संत कबीर · अंतरीचा देव
जिकडे पाहते, तिकडे लाल
लाली मेरे लाल की, जित देखौं तित लाल। लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल॥
माझ्या लालाची लाली अशी की जिकडे पाहते, तिकडे लालच लाल दिसते. ती लाली पाहायला मी गेले, आणि मीही लाल झाले. इथे बोलते ती नवरी, म्हणजे आत्मा; आणि तिचा लाल म्हणजे प्रियकर, देव. हिंदीत ‘लाल’ या एकाच शब्दाचे दोन अर्थ होतात: लाल रंग आणि लाडका. लाल रंग प्रेमाचा, आणि नवरीच्या शालूचाही. देवाचे तेज पाहायला निघालेली ती स्वतःच त्या रंगात रंगून जाते.