रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
ऊन आणि ढग
१ आदल्या दिवशी पाऊस पडून गेला होता. आज पाऊस उघडलेल्या सकाळी फिकट ऊन आणि तुटक ढग मिळून, पिकत आलेल्या हळव्या भाताच्या शेतांवरून आळीपाळीने आपापले लांबलचक कुंचले फिरवीत होते; तो विस्तीर्ण हिरवा चित्रपट कधी प्रकाशाच्या स्पर्शाने उजळ, पिवळसर होई, तर दुसऱ्याच क्षणी सावलीच्या लेपाने गडद, शीतल हिरवाईत रंगून जाई. सगळ्या आकाशाच्या रंगमंचावर ढग आणि ऊन हे दोनच नट आपापली भूमिका वठवीत होते, तेव्हा खाली संसाराच्या रंगमंचावर किती ठिकाणी किती नाटके चालली होती, त्यांना गणतीच नाही. जिथे आम्ही एका लहानशा जीवननाट्याचा पडदा उचलला आहे, तिथे गावात रस्त्याकडेला एक घर दिसते आहे. बाहेरची एकच खोली पक्की; त्या खोलीच्या दोन्ही बाजूंनी विटांची एक पडकी होत आलेली भिंत काही मातीच्या खोल्यांना वेढून उभी आहे. रस्त्यावरून गजांच्या खिडकीतून दिसते — एक तरुण उघड्या अंगाने तक्तपोशीवर बसून डाव्या हाताने अधूनमधून ताडपत्राचा पंखा घेऊन उकाडा आणि डास घालवण्याचा प्रयत्न करतो आहे, आणि उजव्या हातात पुस्तक धरून वाचनात गढून गेला आहे. बाहेर गावच्या रस्त्यावर रेघांची साडी नेसलेली एक मुलगी पदरात थोडी काळी जांभळे घेऊन, एकेक संपवीत, त्या गजांच्या खिडकीसमोरून पुनःपुन्हा येरझारा घालत होती. चेहऱ्यावरूनच स्पष्ट कळत होते की आत तक्तपोशीवर बसून पुस्तक वाचणाऱ्या माणसाशी मुलीची चांगली जवळीक आहे — आणि कसेही करून त्याचे लक्ष वेधून घेऊन त्याला मुकाट्याने, तुच्छतेने एवढे कळवून जायचे आहे की, 'सध्या मी काळी जांभळं खाण्यात अतिशय गर्क आहे; मी तुला यत्किंचितही जुमानत नाही.'
ऊन आणि ढग
दुर्दैवाने खोलीतल्या त्या अभ्यासू पुरुषाला डोळ्यांनी कमी दिसते; दुरून मुलीची मूक उपेक्षा त्याच्यापर्यंत पोचूच शकत नाही. हे मुलीलाही ठाऊक होते, म्हणून बराच वेळ निष्फळ येरझारा घातल्यावर मूक उपेक्षेऐवजी जांभळांच्या बिया वापराव्या लागल्या. आंधळ्यापुढे रुसवा निर्भेळ राखणे इतके कठीण असते! अधूनमधून दोनचार टणक बिया जणू योगायोगानेच उडून लाकडी दारावर ठक् करून आपटल्या, तेव्हा वाचनात गढलेल्या त्या पुरुषाने मान वर करून पाहिले. ते लक्षात येताच ती मायावी पोर दुप्पट तन्मयतेने पदरातून दाताखाली घालण्याजोगे पिकलेले जांभूळ निवडू लागली. पुरुषाने भुवया आक्रसून, मोठ्या प्रयासाने निरखून पाहत मुलीला ओळखले, आणि पुस्तक ठेवून, खिडकीजवळ उठून उभे राहत हसतमुखाने हाक मारली, 'गिरिबाला!' गिरिबाला अविचलपणे आपल्या पदरातल्या जांभळांच्या परीक्षेत पूर्ण गुंगून, संथ पावलांनी, आपल्याच नादात एकेक पाऊल टाकीत चालू लागली. तेव्हा त्या अधू दृष्टीच्या तरुणाला कळायला वेळ लागला नाही की, नकळत घडलेल्या कुठल्यातरी अपराधाची शिक्षा चालू आहे. घाईघाईने बाहेर येऊन तो म्हणाला, 'काय गं, आज मला जांभळं नाही दिलीस?' गिरिबालेने ते शब्द कानावरही न घेता, बराच शोध घेऊन आणि पारखून एक जांभूळ निवडले आणि अगदी निर्धास्त मनाने खायला सुरुवात केली.
ऊन आणि ढग
ही जांभळे गिरिबालेच्या बागेतली, आणि ती त्या तरुणाची रोजची ठरलेली वाटणी. काय ठाऊक, आज ती गोष्ट गिरिबालेला काही केल्या आठवली नाही; तिच्या वागण्यावरून असे दिसले की ही जांभळे तिने केवळ आपल्या स्वतःसाठीच गोळा केली आहेत. पण आपल्या बागेतली फळे तोडून दुसऱ्याच्या दारासमोर येऊन थाटामाटात खाण्याचा अर्थ काय, ते काही स्पष्ट कळले नाही. तेव्हा तो पुरुष जवळ आला आणि त्याने तिचा हात धरला. गिरिबालेने आधी अंग मुरडत हात सोडवून निघून जायचा प्रयत्न केला; मग एकाएकी डोळ्यांतून आसवांचा पूर लोटून ती रडू लागली, आणि पदरातली जांभळे जमिनीवर विखरून टाकून धावत निघून गेली. सकाळचे चंचल ऊन आणि चंचल ढग संध्याकाळी शांत, थकलेले झाले आहेत; पांढरे, फुगीर ढग आकाशाच्या कडेला ढिगांनी पडून आहेत, आणि उतरत्या दुपारचा मलूल होत आलेला प्रकाश झाडांच्या पानांवर, तळ्याच्या पाण्यावर आणि पावसात न्हालेल्या निसर्गाच्या अंगाअंगावर झिकमिकतो आहे. पुन्हा तीच मुलगी त्याच गजांच्या खिडकीसमोर दिसते आहे आणि खोलीत तोच तरुण बसलेला आहे. फरक एवढाच की या वेळी मुलीच्या पदरात जांभळे नाहीत आणि तरुणाच्या हातातही पुस्तक नाही. त्याहून गंभीर आणि खोल असे काही फरकही होते. या वेळीही मुलगी कोणत्या खास गरजेपोटी त्या खास जागी येऊन घुटमळते आहे, ते सांगणे कठीण. आणखी कसलीही गरज असो, खोलीतल्या माणसाशी बोलण्याची गरज आहे असे तिच्या वागण्यातून मुळीच दिसत नाही. उलट असे वाटले की, सकाळी जी जांभळे ती टाकून गेली होती त्यांतल्या कुणाला संध्याकाळपर्यंत अंकुर फुटला आहे की नाही, हे पाहायला ती आली आहे.
ऊन आणि ढग
पण अंकुर न फुटण्याच्या इतर कारणांपैकी एक गंभीर कारण हे होते की, ती फळे सध्या तरुणासमोरच्या तक्तपोशीवर ढिगाने पडलेली होती; आणि मुलगी अधूनमधून खाली वाकून कुठल्यातरी अनिर्वचनीय, काल्पनिक वस्तूच्या शोधात गुंतली असताना तरुण मनातले हसू दाबून, अगदी गंभीरपणे एकेक जांभूळ निवडून मोठ्या काळजीने खात होता. शेवटी जेव्हा एकदोन बिया योगायोगानेच मुलीच्या पायांजवळ, इतकेच काय, पायांवरच येऊन पडल्या, तेव्हा गिरिबालेच्या लक्षात आले की तरुण तिच्या रुसव्याचा सूड घेतो आहे. पण हे बरे का? आपल्या चिमुकल्या हृदयाचा सगळा अभिमान सोडून ती शरण जाण्याची संधी शोधत असताना, तिच्या त्या अतिशय अवघड वाटेत आडकाठी आणणे हा निष्ठुरपणा नव्हे का? आपण स्वतःहून पकडले जायला आलो आहोत, हेच पकडले गेल्याने मुलगी हळूहळू लालबुंद होत पळून जाण्याची वाट शोधू लागली, तेव्हा तरुणाने बाहेर येऊन तिचा हात धरला. सकाळसारखेच या वेळीही मुलीने अंग मुरडत हात सोडवून पळून जाण्याचे पुष्कळ प्रयत्न केले, पण ती रडली नाही. उलट लालेलाल होऊन, मान वळवून, छळ करणाऱ्याच्या पाठीत तोंड लपवून भरपूर हसू लागली, आणि जणू केवळ बाहेरून ओढल्यामुळे नाइलाजाने, पराभूत बंदिनीसारखी लोखंडी गजांनी वेढलेल्या त्या कारागृहात शिरली. आकाशातला ढग-उन्हाचा खेळ जसा क्षुल्लक, तसाच पृथ्वीच्या एका कोपऱ्यातला या दोन जिवांचा खेळही क्षुल्लक, तसाच क्षणभंगुर. आणि पुन्हा, आकाशातला ढग-उन्हाचा खेळ जसा क्षुल्लक नव्हे, खेळही नव्हे, फक्त खेळासारखा दिसतो इतकेच, तसाच या दोन अनामिक माणसांच्या एका कामधामाविना गेलेल्या पावसाळी दिवसाचा हा छोटासा इतिहास जगातल्या शेकडो घटनांमध्ये तुच्छ भासेल, पण तो तुच्छ नाही.
ऊन आणि ढग
जे वृद्ध, विराट दैव अविचल, गंभीर मुद्रेने अनंत काळापासून युगामागून युग गुंफत आले आहे, तेच वृद्ध दैव या मुलीच्या सकाळ-संध्याकाळच्या क्षुल्लक हसण्यारडण्यात आयुष्यभराच्या सुखदुःखांचे बीज अंकुरवीत होते. तरीही मुलीचा हा विनाकारण रुसवा फारच अर्थहीन वाटला — केवळ प्रेक्षकाला नव्हे, तर या छोट्या नाटकाचे मुख्य पात्र असलेल्या त्या तरुणालाही. ही मुलगी कधी एखाद्या दिवशी का रागावते, कधी का अपार माया करू लागते, कधी रोजची वाटणी वाढवते, तर कधी ती वाटणी अजिबात बंद करते, याचे कारण शोधणे सोपे नाही. एखाद्या दिवशी जणू आपली सगळी कल्पकता, विचार आणि चतुराई एकवटून ती तरुणाला खूश करायला लागते; तर एखाद्या दिवशी आपली सगळी चिमुकली ताकद, सगळा कठोरपणा एकवटून त्याला दुखवायचा प्रयत्न करते. दुखवता आले नाही तर तिचा कठोरपणा दुपटीने वाढतो; जमले तर तोच कठोरपणा पश्चात्तापाच्या आसवांत शतधा वितळून मायेच्या अखंड धारांनी वाहू लागतो. या क्षुल्लक ढग-उन्हाच्या खेळाचा पहिला क्षुल्लक इतिहास पुढच्या प्रकरणात थोडक्यात सांगतो. २ गावातले बाकी सगळे लोक तट-गट, कारस्थाने, उसाची लागवड, खोटे खटले आणि तागाचा व्यापार यांतच गुंतलेले असत; भावनांची चर्चा आणि साहित्याचा व्यासंग करीत ते फक्त शशिभूषण आणि गिरिबाला. यात कुणाला कुतूहल वाटावे किंवा काळजी वाटावी असे काहीच नाही. कारण गिरिबालेचे वय दहा, आणि शशिभूषण म्हणजे नुकतेच उमललेले एक एम.ए., बी.एल. दोघे केवळ शेजारी. गिरिबालेचे वडील हरकुमार एके काळी आपल्याच गावचे पत्तनीदार होते. आता हलाखीत सापडल्यामुळे सगळे विकून त्यांनी परगावी राहणाऱ्या जमीनदाराकडे नायबाची नोकरी पत्करली आहे. ते राहतात त्याच परगण्याची नायबी असल्यामुळे त्यांना जन्मगाव सोडून कुठे हलावे लागत नाही.
