रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
शेवटची रात्र
'मावशी!' 'झोप आता यतीन, रात्र झाली ना.' 'होऊ दे रात्र, माझे दिवस तसेही फार उरले नाहीत. मी म्हणत होतो, मणीला तिच्या माहेरी — विसरतोय मी, तिचे वडील हल्ली कुठे असतात —' 'सीतारामपुरात.' 'हां, सीतारामपुरात. तिथेच मणीला पाठवून दे. आणखी किती दिवस ती रोग्याची सेवा करत बसणार! तिची तब्येत काही तितकी खंबीर नाही.' 'ऐक रे जरा! अशा अवस्थेत तुला सोडून सूनबाई माहेरी जायचं म्हणेलच कशाला?' 'डॉक्टरांनी काय सांगितलंय ते तिला —' 'नसेना का तिला ठाऊक — डोळ्यांनी तर पाहतेय ना. त्या दिवशी माहेरी जाण्याचं मी नुसतं जरा सुचवलं, तर सूनबाईला रडू आवरेना.' * * * मावशीच्या या बोलण्यात सत्याला थोडी मुरड घातलेली होती, हे सांगायलाच हवे. त्या दिवशी या विषयावर मणीशी त्यांचे जे बोलणे झाले होते, ते खालीलप्रमाणे. 'सूनबाई, तुझ्या माहेरहून काही खबर आलीय वाटतं? तुझा चुलतभाऊ अनाथ दिसल्यासारखा वाटला.' 'हो, आईनं निरोप धाडलाय, येत्या शुक्रवारी माझ्या धाकट्या बहिणीचं अन्नप्राशन आहे. म्हणून विचार करतेय —' 'छान की बाळ, एक सोन्याचा हार पाठवून दे, तुझी आई खूश होईल.' 'मी जायचं म्हणतेय. धाकटी बहीण मी अजून पाहिलीच नाही, पाहावीशी वाटते.' 'हे काय भलतंच! यतीनला एकटा टाकून जाणार? डॉक्टर काय म्हणाले ते ऐकलंस ना?' 'डॉक्टर तर म्हणत होते, अजून तसं काही विशेष —' 'ते काहीही म्हणोत, त्याची ही दशा पाहून तू जाणार तरी कशी?' 'माझ्या तीन भावांच्या पाठीवर ही एकच बहीण, फार लाडाची — ऐकलंय, अन्नप्राशन मोठ्या थाटात होणार आहे — मी गेले नाही तर आई फार —' 'तुझ्या आईची तऱ्हा काही मला समजत नाही बाई. पण यतीनच्या अशा वेळी तू गेलीस तर तुझे वडील रागावतील, हे मी आत्ताच सांगून ठेवते.'
शेवटची रात्र
'ते ठाऊक आहे मला. म्हणून तुम्ही एक ओळ लिहून द्या मावशी, की काळजीचं काही कारण नाही — मी गेले तर काही विशेष —' 'तू गेल्यानं कुणाचं काहीच अडणार नाही, हे का मला ठाऊक नाही! पण तुझ्या वडिलांना लिहायचंच झालं, तर माझ्या मनात जे आहे ते सगळं उघड उघड लिहीन.' 'बरं, ठीक आहे — तुम्ही नका लिहू. मी यांनाच जाऊन सांगितलं की हे —' 'हे बघ सूनबाई, आजवर पुष्कळ सोसलं — पण यासाठी तू यतीनकडे गेलीस, तर ते मात्र मी मुळीच सहन करणार नाही. तुझे वडील तुला पुरतं ओळखतात, त्यांना तू भुलवू शकणार नाहीस.' * * * एवढे बोलून मावशी निघून आल्या. मणी काही वेळ रागाने अंथरुणावर पडून राहिली. शेजारच्या घरातून तिची सखी आली आणि तिने विचारले, 'हे काय गं सखे, फुगून का बसलीस?' 'बघ ना गं, माझ्या एकुलत्या एका बहिणीचं अन्नप्राशन — आणि हे लोक मला जाऊ द्यायला तयार नाहीत.' 'अगं बाई, हे काय बोलतेस! जाणार तरी कुठे? नवरा रोगानं झुरतो आहे ना!' 'मी तर काहीच करत नाही, करूही शकत नाही. घरात सगळे गप्प गप्प, माझा जीव गुदमरतो. मी अशी राहू शकत नाही, सांगून ठेवते.' 'धन्य आहेस बाई तू!' 'ते काय, मला तुमच्यासारखं लोकांना दाखवण्यापुरतं सोंग करता येत नाही. कुणी काही म्हणेल म्हणून तोंड लपवून घराच्या कोपऱ्यात पडून राहणं माझ्याच्यानं होणार नाही.' 'बरं, मग करणार काय, सांग तरी.' 'मी जाणारच, मला कुणी अडवू शकणार नाही.' 'इश्श, हा तोरा पाहून मेलेच मी! — चालले, मला कामं आहेत.' २ माहेरी जाण्याच्या गोष्टीवरून मणी रडली — ही बातमी ऐकून यतीन अस्वस्थ झाला; त्याने उशी पाठीशी ओढून घेतली आणि थोडा उठून टेकून बसला. म्हणाला, 'मावशी, ही खिडकी आणखी थोडी उघड, आणि हा दिवा या खोलीत नको.'
