रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
संपादक
पत्नी हयात होती तेव्हा प्रभाविषयी मला कसलीच काळजी नव्हती. त्या काळी प्रभापेक्षा प्रभाच्या आईतच मी जरा अधिक गुंतलेला असे. तेव्हा प्रभाचे इवलेसे खेळणे, इवलेसे हसू पाहून, तिचे बोबडे बोल ऐकून आणि तिचे लडिवाळ बिलगणे अनुभवूनच मी तृप्त असे; जोवर बरे वाटे तोवर तिला खेळवत असे, आणि तिने रडायला सुरुवात केली की तिला तिच्या आईच्या मांडीवर सोपवून चटकन आपली सुटका करून घेत असे. तिला पुष्कळ विचाराने आणि कष्टाने माणूस म्हणून घडवावे लागणार आहे, ही गोष्ट माझ्या मनातही कधी आली नव्हती. शेवटी अकाली माझी पत्नी गेली, आणि एके दिवशी आईच्या मांडीवरून निसटून ती मुलगी माझ्या मांडीपाशी येऊन पडली; मी तिला छातीशी ओढून घेतले. पण आईविना पोरक्या मुलीला दुप्पट मायेने वाढवणे हे माझे कर्तव्य आहे, याचा मी अधिक विचार केला होता, की पत्नीविना एकट्या पडलेल्या बापाला परम काळजीने जपणे हे आपले कर्तव्य आहे, हे तिला अधिक जाणवले होते, हे मला नक्की सांगता येत नाही. पण सहा वर्षांची असल्यापासूनच ती घरची गृहिणी होऊन वावरू लागली होती. स्पष्ट दिसत होते की, एवढीशी पोर आपल्या बाबांची एकमेव पालक होण्याची धडपड करते आहे. मी मनातल्या मनात हसलो आणि स्वतःला तिच्या स्वाधीन करून टाकले. पाहिले की, मी जितका निकामी, जितका असहाय होतो, तितके तिला बरे वाटते; पाहिले की, मी स्वतःच खुंटीवरचे कपडे किंवा छत्री काढून घेतली, तर आपल्या अधिकारावर कुणी अतिक्रमण केल्यासारखा तिचा आविर्भाव होतो. बाबांसारखी एवढी मोठी बाहुली तिला यापूर्वी कधीच मिळाली नव्हती; म्हणून बाबांना जेवू घालून, कपडे घालून, अंथरुणावर निजवून ती दिवसभर मोठ्या आनंदात असते. फक्त पाढ्यांचे पुस्तक आणि पद्यपाठाचा पहिला भाग शिकवताना माझ्या पितृत्वाला जरासे जागे करावे लागे.
संपादक
पण अधूनमधून काळजी वाटे — मुलीचे लग्न चांगल्या स्थळी करायचे तर बराच पैसा लागेल; माझ्यापाशी एवढा पैसा कुठला? मुलीला जमेल तेवढे लिहायला-वाचायला शिकवतो आहे खरा, पण एखाद्या पुऱ्या मूर्खाच्या हाती पडली तर तिची काय दशा होईल! मग कमाईकडे लक्ष वळवले. सरकारी कचेरीत नोकरी करण्याचे वय उलटून गेले होते, आणि इतर कचेऱ्यांत शिरकाव करण्याचीही कुवत नव्हती. पुष्कळ विचार करून पुस्तके लिहू लागलो. बांबूच्या नळीला भोके पाडली की तिच्यात तेल राहत नाही, पाणी राहत नाही; धरून ठेवण्याची तिची शक्तीच मुळात नाहीशी होते; संसारातले कोणतेच काम तिच्याने होत नाही; पण फुंकर घातली की फुकटात बासरी मात्र छान वाजते. मला पक्के ठाऊक होते की, संसारातल्या कोणत्याच कामात ज्या अभाग्याची बुद्धी चालत नाही, तो चांगले पुस्तक खात्रीने लिहील. त्याच धाडसावर एक प्रहसन लिहिले; लोकांनी त्याला चांगले म्हटले, आणि रंगभूमीवर त्याचा प्रयोगही होऊन गेला. अचानक कीर्तीची चव लागली आणि असे संकट ओढवले की, प्रहसन काही केल्या सुटेना. दिवसभर व्याकुळ, चिंताग्रस्त चेहरा करून प्रहसने लिहू लागलो. प्रभा आली आणि लाडिकपणे, मायेने हसत तिने विचारले, 'बाबा, आंघोळीला नाही का जायचं?' मी खेकसलो, 'जा आता, जा, आता त्रास देऊ नकोस.' त्या चिमुरडीचा चेहरा एका फुंकरीने विझवलेल्या दिव्यासारखा काळवंडला असावा; दुखावलेल्या, रुसव्याने भरून आलेल्या हृदयाने ती केव्हा मुकाट्याने खोलीतून निघून गेली, हे मला कळलेही नाही.
