रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
सुभा
मुलीचं नाव सुभाषिणी ठेवलं तेव्हा ती मुकी निघेल हे कुणाला ठाऊक होतं? तिच्या दोघी मोठ्या बहिणींची नावं सुकेशिनी आणि सुहासिनी ठेवली होती, म्हणून यमक जुळावं या आग्रहापोटी बापानं धाकटीचं नाव सुभाषिणी ठेवलं. आता सगळे तिला थोडक्यात सुभा म्हणतात. रीतसर शोधाशोध करून आणि पैसा मोजून थोरल्या दोघींची लग्नं होऊन गेली आहेत; आता धाकटी आईबापांच्या हृदयावरच्या एका मूक ओझ्यासारखी घरात विराजमान आहे. जो बोलत नाही त्यालाही भावना असतात, हे सगळ्यांच्या ध्यानात येत नाही; म्हणून तिच्या देखतच सगळे तिच्या भवितव्याची चिंता बोलून दाखवत असत. आपण विधात्याचा शाप म्हणून या बापाच्या घरी जन्माला आलो आहोत, हे तिनं अगदी लहानपणापासून ओळखलं होतं. त्याचा परिणाम असा झाला की लोकांच्या नजरेआड स्वतःला लपवून ठेवायची ती सदैव धडपड करीत असे. तिला वाटे, सगळ्यांनी मला विसरून जावं म्हणजे सुटले. पण दुःख कधी कुणी विसरतं का? आईबापांच्या मनात ती सतत जागी असे. त्यातही तिची आई तिला स्वतःचीच एक उणीव समजे; कारण आई मुलापेक्षा मुलीला आपला अधिक अंश मानते— मुलीत काही अपुरेपणा दिसला तर जणू ती खास आपलीच लाज आहे असं तिला वाटतं. उलट, मुलीचा बाप वाणीकंठ याचं सुभावर इतर मुलींपेक्षा जरा जास्तच प्रेम होतं म्हणा; पण आई मात्र तिला आपल्या पोटाला लागलेला कलंक समजून तिच्यावर फार वैतागलेली असे. सुभाला वाचा नव्हती, पण तिला लांबसडक पापण्यांचे दोन मोठे मोठे काळेभोर डोळे होते, आणि मनात भावनेची नुसती चाहूल लागली तरी तिचे ओठ कोवळ्या पालवीसारखे थरथरू लागत.
सुभा
बोलण्यातून आपण जो भाव व्यक्त करतो, तो बराचसा आपल्याला स्वतः खटपट करून घडवावा लागतो, थोडंफार भाषांतर केल्यासारखा; तो दर वेळी नेमका उतरतोच असं नाही, कुवत कमी पडून कितीदा तरी चुकतोही. पण काळ्या डोळ्यांना काही भाषांतर करावं लागत नाही— मन आपोआप त्यांच्यावर आपली सावली टाकतं; भाव आपोआप त्यांच्यावर कधी उमलतात, कधी मिटतात. कधी ते तेजानं झळाळून उठतात, कधी मंदावत विझत जातात; कधी मावळत्या चंद्रासारखे पापणी न लववता पाहत राहतात, कधी चपळ विजेसारखे दाही दिशांना चमकून जातात. जन्मापासून चेहऱ्यावरच्या भावांखेरीज जिला दुसरी भाषाच नाही, तिच्या डोळ्यांची भाषा अपार उदार आणि अथांग खोल असते— बरीचशी निरभ्र आकाशासारखी: उदयास्ताचा, ऊन-सावल्यांचा एक निःशब्द रंगमंच. या वाचाहीन माणसात विशाल निसर्गासारखी एक एकाकी भव्यता असते. म्हणूनच सामान्य मुलंमुली तिला एक प्रकारे भीत, तिच्याशी खेळत नसत. ती निर्जन दुपारसारखी निःशब्द आणि सवंगड्यांविना आहे. २ गावाचं नाव चंडीपूर. नदी बंगालमधली एक लहानशी नदी, एखाद्या गृहस्थाच्या घरच्या लेकीसारखी; तिचा पसारा फार दूरवर नाही; ही अथक, सडपातळ नदी आपले काठ सांभाळून आपलं काम करीत जाते; दोन्ही तीरांवरच्या गावांतल्या प्रत्येकाशी तिचं जणू काही ना काही नातं आहे. दोन्ही बाजूंना वस्ती आणि झाडांच्या दाट सावलीनं भरलेले उंच काठ; त्यांच्या तळातून ही गावलक्ष्मी, ही प्रवाहिनी, स्वतःला विसरून झपझप पावलं टाकत, प्रसन्न मनानं आपल्या असंख्य कल्याणकार्यांसाठी चाललेली असते.
