रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
वही
लिहायला शिकल्यापासून उमेनं घरात नुसता उच्छाद मांडला आहे. घरातल्या प्रत्येक खोलीच्या भिंतीवर कोळशानं वाकड्यातिकड्या रेघा ओढून मोठमोठ्या कच्च्या अक्षरांत ती एकसारखं लिहीत सुटली आहे— पाणी पडते, पान हलते. तिच्या वहिनीच्या उशीखाली 'हरिदासाची गुप्तकथा' होती; ती शोधून काढून तिच्या पानापानांवर तिनं पेन्सिलीनं लिहिलं आहे— काळे पाणी, लाल फूल. घरात रोज हरघडी लागणाऱ्या नव्या पंचांगातल्या बहुतेक तिथी-नक्षत्रांवर मोठमोठी अक्षरं गिरवून तिनं ती जवळजवळ बुजवूनच टाकली आहेत. वडलांच्या रोजच्या हिशेबाच्या वहीत जमाखर्चाच्या मधोमध तिनं लिहून ठेवलं आहे— लिहील-वाचील जो, गाडीघोड्यात बसेल तो. अशा या साहित्यसेवेत आजवर तिला कुणी कसलीच आडकाठी केली नव्हती; पण शेवटी एके दिवशी एक भयंकर अनर्थ घडला. उमेचा दादा गोविंदलाल दिसायला अगदी गरीब बिचारा, पण वर्तमानपत्रांतून तो सतत लिहीत असतो. त्याचं बोलणं ऐकून त्याच्या नातलगांपैकी किंवा ओळखीच्या शेजाऱ्यांपैकी कुणाला तो विचारी असल्याचा संशयसुद्धा कधी आला नाही. आणि खरंच, तो कधी कुठल्याही विषयावर विचार करतो, असा आळ त्याच्यावर कुणालाही घेता येणार नाही; पण तो लिहितो, आणि बंगालमधल्या बहुसंख्य वाचकांची मतं आणि त्याची मतं हुबेहूब जुळतात. शरीरशास्त्राविषयी युरोपातल्या शास्त्रज्ञमंडळींत काही गंभीर गैरसमज रूढ आहेत. तर्काचा कसलाही आधार न घेता, केवळ अंगावर रोमांच उभे करणाऱ्या भाषेच्या जोरावर ते सगळे मोठ्या तडफेनं खोडून काढणारा एक खुमासदार लेख गोविंदलालनं लिहिला होता. एके दिवशी भर दुपारी, घरात सामसूम असताना, उमेनं दादाची शाई-लेखणी घेतली आणि त्या लेखावर मोठमोठ्या अक्षरांत लिहिलं— गोपाळ फार चांगला मुलगा आहे, त्याला जे देतात ते तो खातो.
