रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
शेजारीण
माझी शेजारीण बालविधवा. शरदातल्या दवाने भिजून देठावरून गळून पडलेल्या प्राजक्ताच्या फुलासारखी; कोणाच्या मधुरात्रीच्या फुलशेजेसाठी ती नव्हती, ती केवळ देवपूजेसाठीच वाहिलेली होती. मनातल्या मनात मी तिची पूजा करीत असे. तिच्याविषयी माझ्या मनात जो भाव होता, तो 'पूजा' या शब्दाखेरीज दुसऱ्या कोणत्याही सोप्या भाषेत मांडावा अशी माझी इच्छा नाही — दुसऱ्यापाशी तर नाहीच, स्वतःपाशीसुद्धा नाही. माझा जिवलग मित्र नवीनमाधव, त्यालासुद्धा यातले काहीच ठाऊक नव्हते. आपली सर्वांत खोल भावना अशी लपवून, निर्मळ राखून ठेवली होती, याचा मला थोडासा अभिमानही वाटत असे. पण मनाचा आवेग डोंगरातून उगम पावणाऱ्या नदीसारखा आपल्या जन्मशिखरावरच कोंडून राहायला तयार नसतो. कोणत्या ना कोणत्या वाटेने बाहेर पडण्याची धडपड करतो. ते जमले नाही, तर छातीत कळ उठवीत राहतो. म्हणून विचार करीत होतो, आपला भाव कवितेतून व्यक्त करावा. पण माझी संकोचलेली लेखणी काही केल्या पुढे सरकेना. परम आश्चर्याची गोष्ट अशी की, नेमक्या याच वेळी माझा मित्र नवीनमाधव याला एकाएकी, प्रचंड वेगाने कविता लिहिण्याची लहर आली — जणू अचानक भूकंपच झाला. त्या बिचाऱ्यावर असे दैवी संकट पूर्वी कधी ओढवले नव्हते, त्यामुळे या अभिनव उलथापालथीसाठी तो जराही तयार नव्हता. वृत्त म्हणा, यमक म्हणा, कशाचीच जुळवाजुळव त्याच्या हाताशी नव्हती; तरीही तो हिंमत हरला नाही, हे पाहून मी चकित झालो. म्हातारपणी केलेल्या दुसऱ्या बायकोसारखी कविता त्याच्या मानगुटीवर बसली. वृत्त-यमकाच्या मदतीसाठी आणि दुरुस्तीसाठी नवीनमाधव माझ्याकडे आश्रयाला आला.
शेजारीण
कवितांचे विषय नवे नव्हते; पण जुनेही नव्हते. म्हणजे त्यांना चिरनूतन म्हणता येईल, चिरपुरातन म्हटले तरी चालेल. प्रेमकविता, प्रियतमेला उद्देशून. मी त्याला एक धक्का देत हसून विचारले, 'काय रे, या कोण?' नवीन हसून म्हणाला, 'अजून पत्ता लागलेला नाही.' या नवीन कवीला मदत करण्याच्या कामात मला मोठा दिलासा मिळाला. नवीनच्या काल्पनिक प्रियतमेवर मी माझा कोंडलेला आवेग ओतला. पिल्ले नसलेली कोंबडी बदकाचे अंडे मिळाले तरी जशी छाती पसरून ते उबवायला बसते, तसा अभागी मी नवीनमाधवाच्या भावांवर हृदयाची सगळी ऊब घेऊन ठाण मांडून बसलो. त्या नवशिक्याचे लिखाण मी इतक्या जोमाने दुरुस्त करू लागलो की, जवळजवळ पंधरा आणे लिखाण माझेच झाले. नवीन चकित होऊन म्हणे, 'अगदी हेच मला म्हणायचं असतं, पण म्हणता येत नाही. पण तुला हे सगळे भाव सुचतात तरी कुठून?' मी कवीच्या थाटात उत्तर देई, 'कल्पनेतून. कारण सत्य मुकं असतं, कल्पनाच बोलकी असते. सत्य घटना भावनांच्या प्रवाहावर दगडासारखी दडपून बसते; कल्पनाच त्याला वाट मोकळी करून देते.' नवीन गंभीर चेहऱ्याने जरासा विचार करून म्हणाला, 'खरंच, तसंच दिसतंय. बरोबर आहे.' पुन्हा थोडा वेळ विचार करून म्हणाला, 'बरोबर, बरोबर.' आधीच सांगितले आहे की, माझ्या प्रेमात एक व्याकूळ संकोच होता; म्हणून स्वतःच्या तोंडून मला काही केल्या लिहिता आले नाही. नवीनला पडद्यासारखे मध्ये उभे केले, तेव्हा कुठे माझ्या लेखणीला तोंड फुटले. लिखाण जणू रसाने भरून, उष्णतेने तडकून फुटू लागले. नवीन म्हणाला, 'हे तर तुझंच लिखाण आहे. तुझ्याच नावाने छापू या.'
