रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
वैष्णवी
मी लिहितो खरा, पण लोकांना रिझवणं हा काही माझ्या लेखणीचा धर्म नाही; म्हणूनच लोकही मला नेहमी ज्या रंगानं रंगवतात, त्यात काळ्या शाईचाच भाग अधिक असतो. माझ्याबद्दल पुष्कळ काही ऐकावं लागतं; नशिबाचा भाग असा, की त्यातलं काही हिताचं नसतं, आणि मनोहर तर नसतंच नसतं. अंगावर जिथे घाव पडत राहतात, ती जागा कितीही क्षुल्लक असो, वेदनेच्या जोरावर ती सगळ्या शरीराला मागे टाकते. शिव्याशाप खातच ज्याची जडणघडण होते, त्याचा स्वभाव जणू ढकलला जाऊन एकाच बाजूला कलतो — भोवतालचं सगळं ओलांडून त्याला फक्त स्वतःचीच आठवण राहते — त्यात ना सुख, ना कल्याण. स्वतःला विसरणं, हेच तर खरं स्वास्थ्य. म्हणून मला अधूनमधून एकांत शोधावा लागतो. माणसांचे धक्के खाऊन खाऊन मनाला चहूबाजूंनी जे पोचे पडतात, ते विश्वप्रकृतीच्या शुश्रूषेत कुशल अशा हाताच्या गुणानं भरून येतात. कलकत्त्यापासून दूर, एका निवांत ठिकाणी माझ्या अज्ञातवासाची सोय आहे; माझ्याविषयीच्या चर्चेच्या जाचातून मी तिथे अंतर्धान पावतो. तिथले लोक माझ्याबद्दल अजून कुठल्याच निर्णयाला येऊन पोचलेले नाहीत. त्यांनी पाहिलंय — मी भोगी नाही, खेड्याच्या रात्रीला कलकत्त्याच्या कल्मषानं गढूळ करत नाही; योगीही नाही, कारण दुरून माझी जी काही ओळख होते तिच्यात श्रीमंतीची लक्षणं आहेत; मी वाटसरू नाही, खेड्याच्या रस्त्यांवर भटकतो खरा, पण कुठे पोचायचं असा माझा मुळीच रोख नसतो; मी गृहस्थ आहे असं म्हणणंही कठीण, कारण घरच्या माणसांचा पुरावाच नाही. त्यामुळे ओळखीच्या जीवजातींपैकी कुठल्याच रूढ कप्प्यात मला बसवता न आल्यानं गावच्या लोकांनी माझ्याबद्दल विचार करणं जवळजवळ सोडून दिलं आहे, आणि मीही निर्धास्त आहे.
वैष्णवी
थोड्याच दिवसांपूर्वी कळलं, की या गावात एक माणूस असा आहे, ज्यानं माझ्याबद्दल मनात काहीतरी ठरवलं आहे — निदान मी मूर्ख आहे असं तरी नाही. तिची माझी पहिली भेट झाली ती आषाढातल्या एका तिसऱ्या प्रहरी. रडून झाल्यावरही पापण्या ओल्याच राहिल्या की जसा एक भाव असतो, तसाच भाव सकाळचा पाऊस थांबल्यानंतर सगळ्या वेलींत, पानांत, आकाशात आणि वाऱ्यात भरून राहिला होता. आमच्या तळ्याच्या उंच काठावर उभा राहून मी एका गुबगुबीत, काळ्यासावळ्या गाईचं गवत खाणं पाहत होतो. तिच्या तुकतुकीत अंगावर ऊन पडलं होतं; ते पाहून मनात येत होतं — आकाशाच्या प्रकाशापासून आपलं शरीर वेगळं राखण्यासाठी सभ्यतेनं जी एवढी शिंप्यांची दुकानं उभी केली आहेत, त्यासारखी उधळपट्टी दुसरी नाही. तेवढ्यात अचानक पाहतो, तो एका प्रौढ स्त्रीनं जमिनीवर लोटांगण घालून मला नमस्कार केला. तिच्या पदरात काही द्रोणांमधून कण्हेर, गंधराज आणि आणखी दोन-चार प्रकारची फुलं होती. त्यांतलं एक फूल माझ्या हातात देऊन, भक्तीनं हात जोडून ती म्हणाली, 'माझ्या देवाला वाहिलं.' आणि निघून गेली. मी इतका चकित झालो, की तिला नीट पाहताही आलं नाही. प्रकार अगदीच साधा; पण तो माझ्यासमोर असा काही उलगडला, की तिसऱ्या प्रहरच्या धूसर उन्हात शेपटीनं पाठीवरच्या माश्या उडवत उडवत, मोठमोठे सुस्कारे सोडत, नव्या पावसाचं रसरशीत कोवळं गवत शांत आनंदात खात फिरणारी ती गाय — तिची ती जीवनलीला मला फार अपूर्व भासली. हे सांगितलं तर लोक हसतील, पण माझं मन भक्तीनं भरून आलं. सहजानंदानं भरलेल्या त्या जीवनेश्वराला मी नमस्कार केला. बागेतल्या आंब्याची पानांसकट एक कोवळी डहाळी तोडून त्या गाईला खाऊ घातली. मला वाटलं, मी देवतेला संतुष्ट केलं.
