मनाचे श्लोक
देव ज्याचा ऋणी
नसे मानसीं नष्ट आशा दुराशा। वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा। ऋणी देव हा भक्तिभावें जयाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
त्याच्या मनात दुष्ट आशा नाही, हावरी इच्छा नाही. त्याच्या अंतरात तहान असते ती प्रेमपाशाची, म्हणजे त्याला आणि देवाला एकत्र बांधणाऱ्या प्रेमाच्या दोराची. आणि त्याच्या भक्तिभावामुळे देव स्वतः त्याचा ऋणी होतो. जगात धन्य तो सर्वोत्तमाचा दास. पाश म्हणजे फास, पकडून घट्ट धरून ठेवणारा दोर. बहुतेकांना फासात अडकण्याची भीती वाटते. हा भक्त मात्र त्यासाठी तहानलेला असतो; फक्त तो दोर प्रेमाचा असावा, आणि तो त्याला देवाशी बांधणारा असावा. आणि हे बंधन दोन्ही टोकांना घट्ट असते. आपण देवाचे सर्वस्वी ऋणी आहोत, असे आपण मानतो. येथे उलटेच झाले आहे: देव भक्ताचा ऋणी होतो. मोठा उपकार झालेला माणूस जसा उपकार करणाऱ्याचा ऋणी राहतो, तसा.