ती तयार झाली नसेल. संकोचामुळे याबद्दल तो आईला काही विचारूही शकला नाही; सगळं मानवी जीवन आणि सगळी विश्वरचनाच त्याला आदीपासून अंतापर्यंत चुकांनी भरलेली वाटू लागली.
समाप्ती
जेवणानंतर जोराचं वारं सुटलं आणि भयंकर पाऊस सुरू झाला. बहीण म्हणाली, 'दादा, आज इथेच राहा.' दादा म्हणाला, 'नाही, घरी जायला हवं; काम आहे.' मेहुणे म्हणाले, 'रात्री तुला एवढं कसलं काम? इथे एक रात्र राहिलास तर तुला कुणाला जाब द्यावा लागणार नाही; तुला काळजी कसली?' बरीच गळ घातल्यावर, अगदी नाखुशीनं, अपूर्व ती रात्र राहायला तयार झाला. बहीण म्हणाली, 'दादा, तू दमलेला दिसतोस; आता उशीर करू नकोस, चल, झोपायला चल.' अपूर्वचीही तीच इच्छा होती. अंथरुणावर अंधारात एकटं होता आलं तर सुटका; प्रश्नोत्तरं करायला त्याला मुळीच नको वाटत होतं. निजायच्या खोलीच्या दाराशी आल्यावर त्यानं पाहिलं, खोलीत अंधार आहे. बहीण म्हणाली, 'वाऱ्यानं दिवा विझलेला दिसतोय. मग, दिवा आणून देऊ का, दादा?' अपूर्व म्हणाला, 'नको, गरज नाही; मी रात्री दिवा ठेवत नाही.' बहीण गेल्यावर अपूर्व अंधारात जपून पलंगाकडे गेला. पलंगावर चढणार, तेवढ्यात अचानक बांगड्यांच्या किणकिणाटासह दोन कोमल बाहूंच्या विळख्यानं त्याला घट्ट बांधून टाकलं, आणि फुलांच्या पाकळ्यांच्या ओंजळीसारखे दोन ओठ दरोडेखोरासारखे त्याच्यावर तुटून पडले, आणि अखंड आसवांनी भिजलेल्या उत्कट चुंबनांनी त्याला नवल व्यक्त करायलाही उसंत दिली नाही. अपूर्व आधी दचकला; मग त्याला कळलं, हसू आडवं आल्यानं कितीतरी दिवस अपुरा राहिलेला एक प्रयत्न आज आसवांच्या धारांत समाप्त झाला.