शेवटची रात्र
खिडकी उघडताच निःस्तब्ध रात्र अनंत तीर्थयात्रेच्या वाटसरूसारखी रोग्याच्या दाराशी येऊन मुकाट उभी राहिली. किती युगांतल्या किती मृत्युसमयांचे साक्षी असलेले ते तारे यतीनच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिले. त्या विशाल अंधाराच्या पटावर यतीनला आपल्या मणीचा चेहरा दिसला. त्या चेहऱ्यातले दोन मोठे डोळे टपोऱ्या अश्रूंनी भरलेले — ते अश्रू कधी संपलेच नाहीत, कायमचे भरून राहिले. बराच वेळ तो गप्प आहे हे पाहून मावशी निश्चिंत झाल्या. त्यांना वाटले, यतीनला झोप लागली. इतक्यात एकाएकी तो बोलू लागला, 'मावशी, तुम्ही सगळे आजवर असंच समजत आलात की मणीचं मन चंचल आहे, आपल्या घरात तिचं मन रमलं नाही. पण बघ —' 'नाही रे बाळा, आमचाच गैरसमज झाला होता — वेळ आली की माणूस ओळखू येतो.' 'मावशी!' 'यतीन, झोप रे बाळा.' 'मला जरा विचार करू दे, जरा बोलू दे. वैतागू नकोस गं मावशी.' 'बरं, बोल रे बाळा.' 'मी म्हणत होतो, माणसाला स्वतःचं मन स्वतःला समजायलाच किती वेळ लागतो. एके काळी जेव्हा वाटायचं की आपल्यापैकी कुणालाच मणीचं मन मिळालं नाही, तेव्हा मी गप्प राहून सहन केलं. तुम्ही तेव्हा —' 'नाही रे बाळा, असं म्हणू नकोस — मीही सहन केलंच.' 'मन म्हणजे काही मातीचं ढेकूळ नव्हे, की उचललं आणि घेतलं. मला ठाऊक होतं, मणीला अजून स्वतःचं मन कळलेलं नाही; कुठल्यातरी आघातानं ज्या दिवशी कळेल, त्या दिवशी मग —' 'खरं आहे, यतीन.' 'म्हणूनच तिच्या पोरकटपणाचं मी कधीच काही मनाला लावून घेतलं नाही.' मावशींनी या बोलण्याला काहीच उत्तर दिले नाही; फक्त मनातल्या मनात एक दीर्घ निःश्वास टाकला. कितीदा त्यांनी पाहिले होते — यतीन व्हरांड्यात येऊन रात्र काढत असे, पावसाचे शिंतोडे अंगावर येत तरी आत जात नसे. कितीदा तो डोके दुखत असताना अंथरुणावर पडून असे; मनातून फार वाटे, मणीने येऊन कपाळावरून जरा हात फिरवावा.
शेवटची रात्र
मणी त्या वेळी मैत्रिणींचा घोळका जमवून नाटक पाहायला जायची तयारी करत असे. मावशी यतीनला वारा घालायला आल्या, तर तो वैतागून त्यांना परत पाठवी. त्या वैतागात किती वेदना दडलेली आहे, हे त्यांना ठाऊक होते. कितीदा त्यांना यतीनला सांगावेसे वाटले होते, 'बाळा, त्या पोरीकडे इतकं लक्ष देऊ नकोस — तिलाही जरा ओढ वाटायला शिकू दे — माणसाला थोडं रडवायलाच हवं.' पण या गोष्टी सांगण्यासारख्या नसतात, सांगितल्या तरी कुणाला कळत नाहीत. यतीनच्या मनात स्त्रीदेवतेचे एक पीठस्थान होते, तिथे त्याने मणीला बसवले होते. त्या तीर्थक्षेत्रात स्त्रीचे अमृतपात्र आपल्या वाट्याला कायमचे रिकामेच राहू शकेल, ही कल्पना करणे त्याला सोपे नव्हते. म्हणून पूजा चालूच होती, अर्घ्य भरून येत होते, वरप्राप्तीची आशा हार मानत नव्हती. मावशींना पुन्हा वाटत होते की यतीन झोपला, इतक्यात तो एकाएकी म्हणाला, 'मला ठाऊक आहे, तुला वाटत होतं, मणीबरोबर मी सुखी होऊ शकलो नाही. म्हणून तू तिच्यावर रागवायचीस. पण मावशी, सुख म्हणजे त्या ताऱ्यांसारखं — सगळा अंधार लिंपून टाकत नाही, मधे मधे फटी राहतातच. आयुष्यात किती चुका करतो, किती गैरसमज करून घेतो, तरी त्यांच्या फटींमधून स्वर्गाचा प्रकाश उजळला नाही का? आज कुठून कोण जाणे, माझं अंतर्मन असं आनंदानं भरून आलंय!' मावशी हळूहळू यतीनच्या कपाळावरून हात फिरवू लागल्या. अंधारात त्यांच्या दोन्ही डोळ्यांतून जे पाणी ओघळत होते, ते कुणालाच दिसले नाही. 'मावशी, मी विचार करतोय, तिचं वय लहान, ती कशाच्या आधारानं राहील?' 'लहान वय कसलं रे यतीन? हेच तर तिचं खरं वय. आम्हीसुद्धा बाळा, कोवळ्या वयातच आपला देव संसाराच्या प्रवाहात सोडून मनाच्या गाभाऱ्यात बसवला — त्यानं काय बिघडलं? आणि हेही सांगते, सुखाची तरी एवढी गरज कशाला?'
