रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
वाहून आलेला
संध्याकाळ होता होता वादळ जोर धरू लागले. पावसाचे सपकारे, ढगांचा गडगडाट आणि विजेचा लखलखाट यांनी आकाशात जणू सुरासुरांचे युद्धच पेटले. काळे काळे ढग महाप्रलयाच्या विजयपताकांसारखे दाही दिशांना उडू लागले; गंगेच्या ऐलतीरी-पैलतीरी बंडखोर लाटांनी खळखळाट करीत नाच मांडला; आणि बागेतली मोठमोठी झाडे आपल्या साऱ्या फांद्या झटापटत, हायहाय करीत उजवीकडे-डावीकडे लोळण घेऊ लागली. त्या वेळी चंदननगरच्या बागबंगल्यात, दिव्याच्या उजेडातल्या एका बंद खोलीत, पलंगासमोर खाली घातलेल्या बिछान्यावर बसून नवरा-बायकोचे बोलणे चालले होते. शरत्बाबू म्हणत होते, 'आणखी काही दिवस राहिलो की तुझी प्रकृती पूर्ण सुधारेल; मग आपण गावी परत जाऊ.' किरणमयी म्हणत होत्या, 'माझी प्रकृती पूर्ण सुधारली आहे; आता गावी परत गेलो तरी काही बिघडणार नाही.' कोणत्याही विवाहित माणसाला हे सहज कळेल की, हे बोलणे मी जितक्या थोडक्यात इथे नोंदवले तितक्या थोडक्यात ते संपले नाही. विषय काही फार अवघड नव्हता, तरीही वादविवाद निकालाच्या दिशेने पुढे सरकत नव्हता; सुकाणू नसलेल्या नावेसारखा तो एकाच जागी गरगर फिरत होता; आणि शेवटी अश्रूंच्या लाटांत बुडण्याची चिन्हे दिसू लागली. शरत्बाबू म्हणाले, 'डॉक्टर म्हणतोय, आणखी काही दिवस राहून गेलो तर बरं.' किरण म्हणाल्या, 'तुमच्या डॉक्टरला ना, सगळंच कळतं!' शरत्बाबू म्हणाले, 'तुला माहीत आहेच, या दिवसांत आपल्याकडे नाना तऱ्हेच्या रोगांची साथ असते; तेव्हा आणखी दोनेक महिने काढून गेलो तर बरं.' किरण म्हणाल्या, 'म्हणजे इथे आता कुठे कुणाला कसलाच आजार होत नाही, होय ना!'
वाहून आलेला
याचा पूर्वेतिहास असा. किरणवर घरातले, आळीतले सगळेच प्रेम करतात — इतकेच काय, सासूसुद्धा. त्या किरणला जेव्हा कठीण आजार झाला तेव्हा सगळेच काळजीत पडले, आणि डॉक्टरने हवापालट सुचवला तेव्हा घरदार आणि कामधंदा सोडून परमुलखात जायला तिच्या नवऱ्याने आणि सासूने काहीच हरकत घेतली नाही. गावातल्या साऱ्या विचारी, जाणत्या मंडळींनी मात्र असा निकाल दिला की, हवापालटाने आजार बरा होईल अशी आशा धरणे आणि बायकोसाठी एवढा गदारोळ माजवणे हा बायकोच्या आहारी जाण्याचा निर्लज्ज अतिरेक आहे; आणि त्यांनी प्रश्न केले — याआधी कुणाच्या बायकोला कधी कठीण आजार झालाच नाही का? शरत्बाबूंनी जिथे जायचे ठरवले आहे तिथली माणसे अमर आहेत का? आणि नशिबाचा लेख जिथे खरा ठरत नाही असा एखादा देश आहे का? — तरीही शरत्बाबूंनी आणि त्यांच्या आईने त्या बोलण्याकडे कान दिला नाही; त्या वेळी गावाच्या साऱ्या एकवटलेल्या शहाणपणापेक्षा त्यांच्या घरची लक्ष्मी असलेल्या किरणचा इवलासा जीव त्यांना अधिक मोलाचा वाटला. प्रिय माणूस संकटात सापडला की माणूस असा वेडावतोच. शरत्बाबू चंदननगरच्या बागेत येऊन राहिले आहेत, आणि किरणही आजारातून उठल्या आहेत; फक्त अंगात अजून पुरती ताकद आलेली नाही. त्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यांत एक करुण कृशता रेखलेली आहे; ती पाहिली की काळजाचा ठोका चुकतो आणि मनात येते — अरेरे, थोडक्यात वाचली! पण किरणचा स्वभाव माणसांत रमणारा, हौसमौजेचा. इथे एकटीला आता करमत नव्हते; घरचे काम नाही, आळीतल्या मैत्रिणी नाहीत; दिवसभर नुसते आपले आजारी शरीर घेऊन बसायला मन होत नाही. तासातासाला मापाने औषध घ्या, शेक घ्या, पथ्य पाळा — याचा त्यांना कंटाळा आला होता; आणि त्या वादळी संध्याकाळी बंद खोलीत नवरा-बायकोत याच गोष्टीवरून वाद रंगला होता.