ऊन आणि ढग
शशिभूषण एम.ए. होऊन कायद्याची परीक्षाही उत्तीर्ण झाले, पण कुठल्याच कामाला ते लागले नाहीत. लोकांत मिसळणे किंवा सभेत चार शब्द बोलणे, तेही त्यांच्याकडून होत नाही. डोळ्यांनी कमी दिसते म्हणून ओळखीच्या माणसांनाही ते ओळखत नाहीत, आणि त्यामुळेच त्यांना भुवया आक्रसून पाहावे लागते; लोक त्याला उद्धटपणा समजतात. कलकत्त्याच्या जनसमुद्रात आपल्याच तंद्रीत एकटे राहणे शोभून दिसते, पण खेड्यात तोच प्रकार मोठा माजोरीपणा वाटतो. शशिभूषणांच्या वडिलांनी पुष्कळ खटपट करून हार खाल्ल्यावर शेवटी आपल्या या निकम्म्या मुलाला खेड्यातल्या आपल्या थोड्याशा जमीनजुमल्याच्या देखभालीला लावले, तेव्हा शशिभूषणांना गावकऱ्यांकडून पुष्कळ छळ, थट्टा आणि अवहेलना सोसावी लागली. अवहेलनेचे आणखी एक कारण होते: शांतताप्रिय शशिभूषण लग्नाला तयार नव्हते — मुलींच्या लग्नाची विवंचना असलेले आईबाप त्यांच्या या नाखुशीला असह्य अहंकार समजून काही केल्या क्षमा करू शकत नसत. शशिभूषणांवर जसजसा उपद्रव वाढू लागला, तसतसे ते आपल्या बिळात अधिकाधिक अदृश्य होऊ लागले. एका कोपऱ्यातल्या खोलीत तक्तपोशीवर काही बांधीव इंग्रजी पुस्तके घेऊन ते बसून असत; जेव्हा जे मनात येई ते वाचत; एवढेच त्यांचे काम — जमीनजुमल्याची देखभाल कशी होत असे, ते त्या जमीनजुमल्यालाच ठाऊक. आणि आधीच सूचित केल्याप्रमाणे, माणसांपैकी त्यांचा संबंध होता तो फक्त गिरिबालेशी. गिरिबालेचे भाऊ शाळेत जात, आणि परत आल्यावर आपल्या मूढ बहिणीला कधी विचारत, पृथ्वीचा आकार कसा आहे; कधी प्रश्न करत, सूर्य मोठा की पृथ्वी मोठी — ती चुकीचे उत्तर देई तेव्हा तिच्याकडे प्रचंड तुच्छतेने पाहत तिची चूक दुरुस्त करत. सूर्य पृथ्वीपेक्षा मोठा, हे मत पुराव्याअभावी गिरिबालेला अमान्य वाटले आणि तो संशय तिने धीर करून बोलून दाखवला, तर तिचे भाऊ दुप्पट तुच्छतेने म्हणत, 'हुं:! आमच्या पुस्तकात लिहिलंय, आणि तू—'
ऊन आणि ढग
छापील पुस्तकात असे लिहिले आहे म्हटल्यावर गिरिबाला पूर्ण निरुत्तर होई; दुसरा कुठलाही पुरावा तिला आवश्यक वाटत नसे. पण तिच्या मनात फार इच्छा होई की आपणही दादांसारखे पुस्तक घेऊन वाचावे. कधीकधी ती आपल्या खोलीत बसून कुठलेतरी पुस्तक उघडून पुटपुटत वाचल्याचे सोंग करी आणि भराभर पाने उलटत जाई. छापलेली काळी काळी, बारीक बारीक, अनोळखी अक्षरे जणू एखाद्या महारहस्यमंदिराच्या सिंहद्वारावर थव्याथव्याने रांगा धरून, खांद्यावर वेलांट्या, ऐकार, रफार उंचावून पहारा देत; गिरिबालेच्या कोणत्याच प्रश्नाला कसलेच उत्तर देत नसत. कथामाला आपल्या वाघ, कोल्हा, घोडा, गाढव यांची एकही गोष्ट त्या कुतूहलाने व्याकूळ झालेल्या मुलीपुढे फोडत नसे, आणि आख्यानमंजरी आपली सगळी आख्याने घेऊन मौनव्रत धरल्यासारखी मुकाट्याने पाहत राही. गिरिबालेने भावांकडे लिहायवाचायला शिकवण्याची गोष्ट काढली होती, पण भावांनी तिच्या बोलण्याकडे साफ कानाडोळा केला. एकट्या शशिभूषणांचाच तिला आधार होता. गिरिबालेला कथामाला आणि आख्यानमंजरी जशी अभेद्य, रहस्यमय वाटत, तसेच शशिभूषणही सुरुवातीला बऱ्याच अंशी वाटत. लोखंडी गज लावलेल्या, रस्त्याकडेच्या त्या छोट्या बैठकीच्या खोलीत तो तरुण एकटाच तक्तपोशीवर पुस्तकांच्या गराड्यात बसलेला असे. गिरिबाला गज धरून बाहेर उभी राहून, पाठ वाकवून वाचनात गढलेल्या या विलक्षण माणसाकडे थक्क होऊन निरखून पाहत राही, आणि पुस्तकांच्या संख्येची तुलना करून मनाशी ठरवी की शशिभूषण तिच्या भावांपेक्षा कितीतरी अधिक विद्वान आहेत. याहून आश्चर्याची गोष्ट तिच्या दृष्टीने दुसरी कुठलीच नव्हती. कथामाला वगैरे जगातली प्रमुख प्रमुख पाठ्यपुस्तके शशिभूषणांनी संपूर्ण वाचून संपवली आहेत, याबद्दल तिला तिळमात्र शंका नव्हती. म्हणून शशिभूषण पुस्तकाचे पान उलटत तेव्हा ती स्तब्ध उभी राहून त्यांच्या ज्ञानाची सीमा कुठवर आहे, ते ठरवू शकत नसे.
ऊन आणि ढग
अखेरीस या विस्मयात बुडालेल्या मुलीने अधू दृष्टीच्या शशिभूषणांचेही लक्ष वेधून घेतले. एके दिवशी शशिभूषणांनी एक चकचकीत बांधणीचे पुस्तक उघडून म्हटले, 'गिरिबाला, चित्रं बघतेस? ये.' गिरिबालेने तत्क्षणी धूम ठोकली. पण दुसऱ्या दिवशी ती पुन्हा रेघांची साडी नेसून त्याच गजांबाहेर उभी राहिली आणि तशाच गंभीर, मूक तन्मयतेने शशिभूषणांचे वाचन निरखू लागली. शशिभूषणांनी त्या दिवशीही हाक मारली, आणि त्या दिवशीही ती वेणी उडवीत जीव खाऊन धावत पळाली. अशा रीतीने त्यांच्या ओळखीचा श्रीगणेशा होऊन ती केव्हा अधिक घट्ट झाली, आणि मुलगी केव्हा गजांबाहेरून शशिभूषणांच्या खोलीत शिरली, त्यांच्या तक्तपोशीवरच्या बांधीव पुस्तकांच्या ढिगांत तिला जागा मिळाली, ती नेमकी तारीख ठरवायला ऐतिहासिक संशोधनाची गरज आहे. शशिभूषणांकडे गिरिबालेचे लिहिणेवाचणे सुरू झाले. ऐकून सगळे हसतील — हे मास्तर आपल्या चिमुकल्या विद्यार्थिनीला केवळ अक्षरओळख, शुद्धलेखन आणि व्याकरण शिकवीत असत असे नव्हे, तर मोठमोठी काव्ये भाषांतर करून ऐकवीत आणि तिचे मत विचारीत. मुलीला काय कळे ते अंतर्यामीच जाणे, पण तिला ते आवडे यात शंका नाही. समजलेले आणि न समजलेले एकत्र मिसळून ती आपल्या बालमनात नाना अपूर्व कल्पनाचित्रे रंगवून घेई. मुकाट्याने डोळे विस्फारून लक्ष देऊन ऐके, मधूनच एखादा अगदी विसंगत प्रश्न विचारी, आणि कधीकधी एकाएकी भलत्याच असंबद्ध विषयावर जाऊन पोचे. शशिभूषण त्यात कधीच आडकाठी आणत नसत — मोठमोठ्या काव्यांविषयी या अतिलहान समीक्षकाची निंदा, स्तुती, टीका, भाष्य ऐकून त्यांना विशेष आनंद होई. सगळ्या गावात हीच गिरिबाला त्यांची एकमेव जाणकार मैत्रीण.
