रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
ती एक रात्र
सुरबालेबरोबर मी एकाच पाठशाळेत गेलो आहे, भातुकलीत तिच्याबरोबर नवरा-बायकोचा खेळ खेळलो आहे. त्यांच्या घरी गेलो की सुरबालेची आई माझं फार कौतुक करत, आणि आम्हा दोघांना जवळ उभं करून आपापसात म्हणत, 'अहा, दोघं किती छान शोभतात!' तेव्हा मी लहान होतो, पण त्या बोलण्याचा अर्थ मला एक प्रकारे कळत असे. इतर साऱ्यांपेक्षा सुरबालेवर माझा काहीतरी खास हक्क आहे, ही कल्पना माझ्या मनात पक्की रुजून बसली होती. त्या हक्काच्या मदानं धुंद होऊन मी तिच्यावर हुकमत गाजवत नसे, तिला छळत नसे, असं नाही. तीही मुकाट्यानं माझी सगळी फर्मानं पाळत असे आणि शिक्षा सोसत असे. आळीत तिच्या रूपाची वाखाणणी होत असे, पण त्या रानटी पोराच्या डोळ्यांत त्या सौंदर्याला काडीचीही किंमत नव्हती — मला फक्त एवढंच ठाऊक होतं की सुरबालेनं माझंच वर्चस्व मान्य करण्यासाठी वडिलांच्या घरी जन्म घेतला आहे, आणि म्हणूनच ती माझ्या खास उपेक्षेची धनीण आहे. माझे वडील चौधरी जमीनदारांचे नायब होते. माझा हात जरा तयार झाला की मला जमीनदारीच्या सरिश्त्याचं काम शिकवून कुठेतरी गुमास्तेगिरीला लावून द्यायचं, असा त्यांचा बेत होता. पण मनातून मला ते मुळीच मान्य नव्हतं. आमच्या आळीतला नीलरतन जसा कलकत्त्याला पळून जाऊन, शिकूनसवरून कलेक्टरसाहेबांचा नाझर झाला होता, तसंच माझंही आयुष्याचं ध्येय भलतंच उंच होतं — कलेक्टरचा नाझर नाही झालो तरी जज-कोर्टातला हेडक्लार्क तरी होईनच, असं मी मनाशी पक्कं ठरवून ठेवलं होतं.
ती एक रात्र
माझे वडील या कोर्टकचेरीत पोट भरणाऱ्या मंडळींना फार मान देत, हे मी नेहमी पाहत असे — निरनिराळ्या निमित्तांनी मासा-भाजी, रुपया-पावली घेऊन त्यांची पूजाअर्चा करावी लागते, हेही मला लहानपणापासून ठाऊक होतं; म्हणून कोर्टातल्या लहानसहान कारकुनांना, इतकंच काय शिपाई-प्याद्यांनासुद्धा, मी मनात मोठ्या आदराचं आसन दिलं होतं. हे आपल्या बंगालचे पूज्य देव; तेहतीस कोटींच्या छोट्या छोट्या नव्या आवृत्त्या. व्यवहारातल्या यशासाठी लोकांचा भरवसा प्रत्यक्ष सिद्धिदाता गणेशापेक्षा यांच्यावरच कितीतरी जास्त; त्यामुळे पूर्वी गणेशाच्या वाट्याला जे काही यायचं, ते सगळं हल्ली यांनाच मिळतं. नीलरतनाच्या उदाहरणानं चेतून मीही एकदा संधी साधून कलकत्त्याला पळून गेलो. आधी गावातल्या एका ओळखीच्या माणसाच्या बिऱ्हाडी राहिलो, मग वडिलांकडूनही शिक्षणासाठी थोडीथोडी मदत येऊ लागली. अभ्यास रीतसर चालू झाला. शिवाय मी सभा-समित्यांतही जाऊ लागलो. देशासाठी तडकाफडकी प्राण अर्पण करणं ही तातडीची गरज आहे, याबद्दल मला तिळमात्र शंका नव्हती. पण ते कठीण काम नेमकं कसं करायचं, हे मात्र मला ठाऊक नव्हतं. तरी त्यामुळे उत्साहात काही कमी पडली नाही. आम्ही खेड्यातली पोरं; कलकत्त्याच्या अकाली पोक्त झालेल्या पोरांसारखी प्रत्येक गोष्टीची थट्टा करायला शिकलो नव्हतो; त्यामुळे आमची निष्ठा अगदी भक्कम होती. आमच्या सभेचे कर्तेधर्ते भाषणं देत, आणि आम्ही वर्गणीच्या वह्या घेऊन, उपाशीपोटी, भर दुपारच्या उन्हात घरोघर वणवण फिरून भिक्षा मागत असू; रस्त्याच्या कडेला उभं राहून पत्रकं वाटत असू; सभेच्या जागी जाऊन बाकं-खुर्च्या मांडत असू; आणि आमच्या पुढाऱ्याविरुद्ध कुणी एक शब्द काढला तर कंबर कसून हाणामारीला तयार होत असू. ही सगळी लक्षणं पाहून शहरातली पोरं आम्हाला गावंढळ 'बांगाल' म्हणून हिणवत.