सुभा
वाणीकंठाचं घर अगदी नदीच्या काठावरच. त्याचं कामट्यांचं कुंपण, गवती छपराचं मोठं घर, गोठा, भात कांडायची पडवी, गवताची गंजी, चिंचेचं झाड, आंबा-फणस आणि केळीची बाग नावेतून जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतात. या सुखवस्तू संसाराच्या भरभराटीत त्या मुक्या मुलीकडे कुणाचं लक्ष जातं की नाही कोण जाणे; पण कामधामातून जरा फुरसत मिळाली की ती या नदीकाठी येऊन बसते. निसर्ग जणू तिच्या वाचेची उणीव भरून काढतो. जणू तिच्या वतीनं बोलतो. नदीची खळखळ, माणसांचा कलकलाट, नावाड्यांची गाणी, पाखरांची किलबिल, झाडांची सळसळ— हे सारं एकवटून, भोवतीच्या साऱ्या वर्दळीशी, हेलकाव्यांशी, थरथरीशी एकरूप होऊन, सागराच्या लाटांच्या राशींसारखं त्या मुलीच्या चिरमौन हृदयाच्या किनाऱ्याशी येऊन पुन्हा पुन्हा फुटत राहतं. निसर्गाचे हे नाना आवाज आणि त्याच्या या नानाविध हालचाली— हीसुद्धा मुक्याचीच भाषा; मोठमोठ्या पापण्यांच्या डोळ्यांच्या सुभाची जी भाषा, तिचाच हा विश्वव्यापी विस्तार: रातकिड्यांच्या किरकिरीनं भरलेल्या गवताळ रानापासून शब्दांच्या पलीकडल्या नक्षत्रलोकापर्यंत नुसते इशारे, हावभाव, संगीत, आक्रंदन आणि दीर्घ निःश्वास. आणि माध्यान्ही जेव्हा नावाडी, कोळी जेवायला जात, गृहस्थ झोपी जात, पाखरं गप्प होत, पैलतीराची नाव बंद असे, गजबजलेलं जग सगळ्या कामधंद्याच्या मधोमध एकाएकी थबकून एक भयाण, निर्जन रूप धारण करी, तेव्हा त्या रौद्र महाकाशाखाली फक्त एक मुका निसर्ग आणि एक मुकी मुलगी समोरासमोर गप्प बसून राहत— एक दूरवर पसरलेल्या उन्हात, दुसरी एका इवल्याशा झाडाच्या सावलीत.
सुभा
सुभाला दोनचार जिवलग सख्या नव्हत्या असं नाही. गोठ्यातल्या दोन गाई— त्यांची नावं सर्वशी आणि पांगुली. ती नावं त्यांनी त्या मुलीच्या तोंडून कधीच ऐकली नव्हती, पण तिच्या पावलांचा आवाज त्या ओळखत— तिच्यापाशी शब्दांविना असा एक करुण सूर होता, त्याचं मर्म त्यांना भाषेपेक्षाही सहज कळे. सुभा केव्हा त्यांचे लाड करते आहे, केव्हा त्यांना रागे भरते आहे, केव्हा विनवणी करते आहे, हे त्यांना माणसांपेक्षा अधिक चांगलं कळत असे. सुभा गोठ्यात शिरून दोन्ही हातांनी सर्वशीच्या मानेला मिठी घालून तिच्या कानाशी आपला गाल घासत असे, आणि पांगुली मायाळू नजरेनं तिच्याकडे पाहत तिचं अंग चाटत असे. ही मुलगी दिवसातून नेमानं तीनदा गोठ्यात जाई; त्याखेरीज नेम नसलेल्या फेऱ्याही होत्याच; ज्या दिवशी घरात एखादा कठोर शब्द कानी पडे, त्या दिवशी ती अवेळी आपल्या या दोन मुक्या मैत्रिणींकडे येई— तिच्या सोशिकपणानं भरलेल्या, विषादानं शांत झालेल्या नजरेवरून, कुठल्याशा आंधळ्या अंतःप्रेरणेनं त्यांना जणू त्या मुलीच्या मनातली वेदना कळत असे, आणि तिला अंग घासत जवळ येऊन, हळूहळू तिच्या हातांवर शिंगं घासत घासत, त्या निःशब्द व्याकुळतेनं तिचं सांत्वन करायचा प्रयत्न करीत. याशिवाय एक शेळी आणि एक मांजराचं पिल्लूही होतं; त्यांच्याशी सुभाची अशी बरोबरीच्या नात्याची मैत्री नव्हती, तरीही ती दोघं तिच्याशी पुरेशी इमानदारी दाखवत. ते मांजराचं पिल्लू दिवसा-रात्री केव्हाही बिनदिक्कत सुभाच्या उबदार मांडीचा ताबा घेऊन सुखाच्या झोपेची तयारी करी, आणि सुभानं त्याच्या मानेवरून-पाठीवरून हलकेच बोटं फिरवली तर झोप लागायला खास मदत होते, असा आपला अभिप्रायही खुणेनं व्यक्त करी.
