संत कबीर · वाणी, संगत आणि आचरण
काळाच्या हाती झोका
प्राणी तो जिभ्या डिगा, छिन-छिन बोल कुबोल। मन के घाले भरमत फिरे, कालहिं देत हिंडोल॥
माणूस आपल्याच जिभेमुळे घसरतो. क्षणोक्षणी तो कधीच बोलू नयेत असे शब्द बोलून जातो. त्याच्याच मनाने त्याचा घात केला आहे, म्हणून तो भ्रमात भटकत राहतो. आपला झोका तो काळाच्या, म्हणजे मृत्यूच्या, हाती देऊन टाकतो; आता काळच त्याला झुलवत राहतो. झोका कधी थांबत नाही. जीभ आणि भरकटणारे मन यांच्या हेलकाव्यांनी हा माणूसही कधी स्थिर होत नाही; आणि तो ज्या झोक्यावर बसला आहे, तो काळाचा आहे.