वही
गोपाळ म्हणताना तिच्या डोळ्यांसमोर खास गोविंदलालच्या लेखांचे वाचक होते, असं काही मला वाटत नाही; पण दादाच्या संतापाला पारावार उरला नाही. आधी त्यानं तिला मारलं, आणि मग तिची झिजून बुटकी झालेली एक पेन्सिल, टोकापासून बुडापर्यंत शाईनं माखलेली एक बोथट लेखणी— मोठ्या जिवापाड जपून जमवलेला तिचा तुटपुंजा लेखनसामग्रीचा सारा ठेवा— हिसकावून घेतला. एवढी कठोर शिक्षा आपल्याला का झाली, ते पुरतं न कळल्यामुळे ती अपमानित पोर खोलीच्या कोपऱ्यात बसून दुखावल्या मनानं रडू लागली. शिक्षेची मुदत संपल्यावर, मनात थोडासा पस्तावा वाटून गोविंदलालनं लुटून नेलेल्या तिच्या वस्तू उमेला परत केल्या, आणि शिवाय रेघा आखलेली, छान बांधणीची एक वही देऊन पोरीच्या मनाची दुखरी जखम भरून काढायचा प्रयत्न केला. उमा तेव्हा सात वर्षांची होती. तेव्हापासून ही वही रात्री उमेच्या उशीखाली आणि दिवसा सतत तिच्या काखेत किंवा मांडीवर विराजमान होऊ लागली. छोटीशी वेणी घालून, मोलकरणीला सोबत घेऊन ती गावातल्या मुलींच्या शाळेत जायची, तेव्हा वहीसुद्धा बरोबर जायची. ती पाहून मुलींपैकी कुणाला आश्चर्य वाटायचं, कुणाला हाव सुटायची, तर कुणाला मत्सर. पहिल्या वर्षी तिनं अगदी जीव लावून वहीत लिहिलं— किलबिल करिती पाखरे सारी, रात्र सरली. निजायच्या खोलीत जमिनीवर बसून, वही उराशी घट्ट धरून, मोठ्यानं सूर लावून ती वाचायची आणि लिहायची. अशा रीतीनं पुष्कळसं गद्य-पद्य जमा झालं. दुसऱ्या वर्षी मधूनमधून एखाद-दुसरी स्वतंत्र रचना दिसू लागली; अगदी त्रोटक, पण अगदी सकस— ना प्रस्तावना, ना उपसंहार. त्यांतल्या एक-दोन इथे उद्धृत करायला हरकत नाही.
वही
वहीत कथामालेतली वाघ आणि बगळ्याची गोष्ट जिथे उतरवून काढली आहे, तिच्या खाली एका ठिकाणी एक ओळ सापडली. ती ओळ कथामालेत काय, किंवा आजच्या बंगाली साहित्यात आणखी कुठे काय, यापूर्वी कधी आढळलेली नाही. ती ओळ अशी— माझं यशीवर खूप प्रेम आहे. आता मी एखादी प्रेमकथा रचायला बसलो आहे, असं कुणी समजू नये. यशी हा आळीतला कुणी अकरा-बारा वर्षांचा मुलगा नव्हे. ती घरातली एक जुनी मोलकरीण; तिचं खरं नाव यशोदा. पण यशीविषयी पोरीच्या मनात खरोखर काय भावना होती, याचा या एका वाक्यावरून काही पक्का पुरावा मिळत नाही. या विषयावर विश्वसनीय इतिहास लिहायची इच्छा ज्या कुणाला असेल, त्याला याच वहीत दोन पानं पुढे या वाक्याचं स्पष्ट खंडन दिसेल. असं एखाद-दुसरंच नव्हे, उमेच्या लिखाणात पावलोपावली परस्परविरोधाचा दोष आढळतो. एका ठिकाणी दिसलं— हरीशी जन्माची कट्टी. (हरी म्हणजे हरिचरण नव्हे, हरिदासी; शाळेतली वर्गमैत्रीण.) आणि त्याच्या जवळच असं काहीतरी लिहिलं आहे की त्यावरून सहज खात्री पटते, हरीसारखी जिवाभावाची मैत्रीण तिला त्रिभुवनात दुसरी नाही. त्याच्या पुढच्या वर्षी, पोर नऊ वर्षांची असताना, एके दिवशी सकाळपासून त्यांच्या घरी सनई वाजू लागली. उमेचं लग्न. नवऱ्या मुलाचं नाव प्यारीमोहन; गोविंदलालचा सहकारी लेखक. वय फारसं नसलं आणि थोडंफार शिक्षण झालेलं असलं, तरी नव्या विचारांचा वारा त्याच्या मनाला जराही लागला नव्हता. म्हणूनच आळीतले लोक त्याला धन्य धन्य म्हणत, आणि गोविंदलाल त्याचं अनुकरण करायची धडपड करी, पण त्याला पुरतं यश काही आलं नाही.
