रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
शुभदृष्टी
कांतिचंद्र वयाने तरुण; तरीही पत्नी गेल्यावर दुसरी बायको शोधण्याच्या भानगडीत न पडता त्यांनी आपले सारे लक्ष पशुपक्ष्यांच्या शिकारीवरच लावले आहे. उंच, कृश, काटक, हलके शरीर; धारदार नजर; नेम कधी चुकायचा नाही; पेहराव उत्तर हिंदुस्थानी धाटणीचा. बरोबर नेहमी पैलवान हीरा सिंग, छक्कनलाल आणि गाणारे-बजावणारे खाँसाहेब, मियाँसाहेब असतात; बिनकामाचे हुजरे-चाकरही भरपूर. दोन-चार शिकारी मित्रांना घेऊन, अग्रहायणाच्या मध्यावर, कांतिचंद्र नैदीघीच्या पाणथळीकाठी शिकारीला गेले आहेत. नदीत दोन मोठ्या बोटींत त्यांचा मुक्काम; आणखी तीन-चार होड्यांतून नोकरचाकरांचा जथा गावच्या घाटाला वेढा घालून बसला आहे. गावातल्या सुनांचे पाणी भरणे, आंघोळ करणे जवळजवळ बंद झाले आहे. दिवसभर बंदुकांच्या आवाजाने जळ आणि स्थळ थरथरते आहे; संध्याकाळी उस्तादी गळ्यांच्या ताना-कसरतींनी गावाची झोप आणि डुलकी दोन्ही पळून गेली आहेत. एके दिवशी सकाळी कांतिचंद्र बोटीत बसून बंदुकीची नळी स्वतःच्या हाताने साफ करीत होते. इतक्यात जवळच बदकांचा आवाज ऐकू आला म्हणून त्यांनी वर पाहिले, तो एक मुलगी दोन्ही हातांत दोन कोवळी बदके छातीशी कवटाळून घाटावर घेऊन आली आहे. नदी लहानशी, जवळजवळ प्रवाह नसलेली, नाना तऱ्हेच्या शेवाळाने भरलेली. मुलीने बदके पाण्यात सोडली, आणि ती अगदीच आवाक्याबाहेर जाऊ नयेत अशा बेताने, धास्तावलेल्या, सावध मायेने ती त्यांना राखण्याची धडपड करीत होती. एवढे कळत होते की, एरवी ती आपली बदके पाण्यात सोडून निघून जात असे; पण हल्ली शिकाऱ्यांच्या भीतीने त्यांना निर्धास्तपणे सोडून जाणे तिला जमत नव्हते.
शुभदृष्टी
मुलीचे सौंदर्य कमालीचे नवे होते,—जणू विश्वकर्म्याने तिला आत्ताच घडवून मोकळे सोडले होते. वय सांगणे कठीण. शरीर उमललेले, पण चेहरा इतका कोवळा की संसाराचा लवलेशही तिला कुठे स्पर्शून गेला नसावा. आपण तारुण्यात पाऊल टाकले आहे, ही बातमी अजून तिची तिलाच पोहोचली नव्हती. कांतिचंद्रांचे बंदूक साफ करणे क्षणभर थबकले. ते चमकलेच. अशा ठिकाणी असा चेहरा दिसेल अशी त्यांनी कधी अपेक्षाच केली नव्हती. आणि तरीही राजाच्या अंतःपुरापेक्षा याच जागी हा चेहरा शोभून दिसत होता. सोन्याच्या फुलदाणीपेक्षा फूल झाडावरच शोभते. त्या दिवशी शरदातल्या दवात आणि सकाळच्या उन्हात नदीकाठचे फुललेले कासाचे बन झळाळत होते; त्याच्यामधला तो साधा, नवा चेहरा पाहून कांतिचंद्रांच्या मुग्ध डोळ्यांसमोर, आश्विनात माहेरी येऊ घातलेल्या उमेच्या आगमनाचे एक आनंदचित्र उमटले. मंदाकिनीच्या काठी तरुण पार्वतीही कधी कधी अशीच हंसाची पिल्ले छातीशी धरून येत असे; कालिदास ते लिहायचे विसरले. इतक्यात ती मुलगी अचानक भेदरून, रडवेल्या चेहऱ्याने, घाईघाईने बदके उचलून छातीशी धरून, अस्फुट आर्त स्वरात घाट सोडून निघाली. काय झाले ते पाहायला कांतिचंद्र बाहेर आले, तो त्यांच्या एका रसिक दरबाऱ्याने गंमत म्हणून, मुलीला घाबरवायला, बदकांवर रिकामी बंदूक रोखली आहे. कांतिचंद्रांनी मागून त्याची बंदूक हिसकावून घेतली आणि एकाएकी त्याच्या गालावर खाडकन एक सणसणीत थप्पड ठेवून दिली; त्या रसिकाचा अचानक रसभंग झाला आणि तो तिथल्या तिथे धप्पकन खाली बसला. कांती पुन्हा आपल्या खोलीत येऊन बंदूक साफ करू लागले.