ऊन आणि ढग
गिरिबालेची आणि शशिभूषणांची पहिली ओळख झाली तेव्हा गिरीचे वय आठ होते; आता ती दहा वर्षांची झाली आहे. या दोन वर्षांत ती इंग्रजी आणि बंगाली वर्णमाला शिकून दोनचार सोपी पुस्तके वाचून मोकळी झाली आहे. आणि शशिभूषणांनाही या दोन वर्षांत खेडेगाव अगदीच सोबतीविना, नीरस वाटले नाही. ३ पण गिरिबालेचे वडील हरकुमार यांचे शशिभूषणांशी फारसे सख्य जमले नाही. हरकुमार सुरुवातीला या एम.ए., बी.एल.कडे खटल्या-मामल्यांविषयी सल्ला घ्यायला येत. एम.ए., बी.एल. त्याकडे फारसे लक्ष देत नसत, आणि कायद्याच्या विद्येविषयी आपले अज्ञान नायबापुढे कबूल करायला कचरत नसत. नायब त्याला निव्वळ ढोंग समजत. अशा रीतीने दोनेक वर्षे गेली. अलीकडे एका उद्दाम कुळाला वठणीवर आणणे आवश्यक झाले होते. नायबसाहेबांनी त्याच्यावर वेगवेगळ्या जिल्ह्यांत वेगवेगळे गुन्हे आणि दावे ठोकून फिर्यादी दाखल करण्याचा आपला बेत बोलून दाखवला, आणि सल्ल्यासाठी ते शशिभूषणांच्या जरा फारच मागे लागले. शशिभूषणांनी सल्ला देणे तर दूरच, शांतपणे पण ठामपणे हरकुमारांना असे दोनचार शब्द ऐकवले, जे त्यांना मुळीच गोड लागले नाहीत. इकडे त्या कुळावरच्या एकाही खटल्यात हरकुमार जिंकू शकले नाहीत. त्यांच्या मनात पक्की खात्री झाली की शशिभूषणच त्या दुर्दैवी कुळाचे पाठीराखे होते; त्यांनी प्रतिज्ञा केली, असल्या माणसाला गावातून ताबडतोब हाकलून लावलेच पाहिजे. शशिभूषणांना दिसू लागले — त्यांच्या शेतात गुरे घुसतात, त्यांच्या कडधान्याच्या खळ्याला आग लागते, त्यांच्या हद्दीवरून तंटे उद्भवतात, त्यांची कुळे सहजासहजी खंड देत नाहीत, आणि उलट त्यांच्यावरच खोटे खटले आणण्याच्या तयारीला लागतात — इतकेच काय, संध्याकाळी रस्त्यात निघाले तर त्यांना मारतील आणि रात्री त्यांच्या राहत्या घराला आग लावतील, अशा वावड्याही कानी येऊ लागल्या.
ऊन आणि ढग
अखेर शांतताप्रिय, निरुपद्रवी स्वभावाच्या शशिभूषणांनी गाव सोडून कलकत्त्याला पळून जाण्याची तयारी केली. ते निघायच्या तयारीत असतानाच गावात जॉइंट मॅजिस्ट्रेट साहेबांचा तंबू पडला. बरकंदाज, कॉन्स्टेबल, खानसामे, कुत्री, घोडे, मोतद्दार, मेहतर यांनी सारा गाव गजबजून गेला. पोरांचे टोळके वाघामागून फिरणाऱ्या कोल्ह्यांच्या कळपासारखे साहेबाच्या मुक्कामाभोवती भेदरलेल्या कुतूहलाने घिरट्या घालू लागले. नायबसाहेब रीतीप्रमाणे खर्च पाहुणचाराच्या खात्यावर टाकून साहेबांना कोंबड्या, अंडी, तूप, दूध पुरवू लागले. जॉइंट साहेबांना जितके अन्न लागत होते त्याहून कितीतरी अधिक नायबसाहेबांनी मोकळ्या मनाने पुरवले होते; पण सकाळी साहेबांचा मेहतर येऊन साहेबांच्या कुत्र्यासाठी एकदम चार शेर तूप फर्मावून बसला, तेव्हा ग्रह फिरले म्हणायचे — ते त्यांना सहन झाले नाही. त्यांनी मेहतराला उपदेश केला की, साहेबांचा कुत्ता देशी कुत्र्यापेक्षा बरेच अधिक तूप बिनतक्रार पचवू शकत असला, तरी एवढ्या प्रमाणात स्निग्ध पदार्थ त्याच्या आरोग्याला हितकारक नाही. त्याला तूप दिले नाही. मेहतराने जाऊन साहेबांना सांगितले की, कुत्र्यासाठी मांस कुठे मिळेल एवढीच चौकशी करायला तो नायबाकडे गेला होता, पण तो जातीने मेहतर म्हणून नायबाने तुच्छतेने सगळ्यांसमोर त्याला हाडहाड करून हाकलून दिले, इतकेच नव्हे तर साहेबांचीही उपेक्षा करायला तो कचरला नाही. एकतर ब्राह्मणाचा जात्यभिमान साहेबलोकांना सहजच असह्य वाटतो, त्यात त्याने त्यांच्या मेहतराचा अपमान करण्याचे धाडस केले — यावर धीर धरणे त्यांना अशक्य झाले. तत्काळ त्यांनी चपराशाला हुकूम सोडला, 'बोलाओ नायबको!'
ऊन आणि ढग
नायब थरथर कापत, दुर्गेचे नाव जपत साहेबांच्या तंबूसमोर येऊन उभे राहिले. साहेब बुटांचा करकर आवाज करीत तंबूतून बाहेर आले आणि परक्या उच्चारात, मोठ्याने नायबाला विचारते झाले, 'टुमी काय कारणवशाट माझा मेठरला डूर केले आहे?' हरकुमारांनी गडबडून हात जोडून सांगितले की, साहेबांच्या मेहतराला हाकलून देण्याचे धाडस त्यांच्याकडून कदापि होणे शक्य नाही; पण कुत्र्यासाठी एकदम चार शेर तूप मागितल्यामुळे आधी त्यांनी त्या चतुष्पादाच्या कल्याणासाठी हलक्या शब्दांत हरकत घेतली, आणि मग तूप गोळा करून आणण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी माणसे धाडली आहेत. साहेबांनी विचारले, कुणाला धाडले आहे आणि कुठे धाडले आहे. हरकुमारांनी तत्काळ तोंडाला येतील ती नावे सांगून टाकली. त्या त्या नावाची माणसे त्या त्या गावी तूप आणायला गेली आहेत की नाही, याचा शोध घ्यायला साहेबांनी तातडीने माणसे पाठवली आणि नायबाला तंबूत बसवून ठेवले. दूत दुपार उलटल्यावर परत आले आणि साहेबांना सांगते झाले, तूप गोळा करायला कुणीही कुठेही गेलेले नाही. नायबाचे सगळे बोलणे खोटे आणि मेहतर सांगतो ते खरे, यात हाकिमाला आता शंका उरली नाही. तेव्हा जॉइंट साहेबांनी क्रोधाने गर्जना करीत मेहतराला बोलावले आणि म्हटले, 'या श्यालकाचा कर्ण धरून तंबूच्या चारी बाजूंनी घोडदौड करवा.' मेहतराने क्षणाचाही विलंब न लावता भोवती जमलेल्या जनसमुदायासमोर साहेबांच्या आज्ञेचे पालन केले. पाहता पाहता गोष्ट घरोघर पसरली; हरकुमार घरी आले आणि अन्नपाणी सोडून मरणासन्नासारखे पडून राहिले.
ऊन आणि ढग
जमीनदारीच्या कामापायी नायबाचे शत्रू पुष्कळ होते; त्यांना या प्रकाराने अतिशय आनंद झाला. पण कलकत्त्याला निघण्याच्या बेतात असलेल्या शशिभूषणांनी ही बातमी ऐकली तेव्हा त्यांच्या अंगातले सगळे रक्त तापले. सबंध रात्र त्यांना झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ते हरकुमारांच्या घरी जाऊन पोचले. हरकुमार त्यांचा हात धरून व्याकूळ होऊन रडू लागले. शशिभूषण म्हणाले, 'साहेबावर अब्रुनुकसानीचा खटला भरला पाहिजे; मी तुमचा वकील म्हणून लढेन.' खुद्द मॅजिस्ट्रेट साहेबांवर खटला भरायचा, हे ऐकून हरकुमार आधी घाबरून गेले; पण शशिभूषणांनी काही केल्या पिच्छा सोडला नाही. हरकुमारांनी विचार करायला वेळ घेतला. पण गोष्ट चहूकडे पसरली आहे आणि शत्रू आनंद व्यक्त करताहेत, हे पाहिल्यावर त्यांना राहवले नाही; ते शशिभूषणांना शरण गेले आणि म्हणाले, 'बाबा रे, तू विनाकारण कलकत्त्याला जायची तयारी करतो आहेस असं ऐकलं; ते काही केल्या व्हायचं नाही. तुझ्यासारखा एक माणूस गावात असला की आम्हाला केवढा धीर असतो! काही का असेना, या घोर अपमानातून मला सोडवलंच पाहिजे.' ४ जे शशिभूषण आयुष्यभर लोकांच्या नजरेआड, एकांताच्या निवाऱ्यात स्वतःला जपण्याचा प्रयत्न करीत आले होते, ते आज कोर्टात येऊन हजर झाले. मॅजिस्ट्रेटांनी त्यांची फिर्याद ऐकून त्यांना खासगी दालनात बोलावून घेतले आणि मोठी मर्जी दाखवीत म्हणाले, 'शशीबाबू, हा खटला गुपचूप मिटवून टाकला तर बरे नाही का?'
ऊन आणि ढग
शशीबाबूंनी टेबलावरच्या एका कायद्याच्या ग्रंथाच्या पुठ्ठ्यावर आपली आक्रसलेल्या भुवयांखालची अधू दृष्टी अगदी एकाग्रतेने खिळवून ठेवीत म्हटले, 'माझ्या अशिलाला मी असा सल्ला देऊ शकत नाही. त्यांचा उघडपणे अपमान झाला आहे; त्याची तडजोड गुपचूप कशी होणार?' साहेबांनी दोनचार गोष्टी बोलून पाहिल्या आणि त्यांच्या लक्षात आले की, हा मितभाषी, मंददृष्टी माणूस सहजासहजी डगमगणारा नाही; ते म्हणाले, 'ऑलराइट बाबू, पाहूया कुठवर काय होते ते.' एवढे बोलून मॅजिस्ट्रेट साहेबांनी खटल्याची तारीख पुढे ढकलली आणि ते मुफस्सल दौऱ्यावर निघून गेले. इकडे जॉइंट साहेबांनी जमीनदाराला पत्र लिहिले, 'तुमचा नायब माझ्या नोकरांचा अपमान करून माझी अवज्ञा करतो. तुम्ही याचा योग्य तो बंदोबस्त कराल, अशी आशा आहे.' जमीनदार गडबडून गेले आणि त्यांनी तत्काळ हरकुमारांना बोलावणे धाडले. नायबांनी आदिपासून अंतापर्यंत सगळी हकीकत उलगडून सांगितली. जमीनदार अतिशय वैतागून म्हणाले, 'साहेबाच्या मेहतराने चार शेर तूप मागितलं तेव्हा तू एक शब्दही न बोलता ताबडतोब का दिलं नाहीस? तुझ्या बापाची कवडी खर्च होणार होती का?' यात त्यांच्या पिढीजात संपत्तीचे काहीच नुकसान झाले नसते, हे हरकुमारांना नाकारता आले नाही. अपराध कबूल करून ते म्हणाले, 'माझे ग्रह फिरले होते, म्हणून अशी दुर्बुद्धी सुचली.' जमीनदार म्हणाले, 'आणि त्यावर पुन्हा साहेबावर फिर्याद करायला तुला कुणी सांगितलं?' हरकुमार म्हणाले, 'धर्मावतार, फिर्याद करायची माझी इच्छाच नव्हती. तो आमच्या गावचा शशी — त्याला कुठे एखादा खटलासुद्धा मिळत नाही — त्या पोराने अगदी जबरदस्तीने, जवळजवळ माझी संमती न घेताच हे लचांड उभं केलं.'
