रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
शिक्षा
१ दुखीराम रुई आणि छिदाम रुई हे दोघे भाऊ सकाळी हातात कोयते घेऊन मजुरीला बाहेर पडले, तेव्हा त्यांच्या दोघी बायकांमध्ये वादावादी, आरडाओरडा चालू होता. पण निसर्गातल्या इतर अनेक रोजच्या कलकलाटासारखाच हा भांडणाचा गोंगाटही आळीतल्या लोकांच्या अंगवळणी पडून गेला होता. चढलेला आवाज कानावर पडला की लोक एकमेकांना म्हणत, 'झालं, जुंपली वाटतं.' म्हणजे जे अपेक्षित होतं ते अगदी तसंच घडलं; आजही निसर्गाच्या नियमात काही खंड पडला नाही. सकाळी पूर्वेला सूर्य उगवला तर कुणी त्याचं कारण विचारत नाही; तसंच या कुरींच्या घरात दोघी जावांमध्ये हलकल्लोळ माजला की त्याचं कारण शोधावं असं कुतूहल कुणालाच वाटत नसे. अर्थात, या भांडणाच्या धुमश्चक्रीची झळ शेजाऱ्यांपेक्षा दोघा नवऱ्यांना अधिक लागत असे यात शंका नाही; पण ते दोघे तिला काही अडचण मानत नसत. जणू हे दोघे भाऊ संसाराचा लांबलचक रस्ता एकाच एक्क्यातून कापत चालले होते, आणि दोन्ही बाजूंच्या स्प्रिंग नसलेल्या दोन चाकांचा अखंड खडखडाट त्यांनी जीवनयात्रेच्या रथाचा एक ठरलेला नियमच म्हणून स्वीकारला होता. उलट, ज्या दिवशी घरात एकही आवाज नसे, सगळं सुन्न, भयाण शांत असे, त्या दिवशीच एखाद्या अनैसर्गिक संकटाची चाहूल लागे; त्या दिवशी कधी काय होईल याचा हिशोब कुणालाच सांगता येत नसे. आमच्या गोष्टीतल्या घटनांना ज्या दिवशी सुरुवात झाली, त्या दिवशी संध्याकाळ होता होता दोघे भाऊ मजुरी करून थकल्या अंगानं घरी परतले, तेव्हा त्यांना जाणवलं, स्तब्ध घर कसं भारल्यासारखं घुमतं आहे.
शिक्षा
बाहेरही भयंकर कोंदट होतं. दुपारी एक जोराची सर कोसळून गेली होती. अजूनही चहूकडे ढग दाटून होते. वाऱ्याचा मागमूसही नव्हता. पावसाळ्यात घराच्या चारी बाजूंना रान आणि तण माजलं होतं; तिथून आणि पाण्यात बुडलेल्या तागाच्या शेतांतून ओल्या वनस्पतींचा दाट, वाफाळ गंध उठून चहूकडे एखाद्या निश्चल भिंतीसारखा घट्ट उभा राहिला होता. गोठ्यामागच्या डबक्यातून बेडूक ओरडत होते, आणि रातकिड्यांच्या किरकिरीनं संध्याकाळचं निःशब्द आकाश अगदी भरून गेलं होतं. * * * जवळच पावसाळ्यातली पद्मा नव्या ढगांच्या सावलीत फार स्थिर, भयंकर रूप धारण करून वाहत होती. शेतांचा बराचसा भाग तिनं गिळून टाकला होता आणि ती वस्तीच्या अगदी जवळ येऊन ठेपली होती. इतकंच काय, ढासळत्या कडेवरच्या दोन-चार आंब्या-फणसाच्या झाडांची मुळं उघडी पडली होती; जणू त्यांच्या असहाय मुठींची पसरलेली बोटं शून्यात कसलातरी शेवटचा आधार घट्ट धरायची धडपड करत होती. दुखीराम आणि छिदाम त्या दिवशी जमीनदाराच्या कचेरीत कामाला गेले होते. पलीकडच्या चरावर पाण्यातलं भात पिकलं होतं. पावसात चर बुडून जाण्याआधी भात कापून घ्यावं म्हणून गावातला प्रत्येक गरीब माणूस कुणी स्वतःच्या शेतात, कुणी मजुरीनं दुसऱ्याच्या शेतात कामाला लागला होता; फक्त या दोघा भावांना मात्र कचेरीतून शिपाई येऊन जबरदस्तीनं धरून घेऊन गेला. कचेरीचं छप्पर ठिकठिकाणी गळत होतं; ते दुरुस्त करायला आणि काही झापा विणायला ते दिवसभर राबले होते. घरी यायला मिळालं नव्हतं; कचेरीतच थोडंसं खायला मिळालं होतं. मधूनमधून पावसात भिजावंही लागलं होतं. रास्त मजुरी मिळाली नव्हती, आणि त्याच्या बदल्यात जे अन्यायी, कडू बोल ऐकावे लागले होते, त्यांचं माप मात्र त्यांच्या हक्काच्या कितीतरी पलीकडे गेलं होतं.