ती एक रात्र
आलो होतो नाझर-सरिश्तेदार व्हायला, पण तयारी करू लागलो मॅझिनी-गारिबाल्डी होण्याची. अशातच माझ्या वडिलांचं आणि सुरबालेच्या वडिलांचं एकमत झालं आणि त्यांनी सुरबालेशी माझं लग्न लावून देण्याची खटपट सुरू केली. मी पंधराव्या वर्षी कलकत्त्याला पळून आलो, तेव्हा सुरबाला आठ वर्षांची होती; आता मी अठरा वर्षांचा. वडिलांच्या मते माझं लग्नाचं वय हळूहळू उलटून चाललं होतं. पण इकडे मी मनाशी प्रतिज्ञा केली होती की आजन्म लग्न न करता स्वदेशासाठी मरायचं — वडिलांना सांगितलं, शिक्षण पुरं केल्याशिवाय मी लग्न करणार नाही. दोन-चार महिन्यांतच बातमी आली, वकील रामलोचनबाबूंशी सुरबालेचं लग्न झालं. मी तेव्हा पतित भारतासाठी वर्गणी गोळा करण्यात गर्क होतो; ही बातमी मला अगदीच क्षुल्लक वाटली. एन्ट्रन्स पास झालो होतो, फर्स्ट आर्ट्सची परीक्षा द्यायची होती, तेवढ्यात वडील वारले. संसारात मी एकटा नव्हतो; आई आणि दोन बहिणी होत्या. त्यामुळे कॉलेज सोडून नोकरीच्या शोधात फिरावं लागलं. खूप खटपट केल्यावर नोआखाली विभागातल्या एका छोट्या शहरात एन्ट्रन्स शाळेत सेकंड मास्तरची जागा मिळाली. मला वाटलं, मला शोभेलसं काम मिळालं. उपदेश आणि प्रोत्साहन देऊन एकेका विद्यार्थ्याला भावी भारताचा एकेक सेनापती बनवीन. काम सुरू केलं. पाहिलं तो भावी भारतापेक्षा तोंडावर आलेल्या परीक्षेची घाई कितीतरी जास्त. विद्यार्थ्यांना व्याकरण आणि बीजगणित सोडून दुसरं काही सांगितलं की हेडमास्तर रागावत. दोनेक महिन्यांतच माझाही उत्साह थंडावत आला.
ती एक रात्र
आमच्यासारखी प्रतिभा नसलेली माणसं घरी बसून नाना प्रकारची स्वप्नं रंगवतात; शेवटी प्रत्यक्ष कामाच्या रिंगणात उतरल्यावर खांद्यावर नांगर वाहत, मागून शेपटी पिरगाळून घेत, मान खाली घालून मुकाट्यानं रोजची ढेकळं फोडण्याचं काम करतात, आणि संध्याकाळी पोटभर आंबोण मिळाली की त्यातच समाधान मानतात; उड्या-बागडण्याचा उत्साह मग उरत नाही. आग लागण्याच्या भीतीनं एक मास्तर कायम शाळेच्या इमारतीतच राहत असे. मी एकटा जीव, म्हणून ती जबाबदारी माझ्यावरच पडली होती. शाळेच्या मोठ्या गवती छपराच्या इमारतीला लागून असलेल्या एका खोपटात मी राहत असे. शाळेची इमारत वस्तीपासून जरा दूर, एका मोठ्या तळ्याच्या काठी होती. भोवती सुपारी, नारळ आणि पांगाऱ्याची झाडं, आणि शाळेला जवळजवळ खेटूनच कडुलिंबाचे दोन प्रचंड जुने वृक्ष एकमेकांना बिलगून सावली धरून उभे होते. * * * एक गोष्ट मी आतापर्यंत सांगितली नाही, आणि आतापर्यंत ती सांगण्याजोगी आहे असंही मला वाटलं नव्हतं. इथले सरकारी वकील रामलोचन राय यांचं बिऱ्हाड आमच्या शाळेपासून फार दूर नव्हतं. आणि त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी, माझी बालमैत्रीण सुरबाला राहत होती, हे मला ठाऊक होतं. रामलोचनबाबूंशी माझी ओळख झाली. लहानपणी माझी सुरबालेशी ओळख होती, हे रामलोचनबाबूंना ठाऊक होतं की नाही, कुणास ठाऊक; मलाही नव्या ओळखीत त्याविषयी काही बोलणं योग्य वाटलं नाही. आणि सुरबाला कधीकाळी कोणत्याही प्रकारे माझ्या आयुष्याशी जोडलेली होती, ही गोष्ट माझ्या मनात नीटशी उमटलीही नाही. एकदा सुट्टीच्या दिवशी मी रामलोचनबाबूंना भेटायला त्यांच्या बिऱ्हाडी गेलो होतो. कशावर चर्चा चालली होती ते आठवत नाही; बहुधा सध्याच्या भारताच्या दुर्दशेवर. त्याबद्दल ते फार चिंतेत होते किंवा खचून गेले होते असं नाही; पण विषयच असा आहे की हुक्का ओढत ओढत तासभर-दीड तास त्यावर अखंड हौसेचं दुःख करता येतं.