ऊन आणि ढग
हे ऐकून जमीनदार शशिभूषणांवर अतिशय संतापले. त्यांनी ताडले — हा माणूस कुचकामी नवशिका वकील आहे; कुठल्यातरी निमित्ताने एखादा गवगवा उठवून लोकांपुढे नाव कमवायच्या खटपटीत आहे. त्यांनी नायबाला हुकूम दिला की, खटला मागे घेऊन धाकट्या-थोरल्या दोन्ही मॅजिस्ट्रेटांना विनाविलंब शांत करावे. नायब साहेबांसाठी थोडी फळफळावळ आणि गारेगार मिठाई भेट घेऊन जॉइंट मॅजिस्ट्रेटांच्या बंगल्यावर जाऊन हजर झाले. त्यांनी साहेबांना सांगितले की, साहेबांवर खटला करणे त्यांच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे; केवळ शशिभूषण नावाच्या गावातल्या एका मिसरूडही न फुटलेल्या, अजाण, अर्धवट वकिलाने त्यांना जवळजवळ न कळवताच हे उद्दाम कृत्य केले आहे. साहेब शशिभूषणांवर अतिशय नाराज आणि नायबावर फार खूश झाले; रागाच्या भरात नायबबाबूंना 'डंडविढान' केल्याबद्दल ते 'डुःखिट' आहेत, असे ते म्हणाले. साहेबांनी अलीकडेच बंगाली भाषेच्या परीक्षेत बक्षीस मिळवले होते, आणि ते लोकांशी शुद्ध ग्रांथिक भाषेत संभाषण करीत. नायब म्हणाले, मायबाप कधी रागावून शिक्षाही करतात, कधी लाड करून मांडीवरही घेतात; यात लेकराला किंवा मायबापाला दुःख वाटण्याचे काही कारण नाही. त्यानंतर जॉइंट साहेबांच्या नोकरमंडळींना यथायोग्य बक्षिसी देऊन हरकुमार मुफस्सलमध्ये मॅजिस्ट्रेट साहेबांना भेटायला गेले. मॅजिस्ट्रेटांनी त्यांच्या तोंडून शशिभूषणांच्या उद्दामपणाची हकीकत ऐकून म्हटले, 'मलाही आश्चर्य वाटत होते — नायबबाबूंना मी नेहमी भला माणूस म्हणूनच ओळखत आलो; ते आधी मला कळवून गुपचूप तडजोड न करता एकाएकी खटला आणतील, हा काय अशक्य प्रकार! आता सगळे लक्षात येते आहे.'
ऊन आणि ढग
शेवटी त्यांनी नायबाला विचारले, शशी काँग्रेसमध्ये सामील झाला आहे का? नायबांनी चेहऱ्यावरची रेषाही न हलवता सांगितले, होय. साहेबांनी आपल्या साहेबी बुद्धीने स्पष्ट ओळखले की, हा सगळा काँग्रेसचा डाव आहे. एखादे कुभांड रचून अमृतबाजारमध्ये लेख लिहायचे आणि सरकारशी कुरबुरी काढायच्या, यासाठी काँग्रेसचे छोटे छोटे चेले लपूनछपून चहूकडे संधी शोधत आहेत. या सगळ्या लहानसहान काट्यांना एका फटक्यात चिरडून टाकण्यासाठी मॅजिस्ट्रेटच्या हाती अधिक थेट अधिकार दिलेले नाहीत, म्हणून साहेबांनी हिंदुस्थानच्या सरकारला अतिशय दुबळे सरकार म्हणून मनातल्या मनात धिक्कारले. पण काँग्रेसवाल्या शशिभूषणाचे नाव मॅजिस्ट्रेटांच्या मनात राहिले. ५ जगात मोठमोठ्या घटना जोमाने उगवू लागतात, तेव्हा लहान लहान घटनाही आपल्या भुकेल्या, बारीक मुळांचे जाळे घेऊन जगावर आपला हक्क पसरवायला सोडत नाहीत. शशिभूषण या मॅजिस्ट्रेटच्या भानगडीत अगदी गुंतलेले असताना — पोथ्यापुस्तकांच्या ढिगांतून कायदा शोधून काढत असताना, मनातल्या मनात भाषणाला धार लावत असताना, कल्पनेत साक्षीदाराची उलटतपासणी घ्यायला बसलेले असताना, आणि भरगच्च कोर्टाचे दृश्य आणि या युद्धपर्वाचे पुढचे अध्याय डोळ्यांपुढे आणून क्षणोक्षणी थरथरत, घामाघूम होत असताना — त्यांची चिमुकली विद्यार्थिनी आपले फाटके होत आलेले चारुपाठ आणि शाईने रंगलेली लिहायची वही घेऊन, बागेतून कधी फुले, कधी फळे, आईच्या कोठीतून कधी लोणचे, कधी नारळाची वडी, कधी पानात गुंडाळलेला, केवड्याच्या परागांनी सुगंधित केलेला घरचा कात घेऊन ठरल्या वेळी त्यांच्या दाराशी येऊन हजर होत असे.
ऊन आणि ढग
पहिले काही दिवस तिने पाहिले, शशिभूषण एक चित्रविरहित, प्रचंड, कठोर रूपाचा ग्रंथ उघडून अन्यमनस्कपणे पाने उलटताहेत; ते तो लक्ष देऊन वाचताहेत असेही वाटले नाही. एरवी शशिभूषण जी पुस्तके वाचत, त्यांतला काही ना काही भाग गिरिबालेला समजावून सांगायचा प्रयत्न करीत; पण त्या जाडजूड काळ्या पुठ्ठ्याच्या पुस्तकात गिरिबालेला ऐकवण्याजोगे दोन शब्दसुद्धा नव्हते का? नसेनात का, म्हणून ते पुस्तक एवढे मोठे, आणि गिरिबाला एवढी लहान? आधी गुरूंचे लक्ष वेधून घेण्यासाठी गिरिबाला सूर लावून, अक्षरे लावीत, वेणीसकट शरीराचा वरचा भाग जोरजोरात डोलवीत मोठ्याने आपणच वाचू लागली. पाहिले, त्याचा काही विशेष उपयोग झाला नाही. त्या जाड काळ्या पुस्तकावर ती मनातल्या मनात अतिशय चिडली. ते तिला एखाद्या कुरूप, कठोर, निष्ठुर माणसासारखे दिसू लागले. ते पुस्तक गिरिबालेला लहान मुलगी म्हणून पूर्ण तुच्छ लेखते, हे जणू त्याचे प्रत्येक दुर्बोध पान एखाद्या दुष्ट माणसाच्या चेहऱ्याचा आकार धरून मुकाट्याने जाहीर करू लागले. ते पुस्तक एखाद्या चोराने चोरून नेले असते, तर त्या चोराला ती आपल्या आईच्या कोठीतला सगळा केवड्याचा कात चोरून बक्षीस द्यायला तयार झाली असती. त्या पुस्तकाच्या विनाशासाठी तिने मनातल्या मनात देवांकडे ज्या विसंगत आणि अशक्य प्रार्थना केल्या, त्या देवांनी ऐकल्या नाहीत, आणि वाचकांना ऐकवण्याचीही काही आवश्यकता मला दिसत नाही.
ऊन आणि ढग
तेव्हा दुखावलेल्या मनाने मुलीने एकदोन दिवस चारुपाठ हाती घेऊन गुरुगृही जाणे बंद केले. आणि त्या एकदोन दिवसांनंतर या विरहाचा काय परिणाम झाला ते पाहण्यासाठी ती दुसऱ्याच कुठल्या निमित्ताने शशिभूषणांच्या घरासमोरच्या रस्त्यावर आली आणि तिरक्या नजरेने पाहिले — शशिभूषण ते काळे पुस्तक बाजूला टाकून एकटेच उभे राहून, हातवारे करीत लोखंडी गजांना परक्या भाषेत भाषण ऐकवताहेत. बहुधा न्यायाधीशाचे मन कसे वितळवायचे, याची या लोखंडावर चाचणी चालली असावी. जगाचा अनुभव नसलेल्या, ग्रंथांतच रमणाऱ्या शशिभूषणांची समजूत होती की, प्राचीन काळी डिमॉस्थिनीस, सिसेरो, बर्क, शेरिडन वगैरे वक्त्यांनी वाणीच्या बळावर जी असामान्य कामे करून दाखवली — शब्दवेधी बाणांच्या वर्षावाने अन्यायाची चाळण केली, अत्याचाराची नाचक्की केली आणि अहंकाराला धुळीला मिळवले — ती आजच्या या दुकानदारीच्या जमान्यातही अशक्य नाहीत. सत्तेच्या मदाने उन्मत्त झालेल्या उद्धट इंग्रजाला जगापुढे कसे लज्जित आणि पश्चात्तप्त करायचे, याचीच तालीम शशिभूषण तिलकुची गावातल्या आपल्या जीर्ण, छोट्या घरात उभे राहून करीत होते. आकाशातले देव ते ऐकून हसले, की त्यांचे देवनेत्र अश्रूंनी भिजले, ते कुणीच सांगू शकत नाही. म्हणून त्या दिवशी गिरिबाला त्यांच्या दृष्टीस पडली नाही. त्या दिवशी मुलीच्या पदरात जांभळे नव्हती; पूर्वी एकदा जांभळांच्या बियांचे बिंग फुटल्यापासून त्या फळाच्या बाबतीत ती फार संकोचलेली होती. इतकेच काय, शशिभूषणांनी कधी सहज भोळेपणाने विचारले, 'गिरी, आज जांभळं नाहीत?' तर ती त्याला छुपी थट्टा समजून चिडून 'चल, जा!' असे दटावून पळून जायच्या बेतात असे. जांभळांच्या बिया नसल्यामुळे आज तिला एक युक्ती योजावी लागली. एकाएकी दूरवर नजर टाकून मुलगी मोठ्याने म्हणाली, 'स्वर्णे गं, तू जाऊ नकोस हं, मी आलेच!'
