रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
सुवर्णमृग
आद्यानाथ आणि वैद्यनाथ चक्रवर्ती हे एकाच वडिलोपार्जित मालमत्तेचे दोन वाटेकरी. दोघांपैकी वैद्यनाथांचीच परिस्थिती जरा वाईट. वैद्यनाथांचे वडील महेशचंद्र यांना व्यवहारबुद्धी अजिबात नव्हती; ते आपले थोरले बंधू शिवनाथ यांच्यावर पूर्णपणे विसंबून असत. शिवनाथांनी भावाला मायेचे भरपूर गोड शब्द दिले आणि त्याबदल्यात त्यांची सगळी जमीनजुमला गिळंकृत केली. उरले ते फक्त कंपनी सरकारचे काही रोखे. जीवनाच्या समुद्रात वैद्यनाथांना धरून राहायला तेवढे काही रोखेच काय ते होते. शिवनाथांनी पुष्कळ शोध घेऊन आपला मुलगा आद्यानाथ याचं लग्न एका श्रीमंताच्या एकुलत्या एक मुलीशी लावून दिलं आणि मालमत्ता वाढवण्याची आणखी एक सोय करून ठेवली. महेशचंद्रांनी मात्र सात मुलींच्या भाराखाली वाकलेल्या एका गरीब ब्राह्मणावर दया करून, एक पैसाही हुंडा न घेता, त्याच्या थोरल्या मुलीशी आपल्या मुलाचं लग्न लावलं. सातही मुली त्यांनी घरात आणल्या नाहीत, त्याचं कारण एवढंच की त्यांना एकच मुलगा होता, आणि ब्राह्मणानेही तशी विनंती केली नव्हती. मात्र बाकीच्या मुलींच्या लग्नासाठी त्यांनी आपल्या ऐपतीपलीकडे जाऊन पैशाची मदत केली होती.
सुवर्णमृग
वडिलांच्या मृत्यूनंतर वैद्यनाथ आपले ते थोडेसे रोखे घेऊन अगदी निश्चिंत आणि समाधानी होते. कामधंद्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवत नसे. काम म्हणायचं तर ते झाडाच्या फांद्या कापून, बसल्या बसल्या मोठ्या निगुतीने छड्या तयार करीत. पंचक्रोशीतली मुलं आणि तरुण छडीसाठी त्यांच्याकडे याचक होऊन येत, आणि ते त्या देऊन टाकत. याशिवाय औदार्याच्या भरात गळाच्या काठ्या, पतंग, फिरक्या बनवण्यातही त्यांचा पुष्कळ वेळ जाई. ज्याला खूप काळजीने, खूप दिवस घासूनपुसून तासावं लागतं, पण संसाराला होणाऱ्या उपयोगाच्या मानाने ज्याच्यावर एवढे श्रम आणि एवढा वेळ खर्चणं मुळीच परवडत नाही, असं एखादं हातकाम मिळालं की त्यांच्या उत्साहाला सीमा राहत नसे. गावात तट-गट आणि कटकारस्थानं यांच्या धुराने बंगालमधले मोठमोठे पवित्र चंडीमंडप कोंदून जात असत, तेव्हा वैद्यनाथ एक लेखणी तासायचा चाकू आणि झाडाच्या फांदीचा एक तुकडा घेऊन सकाळपासून दुपारपर्यंत, आणि जेवण-वामकुक्षीनंतर सांजेपर्यंत, आपल्या ओसरीवर एकटेच वेळ घालवताना बहुधा दिसत. षष्ठीदेवीच्या कृपेने, शत्रूंच्या तोंडात एकामागून एक माती घालत, वैद्यनाथांना दोन मुलगे आणि एक मुलगी झाली. * * * गृहिणी मोक्षदासुंदरी यांचा असंतोष दिवसेंदिवस वाढत चालला होता. आद्यानाथांच्या घरी जसा थाटमाट, तसा वैद्यनाथांच्या घरी का नसावा? त्या घरच्या विंध्यवासिनीचे जसे दागदागिने, बनारसी साड्या, बोलण्याची ढब आणि वागण्याचा डौल, तसे मोक्षदांचे नेमके होऊ नयेत — यापेक्षा तर्काला सोडून असलेली गोष्ट दुसरी कोणती असू शकेल? शिवाय कुटुंब तर एकच ना! भावाची मालमत्ता लुबाडूनच तर त्यांची एवढी भरभराट झाली. जितकं ऐकावं तितका मोक्षदांच्या मनात आपल्या सासऱ्यांविषयी आणि सासऱ्यांच्या एकुलत्या एक मुलाविषयी अनादर आणि तुच्छता मावेनाशी होई.