ती एक रात्र
तेवढ्यात शेजारच्या खोलीत बांगड्यांची अगदी हलकीशी किणकिण, लुगड्याची किंचित सळसळ आणि पावलांचीही किंचित चाहूल माझ्या कानी आली. खिडकीच्या फटीतून कुणाचे तरी कुतूहलानं भरलेले डोळे माझ्याकडे न्याहाळत आहेत, हे मला स्पष्ट कळून चुकलं. त्या क्षणी मला दोन डोळे आठवले — विश्वास, निरागसपणा आणि बालपणीच्या प्रेमानं डबडबलेले दोन मोठे मोठे डोळे, काळ्याभोर बाहुल्या, दाट काळ्या पापण्या, स्थिर, स्निग्ध नजर. अचानक कुणीतरी माझं काळीज कठोर मुठीत आवळून धरावं, तसं झालं आणि वेदनेनं आतून ठणकू लागलं. घरी परत आलो, पण ती कळ तशीच राहिली. लिहिलं, वाचलं, काहीही केलं तरी मनावरचं ते मळभ हटेना; मन अचानक एखाद्या मोठ्या ओझ्यासारखं होऊन छातीच्या शिरांना धरून लोंबकळू लागलं. संध्याकाळी जरा शांतपणे विचार करू लागलो, असं का झालं? मनाच्या आतून उत्तर आलं, तुझी ती सुरबाला कुठे गेली? मी प्रत्युत्तर दिलं, मी तर तिला आपण होऊन सोडून दिलं. ती काय जन्मभर माझी वाट पाहत बसणार होती? मनाच्या आत कुणीतरी म्हणालं, तेव्हा जिला नुसती इच्छा केली असतीस तरी मिळवू शकला असतास, तिला आता डोकं आपटून मेलास तरी एकदा डोळाभर पाहण्याचासुद्धा हक्क मिळणार नाही. बालपणीची ती सुरबाला तुझ्या कितीही जवळ असू दे, तिच्या बांगड्यांची किणकिण ऐकू येऊ दे, तिच्या न्हालेल्या केसांचा सुगंध जाणवू दे, पण मधे कायम एक भिंत उभीच राहील. मी म्हणालो, असेना का, सुरबाला माझी कोण? उत्तर ऐकू आलं, सुरबाला आज तुझी कुणीच नाही, पण सुरबाला तुझी काय होऊ शकली नसती?
