रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
ठेव
१ वृंदावन कुंडू संतापाने लालबुंद होऊन आला आणि बापाला म्हणाला, 'मी आत्ताच चाललो.' बाप यज्ञनाथ कुंडू म्हणाले, 'कृतघ्न कारट्या! लहानपणापासून तुला खाऊ-ल्यायला घालण्यात जो खर्च झाला, तो फेडण्याचं नाव नाही, वर ही मिजास पाहा!' खरं म्हणजे यज्ञनाथांच्या घरी अन्नवस्त्राची जी रीत होती, ती पाहता फार काही खर्च झाला होता असं नाही. प्राचीन काळचे ऋषी आहार आणि वस्त्र यांच्या बाबतीत अशक्य वाटावं इतक्या अल्प खर्चात जीवन कंठत असत; यज्ञनाथांच्या वागण्यावरून दिसून येई की वेशभूषा, खाणंपिणं आणि मौजमजा याबाबतीत त्यांचाही तसाच अत्युच्च आदर्श होता. तो पुरा सिद्धीला गेला नाही, याचं कारण थोडं आधुनिक समाजाचा दोष आणि थोडं शरीररक्षणाबाबत निसर्गाने लादलेले काही अन्याय्य नियम. मुलगा अविवाहित होता तोवर त्याने सोसलं; पण लग्न झाल्यापासून खाण्यापिण्याच्या, नेसण्याच्या बाबतीत बापाच्या अत्यंत शुद्ध आदर्शाशी मुलाच्या आदर्शाचा मेळ बसेनासा झाला. दिसू लागलं की मुलाचा आदर्श आध्यात्मिकाकडून दिवसेंदिवस आधिभौतिकाकडेच अधिक झुकतो आहे. थंडी-उन्हाळा, भूक-तहान यांनी बेजार झालेल्या ऐहिक जगाचं अनुकरण करत करत धोतराचा पन्हा आणि ताटातल्या अन्नाचं प्रमाण उत्तरोत्तर वाढतच चाललं होतं. यावरून बापलेकांत वारंवार खडाजंगी होऊ लागली. अखेर वृंदावनाची बायको गंभीर आजारी असताना वैद्याने एक फार खर्चिक औषध सांगितलं, आणि त्यावरूनच वैद्याचं अज्ञान यज्ञनाथांच्या लक्षात आलं; त्यांनी त्याला तत्काळ रजा दिली. वृंदावनाने आधी पाय धरले, मग आदळआपट केली, पण काही उपयोग झाला नाही. बायको गेली तेव्हा त्याने बापाला 'बायकोचा खुनी' म्हणून शिव्या दिल्या.
ठेव
बाप म्हणाले, 'का रे, औषध घेऊन कोणी मरत नाही? महागडं औषध घेतल्यानेच जर माणूस जगला असता, तर राजे-बादशहा कशाला मेले असते! तुझी आई ज्या रीतीने मेली, तुझी आजी ज्या रीतीने मेली, त्यापेक्षा तुझी बायको काय मोठ्या थाटामाटात मरणार होती?' खरं पाहता, शोकाने आंधळा न होता वृंदावनाने शांत चित्ताने विचार केला असता तर या बोलण्यात त्याला बराच दिलासा मिळाला असता. त्याच्या आईने काय, आजीने काय, मरताना कोणीच औषध घेतलं नव्हतं. या घराचा हा सनातन रिवाजच होता. पण आजकालच्या लोकांना जुन्या रीतीने मरणंसुद्धा नको असतं. मी ज्या काळाची गोष्ट सांगतो आहे, तेव्हा या देशात इंग्रज नुकतेच आले होते; पण त्या काळीसुद्धा तेव्हाचे जुन्या वळणाचे लोक तेव्हाच्या नव्या वळणाच्या लोकांचं वागणं पाहून गोंधळून जात आणि जरा जास्तच हुक्का ओढू लागत. ते काहीही असो, तेव्हाचा नव्या वळणाचा वृंदावन जुन्या वळणाच्या यज्ञनाथांशी भांडून म्हणाला, 'मी चाललो.' बापाने त्याला तत्काळ जायला परवानगी दिली आणि चारचौघांसमोर जाहीर केलं की वृंदावनाला त्यांनी कधी एक पैसा जरी दिला, तरी ते गायीचं रक्त सांडण्यासारखं पातक मानलं जावं. वृंदावनानेही चारचौघांसमोर कबूल केलं की यज्ञनाथाचं धन घेणं म्हणजे आईचं रक्त सांडण्याइतकं पातक. यानंतर बापलेक कायमचे वेगळे झाले. बराच काळ शांततेत गेल्यावर अशी एखादी छोटीशी क्रांती घडली म्हणून गावचे लोक भलतेच खुशीत आले. विशेषतः यज्ञनाथांचा मुलगा वारसाहक्काला मुकल्यावर, यज्ञनाथांचं असह्य पुत्रवियोगाचं दुःख दूर करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे झटू लागला. सगळेच म्हणाले, एका क्षुल्लक बायकोपायी बापाशी भांडण करणं हे फक्त आजकालच घडू शकतं.