सुवर्णमृग
आपल्या घरातलं त्यांना काहीच आवडत नसे. सगळंच गैरसोयीचं आणि अपमानास्पद. झोपायचा पलंग प्रेत वाहून न्यायच्यासुद्धा लायकीचा नाही; ज्याच्या सात कुळांत कोणी नाही असं एखादं अनाथ वटवाघळाचं पिल्लूसुद्धा या जीर्ण भिंतींत राहायला तयार होणार नाही; आणि घरातलं सामानसुमान पाहून ब्रह्मचारी परमहंसाच्याही डोळ्यांत पाणी येईल. या अतिशयोक्तींचा प्रतिवाद करणं पुरुषांसारख्या भेकड जातीला केवळ अशक्य. म्हणून वैद्यनाथ बाहेरच्या ओसरीवर बसून दुप्पट लक्ष देऊन छड्या तासू लागले. पण मौनव्रत हा काही संकटातून सुटण्याचा एकमेव मार्ग नव्हे. एखाद्या दिवशी गृहिणी नवऱ्याच्या कलाकुसरीत व्यत्यय आणून त्यांना आत बोलावून घेत. अतिशय गंभीरपणे दुसरीकडे पाहत म्हणत, 'गवळ्याचं दूध बंद करा.' वैद्यनाथ क्षणभर स्तब्ध राहून नम्रपणे म्हणत, 'दूध बंद करून कसं चालेल? मुलं खाणार काय?' गृहिणी उत्तर देत, 'पेज.' पुन्हा एखाद्या दिवशी याच्या उलट भाव दिसे. गृहिणी वैद्यनाथांना बोलावून म्हणत, 'मला काही ठाऊक नाही. काय करायचं ते तुम्ही करा.' वैद्यनाथ म्लान चेहऱ्याने विचारत, 'काय करायचंय?' पत्नी म्हणत, 'या महिन्याचा बाजार करून आणा.' असं म्हणून अशी एक यादी हातात देत, की तिच्यात एखादा राजसूय यज्ञ थाटामाटात पार पडला असता. वैद्यनाथांनी जर धीर करून विचारलं, 'एवढं सगळं खरंच लागणार आहे का?' तर उत्तर ऐकू येई, 'मग पोरं उपाशी मरू देत आणि मीही जाते, म्हणजे तुम्ही एकटे बसून अगदी स्वस्तात संसार चालवाल.' अशा रीतीने हळूहळू वैद्यनाथांच्या लक्षात आलं की छड्या तासून आता भागणार नाही. काहीतरी मार्ग काढायलाच हवा. नोकरी करणं किंवा व्यापार करणं ही वैद्यनाथांच्या बाबतीत दुराशाच. तेव्हा कुबेराच्या भांडारात शिरण्याचा एखादा जवळचा रस्ता शोधून काढायला हवा.
सुवर्णमृग
एके रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या त्यांनी आर्तपणे प्रार्थना केली, 'हे जगदंबे, आई, स्वप्नात एखाद्या असाध्य रोगावरचं पेटंट औषध सांगितलंस, तर वर्तमानपत्रात त्याची जाहिरात लिहिण्याची जबाबदारी मी घेईन.' त्या रात्री त्यांना स्वप्न पडलं की त्यांची पत्नी त्यांच्यावर नाराज होऊन 'मी विधवाविवाह करणार' असा हट्टच धरून बसल्या आहेत. पैशाची अशी चणचण असताना योग्य दागिने कुठून आणायचे, म्हणून वैद्यनाथ त्या प्रस्तावाला हरकत घेताहेत, आणि विधवेला दागिने लागत नाहीत असं सांगून पत्नी ती हरकत खोडून काढताहेत. यावर एक अगदी बिनतोड उत्तर आहे असं त्यांना वाटतंय, पण ते काही केल्या डोक्यात येत नाही — इतक्यात झोप मोडली. पाहतात तो सकाळ झालेली; आणि आपल्या पत्नीचा विधवाविवाह का होऊ शकत नाही याचं चोख उत्तर त्यांना त्या क्षणी आठवलं, आणि बहुधा त्यामुळे ते जरासे खट्टूच झाले. दुसऱ्या दिवशी प्रातर्विधी आटोपून ते एकटेच बसून पतंगाचा दोरा तयार करीत होते, तेवढ्यात एक संन्यासी जयजयकार करीत दारात आला. त्याच क्षणी विजेसारखं वैद्यनाथांना भावी ऐश्वर्याचं झगमगतं रूप दिसलं. त्यांनी संन्याशाचं भरपूर आदरातिथ्य केलं, खाण्यापिण्याची रेलचेल केली. पुष्कळ विनवण्या केल्यावर त्यांना कळलं की संन्यासी सोनं तयार करू शकतो, आणि ती विद्या त्यांना द्यायला त्याने नकारही दिला नाही. गृहिणीही आनंदाने नाचू लागल्या. यकृत बिघडलं की माणसाला जसं सगळं पिवळं दिसतं, तसं त्यांना जगभर सोनंच सोनं दिसू लागलं. कल्पनेच्या कारागिराकडून झोपायचा पलंग, घरातलं सामान आणि घराच्या भिंतीसुद्धा सोन्याने मढवून घेऊन त्यांनी मनातल्या मनात विंध्यवासिनीला आमंत्रण धाडलं. संन्यासी रोज दोन शेर दूध आणि दीड शेर मोहनभोग खाऊ लागला, आणि वैद्यनाथांच्या कंपनी-रोख्यांचं दोहन करून त्यांतून रुपेरी रसाच्या धारांवर धारा काढू लागला.
