मनाचे श्लोक
दीनांचा दयाळू, मनाचा मवाळू
दिनाचा दयाळु मनाचा मवाळु। स्नेहाळु कृपाळु जनीं दासपाळु। तया अंतरीं क्रोध संताप कैंचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
जो दीनांवर दया करतो, ज्याचे मन मवाळ आहे, तो सर्वोत्तमाचा दास जगात धन्य. तो प्रेमळ आहे, कृपाळू आहे, आणि लोकांत देवाच्या दासांचा, म्हणजे भक्तांचा, सांभाळ करतो. अशा अंतःकरणात क्रोधाला किंवा संतापाला जागा तरी कोठून मिळणार? दहा चित्रांपैकी हे शेवटचे, आणि सर्वांत सौम्य. गीतेत देवाला प्रिय असलेल्या भक्ताचे वर्णन जवळजवळ याच शब्दांत येते: “जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करत नाही, जो सर्वांचा मित्र आहे, करुणामय आहे.”