वैष्णवी
* * * त्याच्या पुढच्या वर्षी मी तिथे गेलो, तेव्हा माघ संपत आला होता. त्या वेळी अजून थंडी होती. सकाळचं ऊन पूर्वेच्या खिडकीतून येऊन माझ्या पाठीवर पडलं होतं; मी त्याला अडवलं नाही. माडीवरच्या खोलीत बसून लिहीत होतो; तेवढ्यात नोकरानं येऊन सांगितलं, आनंदी वैष्णवी तुम्हाला भेटायचं म्हणते. ही कोण, मला ठाऊक नव्हतं; लक्ष दुसरीकडेच असताना म्हणालो, 'बरं, इथेच घेऊन ये.' वैष्णवीनं पायांची धूळ घेऊन मला नमस्कार केला. पाहिलं, तर तीच ती — माझ्या आधीच्या ओळखीची स्त्री. ती सुंदर आहे की नाही, हे कुणाच्या लक्षात यावं असं तिचं वय केव्हाच उलटून गेलं होतं. भरल्या अंगाची, सर्वसाधारण बायकांपेक्षा उंच; सततच्या भक्तीनं तिचं शरीर नम्र झालेलं, तरीही तिच्या वावरात एक बळकट, निःसंकोच भाव. सगळ्यात आधी नजरेत भरायचे ते तिचे दोन डोळे. आतल्या कुठल्यातरी शक्तीनं ते मोठे मोठे डोळे जणू कुठल्यातरी दूरच्या गोष्टीला जवळ आणून पाहत होते. आपल्या त्या दोन डोळ्यांनी मला जणू ढकलत ती म्हणाली, 'हे आणखी काय नवीन? मला या तुझ्या राजसिंहासनाच्या पायथ्याशी आणून हजर करायचं कारण काय? तुला झाडाखाली पाहायचे, तेच किती छान होतं.' समजलं, की हिनं मला झाडाखाली पुष्कळ दिवस न्याहाळलं होतं, पण मी हिला पाहिलं नव्हतं. सर्दी होऊ घातल्यामुळे काही दिवस रस्त्यावर, बागेत फिरणं बंद करून मी गच्चीवरच संध्याकाळच्या आकाशाशी गाठीभेटी घेत होतो; म्हणून काही दिवस तिला मी दिसलो नव्हतो. जरा थांबून ती म्हणाली, 'गौरा, मला काहीतरी उपदेश कर.' मी पेचात पडलो. म्हणालो, 'मला उपदेश देताही येत नाही, घेताही येत नाही. डोळे उघडे ठेवून गप्प बसलं की जे मिळतं, त्यावरच माझा सगळा व्यवहार. आता हेच पाहा ना, मी तुम्हाला पाहतो आहे — मला दिसतंही आहे आणि ऐकूही येतं आहे.'
वैष्णवी
वैष्णवी भलतीच खूश होऊन 'गौर गौर' करू लागली. म्हणाली, 'देवाला काय फक्त जीभच असते? तो तर सर्वांगानं बोलतो.' मी म्हणालो, 'गप्प बसलं की त्याचं ते सर्वांगाचं बोलणं सर्वांगानं ऐकू येतं. ते ऐकायलाच तर शहर सोडून इथे येतो.' वैष्णवी म्हणाली, 'ते मी ओळखलंय, म्हणून तर तुझ्यापाशी येऊन बसले.' जाताना ती माझ्या पायांची धूळ घ्यायला गेली, तेव्हा पाहिलं — माझ्या मोज्यांना हात लागताच तिला फार अडखळल्यासारखं झालं. दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्य उगवण्याआधी मी गच्चीवर येऊन बसलो होतो. दक्षिणेला बागेतल्या सुरूच्या झाडांच्या शेंड्यांपलीकडे थेट क्षितिजापर्यंत माळ ओसाड पसरला होता. पूर्वेला बांबूच्या बनानं वेढलेल्या गावाच्या कडेला, उसाच्या मळ्याच्या टोकावरून रोज माझ्यासमोर सूर्य उगवतो. गावाचा रस्ता झाडांच्या दाट सावलीतून अचानक बाहेर पडून, मोकळ्या माळाच्या मधून वळण घेत, दूरदूरच्या गावांची कामं उरकायला निघालेला. सूर्य उगवला होता की नाही कोण जाणे. धुक्याची एक शुभ्र चादर विधवेच्या डोईवरच्या पदरासारखी गावातल्या झाडांवर ओढलेली होती. दिसलं, की वैष्णवी त्या पहाटेच्या धूसर उजेडातून, धुक्याचीच एखादी चालती मूर्ती असावी तशी, टाळ वाजवत हरिनाम गात गात त्या पूर्वेकडच्या गावासमोरून चालली आहे. झोपमोड झालेल्या डोळ्यांच्या पापण्यांसारखं केव्हातरी धुकं वर उचललं गेलं, आणि त्या शेतांच्या, घरांच्या नाना कामधंद्यांच्या मधोमध हिवाळ्याचं ऊन गावातल्या आजोबांसारखं येऊन छान ऐसपैस बैठक मारून बसलं. मी तेव्हा संपादकाच्या शिपायाची बोळवण करण्यासाठी लिहायच्या टेबलाशी येऊन बसलो होतो. तेवढ्यात जिन्यावर पावलांच्या आवाजासोबत गाण्याचा सूर ऐकू आला. वैष्णवी गुणगुणत आली, मला नमस्कार करून थोड्या अंतरावर जमिनीवर बसली. मी लिखाणातून मान वर केली.
