हरिपाठ
सर्वत्र वैकुंठ
जाणीव नेणिव भगवंतीं नाहीं । उच्चारणीं पाहीं मोक्ष सदा ॥१॥ नारायण हरी उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥ तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । तें जीव जंतूंसी केंवि कळे ॥३॥ ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥
भगवंताच्या ठायी जाणणेही नाही आणि न जाणणेही नाही. नामाच्या उच्चारणातच सदैव मोक्ष आहे. जिथे “नारायण हरि” हे नाम उच्चारले जाते, तिथे कळिकाळालाही शिरकाव नाही. वेदांनाही त्याचा थांग लागत नाही; मग सामान्य जीवजंतूंना तो कसा कळणार? जिकडे तिकडे वैकुंठच झाले आहे. ज्ञानेश्वरांसाठी नारायणाच्या नामाचा पाठ हेच फळ आहे.