वही
बनारसी शालू नेसून, इवलासा चेहरा पदरानं झाकून, उमा रडत रडत सासरी गेली. आईनं बजावलं, 'बाळ, सासूबाईंच्या आज्ञेत राहा, घरकाम करीत जा, लिहिण्यावाचण्याच्या नादाला लागू नकोस.' गोविंदलालनं बजावलं, 'हे बघ, तिथे भिंतींवर रेघोट्या ओढत फिरू नकोस; ते तसलं घर नव्हे. आणि खबरदार, प्यारीमोहनच्या कुठल्याही लिखाणावर लेखणी चालवलीस तर!' पोरीच्या छातीत धडकी भरली. तिला तेव्हा कळून चुकलं, आपण जिथे चाललो आहोत तिथे आपल्याला कुणी क्षमा करणार नाही; आणि ती माणसं कशाला दोष म्हणतात, कशाला अपराध म्हणतात, कशाला चूक म्हणतात, हे पुष्कळ बोलणी खाल्ल्यावर, पुष्कळ दिवसांनी शिकून घ्यावं लागेल. त्या दिवशी सकाळीसुद्धा सनई वाजत होती. पण तो पदर, तो बनारसी शालू आणि ते दागदागिने यांनी मढवलेल्या त्या इवल्याशा पोरीच्या थरथरत्या काळजात काय चाललं होतं, ते नीट समजणारा एक तरी माणूस त्या माणसांच्या गर्दीत होता की नाही, याची शंकाच आहे. यशीसुद्धा उमेबरोबर गेली. काही दिवस राहून, उमेचा सासरी जम बसवून देऊन, ती परत येईल, असं ठरलं होतं. मायाळू यशीनं पुष्कळ विचार करून उमेची वही बरोबर नेली होती. ही वही म्हणजे तिच्या माहेरचाच एक तुकडा; जन्मघरातल्या तिच्या अगदी अल्पशा वास्तव्याची मायेची खूण; आईवडलांच्या मांडीवरच्या दिवसांचा एक छोटासा इतिहास— अगदी वेड्यावाकड्या, कच्च्या अक्षरांत लिहिलेला. या अकाली गृहिणीपणात पोरवयाला रुचणाऱ्या, मायेनं गोड झालेल्या थोड्याशा स्वातंत्र्याची चव तिला त्यातच मिळायची.
वही
सासरी गेल्यावर पहिले काही दिवस तिनं काहीच लिहिलं नाही; वेळही मिळाला नाही. मग काही दिवसांनी यशी आपल्या जुन्या ठिकाणी परत गेली. त्याच दिवशी दुपारी उमेनं निजायच्या खोलीचं दार लावून घेतलं, पत्र्याच्या पेटीतून वही बाहेर काढली आणि रडत रडत लिहिलं— यशी घरी गेली, मी पण आईकडे जाणार. हल्ली चारुपाठ आणि बोधोदय यांतून काही उतरवून काढायला सवड नाही; बहुधा तितकी इच्छाही नाही. त्यामुळे हल्ली पोरीच्या त्रोटक रचनांमध्ये फार मोठा खंड पडत नाही. वर दिलेल्या ओळीच्या लगेच पुढे लिहिलेलं दिसतं— दादानं एकदा घरी नेलं तर मी दादाचं लिहिलेलं परत कधी खराब करणार नाही. असं ऐकिवात आहे, की उमेचे वडील उमेला मधूनमधून घरी आणायचा बरेचदा प्रयत्न करतात. पण गोविंदलाल प्यारीमोहनला सामील होऊन त्यांच्या आड येतो. गोविंदलाल म्हणतो, आता उमेनं पतिभक्ती शिकायचे दिवस आहेत; अशा वेळी तिला मधूनमधून पतिगृहातून जुन्या पितृप्रेमाच्या छायेत आणलं, तर तिचं मन उगाच विचलित होतं. या विषयावर उपदेश आणि उपहास यांची गुंफण असलेला असा सुरेख लेख त्यानं लिहिला होता, की जे जे वाचक आधीपासूनच त्याच्या मताचे होते, त्या सर्वांना त्या लेखातलं अकाट्य सत्य पूर्णपणे मान्य केल्यावाचून राहवलं नाही. लोकांच्या तोंडून हीच गोष्ट ऐकून उमेनं वहीत लिहिलं होतं— दादा, तुझ्या पाया पडते, मला एकदा तुमच्या घरी ने, मी तुला परत कधी राग आणणार नाही.