वैष्णवी
ती म्हणाली, 'काल मला तुझा प्रसाद मिळाला.' मी म्हणालो, 'हे काय सांगताय?' ती म्हणाली, 'काल संध्याकाळी तुझं जेवण केव्हा होतं, त्या आशेनं मी दाराबाहेर बसून होते. जेवण झाल्यावर नोकर ताट घेऊन बाहेर आला; त्यात काय होतं ठाऊक नाही, पण मी खाल्लं.' मी चकित झालो. मी विलायतेला जाऊन आलोय, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. तिथे मी काय खाल्लं, काय नाही, याचा अंदाज बांधणं कठीण नाही; पण प्रायश्चित्ताचं शेण काही मी खाल्लेलं नाही. गेली कित्येक वर्षं मासे-मटणाची रुची मला राहिलेली नाही, हे खरं; पण माझ्या स्वयंपाक्याच्या जातकुळीची चर्चा भर सभेत न केलेलीच बरी. माझ्या चेहऱ्यावर आश्चर्याची चिन्हं पाहून वैष्णवी म्हणाली, 'तुझा प्रसादच जर खाता येत नसेल, तर तुझ्याकडे यायची गरजच काय होती?' मी म्हणालो, 'लोकांना कळलं, तर तुमच्यावरची त्यांची भक्ती उरणार नाही.' ती म्हणाली, 'मी तर सगळ्यांना सांगतच फिरते आहे. ऐकून त्यांनी ठरवलं, हिची दशाच आता अशी झाली आहे.' वैष्णवी पूर्वी ज्या संसारात होती, त्याबद्दल तिच्याकडून मला फारसं काही कळलं नाही. एवढंच ऐकलं, की तिच्या आईची परिस्थिती चांगली आहे आणि ती अजून हयात आहे. आपल्या मुलीची पुष्कळ लोक भक्ती करतात, हे तिला ठाऊक आहे. मुलीनं आपल्याजवळ येऊन राहावं, अशी तिची इच्छा आहे; पण आनंदीचं मन त्याला राजी होत नाही. मी विचारलं, 'तुमचं चालतं कसं?' उत्तरात कळलं, तिच्या भक्तांपैकी एकानं तिला थोडीशी जमीन दिली आहे. तिच्याच पिकावर तीही खाते, चार लोकही खातात, आणि तरी ते संपता संपत नाही. मग जराशी हसून म्हणाली, 'माझ्याकडे तर सगळंच होतं — सगळं सोडून आले, आणि आता पुन्हा लोकांपुढे हात पसरून गोळा करतेय; याची काय गरज होती, सांग बरं?'
वैष्णवी
शहरात असताना हा प्रश्न निघाला असता, तर मी तो सहजासहजी सोडला नसता. भिक्षेवर जगण्यानं समाजाचं किती अहित होतं, ते पटवून दिलं असतं. पण इथे आलं की माझ्या पोथीपढ्या विद्येची सगळी धार एकदम बोथट होऊन जाते. वैष्णवीपुढे कुठलाच वाद माझ्या तोंडून बाहेर पडेना; मी गप्प राहिलो. माझ्या उत्तराची वाट न पाहता ती आपणहूनच म्हणाली, 'नाही नाही, हेच माझ्यासाठी बरं. मागून आणलेलं अन्न, हेच माझं अमृत.' तिच्या बोलण्याचा भाव मला समजला. जो रोज स्वतः अन्न पुरवतो, भिक्षेच्या अन्नात त्याचीच आठवण होते. आणि घरी वाटतं, माझंच अन्न मी स्वतःच्या बळावर भोगतो आहे. तिच्या नवऱ्याच्या घराबद्दल विचारावं अशी इच्छा होती; पण तिनं स्वतः सांगितलं नाही, आणि मीही विचारलं नाही. इथल्या ज्या वस्तीत उच्च वर्णाचे भद्र लोक राहतात, त्या वस्तीबद्दल वैष्णवीला आदर नाही. ती म्हणते, ते देवाला काहीच देत नाहीत, पण देवाच्या नैवेद्यात मात्र सगळ्यांत मोठा वाटा तेच उचलतात. गरीब भक्ती करतात, आणि उपाशी मरतात. या वस्तीतल्या दुष्कृत्यांबद्दल मी बरंच ऐकलं होतं; म्हणून म्हणालो, 'या सगळ्या दुर्बुद्धी लोकांमध्ये राहून त्यांची मती सुधारा; तीच तर देवाची सेवा होईल.' अशा प्रकारचे उच्च दर्जाचे उपदेश मी पुष्कळ ऐकले आहेत, आणि दुसऱ्यांना ऐकवायलाही मला आवडतात. पण वैष्णवी त्यानं काही दिपली नाही. आपले तेजस्वी डोळे माझ्या चेहऱ्यावर रोखून ती म्हणाली, 'तू म्हणतोस, देव पाप्यांमध्येही आहे, म्हणून त्यांची संगत केली तरी त्याचीच पूजा होते. असंच ना?' मी म्हणालो, 'हो.' ती म्हणाली, 'ते जिवंत आहेत, तर तोही त्यांच्याबरोबर आहेच की. पण मला त्याचं काय? माझी पूजा तिथे चालायची नाही; माझा देव त्यांच्यात नाही ना. तो जिथे आहे, तिथेच मी त्याला शोधत फिरते.'