सुवर्णमृग
गळाच्या काठ्या, छड्या, फिरक्यांसाठी हपापलेली मुलं वैद्यनाथांच्या बंद दारावर निष्फळ थापा मारून परत जातात. घरच्या मुलांना वेळेवर खायला मिळत नाही, ती पडतात, कपाळाला टेंगूळ येतं, रडून आकाश फाडतात; कर्ता की गृहिणी, कोणाचंही तिकडे लक्ष नाही. अग्निकुंडासमोर निःशब्द बसून कढईकडे पाहताना दोघांच्याही पापण्या लवत नाहीत, तोंडात शब्द नाही. तहानलेल्या एकाग्र डोळ्यांत अखंड अग्निशिखेचं प्रतिबिंब पडून जणू त्यांच्या बाहुल्यांनाच परिसाचा गुण आला. नजरेची वाट संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या वाटेसारखी झळाळत्या सुवर्णलेपाने लालबुंद झाली. दोन रोखे या सुवर्ण-अग्नीत आहुती दिल्यावर एके दिवशी संन्याशाने दिलासा दिला, 'उद्या सोन्याचा रंग धरेल.' त्या रात्री कोणालाच झोप आली नाही; नवराबायको मिळून सुवर्णनगरी बांधू लागले. तिच्याबद्दल मधूनमधून दोघांत मतभेद आणि वादही झाले, पण आनंदाच्या भरात ते मिटायला वेळ लागला नाही. एकमेकांच्या खातर आपापली मतं थोडी थोडी सोडून द्यायला दोघांनीही फारसे आढेवेढे घेतले नाहीत — त्या रात्री दांपत्यातलं ऐक्य इतकं घट्ट झालं होतं. दुसऱ्या दिवशी संन्याशाचा पत्ता नाही. चहूकडचा सोनेरी रंग उडून गेला आणि सूर्याचे किरणसुद्धा काळवंडलेले दिसू लागले. त्यानंतर झोपायचा पलंग, घरातलं सामान आणि घराच्या भिंती चौपट दारिद्र्य आणि जीर्णपणा दाखवू लागल्या. आता घरच्या कोणत्याही बाबतीत वैद्यनाथांनी एखादं साधंसं मत मांडायला तोंड उघडलं की गृहिणी तिखट-गोड स्वरात म्हणतात, 'अक्कल पुष्कळ दाखवलीत, आता काही दिवस स्वस्थ बसा.' वैद्यनाथ एकदम विझून जातो. मोक्षदेने असा काही श्रेष्ठपणाचा आव आणला आहे, की जणू या सोनेरी मृगजळावर तिने स्वतः क्षणभरसुद्धा भरवसा ठेवला नव्हता.