शेवटची रात्र
'मावशी, मणीचं मन जागं होण्याची वेळ आली आणि नेमका मी —' 'कशाला विचार करतोस यतीन? मन जागं झालं, तर तेच काय कमी भाग्य?' एकाएकी फार दिवसांपूर्वी ऐकलेले बाउलांचे एक गाणे यतीनला आठवले — अरे मना, तू जागला नाहीस रे, तेव्हा मनीचा माणूस आला दारी रे. त्याच्या जाण्याची चाहूल ऐकून मोडली रे झोप, तुझी मोडली रे झोप अंधारी. 'मावशी, घड्याळात किती वाजले?' 'नऊ वाजतील आता.' 'नुसते नऊ? मला वाटलं, दोन-तीन किंवा किती वाजले असतील कोण जाणे. संध्याकाळ झाली की माझी मध्यरात्र सुरू होते. मग तू माझ्या झोपेसाठी एवढी घाई का करत होतीस?' 'कालसुद्धा संध्याकाळनंतर अशाच गप्पा मारता मारता कितीतरी रात्रीपर्यंत तुला झोप आली नाही, म्हणून आज लवकर झोपायला सांगतेय.' 'मणी झोपली का?' 'नाही, ती तुझ्यासाठी मसुराच्या डाळीचं सूप करून मगच झोपायला जाते.' 'काय सांगतेस मावशी, म्हणजे मणी —' 'तीच तर तुझं सगळं पथ्याचं करून देते. तिला कुठली विश्रांती?' 'मला वाटायचं, मणी म्हणजे —' 'बायकांना का या गोष्टी शिकाव्या लागतात? वेळ पडली की आपोआप जमतं.' 'आज दुपारी मौरला माशांचं जे कालवण झालं होतं, ते फार सुरेख जमलं होतं. मला वाटलं, तुझ्याच हातचं असेल.' 'माझं कपाळ! मणी मला काही करू देते का? तुझे पंचे-टॉवेल स्वतःच्या हातानं धुऊन वाळत घालते. तिला ठाऊक आहे, कुठे काही घाण दिसलेली तुला खपत नाही. तुझी बाहेरची बैठकीची खोली एकदा पाहिलीस तर दिसेल, मणीनं दोन्ही वेळा सगळं झाडून-पुसून कसं लख्ख ठेवलंय. मी जर तिला तुझ्या या खोलीत सारखं येऊ दिलं असतं, तर काही खैर नव्हती. तिला तेच तर हवंय.' 'मणीची तब्येत म्हणजे —' 'डॉक्टर म्हणतात, रोग्याच्या खोलीत तिला सारखं येऊ-जाऊ देणं बरं नव्हे. तिचं मन फार हळवं ना, तुझे हाल पाहिले तर दोन दिवसांत तिची तब्येत ढासळेल.'
शेवटची रात्र
'मावशी, तू तिला थोपवून कशी धरतेस?' 'मला ती फार मानते, म्हणूनच जमतं. तरी वारंवार जाऊन तिला खबर द्यावी लागते — तेही माझं एक काम होऊन बसलंय.' * * * आकाशातले तारे जणू करुणेने पाझरणाऱ्या अश्रूंसारखे लुकलुकू लागले. जे जीवन आज निरोप घेण्याच्या वाटेवर येऊन उभे होते, त्याला यतीनने मनोमन कृतज्ञतेने नमस्कार केला — आणि समोर मृत्यूने अंधारातून जो उजवा हात पुढे केला होता, त्यावर यतीनने शांत विश्वासाने आपला रोगाने थकलेला हात ठेवला. एकदा निःश्वास टाकून, जरासा चुळबुळ करून यतीन म्हणाला, 'मावशी, मणी जागी असलीच तर एकदा तिला जर —' 'आत्ता बोलावते, बाळा.' 'तिला मी फार वेळ या खोलीत ठेवून घेणार नाही — फक्त पाच मिनिटं — दोन-एक गोष्टी सांगायच्या आहेत —' * * * मावशी दीर्घ निःश्वास टाकून मणीला बोलवायला गेल्या. इकडे यतीनची नाडी जोरात चालू लागली. यतीनला ठाऊक होते, आजवर मणीशी त्याचे बोलणे कधी नीट रंगले नव्हते. दोन वाद्ये दोन वेगवेगळ्या सुरांत लावलेली असली, तर त्यांचा एकत्र आलाप जमणे फार कठीण. मणी आपल्या मैत्रिणींबरोबर अखंड बडबडत असे, हसत असे; दुरून ते ऐकून यतीनचे मन कितीदा तरी असूयेने व्याकुळ झाले होते. यतीनने स्वतःलाच दोष दिला होता — आपण का असे साध्यासुध्या कशाही विषयावर बोलू शकत नाही? बोलू शकत नाही असेही नाही; आपल्या मित्रमंडळींशी यतीन साध्या विषयांवरच बोलत नाही का? पण पुरुषांचे हे-ते आणि बायकांचे हे-ते काही नेमके जुळत नाही. मोठ्या गोष्टी एकट्यानेच एकसुरी बोलत राहता येतात, समोरच्याचे लक्ष आहे की नाही याची पर्वा केली नाही की झाले; पण क्षुल्लक गप्पांत दोघांचा सतत मेळ लागतो. बासरी एकटी वाजू शकते, पण दोघांचा ताळमेळ नसेल तर टाळांची खणखण जमत नाही.