शुभदृष्टी
कुतूहलाने कांतिचंद्र पक्ष्यांच्या शोधात झाडेझुडपे तुडवीत आत गेले, तो त्यांना एका सुखवस्तू गृहस्थाचे घर दिसले; अंगणात भाताच्या कणगींच्या रांगा. स्वच्छ, मोठ्या गोठ्याशेजारी बोरीच्या झाडाखाली सकाळचीच ती मुलगी एक जखमी होला छातीशी धरून हमसाहमशी रडत होती, आणि घमेल्यातल्या पाण्यात पदर भिजवून पक्ष्याच्या चोचीत पाणी पिळत होती. पाळलेले मांजर तिच्या मांडीवर दोन पाय टेकून, मान वर करून, त्या होल्याकडे उत्सुकतेने टक लावून पाहत होते; मुलगी मधून मधून त्याच्या नाकाच्या शेंड्यावर बोटाने टिचकी मारून त्या लोभी जनावराचा अतिउत्साह दाबून टाकत होती. खेड्यातल्या निःशब्द दुपारी, एका गृहस्थाच्या अंगणातल्या सुखवस्तू शांततेत, हे करुण चित्र क्षणार्धात कांतिचंद्रांच्या हृदयावर कोरले गेले. विरळ पानांच्या त्या झाडाची सावली आणि ऊन मुलीच्या मांडीवर येऊन पडले होते; जवळच पोटभर चरून गुबगुबीत झालेली गाय आळसावून जमिनीवर बसली होती आणि शिंगे व शेपूट हलवून पाठीवरच्या माश्या उडवीत होती; मधून मधून नव्या उत्तरवाऱ्याने बांबूच्या बेटात कुजबुजीसारखी सळसळ उठत होती. त्या दिवशी सकाळी नदीकाठच्या रानात जी वनश्रीसारखी दिसली होती, ती आज दुपारी गोठ्यालगतच्या अंगणाच्या निवांत सावलीत मायेने पाझरणाऱ्या गृहलक्ष्मीसारखी दिसली.
शुभदृष्टी
बंदूक हातात घेऊन एकाएकी या मुलीसमोर येऊन ठाकल्यावर कांतिचंद्र अगदी ओशाळून गेले. त्यांना वाटले, मुद्देमालासकट चोरच पकडला गेलो जणू! पक्षी आपल्या गोळीने जखमी झालेला नाही, एवढा खुलासा कसाही करून द्यावा असे त्यांना वाटू लागले. बोलणे कसे काढावे याचा ते विचार करीत होते, तेवढ्यात कुणीतरी हाक मारली, 'सुधा!' मुलगी दचकल्यासारखी उठली. पुन्हा हाक आली, 'सुधा!' मग ती घाईघाईने पक्षी घेऊन घराकडे निघून गेली. कांतिचंद्रांना वाटले, नाव अगदी साजेसे आहे! सुधा! मग कांतींनी बंदूक आपल्या माणसाच्या हाती दिली आणि पुढच्या वाटेने त्या घराच्या दाराशी येऊन उभे राहिले. पाहतात, तो एक पोक्त वयाचे, दाढीमिशा भादरलेले, शांत मूर्तीचे ब्राह्मण ओसरीवर बसून हरिभक्तिविलास वाचत आहेत. भक्तीने उजळलेल्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या खोल, स्निग्ध, प्रशांत भावात कांतिचंद्रांना त्या मुलीच्या दयार्द्र चेहऱ्याचे साम्य जाणवले. कांतींनी त्यांना नमस्कार करून म्हटले, 'तहान लागली आहे, महाराज. एक लोटाभर पाणी मिळेल का?' ब्राह्मणांनी घाईघाईने त्यांचे स्वागत करून त्यांना बसवले, आणि आतून पितळेच्या रकाबीत थोडे बत्तासे आणि काशाच्या लोट्यात पाणी आणून स्वतःच्या हाताने अतिथीपुढे ठेवले. कांतींचे पाणी पिऊन झाल्यावर ब्राह्मणांनी त्यांची विचारपूस केली. कांतींनी आपली ओळख सांगून म्हटले, 'महाराज, आपल्या काही उपयोगी पडता आले तर मी कृतार्थ होईन.'
