रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
सुट्टी
पोरांचा म्होरक्या फटिक चक्रवर्ती याच्या डोक्यात एकाएकी एक नवी कल्पना चमकली. नदीकाठी शालवृक्षाचा एक प्रचंड ओंडका, जहाजाची डोलकाठी होण्याची वाट पाहत पडून होता; सगळ्यांनी मिळून तो लोटत लोटत न्यायचा, असं ठरलं. ज्याचं लाकूड आहे त्याला ते ऐन गरजेच्या वेळी हवं असेल तेव्हा किती आश्चर्य वाटेल, किती चीड येईल आणि केवढी पंचाईत होईल, हे पुरतं ध्यानात आल्यामुळे पोरांनी या प्रस्तावाला एकमुखी अनुमोदन दिलं. सगळे कंबर कसून मन लावून कामाला लागणार, तोच फटिकचा धाकटा भाऊ माखनलाल गंभीरपणे जाऊन त्या ओंडक्यावर बसला. त्याची ही थोर उदासीनता पाहून पोरं जरा हिरमुसली. एकानं पुढे होऊन घाबरत घाबरत त्याला किंचित ढकलून पाहिलं, पण तो जराही ढळला नाही; अकालीच तत्त्वज्ञानी झालेला हा मानव सर्व प्रकारच्या खेळांच्या असारतेवर मुकाट्यानं चिंतन करीत राहिला. फटिक येऊन दरडावून म्हणाला, 'ए, मार खाशील हां. आत्ताच्या आत्ता ऊठ.' त्यावर तो आणखी थोडा हलूनडुलून आपलं आसन चांगलंच पक्कं करून बसला. अशा प्रसंगी चारचौघांपुढे आपली राजप्रतिष्ठा राखायची तर न ऐकणाऱ्या भावाच्या गालावर विनाविलंब एक सणसणीत थप्पड ठेवून देणं हे फटिकचं कर्तव्यच होतं— पण तेवढी हिंमत झाली नाही. मात्र त्यानं असा आव आणला की मनात आणलं तर आत्ता याला चांगला धडा शिकवता येईल, पण शिकवत नाही, कारण आधीच्यापेक्षा एक भारी खेळ डोक्यात आलाय आणि त्यात आणखी जास्त मजा आहे. त्यानं सुचवलं, माखनसकटच तो ओंडका लोटायला सुरुवात करू या.
सुट्टी
माखनला वाटलं, यात आपला मोठा मान आहे; पण इतर सर्व ऐहिक मानमरातबांप्रमाणे याच्याबरोबरही काही धोका येऊ शकतो, हे त्याच्या किंवा दुसऱ्या कुणाच्याच मनात आलं नाही. पोरांनी कंबर कसून ढकलायला सुरुवात केली— 'मारा धक्का, हेय्या हो! शाब्बास गड्यांनो, हेय्या हो!' ओंडक्यानं एक फेरा घेतला न घेतला, तोच माखन आपलं गांभीर्य, आपला मान आणि आपलं तत्त्वज्ञान या सगळ्यांसकट जमीनदोस्त झाला. खेळाच्या सुरुवातीलाच असं अनपेक्षित फळ हाती आलेलं पाहून बाकीची पोरं भलतीच खूश झाली, पण फटिक जरा गडबडला. माखन क्षणात मातीची शय्या सोडून फटिकवर जाऊन पडला आणि डोळे मिटून सपासप मारू लागला. त्याच्या नाकातोंडावर ओरखडे काढून तो रडत रडत घराच्या दिशेनं निघून गेला. खेळ मोडला. फटिकनं कासाची चार-दोन ताटं उपटून घेतली आणि अर्धवट पाण्यात बुडालेल्या एका होडीच्या नाळेवर चढून बसून तो गुपचूप कासाची मुळं चघळू लागला. इतक्यात परगावची एक होडी घाटाला लागली. काळ्याभोर मिशा आणि पिकलेले केस घेऊन एक मध्यमवयीन सद्गृहस्थ बाहेर आले. त्यांनी त्या मुलाला विचारलं, 'चक्रवर्तींचं घर कुठं आहे?' मुलगा देठ चघळत चघळतच म्हणाला, 'त्ये तिक्कडं.' पण त्यानं कोणत्या दिशेला बोट दाखवलं, हे कुणालाच कळणं शक्य नव्हतं. सद्गृहस्थांनी पुन्हा विचारलं, 'कुठं?' तो म्हणाला, 'मला काय ठाऊक?' आणि पुन्हा पूर्वीसारखा गवताच्या मुळांतून रस शोषण्याच्या कामी गढून गेला. तेव्हा ते बाबू दुसऱ्या लोकांची मदत घेऊन चक्रवर्तींच्या घराच्या शोधाला निघाले. थोड्याच वेळात बाघा बाग्दी येऊन म्हणाला, 'फटिकदादा, आई बोलावतेय.' फटिक म्हणाला, 'नाही येणार.'