सुवर्णमृग
अपराधी वैद्यनाथ पत्नीला थोडंफार खूश करण्यासाठी नाना उपाय शोधू लागले. एके दिवशी एका चौकोनी पुडक्यात गुपचूप एक भेट घेऊन ते पत्नीकडे गेले आणि भरपूर हसू फुलवत, अतिशय चतुराईने मान डोलावत म्हणाले, 'ओळख बघू, काय आणलंय?' पत्नीने आपलं कुतूहल लपवून उदासीनपणे म्हटलं, 'मी कसं सांगणार? मी काही मनकवडी नाही.' वैद्यनाथांनी उगाचच वेळ घालवत आधी दोरीची गाठ अगदी सावकाश सोडली, मग फुंकर मारून कागदावरची धूळ झटकली, त्यानंतर अतिशय काळजीपूर्वक एकेक घडी उलगडत कागदाचं वेष्टन उघडलं, आणि आर्ट स्टुडिओचं रंगीत दशमहाविद्यांचं चित्र बाहेर काढून, उजेडाकडे वळवून गृहिणीसमोर धरलं. गृहिणीला लगेच विंध्यवासिनीच्या शयनगृहातलं विलायती तैलचित्र आठवलं; अपार तुच्छतेच्या स्वरात त्या म्हणाल्या, 'अगो बाई, मेलेच मी! हे तुमच्या बैठकीच्या खोलीत ठेवा आणि बसल्या बसल्या न्याहाळत बसा जा. मला याचं काही काम नाही.' खिन्न वैद्यनाथांच्या लक्षात आलं की इतर अनेक क्षमतांबरोबरच स्त्रीचं मन राखण्याच्या दुर्घट क्षमतेपासूनही विधात्याने आपल्याला वंचित ठेवलं आहे. * * * इकडे पंचक्रोशीत जितके ज्योतिषी होते, त्या सर्वांना मोक्षदांनी हात दाखवला, पत्रिका दाखवली. सगळ्यांनी सांगितलं, त्या अहेवपणीच मरतील; पण त्या परमानंदमय परिणामासाठीच काही त्या फार उतावीळ नव्हत्या, त्यामुळे यानेही त्यांची जिज्ञासा शमली नाही. त्यांनी ऐकलं की त्यांचं संततिभाग्य चांगलं आहे, मुलाबाळांनी त्यांचं घर लवकरच भरून जाण्याचा संभव आहे. हे ऐकून त्यांनी काही विशेष आनंद दाखवला नाही. अखेर एकाने गणित मांडून सांगितलं की वर्षभराच्या आत वैद्यनाथांना दैवी धन मिळालं नाही, तर तो ज्योतिषी आपली पंचांगं-पोथ्या सगळ्या जाळून टाकील. ज्योतिष्याची ही भीषण प्रतिज्ञा ऐकल्यावर मोक्षदांच्या मनात अविश्वासाला तिळमात्र जागा उरली नाही.
सुवर्णमृग
ज्योतिषीबुवा भरपूर बक्षिसी घेऊन निघून गेले, पण वैद्यनाथांचं जगणं असह्य झालं. धन मिळवण्याचे काही सर्वसाधारण, रूढ मार्ग असतात — जसे शेती, नोकरी, व्यापार, चोरी आणि फसवणूक. पण दैवी धन मिळवण्याचा तसा कोणताही ठरलेला उपाय नाही. म्हणूनच मोक्षदा वैद्यनाथांना जितकं प्रोत्साहन देतात आणि जितकी बोलणी सुनावतात, तितका वैद्यनाथांना कोणत्याच दिशेला रस्ता दिसेनासा होतो. कुठे खणायला सुरुवात करावी, कोणत्या तळ्यात पाणबुडे उतरवावेत, घराची कोणती भिंत फोडावी, विचार करकरून काहीच ठरवता येत नाही. मोक्षदांनी अगदी वैतागून नवऱ्याला सांगितलं की पुरुषमाणसाच्या डोक्यात मेंदूऐवजी इतकं शेण भरलेलं असू शकतं, याची त्यांना आधी कल्पना नव्हती. म्हणाल्या, 'जरा हातपाय हलवून बघा. आ वासून बसून राहिलं तर आकाशातून पैशांचा पाऊस पडणार आहे का?' बोलणं रास्तच होतं, आणि वैद्यनाथांचीही मनापासून तीच इच्छा होती; पण हात कुठे हलवावेत आणि पाय कुठे टाकावेत, ते कोणी सांगतच नाही ना! म्हणून ओसरीवर बसून वैद्यनाथ पुन्हा छड्या तासू लागले. * * * इकडे आश्विन महिन्यात दुर्गोत्सव जवळ आला. चतुर्थीपासूनच घाटाला नावा लागू लागल्या. परगावी राहणारे लोक घरी परतत होते. टोपल्यांत अळकुड्या, भोपळे, सुकी नारळं; पत्र्याच्या पेट्यांत मुलांसाठी जोडे, छत्र्या, कपडे; आणि प्रियेसाठी अत्तर, साबण, नव्या गोष्टींची पुस्तकं आणि सुगंधी खोबरेल. निरभ्र आकाशात शरदातलं ऊन उत्सवाच्या हास्यासारखं पसरलं आहे; निम्मीशिम्मी पिकलेली भाताची शेतं थरथरत आहेत; पावसाने धुतलेली टवटवीत पालवी नव्या गार वाऱ्यात शिरशिरत आहे; आणि टसराचा चिनी कोट घालून, खांद्यावर गुंडाळलेली चादर टाकून, डोक्यावर छत्री धरून, परतणारे वाटसरू शेतांतल्या वाटेने घराकडे निघाले आहेत.