ठेव
विशेषतः त्यांनी एक जबरदस्त युक्तिवाद पुढे केला. ते म्हणाले, एक बायको गेली तर लगेच दुसरी आणता येते, पण बाप गेला तर डोकं आपटून मेलं तरी दुसरा बाप मिळत नाही. युक्तिवाद अगदी पक्का, यात शंका नाही; पण माझी खात्री आहे, वृंदावनासारख्या मुलाने हा युक्तिवाद ऐकला असता तर त्याला पश्चात्ताप होण्याऐवजी उलट थोडा धीरच आला असता. वृंदावन निघून गेला तेव्हा त्याच्या बापाला फार मनस्ताप झाला असेल असं वाटत नाही. वृंदावन गेल्यामुळे एक तर खर्चात काटकसर झाली, शिवाय यज्ञनाथांची एक मोठी भीती दूर झाली. वृंदावन आपल्याला कधी विष घालून मारेल याची धास्ती त्यांना सतत असे — जे काही अत्यल्प अन्न ते खात, त्याच्याशी विषाची कल्पना कायम चिकटलेली असे. सून गेल्यावर ही धास्ती जराशी कमी झाली होती, आणि मुलगा गेल्यावर तर ते बरेचसे निर्धास्त झाले. फक्त एक वेदना मनात सलत होती. यज्ञनाथांचा चार वर्षांचा नातू गोकुलचंद्र याला वृंदावन आपल्यासोबत घेऊन गेला होता. गोकुलच्या खाण्यापिण्याचा खर्च त्या मानाने कमी होता, त्यामुळे त्याच्यावरचं यज्ञनाथांचं प्रेम बऱ्याच अंशी निष्कंटक होतं. तरीही वृंदावन त्याला अगदी घेऊनच गेला, तेव्हा अगदी खऱ्याखुऱ्या शोकातसुद्धा क्षणभर यज्ञनाथांच्या मनात एक जमाखर्चाचा हिशेब उभा राहिला — दोघे गेल्यामुळे महिन्याला किती खर्च कमी होतो, वर्षाला तो किती भरतो, आणि जी रक्कम वाचते ती किती रुपयांच्या व्याजाइतकी होते. तरीही, रिकाम्या घरात गोकुलचंद्राचा धुडगूस नसल्यामुळे घरात राहणं कठीण होऊन बसलं. आजकाल यज्ञनाथांची मोठी पंचाईत झाली होती: पूजा करताना कोणी व्यत्यय आणत नाही, जेवताना कोणी ताटातलं हिसकावून खात नाही, हिशेब लिहिताना दौत घेऊन पळून जाईल असा लायक माणूसच कोणी उरला नाही. कसलाही उपद्रव न होता स्नान-भोजन आटोपलं की त्यांचं मन बेचैन होऊ लागे.