शिक्षा
वाटेतला चिखल-पाणी तुडवत संध्याकाळी घरी परतल्यावर दोघा भावांनी पाहिलं: धाकटी जाऊ चंदरा जमिनीवर पदर पसरून गप्प पडून आहे; आजच्या या ढगाळ दिवसासारखीच तीही दुपारी भरपूर आसवं गाळून संध्याकाळच्या सुमारास थांबली आहे आणि आता अगदी कोंदटून बसली आहे. आणि थोरली जाऊ राधा तोंड फुगवून ओसरीवर बसली होती. तिचं दीड वर्षाचं लहानगं पोर आधी रडत होतं; दोघे भाऊ आत आले तेव्हा त्यांना दिसलं, ते नागडं पोर अंगणाच्या एका कडेला उताणं पडून झोपलं आहे. भुकेल्या दुखीरामानं क्षणाचाही उशीर न करता म्हटलं, 'भात वाढ.' दारूगोळ्याच्या पोत्यावर ठिणगी पडावी तशी थोरली एका क्षणात चढलेल्या आवाजानं आभाळ दणाणून ओरडली, 'भात आहे कुठे, वाढू? तू काय तांदूळ देऊन गेला होतास? की मी काय आता स्वतः बाहेर जाऊन कमावून आणू?' दिवसभराचा थकवा आणि अपमान, अन्नाचा कण नसलेलं, उदास, अंधारं घर, भडकलेली भूक, आणि अशात बायकोचे कठोर बोल, त्यातही शेवटच्या वाक्यातला तो छुपा, घाणेरडा टोमणा, हे सगळं दुखीरामाला अचानक कसं कोण जाणे पार असह्य झालं. चवताळलेल्या वाघासारख्या खोल गुरगुरत्या आवाजात तो ओरडला, 'काय म्हणालीस?' आणि एका क्षणात, काहीही विचार न करता, त्यानं कोयता उचलून सरळ बायकोच्या डोक्यात घातला. राधा धाकट्या जावेच्या मांडीपाशी कोसळली, आणि तिचा प्राण जायला क्षणाचाही उशीर लागला नाही. रक्तानं भिजलेल्या वस्त्रानिशी चंदरा 'हे काय झालं हो!' म्हणून किंचाळली. छिदामनं तिचं तोंड दाबून धरलं. दुखीराम कोयता टाकून, तोंडावर हात ठेवून, सुन्न झाल्यासारखा जमिनीवर बसला. पोर जागं होऊन घाबरून किंचाळत रडू लागलं.