शुभदृष्टी
नवीन बाडुज्जे म्हणाले, 'बाबा रे, माझ्या आणखी कसल्या उपयोगी पडणार तू? पण सुधा म्हणून माझी एक मुलगी आहे, तिचे वय होत आले आहे. तिचे एखाद्या सत्पात्री कन्यादान करता आले की संसाराच्या ऋणातून मी मोकळा होईन. जवळपास कुठे चांगला मुलगा दिसत नाही, दूरवर शोधायला जावे इतकी ऐपतही नाही; घरात गोपीनाथाची मूर्ती आहे, तिला सोडून मी कुठे जात नाही.' कांती म्हणाले, 'आपण बोटीवर मला भेटायला या, म्हणजे वराविषयी बोलू.' इकडे कांतींनी पाठवलेल्या हेरांनी बंद्योपाध्यायांच्या मुलीबद्दल, सुधेबद्दल, ज्याला ज्याला विचारले, त्या सर्वांनी एकमुखाने सांगितले, एवढ्या लक्ष्मीच्या स्वभावाची मुलगी दुसरी होणे नाही. दुसऱ्या दिवशी नवीन बोटीवर आले, तेव्हा कांतींनी जमिनीवर डोके टेकून त्यांना नमस्कार केला आणि सांगितले, ब्राह्मणांच्या मुलीशी लग्न करायची इच्छा असलेले वर ते स्वतःच आहेत. या अकल्पित भाग्याने ब्राह्मणांचा कंठ दाटून आला आणि काही वेळ त्यांच्या तोंडून शब्दच फुटेना. त्यांना वाटले, काहीतरी गैरसमज होतो आहे. म्हणाले, 'माझ्या मुलीशी तू लग्न करशील?' कांती म्हणाले, 'आपली संमती असेल, तर मी तयार आहे.' नवीनांनी विचारले, 'सुधेशी?'—उत्तर ऐकले, 'हो.' नवीन शांतपणे म्हणाले, 'मग, मुलगी पाहणं वगैरे,— जणू आपण तिला पाहिलेच नाही असा आव आणून कांती म्हणाले, 'ते एकदमच, शुभदृष्टीच्या वेळी.' नवीन सद्गदित स्वरात म्हणाले, 'माझी सुधा फार सुशील मुलगी आहे, स्वयंपाकपाण्यात, घरकामात तिच्या तोडीची दुसरी नाही. तू जसा तिला न पाहताच तिच्याशी लग्न करायला तयार झालास, तसाच माझा आशीर्वाद आहे की माझी सुधा पतिव्रता सतीलक्ष्मी होऊन जन्मभर तुझे कल्याण करो! क्षणभरसुद्धा तुला पस्तावायचे कारण कधी न घडो.'
शुभदृष्टी
कांतींना आणखी उशीर करायचा नव्हता; माघ महिन्यातच लग्न ठरले. आळीतल्या मजुमदारांच्या जुन्या पक्क्या वाड्यात लग्नाची जागा ठरली. वर हत्तीवर बसून, मशाली पेटवून, वाजंत्री वाजवीत वेळेवर दाखल झाले. शुभदृष्टीच्या वेळी वराने वधूच्या चेहऱ्याकडे पाहिले. मान खाली घातलेली, डोक्यावर मुकुट, चंदनाची नक्षी रेखलेली सुधा त्यांना नीटशी दिसलीच नाही जणू. उचंबळलेल्या हृदयाच्या आनंदाने त्यांचे डोळे जणू दिपून गेले. लग्नरात्रीच्या बासरघरात आळीतल्या सगळ्यांच्या आजीबाईंनी वराच्याच हाताने बळेबळे मुलीचा घुंगट उघडायला लावला, तेव्हा कांती एकाएकी दचकले. ही तर ती मुलगी नव्हे! एकाएकी छातीतून एक काळी वीज उठून जणू त्यांच्या मस्तकावर कोसळली—क्षणात बासरघरातले सारे दिवे जणू विझून गेले, आणि त्या अंधाराच्या पुराने नववधूच्या चेहऱ्यालाही जणू काळिमा फासला. दुसरे लग्न करायचे नाही, अशी कांतिचंद्रांनी मनाशी प्रतिज्ञा केली होती; नियतीने चुटकी वाजवून एखाद्या अशा विचित्र थट्टेने ती प्रतिज्ञा मोडून टाकली की काय! किती चांगली चांगली स्थळे त्यांनी नाकारली होती, किती मित्रांच्या काकुळतीच्या विनवण्या धुडकावल्या होत्या; बड्या घराण्याशी सोयरीक जोडण्याचे आकर्षण, पैशाचे आमिष, रूपाच्या कीर्तीची भुरळ, सगळे टाळून शेवटी कुठल्यातरी अनोळखी खेड्यात, पाणथळीकाठी, कुठल्यातरी अनोळखी गरिबाच्या घरी एवढी मोठी फजिती! लोकांना आता तोंड कसे दाखवायचे?
