हरिपाठ
हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य
हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन । हरिवीण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥ तया नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळही घडलें तीर्थाटन ॥२॥ मनोमार्गें गेला तो येथें मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥ ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडी सर्वकाळ ॥४॥
हरिवंश, म्हणजे श्रीकृष्ण आणि त्याचा वंश यांची कथा, हेच एखाद्याचे पुराण असते. इतरांसोबत हरिनामाचे संकीर्तन हीच त्याची साधना असते, आणि हरीवाचून दुसरा कोणताही चांगुलपणा तो जाणत नाही. अशा माणसाने वैकुंठ जिंकले आहे, आपलेसे केले आहे; त्याच्या हातून सारे तीर्थाटन घडले आहे. जो आपल्या मनामागे जिकडे तिकडे धावतो, तो इथेच हे सारे गमावून बसतो. जो हरिपाठात स्थिर झाला, तोच धन्य. ज्ञानदेवांनी जोडलेले धन म्हणजे हरिनामाची गोडी, आणि सर्वकाळ रामकृष्णांविषयीचे प्रेम.