वैष्णवी
असं म्हणून तिनं मला नमस्कार केला. तिच्या बोलण्याचा आशय असा — नुसतं मत घेऊन काय होणार, सत्य हवं ना. देव सर्वव्यापी आहे, ही एक गोष्ट झाली — पण जिथे मी त्याला पाहते, तिथेच तो माझं सत्य. ही इतकी उघड, सांगायचीही गरज नसलेली गोष्ट काही काही लोकांना सांगणं भाग आहे, की माझ्या निमित्तानं वैष्णवी जी भक्ती करते, ती मी स्वीकारतही नाही आणि परतही लावत नाही. आजच्या काळाची लागण मलाही झाली आहे. मी गीता वाचतो, आणि विद्वानांच्या दारी जाऊन धर्मतत्त्वाची पुष्कळ सूक्ष्म विवरणं ऐकली आहेत. नुसतं ऐकत ऐकतच वय सरायची वेळ आली, पण प्रत्यक्ष कुठे काहीच दिसलं नाही. इतक्या दिवसांनी, स्वतःच्या दृष्टीचा अहंकार सोडून, या शास्त्र न जाणणाऱ्या स्त्रीच्या दोन डोळ्यांतून मी सत्य पाहिलं. भक्ती करण्याच्या निमित्तानं शिकवण देण्याची ही काय विलक्षण रीत! दुसऱ्या दिवशी सकाळी वैष्णवी आली, नमस्कार करून पाहते तो मी तेव्हाही लिखाणात गुंतलेलो. वैतागून म्हणाली, 'माझा देव तुला इतकं उगाच का राबवतोय? जेव्हा येते तेव्हा पाहावं तर लिखाणातच बुडालेला!' मी म्हणालो, 'जो माणूस कुठल्याच कामाचा नाही, त्याला देव स्वस्थ बसू देत नाही — नाहीतर तो मातीमोल व्हायचा. जितकी फालतू कामं असतात, त्यांचा भार त्याच्याच माथी.' मी किती आवरणांनी झाकलेला आहे, हे पाहूनच ती अधीर होते. मला भेटायचं तर परवानगी घेऊन माडीवर चढावं लागतं; नमस्कार करायला यावं, तर हाताला लागते मोज्यांची जोडी; दोन साध्या गोष्टी बोलायच्या-ऐकायच्या असतात, पण माझं मन कुठल्यातरी लिखाणात बुडालेलं.
वैष्णवी
हात जोडून ती म्हणाली, 'गौरा, आज पहाटे अंथरुणात उठून बसले मात्र, तोच मला तुझे चरण मिळाले. अहाहा, तुझे ते दोन पाय — कसलंही आच्छादन नाही — किती थंडगार! किती कोमल! कितीतरी वेळ डोक्यावर धरून ठेवले. एवढं पुरे झालं की. मग आता इथे येण्याची मला गरजच काय? प्रभू, हा माझा मोह तर नाही ना? खरं खरं सांग.' लिहायच्या टेबलावर फुलदाणीत आदल्या दिवशीची फुलं होती. माळी येऊन ती काढून नवी फुलं सजवायच्या तयारीला लागला. वैष्णवी जणू दुखावून म्हणाली, 'बस? या फुलांचं काम झालं? तुला आता त्यांची गरज नाही? मग दे, दे, मला दे.' असं म्हणून ती फुलं ओंजळीत घेऊन, कितीतरी वेळ मान खाली घालून, अपार मायेनं एकटक पाहत राहिली. थोड्या वेळानं मान वर करून म्हणाली, 'तू डोळे भरून पाहत नाहीस, म्हणूनच ही फुलं तुझ्यापाशी कोमेजतात. ज्या दिवशी पाहशील, त्या दिवशी तुझं हे लिहिणं-वाचणं सगळं सुटून जाईल.' असं म्हणून तिनं मोठ्या जपणुकीनं ती फुलं आपल्या पदराच्या टोकाला बांधून घेतली, आणि डोक्याला लावून म्हणाली, 'माझ्या देवाला मी घेऊन जाते.' नुसती फुलदाणीत ठेवली म्हणून फुलांचा आदर होत नाही, हे समजायला मला वेळ लागला नाही. मला वाटलं, शाळेतला धडा न येणाऱ्या मुलांसारखं मी त्या फुलांना रोज बाकावर उभं करून ठेवतो. त्याच दिवशी संध्याकाळी मी गच्चीवर बसलो असताना वैष्णवी येऊन माझ्या पायांपाशी बसली. म्हणाली, 'आज सकाळी नाम ऐकवताना तुझ्या प्रसादाची फुलं घरोघर देऊन आले. माझी भक्ती पाहून वेणी चक्रवर्ती हसून म्हणाला, "वेडे, कुणाची भक्ती करतेस गं तू? अख्खं जग त्याला वाईट म्हणतं." खरं का रे, सगळे म्हणे तुला नावं ठेवतात?'