वही
एके दिवशी उमा दार लावून घेऊन वहीत असंच काहीतरी निरर्थक, क्षुल्लक लिहीत बसली होती. तिची नणंद तिलकमंजरी हिला भारी कुतूहल वाटलं; तिला वाटलं, वहिनी मधूनमधून दार लावून घेऊन करते तरी काय, ते पाहिलंच पाहिजे. दाराच्या फटीतून तिनं पाहिलं, तो वहिनी लिहीत होती. ती पाहून थक्क झाली. त्यांच्या अंतःपुरात सरस्वतीचं असं चोरटं आगमन कधीच झालं नव्हतं. तिच्याहून धाकटी कनकमंजरी, तीही येऊन एकदा डोकावून गेली. तिच्याहून धाकटी अनंगमंजरी, तिनंही चवड्यांवर उभं राहून मोठ्या कष्टानं फटीतून त्या बंद खोलीच्या रहस्याचा भेद करून घेतला. लिहिता लिहिता उमेला एकाएकी खोलीबाहेर तीन ओळखीच्या आवाजांचं खिदळणं ऐकू आलं. काय प्रकार आहे ते तिच्या लक्षात आलं; तिनं घाईघाईनं वही पेटीत बंद केली आणि लाजेनं, भीतीनं अंथरुणात तोंड लपवून पडून राहिली. ही बातमी कळल्यावर प्यारीमोहन फारच चिंतेत पडला. एकदा का शिकणं-वाचणं सुरू झालं, की कादंबऱ्या-नाटकांची आवक सुरू होईल, आणि मग गृहधर्म राखणं मुश्कील होऊन बसेल. शिवाय, खास विचार करून या विषयावर त्यानं एक अतिशय सूक्ष्म सिद्धांत शोधून काढला होता. तो म्हणे, स्त्रीशक्ती आणि पुंशक्ती या दोन्ही शक्तींच्या संमीलनातून पवित्र दांपत्यशक्तीचा उद्भव होतो; पण लिहिण्यावाचण्याच्या शिक्षणानं जर स्त्रीशक्ती पराभूत होऊन केवळ पुंशक्तीचाच प्रादुर्भाव झाला, तर पुंशक्तीची पुंशक्तीवर टक्कर होऊन अशी एक प्रलयशक्ती उत्पन्न होते, की तिच्या योगानं दांपत्यशक्ती विनाशशक्तीत विलीन होऊन नाहीशी होते— अर्थात, स्त्री विधवा होते. आजपर्यंत या सिद्धांताचं खंडन कुणालाही करता आलेलं नाही.