ऊन आणि ढग
पुरुष वाचकांना वाटेल की, हे शब्द स्वर्णलता नावाच्या दूरवरच्या कुणा मैत्रिणीला उद्देशून उच्चारले होते; पण वाचक भगिनी सहज ओळखतील की दूर कुणीच नव्हते, लक्ष्य अगदी जवळ होते. पण हाय, आंधळ्या पुरुषावर तो नेम चुकला. शशिभूषणांनी ऐकले नाही असे नाही, पण त्यातले मर्म त्यांना उमगले नाही. त्यांना वाटले, मुलगी खरोखरच खेळायला उत्सुक आहे — आणि त्या दिवशी तिला खेळातून अभ्यासाकडे ओढून आणण्याचा त्यांचा उत्साह नव्हता, कारण त्या दिवशी तेही काही काही हृदयांवर नेम धरून तीक्ष्ण बाण जोडत होते. मुलीच्या चिमुकल्या हाताचा साधा नेम जसा फुकट गेला, तसाच त्यांच्या सुशिक्षित हाताचा महान नेमही फुकट गेला, हे वाचकांना आधीच कळलेले आहे. जांभळांच्या बियांचा एक गुण असा की, एकामागून एक पुष्कळ फेकता येतात; चार फुकट गेल्या तरी निदान पाचवी नेमकी जागी जाऊन लागू शकते. पण स्वर्ण कितीही काल्पनिक असली, तरी तिला 'मी आलेच' अशी आशा दाखवून फार वेळ उभे राहता येत नाही. राहिले तर स्वर्णच्या अस्तित्वाविषयी लोकांना साहजिकच शंका येऊ शकते. म्हणून तो उपाय फुकट गेला, तेव्हा गिरिबालेला ताबडतोब निघून जावे लागले. तरीही, स्वर्ण नावाच्या दूरच्या कुणा सखीची संगत मिळवण्याची इच्छा मनापासूनची असती तर जशी लगबगीने, उत्साहाने पावले पडणे स्वाभाविक होते, तशी गिरिबालेच्या चालीत दिसली नाही. जणू ती आपल्या पाठीने चाचपून पाहत होती की मागून कुणी येते आहे का; कुणीही येत नाही याची खात्री झाल्यावर आशेचा शेवटचा, अगदी क्षीण उरलेला तुकडा घेऊन तिने एकदा मागे वळून पाहिले, आणि कुणीच न दिसल्यावर ती चिमुकली आशा आणि खिळखिळे झालेले चारुपाठ यांचे तुकडे तुकडे करून रस्त्यावर उधळून दिले.
ऊन आणि ढग
शशिभूषणांनी तिला जी थोडी विद्या दिली होती, ती कशीही करून परत करता आली असती, तर बहुधा टाकून द्यायच्या जांभळाच्या बियांसारखी ती सगळी शशिभूषणांच्या दारासमोर खडखडाट करीत फेकून देऊन ती निघून आली असती. मुलीने प्रतिज्ञा केली — पुन्हा शशिभूषणांची भेट होण्याआधीच ती सगळा अभ्यास विसरून जाईल, ते जे प्रश्न विचारतील त्यांतल्या एकाचेही उत्तर तिला देता येणार नाही! एकाचे — एकाचे — एकाचेसुद्धा नाही! तेव्हा! तेव्हा शशिभूषणांची चांगलीच जिरेल. गिरिबालेचे दोन्ही डोळे पाण्याने भरून आले. अभ्यास विसरल्यावर शशिभूषणांना केवढा तीव्र पश्चात्ताप होईल, या कल्पनेने तिच्या दुखऱ्या मनाला थोडे समाधान मिळाले; आणि केवळ शशिभूषणांच्या दोषामुळे शिकलेले सगळे विसरून बसलेल्या त्या भविष्यातल्या अभागी गिरिबालेची कल्पना करून तिला स्वतःचीच कीव येऊन ऊर भरून आला. आकाशात ढग जमू लागले; पावसाळ्यात असे ढग रोजच जमतात. गिरिबाला रस्त्याच्या कडेला एका झाडाआड उभी राहून रुसव्याने हुंदके देत रडू लागली; असे विनाकारण रडणे रोज कितीतरी मुली रडत असतात. त्यात लक्ष देण्याजोगे काहीच नव्हते. ६ शशिभूषणांचे कायद्याचे संशोधन आणि भाषणांची तालीम कोणत्या कारणाने फुकट गेली, ते वाचकांपासून लपलेले नाही. मॅजिस्ट्रेटवरचा खटला एकाएकी मिटला. हरकुमार आपल्या जिल्ह्याच्या बेंचवर ऑनररी मॅजिस्ट्रेट म्हणून नेमले गेले. एक मळकट चपकन आणि तेलकट पगडी घालून हरकुमार हल्ली वरचेवर जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन साहेबांना नियमितपणे सलाम ठोकून येतात. इतक्या दिवसांनी शशिभूषणांच्या त्या जाड काळ्या पुस्तकाला गिरिबालेचा शाप फळू लागला; ते एका अंधाऱ्या कोपऱ्यात हद्दपार होऊन, उपेक्षित, विस्मृत अवस्थेत धुळीचे थर जमवू लागले. पण त्याची अवहेलना पाहून जिला आनंद व्हायचा, ती गिरिबाला कुठे?
ऊन आणि ढग
ज्या दिवशी शशिभूषण पहिल्यांदा कायद्याचा ग्रंथ बंद करून बसले, त्याच दिवशी त्यांच्या एकाएकी लक्षात आले की गिरिबाला आलेली नाही. तेव्हा गेल्या काही दिवसांचा इतिहास एकेक करून, थोडाथोडा त्यांना आठवू लागला. आठवले, एका उजळ सकाळी गिरिबाला पदर भरून नव्या पावसात भिजलेली बकुळीची फुले घेऊन आली होती. तिला पाहूनही त्यांनी ग्रंथातून नजर वर केली नाही, तेव्हा तिच्या उत्साहाला एकाएकी खीळ बसली. तिने पदराला टोचून ठेवलेली सुई आणि दोरा काढला आणि मान खाली घालून एकेक फूल घेऊन माळ गुंफू लागली — माळ अगदी हळूहळू गुंफली, फार उशिरा पूर्ण झाली, दिवस वर आला, गिरिबालेची घरी परतायची वेळ झाली, तरीही शशिभूषणांचे वाचन संपले नाही. गिरिबाला माळ तक्तपोशीवर ठेवून खिन्नपणे निघून गेली. आठवले, तिचा रुसवा दिवसेंदिवस कसा गडद होत गेला; केव्हापासून ती त्यांच्या खोलीत न शिरता खोलीसमोरच्या रस्त्यावर अधूनमधून दिसे आणि निघून जाई; आणि अखेर केव्हापासून मुलीने त्या रस्त्यावर येणेही बंद केले — त्यालाही आता काही दिवस झाले. गिरिबालेचा रुसवा एवढे दिवस कधी टिकत नाही. शशिभूषणांनी एक दीर्घ निःश्वास सोडला आणि भांबावलेल्या, हतबल माणसासारखे भिंतीला पाठ टेकून बसून राहिले. चिमुकली विद्यार्थिनी येत नसल्यामुळे त्यांची वाचायची पुस्तके अगदी बेचव होऊन गेली. पुस्तक ओढून घ्यायचे, दोनचार पाने वाचायची आणि बाजूला टाकायचे, असे होई. लिहिता लिहिता क्षणोक्षणी दचकून रस्त्याकडे, दाराकडे प्रतीक्षेने भरलेली नजर भिरकावली जाई आणि लिहिणे खंडित होई.
ऊन आणि ढग
शशिभूषणांना भीती वाटली, गिरिबाला आजारी तर पडली नसेल. गुपचूप चौकशी केल्यावर कळले, ती भीती निराधार होती. गिरिबाला हल्ली घराबाहेरच पडत नाही. तिच्यासाठी वर ठरला आहे. गिरीने ज्या दिवशी चारुपाठाच्या फाटक्या तुकड्यांनी गावचा चिखलाचा रस्ता भरून टाकला, त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे ती आपल्या चिमुकल्या पदरात नाना तऱ्हेच्या भेटी गोळा करून झपाझप घरातून बाहेर पडत होती. फारच उकाडा असल्यामुळे रात्र जागून काढल्यावर हरकुमार पहाटेपासून बाहेर उघड्या अंगाने तंबाखू ओढत बसले होते. त्यांनी गिरीला विचारले, 'कुठं निघालीस?' गिरी म्हणाली, 'शशीदादाकडे.' हरकुमारांनी दटावून म्हटले, 'शशीदादाकडे जायचं नाही; घरात जा!' एवढे बोलून, लवकरच सासरी जायच्या, वयात आलेल्या मुलीला लाजलज्जा नसल्याबद्दल त्यांनी तिची भरपूर कानउघाडणी केली. त्या दिवसापासून तिचे बाहेर येणे बंद झाले आहे. या खेपेला तिचा रुसवा मोडायची संधीच मिळाली नाही. आंबापोळी, केवड्याचा कात आणि पाचक लिंबे कोठीत आपापल्या जागी परत गेली. पाऊस पडत राहिला, बकुळीची फुले गळत राहिली, झाड भरून पेरू पिकले, आणि फांद्यांवरून निसटलेल्या, पक्ष्यांच्या चोचींनी टोचलेल्या पिकलेल्या काळ्या जांभळांनी झाडाखालची जमीन रोज आच्छादू लागली. हाय, ते फाटके होत आलेले चारुपाठही आता उरले नाही. ७ गावात गिरिबालेच्या लग्नाची सनई वाजत होती, त्या दिवशी आमंत्रण नसलेले शशिभूषण नावेतून कलकत्त्याच्या दिशेने निघाले होते.
ऊन आणि ढग
खटला मागे घेतल्यापासून हरकुमार शशीकडे विषारी नजरेने पाहत. कारण त्यांनी मनाशी पक्के ठरवले होते की, शशी आपला खात्रीने तिरस्कार करतो. शशीच्या चेहऱ्यात, डोळ्यांत, वागण्यात त्यांना त्याच्या हजारो काल्पनिक खुणा दिसू लागल्या. गावातले सगळे लोक त्यांच्या अपमानाची हकीकत हळूहळू विसरत चालले आहेत, एकटे शशिभूषणच ती दुःखद आठवण जागी ठेवून आहेत, असे वाटून त्यांना शशिभूषण डोळ्यांसमोरही नकोसे झाले. त्यांची भेट होताच हरकुमारांच्या अंतःकरणात थोडासा शरमेचा संकोच आणि त्याबरोबरच प्रचंड संताप उफाळून येई. शशीला गाव सोडायला लावायचेच, अशी हरकुमारांनी प्रतिज्ञा केली. शशिभूषणांसारख्या माणसाला गाव सोडायला लावणे हे काही फार कठीण काम नाही. नायबसाहेबांचा हेतू लवकरच सफल झाला. एके दिवशी सकाळी पुस्तकांचे ओझे आणि दोनचार पत्र्याच्या पेट्या सोबत घेऊन शशी नावेत बसले. गावाशी त्यांचे जे एक सुखाचे बंधन होते, तेही आज थाटामाटात तुटत होते. ते कोमल बंधन त्यांच्या हृदयाला किती घट्ट वेढून बसले होते, हे त्यांना पूर्वी पुरते कळले नव्हते. आज नाव सुटली, गावातल्या झाडांचे शेंडे अस्पष्ट झाले आणि उत्सवाच्या वाद्यांचा आवाज क्षीण होत गेला, तेव्हा एकाएकी आसवांच्या वाफेने हृदय भरून येऊन त्यांचा कंठ दाटला, रक्ताच्या लोटाने कपाळावरच्या शिरा ठणकू लागल्या, आणि सगळ्या जगाचे दृश्य सावल्यांनी रचलेल्या मायावी मृगजळासारखे अगदी अस्पष्ट भासू लागले.