वैष्णवी
फक्त एका क्षणापुरतं माझं मन आकसलं. शाईचे शिंतोडे इतक्या दूरवरही उडतात! वैष्णवी म्हणाली, 'वेणीला वाटलं, माझी भक्ती एका फुंकरीत विझवून टाकेल. पण ही काही तेलाची पणती नाही, ही तर आग आहे! माझ्या गौरा, ते लोक तुला नावं का ठेवतात रे?' मी म्हणालो, 'माझ्या वाट्याचंच आहे ते, म्हणून. मी कधीतरी लपूनछपून त्यांची मनं चोरायचा लोभ धरला असेन.' वैष्णवी म्हणाली, 'माणसांच्या मनात किती विष असतं, ते पाहिलंस ना. आता लोभ टिकायचा नाही.' मी म्हणालो, 'मनात लोभ असला की माराच्या तोंडी राहावंच लागतं. तेव्हा स्वतःला मारायचं विष आपलंच मन पुरवतं. म्हणून माझा मांत्रिक माझंच मन निर्विष करण्यासाठी इतक्या कडकपणे विष उतरवतो आहे.' वैष्णवी म्हणाली, 'दयाळू देव मारून मारूनच मार पळवून लावतो. जो शेवटपर्यंत सोसू शकतो, तोच वाचतो.' त्या संध्याकाळी अंधाऱ्या गच्चीवर संध्यातारा उगवला आणि पुन्हा मावळला; वैष्णवीनं मला आपल्या आयुष्याची कहाणी ऐकवली. * * * माझे पती अगदी साधे, सरळ माणूस. काही काही लोकांना वाटायचं, त्यांची समज कमी आहे. पण मला ठाऊक आहे — जे साधेपणानं समजून घेऊ शकतात, तेच एकूण पाहता बरोबर समजतात. हेही पाहिलं आहे, की शेतीवाडी, जमीनजुमल्याच्या कामात ते फसत असत असं नाही. व्यवहाराचं काम आणि घरचं काम दोन्ही त्यांचं नीटनेटकं होतं. धान, तांदूळ, ताग यांचा जो थोडासा व्यापार ते करत, त्यात त्यांनी कधी तोटा केला नाही. कारण त्यांची हाव थोडी. जेवढं आपल्याला लागतं, तेवढ्याचा ते हिशेब ठेवून चालत; त्यापलीकडचं त्यांना कळतही नसे, आणि त्याला ते हातही लावत नसत.
वैष्णवी
माझ्या लग्नाआधीच माझे सासरे वारले होते, आणि लग्नानंतर थोड्याच दिवसांत सासूबाई गेल्या. संसारात आमच्या डोक्यावर कुणीच नव्हतं. माझ्या पतींना डोक्यावर कुणीतरी वडीलधारं बसवल्याशिवाय राहवत नसे. इतकंच काय, सांगायला लाज वाटते, ते जणू माझीच भक्ती करत. तरी माझी खात्री आहे, त्यांना माझ्यापेक्षा जास्त कळत होतं; मी मात्र त्यांच्यापेक्षा जास्त बोलत होते. सगळ्यांहून जास्त भक्ती ते करायचे आपल्या गुरुमहाराजांची. नुसती भक्ती नव्हे, ते प्रेम होतं — असं प्रेम कुठे पाहायला मिळत नाही. गुरुमहाराज वयानं त्यांच्यापेक्षा थोडे लहान. काय सुंदर रूप होतं त्यांचं! बोलता बोलता वैष्णवी क्षणभर थांबली, आपले ते दूरदूर फिरणारे डोळे खूप दूर पाठवून दिले, आणि गुणगुणत गाऊ लागली — अरुणाची किरणे नव्या अमृतात मळुनी कोण्या विधात्याने हा देह घडविला? या गुरुमहाराजांबरोबर ते लहानपणापासून खेळले होते; तेव्हापासूनच त्यांनी आपलं मन, आपले प्राण त्यांना अर्पण केले होते. त्या काळी गुरुमहाराज माझ्या पतींना मूर्खच समजत. म्हणून त्यांनी त्यांचा पुष्कळ छळ केला. इतर सवंगड्यांबरोबर मिळून थट्टा करकरून त्यांची किती फजिती केली, त्याला सीमा नाही. लग्न होऊन मी या घरी आले, तेव्हा गुरुमहाराजांना पाहिलं नव्हतं. ते तेव्हा काशीला शिकायला गेले होते. तिथला खर्च माझे पतीच पुरवत. गुरुमहाराज गावी परतले, तेव्हा माझं वय बहुधा अठरा असेल. पंधराव्या वर्षी मला एक मुलगा झाला होता. वय कोवळं होतं, म्हणूनच त्या मुलाची निगा राखायला मी शिकले नाही; आळीतल्या सख्या-मैत्रिणींत मिसळायलाच तेव्हा माझं मन धाव घेई. मुलासाठी घरात बांधून राहावं लागतं, म्हणून कधी कधी मला त्याचा रागच येई.