सुवर्णमृग
वैद्यनाथ बसल्या बसल्या हे सारं पाहतात, आणि त्यांच्या हृदयातून दीर्घ उसासा उचंबळून येतो. आपल्या आनंदहीन घराची बंगालमधल्या हजारो घरांच्या मिलनोत्सवाशी ते तुलना करतात आणि मनाशी म्हणतात, 'विधात्याने मला असं निकामी का घडवलं?' मुलं पहाटे उठल्याबरोबर मूर्ती घडताना पाहायला आद्यानाथांच्या अंगणात जाऊन हजर झाली होती. जेवणाची वेळ झाल्यावर दासी त्यांना जबरदस्तीने अटक करून घेऊन आली. त्या वेळी वैद्यनाथ बसल्या बसल्या या विश्वव्यापी उत्सवात आपल्या आयुष्याच्या निष्फळतेची आठवण काढीत होते. दासीच्या हातून दोन्ही मुलांची सुटका करून, त्यांना जवळ कुशीत ओढून घेत त्यांनी थोरल्याला विचारलं, 'काय रे ओबू, या पूजेला तुला काय हवंय, सांग बघू.' अविनाशने लगेच उत्तर दिलं, 'मला एक होडी द्या, बाबा.' धाकट्यानेही विचार केला, कोणत्याही बाबतीत थोरल्या भावापेक्षा कमी पडणं काही बरं नव्हे; म्हणाला, 'मलाही एक होडी द्या, बाबा.' बापाला साजेसे मुलगे! एखादं निरुपयोगी कारागिरीचं काम हाती आलं की त्यांना आणखी काही नको. बाप म्हणाले, 'बरं.' इकडे यथाकाळ पूजेच्या सुट्टीत मोक्षदांचे एक काका काशीहून घरी आले. ते पेशाने वकील. मोक्षदांनी काही दिवस त्यांच्याकडे सारख्या फेऱ्या मारल्या. अखेर एके दिवशी येऊन नवऱ्याला म्हणाल्या, 'अहो, तुम्हाला काशीला जावं लागणार आहे.' वैद्यनाथांना एकदम वाटलं, बहुतेक आपला मृत्युकाळ जवळ आल्याचं ज्योतिष्याने पत्रिकेतून शोधून काढलं आहे; सहधर्मिणीला त्याचा सुगावा लागला, आणि आपली सद्गती करण्याचा बेत त्या आखताहेत. मग त्यांनी ऐकलं ते असं: काशीत एक घर आहे, आणि तिथे गुप्तधन मिळेल अशी वदंता आहे; ते घर विकत घेऊन त्यातलं धन काढून आणायचं आहे. वैद्यनाथ म्हणाले, 'बाप रे, सर्वनाश! मला काशीला जाता यायचं नाही.'
सुवर्णमृग
वैद्यनाथ कधी घर सोडून कुठेही गेले नव्हते. गृहस्थाला घरातून कसं बाहेर काढायचं, याची हातोटी स्त्रियांना न शिकवताच असते — त्यांचं 'अशिक्षितपटुत्व' — असं प्राचीन शास्त्रकार लिहून ठेवतात. मोक्षदा नुसत्या तोंडच्या शब्दांनी घरात जणू मिरचीची धुरी देऊ शकत; पण त्याने बिचारा वैद्यनाथ फक्त डोळ्यांतल्या पाण्यात वाहून जाई, काशीला जाण्याचं नाव काढत नसे. दोन-तीन दिवस गेले. वैद्यनाथांनी बसल्या बसल्या लाकडाचे काही तुकडे कापून, कोरून, जोडून दोन खेळण्यातल्या होड्या तयार केल्या. त्यांत डोलकाठ्या बसवल्या, कापड कापून शिडं लावली, लाल शालूची निशाणं फडकवली, सुकाणू आणि वल्ही बसवली; बाहुल्यांचा एक नावाडी आणि प्रवासी बसवायलाही ते विसरले नाहीत. त्यात त्यांनी फार मेहनत आणि विलक्षण कौशल्य दाखवलं. ती होडी पाहून मनाची असह्य चलबिचल होणार नाही असा संयमी मुलगा सध्याच्या काळात मिळणं दुर्मीळ. म्हणूनच सप्तमीच्या आदल्या रात्री वैद्यनाथांनी जेव्हा दोन्ही होड्या मुलांच्या हातात दिल्या, तेव्हा ती आनंदाने नाचू लागली. एक तर नुसता होडीचा सांगाडाच पुरेसा, त्यात आणखी सुकाणू आहे, वल्ही आहेत, डोलकाठी आहे, शीड आहे, शिवाय जागच्या जागी नावाडी बसलेला आहे — हेच त्यांच्या विशेष आश्चर्याचं कारण झालं. मुलांच्या आनंदाच्या कल्लोळाने ओढल्या जाऊन मोक्षदा आल्या आणि त्यांनी गरीब बापाने दिलेली पूजेची भेट पाहिली. पाहिली, संतापल्या, रडल्या, कपाळावर हात मारून घेतला, आणि दोन्ही खेळणी हिसकावून खिडकीबाहेर भिरकावून दिली. सोन्याचा हार गेला, सॅटिनचा सदरा गेला, जरीची टोपी गेली, आणि शेवटी हा करंटा माणूस दोन खेळणी देऊन आपल्याच मुलांना फसवायला निघाला! तेही दोन पैसे खर्च न करता, स्वतःच्या हाताने बनवलेली!