शुभदृष्टी
आधी सासऱ्याचाच राग आला. लबाडाने एक मुलगी दाखवून दुसऱ्याच मुलीशी माझे लग्न लावले. पण विचार करता त्यांच्या ध्यानात आले, नवीनांनी तर लग्नाआधी त्यांना मुलगी दाखवलीच नव्हती—मुलगी पाहायला त्यांनीच नकार दिला होता. आपल्याच अकलेच्या दोषाने एवढी मोठी फसगत झाली, ही शरमेची गोष्ट कुणापाशीही उघड न करणेच श्रेयस्कर, असे त्यांनी ठरवले. कडू औषध कसेबसे गिळले खरे, पण तोंड कडवटलेच. बासरघरातली थट्टामस्करी, मौज, काहीच त्यांना रुचेना. स्वतःवरच्या आणि साऱ्या जगावरच्या रागाने त्यांचे सर्वांग जळू लागले. इतक्यात शेजारी बसलेली वधू एकाएकी अस्फुट, घाबऱ्या स्वरात दचकली. तिच्या मांडीजवळून अचानक सशाचे एक पिल्लू धावत गेले. पुढच्याच क्षणी त्या दिवसाची तीच मुलगी त्या पिलामागोमाग आली, त्याला पकडून गालाशी धरून अपार मायेने त्याचे लाड करू लागली. 'आली रे वेडी!' म्हणत सगळ्यांनी तिला निघून जाण्याची खूण केली. तिने तिकडे ढुंकूनही न पाहता नेमकी वधूवरांच्या समोर बसून, लहान मुलाच्या कुतूहलाने, काय चालले आहे ते पाहायला सुरुवात केली. घरातली एक दासी तिला धरून न्यायला पुढे झाली, तेव्हा वर घाईने म्हणाले, 'अगं, राहू दे ना, बसू दे.' त्यांनी मुलीला विचारले, 'तुझं नाव काय?' तिने उत्तर न देता डोलायला सुरुवात केली. खोलीतल्या साऱ्या बायका हसू लागल्या. कांतींनी पुन्हा विचारले, 'तुझी बदकं केवढी झाली गं?' मुलगी काहीही संकोच न करता, निःशब्दपणे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. गोंधळून गेलेल्या कांतींनी धीर करून पुन्हा विचारले, 'तुझा तो होला बरा झाला ना?' काहीच उपयोग झाला नाही. बायका अशा हसू लागल्या, जणू वरच चांगला फसला होता.
शुभदृष्टी
शेवटी विचारल्यावर त्यांना कळले—मुलगी बहिरी आणि मुकी आहे, आळीतल्या साऱ्या पशुपक्ष्यांची सोबतीण. त्या दिवशी 'सुधा' ही हाक ऐकून ती उठून घरात गेली, हा केवळ त्यांचा तर्क होता; तिच्या जाण्याला दुसरेच काही कारण होते. कांती तेव्हा मनातल्या मनात दचकले. जे मिळाले नाही म्हणून या जगात आपल्याला कसलेच सुख उरले नव्हते, त्याच्यापासूनच सुदैवाने सुटका झाली, म्हणून त्यांनी स्वतःला धन्य मानले. त्यांच्या मनात आले, आपण या मुलीच्या बापाकडे गेलो असतो, आणि आपल्या मागणीप्रमाणे त्या माणसाने कशीबशी ही पोर आपल्या हाती सोपवून आपली सुटका करून घ्यायचा प्रयत्न केला असता, तर! हाताबाहेर गेलेल्या या मुलीच्या मोहाने जोपर्यंत त्यांचे मन ढवळून निघत होते, तोपर्यंत स्वतःच्या वधूविषयी ते अगदी आंधळे झाले होते. अगदी जवळच आणखी कुठे सांत्वनाला काही जागा आहे का, हे शोधून पाहण्याची इच्छाही त्यांना नव्हती. मुलगी मुकी-बहिरी आहे हे ऐकताक्षणी साऱ्या जगावरचा एक काळा पडदा फाटून गळून पडला. दूरची आशा दूर झाली आणि जवळच्या गोष्टी डोळ्यांसमोर स्पष्ट उभ्या राहिल्या. सुटकेचा एक खोल निःश्वास सोडून, संधी साधून, कांतींनी लाजेने मान खाली घातलेल्या वधूच्या चेहऱ्याकडे पाहिले. आता कुठे खरी शुभदृष्टी झाली. चर्मचक्षूंच्या आड असलेल्या मनाच्या डोळ्यांवरचे सगळे अडसर गळून पडले. हृदयातून आणि दिव्यांतून सारा प्रकाश उधळून एकाच कोमल, सुकुमार चेहऱ्यावर येऊन परावर्तित झाला; कांतींनी पाहिले, एका स्निग्ध श्रीने, एका शांत लावण्याने तो चेहरा मंडित झाला आहे. त्यांना कळून चुकले, नवीनांचा आशीर्वाद फळाला येणार.