शिक्षा
बाहेर तेव्हा पूर्ण शांतता होती. गुराखी पोरं गुरं घेऊन गावात परतत होती. पलीकडच्या चरावर नवं पिकलेलं भात कापायला जे गेले होते, ते पाच-सात जणांच्या टोळीनं एकेका लहानशा होडीतून अलीकडे परतून, कष्टांचं बक्षीस म्हणून दोन-चार भाताच्या पेंढ्या डोक्यावर घेऊन, बहुतेक सगळे आपापल्या घरी पोचले होते. चक्रवर्तींच्या घरचे रामलोचनकाका गावच्या टपाल-कचेरीत पत्र टाकून घरी परतले होते आणि निवांतपणे गप्प बसून तंबाखू ओढत होते. अचानक त्यांना आठवलं, त्यांचा पोटकुळ दुखी याच्याकडे खंडाचे बरेच पैसे थकले आहेत; आज त्यातले काही फेडीन असं त्यानं कबूल केलं होतं. एव्हाना तो घरी परतला असेल असं ठरवून, उपरणं खांद्यावर टाकून, छत्री घेऊन ते बाहेर पडले. कुरींच्या घरात पाऊल टाकताच त्यांच्या अंगावर काटा आला. पाहिलं तो घरात दिवा लावलेला नाही. अंधाऱ्या ओसरीवर दोन-चार अंधाऱ्या आकृती अस्पष्ट दिसत आहेत. ओसरीच्या एका कोपऱ्यातून राहून राहून दबलेला हुंदका फुटतो आहे, आणि पोर जेवढ्यांदा 'आई, आई' म्हणून रडू पाहतं, तेवढ्यांदा छिदाम त्याचं तोंड दाबून धरतो आहे. रामलोचनांनी जरा घाबरून विचारलं, 'दुखी, आहेस का रे?' इतका वेळ दुखी दगडी पुतळ्यासारखा निश्चल बसला होता; नावानं हाक कानी पडताच तो एखाद्या अजाण पोरासारखा हमसाहमशी रडू लागला. छिदाम घाईघाईनं ओसरीवरून अंगणात उतरून चक्रवर्तींपाशी आला. चक्रवर्तींनी विचारलं, 'बाया भांडून बसल्यात वाटतं? आज दिवसभर आरडाओरडाच ऐकत होतो.' इतका वेळ काय करावं हे छिदामला काहीच सुचलं नव्हतं. नाना अशक्य कहाण्या त्याच्या डोक्यात येत होत्या. सध्यापुरतं त्यानं ठरवलं होतं की रात्र थोडी वाढली की प्रेत कुठेतरी हलवायचं. मध्येच चक्रवर्ती येऊन उभे राहतील हे त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं. चटकन काही उत्तर सुचलं नाही. तोंडून निघून गेलं, 'हो, आज खूप भांडण झालं.'
शिक्षा
ओसरीकडे पाऊल टाकत चक्रवर्ती म्हणाले, 'पण त्यासाठी दुखी का रडतोय रे?' छिदामनं पाहिलं, आता काही सुटका नाही; अचानक तो बोलून गेला, 'भांडणात धाकटीनं थोरलीच्या डोक्यात कोयत्याचा घाव घातला.' समोरच्या संकटाखेरीज आणखी कुठलं संकट असू शकेल हे माणसाच्या सहसा मनात येत नाही. छिदाम तेव्हा एवढाच विचार करत होता, 'या भयंकर सत्याच्या हातून आपली सुटका कशी होईल?' असत्य त्याहूनही भयंकर असू शकतं, याचं त्याला भान राहिलं नाही. रामलोचनांचा प्रश्न ऐकताक्षणी त्याच्या डोक्यात एक उत्तर आलं आणि तत्क्षणी तो ते बोलून गेला. रामलोचन दचकून म्हणाले, 'आँ! काय सांगतोस! मेली तर नाही ना?' छिदाम म्हणाला, 'मेली.' आणि त्यानं चक्रवर्तींच्या पायांना मिठी मारली. चक्रवर्तींना पळायला वाट सापडेना. त्यांच्या मनात आलं, राम राम! संध्याकाळच्या वेळी ही कसली ब्याद गळ्यात पडली! कोर्टात साक्षी देता देताच जीव जाईल. छिदाम काही केल्या त्यांचे पाय सोडेना; म्हणाला, 'दादाठाकूर, आता माझ्या बायकोला वाचवायला काय उपाय करू?' खटल्या-कज्ज्यांच्या सल्ल्यात रामलोचन साऱ्या गावाचे मुख्य प्रधान होते. थोडा विचार करून ते म्हणाले, 'हे बघ, याला एक उपाय आहे. तू आत्ताच्या आत्ता ठाण्यावर धावत जा आणि सांग, तुझा थोरला भाऊ दुखी संध्याकाळी घरी आला आणि भात मागितला, भात तयार नव्हता म्हणून त्यानं बायकोच्या डोक्यात कोयता घातला. मी खात्रीनं सांगतो, असं सांगितलंस तर ती पोरगी वाचेल.' छिदामचा घसा कोरडा पडला; उठून तो म्हणाला, 'ठाकूर, बायको गेली तर दुसरी बायको मिळेल, पण माझा भाऊ फासावर गेला तर पुन्हा भाऊ कुठून मिळणार?' पण स्वतःच्या बायकोवर आळ घातला तेव्हा त्यानं यातलं काहीच विचारात घेतलं नव्हतं. घाईगडबडीत एक गोष्ट करून बसला होता; आता त्याचं मन त्याच्या नकळत स्वतःच्या बाजूनं युक्तिवाद आणि समजुती गोळा करत होतं.