सुवर्णमृग
धाकटा मुलगा तर ऊर फुटेस्तोवर रडू लागला. 'मूर्ख पोर!' म्हणून मोक्षदांनी त्याच्या गालावर फाडकन एक थप्पड लगावली. थोरला मुलगा बापाच्या चेहऱ्याकडे पाहून आपलं दुःख विसरला. नुसता आनंदाचा आव आणून म्हणाला, 'बाबा, उद्या पहाटे मी जाऊन त्या उचलून आणतो.' दुसऱ्या दिवशी वैद्यनाथ काशीला जायला तयार झाले. पण पैसे कुठे? त्यांच्या पत्नीने दागिने विकून पैसे उभे केले. वैद्यनाथांच्या आजीच्या काळचे दागिने — असे बावनकशी सोन्याचे, असे वजनदार दागिने आजकाल मिळतच नाहीत. वैद्यनाथांना वाटलं, आपण मरायला निघालो आहोत. मुलांना कडेवर घेऊन, त्यांचे मुके घेऊन, डोळ्यांत पाणी आणून ते घराबाहेर पडले. तेव्हा मोक्षदाही रडू लागल्या. * * * काशीचा घरमालक वैद्यनाथांच्या चुलतसासऱ्यांचा अशील होता. बहुधा त्याच कारणाने घर फार चढ्या भावानेच विकलं गेलं. वैद्यनाथ एकटेच त्या घराचा ताबा घेऊन बसले. घर अगदी नदीच्या काठावरच. घराचा पाया धुवत नदीचा प्रवाह वाहत होता. रात्री वैद्यनाथांच्या अंगावर काटा येऊ लागला. रिकाम्या घरात उशाशी दिवा लावून, चादर डोक्यावरून ओढून ते झोपले. पण काही केल्या झोप येईना. मध्यरात्री सगळा गोंगाट थांबला, तेव्हा कुठूनतरी एक खणखण आवाज ऐकून वैद्यनाथ दचकले. आवाज मंद, पण स्पष्ट. जणू पाताळात बळीराजाच्या खजिन्यात खजिनदार बसल्या बसल्या पैसे मोजतो आहे. वैद्यनाथांच्या मनात भीती दाटली, कुतूहल जागं झालं, आणि त्याचबरोबर एक दुर्दम्य आशा उगवली. थरथरत्या हाताने दिवा घेऊन ते खोलीखोलीतून फिरले. या खोलीत गेलं की वाटे, आवाज त्या खोलीतून येतो आहे; त्या खोलीत गेलं की वाटे, या खोलीतून. वैद्यनाथ सबंध रात्र नुसते या खोलीतून त्या खोलीत येरझारा घालत राहिले. दिवसा तो पाताळ भेदून येणारा आवाज इतर आवाजांत मिसळून गेला, त्याला ओळखता येईना.