शेजारीण
मी म्हणालो, 'भलतंच! हे तुझंच लिखाण आहे; मी फक्त थोडासा फेरफार केलाय, इतकंच.' हळूहळू नवीनचीही तशीच समजूत झाली. ज्योतिर्विद जसा नक्षत्राच्या उदयाची वाट पाहत आकाशाकडे टक लावून बसतो, तसा मीही अधूनमधून आमच्या शेजारच्या घराच्या खिडकीकडे पाहत असे, हे मी नाकारू शकत नाही. अधूनमधून भक्ताचा तो व्याकूळ दृष्टिक्षेप सफलही होई. कर्मयोगात रमलेल्या त्या ब्रह्मचारिणीच्या सौम्य मुखावरून शांत, स्निग्ध प्रकाश परावर्तित होऊन क्षणार्धात माझ्या चित्तातली सारी खळबळ शमवून टाकी. पण त्या दिवशी एकाएकी हे काय पाहिले! माझ्या चंद्रलोकातही अजून ज्वालामुखी जागा आहे की काय? तिथल्या निर्जन, समाधिमग्न गिरिगुहांतला सारा अग्निदाह अजूनही पुरता विझलेला नाही की काय? त्या दिवशी वैशाखातल्या तिसऱ्या प्रहरी ईशान्येकडून ढग दाटून येत होते. येऊ घातलेल्या त्या वादळाच्या ढगांतून फाकलेल्या रौद्र प्रकाशात माझी शेजारीण खिडकीत एकटीच उभी होती. त्या दिवशी शून्यात खिळलेल्या तिच्या गडद काळ्या दृष्टीत केवढी दूरवर पसरलेली, गहिरी वेदना मला दिसली! आहे, माझ्या त्या चंद्रलोकात अजून ऊब आहे! अजूनही तिथे उष्ण श्वास वाहतो आहे. ती देवासाठी नाही; माणसासाठीच आहे. तिच्या त्या दोन डोळ्यांतली विशाल व्याकुळता त्या दिवशीच्या वादळी प्रकाशात आतुर पाखरासारखी उडत चालली होती. स्वर्गाकडे नव्हे — मानवी हृदयाच्या घरट्याकडे. आकांक्षेने उजळलेला तो उत्सुक दृष्टिक्षेप पाहिल्यापासून अशांत मनाला स्थिर ठेवणे मला कठीण होऊन बसले. आता नुसत्या दुसऱ्याच्या कच्च्या कविता दुरुस्त करून समाधान होईना — कसलेतरी, कोणतेही काम करण्याची तळमळ लागली.
शेजारीण
तेव्हा मी संकल्प केला की, बंगालमध्ये विधवाविवाह रूढ करण्यासाठी आपले सारे प्रयत्न पणाला लावायचे. केवळ भाषणे आणि लेखन नव्हे, तर पैशाची मदत करायलाही मी पुढे सरसावलो. नवीन माझ्याशी वाद घालू लागला; तो म्हणाला, 'आजन्म वैधव्यात एक पवित्र शांती असते; एकादशीच्या क्षीण चांदण्यात न्हालेल्या समाधिभूमीसारखी एक विशाल रमणीयता असते. नुसत्या लग्नाच्या शक्यतेनेच ती भंगून जात नाही का?' असल्या काव्यमय गोष्टी ऐकल्या की माझे डोके फिरे. दुष्काळात जो माणूस झिजून मरतो आहे, त्याच्यापुढे एखाद्या खाऊन-पिऊन गब्बर माणसाने अन्नाच्या स्थूलपणाची किळस दाखवत फुलांचा सुगंध आणि पक्ष्यांचे गाणे देऊन त्या मरणोन्मुखाचे पोट भरू पाहिले, तर ते कसे दिसेल? मी चिडून म्हणालो, 'हे बघ नवीन, आर्टिस्ट लोक म्हणतात, देखावा म्हणून पडक्या घरालाही एक सौंदर्य असतं. पण घराकडे नुसतं चित्र म्हणून पाहून चालत नाही; त्यात राहावं लागतं. तेव्हा आर्टिस्ट काहीही म्हणोत, दुरुस्ती आवश्यक आहे. वैधव्यावर तुला दुरून छानपैकी कविता करायची आहे; पण त्यात आकांक्षांनी भरलेलं एक माणसाचं हृदय आपल्या नाना वेदना घेऊन राहतं आहे, हे लक्षात ठेवणं तुझं कर्तव्य आहे.' मला वाटले होते, नवीनमाधवाला काही केल्या आपल्या पक्षात ओढता येणार नाही; म्हणूनच त्या दिवशी मी जरा जास्तच तावातावाने बोललो होतो. पण पाहतो तो काय — माझे भाषण संपताच नवीनमाधवाने एकच खोल, दीर्घ निःश्वास टाकून माझे सगळे म्हणणे मान्य केले; राहिलेले आणखी कितीतरी चांगले चांगले मुद्दे मांडायची संधीच दिली नाही. आठवडाभराने नवीन येऊन म्हणाला, 'तू मदत करणार असलास तर मी एका विधवेशी लग्न करायला तयार आहे.'
