हरिपाठ
प्रपंचाचा पाश तुटेल
भावेंविण भक्ति भक्तिवीण मुक्ति । बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥१॥ कैसेंनि दैवत प्रसन्न त्वरीत । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥ सायास करिसी प्रपंच दिननिशीं । हरीसी न भजसी कोण्या गुणें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे हरि जप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥
मनात भाव नसेल तर भक्तीची भाषा करू नये. भक्ती नसेल तर मुक्तीची, आणि अंगी बळ नसेल तर शक्तीची भाषा करू नये. प्रत्येक गोष्टीला आपला पाया लागतो. मग देव घाईघाईने कसा प्रसन्न होईल? शांत राहा, निवांत राहा; उगाच शिणतो आहेस. रात्रंदिवस तू प्रपंच चालवण्यासाठी कष्ट उपसतोस. मग हरीला का भजत नाहीस? ज्ञानदेवांचा उपदेश असा: हरीच्या नामाचा जप कर. त्याने प्रपंचाची तुझ्यावरची पकड तुटेल.