मनाचे श्लोक
एकांतात रमाकांत भजावा
मना अल्प संकल्प तो ही नसावा। सदा सत्य संकल्प चित्तीं वसावा। जनीं जल्प विकल्प तो ही तजावा। रमाकांत एकांतकाळीं भजावा॥
मन कोणाची संगत धरते, हे सांगून झाल्यावर समर्थ आता मन काय ठरवते, त्याकडे वळतात. मना, एखादा क्षुद्र संकल्पसुद्धा बाळगू नकोस. चित्तात सदैव सत्य संकल्प वसू दे. लोकांत असताना वायफळ बडबड सोडून दे, आणि संकल्प डळमळीत करणारे विकल्पही सोडून दे. आणि एकांताच्या वेळी रमाकांताचे, लक्ष्मीपती विष्णूचे, भजन कर. संकल्प म्हणजे मनाने एखादी गोष्ट करायची ठरवणे. समर्थ येथे विष्णूला रमाकांत म्हणतात, म्हणजे रमेचा, लक्ष्मीचा, प्रिय पती; हे नाव ‘एकांत’ या शब्दाशी नाद साधते. लोकांत बडबड सोडायची, आणि एकांताचा वेळ देवाला द्यायचा.