वाहून आलेला
किरण उत्तरे देत होत्या तोवर दोन्ही बाजूंनी बरोबरीची लढाई चालली होती; पण शेवटी जेव्हा किरण निरुत्तर होऊन, एकही शब्द न बोलता, शरत्बाबूंकडून किंचित तोंड फिरवून मान वळवून बसल्या, तेव्हा त्या दुबळ्या, निरुपाय पुरुषापाशी एकही अस्त्र उरले नाही. तो हार पत्करण्याच्या बेतात असतानाच बाहेरून गड्याने मोठ्याने काहीतरी वर्दी दिली. शरत्बाबूंनी उठून दार उघडले आणि ऐकले की, एक नाव बुडाली असून एक ब्राह्मणाचा मुलगा पोहत पोहत त्यांच्या बागेत येऊन लागला आहे. ते ऐकताच किरणचा रुसवा-फुगवा कुठल्या कुठे पळाला; त्यांनी लगेच दांडीवरून कोरडे कपडे काढून दिले, आणि भराभर वाटीभर दूध गरम करून त्या ब्राह्मणाच्या मुलाला आतल्या दालनात बोलावून घेतले. मुलाचे केस लांब, डोळे मोठे मोठे; मिसरूडाची रेघसुद्धा अजून फुटली नव्हती. किरणने स्वतः जवळ बसून त्याला जेवू घातले आणि त्याची चौकशी केली. कळले की तो जात्रेच्या — गावोगाव पौराणिक खेळ करणाऱ्या — फडातला पोरगा आहे; नाव नीलकांत. जवळच्या सिंहबाबूंच्या वाड्यावर खेळ करायला त्यांच्या फडाला बोलावणे आले होते; मध्येच नाव बुडाली, आणि फडातल्या लोकांचे काय झाले कोण जाणे; याला चांगले पोहता येत होते, म्हणून कसाबसा जीव वाचवला. मुलगा इथेच राहिला. थोडक्यात तो मेला असता, या विचाराने किरणच्या मनात त्याच्याविषयी फार दया दाटून आली. शरत्बाबू मनात म्हणाले, 'बरे झाले; किरणच्या हाती एक नवे काम आले, आता काही काळ असाच निघून जाईल.' ब्राह्मणाच्या मुलाचे भले केल्याने पुण्याची गाठोडी जमेल या आशेने सासूबाईही प्रसन्न झाल्या. आणि फडमालक अधिकारीमहाशय आणि यमराज यांच्या हातांतून अचानक या श्रीमंत घराण्याच्या हाती बदली झाल्याने नीलकांतालाही विशेष आराम वाटू लागला.
वाहून आलेला
पण लवकरच शरत्बाबूंचे आणि त्यांच्या आईचे मत बदलू लागले. त्यांना वाटले, आता याची काही गरज उरली नाही; आता या पोराला एकदाचे रवाना करता आले की ब्याद टळेल. नीलकांत चोरून शरत्बाबूंच्या गुडगुडीतून फडफड आवाज करीत तंबाखू ओढू लागला. पावसाच्या दिवसांत बिनदिक्कतपणे त्यांची हौसेची रेशमी छत्री डोक्यावर धरून नवे मित्र जमवण्याच्या खटपटीत गावभर भटकू लागला. कुठलेसे एक मळकट गावठी कुत्रे त्याने लाड करकरून इतके शेफारून ठेवले की, ते बिनबोलावता शरत्बाबूंच्या सजवलेल्या खोलीत शिरून स्वच्छ जाजमावर आपल्या चार पदपल्लवांच्या धुळीच्या ठशांनी आपल्या शुभागमनाची वार्ता कायमची छापून जाऊ लागले. पाहता पाहता नीलकांताभोवती बाल-भक्तांचा एक भलामोठा संप्रदाय उभा राहिला, आणि त्या वर्षी गावच्या आमराईतल्या कैऱ्यांना पिकायला उसंतच मिळाली नाही. किरण या मुलाचे फारच लाड करीत, यात शंका नाही. शरत्बाबू आणि त्यांची आई त्यांना त्याबद्दल पुष्कळदा अडवीत, पण त्या ऐकत नसत. शरत्बाबूंचे जुने सदरे-मोजे आणि नवे धोतर, उपरणे, जोडे घालून त्यांनी त्याला अगदी बाबू बनवून टाकले. मधूनमधून केव्हाही त्याला बोलावून घेतले की त्यांची माया आणि त्यांची गंमत, दोन्ही हौस फिटे. किरण हसतमुखाने पानाचा डबा शेजारी ठेवून पलंगावर बसत, दासी त्यांचे ओले मोकळे केस विंचरून विंचरून, घासून घासून वाळवीत असे, आणि नीलकांत खाली उभा राहून हातवारे करीत नलदमयंतीचा खेळ करून दाखवी — अशा रीतीने लांबलचक दुपार भराभर सरून जाई. किरण शरत्बाबूंनाही आपल्याबरोबर एका आसनावर प्रेक्षकांत बसवण्याचा प्रयत्न करीत, पण शरत्बाबू फार वैतागत, आणि शरत्बाबूंसमोर नीलकांताची प्रतिभाही पुरती खुलत नसे. सासूबाई एखाद्या दिवशी देवादिकांची नावे कानी पडतील या आशेने ओढल्या जाऊन येत; पण लगेच त्यांची जन्माची सवय झालेली दुपारची डुलकी भक्तीवर मात करी आणि त्यांना अंथरुणावर आडवे करी.