शेवटची रात्र
म्हणूनच कितीतरी संध्याकाळी यतीन मणीबरोबर मोकळ्या व्हरांड्यात चटई अंथरून बसला, तेव्हा दोन-चार ओढूनताणून विणलेल्या वाक्यांनंतर बोलण्याचा धागा पार तुटून मधे पोकळी पडली; त्यानंतर संध्याकाळची शांतता जणू शरमेने मरू पाहत होती. यतीनला समजत असे, मणीला पळून जाता आले तर सुटल्यासारखे वाटेल; आणि मनोमन तो इच्छा करी की आत्ताच कुणीतरी तिसरे माणूस येऊन टपकावे. कारण, दोघांनी बोलणे कठीण, तिघांनी सोपे. मणी आली की आज बोलण्याची सुरुवात कशी करायची, याचाच यतीन विचार करू लागला. विचार करायला गेले की शब्द कसे अस्वाभाविकपणे मोठमोठे होऊन बसतात — तसले बोलणे चालणार नाही. यतीनला भीती वाटू लागली, आजच्या रात्रीची पाच मिनिटेसुद्धा वाया जातील. आणि त्याच्या आयुष्यात अशी एकांताची पाच मिनिटे आता उरली तरी किती? ३ 'हे काय सूनबाई, कुठे निघालीस की काय?' 'सीतारामपूरला जाणार आहे.' 'हे काय भलतंच! कुणाबरोबर जाणार?' 'अनाथ घेऊन जातोय.' 'माझी लक्ष्मी गं तू, जा तू, मी तुला अडवणार नाही — पण आज नको.' 'तिकीट काढून गाडी रिझर्व्ह करून झालीय.' 'होऊ दे, तेवढं नुकसान सोसेल — तू उद्या सकाळी सकाळीच निघून जा — आज जाऊ नकोस.' 'मावशी, मी तुमचं तिथी-वार काही मानत नाही, आज गेले तर काय बिघडलं?' 'यतीननं तुला बोलावलंय, त्याला तुझ्याशी थोडं बोलायचंय.' 'छान की, अजून वेळ आहे — मी त्यांना सांगून येते.' 'नाही, तू जातेयस असं तुला सांगता येणार नाही.' 'बरं ठीक, काही सांगणार नाही, पण मला उशीर करून चालणार नाही. उद्याच अन्नप्राशन आहे — आज गेले नाही तर जमणारच नाही.' 'मी हात जोडते सूनबाई, आजच्या एका दिवसापुरतं माझं ऐक. आज मन जरा शांत करून यतीनजवळ येऊन बस — घाई करू नकोस.'
शेवटची रात्र
'आता मी तरी काय करू सांगा, गाडी काही माझ्यासाठी थांबून राहणार नाही. अनाथ गेलाय — दहा मिनिटांनी तो येऊन मला घेऊन जाईल. तेवढ्यात त्यांची भेट उरकून येते.' 'नको, राहू दे मग — तू जा. अशी उरकायला म्हणून मी तुला त्याच्याकडे जाऊ देणार नाही. अगं अभागी, ज्याला तू एवढं दुःख दिलंस, तो तर सर्वस्वावर पाणी सोडून आज ना उद्या निघून जाईल — पण जोवर जगशील तोवर हा दिवस तुला सतत आठवावा लागेल — देव आहे, देव आहे, हे एक दिवस तुला कळेल.' 'मावशी, असे शाप देऊ नका हं, सांगून ठेवते.' 'अरे देवा रे, आता कशाला जगतो आहेस रे बाळा! पापाला अंतच नाही — मला आता नाही थोपवता आलं.' * * * मावशी जरा उशिराने रोग्याच्या खोलीत गेल्या. त्यांना आशा होती, यतीन झोपी गेला असेल. पण खोलीत शिरताच त्यांनी पाहिले, यतीन अंथरुणात चुळबुळत उठला. मावशी म्हणाल्या, 'बघ, काय प्रकार करून बसलीय ती!' 'काय झालं? मणी आली नाही? एवढा उशीर का केलास मावशी?' 'जाऊन पाहते तो, तुझं दूध तापवताना करपवलं म्हणून रडत बसलीय. मी म्हटलं, त्यात काय झालं, आणखी दूध आहे ना. पण तुझ्या प्यायचं दूध आपल्या निष्काळजीपणानं करपवलं, ही सूनबाईची लाज काही केल्या जात नाही. मी तिची खूप समजूत घालून तिला अंथरुणावर झोपवून आलेय. आज काही तिला आणलं नाही. जरा झोपू दे तिला.' मणी आली नाही म्हणून यतीनच्या काळजात जसे चर्र झाले, तसे त्याला हायसेही वाटले. त्याच्या मनात धास्ती होती की, मणी प्रत्यक्ष देहाने येऊन त्याच्या ध्यानातल्या मणीच्या माधुरीवर जुलूम करून जाईल. कारण, त्याच्या आयुष्यात असे अनेकदा घडले होते. दूध करपवल्यामुळे मणीचे कोमल हृदय पश्चात्तापाने व्याकुळ झाले आहे — याच कल्पनेच्या रसाने त्याचे हृदय भरून भरून येऊ लागले. 'मावशी!' 'काय रे बाळा?'