सुभा
३ उच्च श्रेणीच्या प्राण्यांतही सुभाला आणखी एक सोबती मिळाला होता. पण त्याच्याशी या मुलीचं नेमकं नातं काय होतं, हे ठरवणं कठीण; कारण तो भाषा असलेला जीव; त्यामुळे दोघांची भाषा एक नव्हती. गोसाव्यांचा धाकटा मुलगा— त्याचं नाव प्रताप. हा माणूस अगदीच निकामी. तो कामधंदा करून संसाराची भरभराट करण्याची खटपट करील, ही आशा आईबापांनी खूप प्रयत्नांनंतर सोडून दिली आहे. निकाम्या माणसांचा एक फायदा असा की, घरची माणसं त्यांच्यावर वैतागतात हे खरं, पण परक्या लोकांचे ते बहुधा लाडके होतात— कारण कुठल्याच कामात अडकलेले नसल्यामुळे ते सार्वजनिक मालमत्ता होऊन बसतात. शहरात जशी कुणाच्याही घराशी संबंध नसलेली एखाद-दुसरी सार्वजनिक बाग असावी लागते, तशी गावात दोन-चार निकामी सार्वजनिक माणसं असण्याची फार गरज असते. कामात-धंद्यात, मौजेत-फुरसतीत, जिथं एखादा माणूस कमी पडतो तिथं ते हाताशी हजर असतात. प्रतापचा मुख्य छंद— गळ टाकून मासे धरणं. यात बराचसा वेळ सहज जातो. दुपार टळल्यावर नदीकाठी तो बहुधा याच कामात गुंतलेला दिसे. आणि याच निमित्तानं सुभाची त्याची बहुधा गाठ पडे. कुठल्याही कामात गुंतलेला असो, सोबतीला कुणी असलं की प्रतापला बरं वाटतं. मासे धरताना वाचाहीन सोबतीच सर्वांत उत्तम— म्हणूनच प्रतापला सुभाची किंमत कळत असे. म्हणूनच, सगळे सुभाला सुभा म्हणत, पण प्रताप त्यात आणखी थोडी जास्तीची माया मिसळून तिला 'सु' म्हणून हाक मारी.