शिक्षा
चक्रवर्तींनाही ते म्हणणं पटलं; ते म्हणाले, 'मग जसं घडलं तसंच सांग. सगळ्या बाजू सांभाळणं अशक्य आहे.' एवढं बोलून रामलोचन ताबडतोब निघून गेले, आणि बघता बघता गावभर बोभाटा झाला की कुरींच्या घरच्या चंदरानं रागाच्या भरात आपल्या थोरल्या जावेच्या डोक्यात कोयता घातला. धरण फुटल्यावर जसं पाणी लोटतं, तसे गावात धो धो करत पोलीस येऊन धडकले; अपराधी आणि निरपराधी सगळेच भयंकर धास्तावले. २ छिदामनं विचार केला, जी वाट आपण स्वतः काढली आहे, त्याच वाटेनं आता चालावं लागेल. चक्रवर्तींपाशी त्यानं स्वतःच्या तोंडानं एक गोष्ट सांगून टाकली होती, ती गोष्ट गावभर पसरली होती; आता आणखी काही उघडकीला आलं तर कशातून काय होऊन बसेल हे त्याचं त्यालाच काही सुचेना. त्याला वाटलं, कसंही करून ती गोष्ट टिकवून, तिला आणखी चार कहाण्या जोडून बायकोला वाचवण्याखेरीज दुसरा मार्ग नाही. छिदामनं आपली बायको चंदरा हिला गुन्हा स्वतःच्या शिरावर घ्यायची विनंती केली. ती तर वीज कोसळल्यासारखी थिजून गेली. छिदामनं तिला धीर देत म्हटलं, 'मी सांगतो तसं कर, तुला काही भीती नाही, आम्ही तुला वाचवू.' धीर दिला खरा, पण त्याचा घसा कोरडा पडला, चेहरा पांढराफटक पडला. चंदराचं वय सतरा-अठराहून जास्त नसेल. चेहरा भरलेला, गोल गोबरा; अंगकाठी फार उंच नाही, आटोपशीर, घट्ट; निरोगी, बळकट अवयवांत असा एक डौल होता की चालता-फिरता, हालता-डुलता अंगात कुठे काही अडखळतच नसे. जणू एखादी नवीकोरी होडी: छोटीशी, सुबक, अगदी सहज सरकणारी, आणि तिचा एकही सांधा कुठे ढिला झालेला नाही. जगातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल तिला गंमत वाटे, कुतूहल वाटे; आळीत गप्पा मारायला जायला तिला आवडे, आणि कमरेवर घागर घेऊन घाटावर जाता-येता दोन बोटांनी घुंगट किंचित फाकवून आपल्या चमकदार, चंचल, काळ्याभोर डोळ्यांनी वाटेत पाहण्याजोगं जे काही असेल ते सगळं पाहून घेई.
शिक्षा
थोरली नेमकी हिच्या उलट होती: अगदी गबाळी, सैल, अव्यवस्थित. डोक्यावरचा पदर, कडेवरचं पोर, घरकामाचा व्याप, काहीच तिला सावरता येत नसे. हातात खास असं काही कामही नसे, आणि तरीही तिला कधी फुरसत म्हणून मिळत नसे. धाकटी जाऊ तिला फारसं काही बोलत नसे; हलक्या आवाजात एखाद-दुसरा तिखट डंख करी, आणि ही मात्र आकांडतांडव करत, धुमसत-फणफणत, बडबडत-ओरडत थकून जाई आणि अख्ख्या आळीला हैराण करून सोडी. या दोन्ही नवरा-बायकोच्या जोड्यांमध्येही स्वभावाचं एक विलक्षण साम्य होतं. दुखीराम माणूस जरा अवाढव्य होता: हाडं चांगली रुंद, नाक बसकं, आणि दोन्ही डोळे या दिसणाऱ्या जगाला जणू नीटसं समजत नसत, तरीही त्याला काही प्रश्न विचारावा असंही त्यांना वाटत नसे. इतका निरुपद्रवी तरी भयंकर, इतका बलवान तरी असहाय माणूस फार विरळा. आणि छिदामला जणू कुणीतरी एका चकचकीत काळ्या दगडातून मोठ्या निगुतीनं कोरून घडवलं होतं. जराही अनावश्यक काही नाही, कुठे एखादा पोचाही नाही. प्रत्येक अवयवात ताकद आणि कौशल्य एकजीव होऊन त्याला एक परिपूर्णता लाभली होती. नदीच्या उंच काठावरून उडी मारो, लांब काठीनं होडी रेटो, बांबूवर चढून निवडून निवडून कळक तोडून आणो, प्रत्येक कामात त्याचा एक मोजका नीटनेटकेपणा, एक सहजसुंदर डौल दिसून येई. लांब काळे केस तेल लावून कपाळावरून निगुतीनं मागे विंचरून खांद्यावर रुळवलेले; कपडेलत्ते, नटणंमुरडणं याकडे त्याचं चांगलंच लक्ष असे.