ठेव
वाटे की, मेल्यानंतरच माणसाला अशी उपद्रवरहित पोकळी लाभत असावी. त्यात अंथरुणावरच्या गोधडीला नातवाने पाडलेली भोकं आणि बसायच्या चटईवर त्या कलावंताने रेखलेले शाईचे डाग पाहून त्यांचं हृदय आणखीच अस्वस्थ होई. त्या उधळ्या पोराने दोन वर्षांच्या आतच नेसायचं धोतर पार निकामी करून टाकलं होतं, म्हणून त्याने आजोबांची बोलणी भरपूर खाल्ली होती; आता त्याच्या झोपायच्या खोलीत शंभर गाठी मारलेलं ते मळकं, टाकून दिलेलं फडकं पाहून त्यांचे डोळे डबडबून आले. त्याच्या वाती वळायच्या किंवा घरातल्या दुसऱ्या कुठल्या कामाला ते न लावता त्यांनी ते जपून पेटीत ठेवून दिलं, आणि मनोमन प्रतिज्ञा केली की गोकुल परत आला, आणि अगदी वर्षाला एक धोतर जरी त्याने फाडलं, तरी त्याला रागावणार नाही. पण गोकुल परत आला नाही. यज्ञनाथांचं वय पूर्वीपेक्षा कितीतरी झपाट्याने वाढू लागलं, आणि रिकामं घर दिवसेंदिवस अधिकच रिकामं होत गेलं. यज्ञनाथांना आता घरात स्वस्थ बसवेना. इतकंच नाही, तर दुपारी जेव्हा सगळी प्रतिष्ठित माणसं जेवणानंतर वामकुक्षीचं सुख घेत असतात, तेव्हा यज्ञनाथ हातात हुक्का घेऊन आळीआळीतून भटकत फिरत. त्यांच्या या मूक दुपारफेरीच्या वेळी रस्त्यातली पोरं खेळ टाकून सुरक्षित जागी पळून जात आणि त्यांच्या काटकसरीवर स्थानिक कवींनी रचलेली नाना छंदोबद्ध काव्यं त्यांना ऐकू जातील इतक्या मोठ्याने म्हणत. जेवणात विघ्न येईल या भीतीने त्यांचं जन्मनाव तोंडात घ्यायचं धाडस कोणी करीत नसे, म्हणून प्रत्येकजण आपापल्या मर्जीने त्यांचं नवं बारसं करी. म्हातारी मंडळी त्यांना 'यज्ञनाश' म्हणत; पण पोरं त्यांना 'वटवाघूळ' का म्हणत, याचं स्पष्ट कारण सापडत नाही. बहुधा त्यांच्या रक्तहीन, सुरकुतलेल्या कातडीचं त्या आकाशगामी प्राण्याशी काही शारीरिक साम्य असावं.
ठेव
२ एके दिवशी यज्ञनाथ अशाच रीतीने दुपारच्या वेळी आंब्याच्या झाडांच्या सावलीने गार झालेल्या गावच्या वाटेने फिरत होते. त्यांना दिसलं की एक अनोळखी पोरगा गावच्या पोरांचा म्होरक्या होऊन बसला आहे आणि उपद्रवाचा एक संपूर्ण नवा मार्ग त्यांना दाखवतो आहे. बाकीची पोरं त्याच्या स्वभावातल्या जोराने आणि त्याच्या कल्पनांच्या नावीन्याने भारावून जाऊन तनमनाने त्याच्या आधीन झाली होती. बाकीची पोरं म्हाताऱ्याला पाहताच खेळ मोडून पळत, तसं न करता हा चटकन पुढे आला आणि यज्ञनाथांच्या अंगाजवळ आपलं उपरणं झटकलं; त्यातून सुटलेला एक सरडा उडी मारून त्यांच्या अंगावरून सरसरत रानाच्या दिशेने पळून गेला — अचानक बसलेल्या दचक्याने म्हाताऱ्याच्या सर्वांगावर काटा उभा राहिला. पोरांमध्ये आनंदाचा एकच कल्लोळ उसळला. आणखी थोडं अंतर जातात न जातात तोच यज्ञनाथांच्या खांद्यावरचा पंचा एकाएकी गायब झाला आणि त्या अनोळखी पोराच्या डोक्यावर पगडीचा आकार घेऊन बसला. या अज्ञात बालकाकडून अशा नव्या पद्धतीचा शिष्टाचार मिळाल्याने यज्ञनाथ भलतेच खूश झाले. कोणत्याही पोराकडून इतकी मोकळी, बिनधास्त सलगी त्यांना कितीतरी दिवसांत मिळाली नव्हती. पुष्कळ हाका मारून आणि नाना प्रकारे भरवसा देऊन यज्ञनाथांनी त्याला बऱ्याच अंशी आपलंसं केलं. त्यांनी विचारलं, 'तुमचं नाव काय?' तो म्हणाला, 'निताई पाल.' 'घर कुठे?' 'सांगणार नाही.' 'बापाचं नाव काय?' 'सांगणार नाही.' 'का बरं सांगणार नाही?' 'मी घर सोडून पळून आलोय.' 'का?' 'माझ्या बापाला मला शाळेत घालायचंय.' अशा मुलाला शाळेत घालणं हा एक निष्फळ अपव्यय आणि बापाच्या व्यवहारशून्यतेचा पुरावा आहे, हे यज्ञनाथांच्या मनात तत्काळ आलं. यज्ञनाथ म्हणाले, 'माझ्या घरी येऊन राहाल?'