ती एक रात्र
ते खरंच होतं. सुरबाला माझी काय होऊ शकली नसती? माझी सर्वांत जिवाभावाची, माझ्या सर्वांत जवळची, माझ्या आयुष्यातल्या सगळ्या सुखदुःखांची वाटेकरीण होऊ शकली असती — ती आज इतकी दूर, इतकी परकी; आज तिला पाहणं निषिद्ध, तिच्याशी बोलणं दोष, तिचा विचार करणं पाप. आणि कुठला तरी एक रामलोचन, ना ध्यानी ना मनी, अचानक येऊन उभा राहिला आणि पाठ केलेले दोनेक मंत्र म्हणून, जगातल्या बाकी सगळ्यांपासून एका क्षणात घारीसारखी झडप घालून सुरबालेला घेऊन गेला! मी मानवसमाजाला नवी नीती शिकवायला बसलो नाही; समाज मोडायला आलो नाही; बंधनं तोडायची माझी इच्छा नाही. मी फक्त माझ्या मनातला खरा भाव उघड करतो आहे, एवढंच. आपल्या मनात जे जे विचार उमटतात, ते सगळेच का विवेकाला धरून असतात? रामलोचनाच्या घराच्या भिंतीआड जी सुरबाला वावरत होती, ती रामलोचनापेक्षाही अधिक माझी आहे, हा विचार मी काही केल्या मनातून घालवू शकत नव्हतो. असा विचार अगदीच असंगत आणि अन्याय्य आहे हे मी कबूल करतो; पण अस्वाभाविक नाही. तेव्हापासून माझं कुठल्याच कामात मन लागेना. दुपारी वर्गात मुलं गुणगुणत असत, बाहेर सगळं रणरणत असे, किंचित तापलेल्या वाऱ्याबरोबर कडुलिंबाच्या मोहोराचा सुगंध दरवळत येई; तेव्हा वाटायचं — काय वाटायचं ते ठाऊक नाही — एवढंच सांगू शकतो की भारतवर्षाच्या या सगळ्या भावी आशास्थानांच्या व्याकरणातल्या चुका दुरुस्त करत आयुष्य घालवावं, असं मात्र वाटत नसे. शाळा सुटली की माझ्या त्या मोठ्या खोलीत एकट्यानं राहायला जीव रमत नसे; आणि तरीही कुणी सभ्य गृहस्थ भेटायला आला तरी ते असह्य वाटे. संध्याकाळी तळ्याच्या काठी सुपारी-नारळाच्या झाडांची अर्थहीन सळसळ ऐकत ऐकत मी विचार करत असे, माणसांचा समाज म्हणजे चुकांचं एक गुंतागुंतीचं जाळं आहे. योग्य वेळी योग्य काम करायचं कुणालाच सुचत नाही; मग भलत्या वेळी भलत्याच वासना घेऊन माणूस तळमळत मरतो.
ती एक रात्र
तुझ्यासारखा माणूस सुरबालेचा नवरा होऊन म्हातारपणापर्यंत छान सुखात राहू शकला असता; पण तू निघालास गारिबाल्डी व्हायला, आणि झालास शेवटी एका खेडवळ शाळेचा सेकंड मास्तर! आणि तो रामलोचन राय वकील — त्याला खास सुरबालेचाच नवरा व्हायची काहीच निकड नव्हती; लग्नाच्या आदल्या क्षणापर्यंत त्याच्या लेखी सुरबाला काय नि भवशंकरी काय, सारख्याच; तोच आता काहीही विचार न करता लग्न करून, सरकारी वकील होऊन मस्त चार पैसे कमावतो आहे — ज्या दिवशी दुधाला धुराचा वास येतो त्या दिवशी सुरबालेला रागावतो, ज्या दिवशी मन प्रसन्न असतं त्या दिवशी तिच्यासाठी दागिना घडवायला टाकतो. चांगला गुटगुटीत, चपकन घातलेला, कसलीही तक्रार नाही; तळ्याच्या काठी बसून आकाशातल्या ताऱ्यांकडे पाहत उसासे टाकत कधी संध्याकाळ घालवत नाही. रामलोचन एका मोठ्या खटल्यासाठी काही दिवस बाहेरगावी गेला होता. माझ्या शाळेत जसा मी एकटा होतो, तशीच त्या दिवशी सुरबालाही आपल्या घरी बहुधा एकटीच होती. आठवतं, तो सोमवार होता. सकाळपासूनच आभाळ ढगांनी भरून आलं होतं. दहा वाजल्यापासून रिमझिम पाऊस सुरू झाला. आभाळाचा रागरंग पाहून हेडमास्तरांनी लवकरच शाळा सोडून दिली. काळ्या ढगांचे पुंजके जणू कुठल्यातरी मोठ्या तयारीत असल्यासारखे दिवसभर आभाळभर ये-जा करत राहिले. त्याच्या दुसऱ्या दिवशी दुपार कलताना मुसळधार पाऊस आणि त्याबरोबर वादळ सुरू झालं. जसजशी रात्र चढत गेली तसतसा पावसाचा आणि वादळाचा जोर वाढत गेला. आधी पूर्वेकडून वारा वाहत होता, मग हळूहळू तो उत्तरेकडून आणि ईशान्येकडून वाहू लागला.