शिक्षा
गावातल्या इतर सुनांच्या सौंदर्याकडे तो उदासीन नजरेनं पाहत होता असं नाही, आणि त्यांच्या नजरेत आपण देखणं दिसावं अशी इच्छाही त्याला भरपूर होती; तरीही छिदामचं आपल्या तरुण बायकोवर जरा खास प्रेम होतं. दोघांची भांडणंही होत, गट्टीही होई; कुणीच कुणाला हरवू शकत नसे. आणखी एका कारणानं दोघांमधली गाठ जरा पक्की होती. छिदामला वाटे, चंदरासारख्या चुलबुल्या, चंचल स्वभावाच्या बाईचा पुरता भरवसा नाही; आणि चंदराला वाटे, माझ्या नवऱ्याची नजर चारी दिशांना असते, त्याला जरा आवळून बांधून ठेवला नाही तर एखाद्या दिवशी हातचा जायला वेळ लागणार नाही. ही घटना घडण्याच्या काही काळ आधीपासून नवरा-बायकोत मोठीच कुरबूर चालू होती. चंदरानं पाहिलं होतं की आपला नवरा कामाचं निमित्त सांगून अधूनमधून लांब निघून जातो, इतकंच काय, एक-दोन दिवस बाहेर काढून येतो, आणि तरी काही कमाई करून आणत नाही. लक्षणं बरी नाहीत हे पाहून तीही जरा अतिरेक दाखवू लागली. वाटेल तेव्हा घाटावर जाऊ लागली, आणि आळीभर फिरून आल्यावर काशी मजुमदारांच्या मधल्या मुलाचं भरभरून वर्णन करू लागली. छिदामच्या दिवसांत आणि रात्रींत जणू कुणी विष कालवलं. कामधंद्यात कुठे घटकाभरही त्याचं मन स्थिर होईना. एक दिवस येऊन त्यानं भावजयीची चांगलीच खरडपट्टी काढली. तिनं हात नाचवत, फणकारत, समोर नसलेल्या आपल्या मेलेल्या बापाला उद्देशून म्हटलं, 'ती पोर वादळाच्याही पुढे धावते, तिला मी आवरू! मला ठाऊक आहे, ती कधी ना कधी काहीतरी सर्वनाश करून बसणार.' चंदरा शेजारच्या खोलीतून येऊन हळूच म्हणाली, 'का हो दिदी, तुम्हाला एवढी कसली भीती?' झालं, दोघी जावांमध्ये घनघोर युद्ध जुंपलं. छिदामनं डोळे वटारून म्हटलं, 'पुन्हा कधी ऐकलं की तू एकटी घाटावर गेली होतीस, तर तुझी हाडं मोडून चुरा करीन.'