सुट्टी
बाघानं त्याला जबरदस्तीनं बगलेत उचलून नेलं; फटिक निष्फळ संतापानं हातपाय झाडत राहिला. फटिकला पाहताक्षणी त्याची आई संतापानं लालबुंद होऊन म्हणाली, 'पुन्हा तू माखनला मारलंस!' फटिक म्हणाला, 'नाही, नाही मारलं.' 'पुन्हा खोटं बोलतोस!' 'मुळीच नाही मारलं. माखनला विचार.' माखनला विचारताच माखननं आपल्या आधीच्या तक्रारीला दुजोरा देत म्हटलं, 'हो, मारलं.' आता मात्र फटिकला सहन होईना. तो तडक गेला आणि माखनच्या एक खाडकन थोबाडीत ठेवून देऊन म्हणाला, 'पुन्हा खोटं!' आईनं माखनची बाजू घेऊन फटिकला गदागदा हलवलं आणि त्याच्या पाठीत दोन-तीन जोरदार धपाटे घातले. फटिकनं आईला ढकलून दिलं. आई किंचाळली, 'अँ! तू माझ्या अंगावर हात टाकतोस!' इतक्यात ते काळ्या मिशा-पिकल्या केसांचे बाबू खोलीत येऊन म्हणाले, 'काय चाललंय तुमचं?' फटिकची आई आश्चर्यानं आणि आनंदानं भारावून म्हणाली, 'अगो बाई, हा तर दादा! तू कधी आलास?' आणि तिनं जमिनीवर डोकं टेकवून नमस्कार केला. दादा फार वर्षांपूर्वी पश्चिमेकडे नोकरीसाठी गेले होते. दरम्यान फटिकच्या आईला दोन मुलं झाली, ती बरीच मोठीही झाली, तिचा नवराही वारला, पण एकदाही तिला दादाचं दर्शन घडलं नव्हतं. आज इतक्या वर्षांनी देशी परत आल्यावर विश्वंभरबाबू आपल्या बहिणीला भेटायला आले होते. काही दिवस मोठ्या थाटामाटात गेले. शेवटी निघायच्या एक-दोन दिवस आधी विश्वंभरबाबूंनी बहिणीकडे मुलांच्या शिक्षणाची आणि बौद्धिक प्रगतीची चौकशी केली. उत्तरादाखल त्यांनी फटिकच्या आडमुठ्या उनाडपणाची, अभ्यासाकडे दुर्लक्षाची, आणि माखनच्या शांत, सालस स्वभावाची आणि विद्येवरच्या प्रेमाची हकिकत ऐकली.
सुट्टी
त्यांची बहीण म्हणाली, 'फटिकनं माझा जीव अगदी नकोसा करून सोडलाय.' हे ऐकून विश्वंभरांनी सुचवलं की, फटिकला ते कलकत्त्याला घेऊन जातील आणि स्वतःजवळ ठेवून शिकवतील. विधवा बहिणीनं या प्रस्तावाला सहज संमती दिली. तिनं फटिकला विचारलं, 'काय रे फटिक, येतोस मामाबरोबर कलकत्त्याला?' फटिक उडी मारून म्हणाला, 'हो, येतो!' फटिकला पाठवून द्यायला आईची काही हरकत नव्हती, कारण कधी तो माखनला पाण्यातच ढकलून देईल, नाहीतर त्याचं डोकंच फोडेल, नाहीतर आणखी काहीतरी भलताच प्रसंग ओढवून आणेल, याची धास्ती तिच्या मनात सतत असायची; तरीसुद्धा निघून जायला फटिक इतका उतावीळ झालेला पाहून तिला जरासं वाईट वाटलं. 'कधी निघायचं?' 'केव्हा निघायचं?' असं विचारून विचारून फटिकनं मामाला भंडावून सोडलं; उत्साहापायी रात्री त्याला झोप येईना. शेवटी निघतेवेळी आनंदाच्या भरात आलेल्या औदार्यानं त्यानं आपला मासे धरायचा गळ, पतंग, फिरकी, सगळं माखनला पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनं भोगवटा करण्याच्या पुऱ्या हक्कानिशी देऊन टाकलं. * * * कलकत्त्याला मामाच्या घरी पोचल्यावर पहिली ओळख झाली ती मामीशी. कुटुंबात झालेल्या या अनावश्यक भरीनं मामी मनातल्या मनात फार खूश झाली होती, असं काही मला म्हणवत नाही. स्वतःच्या तीन मुलांना घेऊन ती आपल्या नियमानं संसार मांडून बसली होती; त्यात मध्येच तेरा वर्षांचं एक अनोळखी, अडाणी, खेडवळ पोर आणून सोडलं, तर केवढी उलथापालथ होऊ शकते! विश्वंभरांचं एवढं वय झालं, पण अक्कल म्हणून काही असेल तर शपथ!
