हरिपाठ
रामकृष्ण नामाचा ठसा
हरि बुद्धी जपे तो नर दुर्लभ । वाचेसि सुलभ रामकृष्ण ॥१॥ रामकृष्ण नामीं उन्मनी साधिली । तयासी लाधली सकळ सिद्धी ॥२॥ सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले । प्रपंचीं निवाले साधुसंगें ॥३॥ ज्ञानदेवीं नाम रामकृष्ण ठसा । येणें दशदिशा आत्माराम ॥४॥
पूर्ण बुद्धीने हरीचा जप करणारा माणूस दुर्लभ आहे; रामकृष्ण हे नाम मात्र जिभेवर सहज येते. रामकृष्ण नामात ज्याने उन्मनी साधली, त्याला सगळ्या सिद्धी लाभल्या. उन्मनी म्हणजे मन स्वतःच्याही पलीकडे जाते, ती अवस्था. सिद्धी, बुद्धी आणि धर्म, हे सारे हरिपाठातच येऊन मिळाले आहे. प्रपंचात गुंतलेले स्त्री-पुरुष साधूंच्या संगतीने निवले, शांत झाले. ज्ञानदेवांच्या अंतरी रामकृष्ण नाम मुद्रेसारखे उमटले आहे. या नामामुळे दाही दिशांना एकच आत्माराम, सर्वांच्या अंतरी वसणारा राम, भरून राहिला आहे.