रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
त्याग
१ फाल्गुनातल्या पहिल्या पौर्णिमेला आंब्याच्या मोहोराचा सुगंध घेऊन नव्या वसंताचा वारा वाहतो आहे. तळ्याकाठच्या एका जुन्या लिचीच्या झाडाच्या दाट पालवीतून एका निद्राहीन, अथक पपीह्याचं गाणं मुखुज्ज्यांच्या घरातल्या एका निद्राहीन शयनगृहात शिरतं आहे. हेमंत काहीशा चंचलपणे कधी बायकोच्या अंबाड्यातून केसांची एक बट सोडवून घेऊन बोटाभोवती गुंडाळतो आहे, कधी तिच्या कड्यांवर बांगड्या आपटून किणकिण आवाज करतो आहे, कधी तिच्या केसांतला फुलांचा गजरा ओढून, जागचा हलवून तिच्या तोंडावर आणून टाकतो आहे. संध्याकाळच्या निश्चल फुलझाडाला जागं करण्यासाठी वारा जसा एकदा या बाजूने, एकदा त्या बाजूने त्याला हलकेच हलवत राहतो, तसाच काहीसा हेमंतचा आविर्भाव आहे. पण कुसुम समोरच्या चांदण्यात न्हाऊन निघालेल्या अपार शून्यात दोन्ही डोळे बुडवून स्तब्ध बसून आहे. नवऱ्याची चंचलता तिला स्पर्श करून, आपटून परत फिरते आहे. शेवटी हेमंतने काहीशा अधीरपणे कुसुमचे दोन्ही हात हलवून म्हटलं, 'कुसुम, आहेस कुठे तू? एखादी मोठी दुर्बीण लावून पुष्कळ निरखून पाहिलं तर कुठे तू ठिपक्याएवढी दिसशील, इतकी लांब जाऊन पडली आहेस. आज तू जरा जवळ यावंस, अशी माझी इच्छा आहे. बघ तरी, किती सुंदर रात्र आहे!' कुसुमने शून्यातून तोंड फिरवून नवऱ्याच्या चेहऱ्याकडे वळवलं आणि म्हटलं, 'ही चांदणी रात्र, हा वसंत, सगळं या क्षणी खोटं ठरून भंगून जाईल, असा एक मंत्र मला ठाऊक आहे.'
त्याग
हेमंत म्हणाला, 'ठाऊक असला तर तो उच्चारायचं काही काम नाही. उलट आठवड्यात तीन-चार रविवार येतील, किंवा रात्र संध्याकाळी पाच-साडेपाचपर्यंत टिकून राहील, असा एखादा मंत्र ठाऊक असला तर तो ऐकायला मी तयार आहे.' असं म्हणून त्याने कुसुमला आणखी थोडं जवळ ओढायचा प्रयत्न केला. त्या मिठीच्या पाशात न सापडता कुसुम म्हणाली, 'जी गोष्ट मी मरताना तुम्हाला सांगायची असं मनाशी ठरवलं होतं, ती आज सांगावीशी वाटते आहे. आज वाटतंय, तुम्ही मला कितीही शिक्षा केलीत तरी मी ती सोसू शकेन.' शिक्षेवरून जयदेवाचा एखादा श्लोक म्हणून हेमंत काहीतरी थट्टा करण्याच्या बेतात होता. इतक्यात रागावलेल्या चपलांचा फटाफट आवाज जवळ येताना ऐकू आला. हेमंतचे वडील हरिहर मुखुज्जे यांच्या पावलांचा तो ओळखीचा आवाज. हेमंत गडबडीने उठून उभा राहिला. हरिहर दाराजवळ येऊन संतापाने गर्जला, 'हेमंत, सुनेला आत्ताच्या आत्ता घरातून घालवून दे.' हेमंतने बायकोच्या चेहऱ्याकडे पाहिलं; तिने जराही आश्चर्य दाखवलं नाही, फक्त दोन्ही हातांत व्याकुळपणे तोंड लपवून, आपलं सारं बळ आणि सारी इच्छा एकवटून जणू स्वतःला नाहीसं करून टाकायचा प्रयत्न केला. दक्षिणेच्या वाऱ्याबरोबर पपीह्याचा स्वर खोलीत येत राहिला; तो कुणाच्याच कानी पडला नाही. पृथ्वी इतकी अपार सुंदर, आणि तरीही इतक्या सहज सारं मोडून पडतं! २ हेमंतने बाहेरून परत येऊन बायकोला विचारलं, 'खरं का?' बायको म्हणाली, 'खरं.' 'इतके दिवस का सांगितलं नाहीस?' 'कितीदा सांगायचा प्रयत्न केला, पण सांगू शकले नाही. मी महापापिणी आहे.' 'मग आज सगळं उघड करून सांग.' कुसुमने गंभीर, ठाम स्वरात सगळं सांगून टाकलं — जणू न डगमगणाऱ्या पावलांनी, संथपणे ती आगीतून चालत गेली; ती किती होरपळत होती ते कुणालाच कळलं नाही. सगळं ऐकून हेमंत उठून निघून गेला.