सुट्टी
त्यातून तेरा-चौदा वर्षांच्या मुलासारखी ब्याद या जगात दुसरी नाही. त्याला शोभा नाही, त्याचा कुठं उपयोग नाही. त्याच्याविषयी माया दाटून येत नाही, आणि त्याची संगत कुणाला फारशी हवीशीही वाटत नाही. तो बोबडं बोलला तर लाडिक नखरा, पोक्तपणे बोलला तर आगाऊपणा, आणि तोंड उघडलं की तो उर्मटपणाच. कपड्यांचं काहीही माप न राखता तो अचानक बेढबपणे वाढू लागतो; लोकांना तो त्याचा एक कुरूप उद्दामपणाच वाटतो. बालपणीचं लोभसपण आणि आवाजातला गोडवा एकाएकी नाहीशी होते; आणि त्याबद्दल लोक मनातल्या मनात त्यालाच दोष दिल्यावाचून राहू शकत नाहीत. बालपणाचे आणि तारुण्याचे पुष्कळ दोष माफ होतात, पण या वयातली एखादी स्वाभाविक, अटळ चूकसुद्धा जणू असह्य वाटते. त्यालाही मनातून सारखं जाणवत असतं की आपण जगात कुठंच नीट बसत नाही; म्हणून तो आपल्या अस्तित्वाबद्दलच सदा लाजलेला आणि क्षमा मागत असल्यासारखा वावरतो. आणि नेमकं याच वयात मायेसाठी मनाला जरा जास्तच आसुसलेपण येतं. अशा वेळी कुण्या प्रेमळ माणसाकडून त्याला माया किंवा मैत्री मिळाली, तर तो त्याच्या पायी स्वतःला विकूनच टाकतो. पण त्याला माया लावायला कुणी धजत नाही; कारण लोकांच्या लेखी ते लाड करून डोक्यावर बसवणं ठरतं. त्यामुळे त्याचं रूप आणि त्याचा एकूण आविर्भाव बराचसा मालक नसलेल्या रस्त्यावरच्या कुत्र्यासारखा होऊन जातो. तेव्हा अशा अवस्थेत आईचं घर सोडून दुसरी कोणतीही परकी जागा मुलासाठी नरकच. भोवतालची मायाशून्य नावड त्याला पावलोपावली काट्यासारखी टोचत राहते. याच वयात साधारणपणे स्त्रीजात म्हणजे कुठल्याशा श्रेष्ठ स्वर्गलोकातले दुर्मीळ जीव असं मनात ठसू लागतं, म्हणून त्यांच्याकडून होणारी उपेक्षा अगदीच असह्य वाटते.