वाहून आलेला
शरत्बाबूंकडून कानपिळी, थप्पड, धपाटा नीलकांताच्या नशिबी नेहमीच येई; पण याहून कितीतरी कडक शिस्तीची जन्मापासून सवय असल्याने त्याला त्यात अपमान वा दुःख वाटत नसे. नीलकांताची पक्की समजूत होती की, पृथ्वी जशी जल आणि स्थल यांत विभागलेली आहे, तसा मनुष्यजन्म आहार आणि प्रहार यांत विभागलेला आहे; आणि त्यात प्रहाराचा भागच मोठा. नीलकांताचे नेमके वय किती हे ठरवून सांगणे कठीण. तो चौदा-पंधराचा असेल, तर वयाच्या मानाने त्याचा चेहरा बराच पिकला आहे असे म्हणावे लागेल; सतरा-अठराचा असेल, तर वयाच्या मानाने तो पुरेसा पिकलेला नाही. एक तर तो अकाली पिकला, नाही तर अकाली कच्चा राहिला. खरी गोष्ट अशी की, तो अगदी लहान वयातच जात्रेच्या फडात शिरला आणि राधा, दमयंती, सीता आणि विद्यासुंदरातल्या विद्येची सखी यांची सोंगे घेऊ लागला. अधिकाऱ्याच्या गरजेनुसार, विधात्याच्या वराने तो थोड्याच उंचीपर्यंत वाढला आणि त्याची वाढ थांबली. सगळे त्याला लहानच समजत, तोही स्वतःला लहानच समजे; वयाला साजेसा मान त्याला कुणाकडून मिळत नसे. या सगळ्या स्वाभाविक आणि अस्वाभाविक कारणांमुळे सतरा वर्षांचा असताना तो कमी पिकलेल्या सतरा वर्षांच्या पोरापेक्षा अति पिकलेल्या चौदा वर्षांच्या पोरासारखा दिसे. मिसरूड न फुटल्यामुळे हा भ्रम अधिकच पक्का झाला होता. तंबाखूच्या धुराने म्हणा, की वयाला न शोभणारी भाषा वापरल्याने म्हणा, नीलकांताच्या ओठांभोवतीचा भाग जरा जास्तच पिकलेला वाटे; पण त्याच्या मोठ्या बाहुल्यांच्या दोन डोळ्यांत एक निर्मळपणा आणि कोवळेपणा होता. मला वाटते, नीलकांत आतून स्वभावतः कच्चाच होता, पण जात्रेच्या आचेने वरवर पिकल्याची लक्षणे दिसू लागली होती.
वाहून आलेला
शरत्बाबूंच्या आश्रयाने चंदननगरच्या बागेत राहत असताना नीलकांतावर निसर्गाचा नियम बिनबोभाट आपले काम करू लागला. वयाच्या ज्या संधिरेषेवर तो इतके दिवस अस्वाभाविकपणे थबकून राहिला होता, ती इथे आल्यावर केव्हातरी, कुणाला चाहूलही लागू न देता, त्याने ओलांडली. त्याची सतरा-अठरा वर्षांची उमर आता पुरती भरून आली. त्याच्यातला तो बदल बाहेरून कुणाच्या डोळ्यांत भरला नाही; पण त्याचे पहिले लक्षण असे की, किरण जेव्हा नीलकांताशी लहान पोराशी वागावे तसे वागत, तेव्हा तो मनातल्या मनात लाजे आणि दुखावे. एकदा हौशी किरणने त्याला बायकी वेश घालून सखीचे सोंग घ्यायला सांगितले होते; ती गोष्ट त्याला अचानक फार लागली, पण त्याचे नीटसे कारण त्याला सापडले नाही. हल्ली त्याला जात्रेची नक्कल करून दाखवायला बोलावले की तो गायब होई. आपण एका करंट्या जात्रेच्या फडातल्या पोराहून अधिक काही नाही, ही गोष्ट त्याच्या मनाला काही केल्या सहन होत नसे.