शेवटची रात्र
'मला चांगलं कळतंय, माझे दिवस संपत आले. पण माझ्या मनात कसलीही खंत नाही. तू माझ्यासाठी शोक करू नकोस.' 'नाही रे बाळा, मी शोक करणार नाही. जगण्यातच कल्याण आहे आणि मरणात नाही, असं मी मानत नाही.' 'मावशी, तुला खरं सांगतो, मला मृत्यू गोड वाटतोय.' अंधाऱ्या आकाशाकडे पाहताना यतीनला दिसत होते — त्याची मणीच आज मृत्यूचा वेष घेऊन येऊन उभी राहिली आहे. ती आज अक्षय यौवनाने परिपूर्ण आहे — ती गृहिणी, ती जननी; ती रूपवती, ती कल्याणी. तिच्याच मोकळ्या केसांवर आकाशातले ते तारे म्हणजे लक्ष्मीने स्वहस्ते घातलेली आशीर्वादाची माळ. दोघांच्या मस्तकांवर अंधाराचे हे मंगलवस्त्र धरून जणू पुन्हा नव्याने शुभदृष्टी झाली, वधूवरांची पहिली नजरभेट. रात्रीचा हा विशाल अंधार मणीच्या अनिमिष प्रेमदृष्टीने भरून गेला. या घरची सून मणी, ही इवलीशी मणी, आज विश्वरूप झाली; जीवन-मरणाच्या संगमतीर्थावर त्या नक्षत्रांच्या वेदीवर ती बसली; निःस्तब्ध रात्र मंगलकलशासारखी पुण्यधारेने भरून आली. यतीनने हात जोडून मनोमन म्हटले, 'इतक्या दिवसांनी घुंगट उघडला, या गडद अंधारात आवरण दूर झाले. खूप रडवलेस — सुंदरा, हे सुंदरा, आता तू मला फसवू शकणार नाहीस.' ४ 'त्रास होतोय मावशी, पण तुला वाटतो तितका काहीच नाही. माझा त्रास माझ्यापासून हळूहळू जणू सुटा होत चाललाय. ओझ्याने भरलेल्या नावेसारखा तो इतके दिवस माझ्या जीवनाच्या जहाजाला बांधलेला होता; आज जणू तो दोर कापला गेलाय, माझं सगळं ओझं घेऊन तो दूर वाहत चाललाय. अजून तो मला दिसतोय, पण आता तो माझा आहे असं वाटत नाही — हे दोन दिवस मणीला मी एकदाही पाहिलं नाही, मावशी.' 'पाठीशी आणखी एक उशी देऊ का यतीन?' 'मला वाटतंय मावशी, मणीसुद्धा जणू निघून गेलीय. माझ्या दोर तुटलेल्या दुःखाच्या नावेसारखी.'
शेवटची रात्र
'बाळा, थोडा डाळिंबाचा रस घे, तुझा घसा कोरडा पडतोय.' 'माझं मृत्युपत्र काल लिहून झालं — ते मी तुला दाखवलं का — नीट आठवत नाही.' 'मला बघायची गरज नाही, यतीन.' 'आई गेली तेव्हा माझ्यापाशी काहीच नव्हतं. तुझं खाऊन, तुझ्या हातांखाली मी मोठा झालो. म्हणून म्हणत होतो —' 'हे आणखी काय बोलणं! तुझ्यापाशी तर फक्त हे एक घर आणि थोडीफार मालमत्ता होती. बाकी सगळी तर तुझी स्वतःची कमाई.' 'पण हे घर —' 'कसलं घर माझं! किती दालनं तू वाढवलीस, त्यात माझं कुठे आहे ते शोधूनसुद्धा सापडत नाही.' 'मणी तुला मनातून फार —' 'ते का मला ठाऊक नाही यतीन? तू आता झोप.' 'मी सगळं मणीच्या नावे लिहून दिलं खरं, पण सगळं तुझंच राहिलं मावशी. ती तुझा शब्द कधीच मोडणार नाही.' 'त्यासाठी एवढा विचार कशाला करतोस बाळा?' 'तुझ्या आशीर्वादानेच माझं सगळं आहे; माझं मृत्युपत्र पाहून तू कधी असं मनात आणू नकोस —' 'हे काय बोलणं यतीन! तुझी वस्तू तू मणीला दिलीस म्हणून मी मनात आणीन? एवढं का कोतं आहे माझं मन! तुझी वस्तू तिच्या नावे लिहून देऊन जाता येतंय म्हणून तुला जे सुख होतंय, तेच माझ्या साऱ्या सुखांहून मोठं, बाळा.' 'पण तुलासुद्धा मी —' 'हे बघ यतीन, आता मात्र मी रागवेन. तू निघून जाणार, आणि मला पैसे देऊन भुलवून ठेवून जाणार?' 'मावशी, पैशांहूनही मोठं जर काही असेल, ते तुला —' 'दिलंस यतीन, भरपूर दिलंस. माझं रिकामं घर तू भरून टाकलं होतंस, हे माझं अनेक जन्मांचं भाग्य. इतके दिवस तर मन भरून मिळालं, आज माझ्या वाट्याचं संपलं असलं तर मी तक्रार करणार नाही. दे, सगळं लिहून दे, लिहून दे — घरदार, सामानसुमान, घोडागाडी, जमीनजुमला — जे काही आहे ते सगळं मणीच्या नावे लिहून दे — हे ओझं मला सोसवणार नाही.'