ऊन आणि ढग
उलटा वारा फार जोराने वाहत होता, त्यामुळे प्रवाह अनुकूल असूनही नाव हळूहळू पुढे सरकत होती. इतक्यात नदीत एक असा प्रकार घडला की शशिभूषणांच्या प्रवासात खंड पडला. स्टेशनच्या घाटापासून सदर महकुम्यापर्यंत अलीकडेच एक नवी स्टीमर लाइन सुरू झाली होती. तो स्टीमर आवाज करीत आपले पंख फडफडवीत, लाटा उठवीत प्रवाहाच्या उलट दिशेने येत होता. जहाजावर नव्या लाइनचा तरुण मॅनेजर साहेब आणि थोडेसे प्रवासी होते. प्रवाशांपैकी काहीजण शशिभूषणांच्या गावातूनही चढले होते. एका व्यापाऱ्याची नाव काही अंतरावरून या स्टीमरशी शर्यत लावत येण्याचा प्रयत्न करीत होती; मधूनच गाठू गाठू करी, मधूनच मागे पडे. नावाड्याला हळूहळू ईर्षा चढली. त्याने पहिल्या शिडावर दुसरे शीड, आणि दुसऱ्यावर लहानसे तिसरे शीडसुद्धा चढवले. वाऱ्याच्या जोराने उंच डोलकाठी पुढे झुकली, आणि फुटलेल्या लाटांचे लोट खदखदा हसत नावेच्या दोन्ही बाजूंना बेभान नाचू लागले. नाव तेव्हा लगाम तुटलेल्या घोड्यासारखी धावू लागली. एका ठिकाणी स्टीमरचा मार्ग थोडा वळणाचा होता; तिथे जवळचा मार्ग पकडून नावेने स्टीमरला मागे टाकले. मॅनेजर साहेब उत्सुकतेने कठड्यावर झुकून नावेची ही चढाओढ पाहत होता. नाव पूर्ण वेगात आली आहे आणि स्टीमरच्या दोनेक हात पुढे गेली आहे, इतक्यात साहेबाने एकाएकी बंदूक उचलून फुगलेल्या शिडावर नेम धरला आणि बार काढला. क्षणार्धात शीड फाटले, नाव बुडाली, आणि स्टीमर नदीच्या वळणाआड दिसेनासा झाला.
ऊन आणि ढग
मॅनेजरने असे का केले, ते सांगणे कठीण. इंग्रजपुत्राच्या मनातला भाव आम्हा बंगाली माणसांना नेमका समजत नाही. कदाचित देशी शिडाची ही चढाओढ त्याला सहन झाली नसेल; कदाचित एखादी फुगलेली, पसरलेली वस्तू बंदुकीच्या गोळीने पापणी लवते न लवते तोच फाडून टाकण्यात एक हिंस्र मोह असेल; कदाचित या घमेंडखोर नावेच्या कापडात चारदोन भोके पाडून क्षणात तिची नौकालीला संपवून टाकण्यात एक जबरदस्त पैशाचिक विनोद असेल — नक्की ठाऊक नाही. पण एवढे नक्की, की इंग्रजाच्या मनात थोडासा विश्वास होता की ही थट्टा केल्याबद्दल तो कसल्याही शिक्षेस पात्र नाही — आणि त्याची अशी समजूत होती की, ज्यांची नाव गेली आणि कदाचित जीवही धोक्यात आला, त्यांची गणना माणसांतच होऊ शकत नाही. साहेबाने बंदूक उचलून गोळी झाडली आणि नाव बुडाली, तेव्हा शशिभूषणांची होडी घटनास्थळाच्या जवळ आली होती. नंतरचा प्रकार शशिभूषणांनी प्रत्यक्ष पाहिला. घाईघाईने होडी तिकडे नेऊन त्यांनी नावाडी आणि खलाशांना वाचवले. फक्त एक माणूस आत बसून स्वयंपाकासाठी मसाला वाटत होता, तो काही दिसला नाही. पावसाळ्यातली नदी तीव्र वेगाने वाहत राहिली. शशिभूषणांच्या काळजात तापलेले रक्त उकळू लागले. कायदा अतिशय मंदगती — तो एखाद्या प्रचंड, गुंतागुंतीच्या लोखंडी यंत्रासारखा; तोलूनमापून तो पुरावा घेतो आणि निर्विकारपणे शिक्षा वाटून देतो; त्यात मानवी हृदयाची ऊब नाही. पण भुकेपासून भोजन, इच्छेपासून उपभोग आणि रोषापासून शिक्षा वेगळी करणे शशिभूषणांना सारखेच अस्वाभाविक वाटले.
ऊन आणि ढग
असे पुष्कळ अपराध असतात की, ते डोळ्यांनी पाहताक्षणी स्वतःच्या हाताने त्यांची शिक्षा दिली नाही, तर अंतर्यामी विधाता जणू आतून पाहणाऱ्याला जाळत राहतो. तेव्हा कायद्याची आठवण काढून समाधान मानायची हृदयाला लाज वाटते. पण यंत्राच्या कायद्याने आणि यंत्राच्या जहाजाने त्या मॅनेजरला शशिभूषणांपासून दूर नेले. त्याने जगाचा आणखी काय उपकार झाला ते मी सांगू शकत नाही, पण त्या खेपेला इंग्रजाच्या एका ठोशासरशी सहज फुटणारी शशिभूषणांची ती भारतीय प्लीहा मात्र निःसंशय वाचली. वाचलेल्या नावाडी-खलाशांना घेऊन शशी गावी परत आले. नावेत ताग भरलेला होता; तो ताग वाचवून काढण्यासाठी त्यांनी माणसे लावली, आणि नावाड्याला मॅनेजरविरुद्ध पोलिसांत अर्ज द्यायची विनंती केली. नावाडी काही केल्या कबूल होईना. तो म्हणाला, 'नाव तर बुडाली; आता स्वतःलाही बुडवून घेणार नाही.' एक तर पोलिसांना दक्षिणा द्यावी लागेल; मग कामधंदा, खाणेपिणे, झोप सोडून कोर्टात हेलपाटे घालावे लागतील; मग साहेबावर फिर्याद करून कोणत्या संकटात सापडावे लागेल आणि हाती काय लागेल, ते देव जाणे. शेवटी जेव्हा त्याला कळले की शशिभूषण स्वतः वकील आहेत, कोर्टाचा खर्च तेच करतील, आणि खटल्यात पुढे नुकसानभरपाई मिळण्याची पुरेपूर शक्यता आहे, तेव्हा तो तयार झाला. पण स्टीमरवर हजर असलेले शशिभूषणांच्या गावचे लोक काही केल्या साक्ष द्यायला तयार होईनात. ते शशिभूषणांना म्हणाले, 'भाऊसाहेब, आम्ही काहीच पाहिलं नाही; आम्ही जहाजाच्या मागच्या बाजूला होतो, यंत्राच्या घडघडाटात आणि पाण्याच्या खळखळाटात तिथून बंदुकीचा आवाज ऐकू येण्याचीही काही शक्यता नव्हती.'
ऊन आणि ढग
देशबांधवांना मनापासून धिक्कारून शशिभूषणांनी मॅजिस्ट्रेटपुढे खटला चालवला. साक्षीदारांची काही गरजच पडली नाही. मॅनेजरने कबूल केले की त्याने बंदूक झाडली होती. तो म्हणाला, आकाशात बगळ्यांचा एक थवा उडत होता, त्यांच्यावरच नेम धरला होता. स्टीमर तेव्हा पूर्ण वेगात चालला होता आणि त्याच क्षणी नदीच्या वळणाआड शिरला होता. त्यामुळे कावळा मेला की बगळा मेला की नाव बुडाली, हे त्याला कळलेही नाही. आकाशात आणि पृथ्वीवर शिकारीच्या इतक्या वस्तू आहेत की, कोणताही शहाणा माणूस मुद्दाम 'डर्टी रॅग' म्हणजे मळक्या फडक्यावर दमडीच्या किमतीचे छरेसुद्धा वाया घालवणार नाही. निर्दोष सुटल्यावर मॅनेजर साहेब चिरूट फुंकत फुंकत क्लबात व्हिस्ट खेळायला गेला; जो माणूस नावेत मसाला वाटत होता, त्याचे प्रेत नऊ मैलांवर काठाला येऊन लागले; आणि शशिभूषण मनाची आग घेऊन आपल्या गावी परत आले. ते परत आले त्या दिवशी नाव सजवून गिरिबालेला सासरी नेत होते. त्यांना कुणी बोलावले नव्हते, तरीही शशिभूषण हळूहळू नदीकाठी येऊन पोचले. घाटावर लोकांची गर्दी होती; तिथे न जाता ते थोडे पुढे जाऊन उभे राहिले. नाव घाट सोडून त्यांच्यासमोरून निघून गेली, तेव्हा क्षणभर, विजेसारखे त्यांना दिसले — डोक्यावर पदर ओढून नवी नवरी मान खाली घालून बसली आहे. गाव सोडून जाण्याआधी कसेही करून एकदा तरी शशिभूषणांची भेट व्हावी, अशी गिरिबालेला कितीतरी दिवसांपासून आशा होती; पण आज तिला कळलेही नाही की तिचे गुरू जवळच काठावर उभे आहेत. तिने एकदाही मान वर करून पाहिले नाही; फक्त निःशब्द रडण्याने तिच्या दोन्ही गालांवरून आसवे ओघळत राहिली.
ऊन आणि ढग
नाव हळूहळू दूर जाऊन दिसेनाशी झाली. पाण्यावर सकाळचे ऊन झिकमिकू लागले; जवळच्या आंब्याच्या फांदीवर एक पावशा उचंबळत्या कंठाने पुनःपुन्हा गात राहिला, तरी मनातला आवेग त्याला काही केल्या रिता करता आला नाही; तरीची नाव माणसे भरून इकडून तिकडे ये-जा करू लागली; घाटावर पाणी भरायला आलेल्या बायकांनी मोठमोठ्याने गिरीच्या सासरी जाण्याची चर्चा सुरू केली; शशिभूषणांनी चष्मा काढून डोळे पुसले आणि त्या रस्त्याकडेच्या, त्या गजांच्या आतल्या त्या छोट्या घरात जाऊन प्रवेश केला. एकाएकी त्यांना वाटले, जणू गिरिबालेचा आवाज ऐकू आला! 'शशीदादा!' — कुठे गं, कुठे? कुठेच नाही! ना त्या घरात, ना त्या रस्त्यावर, ना त्या गावात — त्यांच्या आसवांनी न्हालेल्या अंतःकरणाच्या अगदी मधोमध. ८ शशिभूषणांनी पुन्हा सामानसुमान बांधले आणि कलकत्त्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. कलकत्त्यात काही काम नाही, तिथे जाण्याचा काही खास उद्देश नाही; म्हणून रेल्वेने न जाता सबंध प्रवास नदीमार्गानेच करायचा त्यांनी ठरवले. तेव्हा भर पावसाळ्यात बंगालच्या चारी बाजूंना लहानमोठ्या, वेड्यावाकड्या हजारो जलधारांचे जाळे पसरले होते. रसरशीत, हिरव्यागार बंगभूमीच्या शिरा-उपशिरा भरून वाहत होत्या; झाडेवेली, गवत-झुडपे, जाळ्या-जंगले, भात, ताग, ऊस यांनी दाही दिशांना बेहोश तारुण्याची समृद्धी जणू अगदी उधाणून, बेबंद झाली होती. शशिभूषणांची नाव त्या सगळ्या अरुंद, वळणावळणांच्या जलप्रवाहांतून चालू लागली. पाणी तेव्हा काठांच्या बरोबरीला आले होते. काशगवताची रानं, लव्हाळ्याची बेटे आणि जागोजागी पिकांची शेते पाण्याखाली गेली होती. गावांची कुंपणे, बांबूची बेटे आणि आमराया अगदी पाण्याच्या काठालगत येऊन उभी होती — जणू देवकन्यांनी बंगालच्या झाडांच्या बुंध्यांभोवतीची आळी पाणी घालून भरून टाकली होती.