ठेव
पोराने कसलीही खळखळ न करता, जणू ते वाटेकडचं एखादं झाड असावं इतक्या सहजपणे तिथे आसरा घेतला. एवढंच नाही, तर खाण्यापिण्या-नेसण्याच्या बाबतीत तो इतक्या बेधडकपणे आपल्या मर्जीप्रमाणे हुकूम सोडू लागला, जणू त्याची पुरी किंमत त्याने आगाऊच चुकती केली होती. आणि त्यावरून अधूनमधून घरधन्याशी रीतसर भांडणही करू लागला. स्वतःच्या मुलाला नमवणं सोपं; पण परक्याच्या मुलापुढे मात्र यज्ञनाथांना हार मानावी लागली. ३ यज्ञनाथांच्या घरी निताई पालचे हे कल्पनातीत लाड पाहून गावचे लोक थक्क झाले. त्यांनी ताडलं की म्हातारा आता फार दिवस जगणार नाही, आणि कुठून आलेल्या या परक्या पोरालाच सगळी इस्टेट देऊन जाणार. पोराविषयी सगळ्यांच्याच मनात भयंकर मत्सर जागा झाला आणि प्रत्येकाने त्याचं वाटोळं करायचा चंग बांधला. पण बरगड्या काळजाला झाकतात तसा म्हातारा त्याला झाकून जपत असे. पोरगा अधूनमधून निघून जाण्याची धमकी देई. यज्ञनाथ त्याला लालूच दाखवत, 'बाळा, माझी सगळी इस्टेट, सगळा जमीनजुमला मी तुलाच देऊन जाईन.' पोराचं वय लहान होतं, पण या आश्वासनाचं मोल त्याला पुरतं कळत होतं. तेव्हा गावचे लोक पोराच्या बापाचा शोध घ्यायच्या मागे लागले. सगळे म्हणत, 'अरेरे, आईबापांच्या जिवाला काय यातना होत असतील कोण जाणे! पोरगाही काही कमी पापी नाही!' असं म्हणून ते पोराच्या नावाने तोंडात न घेण्याजोग्या शिव्या हासडत. त्यात इतका तिखटपणा असे की न्यायबुद्धीच्या चिडीपेक्षा स्वार्थाची आगपाखडच त्यात अधिक जाणवे. एके दिवशी म्हाताऱ्याने एका वाटसरूकडून ऐकलं की दामोदर पाल नावाचा कोणी माणूस आपल्या परागंदा झालेल्या मुलाचा शोध घेत फिरतो आहे, आणि शेवटी याच गावाकडे यायला निघाला आहे. ही बातमी ऐकून निताई बेचैन झाला; होणारी सगळी इस्टेट, जमीनजुमला सोडून तो पळून जायच्या तयारीला लागला.
