रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
उद्धार
गौरी एका जुन्या श्रीमंत घराण्यात अतिशय लाडाकोडात वाढलेली सुंदर मुलगी. तिचा नवरा परेश हलाखीतून वर येऊन अलीकडेच स्वतःच्या कमाईने थोडासा सावरला होता. जोवर त्याची गरिबी होती, तोवर लेकीचे हाल होतील या भीतीने त्याच्या सासू-सासऱ्यांनी तिला त्याच्या घरी पाठवले नव्हते. गौरी चांगली वयात येऊनच नवऱ्याच्या घरी आली होती. बहुधा याच सगळ्या कारणांमुळे परेशला आपली सुंदर तरुण बायको पुरती आपल्या मुठीतली वाटत नसे; आणि बहुधा संशयी स्वभाव हा त्याच्या व्याधींपैकीच एक होता. परेश पश्चिमेकडच्या एका लहानशा शहरात वकिली करीत असे. घरी आप्तस्वकीय असे फारसे कोणी नव्हते; एकट्या बायकोच्या काळजीने त्याचे मन सतत अस्वस्थ असे. मधूनमधून एखाद्या दिवशी तो अवेळी, अचानक कोर्टातून घरी येऊन उभा राही. सुरुवातीसुरुवातीला नवऱ्याच्या या आकस्मिक अवतरणाचे कारण गौरीला नीटसे उमगत नसे. मधूनमधून परेश विनाकारण एकेका नोकराला काढून टाकू लागला; कोणताच नोकर त्याला फार दिवस पसंत पडेना. विशेषतः, गैरसोय होईल या भीतीने ज्या नोकराला ठेवून घेण्याचा गौरी जरा जास्त आग्रह धरी, त्याला तर परेश क्षणभरही थारा देत नसे. तेजस्वी गौरीच्या मनाला याचा जितका आघात होई, तितका नवरा अधिकच बेचैन होऊन कधीकधी विचित्रपणे वागू लागे.
उद्धार
शेवटी स्वतःला आवरता न आल्याने परेशने दासीला गुपचूप बोलावून तऱ्हेतऱ्हेचे संशयी प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी गौरीच्या कानावर येऊ लागल्या. ती मानी, मितभाषी स्त्री अपमानाने घायाळ झालेल्या सिंहिणीसारखी आतल्या आत धुमसू लागली; आणि हा वेडा संशय प्रलयकाळच्या खड्गासारखा त्या जोडप्याच्या मधोमध कोसळला आणि त्याने दोघांना एकमेकांपासून पार तोडून टाकले. गौरीसमोर एकदा आपला तीव्र संशय उघडा पडून लाजेचा पडदा फाटला, तेव्हापासून परेश उघडउघड रोज पावलोपावली शंका बोलून दाखवीत बायकोशी भांडू लागला; आणि गौरी जितकी मूक तुच्छतेने आणि चाबकाच्या फटकाऱ्यासारख्या धारदार कटाक्षांनी त्याला जणू आपादमस्तक रक्तबंबाळ करू लागली, तितके त्याचे संशयाचे वेड आणखीच वाढत चालले. असे पतिसुखापासून दुरावलेल्या त्या निपुत्रिक तरुणीने आपले मन धर्माकडे वळवले. हरिसभेचे नवे प्रचारक ब्रह्मचारी परमानंद स्वामी यांना बोलावून तिने त्यांच्याकडून मंत्र घेतला आणि त्यांच्या तोंडून भागवताचे निरूपण ऐकू लागली. स्त्रीहृदयातली सारी वाया गेलेली माया केवळ भक्तीच्या रूपाने एकवटून गुरुदेवांच्या चरणी अर्पण झाली. परमानंदांच्या साधुचरित्राविषयी दूरदूरपर्यंत कोणाच्याही मनात तिळमात्र शंका नव्हती. सगळे त्यांना पूजत. त्यांच्याबद्दलचा संशय परेशला तोंड उघडून बोलून दाखवता येत नसे, म्हणूनच तो एखाद्या चोरट्या जखमेसारखा हळूहळू आत पोखरत त्याच्या मर्मापर्यंत जाऊन भिडत होता.
उद्धार
एके दिवशी एका क्षुल्लक कारणावरून ते विष उफाळून बाहेर पडले. बायकोसमोर परमानंदांचे नाव घेऊन त्याने त्यांना दुराचारी भोंदू म्हणून शिव्या दिल्या आणि म्हणाला, 'तुझ्या शाळिग्रामाला हात लावून शपथेवर सांग पाहू, बगळ्याचं ध्यान लावून बसलेल्या त्या ढोंग्यावर तुझं मनातून प्रेम नाही?' पायाखाली तुडवलेल्या नागिणीसारखी क्षणार्धात फणा उभारून, खोट्या उद्दामपणाने नवऱ्याला डसत गौरी दाटलेल्या कंठाने म्हणाली, 'हो, आहे प्रेम! काय करायचं ते करा!' परेशने तत्क्षणी खोलीला कुलूप ठोकून तिला आत कोंडले आणि तो कोर्टात निघून गेला. असह्य संतापाने गौरीने कसेबसे दार उघडवून घेतले आणि ती तत्क्षणी घरातून बाहेर पडली. परमानंद एकांतातल्या खोलीत, निर्मनुष्य दुपारी शास्त्रग्रंथ वाचीत बसले होते. निरभ्र आकाशातून कोसळणाऱ्या विजेसारखी गौरी अचानक त्या ब्रह्मचाऱ्याच्या शास्त्राध्ययनाच्या मधोमध येऊन धडकली. गुरू म्हणाले, 'हे काय!' शिष्या म्हणाली, 'गुरुदेव, या अपमानाच्या संसारातून माझा उद्धार करा, मला घेऊन चला. तुमच्या सेवेच्या व्रताला मी माझं आयुष्य वाहीन.' परमानंदांनी कठोर शब्दांत तिची निर्भर्त्सना करून गौरीला घरी परत पाठवले. पण हाय गुरुदेव, त्या दिवशी अचानक तुटून विस्कटलेला तो अध्ययनाचा धागा पुन्हा पूर्वीसारखा जुळू शकला का!