वाहून आलेला
इतकेच काय, त्याने घरच्या कारकुनाकडून थोडे थोडे लिहा-वाचायला शिकायचा संकल्प केला. पण वहिनीसाहेबांचा लाडका म्हणून कारकुनाला नीलकांत डोळ्यांसमोर नको असे — आणि मन एकाग्र ठेवून अभ्यास करायची त्याला कधीच सवय नसल्याने अक्षरे त्याच्या डोळ्यांसमोरून तरंगत निघून जात. गंगेच्या काठी चाफ्याखाली झाडाच्या बुंध्याला टेकून, मांडीवर पुस्तक उघडून तो बराच वेळ बसून राही; पाणी खळखळ करी, नावा वाहत जात, फांदीवर एखादा चंचल, आपल्याच नादातला पक्षी चिवचिवत स्वगत बोले, आणि पुस्तकाच्या पानावर डोळे ठेवून नीलकांत काय विचार करी ते त्याचे त्यालाच ठाऊक — किंवा त्यालाही ठाऊक नसे. एका शब्दावरून पुढच्या शब्दापर्यंत तो काही केल्या पोचू शकत नसे; तरीही आपण पुस्तक वाचतो आहोत या कल्पनेने त्याला स्वतःचा फार मोठा अभिमान वाटे. समोरून एखादी नाव जाऊ लागली की तो आणखीच थाटाने पुस्तक उचलून घेऊन पुटपुटत वाचण्याचे सोंग करी; प्रेक्षक निघून गेला की वाचनातला त्याचा उत्साह टिकत नसे. पूर्वी सरावाची गाणी तो यंत्रासारखा ठरल्याप्रमाणे म्हणून मोकळा होई; आता त्याच गाण्यांचे सूर त्याच्या मनात एक अपूर्व हुरहुर जागवीत. गाण्याचे शब्द अगदी सामान्य, क्षुल्लक अनुप्रासांनी भरलेले; त्यांचा अर्थ नीलकांताला नीटसा कळतही नसे; पण जेव्हा तो गाई — अरे राजहंसा, जन्मुनी द्विजवंशी, असा नृशंस का रे झालास— सांग कशासाठी, या घोर अरण्यी, राजकन्येचा जीव संकटी घातलास—
वाहून आलेला
तेव्हा तो जणू अचानक दुसऱ्या लोकी, दुसऱ्या जन्मी जाऊन पोचे — तेव्हा भोवतालचे सवयीचे जग आणि त्याचे क्षुल्लक जीवन गाण्यात अनुवादित होऊन एक नवेच रूप धारण करी. राजहंस आणि राजकन्येच्या कथेतून त्याच्या मनात एका अपूर्व चित्राची चाहूल जागी होई; तो स्वतःला कोण समजे हे स्पष्ट सांगता येणार नाही, पण आपण जात्रेच्या फडातले आईबापाविना पोर आहोत हे तो विसरून जाई. अगदी कफल्लक घरातले अभागी, मळकट मूल संध्याकाळी अंथरुणात पडून राजपुत्र, राजकन्या आणि सात राजांच्या धनाचा माणिक यांची गोष्ट ऐकते, तेव्हा मंद दिव्याच्या उजेडातल्या त्या मोडक्या घराच्या कोपऱ्यातल्या अंधारात त्याचे मन साऱ्या दारिद्र्याच्या आणि हीनतेच्या बंधनांतून मुक्त होऊन, जिथे सारे काही शक्य असते अशा परीकथेच्या राज्यात एक नवे रूप, एक झगमगता वेश आणि अप्रतिहत सामर्थ्य धारण करते; तसाच गाण्याच्या सुरांत हा जात्रेच्या फडातला पोर स्वतःला आणि स्वतःच्या जगाला एका नव्याच आकारात घडवीत असे; पाण्याचा नाद, पानांची सळसळ, पक्ष्यांची हाक, आणि लक्ष्मीने पाठ फिरवलेल्या या पोराला ज्या लक्ष्मीने आश्रय दिला होता त्यांचा हसरा, मायाळू चेहरा, त्यांचे मंगल कंकणांनी वेढलेले दोन बाहू आणि दुर्लभ, सुंदर, फुलांच्या पाकळ्यांसारखे कोमल, लालस दोन चरण — हे सारे कोणत्यातरी जादूच्या मंत्राने रागिणीत रूपांतरित होऊन जात. मग पुन्हा केव्हातरी हे गीत-मृगजळ कुठेतरी विरून जाई; झिपऱ्या केसांचा जात्रेच्या फडातला नीलकांत प्रकट होई; आमराईच्या राखणदार शेजाऱ्याच्या तक्रारीवरून शरत्बाबू येऊन त्याच्या गालावर फाडफाड थप्पड लगावीत; आणि पोरांच्या भक्तमंडळाचा नायक होऊन नीलकांत जमिनीवर, पाण्यात आणि झाडांच्या शेंड्यांवर नवनवे उपद्व्याप करायला बाहेर पडे.