ती एक रात्र
अशा रात्री झोपायचा प्रयत्न करणं व्यर्थ होतं. मनात आलं, या वादळवाऱ्यात सुरबाला घरी एकटी आहे. आमची शाळा त्यांच्या घरापेक्षा कितीतरी मजबूत. कितीदा तरी वाटलं, तिला शाळेत बोलावून आणावं आणि मी तळ्याच्या बांधावर रात्र काढावी. पण कसाही केल्या मनाचा निर्धार होईना. रात्रीचा एक-दीड वाजला असेल, तेवढ्यात अचानक पुराची गर्जना ऐकू आली — समुद्र धावत येत होता. मी खोली सोडून बाहेर पडलो. सुरबालेच्या घराच्या दिशेनं निघालो. वाटेत आमच्या तळ्याचा बांध होता — तिथवर पोचतो न पोचतो तोच गुडघाभर पाणी झालं. बांधावर चढून उभा राहिलो, तेवढ्यात दुसरी आणखी एक लाट येऊन ठेपली. आमच्या तळ्याच्या बांधाचा एक भाग जवळजवळ दहा-अकरा हात उंच असेल. मी बांधावर चढलो त्याच वेळी उलट्या बाजूनं आणखी एक व्यक्तीही वर चढली. ती व्यक्ती कोण, हे माझ्या साऱ्या अंतरात्म्यानं, माझ्या डोक्यापासून पायांपर्यंत, ओळखलं. आणि तिनंही मला ओळखलं, याबद्दल मला शंका नाही. बाकी सगळं पाण्याखाली गेलं होतं; फक्त पाच-सहा हातांच्या त्या बेटावर आम्ही दोन जीव येऊन उभे राहिलो. तो प्रलयाचा काळ होता; आकाशात ताऱ्यांचा प्रकाश नव्हता, पृथ्वीवरचे सगळे दिवे विझून गेले होते; तेव्हा एखादा शब्द बोललो असतो तरी काही बिघडलं नसतं, पण एकही शब्द बोलवला नाही. कुणी कुणाला साधं 'बरं आहे ना?' असंसुद्धा विचारलं नाही. आम्ही दोघं फक्त अंधाराकडे पाहत राहिलो. पायांखालून गडद काळाकुट्ट, उन्मत्त मृत्यूचा प्रवाह गर्जत धावत होता.
ती एक रात्र
आज सारं विश्व सोडून सुरबाला माझ्याजवळ येऊन उभी आहे. आज माझ्याशिवाय सुरबालेला दुसरं कुणी नाही. कधीच्या त्या बालपणी सुरबाला, कुठल्यातरी पूर्वजन्मातून, कुठल्यातरी प्राचीन रहस्यमय अंधारातून तरंगत येऊन, सूर्यचंद्रांच्या प्रकाशानं उजळलेल्या, माणसांनी गजबजलेल्या या पृथ्वीवर माझ्याच शेजारी येऊन जडली होती; आणि आज, कितीतरी दिवसांनी, ती प्रकाशमय, माणसांनी भरलेली पृथ्वी सोडून या भयंकर निर्मनुष्य प्रलयांधकारात सुरबाला एकाकी माझ्याच शेजारी येऊन ठेपली आहे. जन्माच्या प्रवाहानं ती नवी कळी माझ्याजवळ आणून सोडली होती; मृत्यूच्या प्रवाहानं ते उमललेलं फूल माझ्याच जवळ आणून सोडलं आहे — आता फक्त आणखी एक लाट आली की पृथ्वीच्या या चिमुकल्या टोकावरून, विरहाच्या या इवल्याशा देठावरून गळून, आम्ही दोघं एक होऊन जाऊ. ती लाट न येवो. पती-मुलं, घरदार, धनसंपदा, आप्तजन यांच्यासह सुरबाला सदैव सुखात राहो. मी या एका रात्री महाप्रलयाच्या काठावर उभा राहून अनंत आनंदाची चव चाखली आहे. * * * रात्र संपत आली — वादळ थांबलं, पाणी ओसरलं — सुरबाला एक शब्दही न बोलता घरी निघून गेली; मीही एक शब्दही न बोलता माझ्या खोलीत गेलो. मनात आलं, मी नाझरही झालो नाही, सरिश्तेदारही झालो नाही, गारिबाल्डीही झालो नाही; मी एका मोडक्या शाळेचा सेकंड मास्तर. माझ्या साऱ्या आयुष्यात फक्त क्षणभरासाठी एक अनंत रात्र उगवली होती — माझ्या उभ्या आयुष्यातल्या सगळ्या दिवसांरात्रींमध्ये ती एकच रात्र माझ्या क्षुल्लक जीवनाची एकमेव परम सार्थकता.