हरिपाठ
कळिकाळ त्यासी न पाहे
नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी । कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥ रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥ हरि हरि हरि हा मंत्र शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥३॥ ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥
जो नित्य, सत्यभावाने आणि हातचे काही न राखता हरिपाठ करतो, त्याच्याकडे कळिकाळही ढुंकून पाहत नाही. कळिकाळ म्हणजे या कलियुगातला मृत्यू. रामकृष्ण हे नाम उच्चारणे म्हणजे अनंत तपाची रासच आहे; त्यापुढे पापांचे कळप पळत सुटतात. ‘हरि हरि हरि’ हा शिवाचा मंत्र आहे. जे तो वाणीने म्हणतात, त्यांना मोक्ष मिळतो. ज्ञानदेवांचा पाठ म्हणजे नारायणाचे नाम. त्यानेच उत्तम निजस्थान, म्हणजे जीवाचे स्वतःचे खरे घर, प्राप्त होते.