वैष्णवी
हाय रे, मूल येऊन पोचलं आणि आई मात्र मागे रेंगाळत राहिली — याहून मोठं संकट कोणतं असेल? माझा गोपाळ आला, पाहतो तो त्याच्यासाठी अजून लोणी तयार नाही; म्हणून तो रुसून निघून गेला — आणि मी आजही रानोमाळ, घाटोघाट त्याला शोधत फिरते आहे. मुलगा बापाचा नयनमणी होता. मी त्याची निगा राखायला शिकले नाही, म्हणून त्याच्या बापाला दुःख होई. पण त्यांचं हृदय होतं मुकं; आजपर्यंत आपलं दुःख ते कुणापाशी काहीच बोलू शकले नाहीत. बाईमाणसासारखी ते मुलाची निगा राखत. रात्री मूल रडलं, तर माझ्या कोवळ्या वयाची गाढ झोप मोडावी असं त्यांना वाटत नसे. स्वतः रात्री उठून, दूध गरम करून पाजून, कितीतरी रात्री बाळाला कुशीत घेऊन त्यांनी झोपवलं आहे — मला ते कळलंही नाही. त्यांचं सगळं काम असंच, निःशब्द. पूजा-उत्सवाला जमीनदारांच्या वाड्यावर नाटकाचा खेळ किंवा कथा असली, की ते म्हणत, 'मला रात्री जागवत नाही; तू जा, मी इथेच राहतो.' ते मुलाला घेऊन घरी राहिले नाहीत तर माझं जाणं होणार नाही, म्हणून ही त्यांची सबब. आश्चर्य हे, की तरीही मुलाचं सगळ्यांत जास्त प्रेम माझ्यावरच होतं. त्याला जणू कळत होतं, की संधी मिळताच मी त्याला टाकून निघून जाईन; म्हणून तो माझ्याजवळ असतानाही धास्तावलेलाच असे. मी त्याला थोडीच मिळाले होते, म्हणूनच मला मिळवण्याची त्याची आस कशानेच पुरी होत नसे. मी आंघोळीला घाटावर जाई, तेव्हा मला बरोबर ने म्हणून तो रोज मला सतावत असे. घाट म्हणजे माझ्या सख्यांच्या भेटीची जागा; तिथे मूल बरोबर नेऊन त्याच्यावर लक्ष ठेवत बसणं मला आवडत नसे. म्हणून शक्यतो मी त्याला नेत नसे.
वैष्णवी
तो श्रावणाचा महिना होता. थरावर थर दाट काळ्या ढगांनी भर दुपार अगदी डोक्यापासून पायापर्यंत लपेटून ठेवली होती. आंघोळीला निघताना बाळानं भोकाड पसरलं. निस्तारिणी आमच्या स्वयंपाकघरात काम करायची; तिला सांगून गेले, 'बाई गं, मुलाकडे लक्ष ठेव, मी घाटावर एक डुबकी मारून येते.' घाटावर नेमकं त्या वेळी आणखी कुणी नव्हतं. सख्यांची वाट पाहत मी पोहू लागले. तळं प्राचीन काळचं; कुठल्यातरी राणीनं कधीकाळी ते खणवलं होतं, म्हणून त्याचं नाव राणीसागर. पोहून हे तळं अलीकडून पलीकडे पार करणं बायकांमध्ये फक्त मलाच जमायचं. पावसाळा असल्यानं तेव्हा तळं काठोकाठ भरलं होतं. जवळजवळ अर्ध्यावर पोचले असेन, तोच मागून हाक ऐकू आली, 'आई!' वळून पाहिलं, तर बाळ घाटाच्या पायऱ्या उतरत उतरत मला हाका मारतोय. मी ओरडून म्हणाले, 'पुढे येऊ नकोस, मी येतेय.' मनाई ऐकून तो हसत हसत आणखी खाली उतरू लागला. भीतीनं माझ्या हातापायांत जणू पेटकेच आले; पार जाणंच होईना. मी डोळे मिटले — न जाणो काय पाहावं लागेल. तेवढ्यात त्या निसरड्या घाटावर, त्या तळ्याच्या पाण्यात, बाळाचं हसू कायमचं थांबलं. पार होऊन परत आले, आणि आईच्या कुशीसाठी आसुसलेल्या त्या मुलाला पाण्याच्या तळातून उचलून कुशीत घेतलं; पण त्यानं पुन्हा 'आई' म्हणून हाक मारली नाही. माझ्या गोपाळाला मी इतके दिवस रडवलं होतं; ती सगळी हेळसांड आज माझ्यावरच उलटून मला मारू लागली. तो जिवंत असताना मी त्याला नेहमी टाकून निघून जात असे; म्हणूनच आज तो रात्रंदिवस माझ्या मनाला घट्ट बिलगून राहिला. माझ्या पतींच्या काळजाला किती लागलं, ते फक्त त्यांचा अंतर्यामीच जाणे. मला त्यांनी बोल लावले असते, तर बरं झालं असतं; पण त्यांना फक्त सोसता येतं, सांगता येत नाही. अशी मी जवळजवळ वेडी होऊन असताना गुरुमहाराज गावी परत आले.