त्याग
कुसुमला कळून चुकलं, जो नवरा निघून गेला तो नवरा तिला पुन्हा मिळणार नाही. तिला त्यात काही आश्चर्य वाटलं नाही; रोजच्या इतर घटनांसारखीच हीही घटना अगदी सहजपणे समोर येऊन उभी राहिली — मनात अशी एक कोरडी बधिरता पसरली होती. फक्त, जग आणि प्रेम आदीपासून अंतापर्यंत खोटं आणि पोकळ वाटू लागलं. इतकंच काय, हेमंतच्या पूर्वीच्या सगळ्या प्रेमाच्या गोष्टी आठवून एक अगदी रुक्ष, कठोर, आनंदहीन हसू एखाद्या धारदार, निर्दय सुरीसारखं तिच्या मनाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एक चरा ओढून गेलं. बहुधा तिला वाटलं असावं, जे प्रेम इतकं मोठं वाटतं, ज्यात इतकी माया, इतकी गाढता — ज्याचा तिळमात्र विरह इतका जिव्हारी लागतो, ज्याचं क्षणमात्र मीलन इतकं आनंदाने भरून टाकतं, जे अपार, अनंत वाटतं, जन्मजन्मांतरीही ज्याचा अंत कल्पवत नाही — ते प्रेम हे! एवढ्याशावर त्याची भिस्त! समाजाने जरासा आघात केला मात्र, आणि ते अपार प्रेम चुरा होऊन मूठभर धूळ झालं. काही वेळापूर्वीच हेमंत कापऱ्या स्वरात कानाशी म्हणत होता, 'किती सुंदर रात्र!' ती रात्र तर अजून संपलेलीही नाही; अजूनही तो पपीहा गातो आहे, दक्षिणेचा वारा मच्छरदाणी थरथरवत जातो आहे, आणि सुखाने थकून झोपी गेलेल्या एखाद्या सुंदरीसारखं चांदणं खिडकीजवळच्या पलंगाच्या एका कडेला अंग चोरून पडून आहे. सगळंच खोटं. 'प्रेम माझ्याहूनही खोटारडं, माझ्याहूनही कपटी!' ३ दुसऱ्या दिवशी पहाटेच, रात्रभराच्या जागरणाने सुकलेला हेमंत वेड्यासारखा प्यारीशंकर घोषालच्या घरी जाऊन पोचला. प्यारीशंकरने विचारलं, 'काय रे बाबा, काय खबर?' हेमंत एखाद्या मोठ्या आगीसारखा जणू धडधडून जळत, थरथर कापत म्हणाला, 'तुम्ही आमची जात बुडवलीत, आमचा सर्वनाश केलात — याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल' — बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला.
त्याग
प्यारीशंकर किंचित हसून म्हणाला, 'आणि तुम्ही लोकांनी माझी जात राखलीत, माझा समाज राखलात, माझ्या पाठीवरून हात फिरवलात! माझ्यावर तुमची केवढी माया, केवढं प्रेम!' हेमंतला वाटलं, त्याच क्षणी आपल्या ब्रह्मतेजाने प्यारीशंकरला जाळून भस्म करावं; पण त्या तेजात तो स्वतःच जळू लागला, आणि प्यारीशंकर मजेत, सुखरूप, ठणठणीत बसून राहिला. हेमंत भंगलेल्या स्वरात म्हणाला, 'मी तुमचं काय वाकडं केलं होतं?' प्यारीशंकर म्हणाला, 'मी विचारतो, मला एका मुलीखेरीज दुसरं मूल नाही — माझ्या त्या मुलीने तुझ्या बापाचा काय अपराध केला होता? तू तेव्हा लहान होतास, तुला कदाचित ठाऊक नसेल — तर मग ती हकीकत नीट लक्ष देऊन ऐक. घाई करू नकोस बाबा, यात मोठी गंमत आहे. 'माझा जावई नवकांत माझ्या मुलीचे दागिने चोरून विलायतेला पळून गेला, तेव्हा तू तान्हा होतास. त्यानंतर पाच वर्षांनी तो बॅरिस्टर होऊन देशी परतला, तेव्हा आळीत जो गहजब उडाला तो तुला थोडाफार आठवत असेल. किंवा तुला ठाऊकही नसेल, तू तेव्हा कलकत्त्याच्या शाळेत शिकत होतास. तुझ्या बापाने गावाचा पुढारी म्हणून सांगितलं, "मुलीला नवऱ्याच्या घरी पाठवायचा विचार असेल, तर त्या मुलीला पुन्हा घरात घेता येणार नाही." मी त्यांचे हातपाय धरून म्हणालो, "दादा, या खेपेला मला क्षमा करा. मी त्या पोराला शेण खायला घालून त्याच्याकडून प्रायश्चित्त करवतो, तुम्ही त्याला जातीत परत घ्या." तुझ्या बापाने काही केल्या ऐकलं नाही, आणि मीही माझ्या एकुलत्या एका मुलीचा त्याग करू शकलो नाही. जात सोडली, गाव सोडला, कलकत्त्याला येऊन संसार मांडला. इथे आल्यावरही पीडा संपली नाही.