वही
संध्याकाळी खोलीत येऊन प्यारीमोहननं उमेची यथेच्छ खरडपट्टी काढली, आणि थोडी थट्टाही केली; म्हणाला, 'आता पगडी शिवायला टाकायला हवी— आमच्या गृहिणी कानाला लेखणी खोचून कचेरीत जाणार!' उमेला ते नीटसं कळलं नाही. प्यारीमोहनचे लेख तिनं कधी वाचले नव्हते, त्यामुळे तेवढी रसिकता अजून तिच्या अंगी आली नव्हती. पण ती मनातल्या मनात अगदी आक्रसून गेली; तिला वाटलं, धरणी दुभंगली तरच आपली लाज राखली जाईल. पुष्कळ दिवस तिनं पुन्हा काही लिहिलं नाही. पण एके दिवशी शरदातल्या सकाळी एक भिकारीण उमा माहेरी येण्याचं आगमनीचं गाणं गात होती. खिडकीच्या गजांवर तोंड टेकवून उमा गप्प ऐकत होती. एक तर शरदाच्या उन्हात लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवतात, त्यात आगमनीचं गाणं ऐकून तिला राहवलं नाही. उमेला गाता येत नव्हतं; पण लिहायला शिकल्यापासून तिला अशी सवय लागली होती की एखादं गाणं ऐकलं की ते लिहून घेऊन ती गाता न येण्याची रुखरुख मिटवायची. आज ती भिकारीण गात होती— नगरीचे लोक म्हणती, उमेच्या आई, तुझी हरवलेली तारा, आली बघ ही. ऐकून वेडीपिशी, राणी धावत सुटे— कुठे उमा, सांगा गं, कुठे? रडत राणी म्हणे, माझी उमा आली— एकदा ये गं, एकदा ये गं, एकदा ये गं, घेते कुशीत. तशी दोन्ही बाहू पसरुनी, आईच्या गळ्याला मिठी घालुनी रुसुनी रडत राणीला बोले— लेक म्हणून मला आणायला कधी आलीस गं? रुसव्यानं उमेचं मन भरून आलं, डोळे पाण्यानं डबडबले. तिनं चोरून त्या गाणारणीला बोलावून घेतलं, खोलीचं दार लावून घेतलं, आणि आपल्या चमत्कारिक शुद्धलेखनात ते गाणं वहीत लिहायला सुरुवात केली.
वही
तिलकमंजरी, कनकमंजरी आणि अनंगमंजरी यांनी त्याच फटीतून सगळं पाहिलं, आणि एकदम टाळ्या पिटून ओरडल्या, 'वहिनी, काय करतेयस ते आम्ही सगळं पाहिलंय!' तशी उमा घाईघाईनं दार उघडून बाहेर आली आणि काकुळतीनं विनवू लागली, 'माझ्या गुणाच्या गं, कुणाला सांगू नका हं, तुमच्या पाया पडते गं— मी परत नाही करणार, मी परत नाही लिहिणार.' शेवटी उमेनं पाहिलं, की तिलकमंजरीची नजर तिच्या वहीवर आहे. तशी ती धावत जाऊन वही छातीशी घट्ट धरून बसली. नणंदांनी पुष्कळ जोर लावून ती हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला; जमलं नाही, तेव्हा अनंगा दादाला बोलावून घेऊन आली. प्यारीमोहन येऊन गंभीरपणे पलंगावर बसला. मेघगर्जनेसारख्या घनगंभीर आवाजात म्हणाला, 'वही दे.' हुकूम पाळला जात नाही असं पाहून आवाज आणखी एक-दोन सूर खाली उतरवून म्हणाला, 'दे.' पोरीनं वही छातीशी धरून अगदी काकुळतीच्या नजरेनं नवऱ्याच्या तोंडाकडे पाहिलं. वही हिसकावून घ्यायला प्यारीमोहन उठला आहे असं दिसताच तिनं ती जमिनीवर टाकून दिली आणि दोन्ही हातांनी तोंड झाकून भुईवर लोळण घेतली. प्यारीमोहननं वही उचलली आणि पोरीचं लिखाण मोठमोठ्यानं वाचू लागला; ते ऐकून उमा धरणीला अधिकाधिक घट्ट कवटाळू लागली; आणि श्रोत्या बनलेल्या बाकीच्या तिघी पोरी खिदळून खिदळून बेजार झाल्या. तेव्हापासून ती वही उमेला पुन्हा कधी मिळाली नाही. प्यारीमोहनचीही सूक्ष्म सिद्धांतांच्या काट्याकुट्यांनी भरलेल्या नाना प्रकारच्या लेखांची एक वही होती; पण ती हिसकावून घेऊन नष्ट करील, असा कुणी मानवजातीचा कैवारी नव्हता.