शिक्षा
चंदरा म्हणाली, 'मग तर हाडं एकदाची निवतील.' आणि म्हणता म्हणता ती लगेच बाहेर जायला निघाली. छिदामनं एका झेपेत तिचे केस धरून तिला ओढत खोलीत कोंडलं आणि बाहेरून दाराला कडी घातली. कामावरून संध्याकाळी परतल्यावर त्यानं पाहिलं, दार उघडं, खोलीत कुणी नाही. चंदरा तीन गावं ओलांडून थेट आपल्या मामाच्या घरी जाऊन पोचली होती. तिथून छिदामनं मोठ्या कष्टानं, खूप विनवण्या करून तिला घरी परत आणलं; पण या वेळी त्यानं हार मानली. त्यानं पाहिलं, ओंजळभर पारा मुठीत घट्ट धरून ठेवणं जितकं कठीण, तितकंच या मूठभर बायकोला घट्ट धरून ठेवणं अशक्य; ती जणू दहाही बोटांच्या फटीतून निसटून जाते. त्यानं आणखी कुठली जबरदस्ती केली नाही, पण तो मोठ्या अस्वस्थतेत दिवस काढू लागला. आपल्या या चंचल तरुण बायकोवरचं त्याचं सदा धास्तावलेलं प्रेम एखाद्या तीव्र वेदनेसारखं ठसठसू लागलं. इतकंच काय, कधी कधी त्याला वाटे, ही मेली तर मी एकदाचा निश्चिंत होईन, थोडीतरी शांती मिळेल. माणसाला माणसाचा जितका मत्सर वाटतो, तितका यमाचा वाटत नाही. अशातच घरात ते संकट कोसळलं. नवऱ्यानं जेव्हा चंदराला खून कबूल करायला सांगितलं, तेव्हा ती थक्क होऊन पाहतच राहिली; तिचे दोन काळे डोळे काळ्या अग्नीसारखे मुकाट्यानं नवऱ्याला जाळू लागले. तिचं सारं शरीर आणि मन जणू हळूहळू आकसून त्या नवरा नावाच्या राक्षसाच्या हातून सुटायची धडपड करू लागलं. तिचा सारा अंतरात्मा त्याच्याकडे पूर्ण पाठ फिरवून उभा राहिला. छिदामनं धीर दिला, 'तुला काही भीती नाही.' आणि पोलिसांसमोर, मॅजिस्ट्रेटसमोर काय काय सांगायचं ते त्यानं तिला पुन्हा पुन्हा पढवलं. ती सगळी लांबलचक कहाणी चंदरानं काहीच ऐकली नाही; ती लाकडी पुतळ्यासारखी बसून राहिली.
शिक्षा
प्रत्येक कामात दुखीरामाची सगळी भिस्त छिदामवरच होती. छिदामनं जेव्हा चंदरावर आळ घालायला सांगितलं, तेव्हा दुखी म्हणाला, 'मग आपल्या धाकटीचं काय होईल?' छिदाम म्हणाला, 'तिला मी वाचवीन.' अवाढव्य दुखीराम निर्धास्त झाला. ३ छिदामनं आपल्या बायकोला पढवलं होतं, 'तू सांग, थोरली जाऊ मला विळी घेऊन मारायला आली होती, मी कोयत्यानं तिला अडवायला गेले आणि कसा कोण जाणे, तो अचानक तिला लागला.' हे सगळं रामलोचनांनी रचलेलं होतं. त्याला पुष्टी देणारे जे जे अलंकार आणि पुरावे लागतील तेही त्यांनी छिदामला तपशीलवार शिकवले होते. पोलीस येऊन तपास करू लागले. चंदरानंच आपल्या थोरल्या जावेचा खून केला, ही गोष्ट गावातल्या सगळ्या लोकांच्या मनात पक्की रुजली होती. सगळ्या साक्षीदारांच्या साक्षींतूनही तेच सिद्ध झालं. पोलिसांनी चंदराला प्रश्न विचारला तेव्हा चंदरा म्हणाली, 'होय, मी खून केला.' 'का खून केलास?' 'मला ती डोळ्यांसमोर खपत नसे.' 'काही बाचाबाची झाली होती?' 'नाही.' 'तिनं आधी तुला मारायला हात उगारला होता?' 'नाही.' 'तिनं तुझ्यावर काही जुलूम केला होता?' 'नाही.' अशी उत्तरं ऐकून सगळे थक्क झाले. छिदाम तर पार सैरभैर झाला. म्हणाला, 'त्या खरं सांगत नाहीत. थोरली आधी—' फौजदारानं जोरात दटावून त्याला गप्प केलं. शेवटी त्यानं चंदराची रीतसर उलटतपासणी केली आणि पुन्हा पुन्हा तेच एक उत्तर मिळवलं: थोरलीकडून कुठलाही हल्ला झाला हे चंदरानं काही केल्या कबूल केलं नाही. अशी हट्टी पोरगी तर कुठे पाहायला मिळत नाही. जिवाच्या आकांतानं ती फासाच्या खांबाकडे झेपावली आहे; कुणाला तिला काही केल्या मागे ओढून धरता येत नाही. केवढा हा जीवघेणा रुसवा! चंदरा मनातल्या मनात नवऱ्याला सांगते आहे, 'मी तुला सोडून, हे माझं नवं तारुण्य घेऊन फासाच्या खांबालाच वरलं; या जन्मातली माझी शेवटची गाठ आता त्याच्याशीच.'