सुभा
सुभा चिंचेखाली बसून राही आणि प्रताप जरा अंतरावर जमिनीवर बसून, गळ टाकून पाण्याकडे पाहत राही. प्रतापला एक पान ठरलेलं होतं, ते सुभा स्वतः लावून आणी. आणि बहुधा, बराच वेळ बसून बसून, पाहत पाहत, तिला वाटे की प्रतापची एखादी खास मदत करावी, कुठल्यातरी कामी पडावं, कसंही करून त्याला कळवावं की या जगात आपणही काही कमी कामाचं माणूस नाही. पण करण्यासारखं काहीच नव्हतं. तेव्हा ती मनातल्या मनात देवाकडे अलौकिक शक्ती मागे— मंत्राच्या बळानं एकाएकी असा काही चमत्कार घडवावा की तो पाहून प्रताप थक्क होऊन म्हणेल, 'अरेच्चा! आपल्या सुभीच्या अंगी एवढी करामत आहे, हे ठाऊकच नव्हतं की!' समजा, सुभा जर जलकन्या असती; हळूच पाण्यातून वर येऊन एखाद्या नागाच्या मस्तकावरचा मणी घाटावर ठेवून जाती; प्रताप आपलं ते क्षुल्लक मासे धरणं टाकून तो मणी घेऊन पाण्यात बुडी मारता; आणि पाताळात जाऊन पाहता, तो रुप्याच्या महालात सोन्याच्या पलंगावर— कोण बसलंय?— आपल्या वाणीकंठाच्या घरची ती मुकी पोर सु— आपली सु, त्या रत्नांनी उजळलेल्या, खोल, निस्तब्ध पाताळपुरीची एकुलती एक राजकन्या! असं होऊ शकलं नसतं का? ते का इतकं अशक्य आहे? खरं तर काहीच अशक्य नाही; पण तरीही सु प्रजाहीन पाताळाच्या राजवंशात जन्माला न येता वाणीकंठाच्या घरी येऊन जन्मली आहे, आणि गोसाव्यांच्या प्रतापला काही केल्या थक्क करू शकत नाहीये. ४ सुभाचं वय दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. हळूहळू तिला जणू आपली आपल्यालाच जाणीव होऊ लागली आहे. जणू कुठल्याशा पौर्णिमेला कुठल्याशा सागरातून भरतीचा एक लोट येऊन तिच्या अंतरात्म्याला एका नव्या, शब्दातीत चेतनेनं काठोकाठ भरून टाकतो आहे. ती स्वतःला स्वतः न्याहाळते आहे, विचार करते आहे, स्वतःला प्रश्न विचारते आहे, आणि तिला काही उमगत नाहीये.
सुभा
पौर्णिमेच्या गहिऱ्या रात्री कधी कधी ती हळूच निजायच्या खोलीचं दार उघडून, भीत भीत तोंड बाहेर काढून पाहते, तो चांदण्यात न्हालेली सृष्टीही सुभासारखीच एकाकिनी, निजलेल्या जगावर जागत बसलेली— यौवनाच्या गूढानं, रोमांचानं, विषादानं, अपार निर्जनतेच्या अगदी शेवटच्या सीमेपर्यंत, किंबहुना ती ओलांडूनही, ओथंबून स्तब्ध झालेली; एक शब्दही बोलू शकत नाहीये. या निस्तब्ध व्याकुळ सृष्टीच्या कडेला एक निस्तब्ध व्याकुळ मुलगी उभी. इकडे उपवर मुलीच्या ओझ्यानं दबलेले आईबाप चिंतेत पडले आहेत. लोकही नावं ठेवू लागले आहेत. इतकंच काय, त्यांना वाळीत टाकणार अशी कुणकुणही कानी येते आहे. वाणीकंठाची परिस्थिती चांगली, दोन्ही वेळ मासे-भात खातो, त्यामुळे त्याला शत्रू होते. नवराबायकोची बरीच खलबतं झाली. काही दिवसांसाठी वाणी परगावी गेला. शेवटी परत येऊन म्हणाला, 'चला, कलकत्त्याला चला.' परमुलखी जाण्याची तयारी सुरू झाली. धुक्यानं झाकलेल्या पहाटेसारखं सुभाचं सारं हृदय आसवांच्या वाफेनं अगदी भरून गेलं. कुठल्याशा अनामिक भीतीनं ती काही दिवसांपासून एखाद्या मुक्या जनावरासारखी सारखी आईबापांच्या मागे मागे फिरत असे— टपोरे डोळे उघडून त्यांच्या तोंडाकडे पाहत काहीतरी समजून घ्यायचा प्रयत्न करी; पण ते तिला काहीच समजावून सांगत नसत. इतक्यात एके दिवशी दुपार टळल्यावर पाण्यात गळ टाकून बसलेला प्रताप हसून म्हणाला, 'काय गं सु, तुला म्हणे नवरा मिळालाय, तू लग्न करायला चाललीस? बघ हां, आम्हाला विसरू नकोस.' एवढं बोलून तो पुन्हा माशांकडे लक्ष देऊ लागला.
