मनाचे श्लोक
चक्रवाकासाठी जसा सूर्य
सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा । उडी घालितो संकटीं स्वामि तैसा । हरिभक्तिचा घाव गाजे निशाणीं । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
चक्रवाक पक्ष्यासाठी सूर्य रोज सकाळी न चुकता येतो; तसाच दास संकटात सापडला, की स्वामी धावून उडी घालतो. हरिभक्ती नगाऱ्यावर घाव घालून सगळ्यांना आपला संदेश ऐकवते: राम दासांचा अभिमानी आहे, तो त्यांची उपेक्षा कधीही करणार नाही. आपल्या काव्यात चक्रवाकांची जोडी रोज रात्री दुरावते, आणि सूर्योदय त्यांना पुन्हा एकत्र आणेपर्यंत एकमेकांसाठी आक्रोश करत राहते. निशाण म्हणजे राजाची आज्ञा जाहीर करण्यासाठी वाजवला जाणारा मोठा नगारा.