संपादक
मोलकरणीला हाकलून देतो, नोकराला मारायला धावतो, एखादा भिकारी सूर लावून भीक मागायला आला की काठी घेऊन त्याच्या मागे लागतो. माझे घर रस्त्याच्या अगदी कडेलाच असल्याने, एखादा निरुपद्रवी वाटसरू खिडकीबाहेरून मला रस्ता विचारू लागला, की मी त्याला जहन्नम नावाच्या एका भलत्याच ठिकाणी जाण्याची विनंती करतो. — हाय रे, कुणालाच कळत नव्हते की मी एक फार मजेदार प्रहसन लिहितो आहे! पण जितकी मजा आणि जितकी कीर्ती होत होती, त्या प्रमाणात पैसा मात्र काहीच मिळाला नव्हता. तेव्हा पैशाची आठवणही नव्हती. इकडे प्रभाला शोभतील असे वर, इतर भल्या गृहस्थांना मुलीच्या लग्नाच्या ओझ्यातून सोडवण्यासाठी, गोकुळातल्या कृष्णासारखे कुणाच्या नकळत मोठे होत होते; माझे त्याकडे लक्षच नव्हते. भुकेने पोटात आग पडल्याशिवाय मला भान आले नसते, पण इतक्यात एक संधी चालून आली. जाहिरग्रामच्या एका जमीनदाराने एक वर्तमानपत्र काढले आणि त्याचा पगारी संपादक होण्याची विनंती करून मला निरोप पाठवला. मी काम पत्करले. काही दिवस अशा दराऱ्याने लिहिले की, रस्त्यात निघालो तर लोक बोटाने मला एकमेकांना दाखवत, आणि आपण भर दुपारच्या सूर्यासारखे, डोळा भरून पाहता न येणारे झालो आहोत, असे मला वाटू लागले. जाहिरग्रामच्या शेजारी आहिरग्राम. दोन्ही गावांच्या जमीनदारांत मोठे हाडवैर. पूर्वी शब्दाला शब्द लागला की लाठ्या चालत. आता दोन्ही पक्षांनी मॅजिस्ट्रेटकडे मुचलका लिहून देऊन लाठ्या थांबवल्या आहेत, आणि पूर्वीच्या खुनी लाठीबाजांच्या जागी कृष्णाच्या या गरीब जिवाला — मला — नेमले आहे. सगळेच म्हणतात, मी त्या पदाची प्रतिष्ठा राखली आहे. माझ्या लेखणीच्या जाचापुढे आहिरग्रामला मान वर करता येत नाही. त्यांची जात-कूळ, पूर्वजांचा इतिहास — सगळे मी आद्योपान्त शाईने बरबटून टाकले आहे.
संपादक
हे दिवस मोठे छान होते. मी चांगलाच गुटगुटीत झालो. चेहरा सदा प्रसन्न, हसरा असे. आहिरग्रामच्या पितरांवर नेम धरून एकेक जिव्हारी लागणारा शब्दांचा भाला फेकत असे, आणि अवघे जाहिरग्राम हसून हसून पिकल्या खरबुजासारखे तडकून फुटे. मोठ्या आनंदात होतो. शेवटी आहिरग्रामनेही एक वर्तमानपत्र काढले. ते कोणतीच गोष्ट आडपडदा ठेवून बोलत नसे. अगदी निर्भेळ, रोजच्या चालू बोलीतल्या शिव्या ते अशा उत्साहाने हासडत असे की, छापील अक्षरेसुद्धा जणू डोळ्यांसमोर किंचाळत आहेत असे वाटे. म्हणूनच दोन्ही गावांच्या लोकांना त्याचे म्हणणे अगदी स्पष्ट समजत असे. पण मी आपल्या जुन्या सवयीनुसार अशी मजा करत, इतक्या कुटिल चातुर्याने विरोधकांवर हल्ला चढवत असे, की माझ्या बोलण्याचा मथितार्थ काय, हे शत्रू-मित्र कुणालाच कळत नसे. त्याचा परिणाम असा झाला की, जिंकलो तरी सगळ्यांना वाटे, माझी हार झाली. नाइलाजाने सुरुचीविषयी एक उपदेशपर लेख लिहिला. पाहिले, तर फार मोठी चूक करून बसलो होतो; कारण खऱ्या चांगल्या गोष्टीची जितकी सहज थट्टा करता येते, तितकी एखाद्या हास्यास्पद गोष्टीची करता येत नाही. हनुवंशी मनुवंशीयांची जितक्या सहज टिंगल उडवू शकतात, तितक्या यशस्वीपणे मनुवंशी हनुवंशीयांची टिंगल कधीच उडवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी दात विचकून सुरुचीला देशाबाहेर पिटाळून लावले. माझे मालक आता माझी पूर्वीसारखी कदर करत नाहीत. सभेतही मला काही मान उरला नाही. रस्त्यात निघालो की लोक आपणहून पुढे होऊन बोलायला येत नाहीत. इतकेच काय, मला पाहून कुणी कुणी हसूही लागले आहेत. दरम्यान माझ्या प्रहसनांचाही लोकांना पुरता विसर पडला आहे. अचानक वाटले, मी जणू काडेपेटीतली एक काडी आहे; मिनिटभर पेटलो आणि अगदी टोकापर्यंत जळून संपलो.