सुभा
काळजात बाण रुतलेली हरिणी जशी पारध्याकडे पाहते, आणि मूकपणे म्हणत राहते, 'मी तुझा काय अपराध केला होता?', तशी सुभानं प्रतापकडे पाहिलं; त्या दिवशी ती झाडाखाली पुन्हा बसली नाही. वाणीकंठ झोपेतून उठून निजायच्या खोलीत तंबाखू ओढत होते; सुभा त्यांच्या पायाशी बसून त्यांच्या तोंडाकडे पाहत रडू लागली. शेवटी तिचं सांत्वन करता करता वाणीकंठांच्या कोरड्या गालांवरून अश्रू ओघळले. उद्या कलकत्त्याला जायचा दिवस ठरला आहे. सुभा गोठ्यात आपल्या बालपणच्या सख्यांचा निरोप घ्यायला गेली; त्यांना आपल्या हातानं खाऊ घालून, त्यांच्या गळ्यात हात टाकून, दोन्ही डोळ्यांत जितके मावतील तितके शब्द भरून तिनं एकदा त्यांच्या तोंडाकडे पाहिलं— दोन्ही पापण्यांतून टपटप अश्रू गळू लागले. त्या दिवशी शुद्ध द्वादशीची रात्र होती. सुभा निजायच्या खोलीतून बाहेर पडली आणि आपल्या त्या चिरपरिचित नदीकाठी हिरवळीच्या शय्येवर अंग टाकून पडली— जणू या धरणीला, या प्रचंड मुक्या मानवमातेला दोन्ही हातांनी कवटाळून तिला सांगायचं होतं, 'मला जाऊ देऊ नकोस गं, आई. माझ्यासारखे तूही दोन हात पसरून मला धरून ठेव.' * * * कलकत्त्यातल्या एका बिऱ्हाडात सुभाच्या आईनं एके दिवशी सुभाला खूप नटवलं. केस घट्ट बांधून, अंबाड्यात जरीची फीत घालून, दागिन्यांनी मढवून, तिचं मूळचं सौंदर्य जमेल तितकं पुसून टाकलं. सुभाच्या दोन्ही डोळ्यांतून पाणी वाहत होतं; डोळे सुजून ती वाईट दिसेल म्हणून आईनं तिला भरपूर बोलणी सुनावली, पण आसवांनी त्या बोलण्यांना दाद दिली नाही.
सुभा
मित्रांना बरोबर घेऊन नवरदेव स्वतः मुलगी पाहायला आले— मुलीचे आईबाप चिंतेत, धास्तावलेले, धावपळीत; जणू देवता स्वतःच आपल्या बळीचं जनावर निवडायला आली आहे. आईनं पडद्याआडून भरपूर दटावून, धमकावून, ताकीद देऊन मुलीच्या आसवांचा पूर दुपटीनं वाढवून तिला परीक्षकांसमोर पाठवलं. परीक्षकांनी बराच वेळ निरखून पाहिलं आणि ते म्हणाले, 'वाईट नाही.' विशेषतः मुलीचं रडणं पाहून त्यांनी ओळखलं की हिला हृदय आहे, आणि हिशोब करून पाहिलं, 'जे हृदय आज आईबापांच्या ताटातुटीच्या कल्पनेनं व्याकूळ झालं आहे, तेच हृदय आज ना उद्या माझ्याच उपयोगी पडेल.' शिंपल्यातल्या मोत्यासारख्या त्या मुलीच्या आसवांनी फक्त मुलीची किंमत वाढवली; तिच्या वतीनं त्यांनी आणखी एक शब्दही उच्चारला नाही. पंचांग जुळवून एका अगदी शुभ मुहूर्तावर लग्न उरकलं. मुकी मुलगी परक्याच्या हाती सोपवून आईबाप गावी निघून गेले— त्यांची जात आणि परलोक दोन्ही वाचले. नवरा पश्चिमेकडे नोकरी करतो. लग्नानंतर लगेचच तो बायकोला पश्चिमेकडे घेऊन गेला. आठवडाभरातच सगळ्यांना कळून चुकलं की नवी नवरी मुकी आहे. पण हा तिचा दोष नाही, हे मात्र कुणालाच कळलं नाही. तिनं कुणालाही फसवलं नव्हतं. तिच्या दोन्ही डोळ्यांनी सगळं काही सांगितलं होतं, पण ते कुणालाच कळलं नाही. ती चहूकडे पाहते— भाषा सापडत नाही— मुक्याची भाषा समजणारे ते जन्मापासूनचे ओळखीचे चेहरे दिसत नाहीत— त्या मुलीच्या चिरमौन हृदयात एक अपार, अव्यक्त आक्रोश घुमू लागला— अंतर्यामीवाचून तो दुसऱ्या कुणालाच ऐकू गेला नाही. * * * या खेपेला तिच्या नवऱ्यानं डोळ्यांनी आणि कानांनीही पारखून घेऊन, भाषा असलेली एक मुलगी लग्न करून आणली.