ठेव
यज्ञनाथांनी निताईला पुन्हा पुन्हा धीर देत सांगितलं, 'तुम्हाला मी अशा ठिकाणी लपवून ठेवीन की तुम्ही कोणालाही सापडणार नाही. गावातल्या लोकांनासुद्धा नाही.' पोराला भारी कुतूहल वाटलं; तो म्हणाला, 'कुठे? दाखव ना!' यज्ञनाथ म्हणाले, 'आत्ता दाखवायला गेलो तर बिंग फुटेल. रात्री दाखवीन.' एक नवं रहस्य उलगडणार या आशेने निताई हरखून गेला. बाप हात हलवत परत गेला की लगेच पोरांबरोबर पैज लावून एक लपंडाव खेळायचा, असा त्याने मनाशी बेत केला. कोणालाही सापडायचा नाही. काय मजा! बाप येऊन सगळा मुलूख पालथा घालील, पण त्याचा कुठेच पत्ता लागणार नाही — तीही मोठी गंमत. दुपारी यज्ञनाथ पोराला घरात कोंडून कुठेतरी बाहेर गेले. ते परत आल्यावर निताईने प्रश्न विचारून विचारून त्यांना भंडावून सोडलं. संध्याकाळ होते न होते तोच तो म्हणाला, 'चल.' यज्ञनाथ म्हणाले, 'अजून रात्र झाली नाही.' निताई पुन्हा म्हणाला, 'रात्र झाली आजोबा, चल.' यज्ञनाथ म्हणाले, 'अजून आळीतले लोक झोपले नाहीत.' निताईने क्षणभरच थांबून म्हटलं, 'आता झोपले, चल.' रात्र वाढू लागली. झोपाळलेला निताई झोप आवरण्याचा जिवापाड प्रयत्न करूनही बसल्या बसल्या पेंगू लागला. मध्यरात्र झाली तेव्हा यज्ञनाथ निताईचा हात धरून झोपलेल्या गावाच्या अंधाऱ्या वाटेवरून निघाले. दुसरा कसलाच आवाज नव्हता; फक्त मधूनमधून एखादं कुत्रं भुंकू लागे, आणि त्या आवाजासरशी जवळची-दूरची जितकी कुत्री होती ती सगळी टिपेच्या सुरात त्याला साथ देत. अधूनमधून पावलांच्या चाहुलीने दचकलेला एखादा निशाचर पक्षी पंख फडफडवत रानातून उडून जाई. निताईने भीतीने यज्ञनाथांचा हात घट्ट धरून ठेवला.
ठेव
कितीतरी शेतं तुडवत अखेर दोघे एका जंगलातल्या, देव नसलेल्या एका पडक्या देवळापाशी येऊन पोहोचले. निताई जरा हिरमुसल्या स्वरात म्हणाला, 'इथे?' त्याने जसं मनात कल्पिलं होतं, तसलं काहीच नव्हतं. यात काही खास रहस्य नव्हतं. बापाचं घर सोडल्यापासून अशा ओसाड देवळांत त्याला कितीदा रात्र काढावी लागली होती. ही जागा लपंडावासाठी तशी वाईट नव्हती, तरीपण इथून कोणी शोधून बाहेर काढणं अगदीच अशक्य नव्हतं. यज्ञनाथांनी देवळाच्या आतली एक फरशी उचलून बाजूला केली. पोराने पाहिलं, खाली एखाद्या खोलीसारखं काहीतरी आहे आणि तिथे दिवा जळतो आहे. ते पाहून त्याला अतिशय आश्चर्य वाटलं, कुतूहल वाटलं, आणि त्याचबरोबर भीतीही वाटू लागली. एका शिडीवरून यज्ञनाथ खाली उतरले; त्यांच्या मागोमाग निताईही भीत भीत उतरला. खाली जाऊन त्याने पाहिलं, चहूबाजूंना पितळेचे हंडे. मधोमध एक आसन, आणि त्याच्यासमोर शेंदूर, चंदन, फुलांचे हार, पूजेचं साहित्य. पोराने कुतूहल शमवायला डोकावून पाहिलं, तर हंड्यांमध्ये नुसते रुपये आणि मोहरा. यज्ञनाथ म्हणाले, 'निताई, मी म्हणालो होतो की माझे सगळे पैसे मी तुम्हाला देईन. माझ्यापाशी जास्त काही नाही; हे एवढेच थोडेसे हंडे माझी सारी पुंजी. आज यातलं सगळंच्या सगळं मी तुमच्या हाती देणार आहे.' पोराने टुणकन उडी मारून म्हटलं, 'सगळंच! यातला एक रुपयासुद्धा तू घेणार नाहीस?' 'घेतला तर माझ्या हाताला महारोग होवो. पण एक गोष्ट आहे. माझा परागंदा झालेला नातू गोकुलचंद्र, किंवा त्याचा मुलगा, किंवा त्याचा नातू, किंवा त्याचा पणतू, किंवा त्याच्या वंशातलं कोणीही जर कधी आलं, तर त्याच्या किंवा त्यांच्या हाती हे सगळे पैसे मोजून द्यावे लागतील.'