सुवर्णमृग
रात्रीच्या दुसऱ्या-तिसऱ्या प्रहरी जग झोपी गेल्यावर तो आवाज पुन्हा जागा झाला. वैद्यनाथांचं मन अगदी अस्वस्थ झालं. आवाजाचा माग काढत कोणत्या दिशेने जावं, ते त्यांना सुचेना. वाळवंटात पाण्याचा खळखळाट ऐकू येतो आहे, पण तो कोणत्या दिशेने येतो ते ठरवता येत नाही; भीती वाटते, एकदा चुकीची वाट धरली तर तो गुप्त झरा कायमचा हाताबाहेर जाईल. तहानलेला वाटसरू स्तब्ध उभा राहून जिवाचे कान करतो, आणि इकडे तहान अधिकाधिक तीव्र होत जाते — वैद्यनाथांची तशी अवस्था झाली. पुष्कळ दिवस त्या अनिश्चित अवस्थेतच गेले. जागरणाने आणि व्यर्थ आशेने त्यांच्या संतोषाने स्निग्ध चेहऱ्यावर उतावीळपणाच्या तीव्र रेषा उमटल्या. खोल गेलेल्या, भेदरलेल्या डोळ्यांत भर दुपारच्या वाळवंटातल्या वाळूसारखी एक धग दिसू लागली. अखेर एके दिवशी भर दुपारी सगळी दारं बंद करून ते खोलीच्या जमिनीवर जागोजागी पहार ठोकून आवाज पाहू लागले. शेजारच्या एका लहानशा कोठडीच्या जमिनीतून पोकळ आवाज आला. रात्र निजानीज झाल्यावर वैद्यनाथ एकटेच बसून ती जमीन खणू लागले. रात्र उजाडायला आली तेव्हा भोक खणून पूर्ण झालं. वैद्यनाथांनी पाहिलं, खाली खोलीसारखं काहीतरी आहे; पण त्या रात्रीच्या अंधारात सारासार न पाहता त्यात पाय सोडायचं धाडस त्यांना झालं नाही. भोकावर अंथरूण दाबून ठेवून ते झोपले. पण आवाज असा काही स्पष्ट होऊ लागला की भीतीने ते तिथून उठून आले — आणि तरीही घर असुरक्षित सोडून दारापासून दूर जायला मन धजेना. लोभ आणि भीती दोन बाजूंनी त्यांचे दोन हात धरून ओढू लागले. रात्र सरली. आज दिवसासुद्धा आवाज ऐकू येतो. नोकराला खोलीत शिरू न देता त्यांनी बाहेरच जेवणखाण उरकलं. जेवण झाल्यावर खोलीत शिरून दाराला कुलूप लावलं.
सुवर्णमृग
दुर्गेचं नाव घेऊन त्यांनी विवराच्या तोंडावरचं अंथरूण बाजूला केलं. पाण्याचा खळखळाट आणि धातूचा ठणठणाट अगदी स्पष्ट ऐकू आला. भीत भीत भोकाजवळ हळूहळू तोंड नेऊन त्यांनी पाहिलं — फार उंच नसलेल्या एका दालनात पाण्याचा प्रवाह वाहतो आहे; अंधारात आणखी काही विशेष दिसलं नाही. एक मोठी काठी खाली सोडून त्यांनी पाहिलं, पाणी गुडघाभरापेक्षा जास्त नाही. एक काडेपेटी आणि एक मेणबत्ती घेऊन त्या उथळ दालनात त्यांनी सहज उडी टाकली. एका क्षणात सारी आशा विझून जाईल की काय, या भीतीने मेणबत्ती पेटवताना हात कापू लागले. पुष्कळ काड्या वाया घालवल्यावर अखेर मेणबत्ती पेटली. पाहिलं, लोखंडाच्या एका जाड साखळीला तांब्याची एक मोठी कळशी बांधलेली आहे; मधूनमधून पाण्याचा प्रवाह जोरात येतो आणि साखळी कळशीवर आपटून आवाज होतो. वैद्यनाथ पाण्यातून छपछप आवाज करीत घाईघाईने त्या कळशीजवळ पोहोचले. जाऊन पाहतात तो कळशी रिकामी. तरीही त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना — दोन्ही हातांनी कळशी उचलून त्यांनी गदागदा हलवली. आत काहीच नाही. उपडी करून धरली. काहीच पडलं नाही. पाहिलं, कळशीचा गळा फुटलेला आहे. जणू एके काळी या कळशीचं तोंड पूर्ण बंद होतं, आणि कोणीतरी ते फोडलं आहे. तेव्हा वैद्यनाथ पाण्यात दोन्ही हातांनी वेड्यासारखे चाचपू लागले. चिखलाच्या थरात हाताला काहीतरी लागलं; उचलून पाहिलं तो कवटी — तीही एकदा कानाजवळ नेऊन त्यांनी हलवून पाहिली — आत काहीच नाही. फेकून दिली. पुष्कळ शोधल्यावरही माणसाच्या सांगाड्याच्या हाडांशिवाय दुसरं काहीच मिळालं नाही. पाहिलं, नदीच्या बाजूला भिंतीचा एक भाग फुटलेला आहे; तिथून पाणी आत शिरतंय, आणि त्यांच्या आधी ज्या कोणाच्या पत्रिकेत दैवी धनलाभ लिहिलेला होता, तोही बहुधा याच भगदाडातून आत शिरला होता.
