मनाचे श्लोक
घरी कामधेनू, तरी ताक मागतो
घरीं कामधेनू पुढें ताक मागे। हरीबोध सांडूनि वेवाद लागे। करी सार चिंतामणी काचखंडें। तया मागतां देत आहे उदंडें॥
घरी कामधेनू आहे, तरीही तो ताकासाठी हात पसरतो. हरीचा बोध सोडून तो वादाच्या मागे लागतो. मौल्यवान चिंतामणी हातात असताना तो त्याच्याकडे काचेचे तुकडे मागतो. आणि चिंतामणी मागितल्याप्रमाणे त्याला तेच ढीगभर देतो. ताक इतके स्वस्त, की कोणतेही घर ते सहज देऊन टाकते. जे मागाल ते देणारी कामधेनू घरी असेल, तर कोणापुढे काही मागायची गरजच नाही. चिंतामणी मागितलेले देतो, म्हणून त्या मूर्खाला काचेचे तुकडेच मिळतात. श्लोक ६० ने सांगितले तसे, कामधेनू काय नि चिंतामणी काय, दोन्ही रामच आहेत. ते अगदी हाताशी आहेत, आणि तरी हा त्यांना वादांत वाया घालवतो.