ठेव
पोराला वाटलं, यज्ञनाथाला वेड लागलं आहे. त्याने तत्काळ कबूल केलं, 'बरं.' यज्ञनाथ म्हणाले, 'मग या आसनावर बसा.' 'का?' 'तुमची पूजा होणार आहे.' 'का?' 'असा नियम आहे.' पोरगा आसनावर बसला. यज्ञनाथांनी त्याच्या कपाळाला चंदन लावलं, शेंदराचा टिळा लावला, गळ्यात हार घातला; आणि समोर बसून पुटपुटत मंत्र म्हणू लागले. देव होऊन बसून मंत्र ऐकताना निताईला भीती वाटू लागली; त्याने हाक मारली, 'आजोबा!' यज्ञनाथ काहीही उत्तर न देता मंत्र म्हणत राहिले. अखेर एकेक हंडा मोठ्या कष्टाने ओढत आणून त्यांनी पोरासमोर ठेवला, त्याला अर्पण केला, आणि प्रत्येक वेळी त्याच्याकडून वदवून घेतलं: 'युधिष्ठिर कुंडूचा पुत्र गदाधर कुंडू, तस्य पुत्र प्राणकृष्ण कुंडू, तस्य पुत्र परमानंद कुंडू, तस्य पुत्र यज्ञनाथ कुंडू, तस्य पुत्र वृंदावन कुंडू, तस्य पुत्र गोकुलचंद्र कुंडू याला, किंवा त्याच्या पुत्राला अथवा पौत्राला अथवा प्रपौत्राला, किंवा त्याच्या वंशातल्या न्याय्य वारसाला हे सगळे पैसे मोजून देईन.' हे पुन्हा पुन्हा म्हणता म्हणता पोरगा भांबावल्यासारखा झाला. त्याची जीभ हळूहळू जड होऊ लागली. विधी संपला तेव्हा दिव्याच्या धुराने आणि दोघांच्या श्वासाने ती चिमुकली गुहा कोंदटून गेली होती. पोराच्या घशाला कोरड पडली, हातापायांची आग होऊ लागली, श्वास कोंडायची वेळ आली. दिवा मंदावला आणि एकाएकी विझला. अंधारात पोराला जाणवलं, यज्ञनाथ शिडीवरून वर चढतो आहे. तो कासावीस होऊन म्हणाला, 'आजोबा, कुठे चाललास?'