त्याग
माझ्या पुतण्याच्या लग्नाची सगळी तयारी केली होती, तेव्हा तुझ्या बापाने मुलीकडच्यांना चिथावून ते लग्न मोडलं. मी प्रतिज्ञा केली, याचा सूड घेतला नाही तर मी ब्राह्मणाचा पोर नव्हे — आता थोडंफार समजलं ना? — पण जरा आणखी दम धर — सगळी हकीकत ऐकलीस तर खूश होशील — यात थोडी खुमारी आहे. 'तू कॉलेजात शिकत होतास तेव्हा तुझ्या बिऱ्हाडाच्या शेजारीच विप्रदास चाटुज्ज्यांचं घर होतं. बिचारा आता गेला. चाटुज्जे महाशयांच्या घरी कुसुम नावाची एक बालविधवा, अनाथ कायस्थाची मुलगी आश्रित म्हणून राहत असे. पोरगी फार सुंदर — कॉलेजच्या पोरांच्या नजरेआड तिला कसं ठेवावं, याची त्या म्हाताऱ्या ब्राह्मणाला जरा काळजीच लागून राहिली होती. पण म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्यांत धूळ फेकणं एखाद्या पोरीला काहीच कठीण नसतं. पोरगी नेहमी कपडे वाळत घालायला गच्चीवर जात असे, आणि तुझाही, बहुधा, गच्चीवर गेल्याशिवाय धडा पाठ होत नसे. एकमेकांच्या गच्चीवरून तुमचं काही बोलणंचालणं होत असे की नाही ते तुम्हीच जाणे, पण पोरीचे रंगढंग पाहून म्हाताऱ्याच्याही मनात संशय आला. कारण कामात तिच्या एकामागून एक चुका होताना दिसू लागल्या, आणि तपस्विनी गौरीसारखी ती दिवसेंदिवस अन्नाचा आणि झोपेचा त्याग करू लागली. एखाद्या दिवशी संध्याकाळी म्हाताऱ्यासमोरच तिला विनाकारण अश्रू आवरत नसत. 'शेवटी म्हाताऱ्याला शोध लागला की गच्चीवर वेळीअवेळी तुमच्या मूक भेटीगाठी चालतात — इतकंच काय, कॉलेज बुडवूनही भर दुपारी जिन्यावरच्या खोलीच्या सावलीत, गच्चीच्या कोपऱ्यात तू हातात पुस्तक घेऊन बसून असायचास; एकांतातल्या अभ्यासाचा तुला एकाएकी एवढा उत्साह आला होता. विप्रदास माझ्याकडे सल्ला विचारायला आला तेव्हा मी म्हणालो, काका, तुम्ही कितीतरी दिवसांपासून काशीला जायचं म्हणताय — पोरीला माझ्यापाशी ठेवा आणि तीर्थवासाला जा, तिची जबाबदारी मी घेतो.