उद्धार
परेश घरी आला, दार उघडे पाहून त्याने बायकोला विचारले, 'इथे कोण आलं होतं?' बायको म्हणाली, 'कोणी आलं नव्हतं. मी गुरुदेवांच्या घरी गेले होते.' परेश क्षणभर पांढराफटक आणि दुसऱ्याच क्षणी लालबुंद होऊन म्हणाला, 'का गेली होतीस?' गौरी म्हणाली, 'माझी मर्जी!' त्या दिवसापासून दारावर पहारा बसवून, बायकोला घरात कोंडून परेशने असा काही छळ मांडला की साऱ्या शहरात कुचाळक्यांना ऊत आला! हे सारे घाणेरडे अपमान आणि अत्याचार कानी आल्यावर परमानंदांचे हरिचिंतन पार उडून गेले. हे गाव ताबडतोब सोडून जाणे हेच आपले कर्तव्य, असे त्यांना वाटले; पण त्या छळल्या जाणाऱ्या जिवाला मागे टाकून त्यांना काही केल्या दूर जाववेना. या संन्याशाच्या त्या काही दिवसांचा आणि रात्रींचा इतिहास फक्त अंतर्यामीच जाणे. शेवटी, बंदिवासात असतानाच गौरीला एके दिवशी एक पत्र मिळाले: 'वत्से, विचार करून पाहिला. यापूर्वी अनेक साध्वी साधिकांनी कृष्णप्रेमापोटी संसाराचा त्याग केला आहे. संसाराच्या अत्याचारांनी हरीच्या चरणकमलांपासून जर तुझे चित्त विचलित झाले असेल, तर तसे कळवल्यास भगवंताच्या साहाय्याने त्याच्या सेविकेचा उद्धार करून तिला प्रभूंच्या अभय चरणारविंदी अर्पण करण्याचा मी प्रयत्न करीन. फाल्गुन २६, बुधवार, दुपारी २ वाजता, इच्छा असल्यास तुमच्या तळ्याच्या काठी माझी भेट होऊ शकेल.'
उद्धार
गौरीने ते पत्र केसांत गुंडाळून अंबाड्यात दडवून ठेवले. फाल्गुनाच्या २६ तारखेला भर दुपारी स्नानापूर्वी केस सोडताना तिने पाहिले, पत्र नाही. एकदम तिला शंका आली, कदाचित पत्र केव्हातरी बिछान्यात निसटून पडले असेल आणि नवऱ्याच्या हाती लागले असेल. ते पत्र वाचून नवरा मत्सराने जळत असेल, या कल्पनेने गौरीला मनोमन एक प्रकारचा दाहक आनंद झाला — पण आपल्या मस्तकीचे भूषण असलेले ते पत्र त्या पाखंड्याच्या हाताच्या स्पर्शाने विटाळत असेल, ही कल्पनाही तिला सहन होईना. ती झपाझप नवऱ्याच्या खोलीत गेली. पाहते तो नवरा जमिनीवर पडून घरघरतो आहे, तोंडातून फेस येतो आहे, डोळ्यांची बुबुळे कपाळाला चढली आहेत. त्याच्या उजव्या हाताच्या आवळलेल्या मुठीतून पत्र सोडवून घेऊन तिने घाईघाईने डॉक्टरला बोलावणे धाडले. डॉक्टर आला, म्हणाला, 'ॲपोप्लेक्सी' — तोवर रोगी गेला होता. त्याच दिवशी परेशचा बाहेरगावी एक तातडीचा खटला होता. संन्याशाचे इतके अधःपतन झाले होते की ती खबर मिळवून ते गौरीला भेटायला सज्ज झाले होते. नुकतीच विधवा झालेली गौरी खिडकीतून गुरुदेवांना चोरासारखे तळ्याच्या काठी उभे पाहताच, वीज पडल्यासारखी दचकून तिने तत्क्षणी नजर खाली वळवली. गुरू कुठून कुठे उतरले आहेत, हे जणू विजेच्या लखलखाटात या क्षणी एकाएकी तिच्या हृदयात उजळून निघाले. गुरूंनी हाक मारली, 'गौरी!' गौरी म्हणाली, 'येते, गुरुदेव.' मृत्यूची बातमी कळून परेशचे मित्र अंत्यसंस्कारासाठी आले, तेव्हा त्यांनी पाहिले, गौरीचा देह नवऱ्याच्या शेजारी निजलेला आहे. तिने विष खाऊन प्राण दिला होता. या आधुनिक काळातले सहगमनाचे हे अद्भुत उदाहरण पाहून सतीच्या माहात्म्याने सारे स्तिमित झाले.