शिक्षा
कैदी होऊन चंदरा, एक भोळी, इवलीशी, चंचल, थट्टेखोर गावची सून, जन्मापासून ओळखीच्या गावच्या रस्त्यानं, रथाच्या पटांगणातून, बाजाराच्या मधून, घाटाच्या कडेनं, मजुमदारांच्या घरासमोरून, पोस्टऑफिस आणि शाळेच्या बाजूनं, साऱ्या ओळखीच्या लोकांच्या डोळ्यांदेखत, कलंकाचा शिक्का घेऊन कायमचं घर सोडून निघून गेली. पोरांचा एक घोळका मागोमाग चालला, आणि गावच्या बायका, तिच्या मैत्रिणी, सख्या, कुणी घुंगटाच्या फटीतून, कुणी दाराच्या आडून, कुणी झाडाआड उभ्या राहून, पोलिसांनी नेलेल्या चंदराला पाहून लाजेनं, घृणेनं, भीतीनं शहारून गेल्या. डेप्युटी मॅजिस्ट्रेटसमोरही चंदरानं गुन्हा कबूल केला. आणि खुनाच्या वेळी थोरलीनं तिच्यावर कुठलाही जुलूम केला होता हे काही उघड झालं नाही. पण त्या दिवशी छिदाम साक्षीदाराच्या जागी येताक्षणीच रडू लागला आणि हात जोडून म्हणाला, 'दुहाई हुजूर, माझ्या बायकोचा काही दोष नाही.' हाकिमांनी दरडावून त्याचा तो उमाळा थांबवला आणि त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली; त्यानं एकेक करून खरी हकीकत सांगितली. हाकिमांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. कारण, मुख्य विश्वासार्ह, सभ्य साक्षीदार रामलोचन म्हणाले, 'खून झाल्यावर थोड्याच वेळात मी घटनास्थळी पोचलो होतो. साक्षीदार छिदामनं माझ्यापाशी सगळं कबूल केलं आणि माझ्या पायांना मिठी मारून म्हणाला, "बायकोला कशी सोडवू, मला युक्ती सांगा." मी बरं-वाईट काहीच बोललो नाही. साक्षीदार मला म्हणाला, "मी असं सांगितलं की माझ्या थोरल्या भावानं भात मागितला आणि भात मिळाला नाही म्हणून रागाच्या भरात बायकोला मारलं, तर ती सुटेल का?" मी म्हटलं, "खबरदार हरामखोरा, कोर्टात एक अक्षरही खोटं बोलू नकोस; याच्याएवढं महापाप दुसरं नाही."' वगैरे वगैरे.
शिक्षा
सुरुवातीला चंदराला वाचवायच्या हेतूनं रामलोचनांनी बऱ्याच कहाण्या रचल्या होत्या; पण चंदराच स्वतः उलटी अडून बसली आहे हे पाहिल्यावर त्यांना वाटलं, 'अरे बापरे, शेवटी खोट्या साक्षीच्या लफड्यात अडकायचं की काय! जेवढं ठाऊक आहे तेवढंच सांगितलेलं बरं.' असा विचार करून रामलोचनांना जे ठाऊक होतं ते त्यांनी सांगितलं. उलट त्याहूनही थोडं जास्तच सांगायला ते चुकले नाहीत. डेप्युटी मॅजिस्ट्रेटांनी खटला सेशन्स कोर्टाकडे सोपवला. दरम्यान शेती-वाडी, बाजारहाट, हसणं-रडणं, जगाचे सगळे व्यवहार चालूच राहिले. आणि आधीच्या वर्षांसारखाच नव्या भातशेतांवर श्रावणाच्या अखंड धारा बरसत राहिल्या. पोलीस आरोपी आणि साक्षीदारांना घेऊन कोर्टात हजर झाले. समोरच्या मुन्सफाच्या कोर्टात पुष्कळ लोक आपापल्या खटल्याची वाट पाहत बसले आहेत. स्वयंपाकघरामागच्या एका डबक्याच्या वाटणीसाठी कलकत्त्याहून एक वकील आला आहे, आणि त्यानिमित्तानं