वाहून आलेला
इतक्यात शरत्बाबूंचा भाऊ सतीश कलकत्त्याच्या कॉलेजला सुट्टी लागली म्हणून बागेत राहायला आला. किरणला फार आनंद झाला; त्यांच्या हाती आणखी एक काम आले. बसताना, जेवताना, कपड्यांत — त्या आपल्या समवयस्क दिराभोवती थट्टेचे जाळे पसरू लागल्या. कधी हाताला शेंदूर फासून त्याचे डोळे दाबून धरीत, कधी त्याच्या सदऱ्याच्या पाठीवर माकड असे लिहून ठेवीत, कधी बाहेरून धाडकन दार लावून घेऊन सुरेल, खळखळून हसत पळून जात. सतीशही काही हार जाणारा नव्हता; तो त्यांच्या किल्ल्या चोरून, त्यांच्या विड्यात मिरची भरून, नकळत पलंगाच्या खुराला त्यांचा पदर बांधून सूड उगवीत असे. अशा रीतीने दोघांचे दिवसभर दटावणे, पाठलाग, हसणे — इतकेच नव्हे तर मधूनमधून भांडण, रडणे, मनधरणी आणि पुन्हा सलोखा — चालू राहिले. नीलकांताला कोणते भूत लागले कोण जाणे! कोणत्या निमित्ताने कोणाशी भांडावे हे त्याला सुचेना, आणि तरीही त्याचे मन तीव्र कडवटपणाने भरून गेले. तो आपल्या भक्त पोरांना विनाकारण रडवू लागला; त्यात त्या पाळलेल्या देशी कुत्र्याला विनाकारण लाथ मारून त्याच्या केंई केंई ओरडण्याने आभाळ दणाणून सोडू लागला; इतकेच काय, रस्त्याने फिरताना छडीचे जोरजोराने फटके मारत रानटी झुडपांच्या फांद्या छाटीत चालू लागला. जे चांगले जेवू शकतात त्यांना समोर बसवून जेवू घालणे किरणला फार आवडे. चांगले जेवण्याची क्षमता नीलकांतापाशी होती; चविष्ट पदार्थ पुन्हा पुन्हा घेण्याचा आग्रह त्याच्यापाशी कधी वाया जात नसे. म्हणून किरण त्याला वारंवार बोलावून स्वतः जवळ बसून जेवू घालत, आणि या ब्राह्मणाच्या मुलाचे तृप्त होऊन जेवणे पाहून त्यांना विशेष सुख वाटे. सतीश आल्यापासून सवड नसल्यामुळे नीलकांताच्या जेवणाच्या वेळी किरणला बरेचदा हजर राहता येत नसे.
