मनाचे श्लोक
द्रौपदीसाठी धावणारा देव
तये द्रुपदीकारणें लागवेगें। त्वरें धांवतु सर्व सांडूनि मागें। कळीलागिं जाला असे बोध्य मौनी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥
द्रौपदीसाठी देव सगळे मागे टाकून लगबगीने धावतो; आपल्या भक्ताला तो कधीच निराधार राहू देत नाही. आणि कलियुगासाठी तो मौनी बुद्ध झाला आहे. पुराणे त्या मौनी मुनीला विष्णूच्या अवतारांत गणतात. महाभारतात कौरवांनी भरसभेत द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. तिने कृष्णाचा धावा केला, आणि तिची साडी वाढतच गेली; ती संपेचना.