फिर्यादीच्या बाजूनं एकोणचाळीस साक्षीदार हजर आहेत. आपापल्या पै-पैच्या हिशोबाचा केसासारखा बारीक निवाडा करून घ्यायला शेकडो लोक उतावीळ होऊन आले आहेत; जगात सध्या यापेक्षा गंभीर दुसरं काहीच नाही, अशीच त्यांची समजूत. खिडकीतून छिदाम या अतिशय धावपळीच्या, रोजच्या जगाकडे एकटक पाहतो आहे; सगळं काही स्वप्नासारखं वाटतं आहे. कंपाउंडमधल्या मोठ्या वडावरून एक कोकिळा कुहू कुहू करते आहे; कोकिळांना कुठलाही कायदा नसतो, कोर्ट नसतं. चंदरा जजसाहेबांना म्हणाली, 'अहो साहेब, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा किती वेळा सांगू?' जजसाहेबांनी तिला समजावून विचारलं, 'तू जो गुन्हा कबूल करते आहेस, त्याची शिक्षा काय आहे ठाऊक आहे?' चंदरा म्हणाली, 'नाही.' जजसाहेब म्हणाले, 'त्याची शिक्षा फाशी.' चंदरा म्हणाली, 'अहो, तुमच्या पाया पडते, तेच द्या ना, साहेब. तुमच्या मनाला येईल ते करा, मला आता हे सहन होत नाही.'
शिक्षा
छिदामला कोर्टात हजर केलं तेव्हा चंदरानं तोंड फिरवलं. जज म्हणाले, 'साक्षीदाराकडे पाहून सांग, हा तुझा कोण?' चंदरा दोन्ही हातांनी तोंड झाकून म्हणाली, 'तो माझा नवरा आहे.' प्रश्न आला, 'त्याचं तुझ्यावर प्रेम नाही?' उत्तर: हं:, भारीच प्रेम आहे! प्रश्न: तुझं त्याच्यावर प्रेम नाही? उत्तर: खूप प्रेम आहे. छिदामला प्रश्न विचारला तेव्हा छिदाम म्हणाला, 'मी खून केला.' प्रश्न: का? छिदाम: मी भात मागितला, थोरलीनं भात वाढला नाही. दुखीराम साक्ष द्यायला आला आणि बेशुद्ध होऊन पडला. शुद्धीवर आल्यावर त्यानं उत्तर दिलं, 'साहेब, खून मी केला.' 'का?' 'मी भात मागितला, तिनं भात वाढला नाही.' भरपूर उलटतपासणी करून आणि इतर साक्षी ऐकून जजसाहेबांच्या स्पष्ट लक्षात आलं की घरच्या बाईला फाशीच्या बेअब्रूतून वाचवण्यासाठी हे दोघे भाऊ गुन्हा कबूल करत आहेत. पण पोलिसांपासून सेशन्स कोर्टापर्यंत चंदरा सतत एकच गोष्ट सांगत आली होती; तिच्या बोलण्यात तसूभरही फरक पडला नव्हता. दोन वकिलांनी स्वतःहून पुढे येऊन तिला देहदंडातून वाचवायची खूप धडपड केली, पण शेवटी तिच्यापुढे त्यांनी हार मानली. ज्या दिवशी अगदी चिमुकल्या वयात एक काळी-सावळी, इटुकली-पिटुकली पोर आपला गोल गोबरा चेहरा घेऊन, खेळातली बाहुली टाकून, बापाच्या घरून सासरी आली, त्या दिवशी रात्री शुभमुहूर्ताच्या वेळी आजच्या दिवसाची कल्पना कुणी केली असती? तिचा बाप मरताना एवढ्याच समाधानात निश्चिंत झाला होता की, काही का असेना, माझ्या पोरीला एकदाची सद्गती देऊन जातो आहे. तुरुंगात फाशीच्या आधी दयाळू सिव्हिल सर्जननं चंदराला विचारलं, 'कुणाला भेटावंसं वाटतं?' चंदरा म्हणाली, 'एकदा माझ्या आईला भेटायचं आहे.' डॉक्टर म्हणाला, 'तुझा नवरा तुला भेटायचं म्हणतो आहे, त्याला बोलावून आणू का?' चंदरा म्हणाली, 'मरण!—'