त्याग
'विप्रदास तीर्थाला गेला. मी पोरीला श्रीपती चाटुज्ज्यांच्या बिऱ्हाडी ठेवलं आणि त्यालाच तिचा बाप म्हणून खपवलं. त्यानंतर जे झालं ते तुला ठाऊक आहेच. तुझ्यापाशी सगळी हकीकत आदीपासून अंतापर्यंत उलगडून सांगून मला फार आनंद झाला. ही जणू एक गोष्टच आहे. वाटतं, सगळं लिहून त्याचं एक पुस्तक छापावं. मला लिहिता येत नाही. माझा पुतण्या म्हणे थोडंफार लिहितो — त्याच्याकडून लिहून घ्यावं असं मनात आहे. पण तू आणि तो मिळून लिहिलंत तर सर्वांत उत्तम, कारण गोष्टीचा शेवट मला नीटसा ठाऊक नाही.' प्यारीशंकरच्या या शेवटच्या बोलण्याकडे फारसं लक्ष न देता हेमंत म्हणाला, 'कुसुमने या लग्नाला काहीच हरकत घेतली नाही?' प्यारीशंकर म्हणाला, 'हरकत होती की नव्हती, ते समजणं महाकठीण. तुला ठाऊकच आहे बाबा, बायकांचं मन — "नाही" म्हणाली की "हो" समजायचं. सुरुवातीला काही दिवस, नव्या घरी आल्यावर तू दिसेनासा झालास म्हणून ती कशी वेड्यासारखी झाली होती. तूही, मी पाहिलं, कुठूनतरी पत्ता काढलास; बहुतेक दिवशी हातात पुस्तक घेऊन कॉलेजला निघालास की तुझी वाट चुकायची — आणि श्रीपतीच्या बिऱ्हाडासमोर येऊन तू काहीतरी शोधत फिरायचास; तू प्रेसिडेन्सी कॉलेजचा रस्ता शोधत होतास असं काही वाटत नसे, कारण सभ्य माणसाच्या घराच्या खिडकीतून फक्त किड्यापतंगांची आणि वेडावलेल्या तरुणांच्या हृदयांचीच वाट जाते. हे सगळं पाहून-ऐकून मला फार वाईट वाटलं. मी पाहिलं, तुझ्या अभ्यासात भारी व्यत्यय येतो आहे आणि पोरीचीही अवस्था बिकट झाली आहे.
त्याग
'एके दिवशी कुसुमला बोलावून घेऊन मी म्हणालो, "बाळ, मी म्हातारा माणूस, माझ्यापाशी लाज बाळगायचं कारण नाही — तू मनातल्या मनात कोणाची आस धरली आहेस ते मला ठाऊक आहे. तो पोरगाही वाया जायच्या बेतात आहे. तुमचं मीलन व्हावं, अशी माझी इच्छा आहे." हे ऐकताक्षणी कुसुम ऊर फुटेस्तो रडू लागली आणि धावत पळून गेली. अशा रीतीने अधूनमधून संध्याकाळी श्रीपतीच्या घरी जाऊन, कुसुमला बोलावून, तुझा विषय काढून, हळूहळू मी तिची लाज मोडली. शेवटी रोज सतत बोलून बोलून मी तिला पटवलं की, लग्नाशिवाय मला दुसरा मार्ग दिसत नाही. त्याखेरीज मीलनाचा आणखी कोणताही उपाय नाही. कुसुम म्हणाली, ते कसं होईल? मी म्हणालो, "तुला कुलीनाची मुलगी म्हणून खपवून देईन." पुष्कळ वादावादीनंतर तिने या बाबतीत तुझं मत विचारायला सांगितलं. मी म्हणालो, तो पोरगा आधीच वेडा व्हायच्या बेतात आहे, त्याला आणखी या भानगडी सांगायची गरजच काय? काम सुखरूप, निर्धास्तपणे पार पडलं की सगळ्याच बाजूंनी सुखाचं होईल. विशेषतः ही गोष्ट कधी उघड होण्याची काहीच शक्यता नसताना, त्या बिचाऱ्याला उगाच आपणहून आयुष्यभरासाठी दुःखी कशाला करायचं? 'कुसुमला समजलं की नाही, ते मला समजू शकलं नाही. कधी रडते, कधी गप्प बसून राहते. शेवटी मी "मग राहू दे" म्हटलं की पुन्हा ती अस्वस्थ होते. अशा स्थितीत मी श्रीपतीकरवी तुला लग्नाचा प्रस्ताव पाठवला. पाहिलं तर, होकार द्यायला तू तिळमात्र वेळ लावला नाहीस. मग लग्नाचं सगळं नक्की झालं.