वैष्णवी
लहानपणी माझे पती त्यांच्याबरोबर खेळले-बागडले, तेव्हाचा भाव निराळा होता. आता इतक्या दीर्घ विरहानंतर त्यांचा बालमित्र विद्या संपादन करून परतला, तेव्हा त्यांच्याविषयी माझ्या पतींची भक्ती अगदी काठोकाठ भरून आली. कोण म्हणेल की हे त्यांचे खेळगडी — यांच्यापुढे त्यांच्या तोंडून जणू शब्दच फुटत नसे. मला सांत्वन द्यावं म्हणून माझ्या पतींनी आपल्या गुरूंना विनंती केली. गुरू मला शास्त्र ऐकवू लागले. शास्त्रातल्या गोष्टींचा माझ्यावर फारसा परिणाम झाला, असं काही वाटत नाही. माझ्या लेखी त्या सगळ्या गोष्टींचं जे काही मोल होतं, ते त्या त्यांच्या तोंडच्या होत्या म्हणून. माणसाच्या कंठातूनच देव माणसाला आपलं अमृत पाजतो; एवढं सुधापात्र त्याच्या हाती दुसरं नाही. आणि त्याच माणसाच्या कंठातून तोही सुधा पितो. गुरूंवरच्या माझ्या पतींच्या अपार भक्तीनं आमचा संसार पोळ्याच्या आतल्या मधासारखा सर्वत्र भरून ठेवला होता. आमचं खाणं-पिणं, वागणं, धन, माणसं — सगळं या भक्तीनं ठासून भरलेलं; कुठे फट म्हणून नव्हती. त्या रसात माझं सगळं मन घेऊन बुडाले, तेव्हाच मला सांत्वन मिळालं. म्हणून देवाला मी माझ्या गुरूंच्याच रूपात पाहू लागले. ते येऊन जेवतील आणि मग मला त्यांचा प्रसाद मिळेल — रोज सकाळी उठल्याबरोबर हीच गोष्ट मनात येई, आणि मी त्या तयारीला लागे. त्यांच्यासाठी भाजी चिरताना माझ्या बोटांतून आनंदाचे सूर वाजत. मी ब्राह्मण नाही, त्यामुळे त्यांना स्वतःच्या हातानं रांधून वाढू शकत नव्हते; म्हणून माझ्या हृदयाची सगळी भूक भागत नसे. ते ज्ञानाचा सागर; त्या बाजूनं त्यांना कसलीच उणीव नाही. मी एक साधी बाई; मी त्यांना फक्त थोडं खाऊ-पिऊ घालून खूश करू शकते — त्यातही किती बाजूंनी किती फटी राहत.
वैष्णवी
माझी गुरुसेवा पाहून माझ्या पतींचं मन खूश होई, आणि माझ्याविषयीची त्यांची भक्ती आणखी वाढे. मला शास्त्राचा अर्थ सांगायला गुरूंना विशेष उत्साह आहे, हे पाहिलं की त्यांना वाटे — बुद्धी नसल्यामुळे गुरूंकडून आपल्याला नेहमी अनादरच मिळाला; आता आपली बायको बुद्धीच्या जोरावर गुरूंना खूश करू शकली, हे आपलं भाग्य. असं करता करता चार-पाच वर्षं कुठून कशी निघून गेली, ते डोळ्यांना दिसलंच नाही. सबंध आयुष्यच असं निघून जाऊ शकलं असतं. पण गुपचूप कुठेतरी एक चोरी चालली होती; ती माझ्या लक्षात आली नाही, अंतर्याम्याच्या लक्षात आली. आणि मग एका दिवशी, एका क्षणात, सगळं उलटंपालटं झालं. त्या दिवशी फाल्गुनातल्या सकाळी घाटाकडच्या सावलीच्या वाटेनं आंघोळ उरकून ओल्या वस्त्रानिशी घरी परतत होते. वाटेच्या एका वळणावर आंब्याच्या झाडाखाली गुरुमहाराज भेटले. खांद्यावर एक पंचा टाकून, कुठलातरी संस्कृत मंत्र म्हणत म्हणत ते आंघोळीला चालले होते. ओल्या वस्त्रात त्यांची भेट झाल्यानं लाजून मी जरा बाजूनं निसटून जायचा प्रयत्न करत होते, तेवढ्यात त्यांनी माझं नाव घेऊन हाक मारली. मी अंग चोरून, मान खाली घालून उभी राहिले. माझ्या चेहऱ्यावर नजर रोखून ते म्हणाले, 'तुझा देह सुंदर आहे.' फांदीफांदीवर जगभरचे पक्षी किलबिलत होते, वाटेच्या कडेकडेनं झुडपांत भारंगीची फुलं फुलली होती, आंब्याच्या फांद्यांना मोहोर येत होता. वाटलं, सगळं आकाश-पाताळ वेडं होऊन सैरभैर झालंय. घरी कशी गेले, काही भान नाही. तशीच ओल्या वस्त्रानिशी देवघरात शिरले; डोळ्यांना जणू देवच दिसेना — त्या घाटाच्या वाटेवरच्या सावलीवर पडलेल्या उन्हाच्या चमचमत्या टिकल्या माझ्या डोळ्यांसमोर सारख्या नाचत राहिल्या.
