हरिपाठ
पवित्रचि होय देह
हरिपाठ कीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥ तपाचे सामर्थ्यें तपिन्नला अमुप । चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे ॥२॥ मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊन ठेले ॥३॥ ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिलें माझ्या हातीं ॥४॥
जो मुखाने हरिपाठाची कीर्ती गातो, त्याचा देह पवित्रच होतो. तपाचे सामर्थ्य त्याचे होते; त्याने अमाप तप आचरलेले असते. तो चिरंजीव होऊन कल्पभर वैकुंठात नांदतो. त्याची आई, वडील, भाऊ आणि अगणित आप्तस्वकीय, सारे चतुर्भुज होऊन विष्णूचेच रूप पावतात. गूढ, पण जाणता येईल असे ज्ञान ज्ञानदेवांना लाभले आहे. ते म्हणतात, “निवृत्तिनाथांनी ते माझ्या हाती दिले.” विष्णूचे रूप मिळणे ही सारूप्य मुक्ती. पहिल्या अभंगात सांगितलेल्या चार मुक्तींपैकी ती एक आहे.