वाहून आलेला
पूर्वी असे झाले तरी त्याच्या जेवणात काहीच व्यत्यय येत नसे; शेवटी दुधाची वाटी विसळून ते पाणीसुद्धा पिऊन मगच तो उठे. पण हल्ली किरणने स्वतः बोलावून जेवू घातले नाही तर त्याचे काळीज दुखू लागे, तोंड बेचव होई; न जेवताच तो उठून जाई आणि दाटल्या गळ्याने दासीला सांगून जाई, 'मला भूक नाही.' मनात म्हणे, आता ही बातमी कळताच किरण पश्चात्तापाने त्याला लगेच बोलावणे पाठवतील, आणि जेवण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करतील; तरीही तो काही केल्या तो आग्रह मानणार नाही, म्हणेल, 'मला भूक नाही.' पण किरणला कुणी बातमीही देत नाही, किरण त्याला बोलावणेही पाठवीत नाहीत; उरलेले अन्न दासी खाऊन टाकते. तेव्हा तो आपल्या झोपायच्या खोलीतला दिवा विझवून अंधाऱ्या अंथरुणावर पडून, हुंदके देत, फुंदत फुंदत, तोंडावर उशी गच्च दाबून रडत राहतो; पण त्याची फिर्याद काय, त्याचा हक्क कुणावर, कोण त्याचे सांत्वन करायला येणार! कुणीच येत नाही तेव्हा विश्वाची मायाळू दाई, झोप, येऊन हळूहळू आपल्या कोमल हाताच्या स्पर्शाने त्या आईविना, दुखावलेल्या पोराचा रुसवा शांत करते. नीलकांताची पक्की समजूत झाली की सतीश किरणकडे सदा त्याच्याविरुद्ध चहाड्या करतो; ज्या दिवशी किरण काही कारणाने गंभीर असत, त्या दिवशी नीलकांताला वाटे, सतीशच्या कारस्थानामुळे किरण त्याच्यावरच रागावून बसल्या आहेत. आता नीलकांत एकचित्ताने, तीव्र तळमळीने सदा देवापाशी प्रार्थना करी, पुढच्या जन्मी मी सतीश होवो, आणि सतीश मी होवो. ब्राह्मणाचा मनापासूनचा शाप कधी वाया जात नाही हे त्याला ठाऊक होते; म्हणून मनातल्या मनात सतीशला ब्रह्मतेजाने जाळायला जाऊन तो स्वतःच जळत राही, आणि वरच्या मजल्यावरून सतीश आणि त्याच्या वहिनीसाहेबांच्या थट्टामस्करीचा, खळखळून हसण्यात मिसळलेला कलकलाट त्याच्या कानी येत राही.
वाहून आलेला
नीलकांताची उघडपणे सतीशशी कसलेही वैर करण्याची छाती नव्हती; पण संधी मिळेल तशी त्याची लहानसहान गैरसोय करून तो समाधान मिळवी. घाटाच्या पायरीवर साबण ठेवून सतीश गंगेत उतरून डुबक्या मारू लागला की नीलकांत चटकन येऊन साबण पळवी — सतीश यथावकाश साबण शोधायला येई तो साबण गायब. एकदा आंघोळ करता करता त्याने अचानक पाहिले की त्याचा खास हौसेचा चिकनकारीचा सदरा गंगेच्या पाण्यात वाहत चालला आहे; त्याला वाटले वाऱ्याने उडून गेला असेल; पण तो वारा कोणत्या दिशेने वाहिला ते कुणालाच ठाऊक नाही. एके दिवशी सतीशची करमणूक व्हावी म्हणून किरणने नीलकांताला बोलावून जात्रेतले गाणे म्हणायला सांगितले — नीलकांत गप्प उभा राहिला. किरणने आश्चर्याने विचारले, 'आता तुला काय झालं रे?' नीलकांताने त्याचे उत्तर दिले नाही. किरण पुन्हा म्हणाल्या, 'ते गाणं म्हण ना!' — 'ते मी विसरलो,' असे म्हणून नीलकांत निघून गेला. शेवटी किरणची गावी परतण्याची वेळ आली. सगळे तयारीला लागले; सतीशही बरोबर जाणार होता. पण नीलकांताला कुणी काहीच बोलत नव्हते. तो बरोबर जाईल की इथेच राहील, हा प्रश्नसुद्धा कुणाच्या मनात उमटत नव्हता. किरणने नीलकांताला बरोबर नेण्याचा विषय काढला, तेव्हा सासूबाई, नवरा आणि दीर सगळ्यांनीच एकमुखाने हरकत घेतली; किरणनेही आपला बेत सोडून दिला. शेवटी निघायच्या दोन दिवस आधी किरणने त्या ब्राह्मणाच्या मुलाला बोलावून मायेच्या शब्दांत त्याला आपल्या गावी परत जाण्याचा उपदेश केला. सलग कितीतरी दिवस उपेक्षा सोसल्यानंतर गोड शब्द कानी पडताच त्याला राहवले नाही; तो एकदम रडू लागला. किरणचेही डोळे पाणावले; ज्याला कायम जवळ ठेवता येणार नाही त्याचे काही दिवस लाड करून त्याला लळा लागू देणे बरे झाले नाही, असे वाटून किरणच्या मनाला फार पश्चात्ताप झाला.