शेवटची रात्र
'तुला उपभोगाची आवड नाही — पण मणीचं वय लहान, म्हणून —' 'असं म्हणू नकोस, असं म्हणू नकोस. धनदौलत द्यायची तर दे, पण उपभोग घेणं —' 'का नाही उपभोग घेणार, मावशी?' 'नाही रे नाही, नाही घेता येणार, नाही घेता येणार! मी सांगते, तिच्या तोंडाला ते रुचणार नाही! घसा कोरडा ठाक पडेल, कशातच तिला गोडी वाटणार नाही.' यतीन गप्प राहिला. आपल्यावाचून मणीला संसार अगदी बेचव होऊन जाईल, ही गोष्ट खरी की खोटी, सुखाची की दुःखाची, हे त्याला जणू ठरवताच आले नाही. आकाशातले तारे जणू त्याच्या हृदयात येऊन कानात कुजबुजले, 'असेच आहे खरे — आम्ही तर हजारो वर्षांपासून पाहत आलो आहोत, जगभर पसरलेला हा सगळा पसारा म्हणजे केवढी मोठी फसवणूक.' यतीनने एक खोल निःश्वास टाकून म्हटले, 'देण्यासारखं काहीच आपल्याला देऊन जाता येत नाही.' 'कमी का देऊन जातोयस बाळा? या घरदार-पैशाअडक्याच्या निमित्तानं तू तिला काय देऊन गेलास, त्याचं मोल तिला कधीच कळणार नाही का? तू जे दिलंस ते मान तुकवून स्वीकारण्याची शक्ती विधात्यानं तिला द्यावी, हाच आशीर्वाद मी तिला देते.' 'आणखी थोडा डाळिंबाचा रस दे, घसा कोरडा पडलाय. मणी काल आली होती का — मला नीट आठवत नाही.' 'आली होती. तू तेव्हा झोपला होतास. उशाशी बसून बराच वेळ वारा घालत होती, मग धोब्याला तुझे कपडे द्यायला गेली.' 'नवल आहे! बहुधा मी नेमका त्याच वेळी स्वप्न पाहत होतो — जणू मणी माझ्या खोलीत यायला पाहतेय — दार अगदी थोडंसं किलकिलं झालंय — ती ढकलाढकली करतेय, पण त्याहून जास्त ते काही केल्या उघडत नाही. पण मावशी, तुम्ही जरा अतीच करताय — तिला दिसू दे की मी मरतोय — नाहीतर मृत्यू अचानक आला तर तिला सोसवणार नाही.' 'बाळा, तुझ्या पायांवर ही लोकरीची शाल ओढून देते — तळपाय गार पडलेत.'
शेवटची रात्र
'नको मावशी, अंगावर काही घेणं आवडत नाहीये.' 'ठाऊक आहे का यतीन? ही शाल मणीनं केलीय; इतके दिवस रात्री जागून जागून ती तुझ्यासाठी करत होती. काल पूर्ण केली.' यतीनने ती शाल घेऊन दोन्ही हातांनी जरा चाचपून पाहिली. त्याला वाटले, लोकरीचा हा मऊपणा जणू मणीच्या मनाचाच आहे; तिने यतीनची आठवण काढत रात्री जागून ही विणली, तिच्या मनातला तो प्रेमळ विचार हिच्यात गुंफला गेला आहे. ही नुसत्या लोकरीने नव्हे, मणीच्या कोमल बोटांच्या स्पर्शाने विणलेली आहे. म्हणून मावशींनी ती शाल त्याच्या पायांवर ओढली, तेव्हा त्याला वाटले, मणीच रात्रीमागून रात्री जागून त्याची पादसेवा करते आहे. 'पण मावशी, मला तर ठाऊक होतं की मणीला शिवणकाम येत नाही — तिला शिवणकाम आवडतसुद्धा नाही.' 'मन लावलं तर शिकायला कितीसा वेळ लागतो? तिला शिकवावं लागलं — त्यात पुष्कळ चुकलेले टाकेही आहेत.' 'असू दे ना चुका. ती काही पॅरिसच्या प्रदर्शनाला पाठवायची नाही — चुकलेल्या टाक्यांनी माझे पाय झाकले तरी उत्तम चालेल.' टाक्यांत पुष्कळ चुका-उणिवा आहेत, या विचारानेच यतीनला आणखी जास्त आनंद झाला. बिचाऱ्या मणीला येत नाही, ठाऊक नाही, पुन्हा पुन्हा चुकते आहे, तरी धीर धरून रात्रीमागून रात्री टाके घालत बसली आहे — ही कल्पना त्याला फार करुण, फार गोड वाटली. चुकांनी भरलेली ती शाल त्याने पुन्हा एकदा जरा चाचपून पाहिली. * * * 'मावशी, डॉक्टर खालच्या खोलीत आहेत वाटतं?' 'हो यतीन, आज रात्री इथेच राहणार आहेत.' 'पण मला उगाच झोपेचं औषध देऊ नका हं. पाहिलंस ना, त्यानं मला झोप लागत नाही, उलट त्रासच वाढतो. मला चांगलं जागं राहू दे. ठाऊक आहे मावशी? वैशाखातल्या द्वादशीच्या रात्री आमचं लग्न झालं होतं — उद्या ती द्वादशी येतेय — उद्या त्या रात्रीचे सगळे तारे आकाशात लावले जातील.