वैष्णवी
त्या दिवशी गुरू जेवायला आले; त्यांनी विचारलं, 'आंदी का नाही दिसत?' माझ्या पतींनी मला सगळीकडे शोधलं; मी कुठेच सापडले नाही. अहो, माझी ती पृथ्वी आता उरली नाही; तो सूर्याचा प्रकाश मला पुन्हा सापडला नाही. देवघरात माझ्या देवाला हाक मारते, तो माझ्याकडे पाठ फिरवून बसतो. दिवस कुठे कसा गेला, नीट कळलं नाही. रात्री पतींची भेट होणार होती. रात्री सगळं निःशब्द, अंधारलेलं असतं. तेव्हाच माझ्या पतींचं मन जणू ताऱ्यासारखं उमलून येतं. त्या अंधारात कधी कधी त्यांच्या तोंडचा एखादा-दुसरा शब्द ऐकून एकदम उमगतं — हा साधा माणूस जे समजतो, ते किती सहज समजतो. संसाराची कामं आटपून यायला मला उशीर होतो. ते माझ्यासाठी अंथरुणाबाहेरच वाट पाहत थांबतात. बहुधा तेव्हा आमच्या गुरूंबद्दल काही ना काही बोलणं होतं. त्या रात्री मी खूप उशीर केला. तिसरा प्रहर झाला असेल; खोलीत येऊन पाहते तो माझे पती अजून पलंगावर झोपलेले नाहीत, खालीच पडून झोपी गेले आहेत. मी अगदी जपून, आवाज न करता, त्यांच्या पायथ्याशी आडवी झाले. झोपेच्या गुंगीत एकदा त्यांनी पाय झाडला, तो माझ्या छातीवर येऊन लागला. तेच मी त्यांचं शेवटचं दान म्हणून स्वीकारलं आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांना जाग आली, तेव्हा मी उठून बसलेली होते. खिडकीबाहेर फणसाच्या झाडाच्या शेंड्यावरून अंधाराच्या एका कडेला थोडासा रंग चढला होता; अजून कावळेही ओरडू लागले नव्हते. मी पतींच्या पायांशी डोकं टेकवून नमस्कार केला. ते घाईघाईनं उठून बसले, आणि माझ्या चेहऱ्याकडे थक्क होऊन पाहत राहिले. मी म्हणाले, 'आता मी संसार करणार नाही.'
वैष्णवी
पतींना बहुधा वाटलं, आपण स्वप्न पाहतो आहोत. त्यांना काहीच बोलता आलं नाही. मी म्हणाले, 'तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ, तुम्ही दुसरं लग्न करा. मी आता निघाले.' पती म्हणाले, 'हे काय बोलतेस तू? तुला संसार सोडायला कुणी सांगितलं?' मी म्हणाले, 'गुरुमहाराजांनी.' पती गोंधळून गेले, 'गुरुमहाराजांनी! असं ते केव्हा म्हणाले?' मी म्हणाले, 'आज सकाळी आंघोळ करून परतत होते, तेव्हा त्यांची भेट झाली. तेव्हाच म्हणाले.' पतींचा आवाज कापरा झाला. त्यांनी विचारलं, 'त्यांनी अशी आज्ञा का केली?' मी म्हणाले, 'ठाऊक नाही. त्यांनाच विचारा; जमलं तर तेच समजावून सांगतील.' पती म्हणाले, 'संसारात राहूनही संसाराचा त्याग करता येतो; हेच मी गुरूंना समजावून सांगेन.' मी म्हणाले, 'गुरूंना कदाचित पटेलही, पण माझ्या मनाला पटणार नाही. माझं संसार करणं आजपासून संपलं.' पती गप्प बसून राहिले. आकाश उजळलं, तेव्हा ते म्हणाले, 'चल ना, दोघं एकदा त्यांच्याकडेच जाऊ.' मी हात जोडून म्हणाले, 'त्यांची माझी आता भेट होणार नाही.' त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं; मी मान खाली घातली. ते आणखी काहीच बोलले नाहीत. मला ठाऊक आहे, माझ्या मनात काय आहे ते त्यांनी आपल्या परीनं पाहून घेतलं. या जगात दोन माणसांनी माझ्यावर सगळ्यांहून जास्त प्रेम केलं — माझ्या मुलानं आणि माझ्या पतींनी. ते प्रेम माझा नारायण होतं; म्हणून ते खोटं सहन करू शकलं नाही. एकानं मला सोडलं, एकाला मी सोडलं. आता मी सत्य शोधते आहे; आता फसवणूक नाही. असं म्हणून तिनं साष्टांग नमस्कार केला.