ऊन आणि ढग
प्रवास सुरू झाला तेव्हा न्हाऊन तुकतुकीत झालेली वनश्री उन्हात उजळून हसत होती; पण थोड्याच वेळात ढग दाटून पाऊस सुरू झाला. मग जिकडे नजर जावी तिकडे सगळे उदास आणि गढूळ दिसू लागले. पुराच्या वेळी गुरे जशी पाण्याने वेढलेल्या, घाणेरड्या, चिखलाच्या, अरुंद गोठ्याच्या आवारात दाटीवाटीने करुण डोळ्यांनी सोशिकपणे उभी राहून श्रावणाच्या धारांत भिजत राहतात, तसाच बंगाल आपल्या चिखलाने निसरड्या, ओल्याचिंब, कोंदट जंगलात मुक्या, उदास चेहऱ्याने पीडित होऊन अविश्रांत भिजत राहिला. शेतकरी इरली डोक्यावर घेऊन बाहेर पडले आहेत; बायका भिजत भिजत, पावसाळी गार वाऱ्याने अंग चोरून, एका झोपडीतून दुसऱ्या झोपडीत घरकामासाठी ये-जा करताहेत, आणि निसरड्या घाटावर अगदी जपून पाय टाकीत ओल्या वस्त्रांनी पाणी भरताहेत; आणि घरातले पुरुष ओसरीवर बसून तंबाखू ओढताहेत; फारच कामाची निकड असली तर कमरेला उपरणे गुंडाळून, जोडा हातात आणि छत्री डोक्यावर घेऊन बाहेर पडताहेत — अबला स्त्रीच्या डोक्यावर छत्री, हे या उन्हाने करपणाऱ्या, पावसाने बुडणाऱ्या बंगालच्या सनातन, पवित्र रीतीत बसत नाही. पाऊस काही केल्या थांबेना, तेव्हा बंद नावेत कंटाळून शशिभूषणांनी पुन्हा रेल्वेनेच जायचे ठरवले. एके ठिकाणी, नदीच्या एका प्रशस्त मुखासारख्या जागी येऊन शशिभूषणांनी नाव बांधली आणि जेवणाची तयारी सुरू केली. लंगड्याचा पाय खड्ड्यातच पडतो — तो काही केवळ खड्ड्याचा दोष नव्हे; लंगड्याच्या पायालाही पडण्याकडे जरा खास ओढ असते. शशिभूषणांनी त्या दिवशी याचा एक पुरावा दिला.
ऊन आणि ढग
दोन नद्यांच्या संगमाच्या मुखाशी बांबू बांधून कोळ्यांनी प्रचंड जाळे लावले होते. फक्त एका बाजूला नावांच्या ये-जा करण्यासाठी वाट ठेवली होती. फार पूर्वीपासून ते हे काम करीत आले आहेत आणि त्यासाठी करही भरतात. दुर्दैवाने या वर्षी या मार्गावर जिल्ह्याचे पोलीस सुपरिंटेंडेंट बहादूर यांचे एकाएकी शुभागमन झाले. त्यांची बोट येताना पाहून कोळ्यांनी आधीच बाजूची वाट दाखवून मोठ्याने सावध केले. पण माणसाने उभारलेल्या कोणत्याही अडथळ्याचा मान राखून वळसा घालून जाण्याची साहेबांच्या नावाड्याला सवय नाही. त्याने त्या जाळ्यावरूनच बोट हाकली. जाळे खाली दबून बोटीला वाट मिळाली, पण तिचे सुकाणू अडकले. थोड्या वेळाने आणि खटपटीने सुकाणू सोडवून घ्यावे लागले. पोलीस साहेबांनी अतिशय तापून, लालबुंद होऊन बोट बांधली. त्यांचा अवतार पाहताच ते चार कोळी जीव घेऊन पळाले. साहेबांनी आपल्या खलाशांना जाळे कापून टाकायचा हुकूम दिला. त्यांनी ते सातआठशे रुपयांचे मोठे जाळे कापून तुकडे तुकडे केले. जाळ्यावर राग काढून झाल्यावर शेवटी कोळ्यांना पकडून आणायचा हुकूम झाला. पळून गेलेले ते चार कोळी सापडले नाहीत, म्हणून कॉन्स्टेबलने हाताशी लागलेल्या चार जणांना पकडून आणले. ते आपण निरपराध असल्याचे सांगत हात जोडून गयावया करू लागले. पोलीस बहादूर त्या कैद्यांना सोबत न्यायचा हुकूम देत होते, इतक्यात चष्मा घातलेले शशिभूषण घाईघाईने एक सदरा अंगात चढवून, त्याची बटणेही न लावता, चपला फटफट वाजवीत धापा टाकीत पोलिसांच्या बोटीसमोर येऊन ठाकले. कापऱ्या आवाजात ते म्हणाले, 'सर, कोळ्यांचे जाळे फाडण्याचा आणि या चार माणसांचा छळ करण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही.'
ऊन आणि ढग
पोलिसांच्या मोठ्या अधिकाऱ्याने त्यांना हिंदीत एक खास अपमानाचा शब्द उच्चारताच, ते क्षणार्धात किंचित उंच काठावरून बोटीत उडी मारून सरळ साहेबांवर तुटून पडले. पोरासारखे, वेड्यासारखे मारू लागले. त्यानंतर काय झाले, ते त्यांना ठाऊक नाही. पोलीस ठाण्यात त्यांना शुद्ध आली तेव्हा — सांगायला संकोच वाटतो — त्यांना जी वागणूक मिळाली, तिच्यात त्यांना ना मनाचा मान वाटला, ना शरीराचा आराम. ९ शशिभूषणांच्या वडिलांनी वकील-बॅरिस्टर लावून आधी शशीला कोठडीतून जामिनावर सोडवले. त्यानंतर खटल्याची तयारी सुरू झाली. ज्या कोळ्यांचे जाळे नष्ट झाले होते, ते शशिभूषणांच्याच परगण्यातले, एकाच जमीनदाराच्या अमलाखालचे. संकटाच्या वेळी कधीकधी ते शशीकडे कायद्याचा सल्ला घ्यायलाही येत. ज्यांना साहेबांनी बोटीत पकडून आणले होते, तेही शशिभूषणांच्या ओळखीचे होते. शशींनी त्यांना साक्षीदार म्हणून उभे करण्यासाठी बोलावून घेतले. ते भीतीने अस्वस्थ झाले. बायकापोरे, कुटुंबकबिला घेऊन ज्यांना संसाराचा गाडा ओढायचा आहे, ते पोलिसांशी वैर घेऊन कुठे जाऊन सुटका करून घेणार? कुणाच्या अंगात एकापेक्षा जास्त जीव आहेत? जे नुकसान व्हायचे ते तर झालेच; आता पुन्हा साक्षीचे समन्स हाती देऊन ही कुठली आफत? सगळे म्हणाले, 'महाराज, तुम्ही तर आम्हाला भलत्याच पेचात टाकलं!' पुष्कळ समजावल्यावर ते खरे सांगायला कबूल झाले. दरम्यान, हरकुमार ज्या दिवशी बेंचच्या कामानिमित्त जिल्ह्याच्या साहेबांना सलाम करायला गेले, त्या दिवशी पोलीस साहेब हसून म्हणाले, 'नायबबाबू, ऐकतो आहे की तुमची कुळे पोलिसांविरुद्ध खोटी साक्ष द्यायला तयार झाली आहेत.' नायब दचकून म्हणाले, 'आँ! असे कधी संभवते का? अपवित्र पशूच्या पोटी जन्मलेल्या पुत्रांच्या अस्थींत एवढे सामर्थ्य!' वृत्तपत्रांच्या वाचकांना ठाऊक आहेच की, खटल्यात शशिभूषणांची बाजू काही केल्या टिकू शकली नाही.
ऊन आणि ढग
कोळ्यांनी एकेक करून येऊन सांगितले की, पोलीस साहेबांनी त्यांचे जाळे कापलेच नाही; बोटीत बोलावून ते त्यांची नावे-गावे लिहून घेत होते. एवढेच नव्हे, तर शशिभूषणांच्या गावच्या चारेक ओळखीच्या माणसांनी साक्ष दिली की, ते त्या वेळी एका लग्नाच्या वऱ्हाडानिमित्त घटनास्थळी हजर होते. शशिभूषणांनी विनाकारण पुढे होऊन पोलिसांच्या पहारेकऱ्यांवर हल्ला केला, हे त्यांनी डोळ्यांनी पाहिले. शशिभूषणांनी कबूल केले की, शिवी ऐकून त्यांनी बोटीत शिरून साहेबांना मारले. पण जाळे कापणे आणि कोळ्यांवरचा अत्याचार हेच त्याचे मूळ कारण. अशा परिस्थितीत ज्या निकालात शशिभूषणांना शिक्षा झाली, त्याला अन्याय्य म्हणता येणार नाही. मात्र शिक्षा जरा जबरच झाली. तीनचार आरोप — मारहाण, अनधिकार प्रवेश, पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा वगैरे — ते सगळेच्या सगळे त्यांच्याविरुद्ध पुरेपूर सिद्ध झाले. शशिभूषण आपल्या त्या छोट्या घरात आपले आवडते ग्रंथ सोडून पाच वर्षांची कैद भोगायला गेले. त्यांचे वडील अपील करायला निघाले तेव्हा शशिभूषणांनी पुनःपुन्हा मना केले; ते म्हणाले, 'तुरुंग बरा. लोखंडाच्या बेड्या खोटं बोलत नाहीत; पण तुरुंगाबाहेर जे स्वातंत्र्य आहे, ते आपल्याला फसवून संकटात टाकतं. आणि सत्संगाचं म्हणाल, तर तुरुंगात खोटारडे, कृतघ्न, भेकड लोक थोडेच असतात, कारण जागा मर्यादित — बाहेर पुष्कळ जास्त.' १० शशिभूषण तुरुंगात गेल्यानंतर थोड्याच काळात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे आणखी वडीलधारे असे कुणी नव्हते. एक भाऊ फार पूर्वीपासून मध्य प्रांतात नोकरी करीत होते; त्यांचे गावी येणे फारसे होत नसे; तिथेच त्यांनी घर बांधले होते आणि ते कुटुंबासह कायमचे स्थायिक झाले होते. गावी जी काही इस्टेट होती, तिच्यातला बहुतेक भाग नायब हरकुमारांनी नाना युक्त्या करून गिळंकृत केला.