सुट्टी
मामीच्या मायाहीन डोळ्यांना आपण एखाद्या पीडाकारक ग्रहासारखे दिसतो, हेच फटिकला सर्वात जास्त सलत असे. मामीनं कधी चुकून त्याला एखादं काम सांगितलं, तर तो आनंदाच्या भरात गरजेपेक्षा जास्तच काम करून टाकी— आणि शेवटी मामी त्याचा उत्साह दाबून म्हणे, 'पुरे, पुरे झालं. त्याला आता तू हात लावायला नको. आता आपलं काम बघ जा. जरा अभ्यास कर जा'—तेव्हा आपल्या बौद्धिक प्रगतीविषयी मामीनं दाखवलेली ही अतिरिक्त काळजी त्याला भयंकर निष्ठुर अन्याय वाटे. घरात अशी उपेक्षा, आणि त्यानंतर मोकळा श्वास घ्यायलाही कुठं जागा नव्हती. भिंतींच्या आत कोंडून पडल्यावर त्याला सारखी आपल्या गावाची आठवण येई. भलामोठा ढाऊस पतंग घेऊन घूं घूं आवाज करीत उडवत फिरायचं ते माळरान; 'ताइरे नाइरे नाइरे ना' करीत मोठ्यानं स्वतःच रचलेला राग आळवत निरुद्योगीपणे भटकायचा तो नदीकाठ; दिवसभरात केव्हाही उडी टाकून पोहायची ती अरुंद नदी; ती सगळी टोळी, तो धिंगाणा, ते स्वातंत्र्य; आणि सगळ्यांहून अधिक, ती जुलमी, अन्यायी आई— रात्रंदिवस त्याच्या असहाय मनाला ओढ लावत. जनावरासारखी एक प्रकारची अजाण माया— फक्त जवळ जाण्याची एक आंधळी इच्छा, फक्त न पाहिल्यानं होणारी एक न सांगता येणारी व्याकुळता, संधिप्रकाशात आई हरवलेल्या वासरासारखी फक्त एक आतून फुटणारी 'आई, आई' अशी हाक— त्या लाजऱ्या, भेदरलेल्या, किरकोळ, उंच, कुरूप मुलाच्या अंतरात सारखी उसळत राही. शाळेत इतका मठ्ठ आणि लक्ष नसलेला मुलगा दुसरा नव्हता. काही विचारलं तर तो आ वासून बघत राही. मास्तर मारू लागले की ओझ्यानं थकलेल्या गाढवासारखा मुकाट्यानं सोसे. मुलांना खेळायची सुट्टी झाली की खिडकीपाशी उभा राहून दूरच्या घरांची छपरं न्याहाळत राही; त्या भर दुपारच्या उन्हात एखाद्या गच्चीवर एखादं-दुसरं पोर कसल्याशा खेळाच्या निमित्तानं क्षणभर दिसून जाई, तेव्हा त्याचं मन अस्वस्थ होऊन उठे.
सुट्टी
एकदा खूप मनाचा निश्चय करून, मोठ्या धाडसानं त्यानं मामांना विचारलं होतं, 'मामा, आईकडं कधी जायचं?' मामा म्हणाले होते, 'शाळेला सुट्टी लागू दे.' कार्तिक महिन्यात पूजेची सुट्टी; ती अजून खूप लांब होती. एक दिवस फटिकचं शाळेचं पुस्तक हरवलं. एक तर त्याचा अभ्यास सहजासहजी होतच नसे, त्यात पुस्तक हरवल्यावर तो पार हतबल झाला. मास्तर रोज त्याला बेदम मारू लागले, अपमान करू लागले. शाळेत त्याची अशी गत झाली की त्याच्या मामेभावांना त्याच्याशी आपलं नातं आहे हे कबूल करायचीही लाज वाटू लागली. त्याचा कुठलाही अपमान झाला की ते इतर मुलांपेक्षाही जणू मुद्दाम जोर लावून जास्त मजा घेत. असह्य झाल्यावर एक दिवस फटिक अगदी अपराध्यासारखा मामीकडे जाऊन म्हणाला, 'पुस्तक हरवलं.' मामीनं ओठांच्या दोन्ही कोपऱ्यांत नाराजीची रेघ ओढून म्हटलं, 'वा, छान केलंस! महिन्यातून पाच पाच वेळा तुला पुस्तकं घेऊन द्यायला मला काही जमायचं नाही.' फटिक आणखी काही न बोलता निघून आला— आपण परक्याचा पैसा वाया घालवतोय, या विचारानं त्याच्या मनात आईविषयी तीव्र रुसवा दाटून आला; स्वतःच्या हीनपणानं आणि दैन्यानं तो अगदी मातीमोल झाला. शाळेतून आल्यावर त्या रात्री त्याचं डोकं दुखू लागलं आणि अंगावर शिरशिरी आली. आपल्याला ताप येतोय, हे त्याला कळलं. आपण आजारी पडलो तर मामीला उगाचच फार त्रास होईल, हेही त्याला कळलं. मामी या आजाराकडे एक निष्कारण, अनावश्यक कटकट म्हणून कसं पाहील, हे त्याला स्पष्ट दिसत होतं. आजारपणात हा कुचकामी, विचित्र, मठ्ठ मुलगा जगात स्वतःच्या आईखेरीज आणखी कुणाकडून शुश्रूषा मिळवू शकेल, अशी अपेक्षा करायचीसुद्धा त्याला लाज वाटू लागली.