त्याग
'लग्नाच्या थोडंच आधी कुसुम अशी काही अडून बसली, की काही केल्या तिला वळवता येईना. ती माझे हातपाय धरते; म्हणते, "नको हे, काका." मी म्हणालो, "सर्वनाश! सगळं ठरून गेलंय, आता काय सांगून मागे फिरवू?" कुसुम म्हणते, "तुम्ही सगळीकडे पसरवून द्या की मी अचानक मेले — मला इथून कुठेतरी पाठवून द्या." मी म्हणालो, "मग त्या पोराची काय दशा होईल? इतक्या दिवसांची त्याची आशा उद्या पूर्ण होणार म्हणून तो स्वर्गात जाऊन बसलाय, आणि आज मी त्याला अचानक तुझ्या मृत्यूची बातमी पाठवू! मग त्याच्या दुसऱ्या दिवशी तुला त्याच्या मृत्यूची बातमी पाठवावी लागेल, आणि त्याच दिवशी संध्याकाळी माझ्याकडे तुझ्या मृत्यूची बातमी येईल. या म्हातारपणी स्त्रीहत्या आणि ब्रह्महत्या करायला बसलोय की काय मी?" 'मग शुभमुहूर्तावर शुभविवाह पार पडला — मी माझ्या एका कर्तव्याच्या ओझ्यातून सुटलो आणि हुश्श झालो. त्यानंतर काय झालं ते तुला ठाऊक आहे.' * * * हेमंत म्हणाला, 'आमचं जे करायचं होतं ते आपण केलंतच; मग पुन्हा ही गोष्ट उघड का केलीत?' प्यारीशंकर म्हणाले, 'मी पाहिलं, तुझ्या धाकट्या बहिणीच्या लग्नाचं सगळं ठरून गेलं आहे. तेव्हा मनात विचार केला, एका ब्राह्मणाची जात मी बुडवली आहे खरी, पण ती केवळ कर्तव्यबुद्धीने. आता आणखी एका ब्राह्मणाची जात बुडणार; ते टाळणं माझं कर्तव्य आहे. म्हणून मी त्यांना पत्र लिहून कळवलं. लिहिलं, हेमंतने शूद्राच्या मुलीशी लग्न केलं आहे, याचा पुरावा आहे.' हेमंत मोठ्या कष्टाने धीर आवरून म्हणाला, 'ही जी मुलगी — हिचा मी परित्याग करीन, मग हिचं काय होईल? आपण हिला आश्रय द्याल?'
त्याग
प्यारीशंकर म्हणाले, 'माझं जे काम होतं ते मी केलं; आता दुसऱ्याच्या परित्यक्ता स्त्रीला पोसणं हे माझं काम नव्हे. — अरे, हेमंतबाबूंसाठी बर्फ घालून एक ग्लास शहाळ्याचं पाणी घेऊन ये, आणि पान आण रे.' या थंडगार आदरातिथ्याची वाट न पाहता हेमंत निघून गेला. ४ कृष्णपक्षातली पंचमी. अंधारी रात्र. पाखरू गात नाही. तळ्याकाठचं लिचीचं झाड काळ्या पटावर अधिक गडद डागासारखं लिंपून गेलं आहे. केवळ दक्षिणेचा वारा या अंधारात आंधळेपणाने गरगर फिरत भटकतो आहे, जणू त्याला रात्रीच्या भुताने झपाटलं आहे. आणि आकाशातले तारे पापणी न लववता, सावध डोळ्यांनी, जिवाच्या आकांताने अंधार भेदून कुठलंतरी रहस्य शोधून काढण्यात गुंतले आहेत. शयनगृहात दिवा लावलेला नाही. हेमंत खिडकीजवळ पलंगावर बसून समोरच्या अंधाराकडे पाहतो आहे. कुसुम जमिनीवर दोन्ही हातांनी त्याचे पाय वेढून, पायांवर तोंड ठेवून पडून आहे. काळ जणू स्तंभित समुद्रासारखा स्थिर होऊन राहिला आहे. जणू अनंत रात्रीच्या पटावर अदृष्ट चित्रकाराने हे एक चिरंतन चित्र रेखून ठेवलं आहे — चारी बाजूंना प्रलय, मधोमध एक न्यायाधीश, आणि त्याच्या पायांशी एक अपराधिनी. पुन्हा चपलांचा आवाज झाला. हरिहर मुखुज्जे दाराशी येऊन म्हणाले, 'पुष्कळ वेळ झाला, आता आणखी वेळ देऊ शकत नाही. त्या पोरीला घरातून घालवून दे.' हा स्वर कानी पडताक्षणी, एका क्षणात आयुष्यभराची हौस फेडून घ्यावी तशी कुसुमने हेमंतचे दोन्ही पाय दुप्पट आवेगाने घट्ट धरले, चरणांचं चुंबन घेतलं, पायांची धूळ मस्तकी लावली आणि पाय सोडले. हेमंत उठून वडिलांपाशी गेला आणि म्हणाला, 'मी पत्नीचा त्याग करणार नाही.' हरिहर गरजला, 'जात घालवणार तू?' हेमंत म्हणाला, 'मी जात मानत नाही.' 'मग तिच्यासकट तूही चालता हो.'