सुवर्णमृग
अखेर पूर्ण निराश होऊन 'आई!' म्हणून त्यांनी एक मोठा काळीज चिरणारा उसासा सोडला — त्याचा प्रतिध्वनी जणू भूतकाळातल्या आणखी कितीतरी निराश माणसांचे उसासे एकत्र करून भीषण गांभीर्याने पाताळातून घुमत वर आला. अंगभर पाणी आणि चिखल माखलेल्या अवस्थेत वैद्यनाथ वर आले. माणसांनी गजबजलेलं, कोलाहलाने भरलेलं जग त्यांना आदीपासून अंतापर्यंत खोटं, आणि त्या साखळीला बांधलेल्या फुटक्या कळशीसारखं रिकामं वाटलं. पुन्हा सामानसुमान बांधायचं, तिकीट काढायचं, गाडीत बसायचं, घरी परतायचं, बायकोशी वाद घालायचा, आयुष्याचं ओझं रोज वाहायचं — हे त्यांना असह्य वाटलं. वाटलं, नदीच्या जीर्ण काठासारखं धप्पकन ढासळून पाण्यात पडावं. पण तरीही त्यांनी ते सामान बांधलं, तिकीट काढलं, आणि गाडीतही बसले. आणि एके दिवशी हिवाळ्याच्या संध्याकाळी घराच्या दारात जाऊन उभे राहिले. आश्विनात शरदाच्या सकाळी घराजवळ बसून वैद्यनाथांनी परगावी राहणाऱ्या कितीतरी जणांना घरी परतताना पाहिलं होतं, आणि उसासे टाकत परमुलखातून घरी परतण्याच्या या सुखासाठी मनोमन आसुसले होते — तेव्हा आजची ही संध्याकाळ स्वप्नातसुद्धा दिसणं शक्य नव्हतं. घरात शिरून ते अंगणातल्या लाकडी पाटावर बावळटासारखे बसून राहिले, आत गेले नाहीत. सर्वांत आधी मोलकरणीने त्यांना पाहिलं आणि आनंदाचा गलका उडवून दिला; मुलं धावत आली; गृहिणीने बोलावणं पाठवलं. वैद्यनाथांची जणू एक गुंगी उतरली; जणू ते आपल्या त्या पूर्वीच्या संसारात पुन्हा जागे झाले. सुकलेल्या चेहऱ्यावर म्लान हसू घेऊन, एका मुलाला कडेवर घेऊन, एकाचा हात धरून ते आत गेले. तेव्हा घरात दिवे लागले होते, आणि अजून रात्र झाली नसली तरी हिवाळ्याची संध्याकाळ रात्रीसारखी सामसूम झाली होती.
सुवर्णमृग
वैद्यनाथ थोडा वेळ काहीच बोलले नाहीत; मग हळू आवाजात त्यांनी पत्नीला विचारलं, 'कशी आहेस?' पत्नीने त्याचं काहीच उत्तर न देता विचारलं, 'काय झालं?' वैद्यनाथांनी काही न बोलता कपाळावर हात मारला. मोक्षदांचा चेहरा फार कठोर झाला. मुलं कुठल्यातरी मोठ्या अमंगळाची सावली पाहून हळूच उठून गेली. मोलकरणीजवळ जाऊन म्हणाली, 'ती न्हाव्याची गोष्ट सांग ना.' आणि अंथरुणावर आडवी झाली. रात्र चढू लागली, पण दोघांच्या तोंडून एक शब्द नाही. घरभर कसलीतरी भयाण शांतता दाटू लागली आणि मोक्षदांचे ओठ हळूहळू वज्रासारखे घट्ट मिटत गेले. बऱ्याच वेळाने मोक्षदा काही न बोलता हळूहळू निजायच्या खोलीत गेल्या आणि आतून दार लावून घेतलं. वैद्यनाथ गप्प बाहेर उभे राहिले. चौकीदार प्रहराची हाळी देऊन गेला. थकलेलं जग निर्धास्त झोपेत बुडून गेलं. आपल्या आप्तांपासून ते अनंत आकाशातल्या नक्षत्रांपर्यंत कोणीही या अपमानित, झोप उडालेल्या वैद्यनाथाला एक शब्दही विचारला नाही. खूप रात्री, बहुधा कुठल्याशा स्वप्नातून जागा होऊन, वैद्यनाथांचा थोरला मुलगा अंथरूण सोडून हळूच व्हरांड्यात आला आणि त्याने हाक मारली, 'बाबा.' तेव्हा त्याचे बाबा तिथे नव्हते. जरा मोठ्या आवाजात बंद दाराबाहेरून त्याने हाक मारली, 'बाबा.' पण काहीच उत्तर मिळालं नाही. पुन्हा घाबरत घाबरत तो जाऊन अंथरुणावर झोपला. नेहमीच्या रिवाजाप्रमाणे सकाळी मोलकरणीने हुक्क्याची चिलीम भरून त्यांना शोधलं, पण ते कुठेच दिसले नाहीत. दिवस वर आल्यावर शेजारीपाजारी घरी परतलेल्या आपल्या स्नेह्याची खुशाली विचारायला आले, पण वैद्यनाथांची भेट झाली नाही.