संपादक
मन असे खचून गेले की, डोके आपटून मेलो तरी एक ओळ लिहून होत नाही. वाटू लागले, जगण्यात काही सुख नाही. प्रभा आता मला घाबरते. बोलावल्याशिवाय एकाएकी जवळ यायचे धाडस करत नाही. तिला कळून चुकले आहे की, मजेदार गोष्टी लिहू शकणाऱ्या बाबांपेक्षा मातीची बाहुली कितीतरी चांगली सोबतीण. एके दिवशी दिसले की आमच्या आहिरग्रामप्रकाशने जमीनदाराला सोडून मलाच धरले आहे. काही अत्यंत ओंगळ गोष्टी लिहिल्या आहेत. माझी ओळखीची मित्रमंडळी एकामागून एक, सगळीच, ते वर्तमानपत्र घेऊन आली आणि हसत हसत मला वाचून दाखवून गेली. कुणी कुणी म्हणाले, याचा विषय काहीही असो, भाषेची करामत आहे. म्हणजे, शिवी दिली आहे हे भाषा पाहताच स्वच्छ कळते. दिवसभर वीस जणांकडून तेच एक वाक्य ऐकले. माझ्या बिऱ्हाडासमोर बागेसारखी थोडी जागा होती. संध्याकाळी अगदी व्यथित मनाने मी तिथे एकटाच फेऱ्या घालत होतो. पाखरे घरट्यांत परतली आणि किलबिल थांबवून निवांतपणे संध्याकाळच्या शांतीच्या स्वाधीन झाली, तेव्हा मला चांगलेच कळून चुकले की पाखरांत विनोदी लेखकांचा कंपू नसतो, आणि सुरुचीवरून वादही होत नाहीत. मनात एकसारखा एकच विचार चालला होता — काय उत्तर द्यावे? सभ्यतेची एक मोठी अडचण अशी की, सगळ्याच ठिकाणचे लोक ती समजू शकत नाहीत. असभ्यतेची भाषा त्या मानाने अधिक ओळखीची; म्हणून विचार करत होतो की, त्याच धर्तीचे एक तोंडात मारल्यासारखे उत्तर लिहिलेच पाहिजे. काही केल्या हार मानायची नाही. इतक्यात त्या संध्याकाळच्या अंधारात एक ओळखीचा, इवलासा आवाज माझ्या कानी आला, आणि त्यापाठोपाठ माझ्या तळहाताला एक कोमल, उबदार स्पर्श जाणवला. मी इतका क्षुब्ध, इतका हरवलेला होतो की, त्या क्षणी तो आवाज आणि तो स्पर्श ओळखीचे असूनही मला उमगले नाहीत.
संपादक
पण क्षणभरातच तो आवाज हळूहळू माझ्या कानांत जागा झाला, तो अमृतस्पर्श माझ्या तळहातावर जिवंत होऊन उठला. ती मुलगी एकदा हळूच जवळ आली होती आणि हलक्या आवाजात तिने हाक मारली होती, 'बाबा'. काहीच उत्तर न मिळाल्याने माझा उजवा हात उचलून एकदा आपल्या कोमल गालावरून फिरवून ती पुन्हा हळूहळू घराकडे परत चालली आहे. कितीतरी दिवसांत प्रभाने मला अशी हाक मारली नव्हती, आणि आपणहून येऊन माझे इतकेसेही लाड केले नव्हते. म्हणूनच आज त्या मायेच्या स्पर्शाने माझे हृदय एकाएकी अतिशय व्याकुळ झाले. थोड्या वेळाने घरात परत जाऊन पाहिले, तर प्रभा अंथरुणावर निजली आहे. शरीर क्लांत, म्लान; डोळे किंचित मिटलेले; दिवस मावळताना गळून पडलेल्या फुलासारखी ती पडून आहे. डोक्याला हात लावून पाहिले, तर डोके अगदी तापलेले; उष्ण उष्ण श्वास चालला आहे; कपाळावरची शीर ठणठणते आहे. मला उमगले, येऊ घातलेल्या आजाराच्या तापाने व्याकुळ होऊन, तहानलेल्या हृदयाने ती मुलगी एकदा बापाची माया, बापाचे लाड मागायला गेली होती — आणि बाप तेव्हा जाहिरप्रकाशसाठी एक चांगलेच खरमरीत उत्तर रचत होता. मी तिच्याजवळ येऊन बसलो. मुलीने काहीच न बोलता तापाने तप्त झालेल्या आपल्या दोन्ही तळहातांत माझा हात ओढून घेतला आणि त्यावर गाल टेकवून ती मुकाट्याने पडून राहिली. जाहिरग्राम आणि आहिरग्रामचे जेवढे कागद होते, ते सगळे मी जाळून टाकले. कोणतेच उत्तर लिहिले गेले नाही. हार मानून इतके सुख कधीच झाले नव्हते. मुलीची आई गेली तेव्हा तिला मांडीवर ओढून घेतले होते; आज तिच्या सावत्र आईचे अंत्यसंस्कार उरकून, पुन्हा तिला छातीशी उचलून घेऊन मी घरात निघून गेलो.