वाहून आलेला
सतीश जवळच होता; एवढ्या मोठ्या पोराचे रडणे पाहून तो फार वैतागून म्हणाला, 'अरे मेल्या! ना काही बोलणं ना चालणं, लगेच भोकाड पसरून रडारड!' किरण या कठोर बोलण्याबद्दल सतीशवर रागावल्या; सतीश म्हणाला, 'वहिनी, तुम्हाला कळत नाही; तुम्ही सगळ्यांवरच फार विश्वास ठेवता. कुठला कोण याचा ठिकाणा नाही, इथे येऊन मस्त राजेशाही थाटात राहतोय. आता पुन्हा पुनर्मूषक होण्याच्या धास्तीने आज हे नक्राश्रू ढाळायला लागलाय — त्याला चांगलं ठाऊक आहे की डोळ्यांतून दोन थेंब पाणी गाळलं की तुम्ही विरघळून जाल.' नीलकांत घाईघाईने निघून गेला; पण त्याचे मन सतीशच्या कल्पित मूर्तीला सुरी होऊन कापू लागले, सुई होऊन टोचू लागले, आग होऊन जाळू लागले; पण खऱ्या सतीशच्या अंगावर साधा ओरखडाही उमटला नाही; फक्त त्याच्याच मर्मस्थानातून रक्त वाहत राहिले. कलकत्त्याहून सतीशने एक शोभिवंत दौतदान विकत आणले होते. त्यात दोन्ही बाजूंना शिंपल्याच्या दोन नावांवर दोन दौती बसवलेल्या होत्या, आणि मधोमध जर्मन सिल्व्हरचा एक हंस उघड्या चोचीत लेखणी धरून पंख पसरून बसलेला होता. त्या वस्तूवर सतीशचा फार जीव होता; बरेचदा तो रेशमी रुमालाने अगदी काळजीपूर्वक ती झाडूनपुसून ठेवी. किरण पुष्कळदा थट्टेने त्या रुपेरी हंसाच्या चोचीच्या टोकावर बोटाने टिचकी मारून म्हणत, 'अरे राजहंसा, जन्मुनी द्विजवंशी, असा नृशंस का रे झालास' — आणि याच निमित्ताने दीर-भावजयीत हास्यविनोदाचे वाग्युद्ध रंगे! गावी निघण्याच्या आदल्या दिवशी सकाळी ती वस्तू सापडेना. किरण हसून म्हणाल्या, 'भाऊजी, तुमचा राजहंस तुमच्या दमयंतीच्या शोधात उडून गेला.'
वाहून आलेला
पण सतीश संतापाने लालबुंद झाला. नीलकांतानेच ते चोरले याबद्दल त्याच्या मनात तिळमात्र शंका उरली नाही — काल संध्याकाळी त्याला सतीशच्या खोलीजवळ घुटमळताना पाहिले असा साक्षीदारही मिळाला. आरोपीला सतीशसमोर हजर करण्यात आले. तिथे किरणही होत्या. सतीश त्याच्यावर एकदम ओरडलाच, 'माझी दौत चोरून कुठे ठेवलीस? आणून दे!' नीलकांताने कितीतरी अपराधांबद्दल — आणि विनाअपराधही — शरत्बाबूंचा भरपूर मार खाल्ला होता, आणि नेहमी हसतमुखाने तो सोसला होता. पण किरणसमोर जेव्हा त्याच्यावर दौतचोरीचा आळ आला, तेव्हा त्याचे मोठे मोठे दोन डोळे आगीसारखे जळू लागले; त्याची छाती फुगून कंठाशी दाटून आली; सतीश आणखी एक शब्द बोलता तर तो आपल्या दोन्ही हातांची दहा नखे घेऊन चिडलेल्या मांजराच्या पिलासारखा सतीशवर तुटून पडला असता. तेव्हा किरणने त्याला शेजारच्या खोलीत बोलावून नेऊन मृदू, गोड आवाजात म्हटले, 'नीलू, ती दौत तू घेतली असलीस तर मला हळूच आणून दे, तुला कुणी काही बोलणार नाही!' नीलकांताच्या डोळ्यांतून धारा फुटून टपटप पाणी गळू लागले; शेवटी तो तोंड झाकून रडू लागला. किरण बाहेर येऊन म्हणाल्या, 'नीलकांताने कधीच चोरी केलेली नाही!' शरत्बाबू आणि सतीश दोघेही म्हणू लागले, 'नक्कीच! नीलकांताशिवाय दुसऱ्या कुणीच चोरी केलेली नाही.' किरण ठामपणे म्हणाल्या, 'मुळीच नाही.' शरत्बाबूंना नीलकांताला बोलावून उलटतपासणी घ्यायची होती; किरण म्हणाल्या, 'नाही, या चोरीबद्दल त्याला एक शब्दही विचारायचा नाही.'
