मनाचे श्लोक
अंबऋषीचे जन्म हरीने सोसले
बहु श्रापितां कष्टला अंबऋषी। तयाचे स्वयें श्रीहरी जन्म सोशी। दिल्हा क्षीरसिंधू तया उपमानी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥
श्लोक २८ ते ३७ यांचे ध्रुपद थोड्या बदलाने आता परत येते; आणि त्याच्याबरोबर देव आपल्या माणसांची कशी काळजी घेतो, याच्या कथा येतात. देव भक्तांचा अभिमानी आहे; त्यांना तो आपले म्हणतो, आणि त्यांना कधीच अव्हेरत नाही. अंबऋषी राजाने खूप कष्ट सोसले: त्याला पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचा शाप मिळाला होता. ते जन्म श्रीहरीने स्वतः घेतले, आणि त्याच्या जागी सोसले. आणि बाल उपमन्यूला देवाने क्षीरसागर दिला. कथा अशी सांगितली जाते: तापट दुर्वास ऋषींनी या भक्त राजाला हा शाप दिला. ते जन्म विष्णूने घेतले, आणि तेच त्याचे अवतार झाले. उपमन्यू हा एका गरीब ऋषीचा मुलगा; दुधासाठी तो रडत असे. महाभारतात त्याला दुधाचा अख्खा सागर देणारा शंकर आहे.