ऊन आणि ढग
तुरुंगात बहुतेक कैद्यांना जितके दुःख भोगावे लागते, त्याहून कितीतरी अधिक दुर्दैवाने शशिभूषणांना सोसावे लागले. तरीही प्रदीर्घ पाच वर्षे उलटली. पुन्हा एकदा पावसाळ्यातल्या एका दिवशी जर्जर शरीर आणि रिकामे हृदय घेऊन शशिभूषण तुरुंगाच्या भिंतीबाहेर येऊन उभे राहिले. स्वातंत्र्य मिळाले, पण त्याखेरीज तुरुंगाबाहेर त्यांचे दुसरे कुणी किंवा दुसरे काही नव्हते. घर नाही, आप्त नाहीत, समाज नाही — केवळ एकट्या त्यांच्यासाठी एवढे मोठे जग अगदी ढिले, सैल वाटू लागले. जीवनाचा तुटलेला धागा पुन्हा कुठून सुरू करायचा, याचा ते विचार करीत होते, इतक्यात दोन घोड्यांची एक मोठी बग्गी त्यांच्यासमोर येऊन थांबली. एक नोकर उतरून आला आणि त्याने विचारले, 'आपले नाव शशिभूषणबाबू?' ते म्हणाले, 'होय.' त्याने तत्काळ गाडीचा दरवाजा उघडला आणि ते आत बसण्याची वाट पाहत उभा राहिला. त्यांनी आश्चर्याने विचारले, 'मला कुठे जायचे आहे?' तो म्हणाला, 'माझ्या धन्यांनी आपल्याला बोलावले आहे.' वाटसरूंच्या कुतूहलाच्या नजरा असह्य वाटल्याने ते तिथे आणखी वादविवाद न करता गाडीत चढून बसले. त्यांना वाटले, यात नक्कीच काहीतरी चूक आहे. पण कुठल्या ना कुठल्या दिशेने तर जायलाच हवे — मग अशा एका चुकीनेच या नव्या जीवनाची प्रस्तावना होऊ दे. त्या दिवशीही ढग आणि ऊन सबंध आकाशभर एकमेकांची शिकार करीत फिरत होते; रस्त्याच्या कडेची पावसाच्या पाण्याने भरलेली, गडद हिरवी शेते चंचल ऊन-सावलीने चित्रविचित्र होत होती. बाजाराजवळ एक मोठा रथ उभा होता, आणि त्याच्याजवळच्या वाण्याच्या दुकानापाशी वैष्णव भिक्षेकऱ्यांचा एक मेळा एकतारी, मृदंग आणि टाळांच्या साथीने गाणे गात होता — ये, ये, परतुनी ये — नाथा, परतुनी ये! माझ्या भुकेल्या, तहानल्या, तापल्या चित्ती सख्या रे, परतुनी ये!
ऊन आणि ढग
गाडी पुढे निघाली; गाण्याचे बोल हळूहळू दुरून, अधिक दुरून कानावर येत राहिले — अरे निष्ठुरा, परतुनी ये रे! माझ्या करुण कोमला, ये! अरे सजल-जलद-स्निग्ध-कांत सुंदरा, परतुनी ये! गाण्याचे शब्द हळूहळू क्षीण, अस्फुट होत गेले, मग कळेनासे झाले. पण गाण्याच्या छंदाने शशिभूषणांच्या हृदयात एक आंदोलन उठवले; ते आपल्याशीच गुणगुणत, कडव्यामागून कडवे रचून जोडत चालले, जणू काही केल्या थांबू शकत नव्हते — माझ्या नित्य-सुखा, परतुनी ये! माझ्या चिर-दुःखा, परतुनी ये! माझ्या सुखदुःख-मंथन-धना, अंतरी परतुनी ये! माझ्या चिर-वांछिता, ये! माझ्या चिर-संचिता, ये! अरे चंचला, हे चिरंतना, भुज-बंधनी परतुनी ये! माझ्या वक्षी परतुनी ये, माझ्या नयनी परतुनी ये, माझ्या शयनी, स्वप्नी, वसनी, भूषणी, अखिल भुवनी ये! माझ्या मुखीच्या हास्यात ये रे, माझ्या डोळ्यांच्या पाण्यात ये! माझ्या लाडात, माझ्या बहाण्यात, माझ्या रुसव्यात परतुनी ये! माझ्या सर्व स्मरणी ये, माझ्या सर्व भ्रमी ये — माझ्या धर्मी कर्मी, प्रीती लाजी, जन्मी मरणी ये! गाडी एका तटबंदीने वेढलेल्या बागेत शिरून एका दुमजली वाड्यासमोर थांबली, तेव्हा शशिभूषणांचे गाणे थांबले. कोणताही प्रश्न न विचारता ते नोकराने दाखवलेल्या वाटेने घरात शिरले. ज्या खोलीत येऊन ते बसले, तिच्या चारी बाजूंना काचेच्या मोठमोठ्या कपाटांत चित्रविचित्र रंगांच्या, चित्रविचित्र बांधणीच्या पुस्तकांच्या रांगा मांडलेल्या होत्या. ते दृश्य पाहताच त्यांचे जुने जीवन दुसऱ्यांदा कैदेतून मुक्त होऊन बाहेर आले. सोनेरी अक्षरांनी अंकित, नाना रंगांनी रंगवलेली ही पुस्तके त्यांना आनंदलोकात प्रवेश करण्याच्या, चांगल्या परिचयाच्या, रत्नजडित सिंहद्वारासारखी भासली.
ऊन आणि ढग
टेबलावरही काहीतरी ठेवलेले होते. शशिभूषणांनी आपल्या अधू दृष्टीने वाकून पाहिले — एक फुटकी पाटी, तिच्यावर काही जुन्या वह्या, एक फाटत आलेले पाढ्यांचे पुस्तक, कथामाला, आणि काशीरामदासाचे एक महाभारत. पाटीच्या लाकडी चौकटीवर शशिभूषणांच्या हस्ताक्षरात शाईने खूप ठळक लिहिलेले होते — गिरिबाला देवी. वह्या आणि पुस्तकांवरही त्याच हस्ताक्षरात तेच नाव लिहिलेले होते. आपण कुठे आलो आहोत, ते शशिभूषणांच्या लक्षात आले. त्यांच्या छातीत रक्ताच्या लाटा उसळू लागल्या. उघड्या खिडकीतून त्यांनी बाहेर पाहिले — तिथे काय दिसले? ती छोटी गजांची खोली, तो उंचसखल गावरस्ता, रेघांची साडी नेसलेली ती छोटी मुलगी. आणि आपले ते शांत, निश्चिंत, एकांतातले जीवन. त्या दिवसांचे ते सुखाचे जीवन काही असामान्य किंवा अतिरिक्त नव्हते; दिवसामागून दिवस लहान लहान कामांत, लहान लहान सुखांत नकळत निघून जात, आणि त्यांच्या स्वतःच्या अध्ययनात एका लहान विद्यार्थिनीला शिकवणे ही एक क्षुल्लक घटनाच गणली जाई; पण गावाच्या कडेचा तो निर्जन दिनक्रम, ती छोटीशी शांती, ते छोटेसे सुख, त्या छोट्याशा मुलीचा तो छोटासा चेहरा — सगळे जणू स्वर्गासारखे देशकालाच्या पलीकडचे, हाती न येणारे होऊन केवळ आकांक्षेच्या राज्यातल्या कल्पनेच्या छायेत विराजू लागले. त्या दिवसांची ती सगळी चित्रे आणि आठवणी आजच्या या पावसाळी सकाळच्या प्रकाशाशी आणि मनात हळुवार गुंजणाऱ्या त्या कीर्तनाच्या गाण्याशी गुंफून, मिसळून एक प्रकारचे संगीतमय, तेजोमय, अपूर्व रूप धारण करू लागली.
ऊन आणि ढग
जंगलाने वेढलेल्या, चिखलाने माखलेल्या, अरुंद गावरस्त्यावरची त्या उपेक्षित, दुखावलेल्या मुलीच्या रुसव्याने कोमेजलेल्या चेहऱ्याची ती शेवटची आठवण जणू विधात्याने रचलेल्या एखाद्या असाधारण, आश्चर्यकारक, अपूर्व, अतिशय खोल, अतिशय वेदनेने भरलेल्या स्वर्गीय चित्रासारखी त्यांच्या मनःपटलावर उमटून आली. तिच्याबरोबर कीर्तनाचा करुण सूर वाजू लागला, आणि वाटले, जणू त्या खेड्यातल्या मुलीच्या चेहऱ्यावर साऱ्या विश्वहृदयाच्या एका अनिर्वचनीय दुःखाने आपली छाया टाकली आहे. शशिभूषणांनी दोन्ही बाहूंत तोंड लपवले आणि त्या टेबलावर, त्या पाटी-पुस्तक-वह्यांवर डोके टेकून, कितीतरी काळाने, कितीतरी दिवसांचे स्वप्न पाहू लागले. बऱ्याच वेळाने हलक्याशा आवाजाने दचकून त्यांनी मान वर करून पाहिले. त्यांच्यासमोर चांदीच्या ताटात फळे, मेवा, मिठाई ठेवून गिरिबाला थोड्या अंतरावर उभी राहून मुकाट्याने वाट पाहत होती. त्यांनी मान वर करताच, अलंकारविरहित, शुभ्र वस्त्रातल्या, विधवेच्या वेषातल्या गिरिबालेने गुडघे टेकून, जमिनीवर डोके टेकवून त्यांना नमस्कार केला. विधवा उठून उभी राहिली आणि तिने कृश चेहऱ्याच्या, निस्तेज, खचलेल्या शरीराच्या शशिभूषणांकडे करुण, स्निग्ध डोळ्यांनी पाहिले, तेव्हा तिचे दोन्ही डोळे झरू लागले आणि दोन्ही गालांवरून आसवे ओघळू लागली. शशिभूषणांनी तिला खुशाली विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना शब्द सापडले नाहीत; दाटून आलेल्या आसवांच्या उमाळ्याने त्यांच्या वाणीचा मार्ग बळेच रोखून धरला; शब्द आणि आसवे दोन्ही असहायपणे हृदयाच्या तोंडाशी, कंठाच्या दाराशी अडकून राहिली. तो कीर्तनाचा मेळा भिक्षा गोळा करीत करीत वाड्यासमोर येऊन उभा राहिला आणि पुनःपुन्हा आळवीत गाऊ लागला — ये, ये रे!