वाहून आलेला
सतीश म्हणाला, 'त्याची खोली आणि पेटी शोधून पाहायला हवी.' किरण म्हणाल्या, 'तसं केलंत तर तुमच्याशी माझी जन्माची कट्टी होईल. निर्दोष माणसावर कसलाही संशय घ्यायचा नाही.' बोलता बोलता त्यांच्या पापण्या पाण्याच्या दोन थेंबांनी भिजल्या. त्यानंतर त्या दोन करुण डोळ्यांतल्या अश्रूंची शपथ मानून नीलकांताला कुणी हात लावला नाही. एका निरुपद्रवी, आश्रित पोरावर झालेल्या या अत्याचाराने किरणच्या मनात फार दया दाटून आली. फराशडांग्याच्या धोतर-उपरण्याच्या दोन चांगल्या जोड्या, दोन सदरे, एक नवा जोडा आणि दहा रुपयांची एक नोट घेऊन त्या संध्याकाळी नीलकांताच्या खोलीत शिरल्या. नीलकांताला न सांगता प्रेमाच्या या भेटी हळूच त्याच्या पेटीत ठेवून यावे, असा त्यांचा विचार होता. पत्र्याची ती पेटीही त्यांनीच दिलेली होती. पदराला बांधलेला किल्ल्यांचा जुडगा काढून त्यांनी आवाज न करता ती पेटी उघडली. पण आपल्या भेटी त्यात मावेनात. पेटीत फिरकी, बांबूच्या कामट्या, कैऱ्या कापायला घासून धारदार केलेला शिंपला, फुटक्या पेल्याचा तळ, असे नाना तऱ्हेचे पदार्थ ढिगाने ठेवलेले होते. किरणला वाटले, पेटी नीट आवरून लावली तर सगळे सामान तिच्यात मावेल. म्हणून त्या पेटी रिकामी करू लागल्या. आधी फिरकी, भोवरा, सुरी, छडी वगैरे बाहेर निघू लागले — मग काही मळके आणि धुतलेले कपडे निघाले, आणि मग सगळ्यात तळाशी अचानक सतीशचे ते जिवापाड जपलेले, राजहंसाने सजलेले दौतदान बाहेर आले. किरण चकित झाल्या; चेहरा लाल होऊन बराच वेळ ते हातात धरून त्या विचार करीत राहिल्या.
वाहून आलेला
इतक्यात नीलकांत केव्हा मागून खोलीत आला ते त्यांना कळलेही नाही. नीलकांताने सगळे पाहिले; त्याला वाटले, किरण स्वतःच चोरासारख्या त्याची चोरी पकडायला आल्या आहेत, आणि त्याची चोरी पकडलीही गेली आहे. त्याने एखाद्या साध्या चोरासारखी लोभापोटी चोरी केलेली नाही, त्याने केवळ सूड उगवण्यासाठी हे केले, ती वस्तू गंगेच्या पाण्यात फेकून द्यायची असेच त्याने ठरवले होते, फक्त एका क्षणाच्या दुबळेपणामुळे ती न फेकता त्याने आपल्याच पेटीत कोंबली — या सगळ्या गोष्टी तो कशा समजावून सांगणार! तो चोर नाही, तो चोर नाही! मग तो कोण? तो कोण आहे हे तरी कसे सांगणार! त्याने चोरी केली आहे, पण तो चोर नाही; किरणने त्याला चोर समजून त्याच्यावर संशय घेतला, हा निष्ठुर अन्याय तो कधीही समजावूनही देऊ शकणार नाही, सोसूही शकणार नाही. किरणने एक दीर्घ निःश्वास सोडून ते दौतदान पेटीत ठेवले. चोरासारखे त्यावर मळके कपडे झाकले, त्यावर पोराची फिरकी, काठी, भोवरा, शिंपला, काचेचे तुकडे वगैरे सगळे ठेवले, आणि सर्वांत वर आपल्या भेटी आणि दहा रुपयांची नोट नीट मांडून ठेवली. पण दुसऱ्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या मुलाचा कुठेही पत्ता लागला नाही. गावचे लोक म्हणाले, त्यांनी त्याला पाहिले नाही; पोलीस म्हणाले, त्याचा शोध लागत नाही. तेव्हा शरत्बाबू म्हणाले, 'आता तरी नीलकांताची पेटी तपासून पाहू या.' किरण हट्टाने म्हणाल्या, 'ते कदापि होणार नाही.' असे म्हणून त्यांनी ती पेटी आपल्या खोलीत आणवली, आणि दौत बाहेर काढून गुपचूप गंगेच्या पाण्यात फेकून आल्या. शरत्बाबू सहकुटुंब गावी निघून गेले; बाग एका दिवसात ओस पडली; फक्त नीलकांताचे ते पाळलेले गावठी कुत्रे अन्नपाणी सोडून नदीकाठाने काठाने फिरत फिरत, शोधत शोधत, रडत रडत भटकत राहिले.