ठेव
यज्ञनाथ म्हणाले, 'मी चाललो. तू इथेच राहा — तू आता कोणालाही सापडणार नाहीस. पण लक्षात ठेव: यज्ञनाथाचा नातू, वृंदावनाचा मुलगा गोकुलचंद्र.' असं म्हणून वर पोहोचताच त्यांनी शिडी उचलून घेतली. कोंडलेल्या गळ्यातून मोठ्या कष्टाने पोरगा म्हणाला, 'आजोबा, मला बाबांकडे जायचंय.' यज्ञनाथांनी भोकाच्या तोंडावर फरशी दाबून बसवली, आणि कान लावून ऐकलं — निताईने कोंडलेल्या गळ्याने आणखी एकदा हाक मारली, 'बाबा!' त्यानंतर काहीतरी पडल्याचा आवाज आला; आणि त्यानंतर कसलाच आवाज आला नाही. अशा रीतीने आपलं धन यक्षाच्या हाती सोपवून यज्ञनाथ त्या फरशीवर माती लोटू लागले. तिच्यावर पडक्या देवळाच्या विटांचा आणि वाळूचा ढिगारा रचला. त्यावर गवताची ढेकळं बसवली, रानातली झुडपं लावली. रात्र संपत आली, पण त्या जागेवरून त्यांना काही केल्या हलवेना. थांबून थांबून ते जमिनीला कान लावून ऐकत राहिले. त्यांना वाटू लागलं, जणू फार दुरून, पृथ्वीच्या अथांग तळातून, एक रडण्याचा आवाज वर येतो आहे. वाटलं, जणू रात्रीचं आकाश त्या एकाच आवाजाने भरून चाललं आहे; जगातली सगळी झोपलेली माणसं त्या आवाजाने अंथरुणात जागी होऊन कान टवकारून बसली आहेत. म्हातारा बेचैन होऊन मातीवर माती लोटतच राहतो. जणू असं करून कसंही करून पृथ्वीचं तोंड दाबून टाकायचं आहे. ते पाहा, कोण हाक मारतं आहे, 'बाबा!' म्हातारा जमिनीवर थापटी मारून म्हणतो, 'गप्प बस! सगळ्यांना ऐकू जाईल.' पुन्हा कोण हाक मारतं आहे, 'बाबा!' त्याने पाहिलं, ऊन वर आलं होतं. भीतीने तो देऊळ सोडून शेतात बाहेर पडला.
ठेव
तिथेही कोणीतरी हाक मारली, 'बाबा!' यज्ञनाथांनी दचकून मागे वळून पाहिलं, तर वृंदावन. वृंदावन म्हणाला, 'बाबा, माझा मुलगा तुमच्या घरी लपून राहिला आहे असा मला पत्ता लागला; त्याला माझ्या हवाली करा.' म्हाताऱ्याने डोळे-तोंड वेडेवाकडे करून वृंदावनावर झुकत विचारलं, 'तुझा मुलगा?' वृंदावन म्हणाला, 'होय, गोकुल — आता त्याचं नाव निताई पाल, आणि माझं नाव दामोदर. आसपास सगळीकडे तुमची ख्याती आहे, म्हणून लाजेखातर आम्ही नावं बदलली; नाहीतर आमचं नाव कोणी तोंडात घेतलं नसतं.' म्हातारा दहा बोटांनी आकाश चाचपडत, जणू वारा मुठीत पकडायचा प्रयत्न करत, जमिनीवर कोसळला. शुद्धीवर येताच यज्ञनाथ वृंदावनाला ओढत देवळात घेऊन गेला. म्हणाला, 'रडणं ऐकू येतंय तुला?' वृंदावन म्हणाला, 'नाही.' 'कान लावून ऐक बरं — कोणी "बाबा" म्हणून हाक मारतंय का?' वृंदावन म्हणाला, 'नाही.' तेव्हा म्हातारा जणू फार निश्चिंत झाला. तेव्हापासून म्हातारा सगळ्यांना विचारत फिरतो, 'रडणं ऐकू येतंय तुम्हाला?' हे वेडाचं बोलणं ऐकून सगळे हसतात. अखेर सुमारे चार वर्षांनी म्हाताऱ्याच्या मरणाचा दिवस उगवला. डोळ्यांवरचा जगाचा उजेड विझत आला आणि श्वास कोंडल्यासारखा झाला, तेव्हा सन्निपाताच्या भरात तो एकाएकी उठून बसला; दोन्ही हातांनी एकदा चहूबाजूंना चाचपडून तो मरणोन्मुख म्हातारा म्हणाला, 'निताई, माझी शिडी कोणी काढून घेतली रे?' त्या हवा नसलेल्या, उजेड नसलेल्या महागर्तेतून वर यायची शिडी न सापडल्यामुळे तो पुन्हा धपकन अंथरुणावर कोसळला. संसाराच्या लपंडावात जिथे कोणीच कोणाला सापडत नाही, तिथे तो अंतर्धान पावला.