शेवटची रात्र
मणीला बहुधा आठवत नसेल — आज मला तिला तेवढी आठवण करून द्यायची आहे; फक्त तिला दोन मिनिटांसाठी बोलावून दे. गप्प का बसलीस? बहुधा डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलंय की माझी तब्येत अशक्त आहे, आता माझ्या मनाला कुठलाही — पण मी तुला खात्रीनं सांगतो मावशी, आज रात्री तिच्याशी दोन शब्द बोलता आले, तर माझं मन अगदी शांत होईल — मग बहुधा झोपेचं औषध द्यावंच लागणार नाही. माझ्या मनाला तिला काहीतरी सांगायचंय, म्हणूनच या दोन रात्री मला झोप लागली नाही. — मावशी, अशी रडू नकोस. मी बरा आहे; आज माझं मन जसं भरून आलंय, तसं आयुष्यात कधीच झालं नव्हतं. म्हणूनच मी मणीला बोलावतोय. वाटतंय, आज माझं हे भरलेलं हृदय तिच्या हातात देऊन जाऊ शकेन. तिला कितीतरी दिवस कितीतरी गोष्टी सांगायच्या होत्या, सांगू शकलो नाही; पण आता एक क्षणही उशीर नको, तिला आत्ताच बोलावून दे — यानंतर वेळ मिळणार नाही — नको मावशी, तुझं हे रडणं मला सहन होत नाही. इतके दिवस तर शांत होतीस, आज तुला असं काय झालं?' 'अरे यतीन, वाटलं होतं माझं सगळं रडू संपलं — पण दिसतंय की अजून शिल्लक आहे — आज नाही रे सोसवत.' 'मणीला बोलावून दे — तिला सांगून ठेवतो, उद्याच्या रात्रीसाठी तिनं —' 'जाते रे बाळा. शंभू दाराशी आहे, काही लागलं तर त्याला हाक मार.' * * * मावशी मणीच्या झोपायच्या खोलीत जाऊन जमिनीवर बसल्या आणि हाका मारू लागल्या, 'अगं ये — एकदा तरी ये — ये गं राक्षसिणी, ज्यानं तुला आपलं सर्वस्व दिलं, त्याचा शेवटचा शब्द तरी राख — तो मरायला टेकलाय, त्याला आणखी मारू नकोस.' * * * पावलांच्या आवाजाने यतीन दचकून म्हणाला, 'मणी!' 'नाही, मी शंभू. मला हाक मारलीत?' 'जरा तुझ्या बाईसाहेबांना बोलाव.' 'कुणाला?' 'बाईसाहेबांना.'
शेवटची रात्र
'त्या तर अजून परत आल्या नाहीत.' 'कुठे गेल्यात?' 'सीतारामपूरला.' 'आज गेल्या?' 'नाही, जाऊन आज तीन दिवस झाले.' क्षणभर यतीनचे सर्वांग बधिर झाले — त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. इतका वेळ तो उशीला टेकून बसला होता, आडवा झाला. पायांवर ती लोकरीची शाल पांघरलेली होती, ती त्याने पायानेच ढकलून दिली. बऱ्याच वेळाने मावशी आल्या, तेव्हा यतीन मणीबद्दल काहीच बोलला नाही. मावशींना वाटले, त्याला ते आठवत नसावे. एकाएकी कधीतरी यतीन म्हणाला, 'मावशी, त्या दिवशीच्या माझ्या स्वप्नाबद्दल मी तुला सांगितलं का?' 'कुठलं स्वप्न?' 'मणी जणू माझ्या खोलीत येण्यासाठी दार ढकलत होती — पण दार काही केल्या एवढ्याशा फटीपलीकडे उघडलं नाही; ती बाहेर उभी राहून पाहत राहिली, पण आत काही केल्या येऊ शकली नाही. मणी कायमची माझ्या घराबाहेरच उभी राहिली. तिला किती हाका मारल्या, पण इथे तिला जागा मिळाली नाही.' मावशी काहीही न बोलता गप्प राहिल्या. त्यांना वाटले, 'यतीनसाठी खोटेपणाने जो इवलासा स्वर्ग मी रचत होते, तो आता टिकला नाही. दुःख येते तेव्हा ते स्वीकारणेच बरे — प्रतारणा करून विधात्याचा तडाखा थोपवू पाहणे काही बरे नव्हे.' 'मावशी, तुझ्याकडून जी माया मिळाली, ती माझी जन्मोजन्मीची शिदोरी; माझं सारं आयुष्य भरून ती घेऊन चाललोय. पुढच्या जन्मी तू नक्की माझी मुलगी होऊन जन्माला येशील, मी तुला उराशी धरून वाढवीन.' 'काय बोलतोस यतीन, पुन्हा मुलगी होऊन जन्माला येऊ? त्यापेक्षा तुझ्याच कुशीत मुलगा होऊन जन्म घेईन — तशीच इच्छा कर ना.' 'नाही, नाही, मुलगा नको. लहानपणी तू जशी सुंदर होतीस, तशीच अपूर्व सुंदर होऊनच तू माझ्या घरी येशील. माझ्या मनात आहे, मी तुला कसं सजवीन ते.' 'आता बडबड पुरे यतीन, बडबड पुरे — जरा झोप.'