सुट्टी
दुसऱ्या दिवशी सकाळी फटिक कुठं दिसला नाही. आजूबाजूच्या शेजाऱ्यांच्या घरी चौकशी करूनही त्याचा काही पत्ता लागला नाही. त्यात त्या दिवशी रात्रीपासून श्रावणाचा मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे त्याला शोधताना माणसांना उगाचच खूप भिजावं लागलं. शेवटी कुठंच न सापडल्यावर विश्वंभरबाबूंनी पोलिसांत वर्दी दिली. दिवसभरानंतर संध्याकाळी एक गाडी विश्वंभरबाबूंच्या घरासमोर येऊन थांबली. तेव्हाही धो धो पाऊस अखंड पडतच होता, रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं. दोन पोलिसांनी फटिकला धरून गाडीतून उतरवलं आणि विश्वंभरबाबूंसमोर आणून उभं केलं. तो नखशिखान्त भिजलेला, सर्वांगाला चिखल, तोंड आणि डोळे लालबुंद, आणि थरथर कापत होता. विश्वंभरबाबू जवळजवळ कडेवर घेऊनच त्याला आतल्या घरात घेऊन गेले. त्याला पाहताच मामी म्हणाली, 'कशाला हो, दुसऱ्याचं पोर आणून हे भोग भोगायचे? द्या, त्याला त्याच्या घरी पाठवून द्या.' खरं तर, दिवसभराच्या काळजीनं तिचं धड जेवणखाणही झालं नव्हतं, आणि स्वतःच्या मुलांवरही ती उगाचच खूप खेकसली होती. फटिक हुंदका देत म्हणाला, 'मी आईकडं चाललो होतो, मला परत आणलं.' मुलाचा ताप भयंकर चढला. रात्रभर तो वात झाल्यासारखा बरळत राहिला. विश्वंभरबाबू डॉक्टरला घेऊन आले. फटिकनं आपले लाल डोळे एकदा उघडले, आणि छताच्या तुळईकडे भांबावल्यासारखं पाहत तो म्हणाला, 'मामा, माझी सुट्टी झाली का?' विश्वंभरबाबूंनी रुमालानं डोळे पुसले आणि फटिकचा किरकोळ, तापलेला हात मायेनं आपल्या हातावर घेऊन ते त्याच्याजवळ येऊन बसले. फटिक पुन्हा पुटपुटत बरळू लागला; म्हणाला, 'आई, मला मारू नको गं, आई. खरंच सांगतो, मी काही केलं नाही.'
सुट्टी
दुसऱ्या दिवशी दिवसा थोडा वेळ शुद्धीवर आल्यावर फटिकनं कुणाच्या तरी आशेनं खोलीत चहूकडे शून्य नजरेनं पाहिलं. निराश होऊन तो पुन्हा मुकाट्यानं भिंतीकडे तोंड करून कूस वळवून पडून राहिला. त्याच्या मनातलं ओळखून विश्वंभरबाबूंनी त्याच्या कानाजवळ तोंड नेऊन हळू आवाजात सांगितलं, 'फटिक, तुझ्या आईला आणायला माणूस पाठवलाय.' त्याच्या पुढचा दिवसही गेला. डॉक्टरांनी काळजीत पडलेल्या, उतरलेल्या चेहऱ्यानं सांगितलं, प्रकृती फारच खालावली आहे. मंद झालेल्या दिव्याच्या उजेडात विश्वंभरबाबू आजारी मुलाच्या उशाशी बसून क्षणाक्षणाला फटिकच्या आईची वाट पाहू लागले. फटिक खलाशांसारखा सूर लावून लावून म्हणू लागला, 'एक बाँव मिले ना. दो बाँव मिले—ए-ए ना.' कलकत्त्याला येताना काही रस्ता आगबोटीनं यावं लागलं होतं; खलाशी दोरखंड सोडून सूर लावत पाण्याची खोली मोजत असत. फटिक भ्रमात त्यांचीच नक्कल करीत करुण स्वरात पाणी मोजत होता; आणि ज्या अपार समुद्राच्या प्रवासाला तो निघाला होता, त्याचा तळ दोर सोडून सोडूनही त्या मुलाला कुठंच लागत नव्हता. इतक्यात फटिकची आई वादळासारखी खोलीत शिरली आणि शिरताक्षणीच मोठमोठ्यानं आक्रोश करू लागली. विश्वंभरांनी मोठ्या कष्टानं तिचा शोकावेग आवरल्यावर, ती अंथरुणावर स्वतःला झोकून देत मोठ्यानं हाक मारली, 'फटिक! सोन्या! माझ्या राजा!' फटिकनं जणू अगदी सहज तिला उत्तर दिलं, 'अं?' आईनं पुन्हा हाक मारली, 'अरे फटिक, माझ्या बाळा रे!' फटिकनं हळूहळू कूस वळवली, आणि कुणाकडेही न पाहता तो हलक्या आवाजात म्हणाला, 'आई, आता माझी सुट्टी झाली गं आई. आता मी घरी जातोय.'