मनाचे श्लोक
गणेश आणि शारदेला वंदन
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा । नमूं शारदा मूळ चत्वार वाचा । गमूं पंथ अनंत या राघवाचा ॥
समर्थ सुरुवातीला गणेशाला वंदन करतात. गणेश हा शिवाच्या गणांचा अधिपती आहे, आणि सर्व गुणांचा स्वामी आहे. तोच मूळ आरंभ, पहिली सुरुवात; इतकेच नव्हे, तर निर्गुणाचाही आरंभ तोच. मग समर्थ शारदेला वंदन करतात. शारदा ही वाणीची देवता, चारही वाणींचे मूळ. आणि मग ते म्हणतात, चला, आता राघवाच्या, म्हणजे रामाच्या, अनंत वाटेने निघू या. याच रामाची स्तुती हे श्लोक करतात. कोणताही ग्रंथ, लहान असो वा मोठा, विघ्नहर्त्या गणेशाला वंदन करूनच सुरू करण्याची आपली रीत आहे. दासबोधातही समर्थ याच क्रमाने स्तुती करतात: आधी गणेश, मग शारदा. हा श्लोक स्वतंत्र आहे; पुढच्या सगळ्या २०४ श्लोकांचे हे मंगलाचरण आहे.