शेवटची रात्र
'तुझं नाव ठेवीन लक्ष्मीराणी.' 'हे काही आजकालचं नाव नव्हे.' 'नाही, आजकालचं नाव नाही. मावशी, तू माझी जुन्या जमान्यातली — तो जुना जमानाच सोबत घेऊन तू माझ्या घरी ये.' 'तुझ्या घरी मुलगी उजवण्याचं दुःख घेऊन मी यावं, अशी इच्छा मी तरी कशी करू?' 'मावशी, तुला मी दुबळा वाटतो? — मला दुःखापासून वाचवायचंय तुला?' 'बाळा, माझं बाईचं मन, मीच दुबळी — म्हणूनच मी फार भीत भीत तुला सगळ्या दुःखांपासून कायम वाचवायला पाहिलं. पण माझी काय ताकद? काहीच करू शकले नाही.' 'मावशी, या जन्मीचं शिक्षण या जन्मी वापरायला मला वेळच मिळाला नाही. पण हे सगळं जमा राहिलं; पुढच्या खेपेला माणूस काय करू शकतो ते मी दाखवीन. जन्मभर स्वतःकडेच पाहत राहणं ही केवढी फसवणूक आहे, हे मला कळलंय.' 'काहीही म्हण बाळा, तू स्वतः काहीच घेतलं नाहीस, दुसऱ्यांनाच सगळं दिलंस.' 'मावशी, एका गोष्टीचा मी अभिमान बाळगीन — मी सुखावर कधी जबरदस्ती केली नाही — जिथे माझा हक्क आहे तिथे मी जोर चालवीन, असं कधीच म्हटलं नाही. जे मिळालं नाही, ते मी हिसकावून घेतलं नाही. मला ती गोष्ट हवी होती जिच्यावर कुणाचाच हक्क नसतो — आयुष्यभर हात जोडून वाटच पाहिली; खोट्याची इच्छा धरली नाही, म्हणूनच इतके दिवस असं वाट पाहत बसावं लागलं — आता बहुधा सत्य कृपा करील. कोण ते — मावशी, कोण ते?' 'कुठे? कुणीच तर नाही यतीन.' 'मावशी, तू एकदा ती खोली बघून ये, मला जणू —' 'नाही बाळा, मला तर कुणीच दिसलं नाही.' 'पण मला स्पष्ट जणू —' 'काही नाही यतीन — ते बघ, डॉक्टरबाबू आले.' * * * 'हे पाहा, तुम्ही यांच्याजवळ असलात की हे फार बोलतात. कित्येक रात्री असेच जागून काढल्या. तुम्ही झोपायला जा, माझा तो माणूस इथे राहील.' 'नाही मावशी, नाही, तू जायचं नाहीस.'
शेवटची रात्र
'बरं बाळा, मी त्या कोपऱ्यात जाऊन बसते हवं तर.' 'नाही, नाही, तू माझ्या शेजारीच बसून राहा — तुझा हा हात मी काही केल्या सोडणार नाही — शेवटपर्यंत नाही. मी तुझ्याच हातांनी घडलेला माणूस, तुझ्याच हातांतून देव मला नेईल.' 'बरं ठीक, पण तुम्ही बोलू नका यतीनबाबू. ते औषध पाजायची वेळ झाली —' 'वेळ झाली? खोटं. वेळ टळून गेलीय — आता औषध पाजणं म्हणजे नुसती फसवून समजूत घालणं. मला त्याची काही गरज नाही. मला मरणाची भीती वाटत नाही. मावशी, यमाचे उपचार चालू आहेत, त्यावर आणखी हे सगळे डॉक्टर कशाला गोळा केलेत — पाठवून दे, सगळ्यांना पाठवून दे. आता मला फक्त तू — आणखी कुणीही नको — कुणीच नको — कुठलंच खोटं नको.' 'तुमची ही उत्तेजना बरी नाही.' 'मग तुम्ही जा, मला उत्तेजित करू नका. — मावशी, डॉक्टर गेले? बरं, मग तू या अंथरुणावर वर येऊन बस — तुझ्या मांडीवर डोकं ठेवून मी जरा पडतो.' 'बरं, पड बाळा, शहाणं माझं ते, जरा झोप.' 'नको मावशी, झोप म्हणू नकोस — झोपता झोपता कदाचित पुन्हा जागच येणार नाही. अजून थोडा वेळ मला जागं राहायचं आहे. — तुला आवाज ऐकू येत नाही? ते बघ, येतंय! आत्ताच येईल.' ५ 'बाळा यतीन, जरा डोळे उघडून पाहा — ती बघ आली. एकदाच बघ.' 'कोण आलंय? स्वप्न?' 'स्वप्न नाही बाळा, मणी आलीय — तुझे सासरेही आलेत.' 'तू कोण?' 'ओळखलं नाहीस बाळा? ही तर तुझी मणी.' 'मणी, ते दार आता सगळं उघडलं का?' 'सगळं उघडलं, बाळा माझ्या, सगळं उघडलं.' 'नको मावशी, माझ्या पायांवर ती शाल नको, ती शाल नको! ती शाल खोटी, ती शाल निव्वळ फसवणूक!' 'ती शाल नाही यतीन. तुझी बायको तुझ्या पायांवर पडलीय — तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला जरा आशीर्वाद दे. — असं रडू नकोस गं सूनबाई, रडायची वेळ येतेच आहे — आता जरा गप्प राहा.'