शेजारीण
मला इतका आनंद झाला — नवीनला छातीशी ओढून मी कडकडून मिठी मारली; म्हणालो, 'लागतील तितके पैसे मी देईन.' तेव्हा नवीनने आपली सगळी कहाणी सांगितली. मला कळले की, त्याची प्रियतमा काल्पनिक नव्हती. काही काळापासून तो एका विधवा स्त्रीवर दुरून प्रेम करीत होता; कोणापाशीही त्याने ते उघड केले नव्हते. ज्या मासिकात नवीनच्या — उर्फ माझ्या — कविता छापून येत, त्या मासिकाचे अंक योग्य ठिकाणी जाऊन पोचत होते. कविता वाया गेल्या नव्हत्या. प्रत्यक्ष भेट न घेता मन जिंकण्याचा हा एक उपाय माझ्या मित्रवर्यांनी शोधून काढला होता. पण नवीन म्हणतात, त्यांनी काही कारस्थान रचून या युक्त्या योजल्या नव्हत्या. इतकेच काय, विधवाबाईंना वाचता येत नाही, अशीच त्यांची समजूत होती. विधवेच्या भावाच्या नावाने ते अंक बिनसहीचे, फुकट पाठवून देत. हा केवळ मनाचे समाधान करण्याचा एक वेडेपणा होता. त्यांना वाटे, देवतेच्या चरणी पुष्पांजली वाहिली — तिला कळो वा न कळो, ती स्वीकारो वा न स्वीकारो. नाना निमित्ते काढून नवीनांनी विधवेच्या भावाशी जी मैत्री जुळवून घेतली होती, तिच्यामागेही कोणताही हेतू नव्हता, असे नवीन म्हणतात. ज्याच्यावर प्रेम असते, त्याच्या जवळच्या नातलगाचा सहवासही गोड वाटतो. अखेरीस भावाच्या गंभीर आजारपणाच्या निमित्ताने बहिणीशी भेट कशी झाली, ती एक लांबलचक कहाणी आहे. कवीची आणि त्याच्या कवितेच्या विषयाची प्रत्यक्ष ओळख होऊन कवितेविषयी बरीच चर्चा होऊन गेली आहे. आणि ती चर्चा केवळ छापून आलेल्या त्या चार-दोन कवितांपुरतीच मर्यादित राहिली, असेही नाही.
शेजारीण
अलीकडे माझ्याशी वादात हार खाल्ल्यावर नवीनने त्या विधवेला भेटून चक्क लग्नाचा प्रस्तावच मांडला आहे. सुरुवातीला काही केल्या तिची संमती मिळाली नाही. तेव्हा नवीनने माझ्या तोंडचे सगळे युक्तिवाद वापरून, आणि त्यात स्वतःच्या डोळ्यांतले दोन-चार थेंब पाणी मिसळून, तिला पुरती हार मानायला लावली आहे. आता विधवेचा पालक, तिच्या आत्याचा नवरा, काही पैसे मागतो आहे. मी म्हणालो, 'आत्ताच घे.' नवीन म्हणाला, 'शिवाय, लग्नानंतर पहिले पाच-सहा महिने बाबा माझा महिन्याचा खर्च नक्की बंद करतील; तेवढ्या दिवसांसाठी आम्हा दोघांच्या खर्चाची सोय करून द्यावी लागेल.' एक शब्दही न बोलता मी चेक लिहून दिला. म्हणालो, 'आता त्यांचं नाव सांग. माझी तुझ्याशी कसलीच चढाओढ नाही, तेव्हा ओळख सांगायला घाबरू नकोस. तुझ्या अंगाला हात लावून शपथ घेतो, मी त्यांच्यावर कविता लिहिणार नाही; आणि लिहिलीच, तर त्यांच्या भावाला न पाठवता तुझ्याकडे पाठवून देईन.' नवीन म्हणाला, 'अरे, मला त्याची भीती नाही. विधवाविवाहाच्या लाजेने त्या फार संकोचल्या आहेत; म्हणून तुम्हा लोकांपाशी त्यांच्याविषयी काही बोलू नको, असं त्यांनी परोपरीने बजावलं होतं. पण आता झाकून ठेवण्यात काही अर्थ नाही. तुझी शेजारीणच त्या — १९ नंबरच्या घरात राहतात.' हृदय जर लोखंडी बॉयलर असते, तर एका धक्क्यासरशी धाडकन फुटले असते. मी विचारले, 'विधवाविवाहाला त्यांचा विरोध नाही?' नवीन हसून म्हणाला, 'सध्या तरी नाही.' मी म्हणालो, 'केवळ कविता वाचूनच त्या भाळल्या?' नवीन म्हणाला, 'का बरं? माझ्या त्या कविता काही वाईट नव्हत्या की!' मी मनातल्या मनात म्हणालो, 'धिक्!' धिक् कुणाला? त्यांना, की मला, की विधात्याला? पण धिक्!